श्रीगणेश लेखमाला २०२३ - बाप्पा आणि हुळ्ळुळ्ळु बुळ्ळुळ्ळु

आजी's picture
आजी in लेखमाला
19 Sep 2023 - 12:01 am

गणपती उत्सवाचे दिवस आहेत. वाजतगाजत गणपतीचं आगमन झालंय. कुठे दीड दिवसांचा गणपती असतो, तर कुठे पाच दिवसांचा. कुठे सात दिवसांचा, तर कुठे दहा दिवसांचा. गणेशचतुर्थी ते अनंत चतुर्दशी असा दहा दिवसांचा हा उत्सव असतो. गणपतीची आई गौरी. तीसुद्धा या उत्सवात येते. तिच्या येण्याचा दिवस, जेवणाचा दिवस आणि ती जाण्याचा दिवस,असे तीन दिवस ती असते. काही घरांमध्ये गौरी-गणपती एकदमच जातात. काही ठिकाणी उभ्या गौरी असतात, तर काही ठिकाणी पाणवठ्यावरचे पाच खडे पाण्याने भिजवून ते आंब्याच्या पानांनी सजवलेल्या कलशात ठेवतात. त्याच गौरी.

गणपतीबाप्पा आले की की सगळीकडे उत्साह संचारतो. त्याच्यासाठी मखर सजवलं जातं. दिव्यांचा लखलखाट केला जातो. त्याला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो.
फोटो

गौरीसाठी ओल्या नारळाच्या करंज्या केल्या जातात.

photo

नैवेद्य दाखवला जातो. पहिल्या दिवशी गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. त्याची षोडशोपचारे पूजा केली जाते. दुहीसांज गणपतीची आरती केली जाते. देशावरचा चाकरमानी कोकणात गावी जातो. सार्वजनिक गणपतीही असतात. त्यात तर काही वाईट घटनाही घडतात. धिंगाणा, हैदोस घातला जातो. मोठ्या आवाजात गाणी काय, दारू, भांग पिऊन केलेले हिडीस नाच काय! त्यामुळे ध्वनिप्रदूषण होतं, वायुप्रदूषण होतं, वाहतूक कोंडी होते. काही जणांना याचं भानच नसतं. अर्थात याला अपवाद आहेत. पण हेही तितकंच खरं आहे की सर्वसामान्य माणूस अशा उत्सवांमुळे मुक्त, मोकळा होतो. वर्षभरात पोटाची खळगी भरण्यासाठी केलेले कष्ट, ताणतणाव तो विसरतो. त्याचं शरीर, मन हलकं होतं. त्याचा जल्लोश, उत्साह, उन्माद, हर्ष, जोश यांचा निचरा होतो. समाजाच्या सामूहिक मनासाठी, संतुलनासाठी हे आवश्यक आहे.

मग बाप्पा जायचा दिवस उजाडतो. दुपारी सुरू झालेली विसर्जनाची मिरवणूक मोठ्या शहरांतून दुसऱ्या दिवशी दुपार झाली तरी सुरू असते. घरातला गणपतीबाप्पा विसर्जित झाला की वाईट वाटतं. रिकाम्या मखराकडे बघवत नाही. लहान मुलांना रडू कोसळतं. मीही लहानपणी गणपती गेला की रडायची. (अजूनही डोळे ओले होतात. उदास वाटतं.) गणपतीला पाण्यात बुडवणं हे तर क्रूरपणाचं वाटतं. लहान वयात तर अगदी.

लहानपणी गणपतीमध्ये मोदक तर व्हायचेच, तसंच रोज गोडधोड खायला मिळायचं. आजच्या काळातल्या मुलांच्या मानाने आम्ही कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलो. पण तरीही खाण्यापिण्याची मजा असायची. आम्ही खाल्लेले कितीतरी पदार्थ आजच्या मुलांना ठाऊकच नाहीत. हुळ्ळुळ्ळु बुळ्ळुळ्ळु, उकड आठळ्या, मुटकुळे, कच्चांबा, थापटवडी, रामप्रसाद ही नावंही त्यांनी ऐकलेली नाहीत. आम्ही तेच खाऊन लहानाचे मोठे झालो. अशाच काही पदार्थांच्या थोडक्यात कृती सांगते.

१) हुळ्ळुळ्ळु बुळ्ळुळ्ळु - पिकलेली चिंच घ्यायची. तिचे चिंचोके, काड्या काढून साफ करून घ्यायची. त्यात तिखट, मीठ, गोडा मसाला, आणि गूळ घालून पाट्यावर वरवंट्याखाली चांगली एकजीव होईपर्यंत कुटायची. तिखट थोडं जास्तच टाकायचं. कुटून एकजीव होऊन त्याचा गोळा करून तळहातावर घेऊन चाटत चाटत खायचा. नो वाटी-चमचा. नो आइसक्रीमची रिकामी कांडी. आइसक्रीमच मिळायचं नाही, तर रिकामी कांडी कुठून येणार?

२) कच्चांबा - कच्च्या कैरीच्या बारीक फोडी करायच्या. त्यावर तिखट, मीठ, मेतकूट घालून, एकत्र मिसळून एकेक फोड उचलून खायची.

३) बकुळीच्या झाडाला फळं लागतात, त्यांना बकुळ म्हणतात. ते बकुळ चिरून त्यावरही तिखट, मीठ, मेतकूट घालून एकत्र मिसळून एकेक फोड उचलून खायची.

४) मुटकुळे - पूर्वी गिरणीत बारीक पीठ दळून मिळायचं नाही. त्यात कोंडा खूप असायचा. तो टाकून नाही द्यायचा. त्यात गूळ घालायचा. सुंठ घालायची. कारण वेलदोडे परवडत नसत. ह्यात पाणी घालून कोंडा भिजवून, एकत्र गोळा करायचा. अगदी थोडं गव्हाचं पीठ घालायचं. त्याचे लहान लहान गोळे करून एकेक गोळा तळहातावर घेऊन मुठीत आवळून मुटकुळी करायची. मोदकपात्रात उकडायची. गार झाल्यावर खायची.

५) उकड आठळ्या - फणसाच्या आठळ्या पाण्यात मीठ टाकून उकडायच्या. गार झाल्यावर तिखट टाकून खायच्या.

६) थापटवडी

फोटो

थोडं जास्त तेल घेऊन त्यात मोहरी, जिरं, हिंग, घालून फोडणी करून घ्यायची. त्यात मिरची, लसूण, जिरं याचं वाटण घालायचं. थोडं परतून हळद घालायची. नंतर त्यात एक कप पाणी घालायचं. उकळी आली की एक कप डाळीचं पीठ घालायचं. पटकन ढवळायचं. गुठळी होऊ द्यायची नाही. नंतर झाकण ठेवून पाण्याचा हबका मारून वाफ येऊ द्यायची. थोडं तेल सोडायचं. ढवळायचं. गोळा झाला की पाटावर थापून (हल्ली ट्रे मिळतात.) खोबरं, कोथिंबीर घालून वड्या पाडायच्या.

७) रामप्रसाद - थोड्या तुपावर कणीक भाजायची. गरम असतानाच त्यात गूळ चिरून मिसळायचा. कोरडी कणीक. थोडी गोड आणि त्यात गुळाच्या थोड्या गुठळ्या! दिल खूश!!

८) तेल, तिखट, भाकरी - एखाद्या दिवशी भाजी नसेल, तर आम्ही तेल, तिखट, मीठ एकत्र मिसळून त्याला लावून भाकरी खायचो. त्यात आम्हाला कसलाही कमीपणा वाटत नव्हता. ते सगळं नाॅर्मल वाटायचं.

९) रंजका - कधी घरात भाजी नसेल, तर आम्ही रंजक्याबरोबर भाकरी खायचो. रोज जेवायला भाकरीच. सणासुदीला पोळी. चैन म्हणजे पोळीबरोबर गुळांबा - साखरांबा नाही. रंजका कसा करायचा ते सांगते. लाल ओल्या मिरच्या तेलावर परतायच्या. वाटायच्या. त्याच तेलात एक चमचा मेथीदाणा भाजून पूड करायची. लसूण वाटून, मिरचीच्या वाटणावर घालायची. मेथीपूडही घालायची. मीठ घालून लिंबू पिळायचं. फोडणीत मोहरी, जिरं, हिंग, हळद घालून फोडणी करायची. फोडणी गार झाल्यावर लाल मिरच्यांच्या वाटलेल्या गोळ्यावर टाकून नीट कालवायचं. झाला रंजका.

१०) लाल भोपळ्याची बाकर भाजी - लाल भोपळा चांगला दळदार घ्यायचा. सालासकट मोठ्या, जाड फोडी करायच्या. खसखस, तिखट, तीळ, गोडा मसाला, कांदा, लसूण यांचं मिश्रण भाजायचं, वाटायचं. फोडणीत मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता घालायचा. त्यात तिखट, मीठ, चिरलेला तांबडा भोपळा घालून भाजी शिजवायची. तांबडा भोपळा लवकर शिजतो. ही भाजी मस्त लागते.

अशा या रेसिपीज आणि असा हा आमच्या बालपणातला गावमेवा. मला खातरी आहे की मी आत्ता दिलेल्या रेसिपीजपैकी तुम्ही कुठलीही करून बघणार नाही आहात. आजच्या काळातल्या मुलांना तर हे पदार्थ अजिबातच आवडणार नाहीत, कारण त्यांच्या जिभेला पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राइज, पास्ता, मॅक्रोनी, नूडल्स या पदार्थांच्या चवीची सवय आहे. पण आम्हाला मात्र हा गावाकडचा मेवा आवडतो आणि काटकसरीत संसार करून निगुतीने आम्हा मुलांना चार चटकदार पदार्थ खायला घालणाऱ्या आईच्या आठवणीने सद्गदित व्हायला होतं.

असा हा आमचा लहानपणीचा गणपतीबाप्पा. आणि असा हा आमचा लहानपणीचा गावमेवा.

माणसाच्या आयुष्यात समाजमनातल्या दबलेल्या भावनांचा निचरा होण्यासाठी एक सायकोथेरपी म्हणून असे सण, उत्सव आवश्यक आहेत. जगात सर्वत्र असे सण, उत्सव साजरे होतात.

बोला..
"गणपतीबाप्पा मोरया , सर्वांना सदा सुख द्या"

प्रतिक्रिया

आजी, बहारदार लेख आहे. यातले सगळे पदार्थ करून बघावे म्हणतो. यापैकी मुटकुळी अजूनही बनवतो, आणि अमेरिकेतल्या पाच वर्षाच्या नातीला तर ती फारच आवडतात. मात्र मोदकपात्रात उकडण्याऐवजी आम्ही चिंच-गुळाचे वरण (आमटी) करून त्यात ती मुटकुळी टाकून, हलकी होऊन वर येईस्तोवर उकळवून मग तूप घालून खातो.

सगळेच नवीन पदार्थ आहेत. कधी नावं ऐकली नव्हती. कोणत्या जिल्ह्यात प्रचलित होते?
प्रसादाच्या करंज्या आवडल्या.
-----
थापटवड्या म्हणजे पाटवड्या असाव्यात. चिंच गोळ्या /गोळे अजूनही वाण्याकडे मिळतात. परंतू चिंच महाग झाल्याने तेही महाग झाले. स्वस्त खाऊ राहिला नाही. कोकमाच्या जीरा गोळ्या केल्या आहेत. नावं मात्र झकास आहेत. बकुळीची फळं आता सहज मिळतात याचं कारण नवीन नियमाप्रमाणे मूळ भारतीय झाडे लावायची. नगरपालिकेने रस्त्यावर बकुळ लावली आहेत. त्याला फळे येतात.

क्या बात!भारी पदार्थ आहेत.अमूल्य पाककृती सांगितल्या आहेत.

आग्या१९९०'s picture

19 Sep 2023 - 7:50 am | आग्या१९९०

मस्त लेख!
हुळ्ळुळ्ळु बुळ्ळुळ्ळु, उकड आठळ्या, रामप्रसाद, तेल, तिखट, भाकरी हे पदार्थ माहित आहे आणि हे पदार्थ करण्यात आम्ही बच्चेमंडळी आत्मनिर्भर होतो. बाकीचे पदार्थ प्रथमच ऐकले.

कर्नलतपस्वी's picture

19 Sep 2023 - 9:19 am | कर्नलतपस्वी

बहुतेक सर्व पदार्थांची चव जिभेला माहीत आहे. घराघरांतून दररोज वेगळी खिरापत ही एक वेगळीच मजा होती.

स्नेहा.K.'s picture

19 Sep 2023 - 1:19 pm | स्नेहा.K.

हे तर सोलापूरच्या सीमाभागातले पदार्थ!

पाटवड्या अजूनही बनतात. बाकीच्या पदार्थातील ओल्या लाल मिरच्यांचा ठेचा माहेरी एका शेजारी कुटुंबाकडे व्हायचा. आमच्याकडे हिरव्या मिरच्यांचा होतो.
सासूबाईंनी असेच काही आधी नावेही माहिती नसलेले पदार्थ शिकवले आहेत. जसं की ज्वारीचा तिखटमिठाचा सांजा.

रंजका रंजक वाटतोय. तो भाकरी सोबत खाण्याखेरीज भातात कालवून खाण्यासही उत्तम लागेल असा अंदाज.

पदार्थांची नावे रोचक. आमच्या कोंकणातील काही पदार्थांची नावे आठवली.

सांदणे, कोयाडे, ताकतई, साठं.

याखेरीज खानदेशात पापडाचा चुरा, तिखट तेल असे काही काही मिक्स करून केलेला एक पदार्थ खाल्ला होता. त्याचे नाव आठवत नाही.

लेख आवडला.

कंजूस's picture

19 Sep 2023 - 2:05 pm | कंजूस

रंजका

म्हणजे आंध्रप्रदेशातला/तेलंगणाचा 'गोंगुरा आचार'चा सौम्य प्रकार वाटतो आहे.

विजुभाऊ's picture

19 Sep 2023 - 6:42 pm | विजुभाऊ

घोंघुरा म्हणजे आपल्या आंबाडीच्या भाजीचे ( पाल्याचे) लोणचे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Sep 2023 - 6:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान लेखन आजी. हळ्ळु-बळ्ळु भारी नाव. करंजी भारी दिसत आहेत. लहानपणीचा गावमेवा सगळाच भारी. उत्सवापाठीमागील भावना अगदी योग्य.
लिहिते राहावे.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

20 Sep 2023 - 8:17 am | प्रचेतस

एकदम भारी, अनवट पदार्थ आहेत हे एकदम. यातले काही खाल्ले होते तर काहींची अजिबातच माहिती नव्हती. हुळ्ळुळ्ळु बुळ्ळुळ्ळु नावावरुन ह्याचे मूळ कन्नड दिसतेय.

चांदणे संदीप's picture

20 Sep 2023 - 3:25 pm | चांदणे संदीप

आजींचा गलेमात चवदार लेख!

सं - दी - प

सुधीर कांदळकर's picture

21 Sep 2023 - 1:06 pm | सुधीर कांदळकर

आवडल्या. १. चिंच पदार्थ दादरला वाण्याच्या दुकानात मिळत असे. जीरा गोळी देखील मिळत असे. २ कैरी पदार्थ अजूनही खासकरून मुली उन्हाळ्याच्या सुटीत बनवून खातात. ५ आठळ्या पदार्थ एवढेच ठाऊक होते. कोकणात पहिला पाऊस पडल्यावर आठळ्या, काजू, भुईमूग शेंगा, इ. घराबाहेरील न्हाणीतल्या आगीत अजूनही भाजून खातात.

छान. लेख आणि पाकृ आवडल्या.

अहिरावण's picture

21 Sep 2023 - 7:57 pm | अहिरावण

>>माणसाच्या आयुष्यात समाजमनातल्या दबलेल्या भावनांचा निचरा होण्यासाठी एक सायकोथेरपी म्हणून असे सण, उत्सव आवश्यक आहेत.

नेमके

>>जगात सर्वत्र असे सण, उत्सव साजरे होतात.

हे अनेक जण विसरतात आणि भारतीयांना दुषणे देतात... बाप्पा त्यांना अक्कल देवो किंवा त्यांना अद्दल घडवो !!

चौथा कोनाडा's picture

22 Sep 2023 - 5:46 pm | चौथा कोनाडा

झ्कास टेस्ष्टी लेख !

एक दोन अपवाद वगळता या पदार्थांची नावे प्रथमच ऐकली.
शाळेत असताना आजच्या कॅडबरी, पॉपकॉर्न, कुरकुरे ऐवजी चिंचा, बोरे, पेरु, शेंगादाणे, फुटाणे असं जंक फुड खायचो.... तो काळच वेगळा होता . ते दिवस आठवले,
लै भारी लेखन आजीबाई !

लेख एकदम स्वादिष्ट झाला आहे, आजी !
ओल्या नारळाच्या करंज्या काय सुरेख दिसताहेत... माझ्या पिल्लांनापण आवडतात, केल्या पाहिजे लवकरच !

रंगीला रतन's picture

23 Sep 2023 - 10:21 pm | रंगीला रतन

हुळ्ळुळ्ळु बुळ्ळुळ्ळु नाव आणि लेख लयी भारी :=)

टर्मीनेटर's picture

25 Sep 2023 - 12:00 pm | टर्मीनेटर

वाह आजी, मस्त लेख 👍
लेखात आलेले मोदक, ओल्या नारळाच्या करंज्या, उकड आठळ्या आणि थापटवडी हे चार पदार्थ तेवढे माहिती होते, बाकी सर्व नव्यानेच समजले.

मुक्त विहारि's picture

25 Sep 2023 - 5:08 pm | मुक्त विहारि

+1

श्वेता व्यास's picture

25 Sep 2023 - 2:27 pm | श्वेता व्यास

छानच आजी, बऱ्याच नवीन पदार्थांची माहिती समजली.
करंजी आणि थापटवडी पाहून तोंपासु :)

आजी's picture

27 Sep 2023 - 10:18 am | आजी

मी लिहिलेल्या "बाप्पा आणि हुळ्ळुळ्ळु बुळ्ळुळ्ळु"या लेखाला आपण सर्वांनी उदंड प्रतिसाद दिलात त्याबद्दल सर्वांचेच मन:पूर्वक आभार.

जुइ's picture

3 Oct 2023 - 6:46 pm | जुइ

पारंपारीक पाकृ आवडल्या! यातील लाल मिरच्यांचा ठेचा आणि तेल तिखट भाकरी खाल्ली आहे. करंज्या आणि थापवडीचे फोटो झक्कांस आहेत.