बारा दिवस, तीन बेटे आणि मनसोक्त सुरु असलेली भटकंती.. अमेरिकेचे 'Tropical Gems' म्हणून प्रसिद्ध असलेल्या हवाई बेटांवरील आमची फॅमिली ट्रिप एकुणात मजेत सुरू होती. तसे पाहता हवाई बेटांना आम्ही काही प्रथमच भेट देत नव्हतो, पण या नितांतसुंदर, अद्भुत निसर्गरम्य बेटांची जादूच अशी आहे की प्रत्येक वेळी तुम्ही नव्याने त्यांच्या प्रेमात पडता. स्नोर्कलिंग, स्कुबा डायविंग, डॉल्फिन-व्हेल वॉचिंग, सर्फिंग, पॅरासेलिंग, हेलिकॉप्टर-सबमरीन टूर्स, अगणित हाइक्स-ट्रेल्स, नॅशनल पार्क्स, Luau अशा अनेक अॅक्टिव्हिटीज आणि सकाळ-संध्याकाळ बीचेसवर घालवलेला निवांत वेळ यांत दिवस अक्षरशः पळत होते. त्या दिवशी मात्र सकाळी उठल्याबरोबर आपण प्रचंड थकलो आहोत, हे जाणवले. घरी जायला तसेही अजून चार-पाच दिवस होते, तेव्हा आज जास्त दमछाक न होणारे असे काहीतरी करू या, असे मी आणि नवऱ्याने ठरविले. मग गूगलदेवांना शरण जाऊन थोडी शोधाशोध केली आणि अमेरिकेतील एकमेव शाही निवासस्थान असलेल्या 'इओलानी पॅलेस'ला भेट देण्याचे ठरविले. तोपर्यंत सकाळी-सकाळीच बीचवर पोहायला गेलेली मुलेही परत आली.
"कालच्या त्या रेन फॉरेस्ट हाइकमुळे मी दमले आहे रे! त्यामुळे आज मी आणि बाबा इथला रॉयल पॅलेस बघायला जाऊ. तुमचा आजचा काय प्लॅन आहे?"
"What's the name of the palace again, Aai ?"
"इओलानी पॅलेस!"
Gen Zच्या माझ्या पिल्लांनी पटकन त्यांच्या स्मार्टफोनमध्ये डोके खुपसले अन तिसऱ्याच मिनिटाला "आम्हीपण तुमच्याबरोबर येतोय!" असे जाहीर करून, चौथ्या मिनिटाला इओलानी पॅलेसला फोन लावला आणि सकाळी दहाची self-guided audio tour बुक केलीसुद्धा! आमच्या हॉटेलपासून पॅलेसला जायला अगदीच पंधरा मिनिटे लागणार होती. आम्ही पटापट तयार होऊन भरपेट नाश्ता केला आणि साधारण साडेनऊपर्यंत पॅलेसला पोहोचलो. सकाळची वेळ असल्याने सुदैवाने पेड पार्किंगही राजवाड्याच्या आवारातच मिळाले. इथे दोन तासापर्यंत पेड पार्किंगची सोय आहे. होनोलुलू शहराच्या डाउनटाउनमध्ये असलेले इओलानी पॅलेस हे हवाईच्या राजघराण्याचे अधिकृत निवासस्थान आहे. पाच मजली आणि सुमारे ५०,००० चौ.फूट इतके विस्तीर्ण क्षेत्रफळ असलेल्या या राजवाड्याचे स्थापत्य अतिशय देखणे आहे. अमेरिकन फ्लोरेंटाइन तसेच फ्रेंच आणि इटालियन स्थापत्यशैलीचा आविष्कार असलेली ही वास्तू हवाईयन संस्कृतीचेही सुरेख प्रतिनिधित्व करते.
आमची तिकिटं घेण्यासाठी आम्ही फ्रंट डेस्कवर गेलो. अत्यंत गोड हवाइयन तरुणीने आमचे स्वागत केले. इओलानी पॅलेसची थोडक्यात माहिती देऊन पॅलेसची टूर घेऊन झाल्यावर "तळघरातील प्रदर्शनही आवर्जून बघा, तिथे तुम्हांला राजघराण्यातील दागदागिने, शस्त्रास्त्रे अन शाही पोशाख, कागदपत्रे वगैरे अतिरिक्त गोष्टी बघता येतील" असे तिने सांगितले. आपल्या संस्कृतीचा सार्थ अभिमान तिच्या बोलण्यातून सहज जाणवत होता. त्यासाठी वेगळे शुल्क भरून आम्ही त्याचीही तिकिटे घेतली अन Self-Led Audio Tourसाठी राजवाड्याच्या मागील आवारात पोहोचलो. बरोबर दहा वाजता आमच्या साधारण १५ जणांच्या ग्रूपला एका दालनात जाण्याविषयीं सूचना दिल्या.
प्रथम तिथे आम्हांला या राजवाड्याच्या इतिहासाचा एक माहितीपट दाखविण्यात आला. इओलानी पॅलेस ज्या ठिकाणी बांधला आहे, ते प्राचीन हेयाऊ म्हणजेच हवाईयन संस्कृतीतील अत्यंत पवित्र असे पूजेचे स्थान आहे. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात स्वतंत्र राज्य असलेल्या हवाई बेटांचा डेव्हिड कालाकवा हा कलाप्रेमी, उच्चशिक्षित राजा होता. अमेरिका, युरोपियन राष्ट्रांना भेट देणारा तो हवाईयन राजघराण्यातील प्रथम राजा होता. युरोपमधील राजघराण्यांचे ऐश्वर्य, त्यांचे रितीरिवाज आणि प्रामुख्याने त्यांचे अतिशय भव्य राजवाडे पाहून तो फारच प्रभावित झाला. पुढे, हवाई बेटांवर परतल्यावर त्याने स्वतःसाठी असेच एक भव्य शाही निवासस्थान बांधायचे ठरविले. हवाईयन संस्कृती आणि परंपरा यांची पुरेपूर झलक दाखविणाऱ्या या राजवाड्याचे बांधकाम इ.स.१८७९मध्ये सुरू झाले आणि साधारण तीन वर्षांनी १८८२मध्ये पूर्ण झाले. त्या काळीही इओलानी पॅलेस विद्युत दिवे, फ्लश टॉयलेट्स आणि इंटरकॉम टेलिफोन अशा अत्याधुनिक प्रणालींनी युक्त होता. अशा रितीने ही भव्य वास्तू स्वतंत्र हवाई राज्याचे शेवटचे दोन वंशज राजा डेव्हिड कालाकवा आणि त्याची बहीण राणी लिलिऊ ओकलनी यांचे शाही निवासस्थान झाले. पुढे, १८९१मध्ये राजा कालाकवाचा मृत्यू झाल्यावर राणी लिलिऊ ओकलनी हिने हवाईची राजधुरा सांभाळली. हवाई राज्य ही एक मोठी राजकीय शक्ती म्हणून उदयास यावें, यासाठी तिने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. परंतु, इ.स. १८९५मधील राजकीय बंडानंतर तिला दोषी ठरविण्यात आले आणि याच राजवाड्याच्या दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीमध्ये तिला बंदिवासात ठेवले गेले.
त्यानंतर आमच्या ग्रूप गाइडने काही सूचना दिल्या. त्यांत फोटोग्राफी कशी करावी, आतील मौल्यवान वस्तूंपासून ठरावीक अंतर ठेवणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राजघराण्याचा योग्य सन्मान राखणे अशा काही गोष्टींचा समावेश होता.आम्ही विचारलेल्या काही प्रश्नांचीही त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. आमच्या ग्रूपमध्ये मध्यमवयीन पालक आणि इतिहासप्रेमी तरुण मुलेच जास्त असल्याने माहितीची मस्त देवाणघेवाण होत होती. इथे थोडे अस्थानी होईल, पण मला आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते. अमेरिकन्स बऱ्यापैकी छान गप्पिष्ट तर असतातच, तशीच त्यांची विनोदबुद्धीही वाखाणण्याजोगी असते. अमेरिकेतल्या वास्तव्यात रोजच्या दैनंदिन आयुष्यात असो अथवा अन्य परक्या ठिकाणी भटकंती करताना असो, जे जे लोक आम्हांला भेटलेले आहेत, हा अनुभव मला सार्वत्रिक आला आहे. आमचा टूर ग्रूपसुद्धा त्याला अपवाद नव्हता. छान गप्पा मारत, थोडेफार विनोद करत आम्ही सर्वच जण आमची राजमहालाची टूर घेण्यास सज्ज झालो. मग गाइडने आम्हांला प्रत्येकाला ऑडिओ डिव्हाइस दिला. साधारण ९० मिनिटांची ही प्रिरेकॉर्डेड ऑडिओ टूर असून इंग्लिश, जॅपनीज, फ्रेंच, स्पॅनिश, हवाईयन, जर्मन, कोरियन अशा इतर भाषांतदेखील उपलब्ध आहे. प्रत्येक दालनाची विशेष माहिती, सजावटीचे वैशिष्ट्य आणि त्यासंबंधित ऐतिहासिक घटना त्या ऑडिओ डिव्हाइसवर ऐकत ऐकत आपण या पॅलेसचा पहिला आणि दुसरा मजला पाहायचा, असे या टूरचे स्वरूप होते.
त्या विशाल प्रासादात प्रवेश केल्यावर सुरुवातीलाच एक अतिशय भव्य असे दालन होते अन समोरच दिसणारा प्रशस्त, सुरेख असा जिना! भिंतीवरील कलाकुसर, हवाईयन राजा-राणींची मोठमोठाली पेंटिंग्ज आणि राजेशाही वस्तू राजवाड्याच्या ऐश्वर्याची साक्ष देत होत्या. स्थानिक कोआ लाकडापासून बनवलेले आणि अतिशय सुरेख नक्षीकाम असलेले फर्निचर सौंदर्यात अजून भर घालत होते. वेगवेगळ्या आकारांतील झुंबरे पाहून डोळे अक्षरशः दिपून जात होते.
सुरुवातीलाच लागते 'ब्ल्यू रूम' - इथे राजकीय नेत्यांचे, महत्त्वाच्या व्यक्तींचे स्वागत केले जात असे. त्या खोलीलाच लागून पांढऱ्याशुभ्र भिंती आणि सिलिंग आणि twin chandeliers असलेली 'स्टेट डायनिंग रूम' - इथे राजाच्या खुर्चीचे वेगळेपण सहज लक्षात येते. या खोलीच्या मागेच पण सहजपणे न दिसणारी 'बटलर्स पॅन्ट्री' आहे. नैसर्गिक प्रकाश भरपूर येईल अशी या खोलीची रचना आहे, अन तिला लागूनच शाही स्वयंपाकघर आहे. इथेच राजघराण्यातील व्यक्तींसाठी त्यांचा खास स्टाफ स्वयंपाक बनवीत असे.
जिन्याच्या दुसऱ्या बाजूला 'गोल्ड रूम' आहे, तिलाच 'म्युझिक रूम' असेही संबोधिले जाते. राजा कालाकवा आणि राणी लिलिऊ ओकलनी दोघेही संगीताचे उत्तम जाणकार होते. त्यांनी लिहिलेली आणि स्वरबद्ध केलेली अनेक गीते आजही हवाईमध्ये गायली जातात. 'Hawaiʻi Ponoʻī' ही राजा कालाकवाची रचना तर हवाईचे राष्ट्रीय गीत होते. या खोलीत असलेला भव्य पियानो राणी वाजवीत असे. त्यानंतर भलीमोठी अशी 'थ्रोन रूम' आहे. इथेच राजा प्रजाजन, परराष्ट्रीय दूत यांच्या भेटी घेत असे. या खोलीतील सर्व फर्निचर अतिशय उत्तम असून ते लाल रंगाचे आहे.
इथे आमची पहिल्या मजल्यावरील टूर संपली. Self-Led Audio Tour अतिशय व्यवस्थित माहिती देत होतीच, संपूर्ण मार्गावर तुम्हांला योग्य खोलीत घेऊन जाणाऱ्या सूचना व्यवस्थित लिहिल्या होत्या. तसेच येथील स्टाफदेखील अतिशय तत्पर होता. ग्रूपमधील सर्वांशी ते स्वतःहोऊन बोलत होते, त्या त्या खोल्यांमधील काही किस्से ऐकवत होते, तर काहींच्या प्रश्नांची उत्तरे देत होते.
पॅलेसमध्ये शिरताच प्रथम दिसणाऱ्या त्या भव्य जिन्याने आम्ही चढू लागलो. काही पायऱ्यानंतर हा जिना संपल्यावर त्याच जिन्याच्या दोन्ही बाजूंना उलट्या बाजूनी दोन समांतर जिने दुसऱ्या मजल्यावरील दालनांत घेऊन जातात. जिन्यावर असलेल्या गोलाकार सिलिंगमधील chandelier फारच आकर्षक होते.
वरच्या मजल्यावरील मुख्य दालनाच्या उजव्या बाजूलाच असलेला सर्वात मुख्य आणि मला अतिशय आवडलेला भाग म्हणजे - King's suite आहे. निळ्या रंगाच्या असंख्य शेड्समध्ये हा अतिशय कलात्मकरित्या सजवलेला असून यांत अनेक खोल्या आहेत. राजाचे कार्यालय, अभ्यासिका आणि सर्वात आतील भागात असलेला त्याचा शयनकक्ष या सर्वांचीच रचना अभ्यासपूर्ण तर आहेच, त्याचबरोबर राजाची उच्च अभिरुची, बुद्धिमत्ता, व्यासंग यांचीही त्यांतून झलक दिसते. राजा डेव्हिड कालाकवा याला हवाईयन, इंग्लिश भाषांचे उत्तम ज्ञान होते. आधुनिक तंत्रज्ञानाची विशेष आवड होती. अनेक पाश्चिमात्य नेत्यांना त्याने लिहिलेली पत्रे इथे एका टेबलावर ठेवली आहेत.
याच्या समोरच लाल-गुलाबी रंगांची उधळण करणारा Queen's suite आहे. यांतही राणीची तयार व्हायची खोली, शयनकक्ष त्याला लागूनच असलेले शाही बाथरूम अशा अनेक खोल्या आहेत.
राजकीय उठावानंतर जेव्हा राणीला याच मजल्यावरील एका छोट्या खोलीत बंदिवासात ठेवले गेले होते, तेव्हा राणीने शिवलेला quiltही इथे बघावयास मिळतो. या दोन्ही suitesच्या विशाल बाल्कनीमधून पूर्वी थेट पॅसिफिक महासागर दिसत असे. आता मात्र डाउनटाउनमधील असंख्य गगनचुंबी इमारतींमुळे केवळ या महासागराच्या लाटांचा आवाज येतो.
बाल्कनीतून दिसणारे होनोलुलू शहराच्या डाउनटाउनचे देखणं दृश्य पाहत आम्ही काही वेळ तिथेच उभे होतो, इतक्यात तेथील एक स्वयंसेवकाने आमच्याजवळ येऊन अभिवादन केले. कुठले राज्य? इथे किती दिवस? काय काय पाहिलंत ? पहिलीच भेट का ?... असे नेहेमीचे संवाद झाल्यावर त्याने आम्हांला एक मन हेलावणारा किस्सा ऐकवला. राजा डेव्हिड कालाकवा याने प्राचीन हवाईयन संस्कृती, आधुनिक तंत्रज्ञान आणि पाश्चिमात्य देशांतील सुधारणा यांची योग्य सांगड घातली होती. त्यांमुळे अर्थातच तो जनतेत अतिशय लोकप्रिय होता. त्याच्या राजकीय कारकिर्दीत हवाईमध्ये प्रगतीचे, परिवर्तनाचे वारे वाहत होते. मात्र इ.स.१८८७मध्ये काही व्यापाऱ्यांनी राजाविरुद्ध बंड केले आणि त्यात राजाच्या सत्तेवर निर्बंध घातले गेले. त्यामुळे राजा कालाकवा व्यथित झाला. त्याची प्रकृतीही ढासळू लागली. नोव्हेंबर १८९०मध्ये त्याने आपल्या मंत्र्याच्या हाती तात्पुरता राज्यकारभार सोपविला आणि तो USS Charlseston या लढाऊ जहाजातून कॅलिफोर्नियाला वैद्यकीय उपचारांसाठी रवाना झाला. सॅन फ्रान्सिस्को इथे राजा कालाकवा काही काळ वास्तव्यास होता. मात्र दुर्दैवाने जानेवारी १८९१मध्ये त्याचा मृत्यू झाला. त्या काळी तार, रेडिओ अथवा फोन अशा काहीच सुविधा नव्हत्या, त्यामुळे राणी आणि हवाईयन प्रजेला आपल्या राजाच्या मृत्यूची काहीच बातमी कळली नव्हती. काही आठवड्यांनी हवाई राज्याच्या हेरांनी जेव्हा दूर क्षितिजावर USS Charlseston हे जहाज बघितले, तेव्हा त्यांनी राणीला त्याबद्दल वर्दी दिली. लगोलग होनोलुलू नगरी एखाद्या उत्सवाप्रमाणे सुशोभित करण्यात आली, सर्व जनता आपल्या राजाच्या स्वागतासाठी सज्ज झाली. स्वतः राणी मोठ्या उत्साहाने सर्व शृगांर करून राजाच्या आगमनाची या बाल्कनीत आतुरतेने वाट पाहू लागली. तोवर सागर किनाऱ्यापासून काही अंतरावर असलेले USS Charlseston हवाईयन सैन्यदलाच्या दृष्टिक्षेपात आले होते, मात्र त्या लढाऊ जहाजाचा पुढील भाग पूर्णपणे काळ्या कापडाने झाकला होता आणि हवाईयन व अमेरिकन ध्वज अर्ध्यावर आणण्यात आले होते. सर्वांसाठी हा अगदीच अनपेक्षित अन अतीव दुःखदायक धक्का होता...The king was making his last voyage home. हे सांगताना त्या स्वयंसेवकाचा स्वर थोडा कातर झाल्यासारखा वाटला. काही काळ त्या दालनांत शांतता पसरली होती. मात्र पुढच्याच क्षणी त्या स्वयंसेवकाने, "राजा डेव्हिड कालाकवाचा जयजयकार असो!" असे मोठ्या अभिमानाने उच्चारत मानवंदना दिली. आजही राजा कालाकवा हवाईयन जनतेत किती लोकप्रिय आहे, याचा आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतला. इओलानी पॅलेसची ही अद्भुत टूर संपली होती. त्यानंतर ऑडिओ डिव्हाइस परत करणे, गेस्ट रिव्ह्यू लिहिणे, स्वयंसेवकांचे आभार मानणे असे सोपस्कार करून आणि आमच्या ग्रूपचा निरोप घेऊन आम्ही त्या भव्य राजमहालातून बाहेर पडलो.
फ्रंट डेस्कवरील हवाईयन तरुणीने राजवाड्याच्या तळघरांत असलेल्या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्या असे सांगितले होते, त्यानुसार आम्ही तेही प्रदर्शन पाहिले. इथेही राजा-राण्यांचे कृष्णधवल फोटोज, त्यांची अमूल्य रत्ने व सुरेख दागिने, उंची शाही पोशाख आणि त्या संदर्भात अनेक विस्तृत परिचयपर लेख बघण्यास मिळाले. त्याबरोबरच राजघराण्यांतील विविध शस्त्रास्त्रे आणि त्यांचा वापर करण्यात आलेल्या प्रसंगांची उत्तम संकलित माहिती यांचेही इथे एक वेगळे दालन होते. राजाने लिहिलेली पत्रे, साकारलेल्या कलाकृती हे फारच सुंदररित्या इथे जतन करून ठेवले आहेत. खरोखरीच हा ऐतिहासिक ठेवा हवाई सरकारने अतिशय अभिमानाने जपला आहे.
इ.स. १८९८मध्ये अमेरिकेने हवाईला आपला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केले. आता इओलानी पॅलेस Capitol Building झाले अन सर्व राजकीय घडामोडींचे साक्षीदार बनले. पुढे इ.स. १९५९मध्ये हवाई बेटे पन्नासावे राज्य म्हणून अमेरिकेच्या संयुक्त राज्यांत सामील झाली आणि तिथे नवीन कॅपिटल इमारत बांधली गेली. त्यानंतर नूतनीकरण होऊन पुन्हा एकदा इओलानी पॅलेस सामान्य जनतेला खुला झाला.
इओलानी पॅलेसमधील ही टूर हवाईयन राजघराणे, त्यांतील सर्व राजा-राणी - पहिला कामेहमेहा ज्याने या सर्व बेटांना एकछत्री अंमलाखाली आणले ते हवाईची शेवटची राणी, त्यांचा इतिहास, हवाईयन कला-संस्कृती यांची ओळख करून देते. त्यातील प्रत्येक दालनांच्या कथा, तसेच जतन करून ठेवलेले शाही पोशाख, राजघराण्यातील अप्रतिम मौल्यवान दागिने, फर्निचर, पेंटिंग्ज अशा अनेक गोष्टींतून इतिहास जणू आपल्या डोळ्यासमोर घडत असतांना आपण अनुभवतो. इतिहासाची आवड असलेल्या माझ्या मुलांनी इओलानी पॅलेसला आमची अचानक ठरलेली ही भेट अतिशय एन्जॉय केली आणि तेथील पॅलेस गिफ्ट शॉपमधून आमच्या गाइडने सांगितलेली पुस्तकेही आवर्जून विकत घेतली.
अगदी ऐन वेळी आम्ही इओलानी पॅलेस बघण्याचे ठरविले होते, त्यामुळे Royal Legacy Tour, White Glove Tour यांसारख्या इतर काही स्पेशल टूर्सचा अनुभव आम्ही घेऊ शकलो नाही. मात्र नशीब आमच्यावर मेहेरबान होते. नेमका तो दिवस शुक्रवार असल्याने, त्या दिवशी पॅलेससमोरील लॉनवर Royal Hawaiian Bandचा शो होता. हवाईयन सुमधुर संगीत ऐकत घालवलेला तो एक तास अर्थातच अविस्मरणीय होता.
पर्यटकहो, भविष्यात कधीही होनोलुलूला भेट दिलीत, तर हवाई बेटांच्या इतिहासाचे प्रतीक असलेल्या इओलानी पॅलेससाठी थोडा वेळ नक्कीच काढा. तोपर्यंत, इओलानी पॅलेसची 3D VIRTUAL TOUR इथे पाहता येईल.
प्रतिक्रिया
13 Nov 2023 - 10:23 am | अथांग आकाश
हवाईचा राजमहाल आवडला!
13 Nov 2023 - 1:50 pm | तुषार काळभोर
महालाचे वर्णन आणि हवाई राजघराण्याचा संक्षिप्त इतिहास, दोन्ही रोचक आहेत.
फोटो आणखी हवे होते, असं पुन्हा पुन्हा वाटलं.
13 Nov 2023 - 6:16 pm | टर्मीनेटर
+१००० हेच म्हणतो...
भरपुर फोटोज हवे होते... शुन्य किंवा कमी फोटोजचा भटकंती लेख मिपावर फाऊल मानला जातो 😀
लेख आवडला हे वेगळे सांगणे न लगे...👍
13 Nov 2023 - 5:31 pm | कर्नलतपस्वी
तुमची ऑडिओ ट्रिप जशीच्या तशी कागदावर उतरवलेली दिसते.
सुंदर वर्णन सुरेख फोटो.
कधी संधी मिळाली तर जरूर भेट द्यायला आवडेल.
धन्यवाद.
14 Nov 2023 - 3:51 am | पर्णिका
14 Nov 2023 - 9:21 pm | मुक्त विहारि
उदारमतवादी हिंदूंनी, ही गोष्ट विसरू नये, ही विनंती...
15 Nov 2023 - 11:32 am | रंगीला रतन
लेख आवडला.
15 Nov 2023 - 4:38 pm | राजेंद्र मेहेंदळे
पण "बारा दिवस, तीन बेटे आणि मनसोक्त सुरु असलेली भटकंती." याची एक सिरीज करता येईल का? आमच्या सारख्या वाचकांना मेजवानी मिळेल. तेव्हढीच दुधाची तहान ताकावर :)
17 Nov 2023 - 2:58 pm | गोरगावलेकर
सुंदर फोटो आणि आपण दिलेली माहिती, वर्णन छानच
1 Dec 2023 - 4:47 pm | चांदणे संदीप
लेख/माहिती आवडली. अजून फोटो पाहिजे होते खरे.
सं - दी - प
1 Dec 2023 - 8:51 pm | स्नेहा.K.
वेगळ्या जागेची वेगळी ओळख आवडली !
4 Dec 2023 - 9:59 pm | चौथा कोनाडा
राजवाड्याच्या सफरीची अतिशय रोचक भटकंती.
झुंबरवाले राजवाड्याचे फोटो बघून तो किती भव्य असेल याची कल्पना आली.
क्वीन सूट चे फोटो झकास आहेत. निळ्या रंगाच्या किंग्स सूट चे फोटो काढायला परवानगी नव्हती का?
अतिशय सुरेख वर्णन आणि उगवती शैली असल्यामुळे तुमच्या सोबतच इओलानी पॅलेस बघतोय अशी भावना झाली !
एकंदरीत झकास पॅलेस टूर ! धन्यवाद !
9 Dec 2023 - 4:36 am | पर्णिका
इओलानी पॅलेस आवडल्याची पोच दिल्याबद्दल धन्यवाद :) - अथांग आकाश, तुषार काळभोर, टर्मीनेटर, कर्नलतपस्वी, रंगीला रतन, राजेंद्र मेहेंदळे, गोरगावलेकर, चांदणे संदीप, स्नेहा.K. आणि चौथा कोनाडा
याचसाठी केला होता अट्टाहास ... नक्की भेट द्या, खूप सुंदर आहे इओलानी पॅलेस आणि हवाई बेटंही ! काही माहिती हवी असल्यास जरूर विचारा, शक्य ती मदत करायला आवडेल.
नक्की प्रयत्न करेन, किमान हवाईतील काही अनवट स्थानांवर जरूर लिहीन.
9 Dec 2023 - 4:40 am | पर्णिका
इथे बऱ्याच जणांनी अजून फोटो हवे होते, King's suiteचे फोटो नाहीत का ? असे विचारले आहे.
extended Thanksgiving हॉलिडे ट्रीपवर असल्याने अनेक आठवडे मिपावर लॉगिन केले नाही, त्यामुळे उशिरा प्रतिसाद देत आहे,
मी पाठवलेले King's suite आणि थ्रोन रूमचे फोटो अजूनही माझ्या लेखांत दिसत नाहीत.
साहित्य संपादक मी याबद्दल पूर्वीही संपर्क केला आहे, कृपया ते सर्व फोटो याच लेखांत टाकता येतील का ? मी अजूनही प्रतिसादांतही ते फोटो टाकू शकत नाही, काहीतरी एरर येतेय.
18 Dec 2023 - 5:21 pm | श्वेता व्यास
हवाईचा राजमहाल छानच दिसतोय, या लेखामुळे कालाकवा राजांबद्दल माहिती मिळाली.
राणीने शिवलेली गोधडी आवडली.
इओलानी पॅलेसच्या 3D VIRTUAL TOUR दुव्याबद्दल धन्यवाद!