उदयपूर,हल्दीघाटी,कुंभलगड व चितौडगड भटकंती दुसरा दिवस

श्वेता२४'s picture
श्वेता२४ in भटकंती
6 Dec 2022 - 4:10 pm

भाग 1 उदयपूर,हल्दीघाटी,कुंभलगड व चितौडगड भटकंती पूर्वतयारी

भाग 2उदयपूर,हल्दीघाटी,कुंभलगड व चितौडगड भटकंती पहिला दिवस

     जगदीश मंदिर पासून सिटी पॅलेस पाच ते सात मिनिटाच्या चालत अंतरावरती आहे. इथे सिटी पॅलेसच्या बाहेरच अनेक राजस्थानी कलाकुसरीच्या वस्तूंची दुकाने आहेत. जसे कपडे, टोप्या, गॉगल, दगडी वस्तू इत्यादी. पॅलेसच्या बाहेरच डाव्या हाताला तिकीट खिडकी आहे. या तिकीट खिडकीच्या आजूबाजूलाच गाईड उपलब्ध असतात. हे गाईड रजिस्टर असतात व गळ्यात त्यांचे आयडी कार्ड घालूनच फिरत असतात. पूर्ण पॅलेस फिरवायचे हे गाईड साधारण पाचशे रुपये घेतात. श्रीयुत सिंग यांना रु.500 या दराने गाईड म्हणून ठरवले. इथे एक आग्रहाने नमूद करावेसे वाटते की, सिटी पॅलेस पहायचा आहे तर गाईड अवश्य घ्या . गाईड शिवाय सिटी पॅलेस पाहणे म्हणजे केवळ टाईमपास आहे. गाईड तुम्हाला प्रत्येक गोष्टी मागील माहिती व कहाण्या सांगत असतात. गाईडमुळे सिटी पॅलेस पाहणे एक अर्थपूर्ण अनुभव होऊन जाईल. पूर्ण सिटी पॅलेस फिरून झाल्यानंतर तुम्हाला ते पैसे दिल्याचे समाधान नक्की मिळेल. पर्यटकांसाठी खुल्या असलेल्या सिटी पॅलेसचे व्यवस्थापन हे तिथल्या महाराजांनी स्थापन केलेल्या ट्रस्टमार्फत पाहिले जाते. येथे बसण्यासाठी जागोजागी बैठक व्यवस्था, प्रसाधनगृह तसेच पाण्याची व्यवस्था अतिशय उत्तम दर्जाची आहे. त्यामुळे कुठेही गैरसोय होत नाही. संपूर्ण पॅलेस फिरण्यासाठी तुम्हाला कमीत कमी तीन ते चार तासांचा अवधी पाहिजे .आम्हाला पाच तास लागले. त्यामुळे ज्या दिवशी तुम्ही सिटी पॅलेस पाहणार असाल त्या दिवशी केवळ सिटी पॅलेस व लेक पिचोलाची बोटिंग राईड एवढाच कार्यक्रम निवांतपणे कव्हर होऊ शकतो.
     सिटी पॅलेस मध्ये बोटिंग चा सुद्धा पॉईंट आहे. हा खाजगी बोटिंग पॉईंट असून इथून जाणाऱ्या बोटी या लेक पीचोलाची सफर घडवतात. जाताना तुम्हाला जगमंदिर वरती थोडावेळ थांबवले जाते. जगमंदिर हे लेक पिचोलाच्या मधोमध असणाऱ्या बेटांपैकी एक असून तेथे आधी राजाचा महाल होता. परंतु आता हा महाल एका फाईव्ह स्टार हेरिटेज हॉटेलमध्ये रूपांतरित करण्यात आला आहे. तिथे छोटेसे म्युझियम देखील आहे. लेक पिचोलाच्या साधारण एका तासाच्या बोटिंगराईड मध्ये तुम्हाला या जगमंदिर येथे थोडा वेळ थांबवण्यात येते. तिथे तुम्ही काही खाऊ पिऊ पण शकता. परंतु दर अतिशय जास्त आहेत. हा पूर्णपणे फोटो पॉईंट आहे. एका फेरीसाठी सकाळी नऊ ते दुपारी तीन पर्यंत साधारण प्रतिमाणशी 400 रुपये दर आकारला जातो. तर संध्याकाळच्या वेळी अतिशय गर्दी असल्यामुळे प्रतिमाणशी 800 रुपये असा दर आकारला जातो. तुम्हाला जर सिटी पॅलेस मधून लेक पिचोलाची बोटिंग सफर करायची असेल तर त्याचे तिकीट तुम्हाला सिटी पॅलेसच्या तिकीट खिडकीवरतीच घ्यावे लागते.
      लेक पिचोला बोटींगचा दुसरा स्वस्त पर्याय म्हणजे सरकारी बोटिंग राईड. याचे तिकीट काउंटर दूध दलाई इथे आहे. इथे प्रतिमाणशी दर केवळ 175 रुपये आहे यामध्ये साधारण एक तास तुम्हाला लेक पिचोलाची सफर घडवली जाते. जगमंदिरच्या बाहेरून तुम्हाला फिरवले जाते व सर्व घाटांच्या वरती असणाऱ्या हवेल्यांचे मस्त दृश्य दिसते. त्यामुळे ज्यांना जग मंदिर वरती उतरण्यात काही इंटरेस्ट नाही त्यांनी सरळ सरकारमान्य बोटिंग मधून सफर करणे कधीही चांगले. तरीही शक्यतो संध्याकाळच्या वेळी म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी जर बोटिंग केली तर लेक पिचोला वरील दिसणारी दृश्य ही खूप छान असतात असे ऐकले आहे.
     आता सिटी पॅलेस विषयी थोडेसे. सिटी पॅलेस हा 1553 झाली महाराज उदयसिंग द्वितीय यांनी बांधावयास घेतला आणि तो पूर्ण व्हायला सुमारे 400 वर्षे लागली. महाराज उदयसिंग द्वितीय यांच्या वारसदारांनी या बांधकामामध्ये भर घालत घालत आज जो आपल्याला राजवाडा दिसत आहे तो दिसतो. सिटी पॅलेसचा फक्त काहीच भाग हा लोकांसाठी खुला आहे. तर आतील इमारतीमध्ये राजाचे वंशज अजूनही राहत असतात. राजस्थान मधील लोकांमध्ये या राजांबद्दल अपार कृतज्ञता त्यांच्या वागण्यातून आणि बोलण्यातून दिसत दिसून येते. हे राजे अत्यंत दयाळू आहेत. त्यांनी त्यांच्या संपत्तीचा बराचसा भाग हा लोक कल्याणासाठी दान केलेला आहे असे आमच्या गाईडने सांगितले. पूर्वी 12 वर्षातून एक दिवस हा संपत्तीचा दान करण्यासाठी ठरवला असे. परंतु राजाचे वंशज आता दरवर्षी संपत्ती दान करतात व बरेच लोकोपयोगी व लोक कल्याणासाठी ते आपला निधी, जमीन व संपत्ती देत असतात, असे आम्हाला गाईडने सांगितले.
      चला तर मग मी तुम्हाला माझ्या नजरेतून सिटी पॅलेसची सफर घडवून आणते...!!!
     सिटी पॅलेसचा भव्य दरवाजा या दरवाजाची उंची अशी आहे की त्यातून हत्ती सहजपणे आत बाहेर येऊ जाऊ शकेल.
दरवाजा

     ही महाराणा प्रताप यांची(मेवाड राजवंशाची) राजमुद्रा आहे.
राजमुद्रा

      यामध्ये भिल्लांची मुद्रा आहे. भिल्ल लोकांचे स्थान महाराणा प्रताप यांच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचे आहे. गुरिल्ला लढाई लढत असताना येथील अरवली पर्वतरांगांमध्ये राहणारे भिल्ल लोकांनी महाराणा प्रताप यांची अतिशय साथ दिली. व महाराणा प्रताप देखील त्यांच्याशी मनाने अतिशय जोडले गेले होते. त्यामुळे राज परिवारामध्ये आज देखील या लोकांना अतिशय मान दिला जातो. जेव्हा कधीही लग्नकार्य वगैरे असते तेव्हा त्यांना आग्रहाचे निमंत्रण असते व सन्मानित केले जाते असे गाईडने आम्हाला सांगितले. महाराणा प्रताप यांनी स्वतः वापरलेली शस्त्रे आहेत. फोटोत दिसणारी तलवार 35 किलो ची आहे असे गाईडने आम्हाला सांगितले.
     स्वत: महाराणा प्रताप यांनी वापरलेली शस्त्रे- तलवार, शिरस्त्राण,बाण इ.
फोटो 1
फोटो क्र.1

फोटो 2
फोटो क्र.2

फोटो 3
फोटो क्र.3

     जाळीदार दरवाजा यातून राजस्त्रीया बाहेरचे पाहू शकत
फोटो क्र.1

     प्रांगण
फोटो क्र.1

     पूर्वी कबुतरांच्या मार्फत संदेशवहन होत असे अशा कबुतरांचा पिंजरा
.

शिशमहल
फोटो 1
.

फोटो 2
.

     पेंटींग्जचे दालन- येथील पेंटींग्ज 300 वर्षापेक्षाही जास्त जूनी असून अशा प्रकारच्या चित्रशैलीला काही नाव होते ते मी विसरले. यातील रंग अस्सल असून खरे सोने व चांदी वापरली आहे त्यामुळे हे खूप टिकाऊ आहेत.
फोटो 1
.

फोटो 2 हल्दीघाटी युद्धाचा प्रसंग व इतर पेंटींग्ज
.

फोटो 3
.

फोटो 4
.

     पॅलेसच्या खिडकितून दिसणारे लेक पिचोलाच्या मध्यावर असणारे हॉटेल ताज
.

पॅलेसच्या खिडकितून दिसणार शहराचे व अरवली रांगांचे दृश्य-
.

रंगमहाल
फोटो 1
.

फोटो 2
.

सारीपाट खेळ
.

     या सज्जात बसून राण्या खालील प्रांगणात होणारे नृत्य इ. पाहत असत.
.

     ही त्याकाळात पॅलेसमध्ये असणारी लिफ्ट आहे.
.

     हे राजे सूर्यवंशी होते. पावसाळ्यात सूर्याचे दर्शन झाले नाही तर इथे पूजा करत असत.
.

     याच प्रांगणात घुमर इ. नृत्य केले जाते.
.

     राजाची जेवण्याची खोली
.

     स्वयंपाकाची भांडी
फोटो 1
.

फोटो 2
.

फोटो 3
.

     हेच ते राजप्रासादातील प्रांगण जिथे ईशा अंबानीचा साखरपुडा झाला होता.
फोटो 1
.

फोटो 2
.

फोटो 3
.

     येथे प्राचीन काळातील भंग झालेल्या शिल्पांचे एक प्रदर्शन आहे
फोटो 1
.

फोटो 2
.

     आता चांदिच्या वस्तुंचे दालन सुरु होते –
      यात लग्नाचा मंडप,हुक्का,मुद्रीका,सिंहासन खेळणी, बुद्धीबळ, द्यूत, खलिते, पूजेच्या वस्तू इ. दिसून येतात.
फोटो 1
.

फोटो 2
.

फोटो 3
.

फोटो 4
.

फोटो 5
.

फोटो 6
.

फोटो 7
.

फोटो 8
.

फोटो 9
.

फोटो 10
.

फोटो ११
.

     संपूर्ण पॅलेस बघून झाल्यानंतर पॅलेसच्या एंट्रन्स ला डाव्या हाताला सिटी पॅलेस मार्फत चालवली जाणारी काही दुकाने आहेत. ज्यामध्ये आम्हाला गाईडने नेले. इथे सीताफळाच्या धाग्यापासून, केळीच्या धाग्यांपासून, उसाच्या चिपाडापासून बनवली जाणारी साडी, रजाई अशा प्रकारच्या वस्तू आहेत. तसेच काही ज्वेलरी आयटम्स पण आहेत. येथील साड्या व ज्वेलरी काही काळानंतर वापरायची नसल्यास इथे परत पाठवली तर 50 टक्के रक्कम परत केली जाते. आम्हाला रजई,साडी व बांगड्या आवडल्या म्हणून आम्ही खरेदी केले.
     आता आमचा सिटी पॅलेस फिरून पूर्ण झाला होता. जेवणाचे काय करायचे याबद्दल आम्ही विचार करू लागलो. गाईडने आम्हाला सांगितले की इथेच पॅलेस च्या आत मध्येच एक रेस्टॉरंट आहे. तिथे दाल बाटी चुरमा मिळतो. तुम्हाला खायचे असेल तर इथे खा किंवा बाहेर पण चांगले रेस्टॉरंट्स आहेत. आम्ही असा विचार केला की सिटी पॅलेस मध्ये पारंपारिक पद्धतीने डाळ बाटी चुरमा आपल्याला मिळेल. त्यामुळे इथेच जेवायचे ठरवले. आम्ही अकरा वाजता इथे आलो होतो आता जवळपास चार वाजत आले होते इथल्या रेस्टॉरंट मध्ये रुपये 150 मध्ये डाळ बाटी चुरमाची थाळी मिळते. ती आम्ही घेतली. मी पहिल्यांदाच डाळ बाटी चुर्मा खात होते. चुरमा अतिशय चविष्ट लागला.परंतु डाळ काही इतकी ठीक वाटत नव्हती. फार काही ग्रेट वाटले नाही मला. मुलाला आणि नवऱ्याला मात्र चव आवडली.
थाळी –
.

     आता आम्हाला करणी माता मंदिर ला जायचे होते. त्यामुळे आम्ही रिक्षा केली. खरेदी केलेले सामान रूमवरती टाकले आणि आम्ही करणी माता मंदिर कडे प्रस्थान केले. सिटी पॅलेस पासून करणी माता मंदिर चे तिकीट काउंटर साधारण अडीच ते तीन किलोमीटर असेल. तिकीट काउंटर वर पोहोचलो. माणशी साधारण 115 रुपये असे तिकीट होते. तीन तिकीट घेऊन आम्ही रोपवेच्या स्टार्टिंग पॉइंटवर पोचलो. रोपवेने करणी माता मंदिर वर पोहोचायला साधारण पाच ते सात मिनिटे लागतात. खालून वरती जाताना संपूर्ण उदयपूर शहराचे विहंगम असे दृश्य दिसते. करणी माता मंदिर हे डोंगरावर आहे ,त्यामुळे डोंगरावरील हिरवाई आणि खाली तलावाकाठी वसलेले उदयपूर शहर हे दृश्य कितीही वेळा डोळ्यात साठवले तरी मन भरत नव्हते. येथील काही फोटो-
फोटो 1
.

फोटो 2
.

फोटो 3
.

      करणी माता येथे मंदिर येथे पोहोचल्यानंतर तिथून आजूबाजूला अनेक विहंगम दृश्य दिसत होते. रोपवेतून उतरल्यावर मंदीराकडे जाताना वाटेत आम्हाला राजस्थानी पारंपारिक वेशभूषा मध्ये फोटो काढून देणारे लोक भेटले. करणी माता मंदिर येथे आम्हाला साधारण एक तास तरी लागणार होता. त्यामुळे आम्ही येथे फोटो काढून घ्यायचे ठरवले. एका माणसाचा फोटो काढायचा असेल तर शंभर रुपये, दोन माणसांचा फोटो असेल तर २०० रुपये आणि एका फोटो तीन माणसे असतील तर तीनशे रुपये अशा पद्धतीचे त्यांचे चार्जेस होते. आम्ही त्या पारंपारिक वेशभूषेमध्ये अनेक फोटो काढले. काही सिलेक्ट केले आणि परत जाताना ते आम्हाला प्रिंट काढून देणार होते व सॉफ्ट कॉपी सुद्धा देणार होते.
मुलाचा फोटो
.

     करणी माता मंदिर हे नवसाला पावणाऱ्या देवीचे मंदिर आहे. देवीच्या गाभाऱ्यामध्ये फोटोग्राफी परवानगी नसल्यामुळे मी देवीचे फोटो काढले नाही. वीस पंचवीस मिनिटे आम्ही मंदिर परिसरात बसून होतो. बहुदा देवीच्या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम चालू होते. बरेच बांधकामाचे साहित्य आजूबाजूला पडले होते.
     मंदीर परिसर फोटो
फोटो 1
.

     आता आम्ही परत निघायचे ठरवले. संध्याकाळचे सहा वाजले होते. आम्हाला परत लेक पीचोला मध्ये बोटिंग करायचे होते. परंतु उतरत असतानाच आम्हाला एक मोठा सज्जासारखा भाग दिसला. जिथे बरेचसे बाकडे टाकले होते. काही खाद्यपदार्थांचे स्टॉल होते आणि बाजूलाच एक स्वच्छ असे प्रसाधन गृह पण होते. हा एक व्यू पॉईंट होता. इथून अगदी समोरून आम्हाला अरवली पर्वतरांगांमध्ये सूर्यास्त होताना दिसत होता.
     हे दृश्य मी वर्णन करू शकणार नाही इतके सुंदर होते!! समोर मला विस्तीर्ण असा उदयपूर शहराचा नजारा दिसत होता आणि मागे अरवली पर्वतरांगातून अस्ताला जाणारा सूर्य!! कितीही डोळ्यात साठवले तरी मन भरत नव्हते. इथे अनेक विदेशी पर्यटक बाकड्यावरती बसून सूर्यास्ताचा आस्वाद घेताना दिसत होते. इतक्या दिवसाच्या वाचनामध्ये या स्थळाबद्दल कोणताही उल्लेख मी वाचलेला नाही. परंतु उदयपूर सहलीतला मी पाहिलेले सर्वात अप्रतिम असे हे स्थळ होते. हा सूर्यास्त अजिबात चुकवला नाही पाहिजे असेच मी म्हणेन. इथे पाहिलेला सूर्यास्त हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम सूर्यास्त पैकी एक होता. आम्ही तिथल्याच एका स्टॉल वरून मॅगी व मोजीतो घेतला आणि समोरच्याच बाकड्यावर बसून आम्ही सूर्यास्ताचा आस्वाद घेतला.
फोटो 1
.

फोटो 2
.

फोटो 3
.

फोटो 4
.

.

     साधारण अर्धा तासामध्ये सूर्यास्त झाला आणि आम्ही रोपवे मधून खाली उतरू लागलो. खाली उतरत असताना उदयपूर शहरांमध्ये झालेली रोषणाई दिसत होती. खाली उतरतानाचे दृश्य सुद्धा अप्रतिम होते. याचे काही फोटोज-

.

.

     खरोखर आजचा दिवस आणि करणी माता मंदिरातून पाहिलेला सूर्यास्त, यांनी आम्ही इतके खुश झालो होतो, की उदयपूर सहलीची इथेच सांगता झाली असती तरी चालले असते. इतके आमचे मन तृप्त झाले होते. गव्हर्मेंट बोटींग बंद झालेले होते. त्यामुळे आम्ही गणगौर घाटावरती जायचं ठरवले.
     आम्ही गणगौर घाटाकडे गेलो कारण तिथल्या वातावरणाच्या प्रेमातच आम्ही पडलो होतो. जवळपास तासभर आम्ही तिथे तळाच्या पाण्यामध्ये पाय सोडून बसलो. आता उद्याच्या दिवसाचे नियोजन आम्हाला करायचे होते. मी हॉटेलच्या मालकाला फोन लावून कुंभलगड हल्दीघाटी येथे जाण्यासाठी टॅक्सीबद्दल विचारले तर त्याने त्याचा जो ड्रायव्हर ठरवला होता त्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्यामुळे तो येणार नाही असे कळवले.
     आता मात्र मला टेन्शन आले की आता कसं करायचं? शेवटी आम्ही दुपारी ज्या रिक्षावाल्याच्या रिक्षा मधून गेलो होतो, त्याला फोन लावला आणि त्याला विचारलं की बाबा तुझ्या ओळखीचा कोणी आहे का? तेव्हा त्याने त्याच्या गल्लीतच राहणाऱ्या एका माणसाचा नंबर दिला. त्या ड्रायवरने एकलिंगजी,नाथाद्वारा हल्दीघाटी आणि कुंभलगड हे एका दिवसात करू शकता आणि त्याचे त्यांनी 3200 रुपये वीथ टोल आणि पार्किंग असे सांगितले. मी त्याला सांगितले की उद्या फक्त एकलिंगजी,सासबहु मंदीर व हल्दीघाटी करायचे आहे. नाथाद्वाराला वेळ मिळाला तरच जायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला राणकपुर आणि कुंभलगड करायचं आहे. त्यावर त्याने सांगितले की दोन्ही दिवसाचे साधारण मिळून सात हजार रुपये भाडे होईल.
     मग मी जस्ट डायल आणि इतर ठिकाण फोन करून विचारले तर त्यांनी तर अजून जास्त रकमेची कोटेशन दिली. शेवटी मी विचार केला जर एका दिवसामध्ये कुंभलगड एकलिंगी हल्दीघाटी ही ठिकाणी कव्हर होत आहेत तर केवळ राणकपूरसाठी परत एक दिवस गाडी न करता जेव्हा माउंट आबुला जायचं आहे तेव्हा राणकपुर पाहता येईल. त्यामुळे मी पहिल्याच ड्रायव्हरला फोन करून सकाळी सात वाजता यायला सांगितले व तीन हजार दोनशे रुपये मध्ये दिवसभराची ट्रिप फिक्स करून टाकली. गणगौर घाटावरती 1 तास बसून आम्ही रूमवरती परत आलो. मोजीतो आणि मॅगी खाल्ली होती त्यामुळे भूक अशी काही नव्हती . आम्ही गेल्यानंतर पनीर चिली ऑर्डर केली आणि तेवढेच खाऊन आम्ही झोपी गेलो. उद्या आम्हाला सात वाजता तयार राहायचे होते, म्हणजेच किमान सहा वाजता तरी उठावे लागणार होते. त्यामुळे आम्ही लगेच झोपी गेलो. क्रमशः

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

6 Dec 2022 - 4:24 pm | कुमार१

सुंदर फोटो व वर्णन..

श्वेता२४'s picture

6 Dec 2022 - 4:53 pm | श्वेता२४

कुमार सर.

धर्मराजमुटके's picture

6 Dec 2022 - 9:00 pm | धर्मराजमुटके

मराठी मनात महाराजांचे जे स्थान आहे तेच राजस्थानी जनतेत महाराणा प्रताप यांचेबद्द्ल आहे. हल्दीघाटी ची लढाईवर आधारीत 'हल्दीघाटी मे समर लड्यो' गीत अतिशय प्रसिद्ध आहे. एकदा वेळ काढून जरुर ऐका.
हिंदी अनुवादित गीत
मुळ मारवाडी भाषेतील गीत

श्वेता२४'s picture

6 Dec 2022 - 9:18 pm | श्वेता२४

महाराणा व महाराजांबद्दल अगदीच योग्य बोललात. दोन्ही गीते ऐकली. लाइव्ह गाणं जास्त आवडलं.

प्रचेतस's picture

8 Dec 2022 - 6:28 am | प्रचेतस

मस्त लिहिताय तुम्ही.
सिटी पॅलेस अत्यंत वैभवशाली दिसतोय. शीशमहल तर अगदी भन्नाट आहे.

श्वेता२४'s picture

8 Dec 2022 - 7:12 am | श्वेता२४

प्रचेतसजी

टर्मीनेटर's picture

8 Dec 2022 - 11:10 am | टर्मीनेटर

जेब्बात! मस्त, हा भागही आवडला 👍

'व्हेनिस ऑफ ईस्ट' म्हणून ओळखले जाणारे 'उदयपूर' हे तलावांचे शहर मला फार आवडते. काय ते तिथले भूमिगत बोगद्यांनी जोडलेले मोठमोठे तलाव, काय त्या देखण्या हवेल्या आणि महाल, आणि काय तिथले विविध 'पोळ' (शहराची प्रवेशद्वारे) सगळंच भारी!

"जगमंदिर हे लेक पिचोलाच्या मधोमध असणाऱ्या बेटांपैकी एक असून तेथे आधी राजाचा महाल होता. परंतु आता हा महाल एका फाईव्ह स्टार हेरिटेज हॉटेलमध्ये रूपांतरित करण्यात आला आहे."

जगत सिंग द्वितीय ह्यांनी १७४३ साली बांधलेलया 'जगमंदिर' (जग निवास) ह्या महालाचे १९५० साली 'ताज लेक पॅलेस' नामक फाईव्ह स्टार हेरिटेज हॉटेलमध्ये रूपांतर करण्यात आले. १९८३ साली आलेल्या 'ऑक्टोपसी' ह्या बॉंडपटातील बऱ्याच दृश्यांचे चित्रीकरण ह्या महालात झाले होते. (हा महाल ऑक्टोपसीचे घर म्हणून दाखवण्यात आला होता 😀)

"चुरमा अतिशय चविष्ट लागला.परंतु डाळ काही इतकी ठीक वाटत नव्हती. फार काही ग्रेट वाटले नाही मला. "

सेम पिंच 😀 मलाही 'दाल-बाटी' आवडत नाही.

"जाळीदार दरवाजा यातून राजस्त्रीया बाहेरचे पाहू शकत"

हा फोटो तुम्ही मोठ्या स्क्रीनवर (लॅपटॉप किंवा डेस्कटॉपच्या) किंचित वेगात अप-डाऊन स्क्रोल करून पाहिलात तर तुम्हाला त्यातला 3D इफेक्ट जाणवेल. असे करून त्या जाळीची छिद्रे आणि त्यांच्या पलीकडे दिसणारे जादुई दृश्य (Illusion) पहाच! अतिशय योग्य कोनातून हा फोटो काढला गेलाय असे म्हणतो 👍

"कुंभलगड एकलिंगी हल्दीघाटी ही ठिकाणी कव्हर होत आहेत तर केवळ राणकपूरसाठी परत एक दिवस गाडी न करता जेव्हा माउंट आबुला जायचं आहे तेव्हा राणकपुर पाहता येईल."

योग्य निर्णय! तुम्ही कुंभलगड, हल्दीघाटी आणि राजस्थानचे 'मिनी खजुराहो' म्हंटले जाणारे सासबहु (सहस्त्र बाहु) मंदीर हि ठिकाणे आवर्जून बघितलीत त्यासाठी तुमचे विशेष अभिनंदन आणि राणकपूरही पाहिले असेलच हि अपेक्षा. हल्दीघाटीमध्ये महाराणा प्रतापांचे कसले सुंदर स्मारक स्मारक उभारलंय! छत्रपती शिवाजी महाराजांचेही असेच सुंदर स्मारक महाराष्ट्रात व्हावे अशी खूप इच्छा आहे.
आता हल्दीघाटी,कुंभलगड, चितौडगड व सहस्त्र बाहु मंदीर तुमच्या नजरेतून पुन्हा अनुभवायचे आहेत, तेव्हा भरपुर फोटोंसहीत पुढचे भाग लवकर येउद्यात 👍

श्वेता२४'s picture

8 Dec 2022 - 12:00 pm | श्वेता२४

विस्तृत प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद. जाळीच्या दरवाज्याचा फोटो योगायोगाने योग्य कोनातून काढला गेलाय. नाहीतर मी फोटो काढण्यात काही एक्सपर्ट नाही. पण या सहलीच्या निमित्ताने फोटो काढण्यामध्ये सुधारणा झालीय एवढं नक्की. पुन:श्च धन्यवाद. पुढचा भाग उद्यापर्यंत नक्की टाकण्याचा प्रयत्न करेन.

गोरगावलेकर's picture

9 Dec 2022 - 12:15 pm | गोरगावलेकर

पूर्वी पाहिलेल्या सिटी पॅलेसच्या आठवणी ताज्या झाल्या

राजेंद्र मेहेंदळे's picture

16 Dec 2022 - 12:32 pm | राजेंद्र मेहेंदळे

३ डी ईफेक्ट बद्दल वाचुन परत वरती गेलो आणि जाळीचा फोटो वेगाने स्क्रोल करुन पाहीला. खरेच तसा भास होत आहे.

कर्नलतपस्वी's picture

16 Dec 2022 - 2:49 pm | कर्नलतपस्वी

पहिल्यांदाच डाळ बाटी चुर्मा खात होते. चुरमा अतिशय चविष्ट लागल.
टुरिस्ट प्लेस मधे व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून वस्तू,पदार्थ विक्रीस उपलब्ध आसतात. प्रवाश्यांची मानसिकता आणी त्यांच्याकडे असणारी माहीती व वेळ याचा व्यापारी वर्ग पुरेपूर वापर करतात. प्रत्येक वस्तू पदार्थ अस्सल म्हणून विकतात. दाल बाटी एक खुप चांगली व श्रीमंत पदार्थ आहे. बनवण्यास खुप वेळा लागतो जो व्यावसायिक देऊ शकत नाही. आणी हे सर्व ठिकाणी अनुभवास येते.

राजस्थानी पारंपारिक वेशभूषा मध्ये फोटो काढून देणारे

जवळपास सर्वच ठिकाणी हा प्रकार दिसतो. आग्र्याला ताजमहाल चिमटीत उचलला आहे असा फोटो काढून मीळतो. सहेली की बाडी मधे सुद्धा बरेच फोटोग्राफर सावज हेरताना दिसतील.

राजस्थानी कलाकुसरीच्या वस्तूंची दुकाने

जयपुर ला गेलो होतो तेव्हा ड्रायव्हर आम्हाला ऐम्पोरीयम मधे घेऊन गेला. सौ. ना साडी आवडली सातशे रूपये देऊन घ्यायला लागली. खिशाला खुप मोठे भगदाड पडले. अलवरला परत आल्यावर त्या साडीची खरी किंमत तीनशे रूपये आहे कळाली. तेव्हापासून अशा ठिकाणी कुठलीच खरेदी करणार नाही आशीशपथ सौंनी घेतली. चारशे गेले पण त्याचा फायदा आजही होत आहे.

आपण केलेले वर्णन वाचताना जुन्या आठवणी वर येतात व शेअर कराव्याशा वाटतात. धन्यवाद.

तसेच अबू रोड स्टेशनवर रबडीची धुमधडाका होणारी विक्रीही थंडावली आहे.
नव्या पिढीला चटकमटक पदार्थ आवडतात.

अनिंद्य's picture

20 Dec 2022 - 11:11 am | अनिंद्य

सुंदर !

लेकसिटी उदयपूर आवडते शहर आहे, राजस्थानचे व्हेनिस :-)

श्वेता२४'s picture

20 Dec 2022 - 5:17 pm | श्वेता२४

@अनिंद्य
@कर्नलतपस्वी
प्रतिसादाबद्दल धन्यवाद

चौथा कोनाडा's picture

21 Dec 2022 - 8:03 pm | चौथा कोनाडा

व्वा, खुप सुंदर फोटो व वर्णन..

श्वेता२४'s picture

21 Dec 2022 - 9:43 pm | श्वेता२४

प्रतिसादाबद्दल धन्यवाद

श्वेता व्यास's picture

16 Jan 2023 - 12:21 pm | श्वेता व्यास

सिटी पॅलेस मस्तच दिसतोय, बुद्धिबळाच्या सोंगट्या खूप आवडल्या.
छान सफर घडवून आणलीत.

श्वेता२४'s picture

16 Jan 2023 - 12:37 pm | श्वेता२४

प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.

चंद्रसूर्यकुमार's picture

18 Jan 2023 - 12:48 pm | चंद्रसूर्यकुमार

सुंदर.

करणीमातेचे मंदिर म्हणजे ते उंदीर असलेले मंदिर ना? तिकडचे उंदीर कितीही शुभ आणि पवित्र मानले जात असले तरी इतके उंदीर आपल्या आजूबाजूला वावरणार आणि त्यातील काही अंगावरही चढणार ही कल्पनाही आवडली नाही म्हणून तिथे गेलो नव्हतो.

श्वेता२४'s picture

18 Jan 2023 - 6:02 pm | श्वेता२४

नूतनीकरणाचे काम चालू होते. एकही उंदीर दिसला नाही.