Thrills on Wheels तिसरा टप्पा

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
20 Feb 2023 - 9:54 am

Thrills on Wheels
( Thane - Statue of Unity - Thane)
तिसरा टप्पा
२३ तारखेला साधारण तीन वाजता हॉटेल वर पोहोचलो. उरलेला वेळ अजिबात फुकट घालवायचा नव्हता. निवांतपणे तयार होऊन हॉटेल मधून नंबर घेवून एक रिक्षा बोलावली. आणि आम्ही गरुडेश्वरला गेलो. साधारण ५ किमी वर आहे गरुडेश्वर. १० मिनिटात तिथे पोहोचलो. छान दर्शन झालं. नर्मदा नदी किनाऱ्यावर जाण्यासाठी मोठ्या मोठ्या पायऱ्यांचा घाट बांधला आहे. डावीकडे धरणावरून येणारा पाण्याचा प्रचंड प्रवाह आहे. अतिशय सुंदर असं ते दृश्य होत. घाट उतरून पाण्यात पाय बुडवून घेतले. मैयाला मनोभावे नमस्कार केला. तिचे आशीर्वाद घेतले. मन भरून आल. सूर्यास्त होत होता. खूप शांत वाटत होत. घरी नेण्यासाठी प्रसाद घेवून परत हॉटेल वर आलो. हॉटेल शेजारी असणाऱ्या MacD मध्ये जाऊन बर्गर फ्राईज वर ताव मारला आणि रूम वर येऊन निवांत झोपलो. ना उद्या उठायचं टेन्शन ना सायकल चालवायच.
२४ ला सकाळी उठून स्टॅच्यू बघण्यासाठी निघालो. एकता मूर्ती च्या वरच्या भागात viewing gallery केलेली आहे. तिथून दोन्ही बाजूची नर्मदा नदी आणि परिसर दिसतो. त्यासाठी त्यांनी स्लॉट दिलेले असतात. आमचा १० ते १२ चा स्लॉट असल्याने आम्ही ९ वाजताच त्या परिसरात पोहोचलो. तिकडे फिरण्यासाठी बसेस आहेत. त्यासाठी कोणतीही फी नाही. त्या बस तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेवून जातात. ही सुविधा अतिशय उत्तम आहे. आमच्या हॉटेल पासून अगदी एखाद किमी वर बस स्टँड होता. शिवाय इलेक्ट्रिक रिक्षा पण होत्या ज्या फक्त बायका चालवत होत्या. त्या भाड देऊन ठरवून ठेवता येतात. आम्ही ९ वाजताच एकता मूर्ती च्या परिसरात पोहोचलो. इथे खूप चालावं लागतं. १० वाजता आम्ही लिफ्ट ने वर viewing gallery मध्ये गेलो. तिथून नर्मदा नदीचं पात्र दिसत होत. पण वातावरण फारच धूसर असल्याने केवळ मूर्तीच्या खाली असणार नदीपात्र दिसत होत. लांबवर वगैरे काहीही दिसत नव्हतं. त्यामुळे हा कार्यक्रम आमचा १५/२० मिनिटात संपला. परत खाली येऊन सगळ्या बाजूंनी तो पुतळा पहिला. भव्य दिव्य म्हणजे काय याची प्रचिती आली. आम्ही उभ्या राहिलो तेव्हा त्या मूर्तीच्या पायाच्या अंगठ्यापाशी सुध्धा पोहोचलो नव्हतो. इतकी ती मूर्ती भव्य आहे. तिथे ठिकठिकाणी अनेक दालन तयार केलेली आहेत. एके ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल यांची माहिती, ऑडियो / व्हिडिओ फिल्म तर दुसऱ्या ठिकाणी पुतळा बनवतानाची माहिती. कायम देशभक्तीपर गाणी सुरू होती. खूपच सुंदर आहे ते सगळं पाहणं. एक समृद्ध अनुभव आहे हा. जागोजागी व्यवस्थित पाट्या लावलेल्या. स्वच्छतागृह ही खरोखर स्वच्छ होती. जानेवारी महिना असल्याने कितीतरी शाळेच्या ट्रीप पण आलेल्या. त्यामुळे भरपूर गर्दी. पिण्याच पाणी भरण्यासाठी सुध्धा छान सोय केलेली. तिथल्याच एरियात कॅफेटेरिया असल्याने खाण्याची सोय देखील होती. दोन अडीच तास फिरून, फोटो काढून मग आम्ही पुढे निघालो जंगल सफारी साठी. इथे बाकी ठिकाणी मात्र आम्ही कुठेच आधी तिकीट काढल नव्हतं. जंगल सफारी आम्ही खूपच एन्जॉय केली. भरपूर चालत भरपूर बडबड करत सगळे प्राणी पक्षी बघितले. काही पक्षी तर इतके जवळ होते की हात लावला असता. सुरवातीला झोपलेला बिबट्या जागा झाल्यावर काचेच्या पलीकडे फेऱ्या मारायला लागला तेव्हा काचेआडून त्याच्यासोबत सेल्फी पण काढून घेतला. अशी धमाल मजा करून मग नर्मदा क्रुझ साठी गेलो. नर्मदा नदीतून बोट जात एकता मूर्ती च सुंदर दर्शन आपल्याला घडत. शिवाय छोटे करमणुकीचे कार्यक्रम होतेच तिथे. संध्याकाळ च महत्वाचं आकर्षण म्हणजे एकता मूर्तीचा लेझर शो. खच्चून गर्दी होती. जेमतेम एक बेंच अगदी आमच्यासाठी राखीव असावा असा मिळाला.
त्यानंतर जे पाहिलं ते अपूर्व होत. तंत्रज्ञानाचा उपयोग करून काय काय आणि किती सुंदर करता येऊ शकतं याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे हा लेझर शो. त्या मूर्तीवर लेझर लाईट सोडून सरदारांचा इतिहास उभा केला आहे. शेवटी नरेंद्र मोदींचं छोटंसं परंतु प्रभावी भाषण लेझर शो ची रंगत वाढवत. सर्वात शेवटी जनगणमन होऊन कार्यक्रम संपला. जनगणमन सुरू झाल्यावर सर्वांनीच सुरात सूर मिसळले आणि अंगावर काटा आला.
साडेसात वाजून गेले होते. तिथून आम्ही बसने glow garden ला गेलो. ही खूपच छान कल्पना होती. प्राणी, पक्षी, फुलं, झाडं असं सगळं लाईट मध्ये बनवलेलं होत आणि अर्थातच रात्री बघण्यासारखं होत. खूपच मजा आली ते बघताना. एक गोष्ट मात्र जाणवली. एकता मूर्तीचा परिसर सोडला तर इतर ठिकाणी जसं की glow garden, जंगल सफारी, फूड मॉल इत्यादी ठिकाणी स्वच्छतागृह अतिशय अस्वच्छ होती. जी अवस्था आपल्या एस टी स्टँड वरील स्वच्छतागृहांची असते, तिच अवस्था इथल्या या इतर स्वच्छता गृहांची होती.
अश्या तऱ्हेने २४ तारीख संपली. पण या सगळ्यात ३ दिवस सलग सायकल चालवल्यावर लागणारी विश्रांती मिळाली नव्हती. त्यात दिवसभर उन्हात उनाडक्या आणि सलग ४ दिवस बाहेरच खाणे, परिणामी मला पित्त झालं. दुसरा दिवस मात्र विश्रांतीसाठी ठेवला. सकाळी उठून नाश्ता करून परत रूम वर आलो आणि विश्रांती घेतली. एकता मूर्ती च्या जवळ सायकल नेऊन फोटो काढणं बाकी होत. शास्त्र असतं ते . मग १२ वाजता तयार होऊन सायकल घेवून तिथे वेगवेगळे फोटो काढले. परत येऊन थोडी विश्रांती घेतली. माझ्या सायकलच्या पुढच्या चाकातून थोडा आवाज येत होता. आम्हाला माहीत असलेले किंवा जमणारे प्रयोग झाल्यावर, मनोज दादाला व्हिडिओ कॉल करून जरा थोडीफार दुरुस्ती करून घेतली.
संध्याकाळी नर्मदा मैया ची आरती बघण्यासारखी असते अस केतकीने सांगितलं होत. त्यामुळे इलेक्ट्रिक रिक्षाने शुलपाणेश्वर मंदिरात पोहोचलो. देवाला नमस्कार केला. इथे आश्चर्य म्हणजे स्त्रियांना गाभ्याऱ्यात प्रवेश होता. इतकंच नाही तर आमच्या हातून शिवाला अभिषेक करता आला. काय समाधान वाटलं ते सांगता येत नाही. खुश झालो दोघीही. तिथून घाटावर आलो. हळूहळू लोक जमत होते, आरतीची तयारी करत होते. घाटावर ठराविक ठिकाणी पाट मांडले गेले, मोठ्या समया, धुपदाणी, मोठमोठे दिवे तयार करून ठेवले होते. गुरुजी सगळे एकाच प्रकारच्या पोषाखात तयार होते. एकीकडे भजन म्हणणाऱ्या लोकांनी सुंदर भजन सुरू केलं. लेझर शो संपल्यावर बरीचशी गर्दी इकडे आली. आणि मग आरतीला सुरवात झाली. आधी पूजा करून मग कापूर लावून आरती. खूपच अवर्णनीय अस ते दृश्य होत. या सगळ्या प्रकारात नदीत निर्माल्य टाकणं किंवा हळद पिंजर वाहण इत्यादी कोणत्याही प्रकारे नदीचं प्रदूषण करू दिलं नव्हतं. नंतर तिथेच समोर नदीच्या पाण्यात कारंजी लावून त्यावर लाईट टाकून शिवतांडव स्तोत्र लावण्यात आल. हा सुध्धा एक वेगळाच आणि अनपेक्षित अनुभव होता. मन तृप्त झालं. तिथून हॉटेल वर परत आलो आणि दुसऱ्या दिवशीची तयारी करून झोपी गेलो.
या दोन दिवसांनी मला काय दिलं? हे दोन दिवस आम्ही मनसोक्त उनाडक्या केला. न विसरता येणाऱ्या आठवणी जमा केल्या. एकमेकींसोबत खूप सुंदर क्षण घालवले. वेडेपणा केला. सगळी टेन्शन विसरून खळखळून हसलो. मन मानेल तस वागत होतो. ना कुणी आम्हाला ओळखत होत ना आम्ही कुणाला त्यामुळे साहजिकच वागण्यात एक प्रकारचा मोकळेपणा होता. बरेच दिवसांनी मस्त टूर केल्याचा आनंद होता.
उद्यापासून परतीचा प्रवास होता. रात्री उद्याची तयारी करताना परतीची ओढ लागयला लागली.

- धनश्रीनिवास

प्रवासअनुभव

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

20 Feb 2023 - 11:25 am | राजेंद्र मेहेंदळे

हा पण भाग सुंदर जमलाय!! पण फोटो का नाही टाकले? अजुन रंगत वाढली असती.