दिवाळी अंक २०२२ - हळूहळू सवय होईल..

Primary tabs

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in दिवाळी अंक
5 Nov 2022 - 8:30 am

ळुहळू सवय होईल..

'तुला पाहिले मी नदीच्या किनारी'
- कवी ग्रेस

किंवा

'मेरे सामनेवाली खिडकी मे एक...'

असे काहीच नव्हते. दूरच्या काका-मामा-आत्याने सुचवले, मग स्वर्गातून आणलेल्या कागदपत्रांची देवाणघेवाण झाली. कांदेपोह्याचा कार्यक्रम झाला. थोरामोठ्यांचे शिक्कामोर्तब झाले आणि मग ते 'फुलले रे क्षण माझे' आले.

मित्रमंडळींनी स्वतःच्या अनुभवावरून धोक्याची सूचना दिली व आपले कर्तव्य पार पाडले.

'झुकी हुयी पलकें और सुरत भोली
'ऐ जी...वो जी... ....सुनो जी' की मीठी बोली।
सब महज नजरों का धोका है.
सोच ले, अब भी एक मौका है
आटे दाल का भाव पता चल जायेगा जब नजरे पैनी और मीजाज होंगे सख्त
तब ना रहेगा ताज ना रहेगा तख्त'।

- कसरत

स्वभाव वेगळे, घरात दोघेच दोघे.
'डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे' अशा अवस्थेतून 'काय तुझ्या मनात, सांग माझ्या कानात' असा हळूहळू बदल होत गेला. मग 'दिस चार झाले मन पाखरू होऊन'. दिवस कसे भरभर उडून जाऊ लागले लक्षातच आले नाही. संगीतमय, नादमय प्रवास चालू होते.

हळूहळू सवय होत गेली.

एक दिवस 'निळ्या आभाळी कातरवेळी' गौप्यस्फोट झाला अन् कातरवेळ मंगलवेळेत बदलली. दिवस पालटले. आनंदीआनंद. जबाबदारीची जाणीव झाली. 'बेड टी'चे कंत्राट आता त्याच्याकडे आले आणि अशी बरीच कामे त्याने आपणहोऊन ओढून घेतली.

हळूहळू सवय होत होती..

एक दिवस तो क्षण आला, ज्याने क्षणात बरीच नवी नाती जन्माला घातली. दोघांत तिसरी आल्यावर बाहेरच्या विश्वाचे दरवाजे अपसूकच बंद झाले व घरातच एक नवीन भावविश्व आकार घेऊ लागले.

ती त्यांचे विश्व आणि तिचेही विश्व ते दोघे. 'पहिली बेटी धनाची पेटी!' पण समाज मात्र अजूनही वेगळाच विचार करत होता. "मुलगीच का?" कुत्सित मनोवृत्तीच्या लोकांची संख्याही काही कमतरता नव्हती. ते दोघे त्यांच्याच विश्वात हरवले होते.

सारे लक्ष त्या नुकत्याच उमललेल्या कळीवर केंद्रित झाले. दोघांच्या आवडीनिवडी, रुसवेफुगवे केव्हाच उडन छू झाले होते. संसारनौकेचे सुकाणू आता त्या चिमुकल्या हातात आले.

"आज नाक वाहतंय, अंग गरम लागतंय" अशा वाक्यांनी घरात धरणीकंप होत होता. कधीकधी तर रात्रीचा दिवसही झाला.

हळूहळू सवय होत होती..

पहिला वाढदिवस, पहिलेच पाऊल, पहिलावहिला तोतला शब्द सगळ्याचाच उत्सव होत गेला. गोकुळ अष्टमीला कृष्णाच्या, नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांत तीच दिसत होती. 'सांता'ची टोपीसुद्धा आली. सर्व काही मोबाइलमध्ये कैद होत होते. पुन्हा पुन्हा दाखवत नव्याने चर्चा होत होती. सुखाचे क्षण वाळूप्रमाणे मुठीतून निसटत होते, त्याचे भान कुणालाच नव्हते.

हळूहळू सवय होत गेली..

एक घास चिऊचा, एक घास काऊचा करत इवलासा जीव मोठा होत होता. स्वयंपाकघरात कणीक दे म्हणून तिच्या पायामध्ये लुडबुड करणारी, गोष्ट सांग म्हणून हट्ट धरणारी, घोडा घोडा करत घरभर फिरवणारी जेव्हा बालवाडीत जायला निघाली, तेव्हा दोघांच्याही मनावर मणामणाचे अदृश्य ओझे आले. काय करेल? डबा खाईल का? कुणी मारणार तर नाही?.. एक ना अनेक प्रश्न. पहिली शाळा, पहिला दिवस, स्वतःच सोडायला निघाला. तिने जाण्याआगोदर त्याचे बौद्धिक घेतले आणि त्यानेसुद्धा निमूटपणे ऐकून घेतले.

अनुभवी, सुहास्यवदना शिक्षिकेने त्याच्या चेहर्‍यावरचे भाव ओळखले, गालातल्या गालात हसत तिने त्याला डोळ्यानेच धीर दिला आणि त्यांच्या काळजाच्या तुकडा घेऊन ती निघून गेली. तो दिसेनासा होईपर्यंत थांबला. थोड्या थोड्या वेळाने फोन वाजत होता. शाळा सुटायच्या आगोदरच तो शाळेत पोहोचला.

हळूहळू सवय होत गेली..

पुन्हा एकदा शाळा सुरू झाली. ए बी सी डी पुन्हा नव्याने ते दोघेही शिकू लागले. पी टी ए, स्नेहसंमेलन, एवढेच काय, दररोजचा आभ्यास एक मोठाच कार्यक्रम होऊ लागला.

याचीसुद्धा हळूहळू सवय होत गेली..

आवतीभोवती घुटमळणारी ती, हळूहळू बाहेरच्या जगात तिचे नवे विश्व निर्माण होत गेले. आईबापाचे म्हणणे ब्रह्मवाक्य समजणारी ती आता शाळेतल्या बाईंचे म्हणणेसुद्धा वेदवाक्य मानू लागली. आता त्या दोघांबरोबर कमी व मित्रमैत्रिणींबरोबर जास्त वेळ जाऊ लागला. आईबरोबर, बाबांबरोबर व मित्रमैत्रिणींबरोबर आता तिचे विश्व विभागले गेले. तिसर्‍या विश्वात जास्त वेळ जाऊ लागला, पण त्या दोघांचे जग तिच्यातच एकवटले होते. आता त्यांच्या वाट्याला ती कमीच येत होती.

हळूहळू सवय होत गेली..

शाळेतून हायस्कूल, पुढे कॉलेज. अजूनही ती लहानच वाटत होती. एक दिवस पाखराला पंख फुटले. उंच आकाशात भरारी घेण्याची तयारी झाली. होस्टेलवर जायचे, एकमेकापासून दूर होण्याचा तिचा आणि त्यांचा, दोघांचाही पहिलाच अनुभव. तयारी सुरू झाली. मित्रमौत्रिणींबरोबर पुढले मनोरे रचू लागले. पुन्हा एकदा आईबाबांच्या काळजात धस्स झाले..

नवीन कालेज, होस्टेल, मित्रमैत्रिणी, नवा मोबाइल.. नवीन वातावरणात रमली. त्या दोघांच्या मोबाइलच्या काॅल रेकाॅर्डवर तिचाच नंबर जास्त वेळा दिसत होता. आता बरेच वेळा मोबाइलवर पूर्वघोषित संदेश येऊ लागले -
"आप जिस नंबर पर बात करना चाहते है वह अभी व्यस्त हैl,
फिलहाल नेटवर्क क्षेत्र के बाहर हैl"

हळूहळू सवय होत गेली.

तो दिवस आला. ती गगनाला गवसणी घालायला, उंच भरारी घ्यायला निघाली. कधीच नाही म्हटले नव्हते. आता तरी कसे नाही म्हणणार? पंख छाटायचे नाहीत, म्हणून पुन्हा एकदा छातीवर दगड ठेवला गेला. ती मात्र खूश होती. त्यांच्या मन:स्थितीची तिला कल्पनाच नव्हती, तयारी झाली..

टर्मिनल दोनवरून तिला निरोप देताना दोघांच्या डोळ्यात पाणी आले. चटकन लपवले, पण चाणाक्ष पिल्लाच्या लगेच ते लक्षात आले. लवकरच येईन म्हणत निरोप घेत स्वतःच्या डोळ्यातले पाणी लपवत पुढे पुढे जात राहिली. पाठीमागे काय चाललेय ते माहीत होते.

काचेतून चार डोळे तिचा पाठलाग करत होते. शेवटी लाल रंगांच्या अनेक सूटकेसेसचा संगम झाल्यावर तिची कुठली याचा ते शोध घेऊ लागले. ती? नाही, ती! नाही नाही, तिच्या पलीकडची!

तिच्याबरोबर त्यांचाही मनातल्या मनात प्रवास चालू होता. इमिग्रेशन, मग सिक्युरिटी, मग बोर्डिग. विमान हवेत झेपावले.

"चला, जाऊ या. किती वेळ इथेच उभे राहणार आहात?" ती त्याला समजावते. दोघांची पावले आपल्या घरट्याकडे वळतात.

घरी आल्यावर तिच्या बंद खोलीकडे त्याचे लक्ष जाते. दारावरचे पोस्टर बघून त्याच्या चेहर्‍यावर हलकेच हसू फुटले.

"Beware, you are entering in the mess.......
.......enter at your own risk".

Tress passers will be prosecuted.

Tips & Toll are welcome."

दूरवरून शांताबाईंचे शब्द आणि पं. वसंतरावांचे स्वर हवेवर तरंगत आले.
...पुन्हा एकदा डोळ्यांनी धीर सोडला.

"दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे.."

होईल....

...हळूहळू सवय...

प्रतिक्रिया

सुखी's picture

6 Nov 2022 - 10:32 pm | सुखी

छान प्रवास लिहिला आहे

प्राची अश्विनी's picture

7 Nov 2022 - 7:52 am | प्राची अश्विनी

Relatable आहे खूपच. छान लिहिलंय.

कुमार१'s picture

7 Nov 2022 - 10:01 am | कुमार१

छान लिहिलंय

कर्नलतपस्वी's picture

7 Nov 2022 - 10:18 am | कर्नलतपस्वी

सुखी,प्राची आणी कुमार सर प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

कंजूस's picture

7 Nov 2022 - 11:31 am | कंजूस

थोडक्यात छान.

सध्या आमचे पिल्लू घरटे सोडून भरारीच्या फेज मध्ये आहे, त्यामुळे लेखातल्या सर्व भावभावना अगदी अलगद पोहचल्यात.

होईल सवय हळूहळू !

श्वेता व्यास's picture

7 Nov 2022 - 1:21 pm | श्वेता व्यास

खूप छान लिहिलं आहे. शेवट डोळ्यांना ओलं करून गेला.
आपणही आपल्या पालकांना असंच कधीतरी भावूक केलेलं असतं आणि आपली मुलंही कधीतरी आपल्याला भावूक करणार असतात.
खरंय, हळूहळू सवय होईल..

श्रीगुरुजी's picture

7 Nov 2022 - 1:29 pm | श्रीगुरुजी

खूपच छान लिहिलंय. लवकरच मुलगी लग्न होऊन परदेशी जाणार असल्याने तुम्हाला आलेले हळवे अनुभव आता आम्हालाही लवकरच येणार आहेत. जरा अवघड जाणार आहे. हळूहळू मनाची तयारी करतोय.

शशिकांत ओक's picture

7 Nov 2022 - 7:40 pm | शशिकांत ओक

फुंकर घालत पुढच्या प्रवासाला सामोरे जाताना मागच्या गोष्टी विसरायची हळूहळू सवय करायची असते असा संदेश भावला.

कर्नलतपस्वी's picture

15 Nov 2022 - 10:30 am | कर्नलतपस्वी

प्रतिसाद खुपच समर्पक.

मुक्त विहारि's picture

7 Nov 2022 - 8:09 pm | मुक्त विहारि

मनोगत आवडले

नगरी's picture

9 Nov 2022 - 12:49 pm | नगरी

सुंदर, फार काही शब्द नाहीत

नगरी's picture

9 Nov 2022 - 12:51 pm | नगरी

सुंदर, फार काही शब्द नाहीत,शीर्षक समर्पक

सस्नेह's picture

9 Nov 2022 - 1:12 pm | सस्नेह

छान लिहिलंय, टचिंग..

नीलकंठ देशमुख's picture

9 Nov 2022 - 5:54 pm | नीलकंठ देशमुख

छान लिहिलंय..हळुवार...आवडलं

चामुंडराय's picture

10 Nov 2022 - 8:50 am | चामुंडराय

छान लिहिले आहे !!

बदल हाच सर्व जगाचा स्थायीभाव आहे.

अनित्यम् अनित्यम् सर्वं अनित्यम् ।
क्षणिकम् क्षणिकम् सर्वं क्षणिकम् ।।

पॉइंट ब्लँक's picture

10 Nov 2022 - 9:12 am | पॉइंट ब्लँक

घरट बनन्यापासून ते रिकामे होण्यापर्यंतचा प्रवास छान रंगवला आहे.

गोरगावलेकर's picture

10 Nov 2022 - 12:44 pm | गोरगावलेकर

छान लिहिलंय

सौंदाळा's picture

11 Nov 2022 - 2:42 pm | सौंदाळा

पद्य - गद्य प्रवाही प्रवास आवडला कर्नलसाहेब.

एक दिवस तो क्षण आला, ज्याने क्षणात बरीच नवी नाती जन्माला घातली. दोघांत तिसरी आल्यावर बाहेरच्या विश्वाचे दरवाजे अपसूकच बंद झाले व घरातच एक नवीन भावविश्व आकार घेऊ लागले.

आयुष्यात कितीही वेगवेगळे बरे-बाईट प्रसंग आले तरी स्वतःचे मूल पहिल्यांदा बघण्याची तुलना दुसर्‍या कशाचीच करु शकत नाही.

टर्मीनेटर's picture

11 Nov 2022 - 7:32 pm | टर्मीनेटर

पद्य - गद्य प्रवाही प्रवास

प्रवाह जर गद्याचा असेल तर कितीही वेगवान प्रवाहाच्या उलटे पोहण्याचे बळ असलेले अस्मादिकांचे हात-पाय पद्याच्या प्रवाहात विरुद्ध दिशेने तर सोडाच, त्याच्या दिशेने जायचे म्हंटले तरी गळपटतात, त्यामुळे माझा पास! माझ्या आवाक्या बाहेरचंच काम आहे ते, जलसमाधी कन्फर्म 😀

आणि आता तर कर्नल साहेबांचा धागा मिपाच्या जनातलं मनातलं, काथ्याकुट, राजकारण, क्रिडा जगत, तंत्र जगत, अर्थजगत, कृषीजगत, भटकंती अशा कुठल्याही साहित्य विभागात दिसला तरी तो उघडताना गद्याच्या वेष्टणात गुंडाळलेले पद्य वाचायला मिळेल की काय अशी भिती वाटावी इतकी मला त्यांची दहशत बसली आहे 😀

कर्नल साहेब, रुक्ष, भवनाशुन्य, अरसिक वगैरे वगैरे कुठलेही लेबल लागले तरी मला कधिच त्याची पर्वा नसते पण मी काव्य, पद्य, कविता इत्यादींपासुन 'कोसों' दुर रहाणारा मनुष्य असल्याने कृपया माझा हा प्रतिसाद हलका घ्यावा हि नम्र विनंती.

कर्नलतपस्वी's picture

15 Nov 2022 - 10:32 am | कर्नलतपस्वी

+१

कर्नलतपस्वी's picture

11 Nov 2022 - 8:38 pm | कर्नलतपस्वी

रुक्ष, भवनाशुन्य, अरसिक

तुम्ही लेख वाचला,प्रतिसाद दिलात यातच सर्व आले.

मलाही कवीता,लेखन वगैरेचे व्यसन नव्हते.
एक गोळी एक दुश्मन अशी आमची ट्रेनिंग.

सेवानिवृत्तीनंतर मराठी वाचन वाढले. बोरकर,शांताबाई शेळके,भट,मोघे यांची गाणी पहिल्यांदा पण ऐकली होती पण आता वेळ आणी खाली डोके यामुळेच शब्दांकडे बारकाईने लक्ष द्यायला सुरवात केली.

कळालेच नाही काय गारूड झाले आणी कवीतेचा पंखा झालो. सध्या कुसुमाग्रज व ग्रेस वाचतोय.

एक कवीता एका पुस्तका बरोबर आहे.
आता तर कवितासंग्रह विकत आणतो आणी पारायणे करतो. खोलवर जातात.

आपल्याला सुद्धा कधी असा साक्षात्कार व्हावा.

तुम्ही "बायनरी" वाले जर चुकून कवीतेच्या "लुप" मधे फसलात तर तुमची अवस्था माझ्या सारखी होईल.

वाचणे थांबवू नका." हळुहळू सवय होईल"
बाकी तुमच्याच कडून शिकलो & # 128591 🙏

चौथा कोनाडा's picture

12 Nov 2022 - 6:57 pm | चौथा कोनाडा

खुप छान प्रतिसाद, कर्नल साहेब!

कर्नलतपस्वी's picture

12 Nov 2022 - 12:57 pm | कर्नलतपस्वी

सर्व वाचक ,प्रतिसादकांचे मनापासून आभार.

एका राजकुमारीचा प्रवास वाटला :) सुंदर!

कर्नलतपस्वी's picture

15 Nov 2022 - 10:35 am | कर्नलतपस्वी

मुलगी बापा साठी राजकुमारीच असते.प्रसंगी तो राणी बरोबर राजकुमारी करता पंगा घेतो.प्रतिसादाबद्दल धन्यवाद

सविता००१'s picture

2 Dec 2022 - 11:48 am | सविता००१

छानच आहे लेखन

श्वेता२४'s picture

2 Dec 2022 - 11:54 am | श्वेता२४

हे वाचायचं कसं काय राहून गेलं कुणास ठाऊक. परत एकदा दिवाळी अंक चाळायला हवा. किती सुंदर लिहीलंय तुम्ही. शेवटी शेवटी मन भरुन आलं अगदी. खूपच छान.

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Dec 2022 - 10:54 am | ज्ञानोबाचे पैजार

फारच सुरेख आणि तरल, अचूक आणि मोजक्या शब्दात सगळा प्रवास मांडला आहे.
लिहित रहा
पैजारबुवा,

कर्नलतपस्वी's picture

4 Dec 2022 - 11:15 am | कर्नलतपस्वी

सर्व वाचक प्रतिसादांचे मनापासून आभार.