दिवाळी अंक २०२२ - जबरदस्त आणि बिनधास्त - जवाई बांध आणि बेराचे बिबटे

एक_वात्रट's picture
एक_वात्रट in दिवाळी अंक
5 Nov 2022 - 9:21 am

राजस्थान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात राजवाडे, मंदिरं, किल्ले, छत्र्या, हवेल्या आणि बावड्या. आपल्या जंगलांसाठी काही राजस्थान प्रसिद्ध नाही - त्यामुळे बिबट्या पाहायला आम्ही राजस्थानात चाललो आहोत असं मी जेव्हा लोकांना सांगितलं, तेव्हा अनेकांनी कान टवकारले. पण राजस्थानातल्या जवाई बांध आणि बेरा ह्या गावांमध्ये बिबटे आणि मनुष्यगण गेली अनेक वर्षं गुण्यागोविंदाने, आपला दुसर्‍याला अजिबात त्रास न होऊ देता एकत्र राहत आहेत. विशेष म्हणजे हे सगळे बिबटे जपलेत इथल्या गावकऱ्यांनी. वन्यजीव आणि मनुष्य यांचं सहजीवन किती सोपं आणि सुंदर असू शकतं, याचं बेरा हे एक उत्तम उदाहरण आहे.

रणथंबोर इथं वाघ किंवा काझीरंगा इथं गेंडा दिसावा तितक्या सहजपणे इथं बिबट्या दिसतो. मी म्हणेन, बिबट्या त्याच्या नैसर्गिक अधिवासात पाहण्याची ही भारतातली सर्वोत्कृष्ट जागा आहे.

ह्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात आम्ही बेराला भेट दिली, हे त्याचंच प्रवासवर्णन आहे.


२२ फेब्रुवारीकोरोना महामारीमुळे प्रवास कमी झाल्याने आणि आजकाल एकूणच विमानप्रवासाला पहिली पसंती मिळत असल्याने अनेक महिन्यांनी पुणे रेल्वे स्टेशनवर जाण्याचा योग आला.


संध्याकाळी ६:५०च्या जोधपूर एक्स्प्रेसने आम्ही पुण्यातून निघालो. प्रवास अगदी छान झाला असला, तरी कोरोना महामारीच्या काळात बंद केलेली पांघरूण सेवा रेल्वेने पुन्हा सुरु केलेली नसल्याने आम्हाला रात्र मात्र कुडकुडत काढावी लागली!


सकाळी कुठेतरी काढलेला एक फोटो!


२३ फेब्रुवारीजवाई बांध स्टेशनावर आम्ही पोहोचलो सकाळी साधारण अकरा वाजता. हे एक चिमुकलं, खूपच गोड स्टेशन आहे. स्टेशनच्या बाहेर एखाददुसरी चहाची टपरी, तीन-चार दुकानं, काही रिक्षा आणि आरामात गप्पा छाटत बसलेले गावकरी, असा एकंदर मामला होता. थोड्या वेळानं रिसॉर्टची गाडी आम्हाला न्यायला आली आणि आम्ही निघालो. प्रवास काही मोठा नव्हता, आमचं रिसॉर्ट रेल्वे स्टेशनपासून पंधरा-सोळा किलोमीटर दूर असावं.


बेरा किंवा जवाई बांध इथे जागेची कमतरता नसल्याने इथली रिसॉर्टस् विशाल जागेवर पसरलेली आहेत, आमचं रिसॉर्टही अर्थात याला अपवाद नव्हतं. मला आवडलेली एक गोष्ट म्हणजे, मूळ जागेत फारसा बदल न करता, तिथली झाडं वगैरे न कापता हे रिसॉर्ट उभारण्यात आलं होतं. राहण्यासाठी इथं तंबूंची सोय होती.


तंबूंपासून जवळच असलेल्या चार-पाच मोठ्या झाडांखालची जमीन सावरून तिथे लोकांना बसण्यासाठी काही खुर्च्या टाकण्यात आल्या होत्या. इथे बसलेले आमच्या सहलीतले काही ज्येष्ठ नागरिक.

अंघोळी करून, जेवून आणि नंतर थोडी झोप घेऊन आम्ही तयार झालो. तुमची गाडी बाहेर येऊन थांबली आहे असा निरोप येताच निघालो. आम्ही ज्या कंपनीकडून सफारी सेवा घेतली होती, त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या गाडीत चालकाबरोबर एक गाइडही असतो. त्यामुळे ‘एक से भले दो’ या उक्तीनुसार चालक आणि गाइड या दोघांच्या अनुभवाचा फायदा तुम्हाला मिळतो (ज्याचा प्रत्यय आम्हाला पुढे अनेकदा आला.)


रिसॉर्टच्या बाहेर पडल्यापडल्या आम्हाला दिसले दोन तितर पक्षी.


हे दोन नर होते आणि चक्क भर रस्त्यात फिल्मी स्टाइलने मारामारी करत होते.


त्यांच्या मारामारीचा निर्णय काय होतो हे पाहण्यासाठी आम्ही काही थांबलो नाही.

थोडा वेळ इकडे-तिकडे फिरल्यानंतर आम्ही पोहोचलो एका टेकडीजवळ. आमच्या चालकाने त्या टेकडीकडे तोंड करून आमची गाडी उभी केली आणि आम्ही समोर पाहत बसलो. ह्या टेकडीच्या परिसरात मागचे काही दिवस एका बिबट्याचा वावर असल्याची माहिती त्यांना मिळाली होती आणि त्यामुळे आम्ही इथे थांबण्याचा निर्णय घेतला होता.


आमचा हा निर्णय योग्य होता, हे थोड्याच वेळात सिद्ध झालं, कारण सुमारे दहा ते पंधरा मिनिटे दुर्बिणीने समोरचा डोंगर पिंजून काढल्यावर आमच्या चालकसाहेबांना शेवटी तिथे दाट झाडीत लपलेला बिबट्या दिसला.


अर्थात, तो आम्हाला दुर्बिणीतून दिसायला पुढची दहा मिनिटं जावी लागली. हे महाशय इतक्या दाट झाडीत लपले होते की चालक आणि गाइड नसते, तर समोरच्या टेकडीवर बिबट्या आहे हे सांगितल्यावरही तो आम्हाला सापडला नसता.


काही वेळातच ही बातमी सगळीकडे पसरली आणि झाडून सगळ्या गाड्या त्या टेकडीकडे निघाल्या. हा एवढा गोंधळ पाहून बिबट्या तिथून निघून जातो की काय अशी भीती आम्हाला वाटत होती, पण सुदैवाने तसं काही झालं नाही.


बिबट्याला बहुतेक या सगळ्या गोंधळाची सवय झाली असावी, कारण पंधरा-वीस गाड्या समोर दिसत असूनही तो काहीच प्रतिक्रिया देत नव्हता.
सुमारे पंधरा ते वीस मिनिटं तिथे थांबल्यावर शेवटी बिबट्या कंटाळून तिथून निघाला. एव्हाना प्रकाशही बराच कमी झाला असल्यामुळे त्याच्या मागे फिरण्यात काही अर्थ नव्हता, तेव्हा आम्हीही तिथून निघालो. चला, सफरीची सुरुवात तर एकदम झकास झाली होती!


रिसॉर्टकडे परत जाताना आपल्या शेळ्या आणि मेंढ्या गावाकडे परत येणारे काही रबारी आम्हाला दिसले. रबारी ही गुजरात आणि राजस्थानमधली एक भटकी जमात आहे. त्यांच्याविषयी जास्त माहिती इथे (https://www.atlasofhumanity.com/rabari) वाचता येईल.


२४ फेब्रुवारी


सकाळच्या सफारीची वेळ सहाची असल्यामुळे आम्ही धडपडत साडेपाचला उठलो, थोडंसं आवरलं, खोल्यांना कुलपं घातली आणि निघालो. गाइड आणि चालक दहा मिनिटं आधीच येऊन थांबले होते. आज आम्ही पुन्हा एकदा गेलो ते कालच्या टेकडीकडेच. तिथे बराच वेळ घालवल्यावर आम्ही रेल्वे मार्ग ओलांडून पलीकडे जायचा निर्णय घेतला. जवाई बांध आणि बेराचा परिसर हम्पीची आठवण करून देणार आहे, त्याच त्या चारही बाजूंना दिसणार्‍या लहानमोठ्या टेकड्या, तेच ते इकडे-तिकडे पसरलेले भलेमोठे दगड आणि तीच ती मध्ये मध्ये उगवलेली खुरटी झाडं (इथे फक्त एका तुंगभद्रेची कमतरता होती!)


इथे चालकाने आमची गाडी चढवली एका भल्यामोठ्या दगडावर.


सपाट असा हा दगड जवळपास दोनेकशे मीटर पसरला असावा.आकाशात चंद्रोदय झाला होता.थोड्याच वेळात सूर्योदयही झाला.


इथे आम्हाला एक सुंदर पक्षी दिसला. (नाव माहीत नाही)बिबट्या अशाच एखाद्या गुहेत लपला असण्याची शक्यता होती.


बराच वेळ तिथे घालवल्यावर आम्ही निघालो. वाटेत आम्हाला काही नीलगाई दिसल्या.


थोडं पुढे गेल्यावर आम्हाला चिमणीसारखे दिसणारे काही पक्षी दिसले.


नंतर आम्ही गेलो दगडखाणीजवळ. ही खाण काही दिवस चालू असली, तरी इथल्या गावकऱ्यांनी आणि पर्यटनावर उपजीविका असणाऱ्या स्थानिकांनी विरोध केल्यावर ती बंद करण्यात आली. या खाणीच्या परिसरात मागचे काही दिवस नीलम नावाची मादी आणि तिची दोन पिल्लं यांचा वावर असल्याची माहिती आमच्या गाइडने दिली. पण बराच वेळ घालवूनही नीलमने किंवा तिच्या पिल्लांनी आम्हाला दर्शन दिलं नाही. जवळच एक पळस दिमाखात फुलला होता. पळसाला इंग्लिशमध्ये ‘फायर ऑफ द फॉरेस्ट’ असं का म्हणतात, ते त्याच्या लालभडक फुलांकडे पाहिलं की सहज लक्षात येत होतं.

आज दुपारच्या सफारीत, ज्या धरणावरून ‘जवाई बांध’ हे नाव ह्या गावाला मिळालं, त्या धरणाला भेट द्यायची होती. त्यामुळे आज तीनऐवजी दोनलाच तयार रहा असं आमच्या गाइडने आम्हाला सकाळी सांगितलं होतं, त्यानुसार आम्ही तयार राहिलो.

जवाई बांध हे धरण खूप जुनं आहे. जोधपूरच्या उमेद सिंग यांनी हे बांधलं. धरणात फारसं पाणी नव्हतं - गेली तीन-चार वर्षं फारसा पाऊस होत नसल्यामुळे हे धरण पूर्णपणे भरतच नाही, अशी माहिती आमच्या गाइडने दिली. पाणी कमी असल्याने धरणाच्या अगदी आतपर्यंत गाडी जाते. आम्ही पाण्याजवळ गेलो, तर तिथल्या चिखलात काही लोक कलिंगड लावत होते. ‘इथे पेरणीचं काम चालू आहे, इकडे या भागात येऊ नका’ अशी त्यांनी आम्हाला सूचना दिली.


धरण मगरी, सुसरी आणि अनेक प्रकारचे पक्षी यांचं वसतिस्थान आहे.


दूरवर अनेक पक्षी दिसत होते, त्यात दोन फ्लेमिंगोही होते.किनाऱ्यावर येऊन मजेत ऊन खात पडलेल्या मगरीही अनेक होत्या.

दोनेक तास काढून आम्ही पुढे निघालो. बेरातल्या आतल्या रस्त्यांवर बराच वेळ प्रवास केल्यावर चालकाने एका जागी गाडी थांबवली आणि तो म्हणाला, "जरा सांभाळून बसा." समोर पाहिल्यावर दिसलं की आम्ही एका प्रचंड टेकडीच्या पायथ्याशी उभे होतो. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे चक्क गाडीत बसून आम्ही ही टेकडी चढून जाणार होतो. टेकडी बरीच उंच होती. अगदी आपल्या पर्वतीपेक्षा उंच असावी. गाडीत बसून ती टेकडी चढणं हा माझ्या आयुष्यातल्या अविस्मरणीय अनुभवांपैकी एक होता. अंगावर काटा यावा असा. टेकडीच्या टोकाशी पोहोचल्यावर आम्ही गाडीतून खाली उतरलो. काही फोटो काढले आणि परत निघालो.


उतरतानाचा अनुभव चढतानाच्या अनुभवापेक्षा अधिक भयानक होता.

हे ठिकाण पाहून झाल्यावर वेड्या बाभळी असलेल्या एका खडकाळ प्रदेशात आता चालकाने गाडी घातली. आम्ही आलो, तर अनेक गाड्या इथे आधीच येऊन थांबल्या होत्या आणि शांतपणे समोरच्या टेकडीकडे पाहत होत्या.

इथे २०-२५ मिनिटं थांबल्यावर अचानक कॅमेर्‍यांचा क्लिकक्लिकाट सुरू झाला. मी समोर पाहिलं, तर डाव्या बाजूने एक बिबट्या दगडांवरून चालत येत होता. तो चालत आला आणि अगदी त्याला बसण्यासाठीच खोदण्यात आला असावा अशा दगडावर आमच्यासमोर बसला.


एकाद्या राजाने दिमाखात आपल्या सिंहासनावर बसावं, तसाच तो त्या दगडावर बसला होता.


आणि एखाद्या राजाने अधूनमधून मान उंचावून दरबारात उपस्थित असलेल्या लोकांकडे पाहावं, तसा तो समोरच्या लोकांकडे पाहत होता.शेवटी अंधारामुळे बिबट्या दिसेनासा झाल्यावर आम्ही तिथून निघालो. आज सकाळी काही दिसलं नसलं, तरी संध्याकाळच्या सफारीने ती कसर शंभर टक्के भरून काढली होती.


२५ फेब्रुवारी


आजचा आमचा दिवस थोडा धकाधकीचा होता. सकाळची सफारी करून आज आम्हाला रनकपूरचं जैन मंदिर आणि कुंभालगड किल्ला ही दोन ठिकाणं पाहायची होती. आधीच्या एका सहलीत मी ही ठिकाणं पाहिली असली, तरी माझ्या सहप्रवाशांनी ती अजून पाहिली नव्हती.

पहाटे गाडी आली आणि आम्ही निघालो पुन्हा एकदा नीलम आणि तिच्या पिल्लांकडे. काल जरी त्यांनी आम्हाला हुलकावणी दिली असली, तरी आज त्यांचं दर्शन होईल अशी आशा आम्ही मनात बाळगून होतो.

पहाटेचा दाट अंधार असूनही नदीपात्रात आमच्या चालकाला हालचाल दिसली. त्याने बॅटरी मारल्यावर डोळे चमकले आणि नीलम आणि तिची पिल्लं तिथेच आहेत, हे स्पष्ट झालं.

हळूहळू प्रकाश वाढू लागला आणि नीलमची आकृती आम्हाला स्पष्ट दिसू लागली.नदीपात्रात कुणीतरी एक मेलेली म्हैस आणून टाकली होती आणि तिच्यावर नीलम ताव मारत होती.थोड्या वेळानं नीलम तिथून निघाली.


तिच्यापाठोपाठ तिच्या दोन पिल्लांनीही तिच्यामागे धाव घेतली.

सफारी आटपून रिसॉर्टकडे परत जाताना आम्हाला हा पोपट () दिसला.नंतर सकाळच्या कोवळ्या उन्हात अंग शेकणारे काही मोर नि लांडोरी दिसल्या.


नंतर दिसली ही बिलायत नावाची झडुपं. मला ही झाडं जाम आवडतात.


नंतर एका वायरीवर कवायती करणारे हे आणखी काही पोपट दिसले.


नंतर दिसली ही पोपटांची एक जोडी.


त्यांचं प्रणयाराधान चालू होतं, तेव्हा त्यांना अधिक त्रास न देता आम्ही पुढे निघालो.

रिसॉर्टवर पोहोचल्यावर अंघोळ किंवा नाश्ता असे दोन पर्याय आमच्यासमोर होते, आम्ही अर्थातच नाश्ता हा पर्याय निवडला. दहा वाजता गाडी आली आणि आम्ही रनकपूर जैन मंदिराकडे निघालो.

पंधराव्या शतकात बांधलं गेलेलं हे मंदिर भारतीय स्थापत्यकलेचा एक अद्वितीय नमुना आहे. मी म्हणेन की हे जगातलं सगळ्यात सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या जोत्याचीच उंची पंधराएक फूट आहे आणि ह्या जोत्याच्या वर तीन मजले आहेत. पूर्णपणे संगमरवर दगडात बनवलेल्या ह्या मंदिरात तब्बल १४४४ खांब आहेत आणि असं म्हणतात की ह्यातला एकही खांब दुसर्‍या खांबासारखा नाही. संपूर्ण मंदिरात बारीक कलाकुसरीची रेलचेल आहे आणि छतांवरचं कोरीवकाम तर अक्षरश: डोळ्यांचं पारणं फेडणारं आहे. आजचं तत्रज्ञान वापरून हे मंदिर बांधायचं म्हटलं, तरी सहज दमछाक होईल आणि तोंडाला फेफरं येईल, १५व्या शतकात हे मंदिर कसं बांधलं गेलं असेल?

कॅमेरा आत न्यायला पैसे असल्याने आणि मागच्या वेळी मनसोक्त छायाचित्रं काढली असल्याने या वेळी मी कॅमेरा आत नेला नाही.


२०१४ सालच्या सहलीत काढलेली काही छायाचित्रं -
रणकपूर जैन मंदिर पाहून आम्ही निघालो कुंभलगडाकडे. राजस्थानमधले रस्ते चांगले आहेत असं मी ऐकत आलो असलो, तरी प्रत्यक्षात मात्र ते रस्ते पाहून महाराष्ट्रातल्या रस्त्यांची आठवण होत होती. जेवण करून शेवटी तीनच्या आसपास आम्ही कुंभलगडाला पोचलो.

खरं सांगायचं, तर महाप्रचंड असा कुंभलगड किल्ला दोनेक तासात ‘बसवणं’ हा त्याचा शुद्ध अपमान आहे. हे म्हणजे ताजमहल पंधरा मिनिटांत उरकण्यासारखं आहे. पण असो. घड्याळात तीन वाजले होते आणि याचा अर्थ स्पष्ट होता - किल्ला पाहण्यासाठी आमच्याकडे फक्त दोन तास होते.

किल्ल्यात पाहण्यासारख्या अनेक वास्तू आहेत, चार-पाच सुंदर मंदिरंही आहेत.

कुंभलगडाची काही छायाचित्रं

कुंभलगडाची २०१४ सालच्या सहलीत काढलेली काही छायाचित्रं -

सव्वापाचच्या सुमारास आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो, आणखी एका सुंदर दिवसाची सांगता झाली.


२६ फेब्रुवारी


आजची सकाळची सफारी ही आमची ह्या सहलीतली शेवटची सफारी होती. गंमतीची गोष्ट म्हणजे ह्या सफारीत आम्हाला कुठल्याच प्राण्याने दर्शन दिलं नाही: पण आम्हाला ह्या गोष्टीची अजिबात खंत वाटली नाही. मागच्या चार सफारींमध्ये बिबट्यानं मनसोक्त दर्शन दिल्याने आमची मनं तृप्त झाली होती. एका जागी थांबून बिबट्याची वाट पाहण्याऐवजी आज आमची बेरा परिसरात स्वैर भटकंती चालू होती. किंचीतशी थंडी, पिकांच्या पार आत घुसलेलं धुकं, झाडांच्या शेंड्यांवर बसलेल्या पक्ष्यांचे कर्णमधुर आवाज, शेतांचे छोटेछोटे तुकडे, आणि ह्या शेतांमधून गेलेले अरुंद असे चिखलाने माखलेले रस्ते. बराच वेळ असं निरुद्देश फिरल्यानंतर आम्ही चहा प्यायला गेलो. सकाळसकाळ मस्त जंगल फिरून आल्यावर एक छानसा चहा पिण्याचा आनंद काय वर्णावा? सकाळी नि संध्याकाळीही सफारी झाल्यावर ह्या चहावाल्याकडं येणं हा आमचा रोजचा कार्यक्रम ठरून गेला होता. (किंमत? फक्त सात रुपये!)

सफारी झाल्यावर आम्ही हॉटेलला परत गेलो, पाच सुंदर सफारींमधे आम्हाला सोबत असलेल्या चालक आणि गाइड या दोघांना चांगली बक्षिशी दिली आणि त्यांचा निरोप घेतला.


परतीची रेल्वे संध्याकाळी पाचला असल्याने दुपारी जेवण करून जवळच्याच सुमेरपूर गावात जाऊन एक-दोन तास काढायचे आणि नंतर जवाई बांध रेल्वे स्टेशनवर पोहोचायचं, असं आजचं नियोजन होतं. जेवण करून एक वाजता आम्ही निघालो. सुमेरपूर हे एक तालुक्याचं ठिकाण आहे, आपल्या इथल्या सासवडसारखं. इथे पुण्यात नेण्यासाठी फरसाण आणि काही मिठायांची खरेदी झाली. आम्हाला खरं तर ‘घेवर’ ही राजस्थानची खास मिठाई हवी होती, पण अनेक दुकानं फिरुनही ती कुठेच मिळाली नाही. कारण विचारल्यावर ‘ती फक्त रक्षाबंधन सणासाठीच बनते’ अशी माहिती मिळाली. सुमेरपूरच्या बाजारपेठेतही एक फेरफटका झाला, तिथे मातीपासून बनवलेल्या हत्तींची आणि काही बांगड्यांची खरेदी झाली. रात्रीच्या प्रवासात खायला कचोरी, फळं, खाकरा असं थोडं सामान घेऊन आम्ही वेळेत जवाई बांध स्टेशनावर पोहोचलो. रेल्वे वेळेवर धावत होती. रेल्वेत बसल्यावर काही वेळाने जेवून घेतलं आणि आम्ही लवकर झोपी गेलो.


२७ फेब्रुवारी


थेट रेल्वे नसल्याने आमचा परतीचा प्रवास दोन टप्प्यांत होता. जवाई बांध ते दादर आणि तिथून पुणे. पुणे-मुंबई असा रेल्वे प्रवास अनेकदा केला असला, तरी चेअर कारने हा प्रवास मी अजूनही केला नव्हता. आज तो योग येणार असल्याने मी त्यासाठी उत्सुक होतो. अतिशय आरामदायक हा प्रवास करून साडेबाराच्या सुमारास आम्ही पुण्यात पोहोचलो आणि एका अतिशय सुंदर सहलीची सांगता झाली.

प्रतिक्रिया

कंजूस's picture

5 Nov 2022 - 7:53 pm | कंजूस

राणकपूर किती अंतरावर आहे?
आम्ही फलना ( स्टेशन) येथे सप्टेंबरात घेवर घेतले होते. म्हणजे रक्षाबंधन नुकतेच होऊन गेलेले.
कुंभालगड जायचे बाकी आहे.

एक_वात्रट's picture

15 Nov 2022 - 8:01 pm | एक_वात्रट

रणकपूर पन्नासेक किमी असावे. बेराहून रणकपूर, कुंभलगड आणि पुन्हा बेरा असा साधारण दोनेकशे किमीचा फेरा पडतो.

कंजूस's picture

5 Nov 2022 - 7:54 pm | कंजूस

राणकपूर किती अंतरावर आहे?
आम्ही फलना ( स्टेशन) येथे सप्टेंबरात घेवर घेतले होते. म्हणजे रक्षाबंधन नुकतेच होऊन गेलेले.
कुंभालगड जायचे बाकी आहे.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

6 Nov 2022 - 1:12 pm | ॲबसेंट माइंडेड ...

छान लेख आणि मस्त फोटो.

यश राज's picture

6 Nov 2022 - 2:01 pm | यश राज

मस्त लेख आणि फोटो पण सुंदर

भटकंती आवडली.मी पण हे ठिकाण फिरून आले अस वाटल :)

झकास भटकंती आणि सुंदर, भरपूर फोटो !

राजस्थानात घेवर श्रावणात (आणि मकरसंक्रांतीच्या वेळेला) खाण्याची मिठाई आहे. जयपूर सारख्या मोठ्या शहरात इतरवेळी मिळू शकते पण निमशहरी-ग्रामीण भागात नाही.

लेख आवडला. रणकपूर जैन मंदिर प्रचंड सुंदर आहे. कुंभलगड तर अद्वितीय.

कर्नलतपस्वी's picture

7 Nov 2022 - 10:53 am | कर्नलतपस्वी

+1

पहिली दुरुस्ती म्हणजे लेखाचे शीर्षक असे हवे: जबरदस्त आणि बिनधास्त - जवाई बांध आणि बेराचे बिबटे

दुसरी दुरुस्ती म्हणजे चला, सफरीची सुरुवात तर एकदम झकास झाली होती! ह्या वाक्यानंतरचा https://i.imgur.com/HqSvnjD.jpg हा फोटो दिसत नाही.
तिथे हा फोटो टाकावा. https://i.imgur.com/pA6czYE.jpg

एक_वात्रट's picture

7 Nov 2022 - 11:41 am | एक_वात्रट

आपण लेखाचे संपादन करू शकतो हे मला माहित नव्हते, वर दिलेले बदल आता मीच केले आहेत. धन्यवाद!

पाषाणभेद's picture

7 Nov 2022 - 5:39 pm | पाषाणभेद

छान आहे प्रवासवर्णव व फोटो

मुक्त विहारि's picture

7 Nov 2022 - 7:58 pm | मुक्त विहारि

फोटो छान आले आहेत

पराग१२२६३'s picture

7 Nov 2022 - 10:19 pm | पराग१२२६३

मस्त आहे माहितीपूर्ण लेख.

टर्मीनेटर's picture

11 Nov 2022 - 8:58 pm | टर्मीनेटर

मस्त वर्णन आणि झक्कास फोटोज 👍

एकाद्या राजाने दिमाखात आपल्या सिंहासनावर बसावं, तसाच तो त्या दगडावर बसला होता.

तर काय, कसला रुबाबात बसलाय शेठ!

हल्दी घाटीला भेट नाही देता आली का ह्या ट्रीपमध्ये? बाकी राणकपुरचे मंदिर आणि कुंभलगड के क्या केहने... ह्या दोन्ही माझ्या फेवरीट वास्तु आहेत.
धन्यवाद आणि पुढिल लेखनास शुभेच्छा!

एक_वात्रट's picture

15 Nov 2022 - 8:06 pm | एक_वात्रट

नाही, हल्दीघाटीला गेलो नव्हतो. कुठलंही ठिकाण बघायला जाण्यापुर्वी तिथे जाण्यासाठी खर्च होणारा वेळ, पैसा आणि श्रम आणि त्या ठिकाणाची सुंदरता ह्याचे गुणोत्तर मी आधी काढतो. हल्दीघाटीसाठी आलेला आकडा फारसा चांगला नसल्याने तिथे गेलो नाही.

सुधीर कांदळकर's picture

12 Nov 2022 - 5:58 pm | सुधीर कांदळकर

खरोखरच जबरदस्त वगैरे. खोलगट दगडावरचे महाराज डौलदार. तितर प्रथमच वरील फोटोत पाहिला. एवढ्या सुंदर मंदिराबद्दल प्रथमच वाचले. बहुधा ते हिंदूंचे नाही म्हणून असावे.. मूळ वेधक, सुरेख विषय आणि तेवढेच सुंदर लेखन. आवडले. धन्यवाद.

संगमरवरात बनवलेले हिंदू मंदिर मी अजूनपर्यंत तरी पाहिलेले नाही.

गोरगावलेकर's picture

15 Nov 2022 - 11:58 am | गोरगावलेकर

नवे, जुने सर्व फोटो मस्त. हे ठिकाण माहित नव्हते. माहितीबद्दल धन्यवाद.

श्रीगुरुजी's picture

15 Nov 2022 - 2:51 pm | श्रीगुरुजी

सुंदर वर्णन व प्रकाशचित्रे!

इथे आम्हाला एक सुंदर पक्षी दिसला. (नाव माहीत नाही)

हा उदी पाठीचा खाटीक (Bay-backed Shrike).

एक_वात्रट's picture

15 Nov 2022 - 8:08 pm | एक_वात्रट

प्रतिसाद देणा-या सा-यांचे आभार!

श्वेता व्यास's picture

16 Nov 2022 - 11:55 am | श्वेता व्यास

खूप सुंदर फोटो आहेत.
आम्हा वाचकांचीसुद्धा तुम्ही छान सफर घडवून आणलीत.
वर्णन वाचून या ठिकाणाला भेट देण्याचं निश्चित करून टाकलं आहे. धन्यवाद.

MipaPremiYogesh's picture

17 Nov 2022 - 10:01 pm | MipaPremiYogesh

खूप रोचक आणि सुंदर वृत्तान्त..बिबट्या मस्त दिसतोय...
तो पक्षी म्हणजे खाटीक उर्फ shrike Ani चिमणी सारखे दिसणारे पक्षी म्हणजे yellow throated sparrow..जिच्या शिकारी पासूनच सलीम अली ह्यांना पक्षी निरीक्षणाचा छंद जडला..

आम्ही राजस्थानला गेलो होतो तेव्हा जयपूरला आम्हाला पुष्कळच घीवर मिळाले.. त्यात मी दोन्ही प्रकारचे घीवर घेतले साधे पांढरे व केशरी फरक कांहीं जाणवला नाही फक्त रंग सोडून. चव ,गोडी आकार, घीवरची जाळी सर्व काही. सारखेच होते, पण त्यापेक्षा आम्हाला चांगले चवीचे मोठे मोठे पेढे हवे होते पण चव दर्जा काही खास मिळाला नाही.