दिवाळी अंक २०२३ - इन्स्टंट इडली ढोकळा

पियुशा's picture
पियुशा in दिवाळी अंक
12 Nov 2023 - 12:00 am

इन्स्टंट इडली ढोकळा

साहित्य :
१) २ वाट्या बेसन.
२) ३ चमचे आंबट दही.
३) चवीनुसार मीठ.
४) चिमूटभर हळद.
५) १ मोठा चमचा तेल.
६) २ चमचे बारीक रवा.
७) अर्धा चमचा बेकिंग पावडर.
८) अर्धा चमचा बेकिंग सोडा ( खाण्याचा सोडा)
* बेकिंग पावडर किंवा सोडा नसल्यास एक पाकीट इनो फ्रूट सॉल्ट घातले तरी चालते.

कृती :
प्रथम बेसन चाळून घ्यावे, म्हणजे गुठळ्या निघून जातील. मग एक खोलगट मोठी डिश किंवा बाउल किंवा पातेले घेऊन त्यात बेसन घ्यावे. त्यात चवीनुसार मीठ घालावे. आता आंबट दही आणि हळद घालून चमच्याने किंवा whiskerने फिरवून घ्यावे. एक मोठा चमचा तेल ओतावे आणि थोडे थोडे पाणी घालून मिश्रण फेटून घ्यावे. सर्व गुठळ्या गाठी मोडून मिश्रण एकजीव झाले की त्यात रवा घालावा आणि एकदा फेटून मिश्रण १० मिनिटे झाकून ठेवावे, म्हणजे रवा छान फुलून येतो.
तोपर्यंत इडली साच्याला तेल लावून पसरवून घ्यावे आणि इडली पात्रात तांब्या भरून पाणी उकळायला ठेवावे.
१० मिनिटे झाली की मिश्रण रव्यामुळे थोड घट्ट झालेले असेल. त्यात थोडे पाणी घालून पुन्हा एकदा फेटून घ्यावे. बॅटरची कन्सिस्टन्सी खूप पातळ किंवा घट्ट नको, भज्यांचे बॅटर जसे असते, तितकेच मध्यम कन्सिटन्सीचे असावे.
आता यात बेकिंग पावडर आणि सोडा (किंवा eno) घालून त्यावर चमचाभर पाणी ओतावे. याने सोडा activate होतो आणि फसफसतो, त्यामुळे पटकन चमच्याने एका दिशेला १०- १२ सेकंद मिश्रण फिरवून घ्यावे आणि साच्यामध्ये ओतून वाफवायला ठेवावे. १०-१२ मिनिटांत ढोकळा तयार होतो. सुरीने किंवा टूथपिकने ढोकळा इडलीत टोचून बघावे, ती स्वच्छ बाहेर आली तर इडली ढोकळा उत्तम वाफवला गेला आहे .टूथपिकला मिश्रण चिकटत, असेल तर आणखी पाचेक मिनिटे वाफवावे.
वाफवून झालेला इडली ढोकळा ताटात काढून घ्यावा. आता त्यावर ओतण्यासाठीची फोडणीची कृती सांगते.

फोडणीसाठी
एका छोट्या कढईत किंवा फोडणी पात्रात एक डाव (मोठा चमचा) तेल घ्यावे. तेल तापले की गॅसची आच मंद करून त्यात एक चमचा मोहरी, ताजा कढीपत्ता आणि २-३ हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालावेत. मिरच्या तडतडल्यावर त्यात चिमूटभर हिंग घालावे. अर्धा चमचा साखर घालावी आणि मूठभर ताजी कोथिंबीर बारीक चिरून फोडणीत घालावी. चवीपुरते मीठ घालून वरून अर्ध्या लिंबाचा रस घालावा. अर्धा ग्लास पाणी फोडणीत ओतावे.
गॅस बंद करावा आणि ही फोडणी तयार इडली ढोकल्यावर व्यवस्थित पसरावी. याने ढोकळा खाताना कोरडा कोरडा लागत नाही. तेल आणि रवा घातल्याने घशाला कोरड पडत नाही.

आपली इन्स्टंट ढोकळा इडली - इडली ढोकळा तयार आहे. पुदिना चटणीबरोबर किंवा इतर आवडीच्या चटणीबरोबर सर्व्ह करावी.

1


सर्व मिपा वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.


प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Nov 2023 - 1:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ढोकलाही मस्त झालाय.

-दिलीप बिरुटे

ढोकळा हा घरी आठवड्या-पंधरवड्यातुन एकदातरी बनणारा पदार्थ आहे. आता पुढच्यावेळी अशा पद्धतीने बनवुन पहायला सांगणार किंवा स्वतः बनवणार!
रेसिपी आवडली हे वेगळे सांगणे न लगे 👍

श्वेता२४'s picture

16 Nov 2023 - 4:01 pm | श्वेता२४

माझी आवडती रेसिपि. अशीच करते फक्त ढोकळा स्वरुपात करते.

चौथा कोनाडा's picture

18 Nov 2023 - 5:43 pm | चौथा कोनाडा

झकास ढोकळा, मस्त ढोकळा.
फर्मास रेसीपी !
(बायको साठी वाखुसा)
ढोकळा : माझा वीक पॉइंट
आमच्या घरी क्वचित करतात !
एरवी जवळच्या चांगल्या मीठाईवाल्याकडून आणतो !

विवेकपटाईत's picture

9 Dec 2023 - 10:16 am | विवेकपटाईत

रेसिपी आवडली

श्वेता व्यास's picture

29 Dec 2023 - 12:03 pm | श्वेता व्यास

खूप छान रेसिपी दिलीत, चुकण्याला जागा नाही ठेवली कुठे :)
मी ढोकळ्याच्या फोडणीत तीळ पण टाकते, घरी सर्वांना तिळासहित फोडणी आवडते.