दिवाळी अंक २०२३ - नितांत सुंदर 'फेवा लेक' आणि परिसर - पोखरा, नेपाळ

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in दिवाळी अंक
12 Nov 2023 - 12:00 am

काळ बदलला तसे पर्यटनाचे स्वरूपही बदलले. 'ज्ञानार्जन, हवापालट, देवदर्शनासाठी धार्मिक स्थळांना दिल्या जाणाऱ्या भेटी किंवा विविध भौगोलिक प्रदेशांतील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी केलेला प्रवास' अशी काही दशकांपूर्वीपर्यंत असलेली पर्यटनाची साधी सरळ व्याख्या आता कालबाह्य झाली असून रोजच्या धकाधकीच्या जीवनशैलीपासून दूर होऊन चार विरंगुळ्याचे क्षण मिळवण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रवासात व्यक्तिगणिक बदलणाऱ्या आवडी-निवडी, छंद आणि मनोरंजनविषयक कल्पना विचारात घेऊन धार्मिक पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, वारसा पर्यटन, क्रीडा पर्यटन, कृषी पर्यटन, जंगल पर्यटन, जल पर्यटन, साहसी पर्यटन अशा अनेक प्रकारांत त्याचे वर्गीकरण झाले आहे.

उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम अशा भारतातल्या पाच राज्यांशी तब्बल १७७० किलोमीटर लांबीच्या खुल्या आंतरराष्ट्रीय सीमेने जोडलेला, एक लाख ४७ हजार १८१ चौ.कि.मी. क्षेत्रफळ असलेला, म्हणजे तौलनिकदृष्ट्या आपल्या छत्तीसगड राज्यापेक्षा थोडा मोठा आणि ओडिशा राज्यापेक्षा आकाराने थोडा लहान असलेला आणि दक्षिणेकडे उत्तर प्रदेश आणि बिहार ह्या राज्यांच्या सीमेवर पूर्व-पश्चिम पसरलेले, समुद्रसपाटीपासून अवघ्या ५०-६० मीटर उंचीवरचे 'तराई क्षेत्र' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगेच्या सपाट मैदानी प्रदेशापासून पुढे 'शिवालिक टेकड्या', 'महाभारत पर्वतरांग', 'इनर हिमालया' ते उत्तरेकडे संपूर्ण तिबेटची सीमा व्यापणाऱ्या 'ग्रेट हिमालया'तील जगातले सर्वोच्च पर्वतशिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टच्या रूपाने समुद्रसपाटीपासून ८,८४८.८६ मीटर इतकी उंची गाठणारा, प्राचीन ऐतिहासिक वारशाने, वैविध्यपूर्ण संस्कृतीने आणि निसर्गसौंदर्याने समृद्ध असलेला नेपाळ हा दक्षिण आशियाई देश जगभरातील अबालवृद्ध पर्यटकांच्या उपरोल्लिखित सर्व पर्यटनविषयक अपेक्षा पूर्ण करण्यास सक्षम आहे.

नेपाळला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये धार्मिक पर्यटनासाठी पौराणिक-धार्मिक संदर्भ असलेले, अतिशय सुरेख आणि भव्य असे 'जानकी मंदिर' आणि श्री राम-सीता ह्यांचा विवाह झालेला 'मणी मंडप' व अन्य काही धार्मिक पर्यटन स्थळांसाठी प्रसिद्ध असलेले 'जनकपूर'; 'पशुपतीनाथ' आणि 'चांगू नारायण' अशी दोन भव्य प्राचीन मंदिरे, 'काठमांडू दरबार स्क्वेअर (बसंतपूर)', 'पाटण दरबार स्क्वेअर (ललितपूर)', 'भक्तपूर दरबार स्क्वेअर (भक्तपूर)' ह्या १३व्या ते १८व्या शतकातील तीन प्राचीन राज्यांच्या राजधान्या असणाऱ्या नगरांतील अप्रतिम काष्ठशिल्पे असलेली मंदिरे व महाल आणि 'बौद्धनाथ' व 'स्वयंभूनाथ' असे दोन प्राचीन स्तूप अशा युनेस्कोने 'जागतिक वारसा स्थळे' म्हणून जाहीर केलेल्या सात स्थळांचा समावेश असलेले 'काठमांडू खोरे'; वन पर्यटनासाठी युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केलेले 'चितवन राष्ट्रीय उद्यान' जी ठिकाणे लोकप्रिय आहेतच, त्याचबरोबर ग्रेट हिमालयाच्या कुशीतले 'ऑल इन वन' अनुभव देणारे 'पोखरा खोरे'देखील अत्यंत लोकप्रिय असून ते नेपाळची 'पर्यटन राजधानी' म्हणून ओळखले जाते.

जगातल्या सर्वोच्च दहा पर्वतशिखरांपैकी तब्बल आठ शिखरे नेपाळमध्ये आहेत. पोखरा ते सारंगकोट अशा हौशा-नवश्या गिर्यारोहकांसाठीच्या एक दिवसीय ट्रेकपासून दहा दिवसांचा 'अन्नपूर्णा बेस कॅम्प' असा थोड्या अनुभवी गिर्यारोकांसाठी, तर दोनशे तीस किलोमीटर लांबीच्या, बावीस दिवसांच्या 'अन्नपूर्णा सर्किट' सारखे तरबेज गिर्यारोकांसाठी असे सुमारे वीस ते पंचवीस पर्याय पोखरा व्हॅलीत उपलब्ध असल्याने जगभरातल्या गिर्यारोहकांची ही पंढरीच आहे.
माउंटन सायकलिंगची आणि माउंटन बायकिंगची आवड असणाऱ्यांना आकर्षित करणारे, आपल्या लडाख आणि लाहौल-स्पितीसारखे निसर्गरम्य पर्वतीय 'शीत वाळवंट'देखील पोखरा खोऱ्यातील 'मस्टांग' जिल्ह्यात आहे.
'व्हाईट वॉटर राफ्टिंग', 'कयाकिंग', 'बंजी जंपिंग', 'झिप लायनिंग', पॅराग्लायडिंग, 'माउंटन फ्लाइट', 'अल्ट्रा लाइट प्लेन फ्लाइट', 'हेलिकॉप्टर राइड' अशा अनेक रोमांचक अ‍ॅक्टिव्हिटीज हिमालयात करण्याची संधी पर्यटकांना पोखरात मिळते. त्याचप्रमाणे 'पुमदीकोट महादेव', 'विश्व शांती स्तूप', 'डेवी'ज फॉल', 'गुप्तेश्वर महादेव गुंफा', 'केदारेश्वर महादेव मंदिर', 'महेंद्र गुंफा', 'विंध्यवासिनी मंदिर', सारंगकोटचा 'सनराईज पॉइंट' आणि 'रोप-वे', खरेदीसाठी प्रसिद्ध असलेला जुना पोखरा बाजार, 'इंटरनॅशनल माउंटन म्युझिअम' अशी अनेक अन्य प्रेक्षणीय स्थळे पोखरामध्ये असली, तरी त्या सगळ्यांचा आढावा एका लेखातुन घेणे अशक्य असल्याने सदर लेखाचा फोकस हा पोखराची शान असलेले 'फेवा लेक', ह्या तलावातल्या बेटावरचे 'ताल बाराही' मंदिर, आणि 'लेक साइड' परिसरातल्या थोड्या मजामस्ती एवढ्यापुरताच मर्यादित ठेवत आहे.

चला तर मग, आता सुरुवात करू या 'फेवा लेक' आणि त्यातल्या 'ताल बाराही' मंदिरापासून.

fewa-1

ताल बाराही मंदिर १

'फेवा लेक' आणि त्यातल्या 'ताल बाराही' मंदिराच्या उत्पत्तीविषयी अनेक आख्यायिका / दंतकथा सांगितल्या जात असल्या, तरी त्यातली सर्वाधिक मान्यताप्राप्त आख्यायिका अशी -

कोणे एके काळी 'फेवा' नावाचे एक नगर होते. उत्तम हवापाणी आणि सुपीक जमीन असे शेतीसाठी अनुकूल वातावरण असल्याने शेतीवाडीतून होणाऱ्या मुबलक उत्पादनाच्या जोरावर नगरातले रहिवासी सधन-संपन्न होते. अशा समृद्ध नगरातील सधन नागरिकांच्या दातृत्वाची परीक्षा घेण्यासाठी भगवती देवी भुकेल्या भिकारिणीच्या वेशात प्रकट होऊन घरोघरी जाऊन अन्नाची मागणी करू लागली. नगरातील एकाही कुटुंबाने तिला अन्न-पाणी न देता अपमानित करून हाकलून लावले होते, परंतु नगराच्या वेशीजवळ काठमांडूहून तेथे स्थलांतरित होऊन जमिनीच्या छोट्याशा तुकड्यावर शेती करून आपली उपजीविका चालवणाऱ्या एका गरीब दांपत्याने तिला पोटभर जेवू-खाऊ घातले होते.

नगरातल्या धनिकांच्या गोरगरिबांप्रती असलेलया बेपर्वाईतून मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे क्रोधित झालेल्या भगवती देवीने फेवा नगराचा विनाश करून तिथल्या असहिष्णू नागरिकांना अद्दल घडवण्याचा आपला निर्णय जाहीर करून ह्या गरीब पण कनवाळू दांपत्याला त्या विनाशापासून वाचवण्यासाठी शेजारच्या एका टेकडीवर आपला संसार थाटायला सांगून आशीर्वाद दिला. भगवती देवीच्या सांगण्याप्रमाणे हे कुटुंब त्या टेकडीवर स्थलांतरित झाल्यावर देवीने नगराला सर्व बाजूंनी वेढणाऱ्या डोंगर-टेकड्यांपैकी दोन टेकड्या नाहीशा करून त्यांच्यामुळे अडलेल्या जलसाठ्याला मार्ग मोकळा करून देत फेवा नगराला जलसमाधी दिली.

संपूर्ण फेवा नगर पाण्याखाली जाऊन तिथे हा तलाव निर्माण झाला आणि ते गरीब दांपत्य वास्तव्यास असलेली टेकडी चहूबाजूंनी पाण्याने वेढली जाऊन तयार झालेल्या ह्या प्रचंड तलावात एका बेटाच्या रूपाने अस्तित्वात राहिली. ह्या जलप्रलयापासून आपल्याला वाचवणाऱ्या भगवती देवीप्रती आपला भक्तिभाव प्रकट करण्यासाठी त्या दांपत्याने ह्या बेटावर देवीचे छोटेसे मंदिर बांधले होते.

पुढे सोळाव्या शतकात कास्कीचा राजा कुलमंडन शाह ह्याने त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. दगड, लाकूड आणि धातू यांचा वापर करून पॅगोडा शैलीत बांधलेल्या ह्या छोट्याशा दुमजली मंदिराचा कळस स्वर्णाच्छादित आहे. आपल्याकडे सहसा सप्तमातृका पूजल्या जातात, त्याप्रमाणे नेपाळमध्ये पूजल्या जाणाऱ्या अष्टमातृकांपैकी एक असलेल्या 'वाराही' देवीला (नेपाळी भाषेत 'बाराही') समर्पित केलेले हे तलावातील मंदिर 'ताल बाराही' तसेच दुर्गा हे भगवती देवीचेच नाव असल्याने दुर्गा मंदिर म्हणूनही ओळखले जाते.

विशाल फेवा तलावातील बेटावर असलेल्या ह्या मंदिरात जाण्यासाठी बोटीशिवाय अन्य पर्याय नाही. तलावात नौकानयन करण्यासाठी किनाऱ्यावरील धक्क्यावर स्वतः वल्हवण्याच्या आणि नावाड्यासहित असे दोन्ही पर्याय उपलब्ध असलेल्या छोट्या होड्या आणि पॅडल बोट्स भाड्याने मिळतात, तसेच केवळ मंदिरात जाण्या-येण्यासाठी शेअर बोटीचा पर्यायही उपलब्ध आहे.

ताल बाराही मंदिर २

ताल बाराही मंदिर 3

ताल बाराही मंदिर 4

नेपाळ मधल्या 'रारा लेक' नंतर आकारमानाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या फेवा लेकचे क्षेत्रफळ जवळपास साडेचार वर्ग किलोमीटर एवढे विशाल आहे. ह्या तलावाच्या चार किलोमीटर लांबीच्या काठावर वसलेल्या पोखरा शहराची, विशेषतः 'लेकसाईड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसराची 'नेपाळचे गोवा' अशीही ओळख आहे. अर्थात समुद्रकिनारा नसलेल्या ह्या भूवेष्टित देशातील रहिवासी ह्या तलावाच्या काठाला 'बीच' म्हणून दुधाची तहान ताकावर भागवत असले तरी काही बाबतीत पोखरा व लेकसाईड परिसर आणि गोव्यात साम्य देखील आहे.

गोव्याप्रमाणेच निसर्गरम्य आणि 'सुशेगात' जीवनशैली असलेल्या ह्या शहरात पर्यटकांना मौज-मस्तीसाठी भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. प्रसन्न सकाळी, संध्याकाळी किंवा रात्री 'फूट ट्रॅकवर मारलेल्या एखाद-दोन लांबलचक चकरा असोत कि खादाडी, रात्री उशिरापर्यंत नाईटलाईफ अनुभवणे असो कि दिवसातल्या कुठल्याही वेळी, बाकी काही न करता, नुसते किनाऱ्यावरच्या एखाद्या बाकड्यावर किंवा गझेबोमध्ये निवांतपणे काही तास बसून आसपासचा निसर्ग, त्याची पाण्यात पडणारी प्रतिबिंबे पाहणे असो, ह्या सर्वच गोष्टी आनंददायी वाटतात.

दोन अडीच किलोमीटर लांबीच्या फूट ट्रॅकच्या एका बाजूला विस्तीर्ण जलाशय तर दुसऱ्या बाजूला शेकडो लहान-मोठी खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने, बार अँड रेस्टोरंटस, अ‍ॅम्यूजमेंट पार्क अशा गोष्टी आहेत. मद्याची रेलचेल आणि मत्स्याहार प्रेमींसाठी माशांचे विविध प्रकार हे देखील गोव्याशी असलेले आणखीन एक साम्य, अर्थात मद्याच्या किमतीच्या बाबतीत गोव्याशी अजिबात तुलना होऊ शकत नाही हा भाग वेगळा, पण विक्रीच्या बाबतीत बघितलं तर अक्षरशः इथल्या चहाच्या टपरीतही मद्यविक्री होताना दिसते.

फेवा सरोवराकाठचे अ‍ॅम्यूजमेंट पार्क

अ‍ॅम्युजमेंट पार्क १

अ‍ॅम्युजमेंट पार्क २

अ‍ॅम्युजमेंट पार्क ३

अ‍ॅम्यूजमेंट पार्कमधल्या 'जायंट व्हील'मधून दिसणारी फेवा लेकची आणि फूट ट्रॅकची विहंगम दृश्ये

अ‍ॅम्युजमेंट पार्क ४

अ‍ॅम्युजमेंट पार्क ५

अ‍ॅम्युजमेंट पार्क ६

पोखराचे 'डिस्नीलँड' म्हणवल्या जाणाऱ्या ह्या अ‍ॅम्यूजमेंट पार्कमध्ये जायंट व्हील, ब्रेक डान्स, डॉजेम कार, पायरेट शिप, स्केटिंग आणि अन्य पाच-सात नेहमीच्या लहान-मोठ्या राईड्स पेक्षा फार काही वेगळी आकर्षणे नसली तरी इथल्या जायंट व्हील मधून दिसणारी परिसराची दृश्ये मात्र विलोभनीय आहेत.

सुमारे दोन ते अडीच किलोमीटर लांबीच्या फूट ट्रॅकवरून दिवसातल्या वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या कोनांतून दिसणारी फेवा लेकची नयनरम्य दृश्ये

फुट-ट्रॅक
स्वच्छ-सुंदर फरसबंद फूट ट्रॅक ▲

fewa-lake

फेवा लेकची वेगवेगळी रुपे १

फेवा लेकची वेगवेगळी रुपे २

फेवा लेकची वेगवेगळी रुपे ३

फेवा लेकची वेगवेगळी रुपे ४

फेवा लेकची वेगवेगळी रुपे ५

फेवा लेकची वेगवेगळी रुपे ६

फेवा लेकची वेगवेगळी रुपे ७

 फेवा लेकची वेगवेगळी रुपे ८

फेवा लेकची वेगवेगळी रुपे ९

फेवा लेकची वेगवेगळी रुपे १०

फेवा लेकची वेगवेगळी रुपे १०

लेक साइड परिसरातील 'नाइट लाइफ':

लेकसाईड फूट ट्रॅक हि पोखरामधली एकदम 'हॅपनिंग प्लेस', त्यामुळे इथल्या वास्तव्यासाठी 'लेकसाईड' परिसरातले हॉटेल बुक करणे श्रेयस्कर! फूट ट्रॅक लगतच्या अनेक गार्डन बार अँड रेस्टोरंट्स पैकी बऱ्याच ठिकाणी रात्री बारा पर्यंत पररवानगी असल्याने लाईव्ह ऑर्केस्ट्रा, डीजे आणि अन्य नृत्यगायनाचे कार्यक्रम सुरु असतात ज्यात पर्यटक खात-पीत किंवा भटकंती करत छानपैकी नाईटलाईफ एन्जॉय करतात त्यामुळे रात्री उशिरापर्यंत इथे बऱ्यापैकी वर्दळ असते.

 फुट ट्रॅक १

 फुट ट्रॅक २

 फुट ट्रॅक ३

 फुट ट्रॅक ४

 फुट ट्रॅक ५

फुट ट्रॅक ६

 फुट ट्रॅक ७

 फुट ट्रॅक ८

तुंबा (Tumba)

फूट ट्रॅकवर संध्याकाळी फेरी मारत असताना स्थानिकांकडे आधी केलेल्या चौकशीत वरच्या फोटोत दिसणाऱ्या 'दुना टपरी मो मो हाऊस' नामक लहानशा रेस्टोरंटमध्ये 'तुंबा' चांगली मिळत असल्याचे समजले होते. तुंबा म्हणजे नेपाळी लोकांची एकप्रकारची पारंपरिक घरगुती बिअर. थंडीच्या दिवसांमध्ये हिमालयानजीकच्या पहाडी जमातींमध्ये घरोघरी तुंबा बनवून अबालवृद्धांद्वारे तिचे सेवन केले जाते. बाजारी पासून बनणारा हा पारंपरिक सौम्य मद्यप्रकार तांत्रिकदृष्ट्या बिअर गटात मोडत असला तरी त्याची निर्मितीप्रक्रिया आणि सेवनपद्धती मात्र बिअरपेक्षा वेगळी आहे.

तुंबा १

एक ते तीन आठवडे आंबवलेली बाजरी एका विशिष्ट आकाराच्या कंटेनरमध्ये अर्ध्याच्यावर भरून सेवन करण्याआधी त्यात उकळते पाणी ओतले जाते. त्यानंतर साधारणपणे पाच ते सात मिनिटांत आंबलेल्या बाजारीतले अल्कोहोल त्या गरम पाण्यात मिसळल्यावर त्या कंटेनरच्या मध्यभागी असलेल्या स्ट्रॉने ह्या गरम गरम पेयाचे सेवन केले जाते. त्या कंटेनरमधले पेय संपले कि पुन्हा त्यात उकळते पाणी ओतायचे आणि पाच-सात मिनिटे थांबून त्याचे सेवन करायचे. हि क्रिया सहसा दोन किंवा तीन वेळा केली जाते.

तुंबा २

एक वेगळा अनुभव म्हणून हे 'उष्ण' पेय प्यायला मजा आली, पण त्यासाठी मोजावी लागलेली किंमत मात्र जरा जास्तच वाटली. असो, पर्यटनस्थळी गोष्टी महागच असतात त्यामुळे 'व्हॅल्यू फॉर मनी' वाटली नसली तरी 'तुंबा' मात्र आवडली!

डान्सिंग बोट पबः

रात्री बारा वाजता फूट ट्रॅकवरची 'जत्रा' संपते पण खरे नाईटलाईफ हे बारानंतरच तर सुरु होते असे वाटणाऱ्या किंवा 'ये दिल मांगे मोअर' अशा गटातले तुम्ही असाल तर निराश व्हायचे कारण नाही! फूट ट्रॅकला समांतर असलेल्या 'बैदम रोड' ह्या हमरस्त्यावर काही चांगले पब्स आणि क्लब्स आहेत जे मध्यरात्री दोन वाजेपर्यंत सुरु असतात, त्यापैकीच एक हा 'पब डान्सिंग बोट'.

हॉटेलच्या रिसेप्शनिस्टकडे इथला चांगला क्लब,पब कुठला आहे अशी विचारणा केली असता त्याने चांगला क्राउड, उत्तम सजावट असलेल्या, दर्जेदार खाद्यपदार्थ आणि कॉकटेल्स मिळणाऱ्या ह्या तीन मजली पबचे नाव सुचवले होते. कोविडपूर्व काळात भरपूर नावलौकिक असलेल्या ह्या ठिकाणाला लॉकडाऊन काळात पर्यटन ठप्प झाल्याने बराच फटका बसला होता. त्यावेळी बराच काळ बंद राहिलेला हा पब नव्या व्यवस्थापनाखाली पुन्हा सुरु झाला पण काही महिन्यांनी पुन्हा बंद झाला होता. गेल्यावर्षी मूळ मालकांपैकीच कुणीतरी पुन्हा तो सुरु केला असून अद्याप तरी चालू आहे अशी अतिरिक्त माहितीही रिसेप्शनिस्टने दिली होती. प्रत्यक्ष त्याठिकाणाला भेट दिल्यावर त्याने सांगितल्याप्रमाणे इथले सर्व काही छान वाटल्याने हा पब पुढेही असाच व्यवस्थित सुरु राहो अशी सदिच्छा मनात निर्माण झाली.

डान्सींग बोट १

डान्सींग बोट २

गॉडफादर्स पिझ्झेरिआ

नेपाळमध्ये खाण्यापिण्याचे तसे हाल होत नसले तरी त्या बाबतीत फार नखरे असणाऱ्या लोकांना खूप लवकरच 'नेपाळी भोजन', 'थकाली' वगैरे स्थानिक खाद्यसंस्कृतीचा कंटाळा येऊ शकतो. मी पण अशांपैकीच एक! मांसाहाराची विशेष आवड नाही, रेड मीटची तर बिलकुल नाही, मत्स्याहार अजिबात करत नाही, चमचमीत-मसालेदार पदार्थांची आवड असल्याने तिखट-मीठ उन्नीस-बीस झालेले चालत नाही, तिथे पावला पावलावर मिळणारा मोमो'ज हा पदार्थ तर घशाखाली उतरत नाही वगैरे वगैरे....

त्यामुळे १३ दिवसांच्या नेपाळ ट्रीपमध्ये सुरुवातीच्या जनकपूर आणि काठमांडू मधल्या चार-पाच दिवसांतच स्थानिक आणि तिथे मिळणाऱ्या उत्तर भारतीय पदार्थांना कंटाळलो नसतो तरच नवल होते. मग चांगले आणि आवडीचे पदार्थ कुठे मिळतील ह्याचा शोध घेतला असता बैदम रोडवरचे 'गॉडफादर्स पिझ्झेरिया' हे ऑथेंटिक इटालीयन पिझ्झा मिळणारे ठिकाण सापडले!

गॉडफादर्स पिझ्झेरिआ १

गॉडफादर्स पिझ्झेरिआ २
मस्तपैकी हातानी लाटून पिझ्झा बेस बनवून त्यावर सॉस आणि टॉपिंग्स वगैरे पसरवून...

गॉडफादर्स पिझ्झेरिआ ३
त्यावर इच्छित असलेली 'याक चीज' आणि अन्य एक्स्ट्रा टॉपिंग्स वगैरे घातल्यावर 'वुड फायर ओव्हन' नामक भट्टीत टाकणाऱ्या आचाऱ्याच्या सगळ्या सराईत कृतींचे फोटो काढू देण्यास अनुमती देणाऱ्या देखण्या व्यवस्थापिकेचे आभार मानावे तेवढे आणि त्या आचाऱ्याचे कौतुक करावे तितके थोडेच...

गॉडफादर्स पिझ्झेरिआ ३

भट्टीतून काढलेले गरमागरम पिझ्झा तसेचही चवीला भारी लागत होते, पण चिली फ्लेक्स, ओरिगॅनो आणि Tabasco सॉस घातल्यावर तर अप्रतिम लागत होते. त्यांची मजा द्विगुणित करायला जोडिला 'गोरखा स्ट्रॉंग' (आपल्याकडच्या माईल्ड आणि स्ट्रॉंगच्या मध्ये बसेल अशी) हि स्थानिक बिअर आणि Somersby Apple Cider ही होतेच!

तर मंडळी तुर्तास इथेच थांबतो... पोखरा आणि नेपाळ मधल्या उर्वरित ठिकाणांबद्दल लिहिण्याचा लवकरच प्रयत्न करतो.

तमाम मिपा चालक / मालक / संपादक मंडळी आणि वाच़कांना दीपावली आणि नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
जय हिंद ! जय महाराष्ट्र !

प्रतिक्रिया

फारच सुंदर ठिकाणे. तपशीलवार लेख आवडला. छायाचित्रे उत्तम..

अथांग आकाश's picture

12 Nov 2023 - 11:20 pm | अथांग आकाश

मस्त! पुर्ण नेपाळ प्रवासवर्णन वाचायला आवडेल!!

सौंदाळा's picture

13 Nov 2023 - 7:48 am | सौंदाळा

छानच दिसतोय फेवा लेक आणि आजूबाजूचा परिसर.
लेखमालेच्या प्रतिक्षेत.
दिवाळीच्या शुभेच्छा.

कंजूस's picture

13 Nov 2023 - 11:33 am | कंजूस

सुंदर.

नेपाळमध्ये कुठून शिरायचं आणि पुढे प्रवासाचे काय पर्याय आहेत इकडे माझे लक्ष आहे. खाण्याचे हाल होतील हे मान्य. पण ग्रूप टुअर, भाड्याचे वाहन नको आहेत. स्वतंत्रपणे थोडीच ठिकाणे भटकायची आहेत. स्थानिक बसेसची सोय काय आहे?
(नेपाळचे नकाशे आणि माहितीपत्रके आहेत पण आपला अनुभव हवा आहे.)

गवि । अथांग आकाश । सौंदाळा । कंजूस
प्रतिसादांसाठी आपल्या सर्वांचे मन:पूर्वक आभार 🙏

@कंकाका,
"डिटेल्स तुम्हाला नंतर व्हॉट्सअ‍ॅप करतो" असे म्हणालो होतो, पण अन्य वाचकांच्याही उपयोगी पडू शकेल असे वाटल्याने लंब्याचौड्या प्रतिसादाच्या स्वरूपात ही माहिती इथेच देत आहे 😀

"नेपाळमध्ये कुठून शिरायचं आणि पुढे प्रवासाचे काय पर्याय आहेत इकडे माझे लक्ष आहे."

सर्वात कमी वेळात (साडेतीन तासांत) नेपाळमध्ये शिरण्यासाठी मुंबई ते काठमांडू हवाई प्रवास हा सर्वोत्तम पर्याय असला तरी अन्य वेळखाऊ पर्यायही उपलब्ध आहेत.

उत्तराखंड मधल्या 'बनबासा', उत्तर प्रदेशातल्या 'सुनौली' बिहार मधल्या 'रक्सौल', आणि पश्चिम बंगाल मधल्या 'पानीटंकी', ह्या चार बॉर्डर क्रॉसिंग पॉईंट्स वरून बराचसा रेल्वेने + बसने किंवा स्वतःच्या वाहनाने रस्तामार्गे नेपाळमध्ये प्रवेश करण्याचे प्रचलित पर्याय आहेत. तसेच दिल्ली ते काठमांडू डेली बस सर्व्हिसचा पर्यायही उपलब्ध आहे पण तो प्रवासही तीस ते बत्तीस तासांचा आहे त्यामुळे मुंबईपासून प्रवासास सुरुवात करायची असल्यास एकंदरीत पाहता हे सर्व पर्याय थोडेफार कमी खर्चिक असले तरी नुसते वेळखाऊच नाही तर खडतरही वाटतात. ह्या ट्रीपमध्ये आम्हाला जनकपूरला आवर्जून भेट द्यायची होती, आणि ते ह्यापैकी कुठल्याच मार्गावर येत नसल्याने वरील सर्व पर्याय आमच्यासाठी निरुपयोगी होते.

मग त्या अनुषंगाने शोधाशोध केल्यावर पवन एक्स्प्रेसने 'लोकमान्य टिळक टर्मिनस किंवा कल्याण ते बिहार मधील जयनगर' हा प्रवास भारतीय रेल्वेने आणि 'जयनगर ते जनकपूर' हा प्रवास नेपाळ रेल्वेने करून जनकपूरला पोचण्याचा झकास पर्याय सापडला. ह्या एकूण प्रवासाचा कालावधी ४५-४६ तासांचा असला तरी कल्याण ते जयनगर पर्यंतचा ३७-३८ तासांचा प्रवास टू टायर एसीने (मग सहा तासांचा मोकळा वेळ) आणि पुढचा जयनगर ते जनकपूरधाम पर्यंतचा एक ते दीड तासाचा प्रवास एसी चेअरकारने केल्याने संपूर्ण प्रवास आरामदायी व अजिबात कंटाळा न येता झाला. (कल्याण ते जयनगर रेल्वे तिकिटाचे दर: स्लीपर कोच -७३५ रु. थ्री टायर एसी - १९५० रु. आणि टू टायर एसी - २८३५ रु. तर जयनगर ते जनकपूरचे जनरल डबा - ७० नेपाळी रुपये व एसी चेअरकार - ३५० नेपाळी रुपये असल्याने हा प्रवास किमान सुमारे ७८०/- ते कमाल ३०५५/- भारतीय रुपये इतक्या रेल्वे भाड्यात होऊ शकतो.)

राहिली गोष्ट नेपाळ मधल्या अंतर्गत प्रवासाची तर नेपाळमध्ये पेट्रोल, डिझेल आपल्यापेक्षाही महाग असल्याने केवळ प्रवासखर्चच नाही तर सर्वच गोष्टी (ज्यात जीवनावश्यक वस्तूही आल्या) भारताच्या तुलनेत महाग आहेत. आम्ही गेलो तेव्हा सप्टेंबरमध्ये तिथे पेट्रोल १८२ रु तर डिझेल १७१ रु प्रतिलिटर होते. वरकरणी दिसायला भारतीय १०० रुपये =१६० नेपाळी रुपये असे दिसत असले तरी वस्तू आणि सेवांच्या किमतीही त्याच प्रमाणात चढ्या आहेत.

जनकपूरमध्ये लोकल साईट सीइंग साठी ई-रिक्षा हा चांगला पर्याय आहे, त्यांचे रेल्वे स्टेशन ते अमुक एक ठिकाण किंवा एअरपोर्ट पिकअप-ड्रॉप साठीचे तसेच अमुक ठिकाण ते तमुक ठिकाण असे अंतरावर आधारित प्रति प्रवासी दरही निश्चित असल्याने फसवणूक होण्याची शक्यता तशी कमी. बाकी पालिकेची बस सेवाही उपलब्ध असल्याचे दिसले, पण तिचा वापर केला नसल्याने अनुभव नाही.

काठमांडूमध्ये स्थानिक प्रवासासाठी टॅक्सी आणि महानगरपालिकेची व खाजगी बस सेवा असे पर्याय उपलब्ध आहेत. टॅक्सीचे किमान भाडे ३०० रुपये तर बसचे किमान भाडे २० रुपये आहे.

पोखरामध्ये देखील काठमांडूप्रमाणे स्थानिक प्रवासासाठी टॅक्सी आणि महानगरपालिकेची बस सेवा उपलब्ध आहे. मुळात पोखरा आणि काठमांडूतल्या बहुतांश टॅक्सीज ह्या मारुती किंवा ह्युंडाईच्या 'मिनी कार' गटातल्या असल्याने तीन प्रवाशांसाठीच आरामदायक आहेत आणि पोखरा इंटरनॅशनल एअरपोर्ट ते हॉटेल ह्या एकमेव टॅक्सीप्रवासाच्या अनुभवावरून, काठमांडूपेक्षा पोखरातले टॅक्सीभाडे जास्त आहे हे नमूद करतो. पोखरा एअरपोर्ट ते लेकसाईड पर्यंतच्या जेमतेम ९ किमी. अंतराच्या प्रवासासाठीचे निश्चित टॅक्सीभाडे ८०० नेपाळी रुपये (५०० भारतीय रुपये) होते. आम्ही सहाजण असल्याने पुढे सर्व साईट सीइंग दोन टॅक्सी घेऊन करण्यापेक्षा एक ७+१ सीटर स्कॉर्पिओ बुक करून तिच्यातून केले. परंतु इथेही बसने कुठला प्रवास केला नसल्याने त्या सेवेचा प्रत्यक्ष अनुभव नाही पण स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोखरातली सार्वजनिक बस सेवा खूप चांगली असल्याचे ऐकून आहे.

हे झाले स्थानिक प्रवासाचे, आता थोडे लांबच्या प्रवासाविषयी.
नेपाळचा सुमारे ७५% भूभाग हा टेकड्या आणि विविध पर्वतरांगांनी व्यापलेला असल्याने तिथे रेल्वेचे जाळे नाही. रस्तेमार्गाने खाजगी किंवा सार्वजनिक वाहनांतून किंवा विमानाने हवाईमार्गे असे प्रवासाचे दोनच मुख्य पर्याय उपलब्ध आहेत. जनकपूर ते काठमांडू हा प्रवास २२५ किमी आणि काठमांडू ते पोखरा हा प्रवास सुमारे २०० किमी अंतराचे असले तरी भाड्याच्या/खाजगी वाहनाने किंवा बसने इतक्या कमी अंतरांसाठी सुद्धा चार धाम प्रमाणेच सर्वसामान्य परिस्थितीत अनुक्रमे सात ते नऊ तास लागतात, वळणा वळणांच्या घाटरस्त्यांवर भूस्खलन आणि दरडी कोसळणे ह्या नित्याच्या बाबी असल्याने ह्या प्रवासाचा कालावधी आणखीनही वाढू शकतो त्यामुळे नेपाळच्या ग्रामीण भागातले लोकजीवन आणि दऱ्याखोऱ्यांचे सौन्दर्य पाहायला मिळत असले तरी सोबत ज्येष्ठ नागरिक असल्यास त्यांना हा प्रवास खडतर आणि शारीरिकदृष्ट्या थकवणारा वाटत असल्याने हे सर्व प्रवास विमानाने अवघ्या २५ मिनिटांत पूर्ण करून वेळ शारीरिक त्रास वाचवण्याकडे पर्यटकांचा कल असतो. आणि ह्याच विचाराने आम्हा सहाजणांपैकी मी, भाचा आणि माझे वडील अशा तिघांनी कल्याण ते जनकपूर पर्यंतचा प्रवास रेल्वेने केला असला तरी पुढचे 'जनकपूर ते काठमांडू', 'काठमांडू ते पोखरा', 'पोखरा ते पुन्हा काठमांडू' आणि 'काठमांडू ते मुंबई' असे चारही प्रवास विमानाने केले. बहिण, भाऊजी आणि बायको नंतर आम्हाला काठमांडू पासून जॉईन झाल्याने त्या तिघांची नेपाळ ट्रिप ९ दिवसांची तर आमची तिघांची १३ दिवसांची झाली 😊

अथांग आकाश's picture

16 Nov 2023 - 8:59 pm | अथांग आकाश

उपयुक्त माहिती! नेपाळ सहलीचे आयोजन करताना उपयोगी पडेल!!

तुषार काळभोर's picture

13 Nov 2023 - 1:05 pm | तुषार काळभोर

फोटो टाकण्यात कुचराई न केल्याने लेख बहारदार झालाय.
निसर्ग सौंदर्य आणि पर्यटन सुविधा दोन्ही दृष्टीने नेपाळ आणि भूतान यातील जास्त उत्तम पर्याय कोणता असेल, याचा विचार करतोय.

निसर्ग सौंदर्य आणि पर्यटन सुविधा दोन्ही दृष्टीने नेपाळ आणि भूतान यातील जास्त उत्तम पर्याय कोणता असेल, याचा विचार करतोय.

निसर्ग सौंदर्याच्या निकषावर नेपाळ की भुतान ह्यावर भाष्य करणे अवघड आहे, कारण त्याबाबतीत त्यांची आपापली वैशिष्ट्ये आहेत, आणि दोन्ही देशांतला निसर्ग सुंदरच आहे.
पर्यटन सुविधांच्या बाबतीत बोलायचे तर त्या भुतानमध्येही दर्जेदार आहेत, पण नेपाळ प्रमाणेच तिथलेही दिड-दोनशे किमी अंतराचे रस्ते प्रवास खडतर आणि वेळखाऊ असले तरी त्यापासुन दिलासा देणाऱ्या नेपाळ सारख्या किफायतशीर विमानसेवेचा मात्र तिथे अभाव असल्याने बरोबर ज्येष्ठ नागरीक किंवा लहान मुले आणि वळणा वळणांच्या घाटरस्त्यांवरुन होणाऱ्या प्रवासाचा त्रास होतो अशा व्यक्ती बरोबर आहेत अशा परिस्थितीत जर दोघांपैकी एकाची निवड करायची झाल्यास मी नेपाळचा पर्याय सुचवेन, पण त्याच बरोबर अनुकुल परिस्थिती असल्यास भुतानला दुर्लक्षीत करु नये असेही नमुद करतो. दोन्ही देश बघण्यासारखे आहेत!

पाषाणभेद's picture

13 Nov 2023 - 4:58 pm | पाषाणभेद

प्रवासवर्णन व फोटो दोन्हीही छान. फोटोंमुळे आम्ही तेथे प्रत्यक्ष गेलो असे वाटते.
दुसरे असे की, नेपाळ बहुतांश वेळा भारतावर अवलंबून आहे. असे असतांना तेथील सामान्य नागरीकाला आताच्या काळात भारताबद्दल काय वाटते?

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Nov 2023 - 12:57 am | अमरेंद्र बाहुबली

मी नेपाळला गेलो होतो तेव्हा एका नेपाळी मूलाला हा प्रश्न विचारला होता. तो बोलला की भारत आम्हाला वेगळा देश वाटतच नाही आपलाच वाटतो. मी त्याला बोललो का मग तुम्ही लोक भारतात शामील व्हायची मागणी का करत नाहीत?? त्यावर तो बोलला “नको, सगळा युपी बिहार नेपाळात घुसेल नी घाण करेल.”

टर्मीनेटर's picture

17 Nov 2023 - 4:01 pm | टर्मीनेटर

नेपाळ बहुतांश वेळा भारतावर अवलंबून आहे. असे असतांना तेथील सामान्य नागरीकाला आताच्या काळात भारताबद्दल काय वाटते?

चांगला मुद्दा उपस्थित केलात!
एकंदरीत मला तिथे भेटलेल्या लोकांशी झालेल्या वर्तालापातुन जे जाणवले ते सांगतो.
नेपाळच्या मध्यमवर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांना भरताबद्दल आत्मियता असल्याचे आणि ते भारताला आपला सच्चा मित्र मानत असल्याचे लक्षात आले. भारतात होत असलेल्या घडामोडींवर हा वर्ग व्यवस्थित लक्ष ठेऊन असल्याने इथे होत असलेल्या विकासकामांबद्दल त्यांना चांगली माहिती आहे. आम्ही तिथे गेलो तेव्हा नुकतीच भरताची चांद्रयान-३ मोहिम यशस्वी झाली होती आणि ह्या घटनेचे भारतिय नागरिक म्हणुन आपल्याला जेवढे कौतुक वाटते तसेच कौतुक त्यांनाही वाटत असल्याचे स्पष्टपणे जाणवेल इतके ते भरभरुन त्याविषयी बोलत होते. तशीच गोष्ट नेपाळ मधल्या क्रिकेट रसिकांची, त्यावेळी नुकतीच आशिया कप २०२३ स्पर्धा सुरु झाली होती. अत्तापर्यंत कुठल्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात भारताचा सामना कुठल्याही संघाशी असो समस्त नेपाळी क्रिकेट रसिक भारत जिंकावा ह्या इच्छेने सामना बघत असत. पण नेपाळचा क्रिकेट संघही आशिया कप मध्ये सहभागी झाल्याने त्यावेळी परिस्थिती थोडी वेगळी होती. ३० ऑगस्टला पहिल्याच सामन्यात नेपाळचा पाकिस्तान कडुन दारुण परभव झाल्याने २ सप्टेंबरच्या भारत वि. पाकिस्तान सामन्यात भारत विजयी व्हावा म्हणुन तिथले क्रिकेट रसिक देव पाण्यात बुडवुन बसले होते, पण त्यांनी देवांना जास्तच खोल पाण्यात बुडवल्याने असेल कदाचीत त्यामुळे पावसाचा व्यत्यय येउन तो सामनाच पाण्यात गेला 😀

४ सप्टेंबरला आणखिन वेगळीच गंमत! त्यादिवशी भारत वि. नेपाळचा सामना होता. नेपाळचे २३० धावांचे आव्हान न पेलवुन भारत तो सामना हरेल ह्या खुळ्या आशावादाने ठिकठिकाणी घोळक्याने सामन्याचे प्रक्षेपण पहात तावातावाने चर्चा करत नेपाळच्या विजयाची एकमेकांना खात्री देणाऱ्यांच्या पदरी त्या दिवशी भारत विजयी झाल्याने निराशा पडली होती. नेपाळ संघ स्पर्धेतुन बाहेर फेकला गेल्यावर झाले गेले विसरुन १० सप्टेंबरच्या भारताच्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतच कसा जिंकेल ह्यावर त्यांच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या, आणि ह्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा दणदणीत पराभव केल्यावर तिथल्या क्रिकेट रसिकांनी भारताच्या विजयाप्रीत्यर्थ अक्षरश: दिवाळी साजरी केली होती. आपला देश स्पर्धेत असेल तर पहिले त्याला पाठींबा, आणि तो स्पर्धेतुन बाहेर पडल्यास आपल्या आवडत्या किंवा मित्र देशाला पाठींबा देणारे क्रिकेट रसिक इथुन तिथुन सगळीकडे सारखेच 😊
क्रिकेट प्रमाणेच भारतीय चित्रपट हा पण त्यांच्या जिव्हाळ्याचा आणि चर्चेचा विषय! हिंदी चित्रपट तर ते पहातातच पण अनेक भारतीयांप्रमाणे हिंदी डब्ड दाक्षिणात्य सिनेमे देखिल ते तितक्याच आवडीने पहाताना दिसले!

बाकी भारताविषयी नेपाळी जनमानसात विष कालवण्याचे उद्योग चिनकडुन व्यवस्थितपणे चालु आहेतच आणि त्याच्या हस्तकांकडुन कडुन चालवल्या जाणाऱ्या दुष्प्रचाराला ज्यांचा भारताशी थेट कुठला संबंध आलेला नाही असे कॉलेज विद्यार्थी आणि मजुर - कामगार अशी कनिष्ठ वर्गातली लोकं बळी पडत असल्याचे त्यांच्याशी बोलताना लक्षात आले. डाव्या विचारसरणीच्या चरणी आपल्या निष्ठा वाहिलेल्या विचारवंत / संपादक मंडळींची जुनी पण परिणामकारक मोडस ऑपरेंडी तिथे बघायला मिळाली. हा प्रतिसाद जास्ती न लांबवता त्याचे उदाहरण खाली दुसऱ्या प्रतिसादात देतो 😀

टर्मीनेटर's picture

17 Nov 2023 - 7:06 pm | टर्मीनेटर

डाव्या विचारसरणीच्या चरणी आपल्या निष्ठा वाहिलेल्या विचारवंत / संपादक मंडळींची जुनी पण परिणामकारक मोडस ऑपरेंडी तिथे बघायला मिळाली. हा प्रतिसाद जास्ती न लांबवता त्याचे उदाहरण खाली दुसऱ्या प्रतिसादात देतो

पुढे चालु...
भक्तपुर दरबार स्क्वेअर मध्ये फिरत असताना अचानक मोठा पाउस आल्याने रस्त्यालगतच्या एका उपहारगृहात शिरलो होतो. तिथे टेबलावर पडलेल्या 'मजदुर' नामक वर्तमानपत्रातल्या भारताविषयीच्या बातमीच्या मथळ्याने माझे लक्ष वेधुन घेतल्याने काय लिहिलंय बघु म्हणुन वाचायला घेतलं खरं पण नेपाळी भाषेची लिपी देवनागरी असली आणि थोडी हिंदीसारखी दिसत असली तरी ती भाषा वेगळी आहे. त्यामुळे अक्षरे/शब्द वाचता येत असले तरी फार काही अर्थबोध होईना म्हणुन त्या बातमीचा फोटो काढुन नंतर हॉटेलवर पोचल्यावर गुगल लेन्सला कामाला लाउन भषांतरीत करुन वाचुया अशा विचाराने त्या वर्तमानपत्राचा फोटो काढला.

मला फोटो काढताना बघुन गल्ल्यावर बसलेल्या मध्यमवयीन मालकाला हसयला आले आणि "त्या चीनी कचऱ्याचा फोटो कशाला काढताय" असे तो हसत हसत विचारता झाला. त्याला कारण सांगीतल्यावर तो म्हणाला "इथल्या माओवाद्यांची अशी चीनी फंडींगवर चालणारी डझनभर तरी वर्तमानपत्रे नेपाळमध्ये आहेत, चीनची स्तुती आणि भारताची निंदानालस्ती करण्याच्या हेतुनेच ती चालवली जातात. नेपाळ मधुन प्रकाशित होणारी ही चीनची मुखपत्रे असल्याने आम्ही ह्यांना चीनी कचरा म्हणतो."
ह्यावर गमतीने त्याला "मग हा कचरा तुम्ही का घेता?" असा प्रश्न विचारल्यावर "असला कचरा विकत घ्यायला माझे पैसे वर नाही आलेत, माझ्या दुकानात रोज फुकट दोन प्रती टाकल्या जातात, मी ते वाचतही नाही पण पार्सलच्या पुड्या बांधायला लागणाऱ्या कागदासाठी रद्दी विकत घेण्यावर होणारा खर्च थोडा वाचतो एवढाच काय तो त्यांचा मला उपयोग. माझ्याच दुकानात नाही तर, तरुण मंडळींचे अड्डे आणि कामगार-मजुर लोकांचा राबता असतो अशी चहा-नाष्ट्याची छोटी मोठी दुकाने आणि उपहारगृहे अशा ठिकाणी असल्या वर्तमानपत्रांच्या प्रती फुकट टाकल्या जातात." हे त्याने दिलेले उत्तर अंतर्मुख करणारे होते.
'मजदुर' वर्तमानपत्रातल्या बातमीचा फोटो...

मजदूर
"भारतको लागि नेपालको राजदूत शङ्कर शर्माको भनाइ आपत्तिको विषय हो" अशा मथळ्याची ही बातमी गुगल लेन्सने खालीलप्रमाणे भाषांतरीत करुन दिली...

"नेपाळचे भारतातील राजदूत शंकर शर्मा यांचे विधान आक्षेपार्ह आहे"
"काठमांडू, २१ ऑगस्ट. नेपाळच्या जलस्रोतांचा वापर, उद्योग आणि व्यापाराचा विकास आणि व्यापारी तूट कमी करण्याबाबत असे केल्यास नेपाळला फायदा होईल, असे चीनचे महामहिम राजदूत म्हणाले. , पंतप्रधान पुष्प कमल दहल संयुक्त राष्ट्राला संबोधित करणार आहेत. अमेरिकन सरकारने युरेनियम असलेले AIM-20 अम्राम क्षेपणास्त्र युक्रेनला विकले आहे, त्यामुळे युक्रेनला रशियाविरुद्ध युद्ध सुरू करण्यासाठी चिथावणी दिली आहे आणि त्यामुळे त्याला प्रोत्साहन मिळालेले नाही, हे प्रम दहल यांनी यूएनला केलेल्या भाषणात स्पष्टपणे सांगणे महत्त्वाचे आहे. चर्चा झाली, परंतु त्याऐवजी ते झाकण्यासाठी उत्तर कोरियाला शस्त्रे विकली.
युक्रेन युद्धामुळे जगात वाढलेली अन्न, इंधन, आर्थिक संकट, बेरोजगारी आणि अशांतता यांचा पंतप्रधान दहल यांच्या भाषणात स्पष्टपणे उल्लेख करणे महत्त्वाचे आहे. अमेरिकन साम्राज्यवादाला विरोध करणे आवश्यक आहे. युरेनियम असलेल्या क्षेपणास्त्रांमुळे कॅन्सरसह जन्मजात आजार होतात, श्वास घेणे कठीण होते आणि अमेरिकन सरकारकडून अशा शस्त्रांची विक्री धोकादायक आहे, याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधणे महत्त्वाचे आहे. अमेरिकन सरकारच्या प्राणघातक शस्त्रांच्या निर्मिती आणि विक्रीविरोधात आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाज उठवण्याचे आवाहन करणे आवश्यक आहे. , सत्ताधारी पक्षाचे नेते आणि अराजकतावादी यांच्या संगनमताने देशाचा आणि जनतेचा फायदा कसा होणार? नाही आज नेपाळच्या दहा मोठ्या खाजगी बँका नेपाळ आणि भारत या दोन्ही देशांचे नागरिकत्व असलेल्या लोकांच्या नियंत्रणाखाली आहेत. सरकारांना नेपाळचे देशभक्त उद्योगपती-व्यापारी कसे दिसले नाहीत?
कांती चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये उपचार न घेता पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आणि पुलचोक अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिकारी आणि प्राध्यापक खासगी महाविद्यालयांचे गुंतवणूकदार बनले, याला सरकारचे पंतप्रधान आणि मंत्री जबाबदार आहेत.
(गुरुवार, 21 ऑगस्ट 2080 रोजी प्रतिनिधीगृहाच्या विशेष अधिवेशनादरम्यान नेपाळ मजूर आणि शेतकरी पक्षाचे खासदार प्रेम सुवाल यांनी दिलेल्या भाषणाचा सारांश)"

हे वाचल्यावर त्या मथळ्याचा आणि बातमीचा नक्की काय संबंध आहे हे काही समजले नाही बुवा, कोणाला काही लिंक लागल्यास ते सांगुन मला उपकृत करावे!

संपुर्ण बातमी वाचण्याएवढा वेळ किंवा आवड नसलेली अनेक मंडळी हेडलाइन्स / मथळे वाचुन वर्तमानपत्रे फक्त चाळतात. अशा लोकांच्या वाचनात असल्या दिशाभुल्/बुद्धिभ्रम करणाऱ्या बातम्यांचे मथळे रोजच्या रोज येत असल्यास भारताविषयी हळुहळु त्यांची नकारात्मक मानसिकता तयार होणे स्वाभविक आहे. एकप्रकारचे स्लो-पॉयझनींगच की हे!

मुक्त विहारि's picture

14 Nov 2023 - 9:09 pm | मुक्त विहारि

तिथेच, माशांचे संगोपन केंद्र आहे..

नाईट लाईफ उत्तम आहे. फसवेगिरी नाही.

नेपाळ मध्ये मला तरी, नाईट लाईफचा वाईट अनुभव आला नाही..

आणि सचोटी पण उत्तम

माझे बिल जवळपास, १४,००० नेपाळी रुपये झाले होते... मी १००/- सौदी रियाल दिले (१०० सौदी रियालची नोट... तेंव्हा, सौदी रियालचा भाव, भारतात १५ आणि नेपाळ मध्ये साधारण पणे 22-23 होता... नक्की आठवत नाही...भारतीय दर समजून बिल दिले...), आणि निघालो तर, त्यांनी मला परत बोलावून, उरलेले पैसे दिले....

मुक्त विहारि's picture

15 Nov 2023 - 6:55 pm | मुक्त विहारि

टायपिंग मिस्टेक

टर्मीनेटर's picture

17 Nov 2023 - 7:21 pm | टर्मीनेटर

टायपिंग मिस्टेक

हो ते आले होते लक्षात 😊
एकतर १०० वर एक पुज्य कमी किंवा १४०० वर एक पुज्य जास्त पडले असावे हा अंदाज आला होता!

नाईट लाईफ उत्तम आहे. फसवेगिरी नाही.

+१०००

लेक परीसर तुंबा पिझ्झा सगळंच भारी!

राजेंद्र मेहेंदळे's picture

15 Nov 2023 - 4:28 pm | राजेंद्र मेहेंदळे

फेवा नगरीची सफर आवडली. शेवटचा पिझा विथ गोरखा स्ट्राँग चा फोटो बघुन गारेगार वाटले :)

आता नेपाळ पोखरा सिरीज येउ द्या. पुलेशु.

गोरगावलेकर's picture

15 Nov 2023 - 9:43 pm | गोरगावलेकर

फेवा लेक परिसराची तपशीलवार ओळख छानच. फोटो जबरदस्त.
पूर्ण पिक्चरची वाट बघणे आले.

Bhakti's picture

16 Nov 2023 - 7:27 am | Bhakti

लेखाच्या सुरुवातीला दिलेली माहिती खुपच उपयुक्त आहे.
सुंदर तलाव दिसत आहे.हैपनिंग उत्साहपूर्ण वातावरण आवडले.तुंबी आणि पिझ्झा तयार करण्याची पद्धती रोमांचकारी आहे.

कर्नलतपस्वी's picture

16 Nov 2023 - 10:11 am | कर्नलतपस्वी

रिंगमास्टर सारखे इतीहास, भूगोल,खादंती इ. भटकंतीच्या विविध अंगाना सतत कसे नाचत ठेवावे हे आपल्या लेखनातून लक्षात येते.
माहितीपूर्ण, मनोरंजक आणी नेपाळ भटकंतीला उद्युक्त करणारा लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद.

इतका सविस्तर लिहिलेला आणि मोहक फोटोंनी सजलेला लेख अतिशय आवडला आहे. आमच्या सारख्यांना घरबसल्या नेपाळ दर्शन झाले ;)

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Nov 2023 - 12:59 am | अमरेंद्र बाहुबली

मस्त लेख नी माहीतीपुर्ण प्रतिसाद. नेपाळला जाणार्याने त्या प्रतिसादावरून चक्कर मारूनच जायला हवे.

टर्मीनेटर's picture

17 Nov 2023 - 7:27 pm | टर्मीनेटर

रंगीला रतन | राजेंद्र मेहेंदळे | गोरगावलेकर | भक्ती| कर्नलतपस्वी | पियुशा | अमरेंद्र बाहुबली

प्रतिसादासाठी आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏

बिपीन सुरेश सांगळे's picture

22 Nov 2023 - 10:08 am | बिपीन सुरेश सांगळे

संजयजी
लेख सुंदर. तुमचे लेख / लेखमाला सगळ्याच भारी अन माहितीपूर्ण , चित्रदर्शी असतात .

प्रचेतस's picture

24 Nov 2023 - 10:03 am | प्रचेतस

एकदम बहारदार वर्णन. तुंबा फारच आवडले. फोटो खूपच सुरेख. मजा येते आपले लेखन वाचायला. फक्त ह्या लिखाणावरच न थांबता तुमच्या एकंदरीत सहलीचे वर्णनही लेखमालिकेच्या स्वरुपात येऊ द्यात.

चौथा कोनाडा's picture

4 Dec 2023 - 5:44 pm | चौथा कोनाडा

फेवा लेक या सुन्दर तलावाचे रम्य भटकंती वर्णन आणि अप्रतिम प्रचि !

फेवा लेकच्या निर्मितीची आख्यायिका अर्थात भगवती देवीची कहाणी अतिशय रोचक !

फूट ट्रॅकवरून दिसणारी फेवा लेकची नयनरम्य दृश्ये ... अप्रतिम !
भट्टीतला गरमागरम पिझ्झा ... तोंपासु.
लेखन आणि सगळेच प्रचि ... एक नंबर...
NC123edfcL456

आणी टर्मीभाऊ , प्रतिसादात दिलेली माहिती अ ति श य उपयोगी आहे
धन्यु !

श्वेता व्यास's picture

13 Dec 2023 - 3:38 pm | श्वेता व्यास

फेवा लेक आणि आजूबाजूचा परिसर आवडला.
फोटो छान आहेत. एखादी निवांत सहल करण्यास चांगला पर्याय दिसतोय.