दिवाळी अंक २०२२ - रीकर्सिव्ह लूप

Primary tabs

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in दिवाळी अंक
5 Nov 2022 - 10:11 pm

खादी गोष्ट प्रकाशाच्या वेगाने गेली तर तिचा वेग सांगता येईल. पण जर ती त्यापेक्षा अधिक वेगाने गेली, तर?

प्रश्न नक्कीच कोड्यात टाकणारा आहे.. म्हणजे बघा, आपण वेग मोजताना ती अ बिंदूपासून ब बिंदूपर्यंत पोहोचली हे आपल्याला दिसतं. त्यासाठी लागलेल्या वेळावरून आपण वेग मोजतो. प्रकाश आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचायला लागलेला वेळ, प्रकाशाच्या वेगाच्या मानाने ब बिंदू ते आपण हे अंतर फारच म्हणजे अगदी अल्प असतं.
पण समजा हं. समजा, तीन व्यक्ती आहेत – अ, ब आणि क.. पैकी अ स्थिर आहे. ब हा प्रकाशाच्या वेगाने जाणार्‍या वाहनात बसला आहे, तर क हा प्रकाशाच्या पाचपट वेगाने जाणार्‍या वाहनात आहे. अ, ब आणि क यांनी हस्तांदोलन केलं, ब आणि क त्यांच्या मोहिमेवर एकाच दिशेने निघाले.

पहिल्या सेकंदाला बने तीन लाख किलोमीटर अंतर कापलं. कने पंधरा लाख किलोमीतर कापलं. मात्र 'अ'ला दिसताना ब ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी कदेखील दिसेल. क प्रत्यक्षात त्यापेक्षा कितीतरी अधिक दूर निघून गेलेला असेल. अ आणि ब एकमेकांना पाहू शकतील, मात्र क त्यांना कधीच पाहू शकणार नाही.
स्वप्निलला, हा रिलेटिव्हिटीचा सिद्धान्त समजावून सांगायला आवडतो. खासकरून वर्षाला. ती ज्या पद्धतीने ऐकते, ऐकत असताना तिच्या डोळ्यातील बदलता भाव, एकटक पाहत ऐकणं, मध्येच काही समजलं नाही तर डोळे किंचित बारीक करणं, त्याबरोबर ओठांची गोल मोहोर करणं, "ए, जरा नीट समजावून सांग ना.." म्हणताना तिची हलणारी मान आणि त्याबरोबर झोके घेणारे कानातले, अगदी त्या "और मै तुम्हे देखते हुए देखू.... " गाण्यातल्यासारखं, फिजिक्स सोडून तिच्याकडेच पहात राहावंसं वाटतं.

स्वप्निल हरवला. त्याच्या आणि वर्षाच्या आठवणीत.

"हे स्वॅपी.. कुठे हरवलास?" ब्रायनला स्वप्निलच्या नावाचा उच्चार करता येत नाही. तो स्वप्निलला स्वॅपी म्हणतो. "कसला एवढा विचार करतो आहेस?"
"काही नाही रे.. वर्षाची आठवण येते. एरवी आपण सतत कामात असतो. दुसर्‍या कसल्याच विचाराला डोक्यात जाग नसते. मला तर कधी कधी वाटतं की आता डोकं विचारांनी ओसंडून वाहायला लागेल.”

"तुम्ही भारतीय ना! फारच इमोशनल असता. तुमचे ते बॉलीवूडचे सिनेमे पाहातो ना मी. काही समजत नाही. तो तिला आवडतो, ती त्याला आवडते. सरळ एकमेकांना सांगून टाका ना. उगाच झाडाभोवती गोल फिरत गाणे म्हणत बसतात. उद्या बॉलीवूडने एखादी सायन्स फिक्शन मूव्ही केली ना, तर त्यातही तुमचे ते हीरो-हिरॉइन एखादा मिटीओर नाहीतर धूमकेतू पकडून त्याभोवती स्वतंत्र स्पेसक्राफ्टमधून गोल गोल फेर्‍या मारत बसतील." ब्रायनला स्वत:च्या कल्पनेची गम्मत वाटली.

"ओक्के, विनोद बाजूला ठेवू या. आपला प्रयोग शंभर टक्के यशस्वी होणार आहे बघ या वेळेला. एक एका एलिमेंटची थ्रेशोल्ड चेक करत आलोय. आता फक्त एकच एलेमेंट उरलाय." ब्रायन आणि स्वप्निलचं प्रोजेक्ट, गेली तीन वर्षं प्रत्यक्ष लॅबमध्ये आणि त्या अगोदर चार वर्षं युनिर्व्हसिटीत, त्यांचं यावरच लक्ष एकवटलंय. आतापर्यंत किती प्रयोग, टेस्ट्स झाले असतील याची गणतीच नाही. गणती नाही हा फक्त भाषेतला वाक्प्रचार म्हणून. बाकी प्रत्येक प्रयोगातली रीडिंग्ज आयपॅडवर रेकॉर्ड केली आहेत. संशोधन चोरीला जाणं हा आज सर्वाधिक असलेला धोका नको, म्हणून त्यांनी कुठलीच माहिती इंटरनेटवर ठेवलेली नाही.

टेलीपोर्टिंग आणि टाइम ट्रॅव्हल या माणसाला लुभावणार्‍या कल्पना.. लिओनार्दो दा विन्चीनेसुद्धा याबद्दल कल्पना लिहिल्या आहेत म्हणे.
या दोन्ही कल्पना प्रत्यक्षात आणायचा ध्यास या दोघांनीच नाही, तर कितीतरी जणांनी घेतलाय. प्रत्येक जण आपलं संशोधन गुप्त ठेवतोय. खरं तर या सगळ्यांनी मिळून एकत्र संशोधन केलं, तर काम बरंच लवकर होईल. पण संशोधनानंतर होणारा आर्थिक आणि लष्करी फायदा कोणालाच सोडायचा नाहीये.

आपण केलेल्या आवाजाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने जाऊन आपण कुठेतरी उभे राहिलो, तर तोच आवाज प्रवास करत आपल्यापर्यंत पोहोचेल. आपण एक तासापूर्वीचा, एका दिवसापूर्वीचा आवाजही ऐकू शकू. न रेकॉर्ड करता. आवाजाला प्रवास करण्यासाठी माध्यम लागतं. प्रकाशाला माध्यमाची गरज नसते. आपण काल काय घडलं ते आज पाहू शकू. अर्थात प्रकाशाच्या गतीपेक्षा जास्त गतीने प्रवास केला, तर. आपल्या सूर्यमालेच्या सर्वात जवळचा तारा आल्फा सेंटॉरी. हा साडेचार प्रकाशवर्षं दूर आहे. म्हणजे आपण आज जो तारा पहातोय, तो अ‍ॅक्चुअली साडेचार प्रकाशवर्षांपूर्वीचा पाहतोय.आज तो जिथे दिसतो तिथे तो आत्ता असेलच असं नाही.

टेलीपोर्टिंग आणि टाइम ट्रॅव्हल हे सांगायला दोन शब्द आहेत. पण त्यात कितीतरी शक्यता अशक्यतांच्या पलीकडे जाऊन प्रयोग करायचे असतात.पूर्वी हे शक्य नव्हतं, पण सुपरकॉम्प्युटर आणि सर्न लॅबमध्ये केलेले बोसॉन संदर्भातले प्रयोग यानंतर हे शक्य वाटायला लागलं.

"स्वॅपी.. हे बघ काय आहे.." ब्रायनचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. सगळी कॅल्क्युलेशन्स तो पुन्हा पुन्हा तपासायला लागला. स्वप्निलनेही ती कॅल्क्युलेशन्स पुन्हा पुन्हा तपासली. कुठे गडबड झाली हे समजत नाही. ते समजलं, तर..

गेले दोन दिवस दोघेही सगळी रेकॉर्ड्स उलटसुलट तपासून पाहत होते. निष्कर्ष एकच - प्लँक्स कॉन्स्टन्टमध्ये चुकून झालेला एका डिजिटचा फरक.
"हे असं करता आलं, तर.. इट्स अ बिग ब्रेक थ्रू.." दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं. दोघांच्याही मनात एकच विचार.. दोघांच्याही चेहर्‍यावर हसू फुलत गेलं. हसणं अनावर झालं. दोघांनी एकमेकांना घट्ट गळामिठी मारली. डोळ्यांतून धारा लागल्या. इतकी वर्षं ज्यासाठी अविरत कष्ट घेतलं, त्याचं फळ मिळणार आहे.
आनंदाचा भर ओसरल्यावर दोघांना जाणीव झाली - प्रत्यक्ष काम करायची, प्रोटोटाइप बनवायची हीच ती वेळ.


एका बंद व्हॅनमधून काही खास पाहुण्यांना आणलं गेलं. दालनात त्या दोन पाहुण्यांशिवाय आणखी फक्त दोनच व्यक्ती तिथे उपस्थित होत्या - एक इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर आणि दुसरे भारताचे सेनादल प्रमुख. ही मीटिंग स्वतः पंतप्रधानांनी अयोजित केली होती. चौघेही त्यांची वाट पहात होते. स्वतःची ओळख करून देणं, हस्तांदोलन वगैरे सोपस्कारांना या मीटिंगमध्ये थारा नव्हता. चौघांनाही इतर कोण आहेत ते माहीत होतं. पंतप्रधानांची वाट पाहणं इतकंच काय ते त्यांच्या हातात होतं.

सिक्युरिटी प्रोटोकॉल म्हणून कोणाकडे मोबाइलही नव्हता. चौघंही वाट पहात होते. दालनात कोणीतरी आलं. झपझप पावलं टाकत. हा पंतप्रधानांचा स्वीय साहाय्यक. त्याने वाकून सेनादल प्रमुखांच्या कानात काहीतरी सांगितलं. सेनादल प्रमुखांनी नीट ऐकलं. ऐकून झाल्यावर साहाय्यक आला तसा दालनातून निघून गेला. तो गेला आहे याची पूर्ण खातरी झाल्यावर सेनदल प्रमुख उभे राहिले. "जंटलमन, आपण ही मीटिंग पुढे ढकलतोय. पंतप्रधान काहीतरी महत्त्वाची घोषणा करणार आहेत. देशभर पोलीस दलाला आणि सैन्यदलाला हाय अ‍ॅलर्ट राहण्याचा आदेश आहे. आजची मीटिंग तहकूब झालेली आहे.”

इन्स्टिट्यूट डायरेक्टर , स्वप्निल आणि ब्रायन तिघांनीही कोणताच प्रश्न विचारायचा नाही. ‘पुढची मीटिंग केव्हा?’ हादेखील नाही.


देशभरात रेडिओ, टेलीव्हिजन, वर्तमानपत्रं, न्यूज एजन्सीज सर्व जण उत्सुकतेने वाट पहात होते. पंतप्रधानांच्या महत्त्वाच्या संदेशासाठी सगळ्या चॅनल्सच्या सुरू असलेल्या कार्यक्रमांचं प्रसारण थांबवून ठेवलं होतं. पंतप्रधान पुढच्या पाच मिनिटांत ऑन एअर येत आहेत, पी एम कार्यालयातून थेट प्रसारण होणार आहे इतकंच काय ते माहीत होतं.

वॉशिंग पावडर रंभा.. वॉशिंग पावडर रंभा.. एका चॅनलवर जहिरात झळकली. चॅनल डायरेक्टरनी त्यांच्या केबिनमधून उठून ब्रॉडकास्टिंग स्टुडिओत धाव घेतली. जहिरात तिथेच थांबवली. पंतप्रधानांचा तातडीचा संदेश म्हणजे काहीतरी खूप महत्त्वाचं असणार, याची सर्वांनाच जाणीव होती.

एका मिनिटाने पंतप्रधान जनतेशी थेट संपर्क साधणार आहेत.. काउंटडाउन सुरू आहे.. चाळीस सेकंद.. तीस सेकंद .. पंधरा सेकंद.. सात सेकंद.. पाच चार तीन दोन एक शून्य.. पंतप्रधानांचा चेहरा स्क्रीनवर दिसू लागला. त्यांच्या डोळ्यातला आत्मविश्वास नेहमीचाच, पण चेहरा अधीक गंभीर.

"मित्रों.." पंतप्रधान बोलू लागले. "एक महत्त्वाचं निवेदन करण्यासाठी मी आज तुमच्यासमोर उभा आहे. काही महत्त्वाच्या निर्णयानुसार आज, आत्ता - म्हणजे भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी आठ वाजल्यापासून चलनात असलेल्या एक हजार आणि पाचशे रुपयांच्या सर्व नोटा भारतीय रिझर्व्ह बँकेकडून रद्द करण्यात येत आहेत, याची नोंद घ्यावी. ज्यांच्याकडे अशा नोटा आहेत, त्यांना त्यांच्याजवळील नोटा बँकेत भरता येतील. तेवढी रक्कम त्यांच्या खात्यात जमा दाखवण्यात येईल. सर्व व्यवहार रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार होतील.”

पंतप्रधान बोलत होते. त्यांनी चलन रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याचे परिणाम काय होणार आहेत ते माहीत नव्हतं. सध्यातरी घरात असलेल्या हजारच्या पंधरा नोटा पुन्हा बँकेत भरणं हेच सर्वात महत्त्वाचं काम समोर दिसतंय.. प्रोजेक्टपेक्षाही महत्त्वाचं. ‘सर्वे गुणा: कांचनं आश्रयंन्ति..’ पुढची मीटिंग केव्हा, याबद्दल काहीच माहीत नाही.


टीव्हीवरच्या प्रत्येक न्यूज चॅनलवर चर्चा चालू होत्या. असणारच ना! आत्तापर्यंत अशी गोष्ट भारताच्य इतिहासात कधीच घडलेली नव्हती. न्यूज चॅनल्स सोडा, इतर चॅनल्सवरही हीच चर्चा होती. आपल्याकडे एक असतं - न्यूज चॅनलवाल्यांच्या हाती एखादी बातमी लागली की किमान दोन-तीन दिवस तरी ती आजची मोठी बातमी, ब्रेकिंग न्यूज अशा वेगवेगळ्य नावांखाली ती सतत दाखवली जाते. मागे कोण तो प्रिन्स नावाचा मुलगा बोअरिंगसाठी घेतलेल्या खड्ड्यात पडला होता, चॅनलवाल्यांना तो विषय पुढचे दहा दिवस पुरला होता. अशा ब्रेकिंग न्यूजमुळे महत्त्वाच्या इतर बातम्या झाकोळल्या जातात.

'बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये क्वान्टम फिजिक्सवर आधारित एक प्रयोगाला अभूतपूर्व यश मिळालं..' बातमी कोणी दिली माहीत नाही. पण नशिबाने क्वान्टम फिजिक्स म्हणजे काय हे त्या बातमीदाराला माहीत नव्हतं. इन्स्टिट्यूटच्या डायरेक्टरनी "हा एक नेहमीचाच प्रयोग आहे, यात पायरॉलिसीस या तंत्रज्ञानाने जुन्या टायर्सपासून द्रवरूप इंधन मिळतं" असं सांगून झाकण टाकलं. बातमी अर्थातच ब्रेकिंग न्यूज न होता दुय्यम महत्त्वाची म्हणून मुख्य बातम्यांच्या खाली स्क्रोल होत दिली गेली.


टेलीपोर्टिंगसाठी जसा प्रेषक (सेंडर) असावा लागतो, तसा रिसीव्हरदेखील असावा लागतो. टाइम मशीन्सच्या बाबतीत एक नवाच प्रश्न उपस्थित केला गेला. समजा, जर कोणी भूतकाळात जाऊन तिथल्या घटनांत फेरफार केला, तर? म्हणजे कोणीतरी एखाद्या राजघराण्याच्या वारसाला लहान असतानाच नाहीसा केला, तर त्या राजघराण्याची पुढची संपूर्ण पिढीच असणार नाही.छ.संभाजी महाराजांना ते पकडले जाणार आहेत हे कोणीतरी अगोदरच सांगितलं, तर?
या शक्यता सुपरकॉम्प्युटरला द्यायला हव्या. पण हा प्रश्नच अतार्किक आहे.. इल्लॉजिक इज द लॉजिक. हे असले प्रश्न स्वतःलाही विचारायचे नाहीत. स्वप्निलने स्वतःलाच एक जोरदार वॉर्निंग दिली.

"तुम्ही बनवलंय त्या कालयंत्राची (टाइम मशीनची) झेप फक्त एक आठवडा आहे. तीदेखील भविष्यात, भूतकाळात किती दिवस मागे जाता येईल?”
“सध्यातरी भविष्याचाच विचार करतोय. कारण भविष्यकाळात कालयंत्र उपलब्ध असणार आहे. त्याचा उपयोग भविष्यकाळातल्या भूतकाळात, म्हणजे आपल्या वर्तमानात करता येईल.”
"इतक्या लहान कालावधीचाच वेध घेणार्‍या या कालयंत्राचा सामान्य माणसाला काय उपयोग असणार आहे?”
"हे संशोधन नवीन आहे. नुकतंच जन्माला आलंय. नुकत्याच जन्मलेल्या बाळाचा काय उपयोग असतो?"
ब्रायन आणि स्वप्निल पत्रकारांना द्यायच्या मुलाखतीची तयारी करत होते.
सगळीकडे न्यूजमध्ये नोटाबंदीच्याच बातम्या होत्या.बँकेत नोटा भरण्यासाठीच्या रांगा, एटीएम मशीनबाहेर पैसे काढण्यासाठीच्या रांगा. कोणाचे रोजगार बुडाले, कोणाकडे जुन्या नोटांचं कोट्यवधींचं घबाड सापडलं.. विविध चॅनल्सवर याच चर्चा होत्या.


पंतप्रधानांसमोर यंत्राचं प्रात्यक्षिक. अगोदर टेलीपोर्टिंग मशीनचं, त्यानंतर कालयंत्राचं.
साधारणत: गोदरेजचं लोखंडी कपाट असतं, तसं दिसणार्‍या कालयंत्राच्या कॅबिनेटमध्ये स्वप्निल स्वतः बसला. ब्रायनने कंट्रोल युनिट संभाळलं. हिरवट पिवळ्या प्रकाशात स्वप्निल न्हाऊन निघाला.

गुई.... मशीनच्या आवाजाची तीव्रता वाढत गेली. हिरव्या प्रकाशझोतात धुकं आल्यासारखं काहीतरी दिसलं. स्वप्निल त्या धुक्यात विरघळत गेला.
दालनातले इतर तिघे - म्हणजे सेनादल प्रमुख, ब्रायन आणि पंतप्रधान खुर्चीवर खिळून होते. ब्रायन लॅपटॉपवरून कंट्रोल पॅनल हाताळत होता, त्यामुळे तो सोडला तर बाकीचे दोघे अक्षरशः थिजले होते. त्यांच्या डोळ्याची पापणीही हलत नव्हती.

साधारणतः एका तासाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर ते हिरवट धुकं विरळ व्हायला लागलं. स्वप्निल हळूहळू दिसायला लागला. दहा मिनिटं गेली. तो आता पूर्ण दिसायला लागला. त्या थंड हवेतही घामाने निथळलेला स्वप्निल टाइम मशीनच्या कॅबिनेटची काच उघडून बाहेर आला. त्याच्या हातात कसलीशी कागदाची गुंडाळी होती. काहीही न बोलता स्वप्निलने ती कागदाची गुंडाळी पंतप्रधानांच्या हातात दिली. पंतप्रधानांनी ती उलगडली. उद्याच्या टाइम्सची बंगळुरू आवृत्ती होती ती.
"प्राउड ऑफ यू" पंतप्रधानांनी स्वप्निल आणि ब्रायन दोघांचीही पाठ थोपटली. "आता यांना तुम्ही सांभाळायचं. हे देशाचेच नाही, तर जगाचे हीरो आहेत." पंतप्रधानांचं हे वाक्य सेनादल प्रमुखांना उद्देशून.

मीटिंग संपली होती. इतक्या वर्षांनंतर आपलं संशोधन फळाला आलं, याचा आनंद स्वप्निलच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होता. आपला हा आनंद वर्षाला सांगता येत नाही, याचं त्याला वाईट वाटत होतं. दु:खाच्या क्षणीच नाही, पण आनंदाच्या क्षणीदेखील कोणीतरी वाटून घ्यायला मिळणं हे किती मोठं भाग्य असतं, हे जाणवतंय.
ब्रायनची अवस्थाही काही वेगळी नव्हती. दोघेही शून्यवत झाले होते. अगदी खरं सांगायचं तर दु:ख, आनंद वगैरे भावनांच्या पलीकडचं असं काहीतरी वाटत होतं. काय व्यक्त करावं? कसं व्यक्त करावं? ते समजत नव्हतं. एकदम रिकामं रिकामं वाटत होतं.

सेनादल प्रमुखांनी त्यांची अवस्था ओळखली. "पंतप्रधानांना तुमचं संशोधन मनापासून आवडलंय. सुरक्षेच्या कारणास्तव हे संशोधन आत्ताच जाहीर करणं योग्य ठरणार नाही. तुमचं हे संशोधन अधिक प्रगल्भ ( मॅच्युअर) झालं की योग्य वेळ येताच आपण ते जाहीर करू, जगासमोर आणू. तोपर्यंत ते गुप्त ठेवायचं. त्यामुळे दोन गोष्टी होतील - एक म्हणजे तुम्ही सुरक्षित रहाल आणि दुसरं म्हणजे तुम्हालाही तुमच्या उपकरणात सुधारणा करायला वेळ मिळेल.

तुमच्या सुरक्षिततेची जबाबदारी माझी. भारतीय सैन्याची. फक्त एक आहे - या काळात बाहेरच्या कोणालाही तुमच्याशी संपर्क साधता येणार नाही. तुमची आयडेन्टिटी पूर्णपणे गुप्त राखली जाईल. तुमच्या कुटुंबीयांना तुम्ही सुरक्षित आहात हे वेळोवेळी कळवलं जाईल. त्यांच्याही सुरक्षिततेची काळजी घेतली जाईल. तुम्ही तुमचं संशोधन पुढे चालू ठेवा.”

मीटिंग संपली. पुढे काय? हा प्रश्नही संपला. पुढे काय? या प्रश्नाबरोबर येणारं रिकामपणही संपलं. उलट पुढच्या सहा महिन्यांत नवीन प्रोटोटाइप बनवायचं टाइमबाउंड आव्हान पुढे आहे. बरंच आहे की हे. ब्रायनने सेनादल प्रमुखांच्या सूचनेला हसत प्रतिसाद दिला.आवडतंय आणि वैद्याने पथ्य म्हणून तेच खायला सांगावं, अशातली गत झाली.

ब्रायन आणि स्वप्निल दोघांनी त्यांची प्रयोगशाळा बंगळुरूपासून दूर बेळगावमध्ये हलवली. इथे सगळं काही उपलब्ध होतं. प्रयोगशाळा बंगळुरूपासून दूर हलवण्याचं मुख्य कारण म्हणजे पंतप्रधानांबरोबर मीटिंग झाली, त्याच्या दुसर्‍याच दिवशी लॅबमध्ये स्वप्निलसारखा दिसणारा एक तरुण आला. त्याने टेबलवर असणारं वर्तमानपत्र उचललं आणि तो थेट कालयंत्र ठेवलेल्या दालनात गेला. त्याला तेथून बाहेर आलेलं कोणीच पाहिलं नाही. तो तरुण कोठून आला, ते कोणालाच माहीत नव्हतं, कुठल्याच गेटवर त्याच्या येण्याची नोंद नव्हती. कुठे गेला तेही माहीत नव्हतं. सीसीटीव्ही कॅमेरे फक्त गेटवरच होते. त्यात कोणत्याच गेटवर त्याच्या येण्याची नोंद झालेली नव्हती. सगळेच बुचकळ्यात पडले. इन्स्टिट्यूटच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावरून एका चॅनलने बातमी दिली. पण थोड्याच वेळात ती बातमी दाबून टाकण्यात आली.

घडलेल्या घटनांचा विचार करून, नक्की काय झालं याचा अंदाज इन्स्टिट्यूट डायरेक्टरना आला. स्वप्निलसारखा दिसणारा तो तरुण म्हणजे दुसरंतिसरं कोणी नसून खुद्द स्वप्निलच असावा.कालच्या प्रयोगात स्वप्निल एक दिवस पुढे आला होता. इन्स्टिट्यूटमध्ये आलेला स्वप्निलच आहे, यात शंकाच नाही.

कडेकोट सुरक्षिततेत प्रयोग सुरू होते. प्रयोगशाळेत बाहेरच्या कोणालाच प्रवेश नव्हता. ब्रायन आणि स्वप्निल इथेच राहत होते. बाहेरचं म्हणायचं, तर इन्स्टिट्यूट डायरेक्टर आणि सेनादल प्रमुख सोडले, तर इतर कोणालाच इथे येता येत नव्हतं. इतर देशांचं लक्ष जायला नको, म्हणून पंतप्रधानही इथे येत नव्हते. ते थेट सेनादल प्रमुखांकडून माहिती घेत.

कालयंत्राचं तंत्रज्ञान खूपच बाल्यावस्थेत होतं. नवीन प्रोटोटाइपच्या साहाय्याने चार महिने भविष्यात जाऊन येता येत होतं. अगदी थोड्या काळासाठी भूतकाळातही जाता येत होतं. भूतकाळात काय किंवा भविष्यकाळात गेलं, तरी परत वर्तमानात येण्यासाठी कालयंत्राची गरज पडते. आज इथे असलेलं कालयंत्र भविष्यातही आहेच, त्यामुळे तो प्रश्न येत नाही. मात्र भूतकाळात गेल्यावर तिथे कालयंत्र नाही, ही अडचण होती.

कालयंत्राची मेकॅनिझम आणि सर्किट्सची गुंतागुंत यांचा पसारा इतका अवाढव्य होता की त्याने लॅबसहित आसपाअसच्या आणखी चार खोल्या व्यापल्या होत्या.
"हा आकार कमी करता आला तर!" ब्रायन लॅपटॉपवर आकडेमोड करत होता.
"तसं झालं, तर खूप बरं होईल. कालयंत्रात बसताना आपण त्याबरोबर दुसरं एखादं कालयंत्र नेता येईल. आणि भूतकाळातली कालप्रवासाची अडचण संपेल." स्वप्निलही तोच विचार करत होता.
"होईल रे.. आता हेच बघ ना. आपले कॉम्प्युटर्सच बघ ना. सुरुवातीचा तो एनिअ‍ॅक नावाच कॉम्प्युटर, तो म्हणे पंधरा हजार स्क्वेअर फूट इतकी जागा व्यापायचा. आणि आज आपले लॅपटॉप बघ, तेही त्या एनिअ‍ॅकपेक्षा कितीतरी शक्तिमान प्रोसेसर असूनही किती लहान आहेत. होईल रे सगळं.. थोडा वेळ द्यावा लागेल." ब्रायनने स्वप्निलला दिलासा दिला.
"मला तर आता काही सुचणं बंद झालंय. आपण इथे या लॅबमध्ये बंदिस्त झालोय." स्वप्निल कंटाळलाय हे त्याच्या आवाजावरून कोणालाही जाणवलं असतं.
"माझ्या तर मेंदूने काम करणं बंद केलंय. आपण आपल्या संशोधनामुळे बंदिवान झालोय." ब्रायन सतत आकडेमोड करून वैतागला होता.
"माझी काही फार वेगळी अवस्था नाहीये. तू निदान सडाफटिंग आहेस. मला बायको आहे रे.. आय मिस हर लॉट.." वैतागलेल्या स्वप्निलला साधे बोलायला ही कष्ट पडत होते. "इन्स्टिट्यूट डायरेक्टरना विचारू या. आपल्याला ब्रेक घेता येईल का... काही दिवसतरी!”
"खरंच ब्रेक हवा आहे. त्या ब्रेकमध्ये मी लॅपटॉप उघडणं सोडा, लॅपटॉपमधला ‘ल’देखील उच्चारणार नाहीये." ब्रायनचा स्वप्निलच्या सूचनेला पूर्ण पाठिंबा.


त्या दोघांना ब्रेक हवा हे पटत होतं. पण त्यांना सुरक्षिततेच्या कारणामुळे बाहेरही पाठवता येत नव्हतं. ते ज्या विषयावर काम करत होते, त्याच विषयावर जगातली अनेक राष्ट्रं गुप्तपणे काम करत होती.

भारतीय शास्त्रज्ञांनी कालयंत्राचं सफळ परीक्षण केलं या बातमीची साधी कुणकुणही लागू नये, म्हणून बरीच गुप्तता ठेवली होती. प्रोजेक्टचं नावही त्यासाठी ‘प्रोजेक्ट अंदमान’ असं दिशाभूल करणारं ठेवलं होतं. कशी कोण जाणे, बातमी बाहेर फुटली. कोणीतरी स्वप्निल आणि ब्रायनची थेट विचारणा करत होतं. त्यांना भेटायचाही प्रयत्न झाला..

इन्स्टिट्यूट डायरेक्टरनी सुट्टी घेऊन बाहेर जाण्याऐवजी पंतप्रधानांची खास परवानगी घेऊन स्वप्निलचे आईवडील आणि वर्षा यांना चार दिवस तिथेच बोलावलं. त्यांच्यासाठी योग्य ते परवानेदेखील दिले गेले.


संपूर्ण उच्च सैनिकी सुरक्षेत वावरताना आईबाबांना संकोच होत होता. वर्षासाठी तर हे असलं वातावरण कधीच न अनुभवलेलं. तिला स्वप्निलने सगळा वेळ आपल्यासाठीच असावं असं वाटत होतं. तो काय करतो, रिसर्च कसा करतो याची तिला उत्सुकता होती. दिवस अख्खा गप्पांत जात होता. स्वप्निलला आईवडिलांशी बोलायचं होतं, पण वर्षालाही वेळ द्यायचा होता. गप्पांमध्ये चुकूनही कालयंत्राचा उल्लेख येणार नाही, याची तो पुरेपूर काळजी घेत होता. चार दिवस कसे संपले ते समजलंसुद्धा नाही. गप्पा.. चहा.. पुन्हा गप्पा.. जुनी गाणी.. स्वप्निलच्या लहानपणीच्या आठवणी.. यात इतर कसलीच आठवण झाली नाही. दिवसाचा सगळा वेळ आपल्यासाठीच आहे हे कधीच अनुभवलं नव्हतं. हे चार दिवस संपूच नयेत असं वाटत होतं.

सुट्टी संपली. आई, बाबा, वर्षा सगळे घरी गेले. ब्रायनलाही कुटुंबात सुट्टी घालवायला मिळाली. त्याने अभ्यासासाठी सगळे पाश तोडले होते. पण लहानपणीच्या आठवणी असतातच की. आईबाबा स्वप्निलचे, पण त्यांच्यात ब्रायनला स्वतःचे आईवडील दिसले. निरोप देताना तोही हळवा झाला.

सुट्टी संपली. पुन्हा कामाला सुरुवात करायची. चार दिवसांच्या सुट्टीमुळे डोकं एकदम ताजंतवानं झालं होतं. सुट्टीपूर्वी आलेला कंटाळा कुठल्या कुठे पळाला होता. नवं डिझाइन, त्यासाठी लागणारा अ‍ॅडव्हान्स्ड नवा प्रोसेसरही उपलब्ध झाला होता. खास बेल लॅबकडून बनवून घेतला होता. प्रोसेसरमुळेही काही डेटा चोरीला जातो असं माहीत झाल्यामुळे ती काळजीदेखील घेतली गेली होती. संपूर्ण लॅब आयसोलेशनमध्ये होती. कुठेही कसली कनेक्टिव्हिटी ठेवलेली नव्हती. ब्रायन आणि स्वप्निल कामात पूर्ण बूडून गेले होते. पुढच्या महिन्याभरात नवा प्रोटोटाइप तयार व्हायला हवा.. आत्ता रात्रीचे अडीच वाजले होते, पण दोघांनाही कामापुढे वेळेची शुद्ध नव्हती. कामात एकदम गर्क होते.

टक टक टक.. दारावरच्या आवाजामुळे कामाची तंद्री भंगली. ब्रायनने घड्याळात पाहिलं. इतक्या रात्री? कोण असेल या वेळेला? स्वप्निलने लॅच फिरवत दार उघडलं. खरं तर असं दार उघडायचं नाही, हे माहीत होतं. दाराला डिजिटल लॉक होतं. त्याचं काँबिनेशन या दोघांव्यतिरिक्त इन्स्टिट्यूट डायरेक्टर आणि सेनादल प्रमुख यांनाच माहीत होतं. प्रत्येकाचा कोड वेगळा होता, त्यामुळे कोणी दार उघडलं याची नोंद होत होती. दार आतून उघडलं तर असं काहीच होत नव्हतं.

टक टक टक... दारावरच्या या आवाजाला एक अभवित प्रतिक्रीया म्हणून स्वप्निलने दार उघडलं. दारात त्याचा आतेभाऊ सुमीत उभा होता. त्याच्याबरोबर पाच मोठाल्या बॅगा. सुमीतला असं अचानक समोर पाहून स्वप्निलचे डोळे आश्चर्याने विस्फारले.. "सुमीत! तू? इथे कसा? आणि या वेळेला?”
"अरे हो. सांगतो, सांगतो. मला आत तर येऊ दे.” स्वप्निलला दरवाजातून बाजूला करत सुमीत आत आला. सुमीतला असं आत येताना पाहून ब्रायनचा चेहेरा प्रश्नार्थक. स्वप्निलने त्याची सुमीतशी ओळख करून दिली.
"तू इथे आलास कसा? आणि मला कसं माहीत नाही?" स्वप्निलला हा इथे कसा हाच मोठा प्रश्न पडला होता. "तुला इथे येण्यासाठीच्या परवानग्या कशा मिळाल्या? आणि या बॅगामध्ये काय आणलं आहेस?” या प्रश्नावर सुमीतने इकडेतिकडे नीट पाहिलं. दार नीट बंद आहे याची खातरी करून घेतली.
"मी इथे बोलतो ते गुप्त राहील ना?"
"हो. इथे बोललेलं आपल्या तिघांतच राहील याची खातरी बाळग. काय सांगणार आहेस असं?" सुमीत काय सांगतोय याची स्वप्निलला उत्सुकता होती, तशीच ब्रायनलाही होती.
"मी इथे कसा आलो याचं उत्तर म्हणजे मामांना - म्हणजे तुझ्या बाबांना इथे यायचे जे पासेस दिले होते, ते फोर्ज केले. अगदी बेमालूमपणे क्यू आर कोडसहित. कोणाकडून, कसे हे विचारू नकोस. माझ्याकडे हॅकिंगमधला सुपर ब्रेन आहे. तो जगात काहीही हॅक करू शकतो. मला कोणत्याच मशीनने अडवलं नाही इथपर्यंत येताना, यावरून अंदाज कर." सुमीतने त्याचं इथपर्यंत येण्याचं गुपित सांगितलं.
"आणि बॅगेत काय आहे?" स्वप्निलचा पुढचा प्रश्न.
"या पाचही बॅगांमध्ये मिळून एकूण साडेपाचशे कोटी रुपये आहेत. वट्ट रोख. हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात. व्यवस्थित कॉम्प्रेस करून बसवल्या आहेत.”
"इतके पैसे? ते कशाला?" इतकी मोठी रक्कम ऐकूनच स्वप्निलला घाम फुटला.
"ऐक. मला तुझ्या संशोधनाबद्दल माहीत झालंय. कालयंत्राबद्दल. मला त्याचा उपयोग करून घ्यायचाय. हे सगळे पैसे मला भूतकाळात न्यायचे आहेत. या एक हजारांच्या नोटांचा इथे काहीच उपयोग नाही. त्यांचा जिथे उपयोग आहे, तिथे - म्हणजे भूतकाळात न्यायचे आहेत. नोटबंदी होण्याअगोदर सोनं, शेअर्स, जमीन या सगळ्यात या पैशांची योग्य गुंतवणूक करायची. ज्यांच्याकडून आणलेत त्यांना तीस टक्के मिळाले तरी ते खूश आहेत. सत्तर टक्के पैसे आपलेच.” सुमीतने त्याचा प्रस्ताव सांगितला.
"अरे, पण हे कसं शक्य आहे?" सुमीत जे काही सांगत होता, ते स्वप्निलच्या पचनी पडत नव्हतं.
"हे बघ, हे तू करणार आहेस. आणि त्या बदल्यात तुम्हाला दोघांना यातले वीस टक्के मिळतील. मग तर झालं? नेमकं सांगायचं झालं तर एकशे दहा कोटी रुपये." सुमीतने सगळे पत्ते उघड केले.
"म्हणजे तू मला लाच देतो आहेस?" सुमीत असं काही करेल यावर स्वप्निलचा विश्वास बसत नव्हता. "ही देशाशी गद्दारी आहे."
"तसं म्हण हवं तर. पण लाच यापेक्षा तुझ्या बुद्धिमत्तेचा मोबदला देतोय असा विचार कर. संशोधनानंतर तुला मिळणार्‍या रकमेपेक्षा कितीतरी अधिक आहे. आणि देशाशी गद्दारी म्हणत असशील तर तुझं संशोधन तू कोणालाही देत नाहीस. त्यातलं एक अक्षरही बाहेर फुटणार नाही. देशाचं कसलंच नुकसान होत नाहीये. उलट तुझ्या संशोधनासाठी मी एक जिवंत माणूस माझ्या स्वतःवर प्रयोग करून घ्यायला तयार झालो आहे. तुझ्या संशोधनासाठी ही केवढी मोठी मदत आहे." सुमीतचा युक्तिवाद पटण्यासारखा होता.
"आणि मी नाही म्हणालो, तर?" स्वप्निलला सुमीतचं म्हणणं पटत नव्हतं.
"म्हणून बघ. नुकसान तुझंच आहे. माझ्यासारखा स्वतःवर प्रयोग करू देणारा मानव तुला मिळणार नाही. चांगली संधी नाकारतो आहेस तू. दुसरं म्हणजे मी इथपर्यंत आलो आहे. बाहेर जाताना या इतक्या मोठ्या बॅगा घेऊन जाताना नक्कीच पकडलो जाईन. या बॅगा इथे ठेवून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही मला. उद्या हे पैसे इथे सापडले, तर तूच अडकशील. कोणतंही स्पष्टीकरण तुझा बचाव करू शकणार नाही. कदाचित तुझ्यावर संशोधन परकीय राष्ट्रांना विकल्याचा , देशद्रोहाचा आरोप ठेवला जाईल. नुकसान तुझंच आहे. मी काय सडाफटिंग आहे.." सुमीतची आणखी एक खेळी.

स्वप्निलकडे निरुत्तर होण्याखेरीज दुसरं काहीच नव्हतं. स्वप्निलने ब्रायनकडे पाहिलं. मिळणारा फायदा आणि होणारं नुकसान याचा ब्रायन अंदाज घेत होता.
"तुला किती भूतकाळात जायचंय?" ब्रायनला फायद्यातोट्याचा अंदाज आला होता. सुमीतने सांगितलेली गोष्ट करण्यात नुकसान काहीच होणार नव्हतं, उलट दोघांना मिळून एकशे दहा कोटी रुपये मिळणार होते. यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे भूतकाळात जाण्यासाठी कालयंत्र अजून टेस्ट केलं गेलेलं नव्हतं. तेदेखील जमणार होतं.
"आठ नोव्हेंबरला नोटबंदी झाली. त्याअगोदर दोन महिने.. आठ सप्टेंबर चालेल. महिन्याभरात मी ते पैसे गुंतवून टाकीन." सुमीत सगळा अभ्यास करून आला होता. परफेक्ट प्लॅन होता त्याचा.
"पण आमच्या प्रयोगाला काही मर्यादा आहेत. वर्तमानकाळात परत येण्यासाठी कालयंत्र तिथे असण्याची आवश्यकता आहे. तू ज्या काळात जायचं म्हणतो आहेस, त्या काळात कालयंत्र उपलब्ध नसणार. आज वीस डिसेंबर आहे. तू म्हणतोस ती तारीख जवळजवळ साडेतीन महिने अगोदरची आहे. इतक्या लांबच्या काळासाठी कालयंत्राची चाचणी कधीच केलेली नाहीये. तीही भूतकाळात." ब्रायनने सुमीतला प्रयोगातले धोके समजावून सांगितले.

"मला कल्पना आहे. धोका पत्करल्याशिवाय काहीच मिळत नाही. कालयंत्रातून कालप्रवास करून मी भूतकाळात जाईन . कालयंत्र उपलब्ध होईपर्यंत मला तिथेच राहावं लागेल ना!मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी कालयंत्रातून भूतकाळात जायला तयार आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. लवकरच सकाळ होईल. त्याअगोदर मला इथून गेलं पाहिजे." सुमीत मनाची पूर्ण तयारी करून आलेला होता.

सकाळी साडेपाचशे कोटी रुपये रोख, तेही जुन्या चलनात बाळगले म्हणून सापडण्यापेक्षा सुमीतला कालयंत्रातून साडेतीन महिने भूतकाळात पाठवणं हे कमी जोखमीचं होतं.

स्वप्निलने सुमीतला कालयंत्रात बसल्यावर काय करायचं, काय नाही, काय काळजी घ्यायची याच्या सूचना दिल्या.ब्रायनने यंत्राचे कंट्रोल्स बरोबर आहेत हे पाहिलं.
सुमीत कालयंत्रात बसला. हेल्मेट, सीट बेल्ट नीट आहेत हे पाहिलं. ब्रायनने कालयंत्राच्या कॅबिनेटचं दार बंद केलं. कालमापनाच्या डायलवर उणे एकशेपाच दिवस टारगेट टाइम सेट केला. स्विच ऑन केलं.


गुर्र्र्र्र.. गुंईं.. बीप.. बीप.. कालयंत्राच्या कंट्रोल पॅनेलवरचे दिवे जोरात लुकलुकायला लागले.यंत्राच्या कॅबीनेटच्या काचेतून आत सुमीत हिरव्या धुक्यात वेढलेला दिसायला लागला. तो हळूहळू नाहीसा होताना, विरत जाताना दिसला.

सुमीत आठ सप्टेंबरच्या काळात पोहोचल्याचा सिग्नल मिळाला. गेले अडीच तास कालयंत्र सतत काही ना काही सिग्नल्स देत होतं. त्यातली मशीनरी, प्रोसेसर्स सगळं तापून गरम झालं होतं, एसी होता तरीही लॅबच्या खोलीत अक्षरशः भट्टीत बसल्याइतकं उकडत होतं. खोलीतलं तापमान वाढतच चाललं होतं. ढप्प.. बाहेर कसलासा जोरात आवाज आला. खोलीतले सगळे दिवे बंद झाले. इमर्जन्सी सायरन वाजू लागला. नक्की काय होतंय तेच कळत नव्हतं.

लाइट गेली होती. कालयंत्राचा बॅटरी बॅकअपही काम करत नव्हता. दरवाजा ऑटो लॉक असल्याने बंद झाला होता. लाइट आल्याशिवाय तो उघडणं शक्य नव्हतं. अंधार असल्याने काही दिसत नव्हतं. आ आ आ आ आ आ आ.. एक तीव्र प्रखर प्रकाश आणि पाठोपाठ ब्रायनचं ओरडणं.. काय झालं ते समजणं कठीण होतं. ब्रायनला काहीतरी झालं होतं, हे नक्की. पुढे जावं की कसं? या संभ्रमात स्वप्निल. आणि पुढे जायचं म्हणजे अंधारात जायचं तरी कुठे? स्वप्निल जीव मुठीत धरून तिथूनच ओरडला, “ब्रायन.. ब्रायन..” कसलाच प्रतिसाद आला नाही.


तासभर तरी हा गोंधळ चालू राहिला. तासाभरानंतर लॅबमधले दिवे लागले. स्वप्निलने सर्वप्रथम ब्रायनचा शोध घेताला. ब्रायन जमिनीवर पडला होता. बेशुद्ध होऊन. त्याचा चेहरा काळानिळा झाला होता. मॉनिटरचा स्क्रीन तडा जाऊन फुटला होता.
स्वप्निलला गरगरायला लागलं.. त्याची शुद्ध हरपायला लागली.
स्वप्निलने डोळे उघडले. डोळ्यासमोर पांढरंशुभ्र काहीतरी दिसलं. आजूबाजूला नजर फिरली. तो हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये बेडवर होता. बेडशेजारी ठेवलेल्या स्टँडवरून निघत सलाइनच्या पिशवीतून एक प्लास्टिकची नळी थेट त्याच्या मनगटावर आली होती, औषधाचा पुरवठा करत होती. समोर हार्टबीट मॉनिटर चालू होता.

“हॅलो, गुड मॉर्निंग. कसं वाटतंय?” स्वप्निलच्या डोळ्यांची हालचाल पाहून एका नर्सने त्याची विचारपूस केली.
“सर.. सर.. पेशंटला शुद्ध आली आहे.” स्वप्निलच्या उत्तराची वाट न पाहता नर्सने रिपोर्ट केलं.
“मी कुठे आहे? आणि ब्रायन.. ब्रायन कुठे आहे? त्याला काय झालंय?” आपण बेशुद्ध होण्यापूर्वी जमिनीवर पडलेला ब्रायन स्वप्निलला आठवला.
“ते अजूनही बेशुद्ध आहेत. तुम्ही वापरत असलेल्या मशीनमधल्या अल्ट्रासाउंड वेव्ह्जमुळे तुमच्या दोघांच्याही हृदयाला झटका बसला, त्यामुळे तुम्ही बेशुद्ध झालात असा प्राथमिक अंदाज आहे. उपचार चालू आहेत.”


आठ दिवसांनंतर स्वप्निल घरी आला. हे सुरक्षा नियमांच्या बाहेर होतं, पण स्वप्निलची मन:स्थिती पाहता त्याला खास परवानगी देण्यात आली होती. घराबाहेर साध्या वेशातले सिक्युरिटी ठेवले होते. आल्या-गेल्या प्रत्येकाची नोंद काटेकोरपणे ठेवली जात होती.

त्या दिवशी अपघात नुसत्या या दोघांना झाला नाही, तर त्या अल्ट्रासाउंड वेव्ह्जमुळे लॅबमधली बरीच उपकरणं नादुरुस्त झाली. मुख्य प्रोसेसिंग युनिट पूर्ण बिघडलं. उष्णतेमुळे आतील सर्किट्स वितळून गेली. स्वप्निल कामावर रुजू झाल्यानंतर ते युनिट उभं करण्यात महिनाभर तरी जाईल. प्रोसेसिंग युनिटचं आणखी काय नुकसान झालं, ते त्यानंतर कळेल. स्टँडबाय ठेवलेल्या प्रोसेसरवर अल्ट्रासाउंड वेव्ह्जचा काय परिणाम होतो, ते माहीत नव्हतं अजून.


"काय म्हणते तब्येत..." कमलाआत्या विचारपूस करायला आली. खूप थकल्यासारखी दिसतेय.. स्वप्निलला कमलाआत्याचा आवाज ऐकू आला. त्याने तिला हसून नमस्कार म्हणायचा प्रयत्न केला. अंगात डोळे उघडे ठेवायचंही त्राण नव्हतं. कमलाआत्या कधी निघून गेली ते समजलंही नाही.
स्वप्निलने डोळे उघडलेले पाहून आईने मोसंबी ज्यूसचा ग्लास पुढे केला. मोसंबी ज्यूसने बर्‍यापैकी ऊर्जा आली.
“अरे, काल कमलाआत्या येऊन गेली. किती काळजीत आहे, तरी तुला पाहून गेली.”
“का? काय झालं?”
“काय सांगू.. एक धड असेल तर ना! सुमीत तुला भेटायचं आहे म्हणत होता. तुझ्या अ‍ॅक्सिडेंटच्या दोन दिवस अगोदर इथे आला होता. बाबांशी बोलत होता. नंतर घरातून बाहेर पडला, तो परत आलाच नाही. त्याच्या मोबाइलवर फोन केला, तर रिंग येतेय पण रिप्लायच देत नाहीये कोणी. पैशाचे काही घोळ केलेत म्हणे त्याने. बाबा सांगतील बघ तुला.” आईच्या स्वरात काळजी आणि गॉसिप दोन्ही होतं.
“का हो, काय झालंय बाबा?” सुमीतचं नाव ऐकून स्वप्निलला काही संदर्भ लागले.
“अरे, काय सांगू.. तो नक्की काय करतो तेच समजत नाही. मागे तीन-एक महिन्यांपूर्वी अचानक कुठूनतरी खूपसे पैसे घेऊन आला. काहीशे कोटी होते म्हणे. नोटा रद्द होणार आहेत असं काहीतरी म्हणत होता. तेव्हा त्याच्या वडिलांनी मला फोनही केला होता. मी त्यांना म्हणालो की अशा कशा रद्द होतील नोटा अचानक? काहेतरी वेड्यासारखं बोलतोय तो.. सुमीतने त्या सगळ्या पैशांचं सोनं घेतलं आणि घरात ठेवलं. म्हणाला, चांगला भाव मिळाला की विकू.
कर्मधर्मसंयोगाने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मार्केट खूप वर होतं. भाव चांगला मिळाला, म्हणून सुमीतच्या वडिलांनी ते सगळं सोनं विकून टाकलं एका सराफ मित्राकरवी. अगदी रोखीत. चांगले पैसे सुटले.
पण काय म्हणतात ना ते.. बघ, पुढच्या आठवड्यात नोटबंदी झाली. आम्ही तुझ्याकडे आलो होतो ना, त्यानंतर परत आल्यावरच्या आठवड्यात सुमीत ते पैसे घेऊन कुठेतरी गेला आणि गायबच झालाय. तेव्हापासून त्याचा पत्ता नाहीये. तक्रारसुद्धा केली आहे पोलिसात तशी.”
बाबा बोलत होते, तशी स्वप्निलच्या डोक्यात चक्रं फिरू लागली.

नोटबंदी झाली.. सुमीतने जुन्या चलनातल्या नोटा गोळा केल्या.. त्याने कालप्रवास करून त्या नोटा भूतकाळात नेल्या.. त्यांचं सोनं घेऊन ठेवायचं आणि नोटबंदी झाल्यानंतरच्या काळात आल्यावर ते सोनं विकून टाकायचं, त्याचे नव्या चलनात पैसे घ्यायचे हा त्याचा अफाट तर्क. त्याने ठरवलं तसं घडलंही. फक्त एक चूक झाली - नोटबंदी व्हायच्या अगोदरच त्याच्या वडिलांनी ते सोनं विकून त्याचे पुन्हा रोख चलनात पैसे घेतले.

दुसरं म्हणजे सप्टेंबर महिन्यात कालयंत्र अस्तित्वातच नव्हतं. वर्तमानात येण्यासाठी सुमीतला किमान तीन महिने वाट पहावी लागणार होती. सुमीत जुन्या चलनातल्या नोटा घेणार, कालयंत्रातून भूतकाळात जाणार, तिथे तो ते जुन्या चलनातले पैसे देऊन त्याचं सोनं विकत घेणार, कालयंत्राचा शोध लागेपर्यंत वाट पाहणार.. तोपर्यंत नोटबंदी व्हायच्या अगोदरच त्याच्या वडिलानी ते सोनं विकून जुन्या चलनातच रोख पैसे केले.

स्वप्निलला समजत होतं.. सुमीत एका न संपणार्‍या रीकर्सिव्ह लूपमध्ये अडकला आहे. हे चक्र अव्याहत चालूच राहणार होतं. हे चक्र तोडायचं असेल तर कालयंत्राला भूतकाळात नेऊन सुमीतला वर्तमानात आणणं हाच उपाय होता.

कालयंत्राचा प्रोटोटाइप अपघातात मोडून पडलाय.. स्वप्निल तंदुरुस्त होऊन काम सुरू करत नाही, ब्रायन त्याच्या अर्धवट बेशुद्धीतून पूर्ण बाहेर येऊन लॅबमध्ये नवा प्रोटोटाइप बनवत नाही, कालयंत्र हातात घेऊन कुठेही जाण्याइतक्या लहान आकाराचं बनत नाही, तोपर्यंत तरी सुमीत या अशा दर साडेतीन महिन्यांनी घडण्यार्‍या कालचक्राच्या रीकर्सिव्ह लूपमध्ये अडकलेलाच राहणार..

प्रतिक्रिया

मार्गी's picture

6 Nov 2022 - 6:20 pm | मार्गी

मस्त रंगवलीय कथा! किंचितसा अंदाज आला होता नोटबंदीच्या उल्लेखामुळे. पण तरीही छान मांडणी केलीय!

पाषाणभेद's picture

7 Nov 2022 - 5:35 pm | पाषाणभेद

छान आधूनिक विज्ञानकथा.

कर्नलतपस्वी's picture

7 Nov 2022 - 7:56 pm | कर्नलतपस्वी

विजूभौ,
डोक्याचं दही झालं की!
किती वळणे,किती बोगदे,काहीच समजायला तयार नाही.

मुश्किलीने आयुष्याशी केमिस्ट्री जुळवलेली आम्ही माणसं, फिजिक्स, गणीत कसेकाय कळणार. कालयंत्र आणी नोटाबंदी आल्यावर ट्युब ढणाढणा पेटली.

मस्त खुलवून सांगीतली आहे कथा.
भारीच.

सौंदाळा's picture

11 Nov 2022 - 2:34 pm | सौंदाळा

हेच म्हणतो

मुक्त विहारि's picture

7 Nov 2022 - 8:03 pm | मुक्त विहारि

कथा आवडली

सुधीर कांदळकर's picture

8 Nov 2022 - 6:20 am | सुधीर कांदळकर

कालयंत्र आणि नोटबंदी यांचे अगदी सुंदर, देखणे कलम. उत्कंठा उत्तरोत्त्तर वाढत गेली. छान. धन्यवाद.

श्वेता२४'s picture

9 Nov 2022 - 2:53 pm | श्वेता२४

कथा खूप आवडली.

विजुभाऊ's picture

11 Nov 2022 - 7:04 am | विजुभाऊ

धन्यवाद

अनेकांची 'ठुसठुसती जखम' असलेला 'नोटबंदी' हा विषय विज्ञान कथेत घेतलात? कमाल आहे बुवा तुमची विजुभाऊ 🙏
कथा आवडली हे वेगळे सांगायला नकोच!

तुषार काळभोर's picture

11 Nov 2022 - 7:16 pm | तुषार काळभोर

५५० कोटी रुपये (१०००*१००*१००*१००*५.५ म्हणजे हजारांच्या नोटांचं लाखाचं बंडल, अशी ५५,००० बंडलं!)
म्हणजे अंदाजे ११०० किलो सोनं!! (अंदाजे अडतीस सेमी बाजू असलेला सोन्याचा घन ठोकळा!!)
या दोन गोष्टी कथा कल्पना स्वातंत्र्य म्हणून नजरेआड केल्या तर इंटरेस्टिंग कथा आहे.

याचा दुसरा भाग (ब्रायनचं काय झालं, स्वप्नील कालयंत्र कसे पूर्ण करतो, सुमित लूप मधून कसा बाहेर येतो, किंवा कसा बाहेर येऊ शकत नाही, कालप्रवासात अजून काय करता येईल) वाचायला आवडेल!!

चकवा लागला म्हणा की सुमित ला

श्वेता व्यास's picture

16 Nov 2022 - 2:45 pm | श्वेता व्यास

मस्त गोष्ट आहे, लूपची कल्पना आवडली.