आणि बाकी शून्य...

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
1 Feb 2023 - 11:22 am

तुझा फोन आला ना की,
चेह-यावर molar to molar हसू उमटतं..
हातातलं काम तिथंच थांबवत मी तव्याखालचा विस्तव विझवते.
केसांची बट मागे सारत स्वतःला उगा आरशात निरखते.
मग फोन घेऊन मी कोलाहलापासून दूर बाल्कनीच्या कोप-यात जाते.
आणि रिंग थांबायच्या जssस्ट आधी हॅलो म्हणते.
सुरवातीची औपचारिक चौकशी आटपून तू पटकन कामाकडे वळतोस.
माझं हसू तीन चतुर्थांश होतं..
ते बोलणं पण म्हणता म्हणता संपून जातं.
आता हसू बरोब्बर निम्मं...
मग तू म्हणतोस, "बाकी काय म्हणतेस?"
आवडलेली कविता, नावडलेलं गाणं..
पाहिलेली वाट, तुझं न येणं..
दाटलेला हुंदका, तुला न कळणं...
माझे वेडे हट्ट, तुझं शहाणं वागणं...
बाकी किती नी काय काय असतं.
पण फोनमधून ऐकू येतो reverse horn चा, गाडी पार्क केल्याचा वगैरे आवाज.
तुझ्या आवाजातली आवराआवर पण ओळखू येतेच की मला.
"बाकी काही नाही, ठीक." म्हणून मी गुपचूप फोन ठेवते.
हसू आता डायरेक्ट मायनस मध्ये पोचलेलं असतं.
..
आणि इथं बाकी असतो पोळपाटावर अर्धवट लाटलेला शून्य ....

मुक्तक

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

1 Feb 2023 - 12:40 pm | चांदणे संदीप

आवडलीच!

सं - दी - प

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Feb 2023 - 9:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झकास...! आवडली कविता.

-दिलीप बिरुटे

विवेकपटाईत's picture

2 Feb 2023 - 5:00 pm | विवेकपटाईत

कविता अनेकदा वाचली. बाकी स्त्रियांच्या मनातले भाव कळणे अशक्यच. काही शंका. मनावर घेऊ नका.
तू पटकन कामाकडे वळतोस नवरा कार्यालयात आहे
reverse horn चा, गाडी पार्क केल्याचा वगैरे आवाज घरी पोहचला ??
नवरा घरी आल्यावर हसू माइनस मध्ये. (36 वर्षांचा अनुभव)(/सौला वाचनाची आवड नाही, बिनधास्त लिहू शकतो)
अर्धवट लटलेला शून्य म्हणजे पोळी. बहुतेक आज नवरा घरी जेवणार...

राघव's picture

2 Feb 2023 - 7:35 pm | राघव

मला नाही वाटत की हे नवर्‍याबद्दल आहे! ;-)

प्राची अश्विनी's picture

3 Feb 2023 - 9:48 am | प्राची अश्विनी

:)

राजेंद्र मेहेंदळे's picture

2 Feb 2023 - 10:40 pm | राजेंद्र मेहेंदळे

माझे ईंटरप्रिटेशन

नवरा परगावी/परदेशात आहे. बायको ईथे झुरते आहे. नवराही झुरत असेलच, पण तो जास्त प्रॅक्टीकल आहे/ईमोशनल कोशंट कमी आहे.
बायको फोनसाठी काम थांबवुन आलेय, नवरा मात्र कामासाठी फोन थांबवायला बघतोय.

थोडक्यात काय "मेन्स ऑन मार्स, वुमेन ऑन व्हीनस"

चित्रगुप्त's picture

3 Feb 2023 - 2:38 am | चित्रगुप्त

आता मंडळी आपापल्या कल्पनेच्या पोळ्या लाटतच आहेत, तर आम्ही सुद्धा एक पोळी लाटतो:
यातला 'तो' म्हणजे सायबांचा डायवर आहे, आणि मेमसाबच्या कीचनात पोळ्या लाटणारी 'ती' त्याची एकतर्फी 'सजणी' आहे.
दुपारी काम आटोपल्यावर ती सगळ्या मालिका, पिच्चर वगैरे बघत असल्यानं - 'molar to molar हसू' - केसांची बट मागे सारत स्वतःला उगा आरशात निरखणं - रिंग थांबायच्या जssस्ट आधी हॅलो म्हणणं - आवडलेली कविता - नावडलेलं गाणं - पाहिलेली वाट - त्याचं न येणं - दाटलेला हुंदका - त्याला न कळणं - वेडे हट्ट .... वगैरे - मालिका आणि पिच्चरात दाखवतात तसं - 'किती नी काय काय' - ते सगळं आपणही करावं, हे तिचं स्वप्न आहे.
साहेब आणि मेमसाब दोघांना त्यांच्या हापिसात गाडीतून सोडून येताना तिला फोन करून - सुरवातीची औपचारिक चौकशी आटपून - मेमसाबनं तिला आठवणीनं करून ठेवायला सांगितलेल्या कामांबद्दल 'तो' तिला निरोप देतो आहे.
निरोप सांगून झाल्यावर तो बेसमेंटमधे गाडी पार्क करून, बाकीच्या डायवरांबरोबर पत्ते कुटत, तंबाखू चोळत बसणार, हे तिला ठाऊक आहे.
शेवटी 'मायनस मधे पोचलेलं हसू' आवरून ती पुन्हा पोळ्या लाटायला आलेली आहे. बिचारी.
(बॅकग्राउंडला "तेरा जाना, दिल के अरमानों का लुट जाना" गाणं वाजतं आहे).
.

राजेंद्र मेहेंदळे's picture

3 Feb 2023 - 12:20 pm | राजेंद्र मेहेंदळे

अनेक वर्षांनी हे गाणे पुन्हा पुर्ण ऐकले. काळजाचे पाणी पाणी झाले.

कर्नलतपस्वी's picture

3 Feb 2023 - 5:14 pm | कर्नलतपस्वी

प्रतिसाद वाचून उगाच शोभा गुर्टू यांच्या बैठकीच्या लावणीची आठवण झाली.

पिकल्या पानाचा देठ की ओ हिरवा

बाकी कल्पनाविलास सत्य असेल असे वाटत नाही.

फोन जरी त्याचा असला तरी गाडीचा रिव्हर्स हाॅरन ओळखीचा वाटत नसल्याने उरले सुरले हसू गायबलेले दिसते.

धिरे धिरे मचल ऐ दिले बेकार कोई आता है
-अनुपमा
मालकीण किंवा सखू कोणीही असो,

दोन रात्रीतला आता संपला वेडेपणा
वेड पांघरण्यात होता वेगळा वेडेपणा

विमान हळुहळू खाली उतरते.

बाकी Men are the men असे कहीसे म्हणतात म्हणे.

कविता प्रतिसाद सह आवडली.

प्राची अश्विनी's picture

3 Feb 2023 - 9:33 am | प्राची अश्विनी

अरारारा . कवितेचा बाजार उठवला की.:)
अजून version पण येऊद्यात .

Bhakti's picture

3 Feb 2023 - 6:13 pm | Bhakti

वाह :)