पुन्हा एकदा राजगड-तोरणा

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
4 Dec 2023 - 5:00 pm

नमस्कार मंडळी आज पहिल्यांदा एक प्रयत्न करून बघतो आहे टायपिंग ऐवजी स्पीच टू टेक्स्ट वापरायचा. बघुया कसे जमतेय.
===============================

राजगड तोरणा हा रेंज ट्रेक मी याच्या आधी पण केलाय. साधारण २०१५ मध्ये हा ट्रेक मी एकदा केला होता आणि त्याच्या आधी एकदा २००४ मध्ये तोरणा ते राजगड असा उलट ट्रेक केला होता पण त्यावेळेला आम्ही आदल्या दिवशी रात्री मुंबईहून निघून वेल्ह्यापर्यंत गेलो होतो. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी वेल्ह्यातून तोरण्यावर गेलो होतो. लगेच तोरण्यावरून मागच्या बाजूला बुधला माचीने खाली उतरलो होतो आणि मग पूर्ण डोंगराची रांग पार करून संध्याकाळपर्यंत अळू दरवाजापर्यंत पोचलो होतो आणि तिकडून अळू दरवाजातून संजीवनी माचीवरून पुढे गेलो होतो . रात्री राजगडला पद्मावती माचीवरती पद्मावतीच्या देवळात मुक्काम केला होता पण यावेळी पुणे ते पुणे ट्रेक करायचा असल्यामुळे दोन्ही पर्याय उपलब्ध होते. एक म्हणजे वेल्ह्यातून तोरण्यावर जाऊन तोरण्यावरून खाली बुधलामाची उतरून मग राजगड ला जायचं हा एक पर्याय होता आणि दुसरा म्हणजे प्रथम राजगड ला जायचं आणि मग तिकडून संजीवनी माचीवरून अळू दरवाजातून खाली उतरून डोंगराची पूर्ण धार पार करून धारेवरून बुधला माचीला भेटायचं हा पर्याय होता . पण त्याच्यात एक अडचण अशी होती की आम्ही जेव्हा फेब्रुवारीमध्ये फक्त एक दिवसाचा तोरणा ट्रेक केला होता तेव्हा तोरण्याच्या मुख्य दरवाजामध्ये भरपूर काम चालू असल्यामुळे तो दरवाज्याचा मार्ग बंद केला होता आणि त्याच्यामुळे आम्हाला एकदम शेवटच्या टोकापर्यंत जाऊन अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये जाऊन परत यायला लागलं होतं आणि तोरण्यात प्रवेश करता आला नव्हता. तर या वेळेला असं काही होऊ नये ही एक धाकधूक मनामध्ये होती .कारण दिवसभर चालल्यानंतर राजगडावरून तोरण्यावर आल्यावर समजा पुढचा दरवाजा बंद असेल आणि खाली उतरता न आल्यामुळे अडकायला झालं तर त्यावेळेला काही खटपट करायची ताकद सुद्धा नसणार त्यामुळे त्या एका गोष्टीची धास्ती होती

म्हणून पहिले दोन-तीन ट्रेकिंग ग्रुप वरती मेसेज टाकला आणि विचारलं की सध्या कोणी लेटेस्ट तोरण्यावरती जाऊन आला आहे का? आणि पुढचा दरवाजा उघडा आहे का? हे करेपर्यंत रात्रीचे दहा वाजून गेले होते आणि दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे निघायचं होतं त्याच्यामुळे मला थोडीशी धाकधूक होती की कोणी उत्तर देईल की नाही. पण नशिबाने दोन्ही ग्रुप वर किंवा एकेका माणसाने कन्फर्म सांगितलं की तोरण्याचा पुढचा दरवाजा उघडा आहे त्याच्यामुळे बिनधास्त जा त्यामुळे हूरूप आला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हर हर महादेव करून घराच्या बाहेर पडलो प्रथम रीक्षाने स्वारगेटला पोचलो. स्वारगेट एसटी स्टँड वरचा नेहमीचा सावळा गोंधळ बघत बघत डायरेक्ट वेल्हे बस मिळेल किंवा डायरेक्ट गुंजवणी बस मिळेल याचा काहीच अंदाज नसताना तिथेच घोटाळत उभा राहिलो .शेवटी एक दोन कण्डक्टरशी बोलल्यावर ती असं समजलं की भोर बस लगेच लागणार आहे आणि भोर बसने आम्हाला नसरापूर फाट्याला उतरता येईल म्हणजे थोडक्यात आता आमच्या पुढे दोन्ही पर्याय उपलब्ध होते .पहिले तोरण्यावर जायचं किंवा पहिले राजगडावर जायचं .पटापट तिकीट काढून आम्ही बसमध्ये स्थानापन्न झालो आणि यथावकाश अर्धा पाऊण तासाच्या अंतराने नसरापूर फाट्याला त्या बसने आम्हाला उतरवलं फाटा पार करून चेलाडी गावाच्या तोंडाशी सगळ्या जीप उभ्या असतात तिथे गेलो. लगेच जीपवाल्या काकांनी आम्हाला गराडा घातला पण त्यांच्याशी बोलताना मला ही गोष्ट प्रथम क्लिअर करून घ्यायची होती की पहिले तोरण्याला जावं का पहिले राजगडला जावं ?कुठला पर्याय चांगला आहे ? याचं कारण म्हणजे आम्हाला एकाच दिवसात ट्रेक पूर्ण करून घरी परतसुद्धा यायचं होतं आणि परत येताना कुठल्यातरी एका अशा गावात उतरायचं होतं की जिकडून आम्हाला पुन्हा नसरापूर फाट्याला परतीची जीप किंवा बस किंवा काहीतरी सोय मिळेल. त्यावर त्या सगळ्या लोकांनी आपापसात चर्चा केली एक-दोन जाणकारांचा सल्ला आणि त्यांच म्हणणं असं पडलं की पाली दरवाज्याच्या खालती भोसलेवाडी म्हणून जे ठिकाण आहे तिकडे जर आम्हाला सोडलं तर आम्हाला सोयीस्कर पडेल. याचं कारण म्हणजे भोसलेवाडीत सोडल्यानंतर चढाईचा जवळजवळ अर्धा टप्पा कमी होतो आणि पुढच्या एक तासभरामध्ये आपण गडावरती पोहोचतो .
आता हे सांगण्याआधी थोडीशी राजगडाची रचना सांगतो. राजगड ३ बाजूनी पसरलेला गड आहे. त्याच्या पूर्वेच्या बाजूला सुवेळा माची आहे त्याच्यातून एक वरती येणारा दरवाजा आहे जो फारसा वापरात नाहीये .त्याच्यानंतर पश्चिमेला संजीवनी माची आहे जी भूतोंडेच्या बाजूला पसरलेली आहे आणि भूतोंडे गावातून अळू दरवाजातून तिकडे वरती रस्ता येतो . तिसरी पद्मावती माची आहे जी सगळ्यात प्रशस्त माची आहे आणि त्याच्यातून चोर दरवाजांनी गुंजवणी गावातून मार्ग वरती येतो. याशिवाय पाली दरवाज्यातून सुद्धा राजगडावरती प्रवेश करता येतो जो प्रशस्त पायऱ्यांचा मार्ग आहे . तिन्ही माच्यांच्या मधोमध बालेकिल्ला आहे. बहुतेक वेळा राजगडला येताना मी गुंजवणी गावात येऊन चोर दरवाजांनी वरती येणारा मार्ग वापरला होता आणि अळू दरवाजावरून खाली उतरलो होतो .पण यावेळी जीपवाल्यांच्या सूचनेनुसार आम्ही भोसलेवाडीत आलो. भोसलेवाडीत त्यांनी आम्हाला ड्रॉप केलं आणि तिकडून निघताना स्वतःचा फोन नंबर सुद्धा देऊन ठेवला जेणेकरून संध्याकाळी आमची अडचण होऊ नये. वेल्हे गावांमध्ये उतरल्यानंतर ते स्वतः आम्हाला घ्यायला येतील किंवा एखाद्या गाडीवाल्याला फोन करून तिकडे थांबायला सांगतील हेही सांगितले.

तर वेळ साधारण सकाळी सव्वानऊ ची ज्या वेळेला आम्हाला त्यांनी भोसलेवाडी मध्ये सोडलं .भोसलेवाडी मध्ये सरप्राईज म्हणजे भरपूर मोकळ पठार होतं आणि त्या पठारावरती ५० -७० गाड्या ऑलरेडी लागलेल्या होत्या म्हणजे लोक सकाळपासून किल्ल्यावरती आलेले होते .खालती अर्थातच त्यांची सोय करण्यासाठी सात-आठ चहा दुकानात चहा- नाश्ता अशी सोय होती .बरोबर थोडासा खाऊ आणलेला होता. पाण्याच्या बाटल्यांचा व्यवस्थित नियोजन केलेलं होतं .पण आयता नाश्ता मिळतोय म्हटल्यावर नाश्ता करावा आणि मगच ट्रेक चालू करावा असा विचार करून चहा पोह्यांचा भरगच्च नाश्ता केला आणि त्याच्यानंतर चालायला सुरुवात केली वेळ सकाळी ९:५०.
a

चालायला सुरुवात केली आणि किल्ले राजगड या फलकाने आमचे स्वागत केले ज्यावर राजगडा जी बरीच चांगली माहिती लिहीलेली होती. रास्ता दात झाडीतून होता. पण थोड्याच वेळात दाट झाडी रस्ता संपला. आणि थोडासा खडकाळ भाग लागला. पण रस्ता चांगला होता अन अजून ऊन लागत नव्हते. त्यामुळे छान वाटत होतं. सकाळची सूर्याची किरणे झाडातून पास होत आमच्यापर्यंत पोचत होती आणि छान. नॉस्टॅल्जिक वातावरण तयार झालं होतं. आधी केलेल्या ट्रेकच्या आठवणी मनात जाग्या होत होत्या. हळूहळू कारवीची झाडी संपली. आणि त्याच्यानंतर थोडासा उघड भाग लागला. वाटेत रमत गमत फोटो काढत प्रवास पुढे चालला होता.

a

कुठे कारवीच्या फुलांचा फोटो कधी, तर कुठे पावसाने माती वाहून गेलेल्या खड्ड्यांमध्ये मुळांवर बसून फोटो काढ. असं करता करता रमत गमत पुढे पुढे चाललो होतो. जिथे चढ लागत होता तिथे थोडीशी कसोटी लागत होती. हाश हूश करत करत. प्रवास पुढे चालू होता. एका मोकळवनात आलो आणि खालती नजर टाकली. वा! जिथून सुरुवात केली ते भोसलेवाडी गाव. खाली दूरवर दिसत होते. उभ्या असलेल्या गाड्या एकदम छोट्या चिमटीत मावतील अशा दिसत होत्या. वरच्या बाजूला नजर टाकली तर सूर्य तळपायला लागला होता. आणि त्याचीच थोडीशी चिंता होती. कारण आजच्या दिवसात पूर्ण राजगड तोरणा ही रेंज करायची असल्याने उन्हाचा त्रास नक्कीच होणार होता. आणि तो कमीत कमी व्हावा. अशी इच्छा होती. पण वेळ नव्हता. पुढे मजल मारत राहिलो. कारवीचा टप्पा आता पूर्ण संपला. आणि मोठ मोठ्या दगडांचा टप्पा सुरू झाला. राज गडाची तटबंदी थोडीही जवळ वाटू लागली. तटबंदीमधली छिद्रे, काही बुरुज,जंग्या या गोष्टी दिसू लागल्या. एका बाजूला राजगढच्या. पाली दरवाज्याच्या बाजूला जे काम चालू होतं. तिकडे सामानाची ने आण करण्यासाठी. लावलेली ट्रॉली दिसत होती. ती वर खाली जात होती आणि वाळू दगड आणि बाकी सामानाची ने आण करत होती. वरती वरती वरती जात असताना. एका ठिकाणी वळण घेतलं आणि सुंदर असा पाली दरवाजाच्या रांगेतला पहिला दरवाजा समोर आला. एक चढण पार करून त्या दरवाज्यामध्ये पोचलो. दरवाजा अतिशय अवघड ठिकाणी बांधलेला आहे. शत्रूला सरळ रेषेत वर येता येणार नाही. पूर्ण वळण घेऊनच दरवाजाला तोंड मिळेल अशी रचना केलेली आहे. बरेच ठिकाणी शासनाची दुरुस्तीची कामे चालू असलेली दिसली. नुकताच या कामांमध्ये या दरवाजाचा आतला भाग आणि लाकडी दरवाजा याची रंगरंगोटी आणि दुरुस्ती केलेली दिसली . दरवाजा सुस्थितीत बघून बरं वाटलं.

a

एका दादाकडे लिंबू सरबत प्यायलं. १० मिनिटे थांबून पुढे निघालो. पाली दरवाजाचा बुरुज. आणि आतली तटबंदी अतिशय देखणी दगडी आणि अजूनपर्यंत टिकून असलेली दिसली.

a

काही पायऱ्या चढून. जिथे काम चालू होते तेथे आलो. तिकडे डावीकडे गेलो असतो तर पद्मावती माची लागली असती. पण आज काही बघायला वेळ नव्हता. त्यामुळे लगेच उजवीकडे वळून सरळ बालेकिल्ल्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली. बालेकिल्ला आता नजरेच्या टप्प्यात दिसत होता. थोडा वेळ चालल्यानंतर बालेकिल्ल्याला सरळ नाकाला नाक लावून भेटलो. जर डाव्या बाजूने गेलो असतो तो सुवेळा माचीकडे जाता आले असते. पण आम्हाला उजवीकडे जाऊन संजीवनी माचीचा रस्ता पकडायचा होता. कारण संजीवनी माचीवरूनच अळू दरवाजातून खाली उतरून डोंगरधार चालायला सुरुवात करायची होती.

a

वेळ सकाळी १०.५० . तासाभरात आम्ही भोसलेवाडीतून गडावर पोचून संजीवनी माचीकडे कुच सुद्धा केला होता. हाच वेग पकडून चालत राहणे भाग होते. पुढे एक छोटी शी पडकी कमान पार केली आणि कारवीच्या दाट झाडीत उतरलो. अजून सकाळचा थंडावा होता.

b

गडाची पश्चिमेकडची बाजू असल्यामुळे ऊन अजून इथे पोचले नव्हते. दाट कारवीतून चालायला छान वाटत होते. पाणीही कमी लागत होतो. कारवीतून पुढे पुढे येत एका ठिकाणी बालेकिल्ल्याचा डोंगर संपला. आणि मोकळवनात आलो. नाकासमोर सरळ चालायला सुरुवात केली संजीवनी माचीकडे. संजीवनी माचीकडे जाताना दोन्ही बाजूलाअतिशय सुंदर असा चिलखती बुरुज आहे. मध्ये साधारण २-३ मीटर खोल आणि काहीशे मीटर लांब खंदक आहे. दोन माणसे एका वेळी चालू शकतील असा हा खंदक आहे. माचीकडे जाताना पाण्याची चांगली व्यवस्था केलेली कुंड आहेत. टाक्या आहेत. या टाक्यांच्या बाजूनेच पुढे जात राहिलो. पण तिथे थोडी गफलत झाली. संजीवनी. माचीच्या टोकापर्यंत गेलो तरी अळू दरवाजा काही सापडेना.
b

मला इथे येऊन काही वर्षे. झाली असल्यामुळे स्मरण शक्ती थोडी दगा देत होती. पण अखेर थोडे मागे येऊन शोधाशोध केल्यावर संजीवनी माचीच्या डाव्या बगलेत असलेला अळू दरवाजाचा रस्ता सापडला. आणि खाली खाली उतरत आलोअळू दरवाजापर्यंत पोचलो. दरवाजातून पाठीमागे अतिशय सुंदर खोऱ्यांचे दृष्य दिसत होते. पण त्याचबरोबर आता आपण उन्हामध्ये जाणार असल्याचे लक्षात येत होते. दरवाजातून खाली उतरलो. लवकरच पायऱ्या संपल्या, बुरुजाची तटबंदी संपली. आणि एक वळसा घेऊन आम्ही पुन्हा तटाला भिडलेल्या कारवीमध्ये उतरलो.
a

आता मात्र आम्ही पूर्वेच्या बाजूला असल्यामुळे. उन्हाचा चटका डाव्या बाजूने लागत होता. ट्रेकला खरी सुरुवात झाली होती. उजव्या बाजूला राजगडाची दूरवर पसरलेली तटबंदी आमची साथ करत होती. मधले बुरुज अतिशय सुंदर दिसत होते. ही तीच संजीवनी माचीची चिलखती बुरुजाची तटबंदी होती जी आम्ही आता खालून बघ होतो.

a

लवकरच वाटेत मोठे मोठे दगड धोंडे पडलेले दिसू लागले. आणि रस्त्याने एक उजवीकडे वळण घेतले. इथे भुतोंडे गावातून बिस्लेरीच्या बाटल्यांचे खोके डोक्यावर घेऊन आलेला एक दादा भेटला. त्याला पुन्हा एकदा खात्री करण्यासाठी तोरण्याचा रस्ता विचारला. त्यांनी खात्री दिली की तुम्ही बरोबर रस्त्याने जात आहात. संध्याकाळ पर्यंत तोरण्याला पोहोचाल.

a

फक्त मध्ये एक खिंड आहे. या खिंडीत चुकू नका. परंतु चालण्याच्या नादात त्याच्या या ईशाऱ्याकडे आमचे लक्ष राहिले नाही. आणि त्याचा फटका आम्हाला नंतर बसला.
आता रस्त्याला उतार लागला. घसाऱ्याची वाट आणि नंतर एक रॉक पॅच. संजीवनी माचीवर बसलेल्या लोकांचे आकार लहान होत चालले . त्यांनी आमच्याकडे बघून केलेली बडबड आता कुजबूज केल्यासारखी ऐकू येऊ लागली. थोडासा सावधगिरी बाळगून रॉक पॅच पारसुद्धा केला. ऊन तापायला लागलं होतं. धुक्यामुळे तोरणा अजूनही नीटसा दिसत नव्हता. पण आधी येऊन गेलेले असल्याने. ओळखीच्या खाणाखुणा सापडत होत्या. उन्हातच पुढची वाटचाल चालू ठेवली. अजूनही ऊन असले तरी ते फार टोचत नसल्याने जितकी मजल मारता येईल. तेवढी मारायची ठरवली.

a

पुढे जात. राहिलो आणि उतार संपून सपाट रस्ता सुरू झाला. पुन्हा एकदा दाट कारवीने आम्हाला कवेत घेतले. दोन्ही बाजूला थोडा थोडा उतार असला तरी कारवीची पुरुषभर उंचीची झाडे असल्याने भीती वाटत नव्हती. मधली पायवाट फक्त सरळ पायाखाली ठेवायची एवढेच. साधारण असेच चालत राहिलो. आणि साडेबाराच्या सुमारास ती खिंड लागली. खिंडीत जरा दम खायला बसलो आणि इकडे तिकडे बघितले. रस्ता थोडा फसवा होता. उजवी आणि डावी दोन्हीकडे वाट उतरत होती. आम्ही अंदाजे डावीकडची वाट धरली आणि वेलींना धरून धसक फसक करत खाली उतरू लागलो. पण सुदैवाने दहाच मिनिटात लक्षात आले. की आपली फसगत झालेली आहे. असेच जात राहिलो तर आपण दरीत खाली उतरू. डोक्यावर हात मारला आणि पुन्हा उलट रस्त्याने खिंडीत आलो. त्या पाणीवाल्या दादाचे शब्द आठवायचा प्रयत्न केला. थोडे इथे तिथे बघितले आणि नाकासमोर सरळ वर चढणारी वाट दिसली. अंदाजे ती वाट धरली , सरळ वरती आलो. आणि नजरेसमोर पुन्हा तोरणा दिसू लागला. देवाचे आभार मानले. जर इथे चुकलो असतो. तर ट्रेक इथेच समाप्त झाला असता. वेळ न घालवता पटापट पावले उचलली आणि पुन्हा एकदा विरळ कारवीतून दाट कारवी आणि पुन्हा विरळ असे करत करत पुढे जाऊ लागलो. राजगड आता दूर दूर सरकत होता आणि आमचे लक्ष्य तोरणा पावलापावलाने जवळ येत होता.
,
a

साधारण एक वाजताच्या सुमाराला खिंडीतून जाणारा डांबरी रस्ता लागला. त्याच्या एका बाजूला भोर तर दुसऱ्या बाजूला वेल्हा हा तालूका आहे. तसे फलक लावले आहेत. थोडावेळ डांबरी रस्त्यावर बसून दम खाल्ला आणि पुन्हा समोरचा झाडीचा रस्ता पकडला. वरती गेल्यावर. एक अनगड देऊळ लागले. नऊ सिमेंटच्या खांबावर पत्रे मारून तयार केलेले कोणतेसे देवस्थान दिसत होते. अडीनडीला रात्री २-४ जण वस्ती करायला उत्तम जागा होती. एक चूलसुद्धा लावलेली दिसत होती. पाणी पिण्यासाठी थांबून लगेच पुढची वाट धरली. मला आता जरा टेन्शन येऊ लागले होते कारण उन्हाचा चटका वाढला होता. तोवर साधारण मध्यावर असलेली एक खूण बघायची मला घाई झाली होती. ही म्हणजे पत्र्याची झोपडी जिथे कुणीच राहत नाही. फक्त विकांताला एक मावशी ताक विकायला तिथे येऊन बसतात. साधारण सव्वा वाजण्याच्या सुमाराला ती झोपडी दिसली आणि जीवात जीव आला. अर्धी शर्यत पार केल्याच्या आनंदात बरोबर आणलेला शिधा झोपडीत बसून खाल्ला .

a

पाणी प्यायलो आणि पुढे निघालो. वाट पुन्हा दाट कारवीत घुसली. जेवण नुकतेच झाले होते. पण भरगच्च पोट भरले नव्हते. कारवीची सुंदर सावली साथ करत होती. त्यामुळे चालण्याचे श्रम कमी होत होती. रस्तासुद्धा सपाट होता. त्यामुळे छान वाटत होते. आयुष्यभर असेच चालत रहावे. असेही एक सुंदर फिलिंग मनात येत होते. पुन्हा एकदा एक ओळखीची खूण लागली. कुठल्यातरी स्थानिक देवाचे झाडाखाली तयार केलेले मंदिर होते २ मिनिटे तिथे विश्रांती घेतली. देवासमोर माथा टेकला. आणि पुढे झालो. दुपारचे दोन वाजून गेले होते. पुन्हा रस्ता कारवीतून बाहेर पडला आणि. तोरण्याचा बुधला आता एकदम नाकासमोर दिसू लागला. उजवीकडे झुंजारमाची ची तटबंदीसुद्धा शेवटपर्यंत दिसत होती. एका हुप्प्याचे खूप खूप असे बोल दरीत घुमत होते. मात्र आता वाट डावीकडे वळली. आणि मला पुन्हा वाट चुकल्यासारखे वाटू लागले. पण इथे ही एकच वाट होती आणि दुसऱ्या चोर वाटा दिसत नव्हत्या. त्यामुळे अंदाजे अंदाजे पुढे चालत राहिलो. लवकरच ती वाट पुन्हा उजवीकडे वळली आणि एक मोठा चढ चढून आम्ही मुख्य रस्त्याला लागलो. दुपारचे तीन वाजून गेले होते.

a

तोरणा आता एकदम. टप्यात आला होता असे वाटत होते. पण ते अतिशय फसवे होते. लवकरच रस्त्याला एक चढणीचा रॉक पॅच आला. तापलेला दगड आणि उन्हाचा कहार. तो. रॉक पॅच कसा बसा थांबत थांबत चढलो. थोडी विश्रांती घेऊन पुढे चालू. लागलो आणि तसेच निर्धाराने पुढे जात राहिलो. जवळचे पाणी आता संपायला आले होते. पण त्याच बरोबर बुधला माचीचे खालचे मोकळवण जवळ येत चालले होते. वेळ दुपारी पावणेचार .बुधला माचीच्या खालच्या आसमंतात जरा वेळ टेकलो आणि पुन्हा उजवा रस्ता धरला. अजून एक रॉक पॅच चढून वरती आलो आणि अखेर तोरण्यावर जायची मुख्य खूण, म्हणजे लोखंडी शिडी दिसली.

a

लोखंडी शिडीवरून वर गेलो आणि तोरण्याच्या तटबंदीवर आमचा प्रवेश झाला. लक्ष आता अगदी टप्प्यात आल्यासारखे वाटत होते. पण हासुद्धा भ्रमच होता. तटबंदीवरून उजवीकडे वळून वर. चढायला सुरुवात केली. घशाला कोरड पडली होती. पाण्याचे अतिशय काटेकोर नियोजन. करायला लागत होते. वरची दिशा पकडून, बुधला डावीकडे ठेवत, चालत राहिलो. साधारण. वीसेक मिनिटे चालल्यावर तोरण्याच्या मागचा दरवाजाकडे जाणारी रेलिंग दिसू लागली. परंतु तिथे पोहोचण्याआधी एक अतिशय अवघड टप्पा आ वासून आमची वाट पाहत होता.तो पार पाडायचा होता. हा अजून एक कातळ आहे. जिथे दोन्ही बाजूला दरी आहे. एकमेकांना धीर देत, पायात पेटके आल्यासारखे वाटत असताना, तो टप्पा कसाबसा पार केला. आणि रेलिंगच्या सुरक्षित टप्प्यावरती येऊन एकदाचे हुश्श केले. अजून चाल जरी. संपली नसली. तरी आता सुरक्षित ठिकाणी येऊन पोहोचलो होतो. वेळ संध्याकाळचे साडेचार मागे मावळत्या सूर्याच्या पार्श्वभूमीवर बुधल्याचे सुंदर दर्शन घडत होते. काही फोटो काढले .

a

आता मुख्य आव्हान जरी संपले असले. तरी वेळेत वेल्हे गावात पोचून जीप पकडण्याचे वेगळे आव्हान होते. मागच्या दरवाजात पोचून किल्ल्यात प्रवेश केला. ठिकठिकाणी पुरातत्व विभाग आणि सरकारतर्फे डागडूजीची कामे चालू होती. इतक्या वेळात प्रथमच माणसांचे दर्शन झाले. मेंगाई देवीच्या देवळात पोचलो आणि तिथे काम करणाऱ्या मजुरांना विनंती करून त्यांच्या कडचे पाणी पोट भर प्यायलो. शिवाय बाटल्या सुद्धा भरून घेतल्या आणि तडक खालची वाट पकडली. २० मिनिटांत खाली उतरून तोरण्याच्या मुख्य दरवाजात आलो आणि ट्रेकची जवळपास सांगता झाली. घड्याळात ५ वाजले होते. झकासपैकी फोटो काढले आणि भरल्या मनाने तोरणा उतरायला सुरुवात केली.

a

एक दिवसात राजगड ते तोरणा हा कठीण टप्पा पार पाडल्याचे समाधान मनात भरून राहिले होते. खाली पहिल्या टप्प्यानंतर एका एका काकांकडे लिंबू सरबत पिऊन ताजे तवाने झालो. समोर पसरलेला अथांग जलाशय बघत झपाट्याने खाली उतरू लागलो. आणि सव्वा सहाच्या सुमारास वेल्ह्यात उतरलो. फोन करून कळवले असल्याने जीपवाले काका आमची वाटच बघत होते. थकली शरीरे आणि सॅक जीपमध्ये कोंबल्या आणि. त्याला धन्यवाद देत नसरापूर फाटय़ाकडे आमचा परतीचा प्रवास चालू झाला.(समाप्त)

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

4 Dec 2023 - 6:31 pm | कुमार१

एकदम झक्कासच !!

क्या बात! सुंदर वर्णन आणि फोटो वेगवेगळ्या आकारातले.

कंजूस's picture

4 Dec 2023 - 7:06 pm | कंजूस

भारी भटकंती.

फोटो कोलाज आवडले.

वेगवेगळे पाहिले आहेत.

कर्नलतपस्वी's picture

4 Dec 2023 - 7:38 pm | कर्नलतपस्वी

सुंदर छायाचित्रण, सखोल वर्णन आणी बरोबर तरूण पिढी तयार करता आहात हे प्रशंसनीय आहे.

लेख आवडला हे वेगळे सांगणे नलगे.

प्रचेतस's picture

6 Dec 2023 - 8:58 am | प्रचेतस

खूपच भारी लिहिलंय. राजगड, तोरणा दोन्ही अजस्त्र किल्ले आहेत. राजगडावर तर जनता असते, सर्वसाधारणपणे लोक सुवेळा आणि बालेकिल्लाच पाहतात, संजीवनीकडे त्यामानाने कमी लोक जातात. ज्यांना महाराजांचं दुर्गशास्त्र बघायचं आहे त्यांनी संजीवनी पाहावी. अत्यंत अद्भुत रचना. त्या चिलखतात फिरण्याचा अनुभव अविस्मरणीय. बाकी हा रेंज ट्रेक करणे सोपे काम नव्हे. मस्त एकदम.

राजेंद्र मेहेंदळे's picture

6 Dec 2023 - 3:55 pm | राजेंद्र मेहेंदळे

सर्व वाचकांचे धन्यवाद!!

स्नेहा.K.'s picture

6 Dec 2023 - 10:23 pm | स्नेहा.K.

फोटो अतिशय छान आहेत!

सुंदर वर्णन आणि फोटो. कोलाज तर मस्तच.
राजगड तोरणा एकत्र कधीच केले नाहीत. तुमचा लेख वाचून माहितगार माणूस बरोबर असल्याशिवाय जमणार नाही असे वाटतय.

विअर्ड विक्स's picture

9 Dec 2023 - 9:32 am | विअर्ड विक्स

लेख आवडला .

आता एक पुरवणी येऊ द्या पुढील माहितीसाठी
१. छायाचित्रे विविधरूपात कशी डकवायची
२. टेक्स्ट टू स्पीच चा अनुभव ? चांगला वाईट ?

राजेंद्र मेहेंदळे's picture

11 Dec 2023 - 12:18 pm | राजेंद्र मेहेंदळे

फार काही करावे लागत नाही.
१. स्पीच टू टेक्स्ट- टेक्स्ट टू स्पीच
तशा अनेक वेब्साईट आहेत, पण मी ह्या वेबसाईटचा वापर केला. ७०-७५ टक्के काम झाले , पण नंतर संकलन करताना चुकीच्या ठिकाणी पडलेली विराम चिन्हे, किवा काही ठिकाणी चुकीचे शब्द दुरुस्त करावे लागले. तरीही एकुण वेळ कमी लागला असे म्हणेन.
तरीसुद्धा लिहिताना डोक्यात त्या आठवणी घोळवत लिहिल्यामुळे लेखाला जास्त जिवंतपणा येतो असे वाटते. बोलताना येणार्‍या विचारांचा वेग नीट जुळत नसल्याने ती क्वालिटी कमी होते.

२. फोटो कोलाज- मोबाईलवर फोटो काढले होते. तिथेच लाईव्ह कोलाज नावाचे फोटो कोलाज अ‍ॅप डाउनलोडवले, त्यात पाहीजे त्या फोटोंचे डकवुन कोलाज करुन घेतले आणि ते सेव्ह केले. मग मूळ फोटोंऐवजी ते कोलाज केलेले फोटो गूगल फोटोज मध्ये पब्लिक अ‍ॅक्सेस असलेल्या अल्बम मध्ये अ‍ॅडवले. आणि त्या फोटोंची लिंक लेखात देत गेलो.

गोरगावलेकर's picture

9 Dec 2023 - 5:29 pm | गोरगावलेकर

वर्णन नेहमीप्रमाणे छानच. लहानांना घेऊन केलेली ही भटकंती विशेष आवडली.

सरिता बांदेकर's picture

10 Dec 2023 - 2:33 pm | सरिता बांदेकर

खूप सुंदर लिहीलं आहे. शाळेत असताना गड किल्ल्यावर खूप वेळा जाणं होत असे.आता शक्य होत नाही त्यामुळे अशी वर्णनं वाचली किखूप छान वाटतं.