दिवाळी अंक २०२३ - गोष्ट एका मोहम्मदवाडीची

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in दिवाळी अंक
12 Nov 2023 - 12:00 am

गोष्ट एका मोहम्मदवाडीची

ढगाई माता मंदिर

शारदीय नवरात्रातील एक पहाट. चहाचा कप घेऊन गच्चीवर बसलो होतो. अंधार होता, पण शेजारील विठ्ठल मंदिराला जाग आली होती.. कुणी गावगंधर्व आपली भाव, भक्ती पणाला लावून गदिमा रचित, संत गोरा कुंभार चित्रपटातील प्रसाद सावकार यांचे अजरामर गीत गात होता.

'ऊठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला
थवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला
पूर्व दिशी उमटे भानू, घुमे वारियाचा वेणू
सूर सूर वेणूचा त्या सुगंधात न्हाला'

विठुराया गालातल्या गालात हसत असावा, कारण त्याला माहीत होते की 'थवा जमा' वगैरे काही नाही, बहुतेक वैष्णव गोधडीत साखरझोपेचा आनंद घेत आहेत.

विठ्ठल मंदिर

शांतपणे पहुडलेल्या रस्त्यावर विविध वाहनांचे आवाज येण्यास सुरुवात झाली होती. निरव, शांत वातावरणात राग मिश्र खराबचे स्वर हळुहळू तारसप्तकाकडे वाटचाल करू लागले होते.. थोडक्यात, रहदारी वाढू लागल्याने शांतता भंग होत होती. कानावर पडणारे स्वर, शब्दांच्या पलीकडले, पक्ष्यांची किलबिल, कोंबड्यांची बांग रश्मीरथाच्या आगमनाची सूचना देत होती.. अशी आमच्या रामप्रहराची सुरुवात होते!

'जमुना किनारे मेरा गाँव साँवरे आय जइ य्यो' (ठुमरी, खमाज), पं.. कुमार गंधर्व यांचे गाणे भ्रमणध्वनीवर सुरू होते. गाण्यामुळे भीमातिरीचा मोरा गाव आठवला, असे वाटते की म्हणत आहे 'कब आओगे मोरे लाल, आय जय्यौ. '

भ्रमणध्वनीवर माझ्या आवडत्या गाण्यांची ऑटो प्ले यादी हीच माझी काकड आरती. प्रभातफेरीमध्ये नित्यनेमाने ऐकतो. ठुमरी संपली, कवी वा.रा. कांत यांचे शब्द आणि पं. वसंतरावांचा आवाज - 'बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात' गाणे सुरू झाले. कवी कांत हे माझे आवडते कवी.. श्रीधर फडक्यांनी गायलेली कांत यांची एक रचना 'झुळूक आणखी एक - आणखी एक पान गळले'.. हृदयाला हात घालते. अप्रतिम.

https://youtu. be/rSkqzyWK-4w?si=HV_5q4W7iSjgda2I

नुकतीच हैदराबाद-रामोजी-श्रीशैल्यम भटकंती पूर्ण केली. छायाचित्रे, गोड-कडू आठवणी गाठीला असतानासुद्धा दिवाळी अंकासाठी काय लिहावे सुचत नव्हते.

तेच किल्ले, तेच किनारे
एकसमान ती उदास शहरे
त्याचं कहाण्या, त्याच विराण्या
तशीच शिल्पे, तशाच लेण्या..

त्याच लाटा अन् तेच भिजणे
त्याच त्या रुपेरी वाळूत रेखणे
तीचं स्वप्ने, हिशोब तोच...
पुन्हा मांडणे, सांधण्या किनारे

भग्न स्मृती अन् इतिहास ठेवा
कधी गहीवरलो, कधी धुसफुसलो,
कधी मनोरम हसलो..
तोच तो अनुभव, पुन्हा,पुन्हा का घ्यावा?

छ्या, असे काहीही लिहावेसे वाटत नव्हते. 'भटकंती'सुद्धा ऋणानुबंधांच्या गाठी, कधी कशा जुळून येतील सांगता येणार नाहीत.

'बगळ्याचीं माळं फुले'वरून अचानक अगळा वेगळा पर्यटन विषय सापडला. चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आला असेल.. नाही, तर चला मग माझ्याबरोबर, आज आपण गावातल्या गावात पर्यटनाचा आनंद घेऊ. तेही पूर्वनियोजन किंवा एकही पैसा न खर्च करता. तुम्ही म्हणाल, काय आहे एवढं बघण्यासारखं या छोट्या गावात? चला बघू या, पण आधी चला तर खरं..

आमची मोहम्मदवाडी, गूगल सर्च केलं तर महादेववाडी म्हणून सापडेल. हडपसर-उंद्री बायपास रस्त्यावरचे छोटेसेच गाव. बोपदेव घाटाच्या डोंगररांगांनी सुरक्षित, निसर्ग, जीववैविध्य भरपूर. आता याला बोपदेव नाव का व कसे पडले असावे? बोपदेव हे देवगिरीच्या यादव दरबारातील मान्यवर दरबारी, प्रसिद्ध व्याकरणकार, कवी, वैद्य होते, मूळ विदर्भातील. कदाचित त्या वेळचा शक्तिशाली राजा सिंघण याचे राज्य इथे होते, म्हणून तर नसेल? असो, संदर्भ शोधू पुन्हा कधीतरी.

तर. .
कानिफनाथ डोंगर आणि इ.स. १७३०मध्ये पिलाजीराव जाधव - स्वराज्याचे सरसेनापती - यांनी बांधलेला जाधवगड इथेच जवळ आहे. आता तिथे महागडे हाॅटेल सुरू आहे.. आता ढाल-तलवारींची जागा काटे-चमच्यांनी घेतली आहे.

पुणे शहराच्या आग्नेय भागात वसलेल्या मोहम्मदवाडीला शिवकालीन इतिहास आहे. काही सांगता येत नाही, त्याच्याही पूर्वीचासुद्धा असेल. शिवकालात जाधवगड, पुरंदरकडे जाण्याकरता महादेववाडीच्या खिंडीतून जावे लागायचे. ऐकीव माहितीवरून असे कळले की छ. संभाजी महाराजांना संगमेश्वरवरून श्रीक्षेत्र वढू तुळापूरकडे जेरबंद करून मोगली सेना याच खिंडीतून घेऊन गेली होती. त्या दुःखद प्रसंगाची ही खिंड साक्षीदार आहे. रस्त्याला 'धर्मवीर छ. संभाजी महाराज मार्ग' नाव दिले आहे.

हडपसर, वानवडी, साडेसतरानळी, मांजरी, उंद्री, पिसोळी, कोंढवा, मुंढवा आशा चित्रविचित्र, दिलखेचक नावांच्या गावांमध्ये वसलेले हे गाव, एकेकाळी दुष्काळ आणि साथीच्या रोगाने उजाड झालेले, शहाजीराजांच्या आदेशानुसार जिऊ घुले पाटील यांनी गावाला पुन्हा आबाद केले.

संदर्भ -

'आदिलशहाने वैराण केलेल्या परगण्याची पुन्हा घडी बसवण्याकरिता, दस्तुरखुद्द शहाजी महाराजांनी दादोजी कोंडदेव यांची पुण्यावर नेमणूक केली. महाराजांचा मुलुख पुणे, इंदापूर, सुपा याचा कारभार दादाजी कोंडदेव पाहत होते.

दादोजी कोंडदेव यांचा पहिला जुना उल्लेख इ.स. १६३३मध्ये पुणे परगण्याच्या महमदवाडी गावासंबधीचा आहे. त्या गावचा जाऊ पाटील याने लिहून दिले आहे.

बापूजी देऊ पाटील घुले हा आपला भाऊ दुष्काळ पडला म्हणून गाव सोडून परमुलखास गेला, त्यावर वडील मेले, आम्ही वाचलो, सुकाळ जाला. ' यावर 'दादाजी कोंडदेव दिवाण जाले, त्यांनी मुलुख लावला' असा उल्लेख आहे.

(शिवचरित्र साहित्य खंड २, लेखांक ९५.. )

https://durgaayan. blogspot. com/2011_01_02_archive. html?m=1
प्रकाशक आणि ब्लॉगरांचे धन्यवाद.

गावाचे नाव साडेसतरानळी, सोळा किंवा सतरा का नाही? साहजिकच असा विचार मनात येतो. विचित्र नावांमुळे या गावांच्या इतिहासाबद्दल उत्सुकता वाढते. मोहम्मदवाडीप्रमाणेच आजूबाजूच्या वरील सर्व गावांना खूप जुना इतिहास आहे. गावातून फेरफटका मारल्यानंतर काही गावांचा ऐकीव / आंतरजालावर इतिहास कळला, तो असा -

हाडपसर (हाडं पसर), वरकरणी अभद्र वाटणाऱ्या नावामागे आख्यायिका आहे म्हणे - रामटेकडीवरून एका राक्षसाला बाण मारल्यानंतर त्याची हाडे सर्वदूर पसरली, म्हणून 'हडपसर' हे या परिसराचे नाव पडले. खरे-खोटे प्रभू श्रीरामच जाणे.

बाराव्या शतकातील राजा सिंघण इ. स.. १२१० ते १२४७ या काळात देवगिरीच्या यादवकुळातील महाशक्तिशाली राजा. याने कोल्हापूरचे शिलाहार, बनवासीचे कदंब आणि पांड्य देशाच्या राजांना आपल्या अंकित केले.. उत्तरेस गुजरात, मालवा अगदी अफगाणिस्तानात कलचुरीपर्यंत आपली सीमा वाढवली. दक्षिणेकडील होयसळचा राजा बल्लाल द्वितीय याचा पराभव करून पितामह भिल्लम यांच्या पराभवाचा बदला घेतला.

याच काळात यादव, जाधव, तुपे, मगर घराणी इथे स्थायिक झाली. नंतर १४व्या शतकात दुष्काळ पडल्यानंतर ही घराणी हा भाग सोडून गेली. या भागाची पाटीलकी कासार लोकांकडे आली. दुष्काळ संपल्यानंतर तुपे घराणे पुन्हा परतले व कासारांकडे मुतालिक म्हणून काम करू लागले.

१५व्या शतकात या भागाची जहागिरी शहाजीराजांकडे आली. महाराजांनी पुन्हा हडपसर वसवले.

पहिल्या बाजीरावाने मांजरी येथे पेशवेपदाची वस्त्रे स्वीकारली.

पेशवे बाजीराव दुसरे यांच्या काळात होळकर व शिंदे या दोन घराण्यांमधील वाद पराकोटीला पोहोचले होते. दोन पराक्रमी सरदार घराण्यांतील वाद मिटवण्याकडे तत्कालीन पेशव्यांनी लक्ष द्यायला हवे होते. मात्र तसे घडले नाही. यशवंतराव होळकरांनी केलेल्या काही मागण्या मान्य करून सामोपचाराने प्रश्न मिटवता आला असता. उलट यशवंतराव होळकर यांचे मोठे बंधू विठोजी होळकर यांना शनिवारवाड्यासमोर हत्तीच्या पायाखाली देऊन मृत्युदंडाची शिक्षा दिली गेली. भावांच्या मृत्यूमुळे संतप्त झालेले यशवंतराव होळकर भलेमोठे सैन्य घेऊन पुण्यावर चालून आले. गेल्या कित्येक वर्षांत पेशव्यांची राजधानी असलेल्या पुण्यावर हल्ला करायचे धाडस झाले नव्हते. पण आता दोन मराठी सेना एकमेकांसमोर उभ्या होत्या. पेशव्याच्या बाजूने अर्थातच दौलतराव शिंदेंची सेना लढणार होती. दोन्ही बाजूंना जवळपास लाखभर सैन्य होते. यात कवायती फौजा, तोफा, घोडदळ यांचा समावेश होता. २५ ऑक्टोबर १८०२ ऐन दिवाळीच्या दिवशी युद्धाला तोंड फुटले. घनघोर लढाई झाली. यशवंतराव होळकर स्वतः जातीने लढाईत उतरले. कुशल नेतृत्व, पराक्रमाची पराकाष्ठा यामुळे शिंदेंच्या कवायती फौजेला होळकर भारी पडू लागले. संध्याकाळपर्यंत दौलतराव शिंदेंचा मोठा पराभव झाला होता. दोन्हीकडचे हजारो सैनिक ठार झाले. हा आकडा त्या काळच्या मानानेदेखील प्रचंड मोठा होता. संपूर्ण पुण्यासाठी ही काळी दिवाळी ठरली. असे युद्ध त्यांनी न भूतो न भविष्यती पाहिले होते.. ही लढाई झाली ते ठिकाण म्हणजे कवडीचा माळ. तिथे मोठी लढाई झाली, म्हणून या गावाचे नाव घोरपडी असे पडले. युद्धकैद्यांना यशवंतराव होळकरांनी जिथे कोंडले, ते ठिकाण कोंढवा म्हणून प्रसिद्ध झाले. मेलेल्या लोकांच्या मुंड्या टाकल्या ते ठिकाण मुंढवा, तर हाडे टाकली ते ठिकाण हडपसर नावाने जन्माला आले. (खरे-खोटे देवाला ठाऊक. )

गेल्या बारा वर्षांपासून मी इथे राहतो आहे. मुख्य शहराबरोबर गावाचे रूपडे पालटले आहे, पण मुळ संस्कृती, रितीरिवाज अजून तरी गावकऱ्यांनी जपले आहेत. जीन्स, टी शर्ट, पंजाबी ड्रेस या अधुनिक पोशाखाबरोबर नऊवारी, पाढंरा सदरा, बंडी, धोतर, पायजमा, नेहरू टोपीसुद्धा प्रचलित आहे.

आज गावात शिरताना वेस जरी नसली, तरी परंपरेनुसार सीमेवर गाव रखवालदार भैरवनाथ यांचे सुंदर, भव्य मंदिर आहे.. भैरवनाथांची जत्रा उत्साहात भरते. जत्रेची लगबग तीन-चार दिवस असते. भरगच्च धार्मिक, सांस्कृतिक, मनोरंजक कार्यक्रम असतात. जत्रेसाठी दुरून व्यावसायिक आणि पाव्हणे रावळे येतात.. पिझ्झा, बर्गर, अमूल-वाडीलालच्या युगात भेळ, कांदाभजी, लाल, पांढरी गोडी शेव, रेवडी यासातख्य पारंपरिक खाद्यपदार्थांना, बुढ्ढी के बाल, गारेगार आइसकॅंडीला भाव येतो.. रहाट पाळणे, फुगे, पिपाणी, गलोल, भातुकलीची भांडीकुंडी... एक ना दोन.. अगदी बायस्कोपसुद्धा जत्रेत हजेरी लावतो. डी-मार्ट, स्टार बझार, वेस्ट साईड यासारखे माॅल जरी असले, तरी जत्रेमधल्या 'शाॅपिंग दा जवाब नही' असेच म्हणावे लागेल.

तमाशाशिवाय जत्रेची काय मजा! गावकऱ्यांनी संपुष्टात येत असलेल्या या लोककलेला आश्रय दिला आहे. एक रात्र तमाशासाठी राखीव असते. सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांनीही गावात हजेरी लावली होती. पीरसाहेबांचा उरूससुद्धा उत्साहात साजरा होतो.

 देव

गावाच्या हद्दीत प्रवेश केल्यावर मारुतीचे प्राचीन मंदिर आहे. एक गाव, एक मारुती, एक तालीम हे समर्थांचे स्वप्न साकारलेले दिसते. मंदिराशेजारीच जोडून तालीम आहे. लाल मातीच्या आखाड्याबरोबर काळ्या आधुनिक यंत्रानी सुसज्ज व्यायामशाळाही उपलब्ध आहेत.

या प्राचीन मारुती मंदिराचा जीर्णोद्धार नुकताच झाला आहे. प्रभू श्रीराम, नवग्रह आणि भक्तासह इथेच विराजमान आहेत. राम नवमी, हनुमान जयंती मआणि शनिवार भक्तांनी मंदिर भरलेले असते. प्रवेशद्वाराजवळ उजवीकडे गजलक्ष्मी, तर डावीकडे नाग कुंडल ही दगडी प्रतीके ठेवलेली आहेत. शेंदुराने माखलेली असली, तरी प्रथमदर्शनी ओळखू येतात. गावातले वरिष्ठ यावर काही जास्त प्रकाश टाकू शकले नाहीत. गजलक्ष्मी संपन्नतेचे, भराभराटीचे, सृष्टिसर्जनाचे प्रतीक. अशी प्रतीके खूप प्राचीन, अगदी कनिष्काच्या कालापासून दिसतात. कुणीतरी मारुती मंदिरात मुद्दाम आणून ठेवण्याची शक्यता कमी वाटते. असे थोडा वेळ ग्राह्य धरले की ती इथलीच आहेत, तर गावाचा इतिहास खूप दूर - म्हणजे किमान दहाव्या-बाराव्या शतकापर्यंत पोहोचतो. (श्री प्रचेतस यांच्यामुळे हा अंदाज बांधता आला, त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. ) असो.

मारुती मंदिराच्या मागेच श्री शिवपूर्णानंद सरस्वती स्वामी महाराज स्थापित नागेश्वर शिवालयास गोडसे मठ या नावानेसुद्धा ओळखतात. शिवमंदिराच्या प्रांगणात तीन-चार मंदिरे, जुनी विहीर आणि तिच्या काठावरचा वड मठाचे ऐतिहासिक वय सांगतो. अंदाजे दीडशे वर्षांपेक्षा अधिक जुना मठ असावा.. २८ फेब्रुवारी १९०३ या दिवशी स्वामी ब्रह्मलीन झाले, त्यांची समाधी इथेच आहे.. १ मे १९११ रोजी स्वामींचे शिष्यमआणि नातू रा. रा.. दिगंबर नारायण गोडसे यांनी मठाचा जीर्णोद्धार केला.. २ फेब्रुवारी १९४८ रोजी लोकक्षोभामुळे नुकसान झाले, स्वामींचे शिष्य आणि नातू रा. रा.. गंगाधर नारायण गोडसे यांनी त्याची डागडुजी केली. आज स्वामींची पाचवी पिढी हयात आहे. परिसर अतिशय सुंदर, शांत, थंड आणि ध्यानधारणेकरता पोषक आहे. इथे वेगळे ध्यानगृह आहे. मठ परिसरावर गोडसे कुटुंबीयांचा मालकी हक्क आहे.

(संदर्भ-परिसरातील सूचना फलकांवरून)

जंगल रोड

मारुती मंदिर आणि तालीम यांच्या मधून जाणारा रस्ता टेकडीवरील ढगाई माता मंदिराकडे जातो. आपल्याला टेकडीवर जायचेच आहे. तेच खरे मुख्य आकर्षण पण गावकुसाचा फेरफटका मारल्यानंतर. चला, परत येताना मठाला भेट देऊ.

गावातून जाणारा हडपसर-उंद्री संपर्क रस्ता पुढे हडपसर-कात्रज बायपासला मिळतो. गावात वाहनांचा सतत राबता, डी पी एस, बिशप, संस्कृती इ. नामांकित शाळा, मगरपट्टा, हडपसर खराडीमधील आयटीवाल्यांना सोईस्कर असल्याने वस्ती वाढली. रस्त्यालगतच्या जमिनींचा भाव वधारला. त्याचा फायदा बळीराजाला झाला. गावांतली शेतजमीन न विकल्याने गावाचे रूप फारसे बदलले नाही. आजही पारंपरिक पद्धतीने शेती व्यवसाय केला जातो. पालेभाज्या, फळभाज्या, ताजे निरसे दूध मिळते. शेतीबरोबर जोडधंदा म्हणून नाही, तर स्वतःसाठीच कोबंड्या, गायी, म्हशी व शेतीसाठी बैलांनी भरलेले गोठे आहेत. बैलपोळा सण जोरात साजरा होतो. डी जे, लेझर लाइटचा वापर मिरवणुकीत या वर्षापासून कमी/बंद झाला आहे. तरुणाई अधुनिक व्यवसायात मग्न आहे. राजकीय नेतृत्वासह सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक संपूर्ण गावगाड्याची धुरा तरुणाईच्या खांद्यावर टाकून वरीष्ठ विसाव्याच्या क्षणी चावडीच्या पारावर स्मरणी ओढत निवांत बसलेले दिसतात. गाव तिथं गजाली, विवीध राजकिय पक्षांचे अनुयायी असले, तरी गाव एकोप्याने नांदत आहे, पालिकेत समाविष्ट झाले, चावडीच्या इमारतीचे PHC, प्राथमिक आरोग्य केंद्रात रूपांतर झाले. काळ्या दगडातली कौलारू, बसकी, चौसोपी इमारत आता गर्दीत अंग चोरून बसल्यासारखी दिसते. समोर पिंपळ आणि वड मंदिराच्या प्रवेशद्वारावरचे जणू जय-विजय. सभोवार पुरुषभर उंचीचे प्रशस्त पार, गप्पांचा अड्डा रोज जमतो. सवाष्णी सकाळी वडाला प्रदक्षिणा घालताना दिसतात, तर विद्यार्थी, कामगार बसची वाट पाहत उभे असतात. वटसावित्री पुपूजेसाठी महिलांची गर्दी असते. हाच रस्ता पुढे गावातून नागमोडी वळणे घेत खिंडीतून सरदार महादजी शिंद्याच्या वानवडीकडे जातो. शिद्यांची छत्री आणि जुना राजवाडा प्रेक्षणीय आहेत.

vitthal mandir

Vitthal

उजवीकडे वीस-एक मीटर अंतरावर बघा, पांडुरंगाचे प्राचीन मंदिर बरोबर झाडांचा मध्य साधून उभे आहे. शंकूसारखे पत्र्याचे उंच उतरते छत, सागवानी, भरपूर तेल प्यायलेल्या तुळया खांबांनी तोलून धरले आहे. चौसोपी सभागृहात पूर्व दिशेकडे तोंड असलेले पुरुषभर उंचीचे पक्के देवघर. त्यात सुंदर असे विठ्ठल-रखुमाई विराजमान आहेत. दोन्ही बाजूंना माउलींची, तुकोबारायांची पूर्णाकृती मूर्ती, तर प्रवेशद्वारावर गरुड हात जोडून बसला आहे. तुळशी वृंदावनही आहे. स्वछ, सुंदर मंदिर गावचे आध्यात्मिक केंद्र आहे. गुढीपाडवा ते तुळशीचे लग्न सर्व धार्मिक कार्यक्रम श्रद्धापूर्वक, खेळीमेळीत पार पडतात. चतुर्मास्यात ज्ञानेश्वरी सप्ताह, कीर्तन, काला, भजन, कार्तिक महिन्यातली विशेष काकड आरती. विठ्ठलनामाच्या गजरात रामप्रहरी जाग येते. समाप्तीला अन्नकोट, पारंपरिक दिव्यांच्या रांगा मंदिर उजळून टाकतात. महाप्रसादाचेही आयोजन असते. चला इथे बराच वेळ गेला, पुढे चलू या.

गावात न शिरता बायपास रस्त्यावर पुढे जाऊ. उजव्या बाजूस बघा, पुणे ब्लाइंड असोसिएशनचे (PBMA) एच.व्ही. देसाई डोळ्याचा दवाखाना दिसतोयं. अत्यंत अत्याधुनिक उपकरणे व कुशल शल्यचिकित्सक आणि इतर कर्मचारी सदैव रोग्यांच्या सेवेसाठी तत्पर आहेत. डोळ्यांचे सर्व प्रकारचे इलाज अत्यंत कमी शुल्कात होतात. स्वच्छता, टापटीप, भोजन व्यवस्था उत्तम दर्जाची. स्नातकोत्तर व पॅरामेडिकल शिक्षणाची सोय आहे. माझ्या मावशीची आणि काकांची मोतीबिंदूची शल्यक्रिया यशस्वीरित्या इथेच झाली. दवाखाना १९६० सालापासून असंख्य रोग्यांना दृष्टिदोषापासून मुक्ती देत आला आहे. संपुर्ण माहीतीसाठी लिंक https://hvdeh. org/ देत आहे. गोरगरिबांसाठी एक उत्तम सोय आहे.

गावाची ओळख झाली, गावाचा, आवतीभोवतीचा इतिहास कळला, देवदर्शन झाले, वैद्यकीय भ्रमंती (मेडिकल टूरिझम) झाली. आता वेळ विशेष भ्रमंतीची. आपापले कॅमेरे सेट करा, दुर्बीणी काढा, तयार व्हा.. पक्ष्यांचे नंदनवन, मोहम्मदवाडी संरक्षित जंगलात आपण प्रवेश करत आहोत. पर्यटकांनी या जागेला पाचपैकी सव्वाचार मार्क्स दिले आहेत.. विविध प्रकारचे पक्षी आपल्याला इथे भेटवेत हीच आशा मनात ठेवून पहिले पाऊल उचलू या. लक्ष देऊन बघा, कधी कुठला पक्षी दिसेल याचा नेम नाही. कुणाला दिसला, कुणाला नाही असे नको व्हायला. छायाचित्र घेता आले नाही तर उगाच हळहळ वाटेल.

अवांतर पण विषयाला धरूनच, तुम्हाला सांगतो, सैन्यात बंदुकीचे प्रशिक्षण सर्वांना अनिवार्य असते. कुशल, अचूक नेमबाज होण्यासाठी तीन मूलभूत सोनेरी कायदे आत्मसात करावे लागतात, ते म्हणजे,

१. मजबूत पकड (Good holding).
२.. अचूक नेम (Good aiming).
३.. ट्रिगरचे योग्य ऑपरेशन (Correct. operation of trigger).

छायाचित्र काढणे व बंदुकीची गोळी झाडणे यात एक साम्य आहे.. TAAN (टार्गेट ॲक्विझिशन आणि न्यूट्रलायझेशन) म्हणजे लक्ष संपादन आणि निराकरण. शूटिंगचे तीन सोनेरी कायदे (Golden Rules) कलात्मक छायाचित्रण करण्यासाठीसुद्धा जसेच्या तसे लागू पडतात. (अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे). मी काढलेली छायाचित्रे जर चांगली असतील, तर याचे श्रेय मी माझ्या वेपन्स ट्रेनिंग (WT)च्या प्रशिक्षकांना देतो. अन्यथा अपयश माझे. छायाचित्रणासाठी निकाॅन बेसिक कॅमेरा वापरतो.

असो, पुढे चलू या.

दवाखान्याच्या मागे मोहम्मदवाडी रिझर्व्ह फाॅरेस्टचे प्राथमिक दर्शन होते. सुरक्षा भिंतीला धरून चाललेली ही पायवाट आपल्याला टेकडीवर घेऊन जाते.. त्या बघा पालिकेच्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या. पाण्याची उपलब्धता व गर्द झाडी यामुळे या ठिकाणी पक्ष्याचा भरपूर वावर आहे.

हाच आपला पहिला पक्षिदर्शन हाॅटस्पाट. इथे माळमुनिया, चितकबरी, ठिपकेदार मनोली, घरेलू चिमण्या, प्लेन टायगर जातीची फूलपाखरे भरपूर दिसत आहेत. पाण्याच्या टाकीवर एक मचाण दिसतेय ना! त्याच्या एका लोखंडी खांबावर एक घार (Black kite) रोज येऊन बराच वेळ परिसराचे निरीक्षण करत बसते. मी तीचे नाव 'महम्मदवाडीची राणी' ठेवले आहे. विजेच्या तारेवर वेडा राघू, माळमुनिया झोके घेत आहेत, तर जातबांधवांना संभाव्य धोक्याचे इशारे देण्यासाठी खांबावर तत्पर कावळा चौफेर आपली बारीक नजर ठेवून आहे. माझ्या बरेच दिवसांच्या निरीक्षणाप्रमाणे थोड्या वेळात खंड्या (किंगफिशर) येईल, बसेल आणि उडून जाईल. कोतवाल, भारद्वाज, घार, राखाडी बगळे, उंच आभाळात उडणारे पक्षी ठरावीक वेळी ठरावीक ठिकाणी दिसतात.

एकादा एका कावळ्याने माझ्याबरोबर केलेली बदमाशी सांगतो. एक दिवस याच पाण्याच्या टाकीवर मो. वाडीची राणी (घार) संपूर्ण परिसर डोळ्याखालून घालत मोठ्या ऐटीत बसली होती. माझी नजर अचानक विजेच्या तारेवर गेली. बघतो तर हिरवा, मोरपंखी, तपकिरी रंगाचा आकर्षक किंगफिशर (खंड्या किंवा किलकिल्या) बसला होता. Deliberate fireची सवय, बंदूक.. क्षमस्व, कॅमेरा म्हणायचे होते.. क्षणार्धात ॲक्टिव्ह झाला, कचाकच दोन फोटो शूट केले. शेजारी खांबावरच्या कावळ्याने खंड्याला काव कावच्या भाषेत काय सांगितले माहीत नाही, पण खंड्या तातडीने उडून गेला. कावळा स्वतः मात्र तिथेच बसून राहिला. झूम करून खंड्याचा क्लोज अप घ्यायचा राहिला. ठेवणीतल्या चार शिव्या हासडल्या आणि मुख्य रस्त्याला लागलो..अर्थात घेतलेले फोटो चांगले आले आहेत, असे मित्रांनी नंतर सांगितले.

आता आपण टेकडीवर पोहोचलो आहोत. जरा सभोवार नजर टाका. आजूबाजूस भरपूर मोकळी जागा आणि बांधकामही चालू आहे. बर्‍यापैकी वस्ती आहे.. वन विभागाची हद्द अजून पुढे आहे. उजव्या बाजूला भगवा झेंडा फडकताना दिसतोय ना! ते ढगाई माता मंदिर. परिसरात खुली व्यायामशाळा, विश्राम करण्यासाठी बेंच, पिण्याच्या पाण्याची सोय आहे. माॅर्निग वाॅकर्स इथेच व्यायाम व देवदर्शन करून स्वार्थ आणि परमार्थ दोन्हीं साधतात. इथून थोडे पुढे गेले की सुरक्षा भिंत व कुंपण लागते. कुंपणापलीकडे एक नैसर्गिक तळे आहे. टेकडीवर येणारे पक्षी इथेच पाणी पिण्यासाठी थांबतात. पक्षिदर्शन हमखास होते. मी बराच वेळ इथे घालवतो. उपलब्ध माहितीनुसार या भागातील संरक्षित जंगलात १३० विविध प्रजातीचे पक्षी आढळतात. या भागात आनंदवन, एनआयबीएम, वानवडी, कोंढवा, मगरपट्टा, ग्लायडिंग सेंटर असे पक्षिदर्शन हाॅटस्पाट आहेत. आमच्या सोसायटीतसुद्धा विविध प्रकारचे पक्षी बघायला मिळतात. चला, ढगाई मातेचे दर्शन घेऊन तळ्याच्या काठी जाऊ. इथे कोतवाल, मोठा बगळा, टिबुकली, ग्रीन सँडपायपर, खंड्या इ. पक्षी दिसण्याची शक्यता आहे. बघू आज दर्शन देतात का!. . . . . . .

lake

तळ्यावरून उजवीकडून खाली उतरताना बरेच पक्षी दिसतील. चिमण चंडोल, हुदहुद, कृष्ण थिरथिरा इ. छोट्या नागमोडी पायवाटा आणि पक्ष्यांची ठिकाणे माहीत करण्यासाठी बरेच वेळा इथे यावे लागेल. सवयीने माहीत झाले आहेत. कोण कुठे भेटतील ते चालता चालता बघू या.

काय विचारताय, मला याची कशी व कधी आवड निर्माण झाली???

हा छंद नवीनच आहे. नुकतेच रविवारच्या म.टा.मध्ये 'पुणे बर्ड ॲटलास' (पी बी ए) या ऐच्छिक संस्थेद्वारे दिलेला लेख वाचनात आला. संस्थेची अंतरजालावर दिलेली माहिती वाचली. उत्सुकता वाढली. माहितीसाठी लिंक https://birdcount. in/pune-bird-atlas/

तसे पाहिल्यास, सकाळचे दीड दोन तास फिरणे म्हणजे माझी लाइफ लाइन. अगदी अम्रीकेतसुद्धा खंड नाही. नित्य भटकंतीमध्ये निसर्गदर्शन आपसूकच, फिरता फिरता भ्रमणध्वनीवर फुलांचे, पक्ष्यांचे किंवा अन्य छायाचित्रण सहजच होत असते. आपणही या उपक्रमात भाग घ्यावा असे वाटले. यात फरक इतकाच की भ्रमणध्वनीऐवजी कॅमेर्‍याने पक्ष्यांचे छायाचित्रण करायचे. बस्स.

तसे पक्ष्यांविषयी माझे ज्ञान खूप थोडे, मर्यादित. चिमणी, कावळा, मोर, पोपट आणि तत्सम आवतीभोवती दिसणारे. सेवानिवृत्तीनंतर कबुतर नावाच्या पक्ष्याची जवळून ओळख झाली. सोसायटीत कबुतरे फार. मला फारच आवडून गेली. (आता आवडत नाही, झोपमोड होते.) काही काम नाही, दिवसभर नुसतेच "गुटर गु,गुटर गु". आता कळले प्रेमी युगलांना कबुतरे का म्हणतात.

म.टा.मध्ये दिलेल्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. त्वरित प्रतिसाद आला. कायप्पावर सदस्य करून घेतले. संवेदनशील आणि सदैव मदतीचा हात देण्यास तयार पक्षिमित्र व्यवस्थापकीय सदस्यांनी विषयासंबधी प्राथमिक व मदतीसाठी उपलब्ध तंत्रज्ञाना (सॉफ्टवेअर)बद्दल माहिती दिली. ए फाॅर ॲपल अशी सुरुवात झाली. हळूहळू कुतूहल आणि आवड वाढत आहे. सर्व सदस्यांचे आभार. वेळेचे बंधन नसल्याने छंद चांगला जोपासता येईल. विसाव्याचे दिवस मस्त जातील असे वाटते.

चला..

जरा खाली नजर फेका, ढगाईची टेकडी हिरवीगार दिसतेयं. वन खात्याची बहुसंख्य सदाहरित झाडे कडुलिंब, वड, पिंपळ, बाभूळ इ. हिरवाईत भर टाकत आहेत. परतीचा पाऊस गेल्यामुळे गवत वाळायला सुरुवात झाली आहे. गवताळ कुरणे तपकिरी हिरवी मिश्र रंगांत दिसत आहेत. पक्षिसंवर्धनास पोषक असे वातावरण, पण सर्वच पक्षी झांडावर अवलंबून नसतात, काही जमिनीवरील किडे, तर काही कचऱ्याच्या ढिगावर खाद्य शोधतात, तर काही रानात चरणाऱ्या म्हशींवर. चौफेर नजर टाकाल तर काळ्या म्हशींच्या पाठीवर पांढरेशुभ्र बगळे आपले पोट भरताना दिसतील. जवळच्या लोकांनी कचरा पेटीचा उपयोग न करता जंगलात कचरा फेकून पक्षिसंवर्धनास हातभार लावलेला दिसतोयं.

शेतांच्या बांधावर शेवगा, आंबा, लिंबू, चिंच, बाभळी यासारखी देशी फळझाडे, तर शेतात मका, तूर, वाल, शेंगाची वेलपिके डोलत आहेत. पक्षी बिनधास्त खाद्य शोधत फिरत आहेत. पायथ्याशी पेरणीला तयार काळ्या वावरात टिटवी, साळुंकी, विविध प्रकारच्या चिमण्या, शेतातले किडे, पडलेले धान्याचे कण वेचत फिरतायत. पक्ष्यांची जत्रा भरली आहे असेच वाटतेय. ज्यांची खळगी भरली ते उडून जात आहेत, तर त्यांची जागा नवीन पक्षी घेत आहेत. सर्व जण पोटभर खात आहेत, पण माणसासारखे पोटावर बांधून नेत नाहीत. दानशूर बळीराजा बेदखल आपल्या कामात मग्न आहे. शांतपणे तमाटी, वांगी, पालकाचा तोडा करतोय. उसाला पाट नीट चाललाय हे बघतोयं.

तर, आतापर्यंत केलेल्या भटकंतीमध्ये अंदाजे पस्तीस ते चाळीस वेगवेगळे पक्षी टिपले आहेत. काही नावे आणि फोटो लेखात दिली आहेत. पक्ष्यांची नावे भाषा व स्थानपरत्वे वेगळी असू शकतात. असो, नावेसुद्धा मजेशीर आहेत. शिंपी, डोंबारी, विणकर, वेडा राघू, भांगपाडी मैना, ब्राह्मणी चिमणी, सुगरण, सुतार इ.

राखी वटवट्या (Ashy Priniya)
जंगल मैना (Acridotheres fuscus)
सातभाई (Large grey babbler )
घार (Black kite)
टिबुकली (Little Grebe)
टिटवी (Red Wattled Lapwing)
हिरवी तुतारी (Green sandpiper)
बया (Weavers)
कोतवाल (Black drongo)
Indian Iora F
भारद्वाज (Greater Coucal)
कोकीळ (Asian Koel M)
कोकीळा (Asian Koel F)
शिंपी (Common Tailorbird)
होला (Laughing dove)
चिमण चंडोल (Ashy crowned sparrow lark)
वेडा राघू (Asian Green Bee eater)
माळमुनिया (Indian Silver bill)

ऊन तापायला सुरुवात झालीय. चला, पटपट पाय उचला, ही भटकंती एका दिवसात संपंणारी नाही. पुन्हा पुन्हा यावे लागेल. ते बघा गोडसे मठातील देवळांचे कळस दिसू लागलेत.

थांबा, थांबा, ते बघा, दूर बाभळीच्या झाडाले सुगरणींचे टांगलेले खोपे. खोपा नर विणकर पक्षी बनवतो, पण बहिणाबाई चौधरींनी श्रेय मात्र सुगरणीला दिलेय.

अरे, खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिन झोका झाडाले टांगला !

माणूस, पशू, पक्षी.. सगळ्या पुरुषांची एकच गत.

सुगरणीचा खोपा
सुगरणीचा खोपा

पण खरी गोष्ट अशी आहे की खोपा बांधण्याची कला, अवजार नर विणकर पक्ष्याकडेच असते. विणीचा हंगाम जवळ आला की सुगरणीला रिझवण्यासाठी तो घरटे बनवतो. एक सुंदर, मोहक दिसणारा खोपा सर्वांनाच आवडतो. कृपया डोळ्यात साठवण करा, पण कधीही तोडू नका. विणकर आपली सुगरण आणि तिच्या पिल्लांसाठी मोठ्या मेहनतीने खोपा बनवतो.

एक सांगू, रोज हे घरटे बघत होतो. वाटले, एक ना एक दिवस बयाचे दर्शन होईल. 'बया बया दार उघड'चा जप करत दररोज वाट बघत उभा राहिलो. शेवटी तपस्या फळाला आली आणि बयाने मस्त फोटो घेऊ दिला. धन्स झाले.

आपण जर या बाजूने वर गेलो असतो, तर मो.वाडीची राणी त्या पिंपळाच्या उंच शेंड्यावर दिसली असती. आपण दवाखान्याच्या बाजूने गेल्यामुळे चुकामूक झाली. चला, मठ बघून घ्या, मग मस्तपैकी गरम वडापाव, चहाचा नाष्टा करू..

सूचना आणि आभार-

१.. कृपया नोंद घ्यावी - ऐतिहासिक संदर्भ ऐकीव माहितीवर आधारित असल्याने यांचा उपयोग करणे उचित नाही.. केल्यास होणार्‍या परिणामास लेखक जबाबदार नाही.

२.. गाव आणि आजुबाजूचा इतिहास मिळवून देणाऱ्या मित्रांचे आभार.

३.. पुणे बर्ड ॲटलास संस्थेच्या Whatsapp समूहातील पक्षिमित्रांचे मन:पूर्वक आभार..

माझे हिंदीचे आवडते कवी शिव मंगल सिंह 'सुमन' यांची विषयाला अनुरूप कविता ऐकवतो आणि आजच्या भटकंतीला स्वल्पविराम देतो. भटकंतीमध्ये भाग घेतल्याबद्दल आपणा सर्वांचे आभार.

हम पंछी उन्मुक्त गगन के
पिंजरबद्ध न गा पाएँगे,
कनक-तीलियों से टकराकर
पुलकित पंख टूट जाएंगे।

हम बहता जल पीनेवाले
मर जाएंगे भूखे-प्यासे,
कहीं भली है कटुक निबोरी
कनक-कटोरी की मैदा से,

नीड़ न दो, चाहे टहनी का
आश्रय छिन्न-भिन्न कर डालो,
लेकिन पंख दिए हैं, तो
आकुल उड़ान में विघ्न न डालो।

सर्वांना, इष्टमित्र-सहपरिवारासह सांप्रत दिवाळी व येणारे नववर्ष सुखसमृद्धीचे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

b3
b3

b3
b3
b3
b3
b११
b3

b3
b3

प्रतिक्रिया

अत्यंत मनोरंजक आणि वाचनीय लेख.

लेख आणि पक्षी निरीक्षण उत्तम.. गावातून खरोखर फेरफटका मारण्याचा आनंद मिळाला. दत्त एकदा मुद्दाम घेऊन चक्कर मारणार.

स्नेहा.K.'s picture

12 Nov 2023 - 10:27 pm | स्नेहा.K.

माझी आजी माहेरची घुले. त्यामुळे लेख विशेष आवडला.
भरपूर विकास झालेला असला तरीही, या परिसरातलं गावपण अजूनही टिकून आहे.

अथांग आकाश's picture

12 Nov 2023 - 11:04 pm | अथांग आकाश

छान माहितीपुर्ण लेख!

पाषाणभेद's picture

13 Nov 2023 - 4:53 pm | पाषाणभेद

मला काय माहीत की तुम्ही येथे राहतात ते. पिसोळी वरून विमाननगरला जाण्याचा हा माझा नेहमीचा रस्ता होता. विठ्ठल मंदीरात संध्याकाळी होणारे भजनाच्या वेळी तेथून जाणे व्हायचे. गाभार्यात दर्शन घेतांना एक दोन वेळा तेथल्या लोकांनी चहा देखीला पाजला आहे. असो.
लेख छान झालाय. प्रत्येक गोष्टीत बारकावे आले आहेत. गावाकडचा अनुभव छान आहे.

कर्नलतपस्वी's picture

13 Nov 2023 - 7:52 pm | कर्नलतपस्वी

कधी या बाजूस आलात तर सांगा,भेटूयात.

छान माहितीपुर्ण लेख आहे. फोटोजही छान आहेत, त्यातले पक्षांचे विशेष आवडले 👍

रामचंद्र's picture

14 Nov 2023 - 12:24 pm | रामचंद्र

वा, रंजक भाषेत स्थानिक इतिहास! महंमदवाडीचं मूळचं नाव महादेववाडी होतं हे माहीत नव्हतं.

मुक्त विहारि's picture

14 Nov 2023 - 8:25 pm | मुक्त विहारि

आपण भेटलो की फेरफटका मारू

मार्गी's picture

14 Nov 2023 - 8:53 pm | मार्गी

अप्रतिम वर्णन आणि फोटोज!!!! आनंद घ्यायला लांब जायची गरज नाही, बस दृष्टी हवी हे छान दाखवून दिलंत!

कर्नलतपस्वी's picture

15 Nov 2023 - 6:46 am | कर्नलतपस्वी

मनःपूर्वक आभार.

गोरगावलेकर's picture

15 Nov 2023 - 7:44 am | गोरगावलेकर

मस्त बारकावे टिपले आहेत. पक्षी निरीक्षण, फोटो सर्वच छान

रंगीला रतन's picture

15 Nov 2023 - 11:44 am | रंगीला रतन

लेख आवडला. purple sunbird मस्त.

कर्नलतपस्वी's picture

15 Nov 2023 - 5:38 pm | कर्नलतपस्वी

धन्यवाद.

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Nov 2023 - 12:27 pm | ज्ञानोबाचे पैजार

एकाच लेखात इतिहास, भूगोल आणि नागरिक शास्त्राचा अभ्यास झाला

या परिसराच्या इतिहासा बद्दल बरीच नवी माहिती समजली

तुमच्या मेहनतीला सलाम

पैजारबुवा,

कर्नलतपस्वी's picture

15 Nov 2023 - 5:25 pm | कर्नलतपस्वी

धन्यवाद,

भटकंतीत तरी आपण काय बघतो,हेच ना.....

हा लेख दिवाळीअंकात सामील होण्यामधे आपला,टर्मिनेटर आणी प्रशांत भौं चा खुप मोठा वाटा आहे.या बद्दल मनापासून आभार.

तुषार काळभोर's picture

15 Nov 2023 - 3:58 pm | तुषार काळभोर

आजूबाजूला गगनचुंबी टॉवर्सच्या मधोमध महमदवाडीने आपलं गावपण टिकवून ठेवलंय. गावातून वानवडीकडे जाताना टेकडी ओलांडून जावं लागतं. ती टेकडी आताशा अतिक्रमित आणि संकुचित होत चालली आहे, पण तिथे अजूनही नीरव शांतता, पक्षांचे आवाज यांचा अनुभव घेता येतो.
अवांतर :
तब्बल अठरा पक्षांची यादी दिली आहे. मला तर पाच सहा अतिसामान्य पक्षी सोडले तर इतके वैविध्यपूर्ण पक्षी ओळखूसुद्धा येणार नाहीत!

कर्नलतपस्वी's picture

15 Nov 2023 - 5:16 pm | कर्नलतपस्वी

या भागात मोठ्या सोसायटीत सुद्धा बर्‍यापैकी ग्रीन कव्हर आहे पण अतिक्रमण सुद्धा भरपूर आहे. सर्व शेतजमीन विकली गेली तर मात्र निश्चित निसर्ग हानी मोठ्या प्रमाणात होणार यात शंकाच नाही.

सध्यातरी इथे एकशे पंचवीस तीस प्रकारचे पक्षी आहेत. मी आतापर्यंत पन्नास हून अधिक टिपले आहेत.

राजेंद्र मेहेंदळे's picture

15 Nov 2023 - 4:24 pm | राजेंद्र मेहेंदळे

लेख आवडला. गावांच्या नावाची उत्पत्ती गंमतशीर आहे. पक्ष्यांचे फोटोही मस्तच.

"महम्मदवाडीची राणी'" हे खास आवडले(शेवटुन ९ वा फोटो तिचाच का?)

कर्नलतपस्वी's picture

15 Nov 2023 - 5:18 pm | कर्नलतपस्वी

होय. त्याचबरोबर खंड्या,किंग फिशर ची सुद्धा जागा ठरलेल्या आहेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Nov 2023 - 12:39 am | अमरेंद्र बाहुबली

मस्त लेख. गावाची ओळख, इतिहास नी पक्ष्यांचे सुंदर फोटो सर्वच अप्रतीम.

बिपीन सुरेश सांगळे's picture

22 Nov 2023 - 10:09 am | बिपीन सुरेश सांगळे

कर्नलजी

लेख आवडला . तुमचा लेखन उत्साह दांडगा आहे .

गावगंधर्व हा भारीच शब्द आहे .

चौथा कोनाडा's picture

29 Nov 2023 - 10:32 pm | चौथा कोनाडा

वा क्या बात हे कर्नल साहेब ! मंहम्मदवाडीची गोष्ट भन्नाट लिहिली आहे ! जाम आवडून गेली.
rryfh asc

सुंदर ओघवत लिहिलं आहे! वाचतच गेलो, वाचतच गेलो आणि बघतो तर काय .... शेवटच आला

धार्मिक, सामाजिक, भौगोलिक, ऐतिहासिक, समकालीन, नैसर्गिकम, पक्षी निरीक्षण इत्यादी गोष्टींनी ठासून भरलेला बंपर सुपरहिट सिनेमा आहे !

प्रचेतस's picture

1 Dec 2023 - 10:20 am | प्रचेतस

भन्नाट लिहिलंय कर्नलसाहेब.

बोपदेव हे देवगिरीच्या यादव दरबारातील मान्यवर दरबारी, प्रसिद्ध व्याकरणकार, कवी, वैद्य होते, मूळ विदर्भातील. कदाचित त्या वेळचा शक्तिशाली राजा सिंघण याचे राज्य इथे होते, म्हणून तर नसेल?

बोपदेव हा रामदेवरायाच्या दरबारात होता. विदर्भातील सार्ध आजचे साडेगाव ह्या गावचा होता. हा प्रख्यात पंडित असून हेमाद्रीचा खास मित्र होता. आपल्या मुक्ताफल नामक ग्रंथात त्याने हेमाद्रीचा पुढिलप्रमाणे उल्लेख केलेला दिसतो.

विद्वद्धनेशशिष्येण भिषक्केशवसूनुना हेमाद्रि बोपदेवेन मुक्ताफलमचीकरत् ॥

मात्र बोपदेव घाटाचे नाम ह्या बोपदेव पंडितावरुन पडले नसून घाटातील बाबदेव-बापदेव-बोपदेव ह्या महादेवाच्या मंदिरावरुन पडलेले आहे.

बाकी महादेववाडीबद्द्ल इतके विस्तृत लिखाण फारच आवडले. ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक पद्धतीने घेतलेला आढावा एकदम उत्तम झाला आणि त्याला पूरक छायाचित्रे तितकीच सुरेख. आमच्या पिंपरी चिंचवडबद्द्ल असं काही लिहायचं केव्हापासून मनात आहे. बघू कधी जमते ते.

भोसरी तर पुण्यापेक्षाही जुनी आहे (भोजापूर) असं म्हणतात. माळव्याच्या तुमच्या प्रवासात या संकल्पाला स्फूर्ती लाभो या शुभेच्छा.

मात्र बोपदेव घाटाचे नाम ह्या बोपदेव पंडितावरुन पडले नसून घाटातील बाबदेव-बापदेव-बोपदेव ह्या महादेवाच्या मंदिरावरुन पडलेले आहे.

मी गुगल वर वाचले पण शंका होती म्हणून अधांतरीच सोडले.
माहीत होते प्रचेतस किवां कुणी मिपाकरा कडून खरे खोटे होईलच.

धन्यवाद.

Bhakti's picture

2 Dec 2023 - 11:03 am | Bhakti

तुझे आहे तुजपाशी परि तू जागा चुकलाशी असे म्हणतात पण तूम्ही नाही चुकले पहा :)आपलाच परिसर आधी अभ्यासून पहावा हे खरं केलं.पक्षी निरीक्षण मस्तच आहे.असच माझ काही २०२०ला झालं आणि त्यातूनच वर्षभर माझ्या परिसराचे विहंगम निरीक्षण मी केलं होतं
मांजरीचं नाव कसं पडलं?माझ्या आयुष्यातील उत्साहाच्या दिवसांपैकी मांजरी-हडपसरचे तीन महिने होते :)
माझी हडपसरची एक मैत्रीण होती तुपे ती लगेच आठवली.

पेपरला "महमंदवाडीचे नामांतर महादेववाडी होणार ? " ही आजची बातमी वाचून या भटकंती लेखाची आठवण झाली !

आमची मोहम्मदवाडी, गूगल सर्च केलं तर महादेववाडी म्हणून सापडेल.

मोहम्मद वाडी पुणे असं गुगल नकाशावर शोधलं की, लेखात नमुद केलेला मोठा भूभाग दाखवला.
अन महदेव वाडी पुणे असं शोधलं की, यातलाच एक छोटा भाग दाखवला !

मित्रहो's picture

8 Dec 2023 - 5:58 pm | मित्रहो

लेख आवडला
गावांच्या नावामागील इतिहास रंजक आहे. पक्षीचित्रे खूप सुंदर
मला बगळ्यांची माळफुले येतपर्यंतची प्रस्तावना कळली नाही.

कर्नलतपस्वी's picture

16 Dec 2023 - 7:50 am | कर्नलतपस्वी

दिवाळी अंक ,भटकंती विषय काय लिहावे सुचत नव्हते. अंतीम तारीख जवळ येत होती. पहाटे अंधारात चहाचा कप घेऊन बाल्कनीत बसणे अतिशय सुखदायक अनुभव तेव्हां गाणी व आसपास च्या वातावरणात सुचलेले शब्द त्याच क्रमाने लिहून काढलेत .
प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.

श्वेता व्यास's picture

11 Dec 2023 - 8:35 pm | श्वेता व्यास

लेख आवडला.
पहाटे सुरु झालेली भटकंती आम्हा वाचकांना भरपूर माहिती देत पक्षी निरीक्षणापर्यंत पोहोचली.
मोहम्मदवाडीलाही इतका इतिहास असेल असं वाटलं नव्हतं.

लेख फारच सुंदर अन माहितीपूर्ण झाला आहे, आवडलाच :)
पक्षांचे फोटोज खासच ! आम्हीही The Big Year पाहिल्यावर खास पक्षी-निरीक्षणासाठी आमच्या आणि आजूबाजूच्या अनेक राज्यांत मस्त भटकंती केली होती, ते आठवले.

भ्रमणध्वनीवर माझ्या आवडत्या गाण्यांची ऑटो प्ले यादी हीच माझी काकड आरती.

ही यादी इथे प्लिज शेअर करणार का ? ऐकायला आवडेल.

कर्नलतपस्वी's picture

16 Dec 2023 - 7:45 am | कर्नलतपस्वी

सकाळी लवकर उठणे हे रक्तात भिनले आहे. सोबत भ्रमणध्वनीवर गाणी कानात कुंडले न घालता ऐकणे विशेष आवडते. तशी गाणी सर्वच चांगली पण कुठली वाजणार हे त्या दिवशीच्या मुलीवर आवलंबून आस्ते.

तरी सुद्धा, डाॅ भरत बलवलींचे "हरी म्हणा कुणी गोविंद म्हणा हे बहुतेक वेळा लागतेच. कुमार गंधर्व यांची निर्गुणी भजनं,अबीदा परवीन यांची कबीर, सुफी कलाम तर कधी रुचा शर्मा,वडाळा बंधू . श्रीधर फडके यांचा काही बोलावयाचे आहे तर ऋतूहिरवा हे आल्बम .संजीव अभ्यंकर यांचे काळ देहासी आला खाऊ,कधी कधी मालिनी राजूरकर, जयतिर्थ मेवूंडी. पं भीमसेन ,अभिषेकी बुवा .......

खुप मोठी यादी होईल.

प्रतिसादाबद्दल आभार.

पर्णिका's picture

17 Dec 2023 - 6:11 am | पर्णिका

अरे व्वा ... एक से एक गाणी आहेत, सकाळी गाडीत ऐकायला फारच मस्त वाटतील ! खूप खूप धन्यवाद !! 😀

कर्नलतपस्वी's picture

16 Dec 2023 - 2:09 pm | कर्नलतपस्वी

गाणी सर्वच चांगली पण कुठली वाजणार हे त्या दिवशीच्या मुलीवर आवलंबून आस्ते.

गाणी सर्वच चांगली पण कुठली वाजणार हे त्या दिवशीच्या मुड वर आवलंबून आस्ते.

असे वाचावे.

क्षमस्व.

चौथा कोनाडा's picture

18 Dec 2023 - 1:16 pm | चौथा कोनाडा

हे त्या दिवशीच्या मुलीवर आवलंबून आस्ते.
hahaha1234
हे वाचुन ज्याम हसलो ... तिथं मुड हा शब्द असणार हे लक्षात आलंच होतं... आणि तुम्ही स्पष्टही करून टाकलंत !