खूप दिवसांनी का असेना पण मी शेवटी ‘मी वसंतराव’ हा चित्रपट बघितला. थियटेरमधे बघणे झाले नाही पण Jio Cinema वर बघायला सुद्धा उशीरच झाला. उशीरा सिनेमा बघून त्यावर काही लिहिण्यात हा फायदा असतो की बऱ्याच मंडळींनी सिनेमा बघितला असतो त्यामुळे कथानक माहिती असते. अशा वेळेला काही लिहिणे म्हणजे चित्रपट बघितल्यानंतर दोन व्यक्तीनी केलेल्या गप्पा असतात तेंव्हा गप्पाच मारु या. चित्रपट तसाही चरित्रपट आहे त्यामुळे शेवटी काय होणार आहे हे माहिती असतेच फक्त हा प्रवास कसा उलगडत जातो तेच बघण्यात खरी मजा आहे. ती मजा चित्रपट बघितल्यानंतरच कळते, तेंव्हा चित्रपट नक्की बघा आता टिव्हीवर देखील येतोय. पुढे काही प्रमाणात कथेचा उलगडा होतो म्हणून चित्रपट बघण्यावर काही परिणाम होईल असे वाटत नाही. चरित्रपट नेहमी फ्लॅशबॅकनीच का सुरु होतात ते एक कोडे आहे. हरीशचंद्राची फॅक्टरी अपवाद होता. वसंतराव देशपांडे यांचा जीवनपट देखील फ्लॅशबॅक मधेच उलगडत जातो. यातल्या फ्लॅशबॅक मधे एक वेगळेपण आहे आणि ते वेगळेपण फार महत्वाचे आहे हे चित्रपट बघितला तर लक्षात येते.
वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावरचा चित्रपट आहे म्हटल्यावर सुरवातीला गाण्यांविषयी बोलायलाच हवे. वसंतराव देशपांडे यांची कितीतरी प्रसिद्ध आणि अजरामर गाणी आहेत परंतु चित्रपटाचा दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी आणि संगीत दिग्दर्शक राहुल देशपांडे यांचा कल जुनी गाजलेली गाणी वापरण्यापेक्षा नवीन गाणी वापरण्यावर होता. जुनी नाट्यगीते वापरली नाही असे नाही परंतु फक्त चित्रपटाचा प्रवास पुढे न्यायलाच वापरली. तसेच त्यांची गाजलेली भावगीते, चित्रपट गीते वापरण्याचा मोह टाळला. जुनी प्रसिद्ध नाट्यगीते किंवा भावगीते वापरुन सिनेमाला प्रसिद्धि मिळविण्यापेक्षा दोघांचाही कल काहीतरी नवीन करण्यावर होता. यामुळे गंमत अशी झाली का तुमचे लक्ष वसंतराव देशपांडे यांच्या प्रवासावर केंद्रित होते. दुसरा फायदा हा झाला की बरीच नवीन गाणी ऐकायला मिळाली. ललना, राम राम जप करी सदा ही गाणी खूप गाजली मला स्वतःला खूप आवडला तो म्हणजे मारवा. मी स्वतः कितीतरी इनडोअर सायकलींग वर्कआऊट मारवा ऐकत केले. मुळात मी राहुल देशपांडे यांच्या गायनाचा खूप मोठा भक्त, फॅन वगैरे आहे. Rahul Deshpande Collective सुरु झाल्यापासून संगीताच जो मोठा कॅनव्हॉस उपलब्ध करुन दिला ते निव्वळ अप्रतिम. त्यामुळे या चित्रपटाच्या गाण्यांविषयी फार बोलण्याची माझी लायकी नाही. मला राम राम, पुनव रातीचा लावणी, गझल सारेच आवडले. शास्त्रीय संगीताच्या लयीसारखा चित्रपट सरकतो मधेच गायकांनी तानावर ताना घ्याव्या तशा काही घटना घडतात , तर कधी गायकाची एखादी हरकत जशी आवडते तसे पटकन काहाततरी चटका लावून जातं असा हा गायकाचा चित्रपट गायकाची सौंदर्यदृष्टी घेऊनच पुढे सरकतो.
मला सर्वात जास्त आवडले ते नागपूरातील वाडे. मोठे फाटक, ते मधे मंदिर, त्या खिडक्या, आजूबाजूला घरे त्यात राहणारे भाडेकरु किंवा मालक, खचत चाललेल्या भिंती असे खूप वाडे बघितले. साऱेच नातेवाईक महालात वाड्यात राहायचे त्यामुळे अशा खूप वाड्यात राहण्याचा , त्यांना भेट देण्याचा योग आला. ते सिनेमात बघताच त्या साऱ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. काही भाग नागपूरातील चिटणवीसाच्या वाड्यात शूट झाल्याचे वाचले. गेले कित्येक दिवस मी चिटणवीसांच्या वाड्यात गेलो नाही तो योग वसंतराव चित्रपटाने घडवून आणला. बाळकृष्ण मंगल कार्यालय अशी पाटी देखील दिसली. दुसरी आवडलेली गोष्ट म्हणजे नागपूर भागात वापरली जाणारी भाषा. टिव्ही मालिकांनी बोलीभाषांचा खूप प्रमाणात कचरा केला आहे. आबे, काहून असे शब्द वापरले की झाली नागपूरातील मराठी असा जो एक विचित्र समज पसरला आहे. हे शब्द वैदर्भी भाषेत नाही असे नाही परंतु ते बोलण्याची एक वेगळी पद्धत असते. यात आलोक राजवाडे ज्या पद्धतीने बोलला ना ते मस्त होतं. खूप दिवसांनी काहीतरी व्यवस्थित ऐकतोय असे वाटले. या दोन गोष्टिंमुळे सुरवातीच्या पाच दहा मिनिटातच मी चित्रपटाशी जोडल्या गेलो.
कथानकात दोन पातळीवर संघर्ष आहे. घर, संसार, मुलबाळं आणि संरक्षण खात्यातली नोकरी यात अडकलेली एक सर्वसाधारण व्यक्ती वसंतराव तर या सर्वसाधारण वसंतरावाच्या आता दडलेला असामान्य प्रतिभेचा गायक वसंतराव देशपांडे. हा गायक नोकरपेशा वसंतरावांना स्वस्थ बसू देत नाही. तो गायक सतत सांगत असतो यातून बाहेर पड पण वसंतराव मात्र कितीतरी वर्षे साच्यातच अडकून राहतात. संसार सांभाळायला पैसे लागतात आणि ते गायनातून येणार नाहीत याची त्या वसंतरावांना पूर्ण कल्पना असते. या संघर्षाला खतपाणी घालत असतात ते त्यांचे मित्रमंडळ जे वसंतरावांच्या गायकीचे प्रचंड चाहते असतात. बाहेरचे सांगत असतात पण खरा संघर्ष आत आहे वसंतराव विरुद्ध वसंतराव. ऑफिसला दांडी मारुन गाण्याच्या कार्यक्रमाला जाणे वगैरे चालूच असते. आपण संसारात अडकलोय ही मनात खोल दडलेली खदखद, खंत अरुणाचल मधल्या प्रसंगात प्रकर्षाने जाणवते. गरीबीतून संघर्ष करुन कुणी वर येतो हा संघर्ष खूपदा बघितलाय पण एका व्यक्तीचा स्वतःशीच सुरु असलेला कला विरुद्ध जीवन हा संघर्ष प्रथमच या प्रकारे कोणत्या चित्रपटात आला असेल.
दुसरा संघर्ष आहे तो एका गायकाचा, एका कलाकाराचा, हा संघर्ष दिनानाथ मंगेशकर यांचा होता तोच संघर्ष त्यांच्या शिष्याचा आहे. कुठल्यातरी साच्यात कलेला, गायनाला अडकविणारा समाज तर ती बंधने मोडून मुक्तपणे सर्वत्र संचार करुन बघणारा गायक कलाकार यांच्यातला हा संघर्ष आहे. दिनानाथ मंगेशकर यांना वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायची होती, ख्याल गायकी करायची होते पण लोकांना फक्त नाट्यगीते ऐकायची होती. कदाचित हीच समस्या पुलंची असावी कितीही प्रयत्न केला तरी पुल म्हणजे विनोदी लेखक ही प्रतिमा पुसणे पुलंना देखील जमले नाही. मराठी गायकानी इंग्रजी गाणे गायले तर नाक मुरडणारे येतात तुम्ही मराठीच गात जा. प्रयोगाशिवाय विज्ञान असो की कला पुढे जात नाही ते प्रयोग करायला कलाकार धजावत नाही किंवा कलाकारांनी असे धाडस केले तर ते स्वीकारायला समाज लवकर तयार होत नाही. सिनेमात दाखविले नाही परंतु कालांतराने हाच समाज त्या कलाकाराला हा तेचतेच करतो म्हणून नावे ठेवायला मागे पाहत नाही. साच्यात अडकलेल्या कितीतरी कलांकारांच्या बाबतीत असे घडले आहे म्हणूनच हा निरंतर चालणारा संघर्ष असला तरी कलाकारांनी आपले प्रयोग थांबवू नये असे मला वाटते. मला आवडणारा मारवा हा या संघर्षाचा फार महत्वाचा भाग आहे हे चित्रपट बघितल्यावर कळले. लाहोर मधे गेल्यानंतर वसंतरावांचा मामा सांगतात “आपल्याकडे शिकता येत ते इथे लाहोरला येऊन कशाला शिकायचे? तर इथले काहीतरी शिक.” अशी प्रवृत्ती हवी. मारवा शिकविणारा शिक्षक म्हणतो “तू मला कॉपी करु नको तर तू मारवा समजून घे मग गा.” मग ते शिक्षक मारवा समजावून सांगतात हीच गोष्ट दिनानाथ मंगेशकरांनी देखील सांगितलेली असते. मी पुलंनी वसंतरावांची घेतलेली मुलाखत ऐकली त्यात या प्रसंगाचा उल्लेख आहे. सिनेमा म्हटल्यावर थोडी नाट्यमयता जरी असली तरी तो मारवाचा प्रसंग तसाच घडला होता. एक राग विविध प्रकारे कसा गाता येतो हे गुरुने शिष्याला सांगितले होते यात गुरु अजून पुढची पायरी समजावून सांगतो. या आणि अशा प्रसंगातूनच वसंतरावांची गायकी तयार होत गेली. जी इतरांपेक्षा वेगळी होती म्हणूनच लोकांना स्वीकारायला जड जात होती. वाईट गाणे आणि वेगळे गाणे यात फरक असतो. वेगळा गातो म्हणजे तो वाईट गातो असे म्हणून जो बहिष्कार टाकला जातो तो मुळात लोकांचे कान तयार झाले नाहीत हे सांगणारा असतो. गायकी वाईट नसते. या वाक्यांनी जरी हा संघर्ष चित्रपटापुरता संपत असला ना तरी प्रत्यक्षात हा कधीच न संपणारा संघर्ष आहे. काही वेगळं स्वीकारायला वेळ लागतो हे खरे आहे.
जसा संघर्ष आहे तसेच सुंदर नात्यांच्या वीण देखील चित्रपटात आहे. चित्रपटात दाखविले की वसंतरावांना त्यांच्या आईने आपल्या सासरच्या इस्टेटीला लाथ मारुन वाढविले. त्यामुळे आई हे त्यांच आयुष्य व्यापून टाकणारी व्यक्ती होती या शंकाच नाही. वसंतरावांच्या भल्यावाईट प्रत्येक प्रसंगात त्याच्या आईची सोबत होती. त्यांची आई पण किर्तनात, भजनात गायची त्यामुळे गाण्याचे संस्कार होत गेले. लक्षात राहिला तो टांग्यातला प्रसंग. त्यावेळेला वसंतरावांची आई जे सांगते ते तिने आजवर जे सांगितले असते त्याच्या अगदी उलट असते. तू माझ्या संस्कारांमुळे असा वागतोय ते मला माहिती आहे पण आता मी सांगते यातून बाहेर पड. हीच वेळ आहे तुझ्या मनात जे चालले आहे ते कर, संघर्ष झाला, त्रास झाला तरी चालेल पण बदल स्वतःला, मी जसे शिकविले, सांगितले तसा वागू नको तर तुला हवे तसे वाग. वसंतरावांच्या आईंचा देवावर विश्वास नव्हता परंतु हळूहळू मुलासाठी तेही करायला लागतात. सासूबाई आणि सूनबाईमधला मैत्रीचा धागा तर जबरदस्त आहे.
वसंतरावांची गायकी आवडणारी जी त्यांची मित्रमंडळी असते त्यात एक मोठे नाव असते ते म्हणजे पुल देशपांडे. वसंतराव आणि पुल याच्या मैत्रीचे खूप प्रसंग चित्रपटात आहेत मला त्याहून जास्त आवडले ते वसंतरावांची आई आणि पुल यांच्यातील नाते. ती बाई पुलंना लाटणे फेकून मारायला कमी करीत नाही. गरज पडल्यास तीच बाई पुलंना सांगते ‘ए भाई काहीतरी कर आता’. एक छोटासा प्रसंग माझ्या लक्षात राहिला पुल आणि वसंतराव एका दुकानात काहीतरी विकत घेत असतात. त्याआधी कुणीतरी वसंतरावांना बोललेले असते आणि वसंतरावांच्या डोक्यात तो राग असतो. अशा वेळी कुणीतरी पुलंची स्वाक्षरी घ्यायला येतो. दुसरी व्यक्ती पुलंनी नाटकाच्या दुसऱ्या अंकात काय बदल करायला हवे ते सांगतो आणि पुल त्याला पुढल्या वेळी लक्षात ठेवीन म्हणून टाळतात. पुल वसंतरावांना म्हणतात “हे पुणे आहे इथे प्र्त्येक विषयात प्रत्येकाला मत असते. लोकांच मनावर घेऊन चालत नाही.” पुल आणि वसंतरावांमधला अप्रतिम प्रसंग म्हणजे पुल वसंतरावांना त्यांनी पूर्ण वेळ गायकी करावी असा आग्रह करीत असतात परंतु वसंतराव नाही म्हणतात. शेवटी चिडून वसंतराव म्हणतात “माझ तुझ्यासारख नाही भाई मी नाही सोडू शकत.” त्यानंतर कुणीच काही बोलत नाही आणि ते न बोलणे बरेच काही सांगून जाते. त्यांच्यातल नात हे असेच चाळीस वर्षे होत.
तसाच सुंदर धागा आहे तो बेगम अख्तर आणि वसंतराव यांच्यातील मैत्रीचा. अतिशय नाजूक वीण खूप छान हाताळली आहे. तीच गोष्ट पुरुषोत्तम दारव्हेकर आणि वसंतराव यांच्यातल्या दुव्याची. तो चहाच्या टपरीवरील प्रसंग अप्रतिम आहे. हा प्रसंग प्रत्यक्षात घडला की लेखकाने लिहिला हे सांगणे कठीण आहे. वसंतरावांच्या आयुष्याला कलाटणी देणारा तो प्रसंग खूप मस्त वाटला. लांब पल्ल्यांच्या संवादांपेक्षा हा चित्रपट अशा छोट्या प्रसंगातून फुलत जातो म्हणूनच चित्रपटातील वसंतरावांचा प्रवास सामान्य माणसांसारखा जिवंत वाटतो कृत्रीम भासत नाही. सप्रे गुरुजींच्या शाळेत वसंतरावांना घालायचा प्रसंग जसा वसंतरावांनी सांगितला तसाच आहे. तो पाऊस पडणे, मुलाने गायन शाळेतील गाणे म्हणणे, शिक्षकांनी मुलाला शिकविणे हल्ली असे शिक्षक भेटणार नाहीत. मला ते वाक्य फार आवडले “माझ्या आयुष्यातील चांगल्या घटना घडल्या तेंव्हा खूप पाऊस आला.” मी स्वतः हे वाक्य बऱ्याचदा म्हणतो. एका शाळेत वसंतराव गायला जातात पण तबलजी आलेले नसतात. तेव्हा तिथल्या एका मुलाला घेऊन वसंतराव गाणं म्हणतात. त्या मुलाला फक्त तीनताल वाजवता येत असतात. तिथे एका मुलाने त्यांचे गाणे ऐकले त्याला त्यांचे गाणे फार आवडले. पुढे जाऊन तो मुलगाच त्यांच्या आयुष्याला कलाटणी देऊन जातो. जुन्या पिढिचे कान एका विशिष्ट प्रकारच्या गायकीसाठी तयार झाले होते. नवीन पिढित तसे नव्हते. ते वेगळेपण नावीण्य स्वीकारत गेले आणि त्या पुढच्या पिढिने मग वसंतराव देशपांडे या गायकाला मोठे केले असा संदेश चित्रपट सहज देऊन जातो.
चित्रपटात दोष नाहीत असे नाही पण त बोचत नाही. दोष बोचत नसतील तर काहीतरी दोष लिहायचे म्हणून लिहिण्यात काय अर्थ आहे. कलाकारांनी साजेसा अभिनय व्यवस्थित केला. चित्रपट संपल्यानंतर जर का राहुल देशपांडे यांचा वसंतराव पुष्कराज चिरपुटकर च्या पुलंपेक्षा लक्षात राहिला असता तर ते दिग्दर्शाकाचे आणि कलाकाराचे अपयश ठरले असते. तसे होत नाही त्यामुळेच अभिनय, कलाकार, कॅमेरा या मला न समजणाऱ्या गोष्टिंविषयी मी काही सांगू शकत नाही. गाण्याच्या बाबतीत माझी बोंबाबोंबच आहे त्यामुळे त्याविषयी फार न लिहिलेले बरे. वसंतराव देशपांडे या गायकावरील चित्रपट असल्याने यात तब्बल बावीस गाणी आहेत. चित्रपटात बराच काळ गायन आहे पण ते उगाच वाटत नाही. चित्रपटातील गाण्याइतपत किंबहुना मी म्हणेल त्याहीपेक्षा जास्त महत्वाचे आहे ते वसंतराव या व्यक्तीचा प्रवास, संघर्ष समजून घेणे. एक सामान्य माणूस त्याच्या आत दडलेला असामान्य गायक ज्याला फक्त गायचे नाही तर साऱ्या चौकटी मोडून गायचे आहे, त्यांच्या मनातली ही खदखद समजून घेणे अधिक महत्वाचे वाटते. हा संघर्ष जर समजला तरच वसंतराव देशपांडे मोठे गायक का झाले हे समजायला सोपे पडते. त्यासाठी मी वसंतराव हा एक वेगळा अनुभव नक्कीच घ्यायला हवा.
मित्रहो
https://mitraho.wordpress.com/
प्रतिक्रिया
27 Jul 2023 - 10:41 am | सौंदाळा
मी पण हल्लीच जिओ सिनेमावरच पहिला. सर्वात भावला म्हणजे वसंतरावांच्या आईचा करारी स्वभाव आणि धीरोदात्तपणा. वसंतरावांची संसार, नोकरी, गाणे सर्व सांभाळताना झालेली कसरत आणि स्वतःचे असे वेगळे गाणे विकसित करायची वृत्ती आणि त्याबाबतीत (कदाचीत) आईकडूनच मिळालेला करारी स्वभाव. पुलंच्या पुस्तकांमध्ये त्यांच्या घरी भीमसेन जोशी, वसंतराव यांच्या अनौपचारिक अनेक मैफिली होत असे वाचले होते. मात्र पुलं आणि वसंतराव एकमेकांच्या इतके जवळ होते हे चित्रपटात कळले.
चित्रपटाचा शेवट पण अचानक झाल्यासारखा वाटला. ऊर्जितावस्था आल्यावर वसंतरावांच्या आयुष्यातला बदल थोडाफार तरी दाखवायला हवा होता असे वाटले.
27 Jul 2023 - 11:53 am | कर्नलतपस्वी
याच्या पलिकडचे लिखाण आवडले.
मि चित्रपट नाही पाहिला पण पं वसंतराव जवळून पाहिलेत.
पं भार्गव आचरेकर, पं वसंतराव, प्रकाश घांग्रेकर,प्रकाश इनामदार, फैय्याज आणी बकुळ पंडित हा कट्यार चा ओरीजिनल संच. बघण्याची, बोलण्याची संधी मिळाली.
बगळ्यांची माळ फुले हे आवडते गाणे.
वा रा कांत याच्या अनेक गितातले एक गीत.
राहुल देशपांडे यांचे पाऊस वाजतो दारी हलकेच निथळती सुर हे आवडते गाणे.
आजोबा आणी नातू मधे आजोबा जास्त आवडतात पण नातवाची,वर दिल्याप्रमाणे,स्वताची गायलेली गिते आवडतात.
27 Jul 2023 - 12:15 pm | राजेंद्र मेहेंदळे
मलाही हा चित्रपट आवडला. एका कलाकाराचा घडतानाचा प्रवास छान दाखवला आहे. पुनव रातीचा गाणे मला विशेष आवडले. श्रुंगारीक शब्द पण वयोमानाने आलेली त्यामागची असमर्थता किवा अपरिहार्यता आणि कारुण्य, कलाकाराची वार्धक्यामुळे होणारी परवड, तरीही दर्दी लोकांकडुन मिळणारी दाद असे बरेच काही एकाच गाण्यात चमकुन जाते. विद्यार्थी दशेतले सूर संगत हे गाणे(सारंग साठ्येची भुमिकाही उत्तम), तरुणपणीचे लाहोरला गुरुंनी शिकवलेला मारवा, हुरहुर लावणारे ले चली तकदीर आणि शेवटची भैरवी, सगळीच गाणी उत्तम जमली आहेत.
शेवटच्या भैरवी मध्ये तबलावादक म्हणुन झाकीर जींच्या भुमिकेत प्रसाद पाध्येला घेतल्याने हँड मुव्हमेंटस योग्य झाल्या आहेत. नाहीतर बरेचदा तालाप्रमणे हात हालत नाहीत(कोणतेही वाद्य असो) आणि ते बघायला खटकते.
28 Jul 2023 - 9:50 am | विअर्ड विक्स
दूरदेशीच्या प्रवासात विमानात भर मध्यरात्री "मी वसंतराव" आणि "चंद्रमुखी" असे सलग दिन मराठी चित्रपट जवळपास ३ -४ महिन्यापूर्वी बघितले होते .
दोन्ही चित्रपट मला शोकांतिका च वाटले.
मी वसंतराव - मला तरी हा चित्रपट त्यांच्या आयुष्यातील पूर्वार्धावर फोकस केलेला वाटला . उत्तरार्ध येणार आहे का माहित नाही , पण यशोगाथा रेखाटण्यात हा चित्रपट कमी पडतो असे माझे मत आहे. मी व्यक्तिशः त्यांचे जीवन चरित्र वाचलेले नाही पण किशोर कुमार प्रमाणे आवाजाची दैवी देणगी त्यांना मिळाली होती जी आखीव रेखीव संगीताच्या पलीकडली होती असे चित्रपट रंगवतो. अनिता दातेंचे नाव नमूद करावे असा आग्रह ( जरी तिचे वर्हाडी एका मालिकेमुळे प्रसिद्ध असले तरी इथे वेगळा बाज आहे )
चंद्रमुखी - लावणी कलाकार वर चित्रपट असूनही यांत विशेष लक्षवेधी गाणी व लावणी नाहीत . बाकी चित्रपटातील अमृता खानविलकर ची भूमिका चांगली आहे. मृण्मयी देशपान्डे ची लहान पण लक्षवेधी भूमिका आहे
28 Jul 2023 - 12:38 pm | मित्रहो
धन्यवाद सौंदाळा, कर्नल तपस्वी, राजेंद्र मेहेंदळे, विअर्ड विक्स
हो वसंतरावांच्या आईचा करारी स्वभाव आवडला. अनिता दाते हिने यात केलेले काम आवडले.
@ कर्नल तपस्वी वसंतराव देशपांडे यांची गाणी चांगलीच होती. कदाचित रेकॉर्डिंग क्वॉलिटीचा परिणाम असेल मला तरी राहुल देशपांडे यांचीच गाणी आवडतात. वैविध्य आहे ते लाजवाब आहे.
@ राजेंद्र मेहेंदळे मलाही पुनव रातीचा हि लावणी आणि तेरे दरसे हि गझल फार आवडली.
@ विअर्ड विक्स तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे आयुष्याचा पूर्वार्ध आहे. मी हे म्हणेल की कट्यार पर्यंतचा प्रवास आहे. असे प्रत्येकाचेच असते. तो एक पहिला मोठा ब्रेक महत्वाचा असतो. त्यानंतरचा प्रवास हा बऱ्याचदा ठराविक मार्गाने जाणारा असतो. उत्तरार्ध येणार की नाही मला माहिती नाही. उदा. धोनी वर्ल्डकप जिंकून संपतो त्यानंतर त्याने कितीवेळा IPL मधे विजय मिळविला याला फारसे महत्व राहत नाही. मला तरी शोकांतिका नाही वाटली. चंद्रमुखी मी बघितला नाही पण मला बाई ग हे गाणे प्रचंड म्हणजे प्रचंड आवडते. नृत्यदिग्दर्शन, नृत्य, संगीत, गायन सारेच आवडते.
28 Jul 2023 - 6:40 pm | राजेंद्र मेहेंदळे
पडद्यावर फक्त अमृता खानविलकर दिसते, पण गाणे बनवण्यासाठी पूर्ण टिमने किती मेहेनत घेतली आहे ते ईथे पहा
https://www.youtube.com/watch?v=qT6MM2dyFII
29 Jul 2023 - 11:25 am | मित्रहो
आणि हे नृत्य दिग्दर्शनाचे प्रयत्न
https://www.youtube.com/watch?v=_kHIyon8Fio
बाई ग ही तशी बैठकीची लावणी आहे. याआधी जितक्या बैठकीच्या लावण्या आल्या त्यात एक गुलाम स्त्री तिच्या मालकाला रिझवते असे होते. गाणी सुंदर असली तर बहुतेक गाण्यात हाच भाव होता. बाई ग हे सुद्धा Extra Marital परिस्थितीमधलेच आहे पण इथे दोन व्यक्तींचे प्रेम आहे. त्याला कृष्णाचा अध्यात्मिक रंग दिल्यामुळे ते अजून उंचीवर गेले. बाई ग या गाण्याने बैठकीचे लावणीचे स्वरुप बदलले. त्यासाठी दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार, गायिका, नृत्य दिग्दर्शक, कलाकार, कला दिग्दर्शक हे सारे कौतुकास पात्र आहे.
29 Jul 2023 - 8:59 am | कर्नलतपस्वी
त्याबरोबर सुर असेल तर संगीत चांगलेच वाटते.
@ कर्नल तपस्वी वसंतराव देशपांडे यांची गाणी चांगलीच होती. कदाचित रेकॉर्डिंग क्वॉलिटीचा परिणाम असेल मला तरी
सहमत.
28 Jul 2023 - 5:32 pm | हणमंतअण्णा शंकर...
पण अव्हेलेबल नाही.
काहीतरी झोल करावा लागेल असं दिसतंय. आमच्या घरी एकंदरीत कलेचे प्रचंड वावडे आहे. का कुणास ठाऊक. कधी कधी मलाही पळून जावेसे वाटते.
29 Jul 2023 - 7:28 am | सुधीर कांदळकर
पुलंच्या मैत्र या पुस्तकात वसंतराव सायकलवरून जाऊन कारकून या पदावर नोकरी करीत त्याचे वर्णन आहे. त्यांच्या इतरही छान आठवणी आहेत. उद्या रविवारी कुठल्या तरी वाहिनीवर दुपारी १२.०० वाजता हा चित्रपट आहे. तो नक्की पाहणार. होम थिएटरवर आवाज ठेवून.
७०च्या दशकात वसंतरावांच्या काही मैफिलींना गेलो होतो. प्रभावी श्रवणकौशल्य या विषयात लिखित मजकुराला शब्दांमागील स्वरातून आत्मविश्वास कसा प्रतीत होतो आणि स्वर आणि तीव्रता यातील चढउतार लिखित मजकुराला कसा वेगळे स्वरूप देतो याबद्दल माहिती आहे. वसंतरावांच्या सुरुवातीच्या आलापापासूनच हे सारे छान अनुभवता येई.
त्या काळात व्यासपीठावर घसा ओला करण्यासाठी तांब्यापेला ठेवला जाई. दादरच्या अॅन्टोनिओ डिसिल्व्हा हायस्कूलच्या पटांगणात त्या काळी नाट्यमहोत्सव भरे. ओळीने आठदहा रात्री नाटके लागत. एकदा तिथे कट्यारचा प्रयोग मी पाहिला आहे. नाटकातल्या व्यासपीठावर तांब्यापेला ठेवल्यामुले तेव्हा हशा पिकला होता.
आठवणींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद.
29 Jul 2023 - 11:29 am | मित्रहो
धन्यवाद हणमंतअण्णा शंकर... आणि सुधीर कांदळकर
सिनेमा ३० जुलैला कलर्स मराठी टिव्हीवर येतो अशी जाहिरात वाचली. तसेच JIO वर कधीही बघता येतो. काही आंतरराष्ट्रिय विमानात सुद्धा उपलब्ध आहे.
सुधीर कांदळकर अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
30 Jul 2023 - 1:29 pm | कंजूस
कलर्स मराठीवर आता १२-३ चालू आहे.
पुन्हा संध्याकाळी ५:३० ते ९:०० आहे.
पाहात आहे. आवडला. लेखाचा उपयोग होईल कारण गाणी,सिनेमातली कळत नाही.
30 Jul 2023 - 4:46 pm | मित्रहो
धन्यवाद कंजूस संध्याकाळी सुद्धा आहे हे माहित नव्हते.
30 Jul 2023 - 9:40 pm | Bhakti
आज पाहिला, सुंदर सिनेमा आहे.वसंतरावांचे आयुष्य इतके खडतर होते माहिती नव्हतं.शेवटचे कैवल्य गीत ऐकताना हरवून गेले.खरोखर राहुल देशपांडे यांनी त्यांचं स्वप्न, इच्छा पुर्ण केल्या आहेत.
तुम्हीही छान लिहिले,इथे धागा आहे म्हणून सिनेमा पाहिला गेला.
31 Jul 2023 - 11:33 am | मित्रहो
धन्यवाद भक्ती
मी लिहिल्यामुळे सिनेमा बघितल्या गेला हे वाचून आनंद झाला.
31 Jul 2023 - 11:32 am | धर्मराजमुटके
खूप सुंदर सिनेमा परिक्षण. खरे तर हा चित्रपट सिनेमागृहातच बघायचे ठरले होते पण काही ना काही कारणाने राहून जात होते. काल जिओ सिनेमावर पाहिला. चित्रपट आवडला. गाणी देखील श्रवणिय आहेत. एकच इच्छा अपुर्ण राहिली ती म्हणजे "घेई छंद मकरंद" पुर्ण लांबीचे हवे होते ते जेमतेम ३० सेकंदात संपले. श्री. वसंत देशपांडे हे राहूल देशपांडे यांचे आजोबा होते ही माहिती देखील नव्याने झाली.
आपल्या लेखाबद्दल अनेक आभार !
31 Jul 2023 - 11:38 am | मित्रहो
खूप धन्यवाद धर्मराजमुटके
राहुल देशपांडे हे वसंतराव देशपांडे यांचे नातू आहेत. मला त्यांची गाणी देखील खूप आवडतात. विशेषतः कलेक्टिव्हमधील काही गाणि अप्रतिम आहेत. एक गाण, एकच राग वेगवेगळ्या प्रकारे गाता येईल का तो जो प्रयत्न केला जातो ते शब्दातीत.
मी वर म्हटल्याप्रमाणे वसंतरावांची खूप प्रसिद्ध गाणी मग ती सिनेमातील असो की नाटकातील ते जमेल तोपर्यंत टाळण्याचा प्रयत्न केला. कर्नल तपस्वी यांच्य लेखात त्याचा उल्लेख आहे.
31 Jul 2023 - 11:39 am | राजेंद्र मेहेंदळे
त्यानेच तर आजोबांच्या स्मरणार्थ वसंतोत्सव सुरु केलाय पुण्यात.