दिवाळी अंक २०२३ - सहा ऋतूंचे सहा सोहळे

मी-दिपाली's picture
मी-दिपाली in दिवाळी अंक
12 Nov 2023 - 12:00 am

पुनरपि ग्रीष्मी तीच काहिली

मेघावली नभी पुनरपि आली...
पुनरपि म्हणजे कितवी वेळ असेल ही? अनादि, अनंत काळाचा एक छोटासा अंश असेल ती! तरीही त्या प्रत्येक वेळी सृष्टी ज्या स्थित्यंतरातून गेली असेल, ते स्थित्यंतर म्हणजे ऋतू!

‛दिवसामागुनी दिवस चालले, ऋतूमागुनी ऋतू..’ गदिमांनी लिहिलेल्या या गीताला स्वरसाज चढवताना बाबूजींनी मोठी कमाल केली आहे. एकाच गीतात त्यांनी पाच रागांचा वापर केला. ध्रुवपदासाठी यमन आणि पुढे केदार, सोहनी, बसंत, मल्हार आणि मग पुन्हा यमन. संगीतातील रागाचा आणि मूड्सचा विशेष संबंध असतोच, परंतु बदलणाऱ्या ऋतूंसाठी या रागांच्या मध्यस्थीचा चपखल वापर केल्यामुळे ऋतूंचा आणि मानवी भावनांचा परस्परसंबंधच इथे नव्याने उलगडून समोर येतो.

निसर्गाचं मानवी भावनांशी तादात्म्य मी बऱ्याचदा अनुभवलंय. मन उदास असलं की मळभ दाटून येतं. वारा सुतक पाळतो. झाडाच्या माथ्यावर कुठेतरी टिटवी टाहो फोडत असते. कधी उलटही घडतं. आकाशातील चांदणं मनातही पसरतं. पाऊस आतबाहेर रिमझिमतो. म्हणूनच मला वाटतं, प्रत्येक ऋतूगणिक पानांफुलांत, मातीवाऱ्यात, जीवाशिवात इतके ‛बदल' घडवून आणणाऱ्या या प्रत्येक ऋतूचा मात्र, एक ‛स्थायिभाव' असतो.

‛पारदर्शक' शरद

काही शब्दांशी भावनांचं असलेलं साहचर्य मला नेहमीच थक्क करतं. कुणा एकाला एखाद्या वेळी आलेल्या अनुभूतीने हे साहचर्य जुळून आलेलं नसतं. हे नातं वैश्विक असतं, चिरंतन असतं. नियम अपवादाने सिद्ध व्हावा, तसं एखाद-दुसऱ्या अपवादाने ते नातं आणखी दृढ होत गेलेलं असतं. रात्रींचंही अगदी असंच असतं. एरवी कोणत्याही ऋतूत त्यांना जो अंधाराच्या, गूढतेच्या सावटाचा अभिशाप असतो, त्यावरील उःशाप म्हणजे या दीप्तिमान शारदराती!

मैफिलीत तिहाई गाठत समेवर यावं, तसा पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूंचा ठेहराव घेत चांदण्याच्या समेवर येतो, तो शरदऋतू! मात्र चांदणं मोजता नाही येत पावसासाखं सेंटिमीटरमध्ये. त्याला डिग्री नसते, उन्हासारखी. पाऱ्याच्या खाली उतरण्यावरून त्याचं मोजमाप करता येत नसतं. त्याचं बरसणं आपण फक्त अनुभवायचं असतं इथे, चकोर होऊन.

आकाशाचा निळाशार रंग, झेंडू, शेवंतीचे सोनसळी रंग, रानफुलांचे विविध रंग जरी या दिवसांत माळरानावर डोकावताना दिसले, तरी ढगांच्या पुंजक्यांमधून, चंद्रप्रकाशातून, जाई, जुई, कुंदकळ्यांमधून मात्र पांढऱ्या रंगाचंच अधिराज्य ठळकपणे जिथे तिथे जाणवत राहतं. या पांढऱ्या रंगांच्याही फिकट आणि गडद छटेतील सूक्ष्मशा फरकाचा प्रत्यय एका संस्कृत श्लोकात विलक्षण सुंदररित्या येतो.
काशाः क्षीरनिकाशा दधिशरवर्णानि सप्तपर्णाणि।
नवनीतनिभश्चन्द्रः शरदि च तक्रप्रभा ज्योत्स्ना॥
अर्थात, शरद ऋतूत फुलणारे कासाचे तुरे शुभ्र, दाट दुधासारखे, तर सप्तपर्णीच्या फुलांचे भरगच्च घोस दह्याच्या निवळीसारखे पांढरे! शरदातील शुभ्र चंद्रमा म्हणजे जणू ताज्या लोण्याचा गोळाच आणि त्याची प्रभा म्हणजे जसे काही पांढरे ताकच!

चराचरात भारून राहिलेलं हे गौरवर्चस्व पाहून कृष्णमेघ स्वतःहोऊन मार्गस्थ होतात. आकाश मग अगदी नितळ, आरस्पानी होऊन जातं. जलधारांनी सतत ढवळून निघणारे जलाशय आता कुणीही यावं आणि आपलं प्रतिबिंब निरखून जावं, इतके निवळशंख झालेले असतात. सुगीला आलेली पिकं पाहून सर्जनक्षम धरा पुरती आश्वस्त झाली असते. संदिग्धतेचं मळभ सरावं आणि मग उजळून लख्ख चित्र दिसावं... तशी अनुभूती देणारा हा पारदर्शी ऋतू... शरद ऋतू!

*शारदराती*

2

काजळगहिरे रंग निशेच्या शापित माथी,

उ:शापाने तेजोमय या शारदराती ॥ध्रु.॥

खुळ्या चांदण्या उन्हात घेती निळसर शेला,
शुभ्र सावरीने कशिदा सुंदर विणलेला,
रात्र चढे तो, आतुर ल्याया चंद्रकळेला।
लक्षदिव्यांच्या बुट्ट्या सजल्या पदरावरती,
उ:शापाने तेजोमय या शारदराती ॥१॥

नुकती न्हालेली पाने, तृण, सुमने सारी,
सृजनाचे चैतन्य डोलते धानशिवारी,
नितळ जलाशय त्यावर झुलते छटा रुपेरी।
रांगोळी देखणी तारका जळी पहाती,
उ:शापाने तेजोमय या शारदराती ॥२॥

रात्रींमाजी गर्भ वाढतो कलेकलेने,
आभा तेजाचीही पसरे, तशी त्वरेने,
स्वागतास पुनवेच्या झाली सज्ज त्रिभुवने।
चांदण्याच गर्भार निशेची भरती ओटी,
उ:शापाने तेजोमय या शारदराती ॥३॥

पूर्ण बिंब उजवीत कूस अवतरले गगनी,
तृप्त जाहला चकोर अमृतकणां प्राशुनी,
झेंडू, शेवंतीसह बहरे कास उपवनी।
नाद घुमे टिपऱ्यांचा कालिंदीच्या काठी,
उ:शापाने तेजोमय या शारदराती ॥४॥

वृत्त - अनलज्वाला
( मात्रा - ८,८,८ = २४)

©️ दीपाली ठाकूर

‛निर्मोही' हेमंत

हेमंत ऋतू मला बऱ्याचदा एखाद्या ज्ञानी, परंतु तरीही निगर्वी, स्थितप्रज्ञ अशा ऋषीप्रमाणे भासतो, कारण त्याच्याच प्रभावामुळे बरंच काही या सृष्टीच्या रंगमंचावर घडत असतानादेखील तो मात्र निर्विकार! कुठेच बडेजाव नाही, कसला गाजावाजा नाही.

खरं तर भारतासारख्या 'उष्ण' कटिबंधाच्या देशात 'थंडीच्या' या ऋतूला, शेतात गव्हाची सुंदर, हिरवीगार पिकं डोलती ठेवणाऱ्या ऋतूला 'सौख्याचा ऋतू' मानलं जायला हवं. बाह्य सौंदर्याने फारसा नटलेला हा ऋतू नाही, परंतु बघण्यापेक्षा हा अनुभवण्याजोगा ऋतू आहे. इंद्रियांमध्ये सुखाची अनुभूती जागवणारा हा ऋतू आहे. ज्येष्ठ-आषाढात आकाशात गर्दी असते ती जळाने भारलेल्या कृष्णमेघांची, तर ऐन मार्गशीर्ष-पौष महिन्यात भरात असणाऱ्या या हेमंतात असते ती धुक्याने गिरवलेल्या धूम्ररेघांची.

इथे उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या रात्रींबरोबरच जसजसा गारवा वाढायला लागतो, तसतसा शरीरातील चयापचय क्रियेचाही वेग वाढू लागतो आणि मग जठराग्नी चांगलाच प्रदीप्त होतो. त्यातूनच सुरू होते धडपड, प्रत्येक सजीवाची, त्या अग्नीला शांतविण्याची. म्हणूनच मग दुर्गाबाई भागवत म्हणतात, 'क्षुधेने चेतावलेले जीव इथे एकमेकांवर अक्षरशः तुटून पडताना दिसतात. कुठे चितूरांच्या मागे नाचण पक्षी धावताहेत, तर कुठे फुलचुख्या आंब्याच्या मोहरावरच्या किड्यांचा फडशा पडताहेत, असं दिसून येतं.' 'जीवो जीवस्य जीवनम।' मात्र पारध असो वा सुटका, जीवन जगण्याची उत्कट असोशी इथे ठायीठायी दिसून येते.

वसंत ऋतूचं ग्लॅमर हेमंताला कधी लाभलं नाही आणि त्यानेही ग्रीष्मासारखी आग ओकून किंवा शिशिरासारखं हळवं करून कधी मेलोड्रामा केला नाही, म्हणूनच की काय, इतका हॅपनिंग असूनही दुर्दैवाने फारसा तो कधी चर्चेत राहिला नाही. त्याचं हे असं नामानिराळं असणं, निरिच्छ असणं मनाला कुठेतरी स्पर्शून गेलं, आणि मग म्हणावंसं वाटलं,
हेमंता, तुज ऋतू म्हणू की संन्यासी निर्मोही...

*हेमंताऽऽ*

1

तुज ऋतू म्हणू की संन्यासी निर्मोही?

लेणे लावण्याचे ना मिरवी देही ।
गारवा नव्हे; सिद्धी ती रिझवी गात्रा,
देउनी सुखाची श्रांत मनाला मात्रा ॥

सावल्या घालुनी गोल भोवती पिंगा,
आवरा सांगती उन्हास अपुला दंगा ।
सरले दिन तुमचे क्षितिजाशी रमण्याचे,
साम्राज्य भूवरी अता वसे तिमिराचे ॥

घन वलय धुक्याचे दाटे सांजसकाळी,
त्याआड धरेसी अलगद नभ कवटाळी ।
संशय सूर्याच्या मनी होतसे जागा,
सारुनी धुक्याला शोधू पाहे मार्गा ॥

चंचल बाला ती, संमुख होई सूर्या,
अनुनय किरणे करती तिज मानत भार्या।
पाहुनी नभाच्या कंठी दाटे गहिवर,
उतरती धरेवर अश्रू बनुनी दहिवर ॥

विभ्रम नाना रंगती तुझ्या मंचावर,
जगण्याचा चाले इथे निरंतर जागर ।
सावज भोळे पारध व्याधाचे होई,
शमविण्या क्षुधा सर्वत्र उडाली घाई ॥

भेदुनी मृदा राशी सोन्याच्या प्रसवी,
निश्चल ऐसा तेजोमय जणू तपस्वी ।
दुर्लक्षित तू हेमंता, न कळे महती,
रामायण सांगे, 'इष्ट ऋतू' परि जगती ॥

वृत्त - भूपतीवैभव
(मात्रा - २,८,८,४ =२२)

©️ दीपाली ठाकूर

‛समंजस' शिशिर

थंडीने अंगावर शिरशिरी आणणारा ऋतू म्हणून का हा शिशिर ऋतू? पण कशी कुणास ठाऊक, याच वेळी नेमकी झाडांच्या पानांच्या गळतीस सुरुवात होते आणि हवीहवीशी वाटणारी उन्हं आता मात्र अडथळ्याशिवाय आरपार, थेट जमिनीपर्यंत पोहोचतात.

निसर्गाचीही मला मोठी कमाल वाटते, नेहमीच कसा तोही अगदी नेमक्या वेळी हवं ते दान पदरात टाकतो.. बरं, ते दान पदरात टाकताना स्वतःची किंमतही चोख पटवून देतो. वैशाखातल्या चटक्यांशिवाय पावसाची ओल कशी सुखावणार? आणि पानगळीशिवाय लुसलुशीत पालवीची कोवळीक कशी जाणवणार!

एकेक जून, मातकट पान एकापाठोपाठ एक गळून पडताना पाहिलं की वाटतं, नेमकं आताच का बरं सूर्यालाही उत्तरायणाचे वेध लागावेत! दक्षिण दिशा यमाची म्हणून तर नव्हे! पण त्याच्या या चालीतली लय तरी किती संयमित! प्रत्येक पाऊल धीरोदात्त! साक्षात तेजोनिधी असूनही प्रकाशाच्या राशी एका दमात रित्या करून अंधाराला डिवचत नाही तो! हळूहळू अंधाराला कवेत घेत प्रकाशाची मूठ हलकेहलके दिवसागणिक फिसकारून देतो तो!

देताना कुठे थांबावं हेही अगदी निसर्गाकडूनच शिकावं. पानांची ओल ही धरणीआईने दिलेलं माहेरचं स्त्रीधन आणि हिरवेपण म्हणजे तेजपुंज पित्याने दिलेलं छत्रच जणू! पण लेकरांच्या भविष्याच्या काळजीने कधीकधी मातापित्यांना थोडं कठोर व्हावं लागतं, अगदी तसंच काहीसं होतं. अचानक धरती आणि सूर्याचं संगनमत होतं आणि सगळी रसद थांबवली जाते. एरवी गुरुत्वीय बलालाही न जुमानता किती ओढीने त्या वृक्षाच्या अग्रापर्यंत हा रसस्रोत अखंड वाहत असतो, पण आता मात्र हात आखडता घेतला जातो...एकेक पान मग हात सोडून द्यायला लागतं, कुणी समजुतीने शांतपणे, तर कुणी आनंदात गिरक्या घेत आईच्याच कुशीत विसावतं कारण.. ठाऊक असतं त्यांना, आपल्यासारखे लाख गेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा मात्र जगायला हवा. फिरून बहरण्यासाठी! पुन्हा एकदा हरवलेलं वैभव दिमाखात उभं करण्यासाठी!

खरं तर पानगळ म्हणजे पानांच्या जीवितकार्याची यशस्वी सांगता! कर्तव्यपूर्तीचा सोहळा! समाधान, छे! ही तर संतुष्टी! अस्तित्वाचं सजग आत्मभान! निसर्गही पिवळ्या, केशरी, लाल रंगांची मुक्त उधळण करून हा निवृत्तीचा सोहळा साजरा करत असताना आपलं मन उदास का व्हावं! मोहात इतकं अडकून का पडावं!

शिशिरागम

3

शिशिर निकट येता, वृक्ष लागे झुराया,

विकल मन तयाचे, नावरे मोहमाया ॥ध्रु.॥

दिवस सरत आले, सोबतीच्या सुखाचे,
विरह अटळ सांगे, पान प्रत्येक त्याचे ।
तटतट परि जेव्हा, देठ लागे तुटाया,
विकल मन तयाचे, नावरे मोहमाया ॥१॥

विपुल मिरवला हा, पर्णसंभार डोई,
बहर विरळ होता, भासते शाख भोई ।
टपटप परि जेव्हा, पान लागे गळाया,
विकल मन तयाचे, नावरे मोहमाया ॥२॥

बहुविध खग जेथे, कोटरी नांदलेले,
तृण विखरुन तेथे, वाळके राहिलेले ।
शुक भिरभिरताहे, पान नाही लपाया,
विकल मन तयाचे, नावरे मोहमाया ॥३॥

गडद तिमिर राशी, सूर्य गर्भात ओढी,
पडझड शमवाया, दक्षिणी मार्ग सोडी ।
समजत निज दोषी, व्यर्थ शोधी उपाया,
विकल मन तयाचे, नावरे मोहमाया ॥४॥

हुरहुर विलयाची, म्लान दाटून राही,
निसदिन क्रम देई, पालवीचीच ग्वाही ।
बहर स्मरत चित्ती, सावरे शुष्क काया,
पुलकित मन त्याचे, नावरे मोहमाया ॥५॥

वृत्त - मालिनी
(ललल ललल गागा, गालगा गालगागा)

© दीपाली ठाकूर

‛उत्सवी' वसंत

वसंत! ऋतुराज वसंत!

उगाच नाही वसंताला हा गौरव प्राप्त झाला! त्या पठ्ठ्याने कमावला आहे तो! सोपं नसतं एक डाव उधळला गेला असताना पुन्हा नव्याने डाव मांडणं ! जिवाभावाचा एकेक हात सुटत असतानादेखील निश्चल राहून पुन्हा मोर्चेबांधणी करणं! नवशिक्या शिलेदारांची फौज जमा करत पुन्हा एकदा हरवलेलं साम्राज्य दिमाखात उभं करणं! शून्यातून विश्व निर्माण करणं!

निर्मितीचा आनंद अलौकिक! पण निर्मितीचा क्षण जावे त्यांच्या वंशा, तेव्हा कळे! निर्मितीचा क्षण तरी कसं म्हणावं! तो तर प्रवास! रुजण्यापासून सर्जनापर्यंतचा! अमूर्तास मूर्त स्वरूप देण्याचा! अतीव प्रसववेदना सहन करूनही काही साकार करण्याची ऊर्मी असते ती! वर्षानुवर्षे ऊन, वारा, पाऊस यांचा मारा सोसून निबर झालेल्या अस्तराला फाडून बाहेर येण्याची ताकद त्या इवल्याशा जिवातही कुठून येते, कुणास ठाऊक! ती ओढ असते मायलेकरांना दोघांना लागलेली, एकतर्फी नसते ती आसक्ती! कमालीची असोशी असल्याशिवाय रुजत नसतं काही आणि जे रुजलेलं असतं, ते प्रकट होण्यावाचून राहत नसतं कधी!

निर्मिती करून उसंत घेईल तो वसंत कसला! त्याला आता बहरायचं असतं, रस, गंध आणि रंगांतून, अंगांगातून! साक्षात कामदेवाचा पुत्रच तो! संकोच नसतो त्याला, त्या पानांविना अनावृत असलेल्या देहाने फुलून येताना! तमा नसते त्याला शृंगारात रत असताना काट्यांची, उन्हाच्या झळांची आणि कोण काय म्हणेल याचीही!

वसंत! केवळ ऋतू नाही हा रानावनांतून फुलून येणारा! ही वृत्ती आहे निर्मितीची, बहरण्याची आणि चैतन्याचीही! तनामनांतून उमलून येणारी!

विदीर्ण झालेल्या मनामध्ये जेव्हा आशेची पालवी फुटते, ती वसंताचीच चाहूल असते! प्रतिभेला आलेला बहरही वसंतच! आणि विरहाने व्याकूळ झालेली अभिसारिका सजणाच्या येण्याची कुणकुण लागताच शृंगार करण्यासाठी धाव घेते, तेव्हा तिच्या मनात फुललेला असतो, तोही वसंतच!

4

वसंत मनात फुलला गं

साजण दारी आला गं
वसंत मनात फुलला गं ॥ध्रु.॥

वैरिणीच त्या रात्री साऱ्या
विस्कटल्या ना जराही निऱ्या
नकोस झोंबू पदरा वाऱ्या
किती विनवले तुज निलाजऱ्या
उठे शिरशिरी अंगी गोऱ्या
स्पर्शाने सजणाच्या कोऱ्या
शिशिर बोचरा सरला गं
वसंत मनात फुलला गं ॥१॥

कुठून लागे मजला कुणकुण?
घुंगूरनाद येई छुनछुन
फुलात रत भुंग्याची गुणगुण
चेतविते श्वासांना उनउन
तनू सावरी काटा सरसर
मोहरही दरवळला झरझर
पलाश ओठी खुलला गं
वसंत मनात फुलला गं ॥२॥

धाव घेत निरखले दर्पणी
राही अधुरा सडा अंगणी
चुकवीत बटा फिरविता फणी
विचारात भिरभिरे पापणी
बकुळहार की साज तन्मणी?
"नकोच कुठला अडसर राणी"
मदनऋतू सळसळला गं
वसंत मनात फुलला गं ॥३॥

वृत्त : बालानंद (८,६) आणि पादाकुलक (८,८)

© दीपाली ठाकूर

‛प्रगल्भ’ ग्रीष्म

चैत्रातील वासंतिक हवेतला ‛अल्लड’ उबदारपणा जाऊन हळूहळू उन्हाचा कडाका ‛वाढू’ लागला, की समजून जावं, वैशाखवणवा ग्रीष्माची चाहूल देत कधीही दाराशी येऊन ठेपेल.

कालिदासाने ऋतुसंहारमध्ये ग्रीष्माचं वर्णन करताना म्हटलंय, ‛एरवी एकमेकांच्या जिवावर उठणारे प्राणी या दिवसांत जलाशयावर सोबत तहान भागवताना दिसतात.’ असं अद्भुत दृश्य दुसऱ्या कोणत्याही ऋतूत दिसणार नाही. मला ग्रीष्माला प्रगल्भ म्हणावंसं वाटलं, याचं कारण हेच. वय वाढणं आणि प्रगल्भ होणं यात अंतर असतं. वाढलेलं वय आधी बाहेरून दिसतं, प्रगल्भता आतून येते. वय वाढतं विनासायास; प्रगल्भता कमवावी लागते, किंमत मोजून. प्रसंगी ग्रीष्मासारखं तावून सुलाखून घेत.

वसंत आणि वर्षा या दोन सर्जनशील ऋतूंमधला ‛सेतू' ग्रीष्म असावा, हेही खूप विस्मयकारक आहे. मूळ निर्मितीपेक्षा निर्मितीदरम्यान झालेला अस्वस्थतेचा प्रवास आपल्याला अधिक समृद्ध करून जातो. कलावंत घडतो, तो त्याने एकापाठोपाठ एक केलेल्या निर्मितीमुळे नव्हे, तर त्या दरम्यानच्या प्रवासामुळे. हे जो जाणतो, तो पुन्हा पुन्हा त्या प्रवासाच्या अट्टाहासापायी निर्मितीच्या मोहात अडकतो.

ही प्रगल्भता अनुभवाने येते आणि माणसाचं अनुभवी असणं बऱ्याचदा त्याने बघितलेल्या पावसाळ्यांवरून जोखलं जातं. पण कधीकधी अनुभवलेल्या ‛चार पावसाळ्यांपेक्षा' सोसलेला ‛एक उन्हाळा' जास्त शिकवून जातो. म्हणूनच जेव्हा इतर कवी वसंत आणि वर्षेच्या प्रेमात असतात, तेव्हा स्वतःला ‛दुःखाचा महाकवी' म्हणवून घेणारे ग्रेस मात्र असे उन्हात विहरतात....
‛समुद्र आटतील का ? अतर्क्य सूर्य वाहतो
अशी अवेळ साधुनी मनात कोण हिंडतो
तहान ही गिळे मला नि कंठ हो तुझा निळा
उन्हात पाय वाजती कुणात जीव गुंतला...’

5

ग्रीष्मगाथा

अल्लड शैशव ते सरले,
आले रे ऊन वयात ।
लागले म्हणाया 'मी मी',
तारुण्याच्या कैफात ॥

ना उसंत घेई तिळही,
अंतरात उसळे ऊर्मी।
अस्तित्व दाखवी अपुले,
ते घाव घालुनी वर्मी

शृंगार धरेने पुरता,
अजुनी उतरविला नाही,
तो लागे दृष्ट कुणाची,
अग्निदिव्यातुनी जाई॥

अंगांगी होई लाही,
लागला शोष कंठासी।
का कृष्णमेघ रेंगाळे,
मावळतीच्या क्षितिजाशी॥

तृप्त या धरेला करण्या,
तो मेघ नसे संपृक्त
परि निरोप वळवासंगे,
धाडी होता मार्गस्थ॥

संपन्न होय तव हस्ते,
सांगता अग्निहोत्राची,
गर्जेल दुंदुभी गगनी,
नांदी ती शुभपर्वाची॥

वृत्त - उद्धव (मात्रा २,८,४ = १४ )

© दीपाली ठाकूर

‛लहरी’ वर्षा

तुझ्यासाठी हेच विशेषण अगदी योग्य आहे. नाहीच लागू देत तू काही थांग! वास्तविक सहाही ऋतूंमध्ये फक्त तुझ्याच नावाचं स्त्रीलिंगी रूप! सर्जनाशी थेट नातं जोडणारं! असं असलं, तरी ‛तो पाऊस' आम्हाला जास्त जवळचा वाटू लागला. लहरीपणा ‛त्यालाच' अधिक शोभून दिसतो, म्हणून असेल कदाचित.

कळाकळा तापलेल्या ‛कातळांवरून' येणारा ‛वारा' आपल्याबरोबर ‛आगीचे' उष्ण लोळ घेऊन धावत येत असतो. स्वतःला शांतवण्यासाठी हजार जिभांनी ‛आसमंतातील' ओलावा चाटून शोषून घेत असतो. पंचमहाभूतांमध्ये आता फक्त तुझ्या हजेरीची उणीव असते. त्याच वेळी तुझं महत्त्व तू ठळकपणे अधोरेखित करून घेतोस.

तू उशिरा आलास, तरी तळहातावर झेलून घ्यावं तुला, असंच शिकवलं जातं आम्हाला.
‛त्याला बोलू नये अधिक उणे, काढू नये त्याचे बहकणे....
सांगू नये त्याला आपले गाऱ्हाणे, वाट पाहणे अधीर होणे...’ अनिलांचे शब्द वाजत राहतात कानात सतत पार्श्वसंगीतासारखे.

तू जितका लहरी, ’ती’ तितकीच सोशिक.. मनात मांडलेला तुझ्या तक्रारींचा हिशेब तुझा पहिला स्पर्श होताच ती विसरते.. नेहमीच! पुन्हा मोहरून येते तिची रोमावळी! पदर सरसा करत जाणाऱ्या पहिलटकरणीचं तिचं हे रूप पाहता क्षणी मोहवतं. एकटक पाहताना दिठावेल की काय, या विचाराने मन चपापतं.. आणि एके दिवशी तिची कूस पोपटी, हिरवे धुमारे प्रसवून धन्य होते. ‛भूमीचे मार्दव, सांगे कोंबाची लवलव!’ नुकताच मोकळा श्वास घेऊ लागलेले, ताठ मानेने उभे राहू पाहत असलेले ते नाजूक कोंब दोन्ही हात जोडून तुला थांबण्यासाठी आर्जव करतात. ती मात्र शांत असते. रिक्त, निष्प्रभ मेघांकडे विरून जाण्याखेरीज दुसरा पर्याय नसतो. स्वीकार असतो तिला या सत्याचा आणि त्याचबरोबर विश्वासही.. सृष्टीच्या सुष्टचक्रावर.
....दूरवरून कुठून तरी मला मात्र सूर ऐकू येतात...‛आ.. फिर से मुझे छोड के जाने के लिये आ... '

6

पृथ्वीचे विवाहगीत

जरा सोडले ते नभांनी उसासे, धरेच्या कपाळी हवेसे ठसे,
तितिक्षा तिची संपली त्या क्षणाने, तनू होत मुग्धा मनाशी हसे।
नसे साज शृंगार, शालू नि शेला, तरीही वधू सज्ज आलिंगना,
किती चौघडे वाजती आसमंती, कसे आवरावे कळेना घना।

नभोमंडपी दीपमाळा विजांच्या, पदन्यास नृत्यांगनेचा गमे,
जरासा विलंबित पडे ताल कानी, कसा मेळ घालू तिला ना जमे।
निघे बोलवाया सख्या सोबत्यांना, सुगंधी कुपी वात घेई सवे,
वऱ्हाडी इथे या विवाहाप्रसंगी तरू, वल्लरी, पाखरांचे थवे।

शिरी डोंगराच्या दिसे शुभ्र रेषा तळाशी कधी मारताना उडी,
जणू सिद्धता चालली ब्राह्मणाची, गळां जानवे घालुनी या घडी।
नुरे धीर देही, मुहूर्तापरीही, अता वाट नाही तिला पाहवे,
घडे देखणा सोहळा मंगलाचा, पुढे वेध ते सर्जनाचे नवे।

युगे साक्ष देती तिच्या संयमाची, झळा तप्त ग्रीष्मी किती साहिल्या,
खुणा काजळीच्या कधी मोजल्या ना, कुठे देह डागाळुनी राहिल्या।
नसे ठावके श्वास ओले कितीसे, तिच्या बांधले आज गाठी इथे,
तरी ओढ लागे पुन्हा का कळांची, नव्याने धरा जन्म घेई तिथे।

वृत्त - सुमंदारमाला ( लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा )

© दीपाली ठाकूर

प्रतिक्रिया

तुम्ही मिपाच्या दुर्गा भागवत आहात.
आपण प्रत्येक ऋतूला वृतबद्ध केलेते. बहूदा हा एकमेव प्रयत्न असावा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Nov 2023 - 5:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अतिशय तरल लेखन. सर्व ऋतुंबद्दलचं वर्णन वैशिष्ट्ये आणि सुंदर वृत्तबद्ध कविता.
उच्च दर्जाचं लेखन आहे, आवडलं. लिहिते राहावे.

-दिलीप बिरुटे

स्नेहा.K.'s picture

14 Nov 2023 - 7:00 pm | स्नेहा.K.

आणि त्याला साजेशी तितकीच सुंदर चित्रे..
लेख खूप आवडला!

मुक्त विहारि's picture

14 Nov 2023 - 7:19 pm | मुक्त विहारि

+१

नठ्यारा's picture

14 Nov 2023 - 7:55 pm | नठ्यारा

मी-दीपाली,

मला ललितकला, कविता वगैरे यांतलं फारसं कळंत नाही. पण वृत्तबद्ध काव्य करणे हे प्रचंड प्रतिभेचं कार्य आहे, एव्हढं मात्रं समजतं. त्याबद्दल तुम्हांस मानाचा मुजरा.

-नाठाळ नठ्या

कर्नलतपस्वी's picture

16 Nov 2023 - 2:58 pm | कर्नलतपस्वी

शिशिर निकट येता, वृक्ष लागे झुराया,

विकल मन तयाचे, नावरे मोहमाया ॥ध्रु.॥

वैरिणीच त्या रात्री साऱ्या
विस्कटल्या ना जराही निऱ्या
नकोस झोंबू पदरा वाऱ्या
किती विनवले तुज निलाजऱ्या
उठे शिरशिरी अंगी गोऱ्या
स्पर्शाने सजणाच्या कोऱ्या
शिशिर बोचरा सरला गं
वसंत मनात फुलला गं ॥१॥

अल्लड शैशव ते सरले,
आले रे ऊन वयात ।

शिरी डोंगराच्या दिसे शुभ्र रेषा तळाशी कधी मारताना उडी,
जणू सिद्धता चालली ब्राह्मणाची, गळां जानवे घालुनी या घडी।

आहो काय हा शब्दांचा खेळ मांडलाय!!!!!

आपला कवीता संग्रह प्रकाशित झाला असेल तर सांगा.

वृत्त, छंद, शुद्ध लेखन, व्याकरणाचे कायदे ना कधी समजले ना लक्षात राहीले. लेखणीच्या ऐवजी बंदुकीने लिहीत आलो. घरापासून नेहमीच दुर असल्याने शब्दांच्या मागे दडलेल्या भावना कशा ओळखाव्यात हे मात्र लक्षात आले.

बहावा वाचल्यापासून आपल्या आणखीन कवीता वाचायला मिळाव्यात हिच इच्छा मनात होती.

मी-दिपाली's picture

25 Nov 2023 - 10:26 pm | मी-दिपाली

कवितासंग्रह प्रकाशित झाला नाहीये, परंतु विचाराधीन आहे. एक मात्र खरं, की बहावाने मला एक ओळख दिली. मनापासून आभार !

Bhakti's picture

16 Nov 2023 - 5:36 pm | Bhakti

ह्या ऋतूचक्राचे प्रमाणबद्ध ' गणित ' दुर्गाबाईंना बळ देऊन गेले,साहित्यिकांना भुरळ देत असते.हे गणित ही ऋतूभाषा समजली की आपण कधीच कुठे एकटे नसतो.कधी वेळ लवकर टळत नसते तेव्हा कानांनी फक्त दुरच्या पक्षांचा आवाज ऐकायचा वेळ आपलीच होते.वृत्तबद्ध काव्य,साजेशी पेंटिंग्ज ओघावत वर्णन सुरेख!

मी-दिपाली's picture

25 Nov 2023 - 10:27 pm | मी-दिपाली

सर्व वाचक अन् प्रतिसादकांचे मनापासून आभार.

रंगीला रतन's picture

27 Nov 2023 - 11:13 pm | रंगीला रतन

वाह. मस्त!

श्वेता व्यास's picture

22 Dec 2023 - 1:52 pm | श्वेता व्यास

अप्रतिम!
लेख, कविता आणि पेंटिंग्स सगळंच उत्तम, उदात्त, उन्नत म्हणून महन्मधुर :)

चौथा कोनाडा's picture

22 Dec 2023 - 3:39 pm | चौथा कोनाडा

सर्व ऋतुंचा सर्वांग सुंदर अनुभव देणारा लेख खुपच आवडला !
लेखातील चित्रदर्शी कवितांनी चार चाँद लावले !
लेखातील पेंटीग्ज आणि प्रचि खासच !
rose9180oiu
क्या बात, खुप सुंदर !