आला पुन्हा हा पाऊस
गंध मातीचा घेऊन
ओल्या पावसाच्या सरी
गाती मल्हाराची धून
सात सुरांवर स्वार
आला थेंबाचा कुमार
भूल पडली कळीला
झाली लाजून ती चूर
फुले आसमंत सारा
गोड सरींत न्हाऊन
ओल्या पावसाच्या सरी
गाती मल्हाराची धून
बहकले हे आभाळ
काळे मेघ ते झिंगले
तुडुंबले नदी-नाले
नाते आभाळी जुळले
हिरव्याशा सावलीला
गाली हसले हे ऊन
ओल्या पावसाच्या सरी
गाती मल्हाराची धून
पानांफुलात पाऊस
सैरावैरा धावे वारा
धरणीच्या मिलनाने
अंगी फुलतो शहारा
रानभोळी पाखरे ही
जाती सरीत निजून
ओल्या पावसाच्या सरी
गाती मल्हाराची धून
राधाकृष्ण प्रणयाचे
गीत नवे पावसाचे
प्रेमवेड्या धरणीला
प्रेम मिळे नवसाचे
असा साजण पाऊस
घेई कुशीत रुजून
ओल्या पावसाच्या सरी
गाती मल्हाराची धून...
प्रतिक्रिया
5 Nov 2022 - 6:38 pm | कर्नलतपस्वी
पावसाचे शब्द चित्र मस्त लिहिलंय.
आवडले.
7 Nov 2022 - 12:38 pm | प्राची अश्विनी
आखीवरेखीव कविता आवडली.
10 Nov 2022 - 2:57 pm | रंगीला रतन
आवडली.