आमच्या तारांगण सोसायटीतल्या उत्साही युवकांनी .. अर्थातच तारांगण ज्येष्ठ नागरिक चमूनं अचानक ठरवलं की क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय स्मारक आपल्या पासून जवळच आहे पण अजून भेट द्यायचा योग आला नाही हे काय बरं नाही. स्मारकाचे उदघाटन तर एप्रिल महिन्यातच झाले .... तीन महिने झाले तरी नाही पाहिलं हे योग्य आहे का हे तुम्हीच सांगा. जगदीश अंकल लैच पेटले अन जाहीर करून टाकले " उद्या दुपारी दोन वा. सोसायटीच्या बाहेरच्या बस स्टॉप वर मी उभा राहणार... ज्यांना कुणाला स्मारक बघायचंय त्यांनी तिथं उपस्थित राहावे." म्हणून लगेच व्हाट्सअप ग्रुपवर यादी करायलाही घेतली. ५ - ७ जण जमले सुद्धा म्हणे.
त्याच दिवशी संध्याकाळी ७ वाजता रोजची गार्डन मिटिंग सुरु झाली .. अन नेमका मी तिथून जात होतो... जगदीश अंकलनी मला आवाज टाकला " चौको, उद्या दुपारी वेळ आहे का तास भर ?
मी : हो, आहे की. काय विशेष ?"
मधेच इंटरप्ट करत किरणभाई : उद्या दु २ नंतर चापेकर स्मारकाला भेट द्यायचं चाललंय ... एकदीड तास लागेल.. आम्ही ५ - ७ जण चाललो आहे. येणार का ?"
मी थोडा विचार करून म्हटलं " हो येईन की"
प्रकाशअंकल, षण्मुगम अंकल किरणभाई आणि इतर खूष झाले !
" व्वा छानच. उल्हासजी उद्गारले. आणि सर्वाना उद्देशून " पण मी काय म्हणतो ... सरळ आपल्या गाड्यांची जाऊ ना !"
" अरे पण कशाला ..? दारासमोरून सिटी बस आहे ... तिकीटही फक्त १० रु... जाऊ या सगळे बसनं" जगदीश अंकल बसनं जाण्याविषयी आग्रही होते .. बसनं बरेच हिंडले होते ... लोकांना एकत्र करणे , बसने जाऊन विविध ठिकाणं हिंडणं , लोकांना इकॉनॉमी ट्रिप्स घडवणे हा त्यांच्या आवडीचा छंद !
" बरोबर ... आणि तिथं जागा तरी आहे का कार किंवा आपल्या टूव्हिलर पार्क करायला ? आधीच अरुंद रस्ता ..समोर मंदिर .. बसनेच जाऊ " सुरेंद्रसरांनी बसला अनुमती दर्शवली !
" आम्ही येतो माझ्या टू व्हीलर वर... चलो मोघेसर... " प्रकाश अंकल उद्गारले. दोन्ही गाड्या दहा पंधरा मिनिटात स्मारकपाशी पोहोचल्या. दुपारची वेळ असल्याने गाड्या लावायला फारशी अडचण आली नाही.
सगळेजण स्मारकाच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. वर ठसठशीत अक्षरे लिहिलेली " क्रांती तीर्थ आणि चौकटीवर क्रांतिवीर चापेकर वाडा " सुंदर नक्षीकाम असलेले लाकडी प्रवेशद्वार.. वर सज्जा त्याला कमानीदार नक्षी काळा कुळकुळीत रंग भारी वाटत होतं. क्रांतीतीर्थ डोळ्यांत भरून घेतले !
दरवाजा मात्र बंद होता. शेजारी खुर्चीवर रक्षक बसला होता.. त्याच्याकडे चौकशी केली त्याने सांगितलं “एक बॅच ऑलरेडी आत मध्ये गेली आहे... दहा मिनिटात येतीलच ते बाहेर. तोपर्यंत इथे या रजिस्टर मध्ये तुमचं नाव आणि मोबाईल नंबर लिहा.
शेजारी वीटकाम डिझाईन असलेल्या भिंतीवर दामोदर, बाळकृष्ण व वासुदेव या तिन्ही चापेकर बंधू आणि महादेव रानडे यांचे भित्तीशिल्प कोरलेले होते. स्वातंत्र्यलढ्यातील धगधगती मशाल आणि त्यात या चार क्रांतिकारकांचे चेहरे आणि खाली संदेश "राष्ट्रीय स्वाहा" त्यांच्या हौतात्म्याला उदात्त करत होते... या क्रांतिकारकांना मनोमन अभिवादन केले
तोपर्यंत आमच्यातील प्रकाश अंकल किरण भाई आणि सुरेंद्र सर यांनी चटपटीतपणा दाखवत क्रांती तीर्थाच्या प्रवेशद्वारांच्या पायऱ्यावर फोटो काढून घेतला. स्मार्ट गाईज !
दहा एक मिनिटांनी आत गेलेला पहिला चमू बाहेर आला. आता पर्यंत आमच्या बॅच सोबत आणखी काही लोकही जॉईन झाले होते. एकावेळी फक्त पंधरा जणांनाच प्रवेश देतात... (अगदी गर्दी असेल तरच वीस जण) प्रवेश विनामूल्य. वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत. दर सोमवारी साप्ताहिक सुट्टी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुट्टी.
प्रवेश करते वेळी आपोआप मुखातून उद्गार उमटले " क्रांतिवीरांचा विजय असो"
आम्ही सर्वजण आत प्रवेश करताच दरवाजा बंद करून घेतला गेला. प्रगायुने (प्रशिक्षित गाईड युवतीने) आमचा ताबा घेतला. सर्वांचा स्वागत करत " तुम्ही भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एका ऐतिहासिक परवाचे साक्षी होणार आहात. पुढील तासभरात मी तुम्हाला क्रांतिवीरांचे जीवनदर्शन घडवणार आहे तसेच या संग्रहालयाची सफर घडवणार आहे.
यावेळी प्रगायुने चापेकर बंधूंच्या वाड्याचा इतिहास सांगितला... चापेकर बंधूंना फाशी झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांची वाहतात झाली वाताहत झाली... त्यांच्या घराचा ताबा टवाळखोर लोकांनी घेतला आणि तिथे गप्पा छाटणे, पत्ते खेळणे, जुगार खेळणे, आधी गैरप्रकार सुरू केले. 1972 साली तेव्हा युवा अवस्थेत असलेल्या पद्मश्री गिरीशजी प्रभुणे आणि त्यांच्या तरुण सहकाऱ्यांनी हे थांबवण्याचा निश्चय करून हे त्यांचे उद्योग उध्वस्त केले.
ज्या वास्तूत क्रांतिक चापेकर बंधूंचा जन्म झाला शिक्षण झाले ज्यांच्या मनात प्रखर देशभक्तीचा जागर झाला आणि त्यातून देश धर्माच्या रक्षणार्थ अतुलनीय धैर्याने त्याने हौतात्मे स्वीकारले त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांनी त्यागाची परिसीमा गाठली त्या वास्तूचे पुनरुत्थान करून त्याला पूर्व वैभव प्राप्त करून देण्याचा दृढ निश्चय केला.
1972 साली क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीची स्थापना करण्यात आली इथे व्यायाम शाळा स्थापन करून व्यायाम पटू तयार करण्याची जबाबदारी घेण्यात आली, चापेकर बंधू स्मृती व्याख्यानमाला उत्साहात साजरी करण्यात आली बालवाडी माध्यमिक शाळा वाचनालय आरोग्य केंद्र इत्यादी सुरू करून स्थानाचा कायापालट करण्यात आला. अशा उपक्रमांना समाजातील दानशूर लोकांनी उदाक्तपणे देणगी देत यात सहभाग घेतला.
1998 साली क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर यांच्या स्मृती शताब्दी सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. या वेळी वाड्यामध्ये यथोचित स्मारक आला करण्यात आला या कालावधीत मी बऱ्याच वेळेला या वाड्याला भेट दिली होती. कोणी पाहुणे आले परगावणि संग्रहालय करण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार वाड्याची डागडूजी करून वाडा लोकांना पाहण्यासाठी 2005 साली खुला करण्यात आला.
(या कालावधीत हा वाडा पाहण्याचे मला अनेकदा योग आले परगावहून कोणी पाहुणे आले की त्यांना मोरया गोसावी मंदिर पाठोपाठ क्रांतीतीर्थ ची मी हमखास सहल घडवत असे.)
२०१४ सालानंतर सरकार पालटले. त्यावेळी हे स्मारक आणखी भव्य करून त्याला डिजिटल तंत्रज्ञानाची जोड "एक अनुभव देणारे" स्मृतिस्थळ घडवण्याचे ठरवण्यात आले. आणि या साठी योग्य तो विधी वेळेत मिळत राहील याची काळजी घेतली गेली. आता तर या स्मारकाला राष्ट्रीय संग्रहालयाचा दर्जा मिळाला असून चापेकर वाड्याच्या मागील बाजूस बहुमजली भव्य संग्रहालय उभा करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या साठी भूसंपादनचे काम पूर्णत्वास येत आहे.
स्मारकाचे उदघाटन करण्यास स्वतः पंतप्रधान उपस्थित राहणार होते, पण त्यांच्या व्यग्र कार्यबाहुल्यांमुळे शेवटी एप्रिल २०२५ मध्ये मा मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या हस्ते आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितित करण्यात आले.
थोड्या वेळाने तळमजल्यावरचे काही दिवे मालवले गेले.
तिथलं तुळशी वृंदावन, गाय वासरू आदि पाहून मन मागच्या शतकात गेलं. एक पडदा जिवंत होऊन बोलू लागला... जुन्या काळातील वाड्याची रचना कशी असायची, कोण कोणत्या वस्तू असायच्या, त्याचा कसा कसा वापर व्हायचा .. याच बरोबर चापेकर कुटुंबीय चिंचवडला कसे आले ... त्यांचे शिक्षण, तरुणपण
या बद्दल माहिती दिली !
वाड्याचा मधला भाग : दोन प्रचि
चापेकर वाड्यातील स्वयंपाकघर
दिवाणखाना / कीर्तन संगीत सरावाची खोली
चापेकर वाड्यातील देवघर
असे प्रसंग सादर करत तळमजल्यावर पूर्ण चाफेकर बंधूंच्या वाड्याची गोष्ट सादर करण्यात आली.
संपूर्ण स्मारक तीन मजले आहे. प्रत्येक मजल्यावर वेगेवेगळे विभाग आहेत. चाफेकर बंधूंच्या जीवनावर आधारित सिलिकॉन पुतळ्यांच्या माध्यमातून अठरा प्रसंग साकारले आहेत. प्रत्येक प्रसंग सादर करण्यापुर्वी प्रगायु ने विशेष माहिती सांगितली. प्रसंग सादर होत असताना त्यांची याची ध्वनीफिती द्वारे माहिती सांगितली गेली तसेच काही प्रसंग दृकश्राव्य माध्यमाने सादर केले गेले.
अरुंदश्या जिन्यावरून वर जाताना पुढील विभाग कोणकोणते आहेत याची माहिती फलका द्वारे दिली होती.
द्रविड बंधूनी ब्रिटिशांना फितूर होत आर्थिक लाभपोटी रँड च्या मारेकऱ्यां विषयी चापेकर बंधूची माहिती ब्रिटिशांना दिली. नंतर वासुदेव चाफेकर व महादेव रानडे यांनी द्रविड बंधूंना ठार केले तो प्रसंग
चापेकर बंधूंना मृत्यूदंडाची शिक्षा दिल्यानंतर भगिनी निवेदिता यांनी त्यांच्या आईचे सांत्वन करण्यासाठी वाड्यास दिलेली भेट दिली तो प्रसंग
येरवडा कारागृहातील भेट : लोकमान्य टिळक आणि चापेकर
आणि शेवटी : ब्रिटिश कमिशनर वॉल्टर चार्ल्स रँड यांची हत्या करण्याचा थरारक प्रसंग ... पाहताना अंगावर काटा येतो.
सगळे पुतळे जिवंत भासावेत इतके हुबेहूब होते. त्याला योग्य ती वेशभूषा, प्रकाश योजना आणि नेपथ्य या मूळे प्रसंग सादर होताना ते पुतळे जिवंत होऊन आपल्याशी बोलत आहेत असा भास होता होत होता.
प्रदर्शन पाहताना तासभर कसा निघून गेला ते कळालेच नाही. शेवटच्या रँड वधा प्रसंगाने कळस चढवला.
स्मारकातून बाहेर पडताना अंगात वेगळेच स्फुरण जाणवत होते. चापेकर बंधू आणि अश्याच क्रांतिकारकांनी आपल्या स्वातंत्र्याचा पाया रचण्यासाठी आपले प्राणार्पण केले !
आज आपण जे काही स्वातंत्र्य उपभोगतो आहोत ते अशाच क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिकांमुळे ही कृतज्ञतेची भावना मनात तरळत होती.
बाहेर प्रतीक्षेत असणारी पुढील बॅच चापेकर बंधू स्मारकात शिरली. पुढील शो साठी दरवाजा लावून घेतला गेला.
क्रांतीतीर्थ बाहेर आमच्या चमूचा फोटो.
आमची दोन तासाची लघुसहल झकास पार पडली त्या आनंदात जवळील कॅफेमध्ये गरमागरम वडापाव खादाडी अन चहापान झाल्यानंतर आम्ही उत्साही तारांगण वासी !
धन्यवाद !
प्रतिक्रिया
7 Aug 2025 - 5:28 pm | सौंदाळा
तुम्ही म्हटल्याप्रमाणेच मी पण घरी येणार्या बर्याच नातेवाईकांना इकडे नेले आहे.
नूतनीकरणानंतर मात्र अजून गेलो नाही, एकदा जाण्यासाठी निघालो पण बाकी कामे करुन पोचेपर्यंत ४.५५ झाले होते त्यामुळे आत सोडले नाही.
असो.
लेख आणि फोटो आवडले.
10 Aug 2025 - 7:41 pm | चौथा कोनाडा
भेट देण्याचे योग लवकर येवोत. आणि शक्यतो समुहाने जावा... ती मजा वेगळीच.
7 Aug 2025 - 7:32 pm | कर्नलतपस्वी
एक मिपाकट्टा चिंचवड येथे होऊन जाऊद्या. मोरया गोसावी मंदिर, चाफेकर वाडा आणी प्रसिद्ध चित्रकारांचे चित्रदालन.
लेख,प्रची आवडली.
12 Aug 2025 - 6:35 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद, कर्नल साहेब !
नक्की करुयात असा मिपाकट्टा. मे बी दिवाळी नंतर सोयीचे पडेल.
7 Aug 2025 - 8:36 pm | कंजूस
स्मारक छानच केले आहे.
आवडला लेख.
१५ ऑगस्ट जवळच आला आहे त्या निमित्ताने योग्य वेळ.
8 Aug 2025 - 1:03 pm | श्वेता व्यास
+१
10 Aug 2025 - 7:42 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद, कंजूस सर & श्वेता व्यास.
11 Aug 2025 - 12:23 pm | कुमार१
स्मारक छानच.
12 Aug 2025 - 6:36 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद, कुमार१ सर