Thrills on Wheels

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
1 Feb 2023 - 9:01 pm

Thrills on Wheels
(Thane - Statue of Unity - Thane)
पूर्वतयारी
डॉ अश्विनीला हॉस्पिटल मध्ये ८ दिवसांची सुट्टी मिळणार होती. वेगळं काहीतरी करायला हवं अस दोघींच्याही डोक्यात होत पण काय ते ठरत नव्हतं. सुट्टी तर नक्की झाली. श्रीनिवास ने नेहमीप्रमाणे दोघींनी बाईक टूर करा म्हणून आयडिया दिली आणि तेजानंदसह आम्हीही ती उचलून धरली. आता कुठे जायचं यावर एकमत होईना. चौघांचा व्हॉटस् अप ग्रुप करून चर्चा सुरू झाल्या. दोन दिवस सायकल चालवत जायचं, दोन दिवस विश्रांती घ्यायची आणि दोन दिवस सायकल चालवत परत यायचं असा ढोबळ आराखडा ठरला. टुरिंग असल्यामूळे BRM सारखं फास्ट जाणं, स्पीड मेन्टेन ठेवणं वगैरे नव्हतं. रिलॅक्स राईड करायची होती. त्यानुसार साधारण २००/३०० किमीच ठिकाण पाहिजे.

वेगवेगळे ऑप्शन्स शोधत असताना एकदा श्रीनिवास सहज म्हणाला स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात एकता मूर्ती ला जाऊन भेट द्या. सांगितल्या क्षणी ही कल्पना दोघींना पसंत पडली. आता तिथवर जायचं कसं हा पुढचा प्रश्न. इथून मॅप ६४४ किमी दाखवत होता. एका दिवशी साधारण १००/१५० किमी करायचे तरी ५/६ दिवस नुसते जायला लागणार होते. म्हणजे १२/१५ दिवस लागणार. हे जरा जास्तच होते. पहिलीच दोघींची ट्रीप, त्यात एवढे दिवस जायचं???? मग त्यावर उपाय म्हणून श्रीनिवास म्हणत होता, तुम्ही जाताना ट्रेन ने जा, येताना सायकल ने या.आम्हाला राऊंड ट्रीप करायची होती. त्यामुळे आम्ही याला नकारार्थी मान हलवली. चर्चेअंती ठाण्याहून अंतर बघता ४०० किमी जे ३ दिवसात पार करता येईल अस जाणवलं. त्यामुळे सूरवात ठाण्याहून करायचं ठरलं. आता ठाण्यापर्यंत सायकल आणि सामान कसं नेणार यावर चर्चा सुरू झाली. ट्रेनचा पर्याय बघितला. पण सगळ्या ट्रेन फुल्ल होत्या. परत एकदा श्रीनिवासने सुचवलं, " दोघीजणी गाडी घेवून जा. गाडीत सायकल पण सेफ राहतील आणि जायचा यायचा प्रश्न नाही." आता मी जरी Wagon r चालवते तरी मुंबईला गाडी नेण्याची कधी वेळ आली नव्हती. मी तर चिपळूण बाजारपेठेत गर्दीत गाडी न्यायाची तरी वैतागते. इथे ठाण्यात एंट्री करायची तरी कुठून करायची अशी सूरवात.शेवटी "डर के आगे जीत है" हे सतत ऐकून आम्ही तयार झालो. मग ३ दिवसात किती अंतर जायचं आणि कुठे जाऊन थांबायचं हे ठरवण्यात काही दिवस गेले. कधी आम्ही गणपत्ये फॅमिली कडे तर कधी ते आमच्याकडे असे बसून ठरवू लागलो. शेवटी निदान जातानाचा प्लॅन ठरवून झाला.

श्रीनिवासने त्याच्या मित्राबरोबर याआधी हा सायकल दौरा केल्यामुळे त्याच मार्गदर्शन चालू होत. जाताना पहिला मुक्काम १५० किमीला वापीला ठरवला. तिथली हॉटेल बघून एक बुक करून झालं. पुढचा मुक्काम १५० किमी अंकलेश्र्वरला ठरला आणि तिथेही हॉटेल बुक केलं.आणि शेवटचा मुक्काम केवडिया गावात अर्थात एकता मूर्ती असलेल्या परिसरात १००किमी वर. आम्हाला वाटलं सुट्टीचा सिझन संपला तर गर्दी फार नसेल तर बजेट हॉटेल ना बुकिंग फुल्ल होत. मग त्यातल्या त्यात जवळच हॉटेल बुक केलं आणि शिवाय स्टॅच्यू ऑफ युनिटी च पण तिकीट काढून ठेवलं.

हे सगळं प्लॅनिंग जरी महिना दोन महिने आधी चाललं होत, तरी आम्ही हे कुठेच बोललो नव्हतो. सेफ्टी, सिक्युरिटी हा विषय होताच. पण ' आधी केले मग सांगितले ' हे महत्वाचं होत. उगाच आधीपासून गाजावाजा करायचा आणि नंतर हात हलवत परत यायचं अस होऊ नये याची भीती होती. आणि म्हणून आधी कुठेच कुणाला काही बोललो नव्हतो. ८/१० दिवस बाहेर जातोय एवढंच कुणी विचारलं तर सांगितलं होत.

माझी सायकल एकदा मनोज दादाकडे नेऊन ठीकठाक करून आणली. अश्विनीने तिची सायकल सर्व्हिसिंग करून आणली. गाडी पण तयार झाली. सायकलच्या कॅरियरला अडकवयाच्या बॅग्स दोघींकडे असल्याने तो प्रश्न नव्हता. किती सामान घ्यायचं, काय घ्यायचं, काय नाही अशी वाटणी केली. जसं फर्स्ट एड किट अश्विनीने घेतलं तर पंक्चर किट मी घेतलं. छोटा पंप मात्र दोघींनी घेतला. दोघींचे टायर साइज वेगळे असल्याने दोघींनी आपल्या आपल्या ट्युबस घेतल्या. सायकलिंगचे दोन ड्रेस आणि तिथे फिरायला ड्रेस असे मोजकेच कपडे घेतले. एरवी भरपूर सामान घेणाऱ्या मला एवढ्याच सामानात एवढा मोठा दौरा करायचं फारच टेन्शन आल. त्यात सायकलिंगचे कपडे परत परत तेच वापरायचे. कधी धुता येतील याची शाश्वती नाही. रात्री घालायला एक ट्रॅक पँट - टी शर्ट. सगळया रात्री तोच वापरायचा. मी जरा नाक मुरडल पण इलाज नव्हता. जास्त सामान म्हणजे जास्त वजन जे मलाच न्यायचं आहे. त्यामुळे सगळी काट छाट झाली. तिकडे फिरताना घालायला पण एकच पँट वर दोन वेगवेगळे टॉप. साबण हॉटेल मध्ये बरेच वेळा असतात. त्यामुळे अगदी आंघोळीचा किंवा कपड्याचा साबण पण नाही. लागेल तेव्हा तिथे घेवू अश्या हिशेबाने. बॅग भरून तयार झाल्या. सगळी तयारी झाली. आदल्या दिवशी अश्विनी सायकल घेवून आली. पुढचं चाक काढून दोन्ही सायकल wagon r मध्ये मावल्या.

आता फक्त आजची रात्र, उद्यापासून ८/९ दिवसांचा प्रवास सुरू. घरापासून, लेकापासून दूर राहणार म्हणून हुरहूर वाटत होती. एवढे दिवस आपल्याशिवाय घरात नीट राहतील ना? लेकाला माझी आठवण येईल तेव्हा काय करेल? मदतनीस काकू पोळ्या करून जाईल पण एखाद्या दिवशी ती नाही आली तर हे घरातले तीन पुरुष काय करतील? असे किती प्रश्न मनात येत होते. पण श्रीनिवास सारखा," तुला काय करायचंय? तू जा बिनधास्त. आमचं आम्ही बघू" सांगत होता. तसा घरात चिवडा, शंकरपाळे वगैरे कोरडा खाऊ करून ठेवला होता. गहू, तांदूळ, आंबोळी, थालीपीठ सगळी पिठं तयार करून ठेवली होती. त्यामुळे थोडी निर्धास्त होते. बघू पुढचं पुढे अस म्हणून झोपी गेले.

- धनश्रीनिवास

प्रवासअनुभव

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

2 Feb 2023 - 12:19 am | कपिलमुनी

पुभाप्र

गोरगावलेकर's picture

2 Feb 2023 - 10:15 am | गोरगावलेकर

माझ्या एकता मूर्ती सहलीच्या आठवणी ताज्या होणारच आहेत. त्याचबरोबर आपले सायकल प्रवासाचे अनुभव वाचायला मजा येणार हे निश्चित

सरिता बांदेकर's picture

2 Feb 2023 - 10:21 am | सरिता बांदेकर

मस्त.
तुमचा अनुभव वाचायची उत्सुकता आहे.

सरिता बांदेकर's picture

2 Feb 2023 - 10:21 am | सरिता बांदेकर

मस्त.
तुमचा अनुभव वाचायची उत्सुकता आहे.

कर्नलतपस्वी's picture

2 Feb 2023 - 11:41 am | कर्नलतपस्वी

छान सुरुवात झाली आहे.

श्वेता व्यास's picture

2 Feb 2023 - 12:18 pm | श्वेता व्यास

वाचत आहे, पुभाप्र

राजेंद्र मेहेंदळे's picture

2 Feb 2023 - 12:58 pm | राजेंद्र मेहेंदळे

होउन जाउदे मालिका!! पुभाप्र.

सस्नेह's picture

2 Feb 2023 - 4:24 pm | सस्नेह

ब्रेव्हो !
वाचतेय..... आगे बढो.

mayu4u's picture

9 Feb 2023 - 12:07 pm | mayu4u

र च्या क ने, तुम्ही परतेपर्यन्त शिन्या ने काही गोन्धळ घातला नाही ना?

मालविका's picture

20 Feb 2023 - 9:56 am | मालविका

प्रतिसादाबद्दल आभार