खाज्जियार हे चंबा खोऱ्यातील ६५०० फूट उंचीवरील एक हिल स्टेशन .
स्वित्झर्लंडशी उष्णकटिबंधीय साम्य असलेले हे ठिकाण म्हणजे सुमारे ५ किमीचा परीघ असलेले एका मोठ्या खोलगट बशीच्या आकाराचे हिरवेगार कुरण आणि मध्यभागात एक सुंदर तळे. कुरणात चरणारे प्राणी, कुराणाच्या पलीकडील बाजूस दिसणारे पर्वत व त्यावरील देवदार वृक्षांचे दाट जंगल याचे नेत्रसुखद दर्शन. कुरणाच्या एका कोपऱ्यात (रस्त्याच्या बाजूने) १२ व्या शतकातील खाज्जिनाथ मंदिर हे येथील आणखी एक आकर्षण. १९९२ मध्ये स्विस दूत यांनी खज्जियारला भेट दिली तेव्हा ते खूप प्रभावित झाले व या ठिकाणाची भारतातील 'मिनी स्वित्झलँड' म्हणून त्यांनी घोषणा केली.
काळ संध्यकाळीच खज्जियारला पोहचलो होतो. हॉटेल लगतच हे मिनी स्वित्झर्लंड म्हटले जाणारे सुंदर ठिकाण आहे. त्यामुळे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या कुरणात येऊन यथेच्छ फेरफटका मारला. दिवसाच्या वेगवेळ्या वेळात निसर्गाचे बदलणारे रूप पहिले.
आज सकाळी उठून फेरफटका मारून रम्य सकाळ अनुभवली.
चम्बाच्या मंदिरांविषयी ऐकले होते. त्यांच्या वेगळेपणामुळे आज ही मंदिरे बघायची ठरवले . खज्जियारपासून साधारण २०-२२ किमी व वेळ एक तास लागणार होता.
चलो चम्बा
वळणा वळणाच्या रस्त्याने गाडी घाट उतरू लागली. हा रस्ताही निसर्गसौंदर्याने परिपूर्ण आहे. थोड्याच वेळात चम्बाच्या 'चोगान' ला येऊन पोहचलो. (चोगान':एक मैदान जेथे सभा, मेळे आयोजित केले जातात) याच्या आसपासच आम्हाला बघायची ती मंदिरे होती.
याच मैदानात दोन दिवसानंतर मोदीजींची सभा होणार होती त्यामुळे रस्ते, मैदान सगळीकडे पोलिसांचा खूप बंदोबस्त होता.
'चोगान'
दहाव्या शतकात राजा साहिल वर्मन याने मुलगी चम्पावतीच्या म्हणण्यानुसार आपली राजधानी भारमौरहून येथे आणली व राजधानीचे नामकरण मुलीच्या नावावरून चंबा असे केले.
चम्बाची पाषाण व लाकडी छत असलेली मंदिरे
चम्बाची बहुतेक मंदिरे दगडी बांधकाम असलेली नगारा शैलीत (किंवा शिखर शैलीत)आहेत. या शैलीतील मंदिरांचे दोन प्रकार दिसून येतात. टेकडी व मैदानी प्रकारातील मंदिरे. टेकडी प्रकारात मंदिरे आतून कोरीवकाम किंवा चित्रकला केलेली तर मैदानी प्रकारात बाह्य भागावर कोरीव काम केलेली दिसून येतात. चम्बाच्या मंदिरांमध्ये बाह्य भागावर विपुल प्रमाणात कोरीव काम आहे. मंदिराच्या भिंतींचे पाऊस किंवा हिमवृष्टीपासून रक्षण व्हावे या दृष्टीने शैलीत थोडा बदल केला गेला असावा. मंदिराच्या शिखराजवळ बाहेरील बाजूने गोलाकार लाकडी छत दिलेले दिसते. देवदार वृक्षांच्या मजबूत लाकडामुळे ही छते हजार वर्षांनंतरही आज चांगल्या स्थितीत टिकून आहेत.
लक्ष्मी नारायण मंदिर (चंबा येथील मुख्य मंदिर)
राजा साहिल वर्मन याने १० व्या शतकात या मंदिर संकुलाचे निर्माण केले. शिखर शैलीतील सहा मंदिरांचा हा समूह. मंदिरे शंकर, विष्णू व कृष्णाला समर्पित आहेत. मुख्य मंदिरातील विष्णूची मूर्ती हि विंध्य पर्वतातून आणलेल्या संगमरवरी दगडातून तयार केली गेली आहे. असे म्हणतात की राजाची दहा पैकी नऊ मुले मूर्तीसाठी दगडाच्या शोधात मध्य भारतात आली होती जी त्यांच्यावरील हल्ल्यात मरण पावली. मूर्ती घडवण्याबद्दल राजाची अपार श्रद्धा होती व त्यामुळेच त्याने दहाव्या मुलालाही शिळा आणण्यास पाठविले. त्याने आणलेल्या संगमरवरी शिळेतून नारायणाची सुंदर मूर्ती साकारल्या गेली.
मंदिर संकुल प्रांगणाच्या प्रवेश द्वारासमोर गरुड स्तंभ असून त्यावर पितळेची गरुड मूर्ती आहे.
प्रवेश केल्यावर नंदी मंडप असून पुढे मुख्य लक्ष्मी नारायण मंदिर आहे. प्रवेश द्वारावर गंगा यमुना आहेत. वर सांगितल्याप्रमाणे सर्व मंदिरांना शिखराजवळ लाकडी छत असून बाह्य भागावर सुंदर मूर्तिकाम व नक्षीकाम दिसते.
संकुलातील मंदिरे :
१. लक्ष्मी-नारायण (मुख्य मंदिर)
२. राधा कृष्ण
३. चंद्रगुप्त
४. गौरी शंकर
५. त्रंबकेश्वर
६. लक्ष्मी दामोदर
लाकडी छत
हरी राय मंदिर
चम्बाचे मैदान 'चौगान' च्या अगदी बाजूस हे मंदिर आहे. मूर्ती ९-१०व्या शतकातील असून मंदिर ११व् व्या शतकातील आहे. विष्णूची वैकुंठ स्वरूपातील दागिन्यांनी नटलेली सुंदर मूर्ती आहे.
चंपावती मंदिर
अकराव्या शतकात राजा साहिल वर्मन याने आपल्या मुलीच्या नावे हे मंदिर बांधले. हे मंदिरही चोगान च्या जवळच (पोलीस स्टेशनच्या मागे) आहे. यामागची कथा अशी सांगितली जाते की चंपावती नेहमी एका ऋषींना भेटण्यासाठी जात असे. राजाने संशय घेऊन ऋषींच्या खोलीत प्रवेश केला. खोलीत कोणीही नव्हते. राजाला प्रायश्चित्त म्हणून उभ्या असलेल्या जागीच मंदिर बांधण्याबद्दल आकाशवाणी झाली.
येथे अजूनही काही चांगली ठिकाणे आहेत जसे चामुंडा मंदिर, सुई माता मंदिर ,अखंड चंडी पॅलेस,रंगमहाल, म्युझिअम इ. पण आवरते घेतले. अशीही दोन दिवसांनी मोदीजींची सभा असल्याने गर्दी खूप होती आणि खाज्जियार पासून बरेच खाली आल्याने वातावरणातही थोडा उष्मा होता . एक वेगळ्या प्रकारची मंदिरे पाहायची होती ती बघून झाली असल्याने खज्जियारसाठी परत निघालो.
(ज्यांना इतिहास, प्राचीन मंदिरे वगैरेची आवड आहे त्यांनीच इकडे फिरकावे बाकीच्यांनी खज्जियारला थांबून हिल स्टेशनची मजा अनुभवावी. दोन्ही ठिकाणांच्या उंचीत साधारण १८०० फुटांचा फरक असल्याने येथील वातावरण व शहरातील गर्दी यामुळे फिरणे थोडेसे कंटाळवाणे होऊ शकते म्हणून एक फुकटचा सल्ला)
दुपारी अडीचच्या सुमारास परत खज्जियारच्या जवळ पोहचलो. वाटेत एक उंच शंकराची मूर्ती दिसली. येथेच जगदंबा मातेचे मंदिर होते. दर्शन घेऊन परत हॉटेलवर आलो.
खोलीतून दिसणारा नजारा
माकडांपासून खुप सांभाळावे लागते.
तळ्याकाठी फिरायची हौस अजून पूर्ण झाली नव्हती पण बाहेर पाऊस पडायला सुरुवात झाली होती. त्यामुळे थोडे थांबून बाहेर पडलो. भरपूर फोटो काढले व येथील फोटोग्राफरकडूनही काढून घेतले.
हॉटेलच्याच कडेने रस्त्यापलीकडे 'खज्जीनाग मंदिर ' आहे. मंदिर १२ व्या शतकातील असून नागांचा राजा खाज्जिनाग ह्याची मूर्ती आहे.मंदिराला उतरते स्लेट दगडाचे छत असून इतर काम खांब वगैरे लाकडी आहे.
१६ व्या शतकात राजा बालभद्र वर्मन यांच्या काळात लाकडापासून बनविलेल्या पांडवांच्या पाच पूर्णाकृती मूर्ती येथे आहेत.
हिडिंबा व शिवाचेही छोटेसे देऊळ आहे.
उद्या सकाळी अमृतसरकरिता निघायचे असल्याने आवराआवर करून लवकरच झोपी गेलो. सकाळी सातलाच बिल भरून गाडीवर सामान लादले. हॉटेलमधील अनुभव खूपच चांगला होता. खज्जियारला मुक्काम करावयाचा असेल तर हॉटेल 'देवदार' सारखे चांगले ठिकाण शोधूनही सापडणार नाही. गाडी परत डलहौसीमार्गे धावू लागली. डलहौसीच्या बिजीज पार्कजवळचा सुंदर रस्ता परत एकदा अनुभवला.
साडे आठ नऊच्या दरम्यान एका ढाब्यावर नाश्त्याकरिता थांबलो. वनविभागाच्या एका निवृत्त कर्मचाऱ्याचा हिमाचल प्रदेश,, जम्मू -काश्मीर व पंजाबच्या सीमेवरच्या निसर्ग सुंदर जागेवर असलेला हा ढाबा.
काही मिनिटातच आम्ही हिमाचल प्रदेशची हद्द ओलांडून पंजाबच्या सीमेत प्रवेश केला.
ही लेख मालिका हिमाचल प्रदेशच्या कांगडा व चंबा पुरतीच मर्यादित ठेवण्याचा विचार असल्याने इथेच संपवीत आहे.
यानंतर अमृतसर येथेही काहींनी एक तर काहींनी दोन रात्र मुक्काम करून अटारी-वाघा बॉर्डर, सुवर्ण मंदिर, जालियनवाला बाग , श्री दुर्ग्याना तीर्थ इ. ठिकाणांना भेट दिली.
आधीच्या काही भागातील प्रतिक्रियेत सहलीचा कार्यक्रम व खर्चाबाबत काहींनी चौकशी केली होती त्याबद्दल माहिती खाली देत आहे
सहलीची रूपरेषा
सहल खर्चात समाविष्ट गोष्टी:
* मुंबईपासून पठाणकोट व अमृतसर ते मुंबई रेल्वेचा ससंपूर्ण रेल्वे प्रवास वातानुकूलित.
* पठाणकोटला उतरल्यापासून ते परतीच्या ठिकाणापर्यंत भटकंतीसाठी सर्व दिवस खाजगी वाहन
* पूर्ण जेवणखर्च
* सर्व ठिकाणांची प्रवेश फी , गाईड खर्च, टीप
अंदाज येण्यासाठी प्रवासासहित संपूर्ण १२ दिवसांचा प्रत्येकी खर्च
सहलीतील एक सदस्य श्री विजय गोरेगावकर यांनी सहलीचा थोडक्यात घेतलेला आढावा
जमलं तर भेटू पुन्हा एकदा अशाच एखाद्या लहान-मोठ्या सहलीच्या निमित्ताने. धन्यवाद.
समाप्त
प्रतिक्रिया
23 Feb 2023 - 3:21 pm | टर्मीनेटर
मस्त झाली भटकंती 👍
ह्या परिसरातली काही नं बघितलेली ठिकाणे मालिकेतून फोटोरूपाने अनुभवता आली तर ह्याआधी बघितलेल्या अनेक ठिकाणांच्या आठवणी जाग्या झाल्या.
पुढील भटकंती आणि लेखनासाठी शुभेच्छा!
24 Feb 2023 - 11:56 am | गोरगावलेकर
आपल्या सूचना व वेळोवेळी दिलेले प्रोत्साहन याबद्दल खूप खूप धन्यवाद.
23 Feb 2023 - 4:16 pm | Bhakti
वाह!खुपचं सुंदर भटकंती मालिका ठरली.
खज्जियार खरंच सुंदर आहे.
पुढील भटकंतीसाठी खुप खुप शुभेच्छा!
24 Feb 2023 - 11:57 am | गोरगावलेकर
प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक आभार
23 Feb 2023 - 5:55 pm | स्मिता श्रीपाद
खूप मस्त सहल आणि वर्णन. तुमच्या सगळ्या लेखमालिकांची मी फॅन आहे.
आणि सहल आखणीचा उत्साह खुप आवडला. ट्रॅवल कंपनी काढा तुम्ही एक. मस्त मॅनेज कराल :-)
24 Feb 2023 - 11:59 am | गोरगावलेकर
ट्रॅवल कंपनी काढा तुम्ही एक. मस्त मॅनेज कराल :-)
कल्पना चांगली आहे पण लोकांशी संवाद साधण्यात आम्ही (मी व नवरा) दोघेही बरेच कमी पडतो. विरंगुळा म्हणूनच आहे ते ठीक आहे. सर्व तयारीसाठी सहलीपूर्वी चार महिने व प्रत्यक्ष अनुभवानंतरचे २-३ महिने आठवणी एकमेकांना सांगण्यात मस्त मजेत जातात.
23 Feb 2023 - 7:36 pm | कंजूस
ट्रावल गुरूही.
आणि माहिती चौकडीत चित्रांसह सादरीकरण करणारीलाही धन्यवाद. रंगीत माहितीपत्रकच.
चला माझेही हिमाचल इथेच झाले.
24 Feb 2023 - 12:02 pm | गोरगावलेकर
आपले सल्ले मोलाचे असतात. मिपावर फोटो चढविणे आपल्या लेखातूनच शिकले. आहे. सहलीतील एका सदस्याने सहलीविषयी घेतलेल्या आढाव्याची श्राव्य फाईल जोडायची होती ते मात्र जमले नाही. (MP3 फाईल गूगल ड्राइव्ह वर आहे)
24 Feb 2023 - 12:32 pm | कंजूस
गूगल ड्राइव'वरचे फोटो, ओडिओ, विडिओ वेबसाईटवर देणे.
https://www.misalpav.com/node/47068
या लेखात दिलेली कृती करून पाहा.
24 Feb 2023 - 5:21 pm | गोरगावलेकर
लेखाच्या शेवटी ही फाईल जोडली आहे.
सहकार्याबद्दल धन्यवाद.
24 Feb 2023 - 11:46 am | अनिंद्य
खूप छान.
खर्चाचा तक्ताही दिलात, प्रवासखर्चाचा उत्तम हिशेब ठेवणाऱ्याचे / रीचे कौतुक.
25 Feb 2023 - 11:21 am | गोरगावलेकर
प्रत्येक तिकीट/बिल/पावतीचा फोटो काढून ठेवतात. कुठलाही हिशेबाचा कागद खिशात ठेवत नाहीत. Tally त काम करायची सवय असल्याने वर्गवार नोंद ठेवता येते.
24 Feb 2023 - 11:59 am | प्रचेतस
ही मालिका एकदम सुरेख झाली.
खज्जियार अतिशय देखणे आहे. चंबा येथील नागर शैलीतली मंदिरे आवडली. खज्जिनाग मंदिरातल्या पाच पांडवांच्या मूर्तीदेखील सुरेख. आपल्याकडे तळेगाव दाभाडे येथे पाच पांडवांचे आणि निद्राधीन द्रौपदीचे मंदिर आहे. जेजुरीनजीक पांडेश्वर येथे देखील पाच पांडवांची मंदिरे आहेत.
आता पुढच्या एखाद्या अशाच लेखमालेच्या प्रतिक्षेत.
25 Feb 2023 - 11:22 am | गोरगावलेकर
प्रतिसादही आवडला
महाराष्ट्रातील पांडव मंदिरांबद्दलची माहिती माझ्यासाठी नवीनच. केव्हातरी लोणावळा परिसरात जाणे होईलच तेव्हा तळेगाव दाभाडेला जरूर जाईन.
8 Mar 2023 - 12:43 pm | गोरगावलेकर
या रविवारीच येथे जाऊन आले. मंदिर लॉकडाऊन मध्ये बंद झाले ते आजपर्यंत उघडण्यात आले नाही. आजूबाजूला केलेल्या चौकशीत समजले की मंदिराच्या भिंती ढासळण्याच्या स्थितीत आहेत, छतही कधी खाली येईल ते सांगता येत नाही. त्यामुळे मंदिर बंदच ठेवण्यात आले आहे. मंदिराची मालकी दाभाडे घराण्याकडे असून त्यांचे एक वंशज बाजूलाच राहतात व त्यांच्याकडे मंदिराच्या कुलुपाची किल्ली असते असे कळले. परंतु तेही कुठेतरी बाहेर गेले आहे असे कळल्याने विचारणा करता आली नाही.
खिडकीच्या जळीतून टिपलेला फोटो. पाच पांडव व मागील झरोक्यातून दिसणारी एका कुशीवर झोपलेली द्रौपदी.
दुसऱ्या खिडकीच्या जाळीतून दिसणारी द्रौपदीची खोली
मंदिराच्या बाहेर एक नंदी व शिवलिंग आहे. बाजूला अजून एक चौथरा आहे त्याच्या बाजूलाच एक वीरगळ दिसतो. यावरून हा चौथरा म्हणजे एखाद्या योध्याची समाधी असावी असे कळते. एक लहानसे दगडी वृन्दावनही दिसते, यावरून एखादी स्त्री येथे सती गेली असावी असे कळते.
वीरगळ
वृंदावन

9 Mar 2023 - 6:45 am | प्रचेतस
एकदम मस्त, मीही मागच्या मार्चमध्ये येथे आलो होतो पण तेव्हा बंदच होते, चावीही मिळाली नव्हती. मात्र तेव्हा मंदिराबाहेरील घुमटी रंगवलेली नव्हती, आता मात्र थोडा बदल दिसून येत आहे.
25 Feb 2023 - 10:54 pm | रीडर
खर्चाचा अंदाज उपयुक्त आणि माहितीपत्रकही मस्त
26 Feb 2023 - 8:01 pm | कंजूस
हॉटेलचे प्रकार,स्वच्छता,मुख्य गाव/शहर यांच्या रेल्वे स्टेशन/बस अड्डा पासून किती दूर यावर थोडेसे फिरलेले लोकांना खर्चाचा अंदाज बांधता येतो. प्रवासाची साधने बस,टॅक्सी नाका जवळ असले की खर्च कमी येतो.
27 Feb 2023 - 7:05 am | अक्षय देपोलकर
8 Mar 2023 - 12:34 pm | गोरगावलेकर
@रीडर, अक्षय देपोलकर आणि सर्व वाचकांचे मनापासून धन्यवाद