अमानवी बुद्धिमत्ते ( NHI ) अर्थात एलियन्स विषयी माझी बदलती मते : भाग २

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture
हणमंतअण्णा शंकर... in काथ्याकूट
21 Jul 2023 - 6:18 pm
गाभा: 

आता आपण पातळी १ एक बद्दल अजून खोलात जाऊ.

पातळी १. अनोळखी उडत्या वस्तू (UFO) किंवा अनोळखी विसंगत घटिते (Unidentified Anomalous Phenomenon किंवा UAP) अस्तित्वात असून मानवी आकलनापलीकडे आचरण करतात.

मी आता फक्त काही व्यक्तींनी या विषयी काय सांगितलं आहे हे देईन. या व्यक्ती आजही जबाबदार पदांवर आहेत, आणि त्यातल्या काही व्यक्ती खूप मोठ्या जबाबदार पदांवर होत्या. या यादीत हौशे आणि नवशे अजिबात नाहीत. माझ्या पदरचेही काही टाकत नाही. हे लोक जर तुम्हाला विश्वासार्ह्य वाटत नसतील तर ही लेखमालिका तुमच्याकरिता नाही, कृपया आपला बहुमूल्य वेळ इतरत्र द्यावा हे नम्रपणाने सुचवतो.

प्रगत तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक करत काही वस्तू नियमितपणे आमच्या प्रतिबंधित किंवा संवेदनशील हवाई क्षेत्रावरून उड्डाण करत आहेत त्यामुळे हवाई सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका निर्माण होत आहे

— Marco Rubio, US Senator (R), 2/28/2023 | Twitter

आकाशातील काही वस्तूंचे फुटेज आणि नोंदी आहेत. ते नेमके काय आहेत हे आम्हाला माहीत नाही. ते कसे हलतात, कसे मार्गक्रमण करतात हे आम्ही स्पष्ट करू शकत नाही. आकलनायोग्य आकृतिबंध काढता येत नाही.

— Barack Obama, US President (D), 5/19/2021 | Late Late Show with James Corden

या वस्तूंविषयीच्या सेन्सर डेटामधील बहुसंख्य निरीक्षणे या भौतिक वस्तू आहेत...त्यांची आमची टक्कर झाली नाही. परंतु किमान 11 वेळा अगदी जवळून चुकामुक झालेली आहे

— Scott Bray, Deputy Director Navy Intelligence, 5/17/2022 | Congressional hearings

सहसा आमच्याकडे या गोष्टी तपासणारे अनेक सेन्सर असतात... सार्वजनिक केल्या गेलेल्या डेटा पेक्षा खूप जास्त दृश्ये आमच्याजवळ आहेत. नौदल किंवा हवाई दलाच्या वैमानिकांनी पाहिलेल्या वस्तू, किंवा उपग्रह इमेजरीमध्ये सापडलेल्या वस्तू... कोणताही सोनिक बूम न करता ध्वनिहून वेगाने प्रवास करणारे तंत्रज्ञान आमच्याकडे नाही... म्हणजेच या वस्तूंविरूद्ध आम्ही आमचं संरक्षण करण्यास सक्षम नाही आहोत

— John Ratcliffe, Director National Intelligence, 3/22/2021 | Fox News

आम्ही रिपोर्ट केलेला एक UAP ओळखण्यात यशस्वी झालो. ती वस्तू मोठा डीफ्लेटिंग बलून होती. इतर १४३ वस्तूंविषयी कोणतेही स्पष्टीकरण नाही... बहुतेक UAP एकापेक्षा जास्त सेन्सर्सवर नोंदले गेले आहेत. हे सेन्सर्स रडार, इन्फ्रारेड, इलेक्ट्रो-ऑप्टिकल, शस्त्र शोधक आणि दृश्य निरीक्षणे नोंदवणारी अशा सर्व प्रकारांची आहेत. त्यावरून या वस्तू भौतिक आहेत हे आम्ही सांगू शकतो.

या UAP इतर परदेशी देशांच्या तांत्रिक प्रगतीतून निपजल्या आहेत ज्या अमेरिकेला शक्य नाही हे छातीठोक सांगण्याइतपत पुरावा आमच्याकडे नाही. मात्र काही UAP गुप्त अमेरिकन कार्यक्रमांचे फलित असू शकतात किंवा तसे निरिक्षण नोंदवता येते. परंतू हे सध्या आमच्याकडे जितकी कागदपत्रे आहेत त्यांच्या आधारे सिद्ध करता येत नाही.

— Office of the Director of National Intelligence ; Preliminary Assessment: Unidentified Aerial Phenomena 2021 ; 6/25/2021 | Report to Congress

UAP उड्डाण सुरक्षेसाठी धोकादायक आहेत. जून 2021 मध्ये ODNI चा प्राथमिक मूल्यमापन अहवाल प्रकाशित झाल्यापासून, UAP रिपोर्ट करण्याचे प्रमाण वाढले आहे. UAP घटनांना हास्यास्पद ठरवत ज्या पद्धतीने बदनाम करण्याचे प्रयत्न होत होते ते प्रकार कमी झाले आहेत आणि त्याऐवजी त्यांना संभाव्य धोका मानले जात आहे. याचा परिणाम असा आहे की मागच्या एकूण १७ वर्षांत जितक्या UAP घटनांची नोंद केलेली आहे, त्याहून जास्त नोंदी केवळ गेल्या १७ महिन्यांतील आहेत. जून 2021 च्या अहवालात १४४ घटना होत्या ( गेल्या १७ वर्षांतील ) आणि या अहवालात गेल्या १७ महिन्यांत २४७ घटना नोंदवल्या आहेत

— Office of the Director of National Intelligence; 2022 Annual Report on Unidentified Aerial Phenomena; 1/12/2023 | Report to Congress

...तर ते आपण नाही आहोत...एवढं तरी ठाऊक आहे आपल्याला.. मी विभागातील विविध पदे भूषविली आहेत, तेवढ्या आत्मविश्वासाने मी म्हणू शकतो...

— Christopher Mellon; Dep. Asst. Secretary of Defense for Intelligence; 5/16/2021 | 60 Minutes

बरं, ते परदेशी शत्रूंकडून येत आहेत यावर माझा विश्वास नाही. असे असेल तर त्यांच्याकडे असे तंत्रज्ञान आहे जे आपल्याला समजत असलेल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा पूर्णपणे भिन्न आणि वेगळ्या पातळीवरचं आहे आणि स्पष्टपणे सांगायचे तर हे चीन आणि रशिया नाहीत आणि आपणही नाही..

— Mitt Romney, US Senator (R), Former Presidential Nominee; 6/27/2021 | CNN

मला माहित नाही की ते काय आहेत, परंतु जेव्हा तुमचे वैमानिक असे वर्णन कायदेशीररित्या करतात जे आणि भौतिकशास्त्राच्या नियमांशी सुसंगत वाटत नाही. ते यूएस एअरस्पेसमध्ये आहे, तेव्हा मला वाटते की आम्हाला हे याच्या तळाशी जाणे आवश्यक आहे... जर अशा प्रकारच्या क्षमता असलेले परदेशी सरकार असेल,तर त्या देशांची इतर तांत्रिक प्रगतीही दिसली असती.. मी कल्पना करू शकत नाही की काही व्हिडिओंमध्ये दाखवले आहे ते माझ्या माहितीतल्या कोणत्याही सरकारचे आहे...

— Martin Heinrich, US Senator (D); 5/21/21 | TMZ

आम्ही ह्या वस्तू ['धातूच्या orbs'] जगभर पाहत आहोत, आणि त्या रोचक हवाई-कसरती करतानाही पाहत आहोत. .

— Dr. Sean Kirkpatrick; Director, All-domain Anomaly Resolution Office; 5/31/2023 | NASA IST Briefing

अशा वस्तू गोळा करणार्‍या आणि त्यांचा अभ्यास करणार्‍या, 20 व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातल्या ऐतिहासिक कार्यक्रमांचे अस्तित्व यापुढे गुप्त राहू नये. पुनर्प्राप्त केलेल्या बहुतेक वस्तूंचे मूळ मानवी किंवा या पृथ्वीवरचे नाही. जरी समजा सगळ्याच गोष्टी इथल्या नसतील, पण एक जरी गोष्ट जर या पृथ्वीवरची नसेल तरीदेखील ही साधुसुधी गोष्ट नाही.

जेव्हा अनेक एजन्सी पारंपारिक SAP/CAP कार्यक्रमांअंतर्गत छुप्या पद्धतीने UAP संबंधित गोष्टी करत असतात, तेव्हा या गोष्टींनी शोषित, बाधित व्यक्तींना त्यांची तक्रार मांडायलाही जर कुठल्या हक्काच्या जागा नसतील तर ही समस्या नाही काय?

— David Grusch; National Geospatial-Intelligence Agency (NGA) officer; UAP Task Force representative and whistleblower; 6/5/2023 | The Debrief

नॅशनल डिफेन्स ऑथोरायझेशन ऍक्ट (NDAA) मध्ये सुधारणा म्हणून सादर करण्यात आलेला [UAP डिस्क्लोजर ऍक्ट 2023] पुढील आठवड्यात सिनेटपुढे येईल. या कायद्यानुसार राष्ट्रीय अभिलेखागार आणि अभिलेख प्रशासनाला "UAP रेकॉर्ड संग्रह" म्हणून ओळखल्या जाणार्‍या नोंदींचा संग्रह तयार करण्याचे निर्देश देण्यात येतील. प्रत्येक सरकारी कार्यालयाला कोणते रेकॉर्ड कोणत्या संग्रहात जातील हे ओळखण्यासाठी निर्देश देण्यात येतील. UAP रेकॉर्ड संग्रहात आलेली प्रत्येक वस्तू तत्काळ जगजाहीर मानली जाईल, याचा अर्थ असा आहे की जे दस्तऐवज गोपनीय ठेवावे लागतील ते तसे ठेवण्यासाठी पुनरावलोकन मंडळाला तसे कारण सादर करावे लागेल.

माजी मेजोरिटी लीडर हॅरी रीड यांनी UAP घटनांचा तपास करण्यासाठी एक प्रकल्प प्रायोजित केला होता. तो प्रकल्प सार्वजनिक झाल्यानंतर, सिनेटर्स, काँग्रेसजन, समित्या आणि कर्मचारी यांनी या समस्येचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. त्यामधून अशा घटना, त्याबद्दलचे अनुभव, त्या बद्दलच्या कल्पना आणि कथा-दंतकथा यांचे एक जाळेच विणले गेले. या कथांमध्ये विश्वासार्हतेचे वेगवेगळे स्तर असले तरी, पूर्ण संख्या आणि विविधतेमुळे काँग्रेसमधील काहींना असा विश्वास वाटू लागला आहे की कार्यकारी शाखा UAPs संबंधित महत्त्वाची माहिती लपवत आहे. काँग्रेसला ठाऊक आहे की हे रेकॉर्ड - ते अस्तित्त्वात असल्यास - राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्याच्या सद्भावनेच्या उद्दिष्टाखाली लपवले गेले होते. तथापि, कॉंग्रेस आणि मोठ्या प्रमाणावर जनतेपासून ती माहिती लपवणे केवळ अस्वीकार्य आहे. हे दस्तऐवज जबाबदारीने उघड करण्यासाठी आणि सार्वजनिक क्षेत्रात आणण्यासाठी कार्यकारी शाखेसोबत सहकार्याने काम करणे हे आमचे ध्येय आहे.

— U.S. Senate; Joint bipartisan statement from Senators Schumer, Rounds, Rubio, Gillibrand, Young and Heinrich; 7/14/2023 | Press Release

अनेक दशकांपासून, अनेक अमेरिकन लोकांना अनाकलनीय असलेल्या या वस्तूंनी भुरळ घातली आहे. त्यांची विश्वासार्ह्य उत्तरे मिळवण्याच्गी आणि देण्याची वेळ कधीचीच निघून गेली असली तरी अमेरिकन जनतेला अज्ञात उत्पत्तीचे तंत्रज्ञान, गैर-मानवी बुद्धिमत्ता आणि अनाकलनीय घटनांबद्दल जाणून घेण्याचा अधिकार आहे. आम्ही केवळ या घटनांबद्दल सरकार पूर्वी काय शिकले आहे तेवढेच केवळ जाहीर करण्याचे काम करत नाही आहोत, तर भविष्यातल्या सगळ्या अशा घटना, संशोधन सार्वजनिक करण्यासाठी पाइपलाइन तयार करण्याचे काम करत आहोत. माझे गुरू आणि प्रिय मित्र हॅरी रीड यांचा वारसा पुढे चालवण्याचा आणि या घटनांभोवती जनतेने ज्या पारदर्शकतेची मागणी केली आहे त्या पारदर्शकतेसाठी लढण्याचा मला अभिमान वाटतो.

— Chuck Schumer, US Senator (D), Senate Majority Leader, 7/14/2023 | Press Release

प्रतिक्रिया

विवेकपटाईत's picture

22 Jul 2023 - 8:22 am | विवेकपटाईत

ब्रम्हांडात सर्वत्र जीवन आहे. कदाचित त्या पुढारलेल्या जीवांनी पृथ्वीला एक अभयारण्य घोषित केले असेल. इथल्या जीवांचे अध्ययन करण्यासाठी काही सेंपलस इथून ते घेऊन गेले असतील. त्यांचा विचार बदलला तर मनोरंजनासाठी ते शिकार करायला इथे येऊ शकतील. ......

गवि's picture

22 Jul 2023 - 8:31 am | गवि

आपण आपल्या मानवी दृष्टिकोनातूनच अंदाज लावतो. कोण जाणे त्यांचे इंटरेस्ट काय असतील. त्यांना इथले केवळ मीठ , डांबर किंवा रसना सरबत यात प्रचंड रस असू शकेल.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

22 Jul 2023 - 9:49 pm | हणमंतअण्णा शंकर...

https://grabbyaliens.com/

चेतावनी : लॉजिक हेवी.

गवि's picture

22 Jul 2023 - 8:25 am | गवि

Office of the Director of National Intelligence

उपरोक्त संस्थेचे निवेदन सर्वात (त्यातल्या त्यात) वास्तव वाटले. बाकी अनेक विधाने ही अमेरिकेला सर्व काही ज्ञात आहे आणि ते छातीठोकपणे सांगू शकतात की... अशा प्रकारची आहेत.

१. हे रशिया चीन नव्हेत च
२. हे आपले गुप्त विभागांचे काम नव्हेच (असे जाहीर सांगतात का?). हे आपण नव्हेच.
३. जगात असे तंत्रज्ञान (जे अमेरिकेला समजत नाहीये, ट्रॅक करता येत नाहीये) ते पृथ्वी बाहेरीलच असणार. यात एक जबरदस्त आत्मविश्वास दिसतो.

एक कुतूहल. वस्तू सेन्सर्स वर detect झाल्या आहेत की प्रत्यक्ष ताब्यात आहेत? त्यातील एक बलून असल्याचे सिद्ध झाले असेल तर ते कसे झाले नेमके? सेन्सर डेटाचा अधिक अभ्यास करून की प्रत्यक्ष हाती लागला बलून? इतर १४३ वस्तू कुठे ठेवल्या आहेत का?

अनेक ठिकाणी अजून एक जाणवले की मिळालेला डाटा किंवा प्रतिमा या काही नेमके निष्कर्ष काढण्यासाठी अपुऱ्या आहेत. पण हे अमुक नाही किंवा तमुक नाही असे exclusion निष्कर्ष मात्र आश्चर्यकारकरित्या ठामपणे व्यक्त झालेत. टिव्ही इंटरव्ह्यू इफेक्ट असेल का?

मी इथे सपोर्ट करण्यापेक्षा अधिक आवश्यक अशी स्केपटिकची भूमिका घेतोय हे तुम्हाला जाणवले असेल अशी आशा.

आनन्दा's picture

22 Jul 2023 - 12:38 pm | आनन्दा

>> जर अशा प्रकारच्या क्षमता असलेले परदेशी सरकार असेल,तर त्या देशांची इतर तांत्रिक प्रगतीही दिसली असती..

हे वाचलेत ना? या म्हणण्यात तथ्य आहे. अश्या प्रकारच्या वस्तू तयार करण्यासाठी technology वगैरे वर जी कमांड लागेल ती जर कोणाकडे असेल तर ते अजून पेट्रोल वर का अवलंबून आहेत?
जर अशी ऑब्जेक्ट तयार करण्याइतकी कमांड जर physics आणि nanotechology मध्ये असेल तर करोनामध्ये त्याचा वापर का झालेला दिसला नाही?
आणि कोणीही अजून चंद्र आणि मंगल याच्या पलीकडे गेलेले का दिसत नाहीत?

त्याचा मुख्य रोख अमेरिका सोडल्यात इतर देश प्रगत नाहीत असा असण्यापेक्षा देखील आजच्या घडीला कोणत्याही देशाकडे असलेल्या तंत्रज्ञानाचे अतिशयोक्त रूप देखील या ऑब्जेक चे स्पष्टीकरण देऊ शकत नाही असे संगण्याकडे आहे.

बाकी मूळ प्रश्न - UFO आहेत की नाही? त्याबद्दल अजून लेख यायची वाट पाहत आहे.
पण काहीतरी credibal डेटा या लेखमालेतून येईल अशी आशा मात्र नक्की वाटतं आहे

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

22 Jul 2023 - 2:12 pm | हणमंतअण्णा शंकर...

युएपी डिस्क्लोजर बिलाचा मसुदा नीट वाचला तर असे लक्षात येईल की अमेरिकन संसदेला बंद लिफाफ्यात देखील डेटा मिळत नाही.

म्हणून तर सगळा खटाटोप चालला आहे संसद सदस्यांचा.

जर बिल आणण्याइतपत त्या लोकांना हे महत्त्वाचे वाटत असेल तर आपल्याला इतकं स्केप्टिक असून काय फायदा आहे हेच मला कळत नाही.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

22 Jul 2023 - 2:26 pm | हणमंतअण्णा शंकर...

UFO आहेत की नाही? त्याबद्दल अजून लेख यायची वाट पाहत आहे.

येस. आहेत.

हा सगळा खटाटोप कशाला करतोय मी मग?

हे मी माझ्या मनाचं सांगत नाही, अमेरिकन सरकारच सांगत आहे. वरील सगळे रेफरेन्सेस अमेरिकन सरकार, अमेरिकन सैन्यदले, नासा अशा अनेकविध संस्थांचे, त्यात काम केलेल्या लोकांचे आणि महत्त्वाचे म्हणजे संसदेचे आहेत.

तुम्हाला अजून विस्तारित स्पष्टीकरण हवे आहे का? कारण माझा फोकस हा प्रामुख्याने विदा देणे इतकाच आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jul 2023 - 10:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'विश्वासार्ह्य वाटत नसतील तर ही लेखमालिका तुमच्याकरिता नाही' दावे मतं विश्वासार्ह असतील नसतील तरीही एक मिपाकर म्हणून लेखमालिकेच्या अनुषंगाने विश्वास जेव्हा बसायचा तेव्हा बसेल पण, आपलं मत मांडलं पाहिजे.

काहीच मान्यवरांनी दावे केले म्हणून मान्य असे म्हणून चालणार नाही, तर त्यावर अधिकाधिक संशोधने तथ्य पुढे आले पाहिजेत. एवढ्या दाव्यांवर काही अद्भूत आहे, असे मानायला मी तरी तयार नाही. पण आपला विदा-माहिती लेखमालिकेला पुढे नेण्यास पुरेशी नक्की आहे.

बलशाली-सत्ताधिशांना कायम भिती वाटत असते. आपल्यावर गदा आली तर काय होईल अशीच भिती अमेरिकेला वाटत असावी. परग्रहावरील जीव, उडत्या तबकड्यांवर त्यांनी कायम खर्च केला. पण फारसे हाताशी काही आले नाही. दोनहजार सात ते दोन हजार बारा अमेरिकेला सतत या विषयावरील संशोधनासाठी खर्च केला. पण, काही तथ्य समोर आले नाहीत म्हणून पुढे दोन हजार बारा नंतर या कार्यक्रमासाठी निधी देणं सरकारनं बंद केलं ( थँक्स टू गुगल) तरी देखील संशोधकांनी परग्रहावरील जीव तबकड्या यांचं शोध घेणं थांबवलं नाही.

मागील वर्षी अमेरिकेच्या केंद्रीय गुप्तहेर विभागानं (CIA) ही सर्व कागदपत्रं सर्वांसाठी खुली केली म्हणे, दुवे-फोटो असतील तर वाचायला आणि समजून घ्यायला आवडतीलच.

मन की बाते : हौशी मौजीचा कार्यक्रम म्हणून चंद्राच्या दिशेने अनेकदा टेलीस्कोप रोखून आपल्याला काही तरी दिसावं असं कायम वाटलं आहे. उडत्या तबकड्या, परग्रहावरील जीव, सर्वप्रथम मलाच दिसावेत असे काल्पनिक स्वप्न अनेकदा पाहिलीत. पण सालं चंद्रावरील खड्डे, चमकती किनार या पलिकडे काही हाताशी लागलं नाही. शुक्र तारा चंद्रकोरीसारखाच दिसतो या पलिकडे आपल्याला काही गवसले नाही.

लेखमाला भारी आहे. आपल्याला या विषयात लै इंट्रेष्ट आहे, हे नम्रपणे नमूद करतो. लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

वामन देशमुख's picture

22 Jul 2023 - 5:18 pm | वामन देशमुख

रच्याक,

Non Human Intelligence ला मानवी बुद्धिमत्ता म्हणावे कामानवी बुद्धिमत्ता म्हणावे?

हा 'कालयात्रा' संबंधी काही प्रकार असावा का ?
आपल्याइकडल्या भानामती, चेटूक, जादूटोणा वगैरेबद्दलच्या संशोधनासाठी सरकारने एकादे खाते सुरू करावे किंवा कसे ? कदाचित अमेरिकनांनी तसले काही केले तर नंतर इतरत्रही होईल.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

23 Jul 2023 - 4:12 am | हणमंतअण्णा शंकर...

आपल्याइकडल्या भानामती, चेटूक, जादूटोणा वगैरेबद्दलच्या संशोधनासाठी सरकारने एकादे खाते सुरू करावे किंवा कसे ?

तुमचा प्रश्न खोचक आहे तरी तो वैज्ञानिकदृष्ट्या व्हॅलिड आहे म्हणून उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. आपण (आधुनिक भारतीय) लोक कोणत्याही गोष्टीचा मुळातून आधुनिक वैज्ञानिक दृष्टीने विचार न करता खूप वितंड वाद घालतो. त्यामुळे भारतात एकही हाडाचा वैज्ञानिक सापडणार नाही जो या गोष्टींची सायंटिफिक एन्क्वायरी करेल. तुम्हाला दोन्ही टोकाच्या भूमिका घेणारेच दिसतील. म्हणजे एकतर स्युडोसायन्स किंवा थेट रिजेक्शन.

म्हणून Jacques Vallée यांच्यासारखा वैज्ञानिक महत्त्वाचा आहे.

त्यांनी मांडलेल्या मुख्य संकल्पना अशा आहेत -

इंटरडायमेंशनल हायपोथेसिस: जॅक व्हॅली हे एलियन/एक्स्ट्राट्रेरिस्ट्रियल हायपोथेसिसला पर्याय म्हणून इंटरडायमेंशनल हायपोथेसिसचे समर्थन करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. UFOs आणि संबंधित घटनांना पूर्णपणे भौतिक अंगाने, स्पेसक्राफ्टमधून अंतराळातप्रवास करू शकणारे एलियन यांची करणी म्हणून विचारात घेण्याऐवजी, त्या घटना इतर आयाम किंवा पर्यायी वास्तविकतेतून उद्भवू शकतात. व्हॅली यांचा दृष्टीकोन संगणक विज्ञानातील त्याच्या पार्श्वभूमीने प्रभावित आहे.

तंत्रज्ञान विरुद्ध चैतन्य: अनेक पारंपारिक युफोलॉजिस्ट्स केवळ UFO च्या तांत्रिक पैलूवर लक्ष केंद्रित करतात. व्हॅली यांनी मानवी मनाचा सखोल वेध घ्यावासा वाटतो. एखादी तांत्रिक घटना ही मानवी चेतनेच्या परसेप्शनने पाहावी असे ते सुचवतात. म्हणजे यु.ए.पी घटना ही स्वतंत्र फिजिकल घटना असेलच असे नाही. ती मानवी मनाचे खेळ + मानवी संस्कृतीने रुजवलेले विविध गंड /विश्वास या गोष्टींचा अंतर्भाव करून मानवापुढे घडू शकते. उदा. सध्या मानव हायपरसोनिक वेगाने प्रवास करू शकतो. तंत्रज्ञान मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे आधुनिक मानवी मनाला ज्या तंत्रज्ञानाची सवय आहे त्या तंत्रज्ञानालाच इन्व्हॅलिड करणार्‍या युएपी आपल्याला दिसतील. परंतु, मध्ययुगात किंवा ख्रिस्तपूर्व काळात या घटना कशा घडत असतील? त्यावेळच्या सामाजिक धारणांचा या घटनांमध्ये समावेश केला जाऊ शकतो का? कदाचित भानामती, चेटूक, जादूटोणा या गोष्टी एकेकाळी यु.ए.पी असू शकतात.

यूएफओ संशोधनावर टीका: वॅली यांनी यूएफओ संशोधनाच्या काही पैलूंवर टीका केली आहे, विशेषत: साक्षीदारांच्या साक्ष्यांवर आणि किस्सासंबंधी पुराव्यांवरील अतिविश्वास. त्यांचा असा विश्वास आहे की या क्षेत्राने कठोर डेटा संकलन आणि विश्लेषण पद्धतींचा समावेश करून अधिक वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे.

एक्स्ट्राटेरेस्ट्रियल विरुद्ध अल्ट्राटेरेस्ट्रियल: व्हॅली यांनी "अल्ट्राटेरेस्ट्रियल" हा शब्द तयार केला आहे. UFOs हे आपल्या विश्वातील इतर ग्रह किंवा तारा प्रणालीतूनच निपजतील असे काही नाही परंतु आपल्याला पूर्णपणे समजत नसलेल्या गैरमानवी बुद्धिमत्तेच्या इतर प्रकारांशी संबंधित असू शकतात.

मी खूप सपाट स्पष्टीकरण दिले. व्हॅली यांची पुस्तके खूप सखोल आहेत. त्यांचे प्रयत्न पूर्णपणे वैज्ञानिक मर्यादेत राहून केलेले आहेत. व्हॅली यांचे एक बीजभाषण ऐका म्हणजे त्यांच्या विचारांची सघनता आणि प्रामाणिकपणा दिसून येईल.

चित्रगुप्त's picture

26 Jul 2023 - 8:13 am | चित्रगुप्त

Do Aliens Exist? ISRO Scientist Reveals The TRUTH
https://www.youtube.com/watch?v=Z_AY4Y6nGO8

आनन्दा's picture

26 Jul 2023 - 6:54 pm | आनन्दा

पुढचा भाग कधी?

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

26 Jul 2023 - 7:52 pm | हणमंतअण्णा शंकर...

अमेरिकन संसद सदस्याकृत जनसुनावणी सुरू झाली आहे.

मानवी अस्तित्त्वाचा अर्थ मुळातून बदलवणारी गोष्ट, तिच्या एका महत्त्वाच्या पानाचे साक्षीदार व्हा! निव्वळ अभूतपूर्व अशी ही सुनावणी आहे

https://www.youtube.com/live/SpzJnrwob1A?feature=share

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

27 Jul 2023 - 12:08 am | हणमंतअण्णा शंकर...

वरील हिअरिंग कानात प्राण आणून ऐकली आणि पाहिली.

गेले कित्येक दिवस आणि रात्र या रॅबिट होल मध्ये घालवले. भुलभुलैय्या मधून लखलखीत काहीतरी हाती लागलं. त्याचा आज कळसाध्याय झाला.

आजचा दिवस मानवी इतिहासात अमर झाला आहे.

शपथपूर्वक कॉंग्रेस समोर सत्य मांडणे तेही प्राणांची बाजी लावून, हे खरे हिरो.

सलाम! बारा कोटींच्या महाराष्ट्रात एक तरी व्यक्ती तुमची दखल घेत होती याची नोंद करताना अभिमान वाटतो. आणि पुढे काय असेल ही उत्सुकता, थोडे भय, किंचित अविश्वास, आणि किंचित डिनायल पण बहुतांश आशा मनात उमटत आहे.

पुढील भागाची तयारी सुरुच आहे, ही सुनावणी झाल्यामुळे त्याला धार मिळाली हे बरेच झाले.

तुम्ही दिलेला दुवा उघडून जरा वेळ बघितला होता पण जल्ला काय म्हून काय बी कला न्हाय. तरी आजचा दिवस मानवी इतिहासात अमर झाला असे वाटण्याजोगे नेमके काय घडले आहे, आणि त्याचा मानवजातीला वगैरे पुढे काय उपयोग होईलसे वाटते आहे, वगैरे जरा उलगडून सांगितल्यास बरे होईल.