व्हेजिटेबल पुलाव
व्हेजिटेबल पुलाव ही खूप साधी सोपी रेसिपी आहे.
साहित्य-
१) बासमती तांदूळ २ वाट्या
२) तेल १ मोठा चमचा
३) जिरे
४) तमालपत्र २
५) लवंग ४-५
६) चक्रीफुल २
७) वेलची ४-६
८) कांदा १ मोठा बारीक चिरून
९) आलं-लसूण पेस्ट १ छोटा चमचा
११) श्रावणी घेवडा, गाजर, बटाटा, ओला वाटाणा प्रत्येकी अर्धी वाटी
१२) हिरवी मिरची ३-४ उभ्या चिरून
दोन वाट्या तांदूळ वीस मिनिट भिजवून ठेवला. त्यानंतर एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवले. पाण्याला थोडी उकळी फुटल्यानंतर त्यामध्ये थोडं मीठ टाकून तांदूळ वाफवून घेतला.
त्यानंतर तांदूळ एका मोठ्या ताटामध्ये थंड करायला ठेवला. नंतर कढई गरम करायला ठेवली.
एक मोठा चमचा तेल गरम केले. त्यामध्ये एक चमचा जिरं घातलं, तमालपत्र ,दालचिनी, लवंग ,स्टार फुल, वेलची हे सगळं घातलं आणि अर्धा मिनिट परतून घेतलं.
त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घातला, कांदा चारेक मिनिटे परतून घेतला. नंतर आलं लसणाची पेस्टही एक चमचा घातली. हे सुद्धा एक मिनिट परतून घेतलं आणि दोन-तीन उभ्या चिरलेल्या मिरच्या परतून घेतल्या.
आता यामध्ये चिरलेल्या भाज्या घातल्या. प्रत्येकी एक वाटी श्रावणी घेवडा, गाजर, बटाटा, ओला वाटाणा या सगळ्या भाज्या काही मिनिटे परतून झाकण ठेवून थोडंसं शिजवून घेतलं,पाणी न टाकता. या भाज्या शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे पाणी न टाकता पण या पटकन शिजतात.
भाज्या शिजवून घेतल्यानंतर थंड झालेला भात त्यामध्ये परतून घेतला आणि चवीनुसार मीठ घातलं सगळं साहित्य एकजीव करून घेतलं.
गॅस बंद करून वाफ मुरू दिली.
पुलाव तय्यार!
डाळ फ्राय
पुलाव सोबत कडकडीत फोडणी दिलेली डाळ मस्त लागते.
साहित्य-
१) तूर डाळ एक वाटी
२) जिरे मोहरी, हळद, गरम मसाला, मिरची पावडर प्रत्येक अर्धा छोटा चमचा
३) कढीपत्ता आवडीनुसार
४) कांदा एक मोठा कांदा बारीक चिरून
५) टोमॅटो दोन मोठे, बारीक चिरून
६) कोथिंबीर सजावटीसाठी
७) लसूण पेस्ट १ छोटा चमचा
८) हिंग
कुकर मध्ये दोन वाट्या पाणी, एक वाटी तुर डाळ, चिमुटभर हिंग, पाव चमचा हळद टाकून चार शिट्ट्या देऊन डाळ शिजवून घेतली.
त्यानंतर कढईत तेल गरम करून घेतले त्यामध्ये मोहरी,जिरं आणि कढीपत्ता टाकला. एक कांदा बारीक चिरून त्यामध्ये परतून घेतला. दोन टोमॅटो बारीक करून तीन चार मिनिटे परतून घेतले.
लसूण पेस्ट टाकली. मिरची पावडर, गरम मसाला, थोडी हळद टाकून परतून घेतलं आणि झाकण ठेवले.
शिजलेली डाळ रवीने हाटून घेतली आणि झाकण काढून त्यामध्ये शिजलेली डाळ टाकली. थोडं पाणी टाकून पाच ते सहा मिनिट शिजवून घेतले.
यावर सजावटीसाठी दोन ब्याडगी मिरच्यांची फोडणी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर अतिशय सुंदर दिसते.
व्हेज पुलाव आणि सोबत ही फोडणी दिलेली डाळ/दाल फ्राय.
प्रतिक्रिया
14 Nov 2023 - 9:02 am | तुषार काळभोर
पुलाव अगदी छान दिसतोय.
14 Nov 2023 - 9:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फोटो लैच भारी. भारी पुलाव.
-दिलीप बिरुटे
14 Nov 2023 - 11:53 am | कर्नलतपस्वी
महारानी डाळ आणी रायता असा सुटसुटीत मेन्यू. तुमची रेसिपी वापरून एक रविवारी बनवून बघतो.
तुरीची आमटी आणी भात म्हणजेच स्वर्ग सुख अशी माझी धारणा आहे.
14 Nov 2023 - 12:11 pm | तुषार काळभोर
कोणतीही आमटी आणि इंद्रायणी भात म्हणजेच स्वर्ग सुख अशी माझी धारणा आहे.
14 Nov 2023 - 7:20 pm | मुक्त विहारि
तोंपासू
14 Nov 2023 - 10:15 pm | स्नेहा.K.
मिपावर लिहिण्याचा माझा पहिलाच प्रयत्न.
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..
16 Nov 2023 - 1:04 pm | चौथा कोनाडा
+१
खुप छान !
पुढील लेखनास हार्दिक शुभेच्छा !
16 Nov 2023 - 11:38 am | टर्मीनेटर
+१
व्हेजिटेबल पुलावची ही साधी सोपी रेसिपी आवडली 👍
दाल फ्राय किंवा दाल तडका मला नुसत्या तुरीच्या डाळीपेक्षा तुर डाळ, मसुर डाळ आणि (थोडी) मुगाची डाळ अशा तीन डाळींपासुन बनवलेला अधिक आवडतो!
16 Nov 2023 - 12:54 pm | चौथा कोनाडा
व्वा, झकास .... मस्तच प्राकृ !
टेस्टी !
मला सौम्य चवीचा पुलाव आवडतो ... अन हा तसाच दिसतोय ,,, म्हणून विशेष भावला !
16 Nov 2023 - 4:05 pm | श्वेता२४
अगदी असाच पुलाव बनवते. मला नुसताच खायला आवडतो. छान रेसिपि
29 Nov 2023 - 6:41 pm | सरिता बांदेकर
मस्त रेसीपी आहेत दोन्ही. फक्त आम्हा कोकणी/ मालवणी लोकांना डाळीत खोबरं लागतंच, मग ती डाळ कुठचीही चालते.
पुलाव रेसीपी करायला सोपी वाटतेय खरी पण जरा जरी पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं कि पुलाव रुसून बसतो.
तुमचा पुलाव खूप छान दिसतोय.
नवीन नवीन रेसीपी टाकत रहा.
29 Nov 2023 - 8:47 pm | राजेंद्र मेहेंदळे
हा पुलाव कॅसेरॉल मधे आणि वरुन काचेचे झाकण(वाफ जायला भोक असलेले) वापरुन बनवला की पाणी कमी /जास्त झाल्यास कळते. पुलावात तसे फसण्यासारखे काही नसते. डाल फ्रायही मस्त दिसतेय. बरोबर भाजका उडीद पापड आणि/किवा आंबा लोणचे मात्र पाहीजेच.
29 Nov 2023 - 10:16 pm | स्नेहा.K.
टर्मिनेटर, श्वेता२४, चौथा कोनाडा, सरिता बांदेकर आणि राजेंद्र मेहेंदळे, धन्यवाद!
30 Nov 2023 - 2:00 pm | श्वेता व्यास
वाह, मस्त दिसतोय पुलाव आणि डाळ फ्राय!