सूरतेहून मौल्यवान सामान घेऊन कळवण वरून भराभर सरकता तांडा भाग ६

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
2 Jun 2023 - 1:59 am
गाभा: 

६.०

६.१

भाग ६ नव्याने सादर करत आहे म्हणून क्रम वर खाली झाला आहे.

६.२

१८५०च्या आधीच्या काळात खटारा कसा असायचा याचे प्रातिनिधिक चित्र
“चाकांची ओबडधोबड रचना, सतत वाहतुकीमुळे खराब झालेले रस्ते आणि अवजड ओझे वाहून नेताना तो सर्व तांडा खाणे पिण्यासाठी विश्रांती घेत ताशी किती किती वेगाने जात असावा यावर विचार केला जावा.”

कळवणवरून भराभर सरकता तांडा
मुल्हेरची ‘पेठ’ ही वाहतूक करणाऱ्या माल जनावरांच्या अदलाबदलींकरिता प्रसिद्ध असावी. अहवा ते सध्याच्या काळात ताहेराबाद. हा घाट वाटांच्या उभ्या चढणीचा, चिंचोळ्या वाटेचा भाग, जंगलातील अदिवासी व अनेक लुटारू टोळ्यांनी घेरलेल्या प्रदेशातून तांडा श्रमपूर्वक घाटमाथ्यावर आला असावा. मुल्हेरच्या आसमंतात आल्यावर गुजराती भाषेचा प्रभाव कमी होऊन मराठी बोलीचा वापर करणाऱ्या मुलखात प्रवेश केल्याचे जाणवले असावे. गुजराती मालवाहू जनावरांच्या मालकांपेक्षा नव्या दमाच्या जनावरांच्या पाठीवरून नव्या लमाण्यांचा (लवणाची वाहतूक करणारे ते लवाणीचे लमाणीत रुपांतर असावे) तांडा पुढे घेऊन जाणे महाराजांच्या आखणीतून सामोरे येते. वेगवेगळ्या दिशांनी होणाऱ्या व्यापारी मार्गावरील नाके व बाजारपेठेत दोन कामांना प्राधान्य दिले असावे.
१. सुरतहून आलेल्या मालवाहू जनावरांच्या मालकांकडून मुल्हेरच्या बंजारा मालवाहतुकदारांशी पुढच्या वाटचालीसाठी जनावरांची जोडणी करणे, त्यांना जुन्या गाढवांसमोर नवे गाढव, बैलासमोर बैल, बैलगाड्या लावून इकडून तिकडे मालाची उठाठेव व्यवस्था करायला सर्व सैनिक लोक लागले असावेत. इतकी प्रचंड मालमत्ता घेऊन चाललेले सैनिक पाहून तिथल्या बाजारात गवगवा होऊन मोठे व्यापारी, सावकारांनी आपल्या व्यवसायाची, घरादाराची शाश्वती न वाटून भयभीत होऊन पळापळ झाली असावी. सहकार्य करायच्या ऐवजी पळणाऱ्या लोकांना धरून त्यांच्याकडून हवा तो माल मिळवायला हाणामारी करून बराच नवा माल भर पडला असावा. मालवाहू जनावरांना घेऊन आपल्या पोट्यापाण्याचा व्यवसाय करणारा बंजारा समाज हा फार पूर्वीपासून गावोगावी फिरणारा आणि सामान घेऊन जात येत असे. त्यांच्या ठराविक विभागात एकाधिकारशाही असल्याने त्यांच्याशी सलोखा ठेवला नाही तर ते आपल्या कर्तृत्वाचा इंगा ज्यांचा माल घेऊन जाणाऱ्या मालदारांवर दाखवायला कमी नसत.
२. सातमाळाच्या डोंगराळ भागातील मार्गावर प्राचीन काळापासून किल्ले, देवड्या, व्यापारी, सैनिकांसाठी सराया, देवी-देवांच्या यात्रा, बौद्ध भिक्षुकांच्या ध्यान साधनेसाठी निघालेल्या संघाचे जाणे येणे, यामुळे वाटा रुळलेल्या असाव्यात. सातमाळाच्या एका बाजूला सध्याच्या नाशिक जिल्ह्यातील सुपीक आणि संपन्न भाग आहे. त्यात सप्तशृंगी, वणी, गोदावरीचे उगमस्थान त्रिंबक, रामचंद्र प्रभूंच्या वास्तवाने पुनित पंचवटी, प्रवरा नदीकाठी अगस्त्य-लोपामुद्रा यांच्या सारख्या महर्षींच्या अकोले व अन्य तपोभूमी, जुन्नर भागातील अष्टविनायकापैकी लेण्याद्री, वगैरे धार्मिक स्थानाचा प्राचीन काळापासून प्रभाव असावा. तेथील वार्षिक यात्रा, कुलदेवतांच्या दर्शनासाठी जमणारे शेकडो जनसामान्य भाविक असावेत. त्यांच्या प्रभावाने सांस्कृतिक वातावरण पवित्र होत असेल.
३. संस्कृत, प्राकृत भाषांमध्ये काव्य, शास्त्राचे लेखन - पठण यामधून सांस्कृतिक वारसा पुढे नेणारा विद्वान ब्राह्मण वर्ग तयार झाला असावा. मालगुजारी, कापड व्यापारी, गावकुसातील लोकांना विविध सेवा देणारे बलुतेदार, शेतीच्या कामांना वाहून घेतलेल्या बहुजनांच्या वस्त्या, गावकुसाबाहेर राहून गावाला उपद्रवी जनावरांपासून, चोर दरोडेखोरापासून संरक्षण करणे, मृत जनावरांचे कातडे काढून देणारे ढोर समाजातील धीट, शूर आणि चपळ लोक. सैन्याला लागणारी शस्त्रे व अन्य सामुग्री बनवणारे लोहार, शिकलगार, चांभार, काही गावांमध्ये आखाडे, रिंगणात शारीरिक कसरती, व्यायाम, शस्त्र संचालन, घोडे स्वारी, याच्या शिक्षणासाठी सोय असावी. अनेक जण लढाईत कामाला लागणाऱ्या जनावरांची पैदास, शिकवण, रखरखाव यातून जीवनयापन करत असावेत.
४. वरील प्रमाणे गावगाड्याच्या संथ, पण संघटित जीवनात अनेकदा भीषण नैसर्गिक आपत्ती, सैन्य हालचालीतून लढायांची आणीबाणी, बदलत्या राजसत्तेखाली आपले गाव, जहागिरी, किल्ले, शिबंद्या राखून ठेवणे, शेती करणाऱ्यांना पावसाच्या मेहेरबानीने पीक पिकवून धान्याचा, पैशाचा सारा बिनबोभाट भरणे वगैरे कामात विविध स्तरांतील लोकांना मुसलमान धर्म संकल्पनेतील भीषणता समजून येत असावी.
५. मुगल सलतनत, अदिलशाही, निजामशाही, विदेशातून व्यापार करायला आलेल्या गोऱ्यांच्या सत्तांना टक्कर देऊन उभे राहता येते याची जाणीव आपल्या रयतेला करून द्यायची असेल तर शिवाजी या व्यक्तीला सुपे आणि आसपासच्या मुलखाचा ‘जहागीरदार’ या हुद्द्यातून बाहेर पडून हिंदवी स्वराज्याचा ‘राजा’ होणे गरजेचे आहे याची प्रकर्षाने जाणीव झाली असावी. हस्तगत केलेला किंमती माल, सामान भविष्यकाळात ऐशारामात राहून आळशी, विलासी जगून, एकमेकांच्या विरोधात राहून पिढ्यानपिढ्या वैरभाव सांभाळत राहण्याची सवय जडलेल्यांच्या हाती पडू न देणे शिवाजी महाराजांच्या मते आवश्यक असावे.
या सर्व वैचारिक भूमिकेतून या पुढील वाटचालीतील अडथळे दूर करण्यासाठी मुगल अंमलातील प्रदेशाला टाळून जावे किंवा लढून पुढे जायचे तर मिळवलेल्या संपत्तीच्या रक्षणासाठी त्याचे भाग करून जावे. वेळ पडल्यास ती कुठल्यातरी किल्ल्यावर काही काळ सुरक्षित राहील अशी व्यवस्था करणे आवश्यक असावे. सोबतच्या वरिष्ठ सरदारांशी विचार विनिमय करताना २५ किमीवरील कळवण या गावातून दोन तीन पर्यायी वाटातून तोवर निर्माण होणाऱ्या सैन्य प्रतिकारातून पुढचा मार्ग ठरवावा असे ठरले असावे. सुरतकडील कटु वार्ता औरंगाबाद येथे दक्षिणेचा सुभेदार मुअज्जम यांच्याकडे पोचली असावी.

६.३

राजकुमार मुअज्जम
जो १६७०च्या सुमारास दक्षिण सुभ्यांचा लष्करी सत्ताधारी होता. तो औरंगजेबाचा दोन नंबरचा मुलगा होता. दौलताबाद (म्हणजे आत्ताचे नाव औरंगाबाद किंवा संभाजीनगर) येथे सुरतेवरील हल्ल्यातील वाताहत ऐकून त्यातल्या त्यात जवळच्या म्हणजे बऱ्हानपुरच्या (त्यातील न चा उच्चार मराठीत ण करतात) दाऊद खानाला बंदोबस्तासाठी तैनात करून त्याच्या खाली अन्य सरदारांनी सैन्य घेऊन जायचे हुकूम दिले असावेत.
*मोहम्मद सुलतान शाहआलम नामक आपल्या मोठ्या भावाला बापाच्या पश्चात गादी मिळणार असेल तर कट कारस्थान करून त्याला शह देण्यासाठी आपल्या बाजूने सेना उभी हवी या विचाराने बालसंभाजीच्या नावे ५ हजारी जहागिरी देऊन त्याच्या वतीने लढणाऱ्या ‘सिवा’ ला विरोध तर करायला हवा पण इतका नको की नंतर तोच सत्ता हस्तगत करायच्या गळेकापू स्पर्धेत आपल्या बाजूने कामाला यायला नाकारेल याची जाणीव ठेवून दाऊदखानाला काही सैन्य आणि दारूगोळा पाठवून तो स्वस्थ बसून राहिला असावा.
{अवांतर माहिती *हा शाह आलम गादीवर हक्क बजावला निघाला असताना वाटेत त्यांनी संभाजी पुत्र शाहूंना काही अटी घालून सरदासमावेत मराठा राज्यात परत जायची परवानगी दिली. मात्र दिल्लीत पोचण्याआधी तो १७०७ सालात मारला गेला. नंतरच्या घटनात औरंगजेबाच्या मृत्यूच्या वेळी शाह मुअज्जम काबुलच्या सुभ्याचा मु्ख्य झाला होता. मोठा भाऊ शाह आलम औरंगजेबाच्या बरोबर दक्षिणेत सुभेदार होता. मुअज्जम बहादूर शाह (प्रथम) उर्फ शाह आजमला अंततः औरंगजेबाची गादी १७०७ नंतर मिळवता आली. तर मुलगा महंमद अकबर संभाजी राजांना मिळाला. पण नंतर इराणला पळून गेला, सन १७०६मधे तिथेच मेला. त्याचा सर्वात धाकटा आवडता मुलगा कामबक्ष १७०९ मधे मारला गेला.}
खालील नकाशावरून महत्वाच्या गावांमधील अंतरांची कल्पना येईल.

सुरत ते औरंगाबाद ३४७ किमी

६.४

औरंगाबाद ते बऱ्हानपुर २१३ किमी

६.५

बऱ्हानपुर ते चांदवड २५७ किमी

६.६

वरील नकाशातून वर उल्लेख केलेल्या ठिकाणांतील अंतर, रस्ते, बऱ्हानपुर ते चांदवड २५७ किमी अंतर (जिथून शिवाचे सैन्य सातमाळाच्या डोंगरातून नाशिकच्या (त्या वेळचे नाव गुलशनाबाद) भागात उतरायची जास्त शक्यता वाटून आपले सैन्य एकत्र केले असावे) वरील गावातील सूरत ते औरंगाबाद ३४७ किमी, औरंगाबाद ते बऱ्हानपुर २१३ किमी, बऱ्हानपुर ते चांदवड २५७ किमी अंतरे, रस्त्यांची सोय, हव्या त्या सैन्याला एकत्र करायचे झाल्यास लागणारा वेळ आणि नंतर त्याचा पुढे सरकण्याचा वेग पाहता महाराज आरामात सातमाळाच्या बाजूने सटकून सिन्नर, अकोले करत कोकणात उतरून गेले असते.

औरंगाबाद ते वैजापुर ते चांदवड

६.७

परंतु बऱ्हाणपुचा किल्लेदार दाऊदखान कुरेश काही कारणाने सैन्यासह वैजापुरला होता, म्हणून कदाचित चांदवडच्या मोहिमेवर ताबडतोब जायला त्याला आज्ञा दिली गेली असावी. त्याला सुरतच्या प्रकाराची माहिती मिळताच सिवा चांदवडच्या जवळ खेळबारी खिंडीतून सातमाळ उतरेल असा सैनिकी अंदाज बांधून चांदवडच्या किल्लेदारापाशी धनुष्यबाण, तलवारी, शस्त्रे, मोहिमेचे सामान, जनावरांचा दाणागोटा, तोफा, बंदुका, त्यांची ठासणीची दारू, लोखंडी, दगडी गोळे वगैरेची सोय करण्यात गुंतला असावा.
लढाई करायची वेळ आली की काय नियोजन करावे यावर दाऊदखानाने आपल्या बरोबरच्या सरदारांसमावेत विमर्ष केला असेल. सुरतहून मिळवलेल्या संपत्तीच्या रक्षणासाठी सिवाला तांड्यांसोबत राहूनच आपल्याशी संघर्ष करावा लागेल. म्हणून आपल्या सैनिकांनी ‘सिवा’ च्या सैन्याला गुंतवून ठेवून आपले मुख्य काम म्हणजे त्वरित तांड्यातील मालजनावरांच्या चालकांना ताब्यात घेऊन त्यांना परत उलटे फिरवून शक्य तितकी संपत्ती सूरतेच्या मालकांकडे परत करावी हे ध्येयअसेल.
अशावेळी कोणी काय कामे करायला हवीत याचा तपशील मुगलांच्या सैन्यात काम करणाऱ्या भीमसेन सक्सेना यांनी नमूद केले आहे. डॉ श्रीनिवास सामंत, प्रा. नामदेव जाधव, श्री गजानन मेहेंदळे यांनी विविध संदर्भ तपासून निष्कर्ष काढले आहेत. त्यातून ह्या लढाईचे रणक्षेत्र एकच ठिकाण, खिंड, गाव किंवा रस्ता असे न मानता त्या तांड्यांसोबत विविध भागात सैन्य संचलन करत ठिकठिकाणी हातघाईच्या समरातून शिवाजी महाराजांच्या सेनेने मुगल सेनेला जबर जखमी करून नामोहरम अवस्थेत पाठलाग करणे सोडून द्यायला लावले असेल.
हजारो मालजनावरांच्या पाठीवरील ओझ्यातून नेत तो तांडा नंतर कुठे कुठे थांबत गेला? मधल्या मधे कुठे तरी तो ठेवून त्यात इतर ठिकाणाहून हल्ले करून हस्तगत करून नंतर एकत्रित करून मग टप्प्या टप्प्याने पोचला? महाराज तो रायगडावर पोहोचेपर्यंत बरोबर होते का? मालवाहक जनावरांच्या चाऱ्याचा, विश्रांतीचा, पुन्हा अदलाबदलीकरिता कुठेतरी थांबायला लागले असेल तर ते कुठे असावे? यावर प्रकाश टाकायची गरज आहे…..
या संदर्भात एक बातमी वाचनात आली त्याच्या शीर्षकावरून हायवेच्या एका रुंद रस्त्यावरून जाताना लांबलचक तांडा दाखवला होता...

६.८

६.९

६.१०

या निमित्ताने मुगलसेनेच्या व्यूह रचनेचा आढावा घेता येईल.

६.११

मुगलांच्याकडून लढाईची सुरवात तोफा, बंदुका आणि दारूचे बाण यांच्या माऱ्याने होत असे. काही वेळा नंतर कोणातरी एका फौजेतील एखादी तुकडी पुढे चालून जात असे. घोडेस्वारांजवळ बाण असत आणि पुढे दौडत असताना ते बाण सोडत असत. त्या बाणांचा उद्देश समोरच्या सैनिकांचे घाबरवून मनोबल खच्ची करणे असा असावा. मात्र नेम लागून सैनिक मेला किंवा जखमी असे होत नसल्याने या हत्याराचा फारसा परिणाम होत नसावा, दहापैकी नऊ बाण शत्रूच्या सैनिकांच्या डोक्यावरून जात किंवा अलिकडे पडत असत. सामूगड लढाईतील वर्णनातून हे पटकन लक्षात येते.
काही वेळानंतर जरांघार (डावी) किंवा बरांघार (उजवी) बाजूपैकी कोणत्यातरी बाजूची एखादी तुकडी पुढे चालून जात असे. पण मुख्य भर धक्कातंत्रावर असे. स्वार शत्रूला भिडताच तलवारी, भाले, इत्यादी शस्त्रांनी हातघाईची लढाई सुरू होई. एका तुकडीपाठोपाठ इतरही तुकड्या हातघाईत सामील होत. या हातघाईवरच लढाईचा अखेरचा निर्णय होत असे. हरणाऱ्या फौजेत पळती सुरू होई आणि तिची छावणी विजयी फौजे कडून लुटली जाई.
समोरासमोर उभे ठाकून केलेल्या लढायांमध्ये अदिलशाही आणि कुत्ब फौजांचे रणतंत्र मुगल फौजांसारखेच सारखेच होते. पण मुगल फौजेविरुद्ध - बहुधा मुगलांकडे संख्याधिक्य असल्यामुळे आणि त्यांचा तोफखाना व त्यांचे घोडे सरस असल्यामुळे - निजामशाही, आदिलशाही व कुत्बशाही फौजा सहसा समोर उभ्या ठाकून लढाई करत नसत. मुगलांशी समोरासमोर लढाई करावयाची नाही आणि त्यांची दमछाक करून त्यांना जेरीस आणायचे अशी त्यांची युद्धनीती असे. या युध्दनीतीस अनुसरून त्यांचे रणतंत्र बनलेले होते. ( गजानन मेहेंदळे यांचे ग्रंथ संदर्भ -)
मग महाराजांनी अमलात आणलेले तंत्र काय होते? ते नंतर समजून येईल...

बोजड तोफा हत्ती किंवा बैलांना कामाला लावून कशा वाहून नेत असत याचे प्रातिनिधिक चित्र

६.१५

६.१३

भाग ७ पुढे चालू...

प्रतिक्रिया

अत्यंत अभ्यासपूर्ण, त्या काळच्या एकंदरित परिस्थितीचा सर्वकष आढावा घेणारे विवेचन.
सुरुवातील शब्दकोडी बनवणे, 'अपछायिता' लिखाण, मग नाडीग्रंथांचा सांगोपांग अभ्यास/ पुस्तके या सर्वांनंतर आता शिवकालीन लढायांचा अभ्यास आणि सादरीकरण हे शशिकांत ओक यांच्या उद्यमीपणाचे दैदिप्यमान शिखर म्हणता येईल.
तुमच्या या विविध विषयांचा पाठपुरावा करत अभ्यासपूर्ण लेखन करण्याच्या गेल्या अनेक दशकांच्या उद्यमाचा आढावा घेणारा लेख जरूर लिहावा, अशी प्रेमळ विनंती करतो.
सहज जालावर बघताना हत्तींच्या सहाय्याने तोफ वाहून नेण्याबद्दल हे मिळाले:

.
.

.
कोटा शैलीतील या चित्रात तोफा बैलगाडीत ठेवलेल्या असून मागून हत्ती ढकलत आहे.
(Source: Ashmolean Museum, University of Oxford)
.

राजेंद्र मेहेंदळे's picture

2 Jun 2023 - 2:54 pm | राजेंद्र मेहेंदळे

उंबरखिंड लढई आणि सुरतेची लूट या दोन्ही लेखमाला तुटक तुटक वाचत चाललो आहे.

कृपया कोणीतरी सगळ्या लिंक्स एकत्र करुन देउ शकेल काय? किवा लेखातच पुढच्या मागच्या लिंक देता येतील काय?

उत्तम माहिती आणि सादरीकरणात सुधारणा होते आहे. ह्याचे एक पुस्तक होऊ शकते, त्यासाठी गद्यमाहीती वाढवायला हवी.
खुप नवीन गोष्टी समजत आहेत.

दुर्गविहारी's picture

2 Jun 2023 - 7:17 pm | दुर्गविहारी

खुपच छान लेखमाला !

कर्नलतपस्वी's picture

2 Jun 2023 - 9:05 pm | कर्नलतपस्वी

कुठल्याही मोहिमेवरून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे अर्धी लढई तर गुप्तहेर खातेच लढते.

मिळालेल्या माहितीचा किती व कसा उपयोग करायचा, मोहीमेचे नियोजन व त्याची अमंलबजावणी यावर लढाईचे फलीत अवलंबून असते.

हे कदाचित मिलिटरी सायन्सचे बेसिक म्हणावे लागेल जे आजही संयुक्तिक वाटते.

छान माहितीपूर्ण लेख.धन्यवाद.