दिवाळी अंक २०२२ - माय नेम इज बॉंड... जेम्स बॉंड!

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in दिवाळी अंक
5 Nov 2022 - 3:36 pm

माय नेम इज बॉंड...
जेम्स बॉंड

माय नेम इज बॉंड... जेम्स बॉंड , व्होडका मार्टीनी... शेकन... नॉट स्टर्ड , 'डबल ओ सेव्हन' , 'नॉट नॉट सेव्हन' अशी वाक्ये वा शब्द कानावर पडले किंवा 007 हा आकडा पाहिला कि आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो 'जेम्स बॉंड' नावाचा एक स्टायलीश, देखणा, रुबाबदार नायक!

जगासाठी जरी त्याची ओळख ‘युनिव्हर्सल एक्स्पोर्टस’ नामक कंपनीचा प्रतिनिधी अशी असली तरी प्रत्यक्षात तो असतो, ब्रिटीश सरकारच्या मिलिटरी इंटेलिजन्स अंतर्गत आंतरराष्ट्रीय कारवायांत गुंतलेला विभाग ‘एमआय सिक्स’ (MI6) मध्ये कमांडर ह्या हुद्द्यावर कार्यरत असलेला आणि ‘डबल ओ सेव्हन’ ह्या संकेतनामाने ओळखला जाणारा गुप्तहेर.

प्रख्यात ब्रिटिश कादंबरीकार 'इयान फ्लेमिंग' ह्यांच्या लेखणीतून १९५३ साली साकार झालेल्या ‘जेम्स बॉंड’ नामक काल्पनिक पात्राने गेली सहा दशके जगभरातील असंख्य स्त्री / पुरुषांवर अक्षरशः गारुड केले आहे ते त्यांच्या लिखाणापेक्षा त्या पात्रावर आधारित असलेल्या चित्रपटांमुळे.

जेम्स बॉंडच्या नवीन चित्रपटाची घोषणा झाली कि लगेच त्यात 'बॉंडची भूमिका कोणता अभिनेता साकारणार?', 'बॉंडगर्ल्स कोण कोण असणार?', 'बॉंड कुठली कार आणि घड्याळ वापरणार?', 'कुठली नवीन गॅजेट्स बघायला मिळणार?' ह्याची उत्सुकता बॉंडपटांच्या चाहत्यांना लागून राहते आणि यथावकाश त्यावर चर्चाही सुरु होतात.

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे, १९६२ साली ‘डॉक्टर नो’ (Dr. No) ह्या पहिल्या बॉंडपटा पासून सुरु झालेला 'जेम्स बॉंड फ्रेंचाईज' चा हा प्रवास २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला पंचविसावा बॉंडपट ‘नो टाईम टू डाय’ (No Time to Die) पर्यंत अविरत सुरु आहे, आणि भविष्यातही सुरु राहील.

गेल्या साठ वर्षांत इऑन प्रोडक्शन्सद्वारे निर्मित (अधिकृत जेम्स बॉंड फ्रेंचाईज) बॉंडपटांच्या चित्रपट मालिकेतील पहिल्या 'डॉक्टर नो' (Dr. No) ह्या चित्रपटाच्या षष्ट्यब्दीपूर्तीचे औचित्य साधत आत्तापर्यंत प्रदर्शित झालेल्या पंचवीस बॉंडपटांची काही वैशिष्ट्ये आणि त्यात काळानुरूप झालेली स्थित्यंतरे ह्यांचा संक्षिप्त आढावा घेण्यासाठी हा लेखनप्रपंच.


ब्रँडेड वस्तू, उंची गाड्या, उंची कपडे, उंची मद्याचा आणि जुगाराचा शौक; सुंदर स्त्रिया सहजगत्या वश होतील अशी नजर, देहबोली आणि रुबाबदार व्यक्तिमत्व; हजरजवाबीपणाला मिष्कील पण काहीशा स्त्रीलंपट स्वभावाची जोड; एका बाजूला त्याचा प्रणयातला आवेग तर दुसऱ्या बाजूला अतिशय थंडपणे एखद्याची हत्या करण्यातली त्याची सहजता; एकीकडे अशा स्वभाववैशिष्ट्यांतून ठळकपणे जाणवणारी त्याची विलासीवृत्ती तर दुसरीकडे त्याच्या देशावर आलेले कुठलेही संकट मग ते कितीही मोठे असो, जीवाची बाजी लावून विलक्षण धैर्याने त्याचा सामना करत ते परतवून लावण्यातून अधोरेखित होणारी त्याची साहसी प्रवृत्ती; असे अनेक गुण-अवगुण ठायी असलेले 'जेम्स बॉंड' नामक गुप्तहेराचे हे काल्पनिक पात्र आपल्या कथा/कादंबरीतून जन्माला घालणाऱ्या 'इयान फ्लेमिंग' ह्यांची प्रतिभा मोठी कि चित्रपट माध्यमातून रुपेरी पडद्यावर दृष्य स्वरूपात साकारण्यात आलेली जेम्स बॉंडची 'लार्जर दॅन लाईफ' प्रतिमा जास्त मोठी असा प्रश्न पडतो .

असे म्हणतात की "लेखनावरून लेखकाच्या व्यक्तिमत्वाविषयी अंदाज बांधता येतो". जेम्स बॉंड ह्या काल्पनिक पात्राचे जनक 'इयान फ्लेमिंग' (Ian Fleming) ह्यांची कौटुंबिक, आर्थिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमी, त्यांच्या आवडी-निवडी आणि जीवनशैली अभ्यासली तर ह्या म्हणीच्या सत्यतेचा प्रत्यय येतो, त्यामुळे 'जेम्स बॉंड' हे पात्र आणि त्या व्यक्तिरेखेवर आधारित असलेल्या चित्रपटांविषयी काही लिहिताना त्याच्या जन्मदात्या लेखकाचा अल्प परिचय करून देणे अगत्याचे ठरते.


इयान लँकेस्टर फ्लेमिंग
जन्म 28 मे 1908 लंडन - इंग्लंड.
मृत्यू 12 ऑगस्ट 1964 कॅंटरबरी - इंग्लंड.

आजोबा 'स्कॉटिश बँकर' आणि वडील इंग्लंड मधील 'कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार' अशी सधन व विशेषाधिकार प्राप्त असलेली कौटुंबिक पार्श्वभूमी लाभलेल्या घरात जन्मलेल्या आणि इंग्लंड, जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्ये शिक्षण घेतलेल्या इयान फ्लेमिंग ह्यांनी 1929 ते 1933 ह्या काळात मॉस्कोमध्ये पत्रकारिता आणि त्यानंतर 1935 ते 1939 ह्या कालावधीत 'बँकर आणि स्टॉक ब्रोकर' म्हणून काम केले. पुढे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात (1939–1945) ब्रिटिश नौदलच्या 'गुप्तचर विभागात' उच्च पदस्थ अधिकारी म्हणून काम केल्यानंतर पुढल्या काळात ते 'लंडन संडे टाइम्स' च्या व्यवस्थापक पदावर कार्यरत होते.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी गुप्तहेरावर आधारित कादंबरी लिहिण्याची आपली इच्छा मित्रमंडळींकडे व्यक्त केली होती, पण ती पूर्ण होण्यासाठी १९५२ साल उजाडावे लागले. पूर्णवेळ लेखक होण्या आधीपासूनच इयान फ्लेमिंग हिवाळ्याचा कालावधी त्यांच्या १४ एकर क्षेत्रफळावर पसरलेल्या सेंट मेरी, ओराकबेसा - जमैका येथील 'गोल्डनआय इस्टेट' ह्या निवासस्थानी व्यतीत करत असत. १९०४ साली स्थापन झालेल्या अमेरिकेतील 'रॉयल टाईपरायटर कंपनीने' वर्षभराने येऊ घातलेला आपला सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी 'सुवर्णाच्छादित टाईपरायटर्स' (Gold Plated Typewriters) ची एक विशेष आवृत्ती तयार केली होती. त्यासाठी १७४ अमेरिकन डॉलर्स खर्चून आपली मागणी नोंदवलेल्या इयान फ्लेमिंग ह्यांना १५ जानेवारी १९५२ रोजी तो टाईपरायटर त्यांच्या जमैका मधील 'गोल्डनआय इस्टेट' येथे प्राप्त झाला.

'सुवर्णाच्छादित टाईपरायटर'

5 मे 1995 रोजी जेम्स बॉंडची भूमिका साकारणारा आयरिश अभिनेता पियर्स ब्रॉस्ननने इयान फ्लेमिंग ह्यांचा हा टाईपरायटर लंडनमधील साउथ केन्सिंग्टन रूम्स येथे झालेल्या 'क्रिस्टीच्या' लिलावात जोरदार बोली लावत तब्बल 56,250 पाउंड्सना खरेदी केला.

त्यानंतर जवळपास महिन्याभराने, १७ फेब्रुवारी १९५२ रोजी आपले वैयक्तिक अनुभव आणि कल्पनाशक्तीच्या बळावर इयान फ्लेमिंग ह्यांनी त्यांच्या गोल्ड प्लेटेड टाईपरायटरवर 'कॅसिनो रोयाल' (Casino Royale) ही आपली पहिली कादंबरी टंकण्यास सुरुवात केली आणि १८ मार्च १९५२ रोजी ती टंकून पूर्ण केली. पुढच्या वर्षी, १३ एप्रिल १९५३ रोजी युनायटेड किंगडम मध्ये प्रकाशित झालेल्या 'कॅसिनो रोयाल' ह्या कादंबरीची पहिल्याच महिन्यात दुसरी आवृत्ती काढावी लागली इतकी ती यशस्वी ठरली आणि त्या कादंबरीतुन जन्माला आलेलया 'जेम्स बॉंड' ह्या काल्पनिक पात्रालाही अफाट लोकप्रियता लाभली.

बालपणापासूनच उच्चभ्रू वातावरणात वाढलेल्या आणि महागड्या वस्तूंचा शौक बाळगणाऱ्या इयान फ्लेमिंग ह्यांनी आपल्या कथा/कादंबऱ्यांतून नायक 'जेम्स बॉंड', खलनायक आणि अन्य काही महत्वाची पात्रे रंगवताना मोठ्या खुबीने आपल्या व्यक्तिगत आवडीनिवडी आणि जीवनशैली ही त्या पात्रांची स्वभाव वैशिष्ट्ये म्हणून सादर केली. मग ते बॉंडच्या मनगटावरील 'रोलेक्स'चे घड्याळ असो, सोन्याच्या 'कफ लिंक्स' असोत कि त्याची वेशभूषा. सोन्याविषयी त्यांना असलेल्या आकर्षणाचा प्रभाव त्यांच्या कादंबऱ्यांच्या शीर्षकांमधुनही जाणवतो, जसे की 'गोल्डफिंगर', 'द मॅन विथ द गोल्डन गन'. गोल्डफिंगर ह्या कादंबरीच्या कथानकात त्यांनी आपल्या 'गोल्ड प्लेटेड टाईपरायटर'ला देखील स्थान दिले, आणि पुढे त्यावर आलेल्या बॉंडपटात निर्माता/दिग्दर्शकाने टाईपरायटरच्या त्या मॉडेलचे चित्रपटात दर्शनही घडवले.

आपल्या लेखन कारकिर्दीत इयान फ्लेमिंग ह्यांनी 'जेम्स बॉंड' वर १२ कादंबऱ्या आणि ९ लघुकथा लिहिल्या. दरवर्षी त्यांचे एक पुस्तक प्रकाशित होण्याच्या परंपरेत १९६४ साली झालेल्या त्यांच्या मृत्यूनंतरही पुढची दोन वर्षे खंड पडला नाही.

१. कॅसिनो रोयाल (१३ एप्रिल १९५३), २. लिव्ह अँड लेट डाय (५ एप्रिल १९५४), ३. मूनरेकर (५ एप्रिल १९५५). ४. डायमंडस आर फॉरएव्हर (२६ मार्च १९५६), ५. फ्रॉम रशिया विथ लव्ह (८ एप्रिल १९५७ ), ६. डॉक्टर नो (३१ मार्च १९५८), ७. गोल्डफिंगर (२३ मार्च १९५९), ८. फॉर युअर आईज ऑन्ली - कथा संग्रह (११ एप्रिल १९६०), ९. थंडरबॉल (२७ मार्च १९६१), १०. द स्पाय हू लव्हड मी (१६ एप्रिल १९६२), ११. ऑन हर मॅजेस्टीज सिक्रेट सर्व्हिस (१ एप्रिल १९६३), १२. यु ऑन्ली लिव्ह ट्वाईस (१६ मार्च १९६४) अशा अकरा कादंबऱ्या आणि एक कथासंग्रह त्यांच्या हयातीत, तर १३. द मॅन विथ द गोल्डन गन (१ एप्रिल १९६५) ही कादंबरी आणि १४. ऑक्टोपसी अँड द लिव्हिंग डेलाईट्स (२३ जून १९६६) हा कथा संग्रह त्यांच्या मृत्यूपश्चात पुस्तक रूपाने प्रकाशित झाला.

'इयान फ्लेमिंग ह्यांच्या पुस्तक संग्रहाचे प्रतीकात्मक छायाचित्र'

इयान फ्लेमिंग ह्यांनी 'जेम्स बॉंड' वर लिहिलेल्या सर्वच कादंबऱ्या आणि (एखाद दुसरा अपवाद वगळता) लघुकथांचा वापर बॉंडपटांच्या निर्मितीसाठी केला गेला. अर्थात सिनेमा रुपांतरणात त्यांनी लिहिलेल्या कथेत अनेक लक्षणीय बदल केले गेले तर काही प्रसंगी चित्रपटाचे केवळ शीर्षक त्यांच्या कथा/कादंबरीच्या शीर्षकावरून देण्यात आले. 'जेम्स बॉंड फ्रेंचाईज' अंतर्गत निर्माण झालेले चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या प्रचंड यशस्वी ठरल्याने पुढे बॉंडपटांसाठी अन्य लेखकांकडून नव्याने कथा लिहून घेतल्या गेल्या आणि अशा नवीन बॉंड कथांवर निर्मित चित्रपटही कमालीचे यशस्वी ठरले.

"इयान फ्लेमिंग ह्यांची पुस्तके चित्रपटांइतकीच महत्त्वाची असली तरी, मुळ कथा वा कादंबरी आणि त्यावर बनवलेला चित्रपट ह्यात अनेकदा जमीन आस्मानाचा फरक असतो. कित्येकदा कादंबरी वाचली असेल तर त्यावर आधारित असलेला चित्रपट हा निराश करतो, त्या उलट काही चित्रपट हे मुळ कथेशी फारकत घेऊनही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरून व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरतात आणि मूळ कथा वा कादंबरी वाचण्यापेक्षा ती चित्रपट स्वरुपात बघणे जास्त आनंददायी वाटते त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे फ्लेमिंग ह्यांच्या कथा/कादंबऱ्यांवर बेतलेले बॉंडपट."


इऑन प्रोडक्शन्स

चित्रपट निर्माते अल्बर्ट आर. ब्रोकोली आणि हॅरी सॉल्टझमन अशा दोघांनी 1961 साली स्थापन केलेली 'इऑन प्रोडक्शन्स लि.' (Eon Productions Ltd) हि ब्रिटीश चित्रपट निर्मिती कंपनी 'अधिकृतरीत्या' बॉंडपटांची (जेम्स बॉंड फ्रेंचाईज) निर्मिती करण्यासाठी सुप्रसिद्ध आहे. कंपनीद्वारे 'डॉक्टर नो' (1962) ते 'द मॅन विथ द गोल्डन गन' (1974) अशा नऊ बॉंडपटांची निर्मिती झाल्यानंतर १९७५ साली हॅरी सॉल्टझमन आपले शेअर्स 'युनायटेड आर्टिस्टला' विकून कंपनीतून बाहेर पडला असला आणि १९९६ साली अल्बर्ट आर. ब्रोकोली ह्यांचे निधन झाले तरी इऑन प्रोडक्शन्सची मालकी अजूनही ब्रोकोली कुटुंबाकडेच आहे. अल्बर्ट आर. ब्रोकोली ह्यांच्या मृत्युपश्चात त्यांची मुलगी 'बार्बरा ब्रोकोली' आणि त्यांचा सावत्र मुलगा 'मायकेल जी. विल्सन' हे कंपनीची धुरा सांभाळत असून नवनवीन बॉंडपटांच्या निर्मितीत त्यांनी अद्याप खंड पडू दिला नाहीये.

१९६२ ते २०२२ अशा साठ वर्षांत इऑन प्रोडक्शन्सने एकूण पंचवीस बॉंडपटांची निर्मिती केली आहे. ह्या चित्रपटांचे पोस्टर्स तयार करण्याच्या शैलीतही स्थित्यंतर झाल्याचे ठळकपणे जाणवते. सुरुवातीला चित्रकाराच्या कुंचल्यातून साकार झालेली चित्ररूपी पोस्टर्स पुढच्या काळात डिजिटलाईज होत गेली आणि त्यांची रंगसंगतीही बदलत गेली, तर काही पोस्टर्सवर एखाद्या उत्पादनाची जाहिरातही बघायला मिळाली. आत्तापर्यंत प्रदर्शित झालेल्या पंचवीस बॉंडपटांच्या मूळ पोस्टर्सची धावती झलक...


जेम्स बॉंड 'पोस्टर' पंचवीशी

०१
डॉक्टर नो

०२
फ्रॉम रशिया विथ लव्ह

०३
गोल्डफिंगर

०४
थंडरबॉल

०५
यु ऑन्ली लिव्ह ट्वाईस

०६
ऑन हर मॅजेस्टीज सिक्रेट सर्व्हिस

०७
डायमंडस आर फॉरएव्हर

०८
लिव्ह अँड लेट डाय

०९
द मॅन विथ द गोल्डन गन

१०
द स्पाय हू लव्हड मी

११
मूनरेकर

१२
फॉर युअर आईज ऑन्ली

१३
ऑक्टोपसी

१४
अ व्हयु टू अ किल

१५
द लिव्हिंग डेलाईट्स

१६
लायसन्स टू किल

१७
गोल्डनआय

१८
टूमॉरो नेव्हर डाईज

१९
द वर्ल्ड इज नॉट इनफ

२०
डाय अनादर डे

२१
कॅसिनो रोयाल

२२
क्वांटम ऑफ सॉलेस

२३
स्कायफॉल

२४
स्पेक्टर

२५
नो टाईम टू डाय


०१
डॉक्टर नो

०२
फ्रॉम रशिया विथ लव्ह

०३
गोल्डफिंगर

०४
थंडरबॉल

०५
यु ऑन्ली लिव्ह ट्वाईस

०६
ऑन हर मॅजेस्टीज सिक्रेट सर्व्हिस

०७
डायमंडस आर फॉरएव्हर

०८
लिव्ह अँड लेट डाय

०९
द मॅन विथ द गोल्डन गन

१०
द स्पाय हू लव्हड मी

११
मूनरेकर

१२
फॉर युअर आईज ऑन्ली

१३
ऑक्टोपसी

१४
अ व्हयु टू अ किल

१५
द लिव्हिंग डेलाईट्स

१६
लायसन्स टू किल

१७
गोल्डनआय

१८
टूमॉरो नेव्हर डाईज

१९
द वर्ल्ड इज नॉट इनफ

२०
डाय अनादर डे

२१
कॅसिनो रोयाल

२२
क्वांटम ऑफ सॉलेस

२३
स्कायफॉल

२४
स्पेक्टर

२५
नो टाईम टू डायरुपेरी पडद्यावरचे 'जेम्स बॉंड'

सहा दशके सुरु असलेल्या आणि चित्रपटांच्या जागतिक इतिहासातील 'सर्वात दीर्घ चित्रपट मालिका' असा लौकिक मिरवणाऱ्या 'जेम्स बॉंड फ्रेंचाईज' अर्थात बॉंडपटांच्या चित्रपट मालिकेत मुख्य नायकाची भूमिका वठवणारे अभिनेते काळानुरूप बदलणे अत्यंत स्वाभाविक आहे. त्याला अनुसरून साठ वर्षांच्या कालखंडात सहा अभिनेत्यांनी रुपेरी पडद्यावर जेम्स बॉंडची भूमिका समर्थपणे साकारली आहे.

James Bond

जेम्स बॉंडची भूमिका साकारणारे सहा अभिनेते

शॉन कॉनरी

जॉर्ज लझेन्बी

रॉजर मूर

टिमोथी डाल्टन

पिअर्स ब्रॉस्नन

डॅनिअल क्रेग


शॉन कॉनरी

इऑन प्रोडक्शन्स निर्मित 'डॉक्टर नो' ह्या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पहिल्यांदा दृश्य स्वरुपात 'जेम्स बॉंड' साकारण्याची संधी स्कॉटिश अभिनेते 'शॉन कॉनरी' ह्यांना मिळाली आणि त्यांनी अर्थातच त्या संधीचे सोने केले. गमतीचा भाग म्हणजे १९६२ साली आलेला 'डॉक्टर नो' हा बॉंडपटांच्या मालिकेतील पहिला चित्रपट इयान फ्लेमिंग ह्यांच्या १९५८ साली प्रकाशित झालेल्या आणि 'जेम्स बॉंड' वर लिहिलेल्या सहाव्या कादंबरीवर आधारित होता.

आपले रुबाबदार व्यक्तिमत्व आणि उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर शॉन कॉनरी ह्यांनी साकारलेला जेम्स बॉंड प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरल्याने अवघ्या १.१ दशलक्ष डॉलर्सच्या तुटपुंज्या बजेटमध्ये निर्माण झालेल्या ह्या बॉंडपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास ६० दशलक्ष डॉलर्सचा व्यवसाय केला. बॉंडची भूमिका केलेल्या पहिल्याच चित्रपटाला घवघवीत यश मिळाल्यानंतर शॉन कॉनरी ह्यांनी 'फ्रॉम रशिया विथ लव्ह (१९६३)' , 'गोल्डफिंगर (१९६४)' , 'थंडरबॉल (१९६५)' आणि 'यु ऑन्ली लिव्ह ट्वाईस (१९६७)' अशा पुढच्या चार चित्रपटांमध्ये यशस्वीपणे जेम्स बॉंड साकारल्यावर मालिकेतील आगामी चित्रपटामध्ये बॉंडची भूमिका न करण्याचा निर्णय घेतला आणि १९६९ साली आलेला 'ऑन हर मॅजेस्टीज सिक्रेट सर्व्हिस' हा चित्रपट नाकारून तो अमलातही आणला. परंतु त्यापुढचा सातवा बॉंडपट 'डायमंडस आर फॉरएव्हर' मध्ये पुन्हा त्यांनीच बॉंडची भूमिका करावी ह्यासाठी निर्मात्यांनी त्यांची मनधरणी करून त्यांना त्या चित्रपटात जेम्स बॉंडची भूमिका करण्यास राजी केले. १९७१ साली 'डायमंडस आर फॉरएव्हर' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मात्र शॉन कॉनरी ह्यांनी बॉंडपटांतून आपली निवृत्ती जाहीर केली. जेम्स बॉंडची भूमिका साकारणाऱ्या सहा अभिनेत्यांपैकी माझ्या वैयक्तिक पसंतीक्रमात सत्तरचे दशक गाजवणारे 'शॉन कॉनरी' हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत

25 ऑगस्ट 1930 रोजी एडिनबर्ग ,स्कॉटलंड येथे जन्मलेल्या, १९९९ साली आजीवन कामगिरीसाठी अमेरिकेतील 'केनेडी सेंटर ऑनर' हा सन्मान आणि २००० साली राणी एलिझाबेथ II ह्यांच्या हस्ते 'नाइट' पुरस्कार प्राप्त झालेल्या ह्या महान अभिनेत्याचा 31 ऑक्टोबर 2020 रोजी वयाच्या नव्वदाव्या वर्षी बहामास येथे मृत्यू झाला.


जॉर्ज लझेन्बी

'यु ऑन्ली लिव्ह ट्वाईस' ह्या चित्रपटानंतर शॉन कॉनरी ह्यांनी जेम्स बॉंडची भूमिका न करण्याचा निर्णय घेतल्यावर मालिकेतील सहावा बॉंडपट 'ऑन हर मॅजेस्टीज सिक्रेट सर्व्हिस ( १९६९)' मध्ये जेम्स बॉंडची भूमिका साकारण्यासाठी ऑस्ट्रेलियन मॉडेल 'जॉर्ज लझेन्बी' ह्यांची वर्णी लागली आणि त्यांनीही चित्रपटात बॉंडची भूमिका छान वठवली आहे.

'ऑन हर मॅजेस्टीज सिक्रेट सर्व्हिस' मधील बॉंडच्या भूमिकेसाठी साठी नव्या अभिनेत्याचा शोध सुरु होता तेव्हा जॉर्ज लझेन्बी ह्यांनी 'शॉन कॉनरी' ह्यांचे कपडे शिवणाऱ्या टेलरचे दुकान गाठून त्यांच्यासारखा सूट शिवून घेतला आणि त्यांच्या आधीच्या बॉंडपटांतून प्रचंड लोकप्रिय झालेल्या 'रोलेक्स सबमरिनर' ह्या महागड्या घड्याळाची खरेदीही केली आणि अशा जय्यत तयारीनीशी ते 'जेम्स बॉंडच्या' भूमिकेसाठी ऑडीशन द्यायला गेले. ह्यावरून 'शॉन कॉनरी' ह्यांनी 'जेम्स बॉंड' साकारताना त्या काल्पनिक पात्राला कुठल्या उंचीवर नेऊन ठेवले होते ह्याचा अंदाजही येतो आणि 'जॉर्ज लझेन्बी' हे देखील ती भूमिका मिळवण्यासाठी किती गंभीरपणे प्रयत्नशील होते हे सुद्धा जाणवते. पण जेम्स बॉंड साकारण्यासाठी साजेसे व्यक्तिमत्व आणि गुणवत्ता असूनही दुर्दैवाने जॉर्ज लझेन्बी ह्यांना केवळ 'ऑन हर मॅजेस्टीज सिक्रेट सर्व्हिस' ह्या एकमेव बॉंडपटात जेम्स बॉंडची भूमिका साकारण्याची संधी देण्यात आली आणि मालिकेतील पुढच्या बॉंडपटासाठी ('डायमंडस आर फॉरएव्हर') निर्मात्यांनी 'शॉन कॉनरी' ह्यांचे मन वळवून बॉंडप्रेमींच्या माथी 'जॉर्ज लझेन्बी' सारख्या तरण्याबांड 'बॉंड' ऐवजी थोडा वयस्कर 'बॉंड' मारला.

२००६ साली आलेल्या 'कॅसिनो रोयाल' ह्या डॅनिअल क्रेग अभिनित चित्रपटातून 'बॉंड' चा स्वभाव थोडा सौम्य / भावनिक झाल्याचे जाणवते, पण बॉंडची अशी बदललेली स्वभाव वैशिष्ट्ये आपल्याला त्याच्या ३७ वर्षे आधी आलेल्या 'ऑन हर मॅजेस्टीज सिक्रेट सर्व्हिस' मध्येही बघायला मिळतात. ह्या चित्रपटात जॉर्ज लझेन्बी ह्यांनी साकारलेला जेम्स बॉंड 'तेरेसा दि विसेन्झो' (अभिनेत्री: डायना रिग) हिच्या केवळ प्रेमातचं पडत नाही तर थेट तिच्याशी लग्नही करतो. परंतु एकूणच 'जेम्स बॉंडच्या' कुंडलीत 'संसारसुख' अजिबातच नसल्याने त्याच्या नवपरिणीत वधूची लग्नाच्या दिवशीच हत्या होते.

असो, केवळ एकाच चित्रपटात जेम्स बॉंडची भूमिका साकारायला मिळाली असली तरी ती भूमिका करणाऱ्या सहा अभिनेत्यांपैकी माझ्या पसंतीक्रमात 'जॉर्ज लझेन्बी' हे चौथ्या क्रमांकावर आहेत.


रॉजर मूर

१९७१ साली प्रदर्शित झालेल्या 'डायमंडस आर फॉरएव्हर' ह्या चित्रपटानंतर शॉन कॉनरी ह्यांनी बॉंडपटांतून आपली निवृत्ती जाहीर केली होती. 'ब्लॅक्सप्लॉयटेशन' (Blaxploitation) चित्रपट लोकप्रिय होत असतानाच्या आणि ब्लॅक पँथर पार्टी सारख्या सामाजिक चळवळी जोर धरत असतानाच्या काळात 'कृष्णवर्णीय' व्यक्ती खलनायकाच्या भूमिकेत दाखवत चित्रपट काढणे हे खरोखर धाडसी पाऊल होते. तरी ती जोखीम पत्करून १९७३ साली प्रदर्शित झालेल्या 'लिव्ह अँड लेट डाय' ह्या चित्रपटातून नव्या 'जेम्स बॉंड' च्या रुपात 'रॉजर मूर' ह्यांनी दमदार पदार्पण केले आणि हा चित्रपटही व्यावसायिकदृष्ट्या चांगलाच यशस्वी ठरला त्यामुळे बॉंडपटांच्या इतिहासात ऐशीच्या दशकात झालेला एक मोठा बदल म्हणून 'रॉजर मूर' ह्यांच्याकडे पाहता येईल.

पदार्पणातच घवघवीत यश मिळवणाऱ्या 'रॉजर मूर' ह्यांनी 'जेम्स बॉंड' मालिकेतील 'लिव्ह अँड लेट डाय (१९७३)' , 'द मॅन विथ द गोल्डन गन (१९७४)' , 'द स्पाय हू लव्हड मी (१९७७)' , 'मूनरेकर (१९७९)' , 'फॉर युअर आईज ऑन्ली (१९८१)' , 'ऑक्टोपसी (१९८३)' आणि 'अ व्हयु टू अ किल (१९८५)' अशा सात चित्रपटांत बॉंडची भूमिका साकारली. एकाच अभिनेत्याने सर्वात जास्ती वेळा जेम्स बॉंडची भूमिका करण्याचा त्यांचा हा अनोखा विक्रम आजही अबाधित आहे.

रॉजर मूर ह्यांच्या पदार्पणानंतर बॉंडपटांत विनोदाचे आणि एकोळी संवादांचे प्रमाण थोडे वाढले होते पण तेवढ्यापुरतेच ते स्थित्यंतर मर्यादित नव्हते. त्यांच्या आधीच्या बॉंडपटांत बॉंडच्या घड्याळाचा 'ब्रँड' हा मुख्यत्वे 'रोलेक्स सबमरिनर' (Rolex Submariner) हाच राहिला होता, क्वचित प्रसंगी 'ब्रेटलिंग' (Breitling), 'ग्रुएन' (Gruen) अशा अन्य 'ब्रँड्स' चे दर्शन घडले असले तरी जेम्स बॉंडचे घड्याळ म्हणजे 'रोलेक्स' हे समीकरण पक्के झाले होते. पण 'रॉजर मूर' ह्यांनी साकारलेल्या बॉंडने रोलेक्सच्या जोडीने 'हॅमिल्टन पल्सर' (Hamilton Pulsar LED watch) , 'सिको' (Seiko) अशी डिजिटल घड्याळेही वापरायला सुरुवात केली आणि ' क्यू' ब्रांच कडून त्यांच्यात अनेक चमत्कारिक गोष्टींची भर घालण्यात आली. एवढेच नाही तर सिकोच्या घड्याळांची 'द स्पाय हू लव्हड मी' चित्रपटाच्या पोस्टरवर जाहिरातही करण्यात आली.

जेम्स बॉंडची भूमिका साकारणाऱ्या सहा अभिनेत्यांपैकी माझ्या वैयक्तिक पसंतीक्रमात ऐशीचे दशक गाजवणारे 'रॉजर मूर' हे पाचव्या क्रमांकावर आहेत.


टिमोथी डाल्टन

प्रेक्षकांना 'रॉजर मूर' ह्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या बघायला लाऊन एकदाचे समाधान झाल्यावर निर्माता/दिग्दर्शकांनी बॉंड प्रेमींना आधीच्या किमान दोन चित्रपटांपासून हवाहवासा वाटत असलेला बदल करण्याचे अखेरीस मनावर घेतले आणि 'द लिव्हिंग डेलाईट्स' ह्या 'जेम्स बॉंड' मालिकेतील पंधराव्या चित्रपटातून 'टिमोथी डाल्टन' नव्या कोऱ्या 'बॉंडच्या' रुपात रुपेरी पडद्यावर अवतरले.

'द लिव्हिंग डेलाईट्स (१९८७)' आणि 'लायसन्स टू किल (१९८९)' अशा दोनच बॉंडपटांत 'जेम्स बॉंड'ची भूमिका साकारायची संधी मिळालेल्या 'टिमोथी डाल्टन' ह्यांनी 'रॉजर मूर' ह्यांच्या प्रत्येक नव्या चित्रपटागणिक बोथट होत चाललेल्या 'जेम्स बॉंड' नावाच्या तलवारीला नव्याने धार चढवली आणि त्या पात्राला पुन्हा एकदा 'शॉन कॉनरी' ह्यांनी साकारलेल्या बॉंडच्या जवळपास नेण्याचे काम चोख बजावले.

जेम्स बॉंडची भूमिका साकारणाऱ्या सहा अभिनेत्यांपैकी माझ्या वैयक्तिक पसंतीक्रमात नव्वदच्या दशकात बॉंडला गतवैभव पुन्हा प्राप्त करून देणारे 'टिमोथी डाल्टन' हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.


पिअर्स ब्रॉस्नन

'पिअर्स ब्रॉस्नन' ह्यांच्याबद्दल काय बोलायचं? ...बस नाम ही काफी है!

१९८९ साली आलेल्या टिमोथी डाल्टन ह्यांच्या 'लायसन्स टू किल' ह्या बॉंडपटानंतर तब्बल सहा वर्षे सुप्तावस्थेत गेलेल्या 'जेम्स बॉंड' चित्रपट मालिकेला पुन्हा जागृतावस्थेत आणण्याचे महत्कार्य करत १९९५ साली 'गोल्डनआय' ह्या चित्रपटातून नव्या 'जेम्स बॉंड' च्या रुपात धडाकेबाज पदार्पण करणाऱ्या पिअर्स ब्रॉस्नन ह्यांच्या आगमनातून बॉंडपटांमध्ये अमुलाग्र बदल घडले आणि 'जेम्स बॉंड' हे पात्र एका नव्या उंचीवर जाऊन पोचले.

मुळात 'जेम्स बॉंड' ची भूमिका करण्यासाठी पिअर्स ब्रॉस्नन ह्यांची निवड झाली तेव्हा 'इयान फ्लेमिंग' ह्यांनी लिहिलेल्या कथा / कादंबऱ्यांचा साठा संपला होता. नाही म्हणायला 'कॅसिनो रोयाल' ही फ्लेमिंग ह्यांची पहिली कादंबरी आणि 'क्वांटम ऑफ सॉलेस' ही लघुकथा बाकी होती ज्यावर 'इऑन प्रोडक्शन्सने ' अद्याप चित्रपटाची निर्मिती केली नव्हती. पण 'कॅसिनो रोयाल' ह्या कादंबरीवर १९६७ साली त्याच नावाने अन्य निर्मात्याचा एक विडंबनात्मक चित्रपट येऊन गेला होता म्हणून तिचा विचार त्यावेळी झाला नसावा.

अशा परिस्थितीत मालिका पुन्हा सुरु करताना 'इयान फ्लेमिंग' ह्यांची छाप नसलेली पूर्णपणे नवीन कथा घेऊन 'गोल्डनआय' ह्या बॉंडपटाची निर्मिती करण्यात आली. फक्त चित्रपटाचे शीर्षक तेवढे 'इयान फ्लेमिंग' ह्यांच्या जमैका मधील 'गोल्डनआय इस्टेट' वरून देण्यात आलेला हा चित्रपट आणि नवीन बॉंडच्या रूपातला देखणा 'पिअर्स ब्रॉस्नन' आणि त्याचा अभिनय प्रेक्षकांना आवडला व हा बॉंडपट व्यावसायिकदृष्ट्या जगभरात कमालीचा यशवी ठरला.

पिअर्स ब्रॉस्नन पर्वात बॉंडपटांमध्ये झालेले आणखीन दोन महत्वाचे बदल म्हणजे पहिल्यांदाच जेम्स बॉंडच्या वरिष्ठांच्या म्हणजे MI6 चे प्रमुख 'M' ह्या भूमिकेत एक स्त्री (अभिनेत्री: जुडी डेंच) दाखवण्यात आली. तसेच बॉंडचे घड्याळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'रोलेक्स'ला सोडचिठ्ठी देत 'गोल्डनआय' ह्या चित्रपटापासून मालिकेतील पुढच्या सर्व बॉंडपटांसाठी 'ओमेगा' (Omega) हा घड्याळाचा ब्रँड अधिकृतपणे स्वीकारला गेला.

पिअर्स ब्रॉस्नन ह्यांनी 'गोल्डनआय (१९९५)' , 'टूमॉरो नेव्हर डाईज (१९९७)' , 'द वर्ल्ड इज नॉट इनफ (१९९९)' आणि 'डाय अनादर डे (२००२)' अशा एकूण चार चित्रपटांत जेम्स बॉंडची भूमिका साकारली आहे.

जेम्स बॉंडची भूमिका साकारणाऱ्या सहा अभिनेत्यांपैकी माझ्या वैयक्तिक पसंतीक्रमात 'जेम्स बॉंड' चित्रपट मालिकेला पुन्हा उर्जीतावस्थेत आणणारे 'पिअर्स ब्रॉस्नन' हे अर्थातच पहिल्या क्रमांकावर आहेत.


डॅनिअल क्रेग

एकविसाव्या शतकातील पहिल्या दशकाच्या उत्तरार्धात 'पिअर्स ब्रॉस्नन' ह्यंच्या जागी 'जेम्स बॉंड'च्या भूमिकेसाठी 'डॅनिअल क्रेग' ह्यांची निवड झाली तेव्हाचं बॉंडप्रेमींच्या भुवया थोड्या साशंकतेने उंचावल्या गेल्या होत्या. 'इयान फ्लेमिंग' ह्यांच्या १३ एप्रिल १९५३ रोजी प्रकाशित झालेल्या पहिल्या कादंबरीवर आधारित असलेल्या 'कॅसिनो रोयाल (२००६)' ह्या बॉंडपटातून डॅनिअल क्रेग ह्यांनी नव्या बॉंडच्या रुपात पदार्पण केले. तब्बल ५३ वर्षे जुन्या कथेवर बेतलेला असूनही हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला तसेच 'जेम्स बॉंड' ह्या पत्राच्या स्वभाव वैशिष्ट्यांमध्ये झालेले बदल स्वीकारून हाडाच्या बॉंड प्रेमींनीही डॅनिअल क्रेग ह्यांना नव्या बॉंडच्या रुपात स्वीकारले. अर्थात त्या चित्रपटात डॅनिअल क्रेग ह्यांनी निर्विवादपणे चांगले काम केले होते, पण त्यानंतर दोनचं वर्षांनी आलेल्या त्यांच्या 'क्वांटम ऑफ सॉलेस (२००८)' ह्या चित्रपटाने मात्र बॉंड प्रेमींची घोर निराशा केली. माझ्या मते १९६२ ते २०२१ ह्या कालावधीत प्रदर्शित झालेल्या पंचवीस बॉंडपटांतला हा एकमेव 'तद्दन भिकार' असा चित्रपट होता.

'क्वांटम ऑफ सॉलेस' च्या अपयशातून धडा घेत बॉंडपट निर्मात्यांनी चार वर्षांचा वेळ घेऊन २०१२ साली पुन्हा एकदा 'नवी कोरी' कथा घेऊन तयार केलेला त्यांचा पुढचा चित्रपट 'स्कायफॉल' प्रदर्शित करून 'जेम्स बॉंड फ्रेंचाईज' चा सुवर्ण महोत्सव मोठ्या दणक्यात साजरा केला. चित्रपट नक्कीच चांगला होता, जेम्स बॉंडची भूमिका करण्याचे वय उलटून गेले असले तरी अस्सल बॉंड प्रेमींनी 'डॅनिअल क्रेग' ह्यांचा हा शेवटचा बॉंडपट असणार हे गृहीत धरुन त्यांच्यावर टिका न करता उलट त्या चित्रपटाचे स्वागतच केले, पण बॉंड प्रेमींचे हे गृहीतक चुकीचे ठरवत निर्मात्यांनी त्यानंतरही 'स्पेक्टर (२०१५)' आणि 'नो टाईम टू डाय (२०२१)' अशा पुढच्या दोन बॉंडपटांतून 'डॅनिअल क्रेग' नावाचा 'म्हातारा बॉंड' पुन्हा पुन्हा त्यांच्या माथी मारला .

अर्थात हे दोन्ही चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरले असले तरी 'जेम्स बॉंड फ्रेंचाईज' आणि 'जेम्स बॉंड' ह्या पात्राच्या कट्टर चाहत्यांचे समाधान करण्यात ते पूर्णपणे अपयशी ठरले आहेत हे नाकारता येणार नाही.

असो, एक कलाकार /अभिनेता म्हणून मला आवडत असले तरी जेम्स बॉंडची भूमिका साकारणाऱ्या सहा अभिनेत्यांपैकी माझ्या वैयक्तिक पसंतीक्रमात 'डॅनिअल क्रेग' हे 'शेवटच्या' सहाव्या क्रमांकावर आहेत.


रुपेरी पडद्यावरच्या 'बॉंड गर्ल्स'

बॉंडपटांच्या चाहत्यांसाठी 'जेम्स बॉंड' प्रमाणेच 'बॉंड गर्ल्स' हा देखील जिव्हाळ्याचा विषय आहे.

'जेम्स बॉंड फ्रेंचाईज'च्या नवीन चित्रपटाची घोषणा झाली कि लगेच त्यात 'बॉंडची भूमिका कोणता अभिनेता साकारणार?', 'बॉंडगर्ल्स कोण कोण असणार?', 'बॉंड कुठली कार आणि घड्याळ वापरणार?', 'कुठली नवीन गॅजेट्स बघायला मिळणार?' ह्याची उत्सुकता बॉंडपटांच्या चाहत्यांना लागून राहते आणि यथावकाश त्यावर चर्चाही सुरु होतात.

'जेम्स बॉंड' आणि 'रोमान्स' ह्यांचं एक अतूट नातं आहे. 'इयान फ्लेमिंग' ह्यांनी आपल्या कथा/कादंबऱ्यांतून 'जेम्स बॉंड' हे पात्र रंगवताना प्रणयासक्ती आणि काहीसा स्त्रीलंपटपणा ही त्याची स्वभाव वैशिष्ट्ये म्हणून पेश केली आहेत त्यामुळे अशा पात्राच्या सहवासात अनेक सुंदर/आकर्षक स्त्रिया येणे हे स्वाभाविक आहे.

हेरगिरीच्या पेशात असलेल्या 'जेम्स बॉंडच्या' नशिबात संसारसुख नाही, त्यामुळे घर, लग्न, बायको, मुले-बाळे अशा प्रापंचिक गोष्टींनाही त्याच्या आयुष्यात स्थान नाही. "एखाद्या स्त्रीची 'जेम्स बॉंडशी' भावनिक जवळीक वाढली की तिचा मृत्यू अटळ" हे एक पक्के समीकरण असल्याने बॉंडपटांमध्ये झळकणाऱ्या अभिनेत्री ह्या बॉंडच्या 'नायिका' नसतात, त्या असतात 'बॉंड गर्ल्स'. अर्थात जेम्स बॉंडच्या आयुष्यात येणारी प्रत्येक स्त्री ही त्याची हितचिंतकच असेल ह्याची शाश्वती नाही. काही त्याच्या सहकारी असतात, काही हितचिंतक किंवा मित्रपक्षातल्या असतात तर काही थेट त्याचा जीव घेण्यासाठी टपलेल्या शत्रुपक्षातील असतात. पण त्यांचा पक्ष कुठला ह्याच्याशी अर्थातच बॉंडला काहीही देणे घेणे नसते, सहसा त्यांचा शक्य तेवढा उपभोग घेणे एवढीच त्याची अपेक्षा असते. नाही म्हणायला ह्यालाही 'ऑन हर मॅजेस्टीज सिक्रेट सर्व्हिस ( १९६९)' मधली 'तेरेसा दि विसेन्झो' (अभिनेत्री: डायना रिग) आणि 'कॅसिनो रोयाल (२००६)' मधली 'व्हेस्पर लिंड' (अभिनेत्री: इवा ग्रीन) अशा दोन 'बॉंडगर्ल्स' अपवाद आहेत पण त्यांचीही गत चित्रपटाच्या शेवटी वर म्हंटल्या प्रमाणे "एखाद्या स्त्रीची 'जेम्स बॉंडशी' भावनिक जवळीक वाढली की तिचा मृत्यू अटळ" अशीच होते.

गेल्या साठ वर्षांत प्रदर्शित झालेल्या पंचवीस बॉंडपटांतून सुमारे ७५ अभिनेत्रींना 'बॉंड गर्ल' म्हणून रुपेरी पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली आहे आणि त्यातल्या पाच जणींचा अपवाद वगळता कुठल्याही अभिनेत्रीला पुन्हा बॉंडगर्लची भूमिका करण्याची संधी मिळालेल नाही.

पंचवीस बॉंडपटांतून झळकलेल्या सर्व बॉंड गर्ल्स चे फोटोज ह्याठिकाणी देणे अप्रस्तून वाटत असल्याने प्रत्येक बॉंडपटातील मला आवडलेल्या एका बॉंड गर्लचा फोटो असलेला स्लाईड शो खाली देत आहे.


बॉंड गर्ल्स - स्लाईड शो

01 - डॉक्टर नो
पात्र: हनी रायडर
अभिनेत्री: उर्सुला अँड्रेस

02 -फ्रॉम रशिया विथ लव्ह
पात्र: तातियाना रोमानोव्हा
अभिनेत्री: डॅनिएला बियांची

03 - गोल्डफिंगर
पात्र: पुसी गॅलोर
अभिनेत्री: ऑनर ब्लॅकमन

04 - थंडरबॉल
पात्र: पॉला कॅप्लान
अभिनेत्री: मार्टिन बेसविक

05 - यु ऑन्ली लिव्ह ट्वाईस
पात्र: किसी सुझुकी
अभिनेत्री: मी हामा

06 - ऑन हर मॅजेस्टीज सिक्रेट सर्व्हिस
पात्र: तेरेसा दि विसेन्झो
अभिनेत्री: डायना रिग

07 - डायमंडस आर फॉरएव्हर
पात्र: टिफनी केस
अभिनेत्री: जिल सेंट जॉन

08 - लिव्ह अँड लेट डाय
पात्र: सॉलिटेअर
अभिनेत्री: जेन सेमोर

09 - द मॅन विथ द गोल्डन गन
पात्र: मेरी गूडनाईट
अभिनेत्री: ब्रिट एकलंड

10 - द स्पाय हू लव्हड मी
पात्र: अन्या अमासोवा
अभिनेत्री: बार्बरा बाख

11 - मूनरेकर
पात्र: होली गुडहेड
अभिनेत्री: लोइस चिलीस

12 - फॉर युअर आईज ऑन्ली
पात्र: मेलिना हॅवलॉक
अभिनेत्री: कॅरोल बूके

13 - ऑक्टोपसी
पात्र: ऑक्टोपसी
अभिनेत्री: मॉड अ‍ॅडम्स

14 - अ व्हयु टू अ किल
पात्र: स्टेसी सटन
अभिनेत्री: तान्या रॉबर्ट्स

15 - द लिव्हिंग डेलाईट्स
पात्र: लिंडा
अभिनेत्री: केल टायलर

16 - लायसन्स टू किल
पात्र: लुपे लमोरा
अभिनेत्री: तालिसा सोटो

17 - गोल्डनआय
पात्र: नताल्या सिमोनोव्हा
अभिनेत्री: इझाबेला स्कॉरपको

18 - टूमॉरो नेव्हर डाईज
पात्र: पॅरिस कार्व्हर
अभिनेत्री: तेरी हॅचर

19 - द वर्ल्ड इज नॉट इनफ
पात्र: इलेक्ट्रा किंग
अभिनेत्री: सोफी मार्सो

20 - डाय अनादर डे
पात्र: जिंक्स
अभिनेत्री: हॅले बेरी

21 - कॅसिनो रोयाल
पात्र: सोलांज दिमित्रीओस
अभिनेत्री: कॅथरीना मुरिनो

22 - क्वांटम ऑफ सॉलेस
पात्र: स्ट्रॉबेरी फील्ड्स
अभिनेत्री: जेम्मा आर्टरटन

23 - स्कायफॉल
पात्र: सेव्हेरिन
अभिनेत्री: बेरेनिस मारलोह

24 - स्पेक्टर
पात्र: एस्ट्रेला
अभिनेत्री: स्टेफनी सिग्मन

25 - नो टाईम टू डाय
पात्र: पालोमा
अभिनेत्री: आना डी आर्माससहा दशकांच्या कालावधीत झालेले बदल/स्थित्यंतरे ही केवळ जेम्स बॉंडची भूमिका साकारणारे अभिनेते, त्यांच्या अभिनय शैली, बॉंडची घड्याळे आणि स्वभाव वैशिष्ट्ये व बॉंड गर्ल्स पुरतीचं मर्यादित नाहीत तर मुख्य नायक 'जेम्स बॉंडच्या' जोडीने प्रचंड लोकप्रिय झालेल्या 'एम' (M) ह्या संकेताक्षराने ओळखले जाणारे MI6 चे प्रमुख, त्यांची सेक्रेटरी 'मनी पेनी' (Moneypenny), 'क्यु ब्रँच' ह्या ब्रिटिश सिक्रेट सर्व्हिसेसच्या काल्पनिक 'संशोधन आणि विकास' शाखेचे 'क्वार्टर मास्टर' म्हणून ओळखले जाणारे प्रमुख 'मेजर बूथरॉईड' (जे पुढे 'क्यु' (Q) ह्या संकेताक्षराने ओळखले जाऊ लागले) अशा जवळपास प्रत्येक चित्रपटात दिसणाऱ्या, तर 'फिलिक्स लाइटर' हा अनेक बॉंडपटांतुन बॉंडचा सहकारी/मित्र म्हणून दिसलेला सी.आय.ए. (CIA) एजंट अशी अन्य महत्वाची पात्रे साकारणाऱ्या अभिनेता/अभिनेत्रीं आणि बॉंडने वापरलेल्या गाड्या आणि अन्य वाहनां मध्येही वेळोवेळी बदल होत गेले. पंचवीस बॉंडपटांत केवळ जेम्स बॉंडने स्वतः चालवलेल्या किंवा ज्यातून त्याने प्रवास केला आहे अशा किंवा चित्रपटातील अन्य महत्वाच्या पात्रांनी उपयोगात आणलेल्या कार्स, मोटारसायकल्स, बोटी, जहाजे, पाणबुड्या, रणगाडे, विमाने, हेलिकॉप्टर्स अशी सुमारे साडेतीनशे पेक्षा जास्ती वेगवेगळ्या प्रकारची आणि बनावटीची वाहने वापरली गेली आहेत.

खरंतर 'जेम्स बॉंड' ह्या विषयाची व्याप्ती पाहता सहा दशकांत आलेल्या पंचवीस बॉंडपटांचा संक्षिप्त आढावा एका लेखातून घेणे ही गोष्ट केवळ अशक्यच नाही तर मुळात तसा प्रयत्न करणेही 'महापाप' आहे आणि मिपाच्या दिवाळी अंकात हा लेख लिहिण्यातून हे पाप माझ्या हातून घडल्याचे मी कबुल करतो आणि 'पापक्षालन' म्हणून 'जेम्स बॉंड फ्रेंचाईज'च्या सर्व चित्रपटांचे रसग्रहण करणारी पंचवीस भागांची मालिका मिपावर लिहिण्याचा संकल्प करून शब्दमर्यादेचे भान ठेवत आत्ता इथेच थांबतो.


सर्व मिपा सदस्य, मिपा वाचक आणि संपादक मंडळाला दीपावली आणि नूतन वर्षाच्या मंगलमय शुभेच्छा!

(कट्टर बॉंड प्रेमी) टर्मीनेटर

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

5 Nov 2022 - 5:29 pm | कुमार१

सुरेख आढावा घेतला आहे.
पुढील संकल्प सिद्धीस जावो आणि आम्हाला मेजवानी मिळो :)

जिओ!!
सुंदर ओघवता आढावा.

पिअर्स ब्रॉस्नन माझाही सर्वाधिक आवडता बॉन्ड! काय त्याचं रणगाडा चालवणं, काय त्याचं न्युटनला आव्हान देत पडणार्‍या विमानापेक्षा वेगाने खाली येऊन विमान सावरणं सगळंच भारी!!
लहानपणी ज्युरासिक पार्क नंतर पहिल्यांदा हॉलीवूडपट पाहिला तो थेट २००३ मध्ये. वेस्टएण्डला डाय अनादर डे पाहिलेला आताही स्पष्ट आठवतो.
पहिली सेक्सी बॉन्डगर्ल पाहिली तीदेखील पिअर्स ब्रॉस्ननसोबतच. समुंदर में नहाके नमकीन होकर बाहेर येणारी हॅले बेरी पाहताच 'त्या' वयात कलेजा खल्लास झाला होता.

आणि 'पापक्षालन' म्हणून 'जेम्स बॉंड फ्रेंचाईज'च्या सर्व चित्रपटांचे रसग्रहण करणारी पंचवीस भागांची मालिका मिपावर लिहिण्याचा संकल्प करून ..

प्रतिक्षा करत आहोत!!

.mi-container1 {
position: relative;
width: 100%;
overflow: hidden;
padding-top: 56.25%; /* 16:9 Aspect Ratio */
}

.responsive-iframe {
position: absolute;
top: 0;
left: 0;
bottom: 0;
right: 0;
width: 100%;
height: 100%;
border: none;
}

पिअर्स ब्रॉस्नन माझाही सर्वाधिक आवडता बॉन्ड! काय त्याचं रणगाडा चालवणं, काय त्याचं न्युटनला आव्हान देत पडणार्‍या विमानापेक्षा वेगाने खाली येऊन विमान सावरणं सगळंच भारी!!

+1000
बाब्बो... कसलं भारी वाटलं होतं हे सगळं मोठ्या पडद्यावर बघताना त्यावेळी 🤩
आता विषय काढलाच आहात त्या दोन थरारक प्रसंगांचा तर त्यांच्या व्हिडिओ क्लिप्स अ‍ॅडवणे भागच आहे 😇

.

.

पहिली सेक्सी बॉन्डगर्ल पाहिली तीदेखील पिअर्स ब्रॉस्ननसोबतच. समुंदर में नहाके नमकीन होकर बाहेर येणारी हॅले बेरी पाहताच 'त्या' वयात कलेजा खल्लास झाला होता.

लग्नाच्या आधी कैक वर्षे प्रेयसीच्या भूमिकेत असलेल्या बायको बरोबर हा बॉंडपट पहिला होता तरीही माझी परिस्थिती काही वेगळी नव्हती, ती तुम्ही वर म्हंटल्या प्रमाणेच झाली होती 😍 पुढे लग्नानंतरही कित्येक दिवस त्यावरून टोमणे ऐकावे लागले होते, मग नावे बदलत गेली. मागची काही वर्षे प्रियांका चोप्रावरून ऐकत आहे, तिच्या नंतर कोण असेल माहित नाही! आता हॅले बेरीचाही विषय निघालाच आहे तर त्या सीनची उजळणीही झालीच पाहिजे राव...
(हिंदी डब्ड क्लिप असल्याने संवाद फार विनोदी वाटत आहेत, पण इथे संवाद ऐकायचेत कोणाला 😀)

.
गमतीची गोष्ट म्हणजे हॅले बेरीच्या आधी पहिल्यांदा असं 'समुंदर में नहाके नमकीन' होत एन्ट्री मारण्याचा 'बहुमान' आपल्या जन्माच्याही कित्येक वर्षे आधी आलेला पहिला बॉंडपट 'डॉक्टर नो' मध्ये त्याकाळी 'स्विस सेक्स बॉम्ब' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'उर्सुला अँड्रेस' ह्या अभिनेत्रीला मिळाला होता...

कंजूस's picture

5 Nov 2022 - 8:09 pm | कंजूस

धमाल.

आलो आलो's picture

5 Nov 2022 - 9:10 pm | आलो आलो

लहानपणी दिवाळी आणि त्यानंतर शाळा परत सुरु होईपर्यंत हाच खेळ कितीतरी वर्षे सुरु होता
कालौघात हातातील बंदुकीची रेंज कळली आणि हळूहळू खेळ बदलत गेला.
पण बॉन्डपट ? ये तो फेव्हरेट था है और रहेगा !

Pierce ब्रॉस्नन
हा आपला ऑल टाइम आवडता बॉण्ड .
आणि बॉण्ड गर्ल तर सगळ्याच आवडत्या फक्त मोनिका बेलुन्स्की ला एकदा बॉण्ड गर्ल च्या रूपात पाहण्याची इच्छा .

टर्मिनेटर आपल्या लेखाने अंकाची सुरुवात केली आणि “का एव्हढी वाट पाहताय त्या अंकाची घरी ४-४ अंक आले असतानाही ?” या बायकोच्या प्रश्नाला उत्तर द्यायला पुरावा मिळाला.
धडाकेबाज लेख धडाकेबाज अंक !

आता आठवडाभर पुरवून पुरवून चव घेईल .
ता क - चकल्या चिवडा आणि ब्लॅक अँड व्हाईट सोबतीला मिपादिअं आनंद आनंद आनंद ....

परत शब्द राहिला
मोनिका बेलुन्स्की ला परत एकदा बॉण्ड गर्ल च्या रूपात पाहण्याची इच्छा .असे वाचावे

.mi-container1 {
position: relative;
width: 100%;
overflow: hidden;
padding-top: 56.25%; /* 16:9 Aspect Ratio */
}

.responsive-iframe {
position: absolute;
top: 0;
left: 0;
bottom: 0;
right: 0;
width: 100%;
height: 100%;
border: none;
}

@ आलो आलो, बंदुकीचा किस्सा भारी!

मोनिका बेलुन्स्की ला एकदा बॉण्ड गर्ल च्या रूपात (परत) पाहण्याची इच्छा

ओह, पण दुर्दैवाने आता तुमची ही इच्छा पुर्ण होण्याची शक्यता तशी बरीच कमी वाटत आहे. वयच्या ५१ व्या वर्षी बाँड गर्ल होण्याचा अनोखा विक्रम ह्या अभिनेत्रीने नोंदवलाय ह्यबद्दल तीचे कौतुक नक्कीच वाटते आणि विशेष म्हणजे तिचे वय एवढे असेल असे २०१५ सालचा 'स्पेक्टर' बघताना अजिबात जाणवले नव्हते. त्यावेळी ४७ वर्षांचा असलेल्या डॅनीअल क्रेग पेक्षा 'लुसिया सायरा' चे पात्र साकारणारी ५१ वर्षीय मोनिका बेलुसी मला किमान १०-१२ वर्षांनी तरुण वाटत होती. अर्थात अगदीच छोटासा (जेमतेम ६ मिनीटांचा) रोल देउन चित्रपटात तिला अक्षरशः वाया घालवली आहे असे नक्कीच म्हणता येईल.
प्रत्येकाच्या व्यक्तिगत आवडी-निवडींचा आदर ठेवलाच पाहीजे. खास तुमच्यासाठी मोनिका बेलुसीची (स्पेक्टर चित्रपटातल्या संपुर्ण रोलची सहा मिनिटे पाच सेकंदांची) व्हिडीओ क्लिप... एंजॉय!

.

ता क - चकल्या चिवडा आणि ब्लॅक अँड व्हाईट सोबतीला मिपादिअं आनंद आनंद आनंद ....

क्या बात...क्या बात...
चिअर्स 🥂

आलो आलो's picture

9 Nov 2022 - 10:41 pm | आलो आलो

त्येस्नी मोनिका बेलुन्स्की न्हवं बेलूस्सी म्हणत्यात व्हय ?
हात्तिच्यामारी गुगल्यावर आयकून त गपगार पडलो त्ये बेन ‘बेलुची’ म्हणतंय (LoL)
आत्ता आत्तापर्यंत छातीठोक सिन कॉनेरी च म्हणत आलोय आन आता कळतंय तेस्नी शॉन म्हणत्यात...
कायका असना हिथं आमच्या सौताच्या म्हानायकाला बी आमी ‘अमिताबच्चनच’ म्हणतो ...अज्जुनबी ....
तरीबी मोनिका आय्लाव्ह्यूचं बर्का
ता. क. - चकल्यांचा नवीन स्टॉक बनवला जातोय आणि सुट्या आठवडाभरासाठी वाढवुन घेण्यात आल्यात त्यामुळे आनंदी आनंद गडे किमान अजून ४ दिवस तरी .....

सरिता बांदेकर's picture

5 Nov 2022 - 9:46 pm | सरिता बांदेकर

बॅाण्ड पट किती वेळा बघितले,प्रत्येक पिक्चरचा प्रत्येक क्शण पाठ आहे. पण ब्रॅास्नननंतर नाहीच बघितले.
तुमचा लेख वाचताना सगळं आठवत होतं. मस्त लिहीलं आहे.मेलबर्नमध्ये बॅाण्ड प्रदर्शन लागलं होतं तेव्हा पण दोन, तीन वेळा बघितलं.
ॲाकलंडला रस्त्यावर ॲस्टन मार्टीन बघितली तेव्हा मालकाला विचारून गाडीला हात लावला.तेव्हा त्याने विचारलं ,‘बॅाण्ड फॅन?? आय कॅन अंडरस्टॅंड‘ म्हणून मान हलवली होती.
तर पुन्हा एकदा धन्यवाद.

@ सरिता बांदेकर,

मेलबर्नमध्ये बॅाण्ड प्रदर्शन लागलं होतं तेव्हा पण दोन, तीन वेळा बघितलं.

मस्तच 👍 मला अजुन पर्यंत असा योग आला नाहीये.

ॲाकलंडला रस्त्यावर ॲस्टन मार्टीन बघितली तेव्हा मालकाला विचारून गाडीला हात लावला.तेव्हा त्याने विचारलं ,‘बॅाण्ड फॅन?? आय कॅन अंडरस्टॅंड‘ म्हणून मान हलवली होती.

हा किस्सा तर जामच भारी! बाँडचे फॅन्स ओळखणे तसे फार कठीण नाही 😀

ह्यावरुन माझा एक किस्सा सांगायचा मोह टाळता येत नाहीये...

२०१५ मध्ये बायकोच्या ग्लासगो स्थित हेड ऑफिसला भेट देण्यासाठी स्कॉटलंडला गेलो असताना आमचा मुक्काम हॉटेल 'क्राऊन प्लाझा'मध्ये होता. एका संध्याकाळी लोकल साईट सीइंग करुन हॉटेलवर परतलो तेव्हा तिथे नुकत्याच आटोपलेल्या कुठल्याशा समारंभाला आलेली लोकं बाहेर पडत होती. त्यांच्यात व्हिलचेअर वर बसवुन नेण्यात येत असलेल्या एका वृद्ध व्यक्तीचाही समावेश होता. आजुबाजुने येणारे जाणारे लोक मान लववुन त्यांच्या प्रती आदर व्यक्त करत होते आणि ते गृहस्थही हसून हात हलवत त्यांना प्रतिसाद देत होते.

इतरांप्रमाणेच त्यांनी आमच्या कडेही सुहास्य वदनाने बघुन हात हलवल्यावर, असेल इथली कोणीतरी प्रतिष्ठीत व्यक्ती, लोकप्रतिनिधी किंवा राजकारणी वगैरे अशा विचारातुन आम्हीही त्यांना तसाच प्रतिसाद दिला आणि पुढे चालते झालो. पण कुतुहल जागृत झालेल्या आमच्या बाईसाहेबांनी आत आल्यावर 'ते' गृहस्थ कोण होते ह्याची चौकशी रिसेप्शनिस्टकडे केलीच. आणि तिने दिलेले उत्तर ऐकल्यावर फाडकन कपाळावर हात मारून घेत मी 'आलोच' एवढे बोलून, आपण एका अतिशिष्ट लोकांचा देश म्हणून ओळखलया जाणाऱ्या युनायटेड किंगडम मधल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आहोत वगैरे सर्व गोष्टी विसरून बावळटासारखा धावत परत बाहेर आलो. पण हाय रे दैवा, तोपर्यंत ते गृहस्थ गाडीत बसून निघून गेले होते.

ते गृहस्थ दुसरे तिसरे कोणी नसून रुपेरी पडद्यावर पहिला जेम्स बॉंड साकारणारे 'शॉन कॉनरी' होते.

ज्यांच्या चित्रपटांची पारायणे केली आहेत त्या तारुण्यातल्या पिळदार शरीरयष्टीच्या, पडद्यावर सॉलिड रुबाबदार दिसणाऱ्या शॉन कॉनरींना त्यांच्या वृद्धपकाळात मात्र मी जेमतेम चार ते पाच फूट इतक्या जवळच्या अंतरावरूनही ओळखू शकलो नाही ह्याचे त्यावेळी खूप वैषम्य वाटले. अर्थात माझ्या जन्माच्याही आधी बॉंडपटांतून निवृत्त झालेल्या कॉनरींचे चित्रपट मी बऱ्याच वर्षांनंतर स्टार मुव्हीज वर जेव्हा सगळे बॉंडपट दाखवले गेले होते तेव्हा पहिल्यांदा बघितले होते, त्यांची पारायणे नंतर केली होती. त्यामुळे स्वतःला दोष देण्यातही फारसा अर्थ नव्हता!

कोणाच्या स्वाक्षऱ्या वगैरे मी गोळा करत नाही, त्यात मला अजिबात रस नाही, पण भेट झाली असती आणि त्यांनी परवानगी दिली असती तर किमान त्यांच्याबरोबर एखादा सेल्फी नक्कीच घेतला असता. असो, त्या महानायकाला त्याच्या मायभूमीत अगदी जवळून प्रत्यक्षात बघायला मिळाले ह्यात पण मी समाधानी आहे!

आणि हो, त्यांच्या नावाच्या Sean Connery ह्या स्पेलिंग वरून अनेकांप्रमाणे मी पण त्यांचे नाव 'सीन कॉनरी' असेच उच्चारायचो, पण त्यांच्या नावाचा उच्चार 'शॉन कॉनरी' असा असल्याचे त्या दिवशी कळले होते! चार वर्षांपूर्वी लिहिलेल्या माझ्या 'इजिप्त' वरील मालिकेच्या सहाव्या भागात नावांच्या उच्चाराशी संबंधित असलेल्या एका गमती जमतीत मी ह्याचा उल्लेखही केला होता, पण हा प्रसंग त्याठिकाणी अस्थानी असल्याने लिहिला नव्हता, आज तुमच्या प्रतिसादाच्या निमित्ताने तो शेअर करता आला त्यासाठी तुमचे विशेष आभार 🙏

अमेरिकेत असताना पहिल्यांदा बॉंड चा सिनेमा पहिला. तेव्हा पण ते ३०-४० वर्षे जुने सिनेमे शनी, रविवारी प्राईम टाईमवर लागायचे. आणि नंतर तर त्याचे व्यसनच लागले. जीपीएस सारखी गॅजेट्स तेव्हा असायची. एक्शन सुद्धा परिणामकारक आणि पार्श्वसंगीतपण.
उत्तम लेख. स्लाईड शो, माहिती (मुख्यत्वे इयान फ्लेमिंगची) मस्तच.
२५ भागांची वाट बघत आहे.

आमच्या डोंबिवलीच्या टिळक टॉकीज मध्ये जुने झालेले हॉलीवुडचे चित्रपट 'मॉर्निंग शो' ला लागायचे तेव्हा मी मित्रांबरोबर टॉकीज मध्ये जाउन पाहिलेला पहिला बाँडपट 'लायसन्स टू किल'. मग त्यानंतर लगेचच आलेला 'गोल्डनआय' बघितला होता. मग 'स्टार मुव्हिज' वर अगदी पहिल्या 'डॉ. नो' पासुन पुढचे सगळे बाँडपट दाखवले गेले ते बघितल्यावर मात्र तुमच्याप्रमाणेच मला पण त्याचे व्यसनच लागले 😀
बाँडपटांच्या व्हिडिओ सीडिज/ डिव्हिडीज/ ब्लु-रे चे कलेक्शन केले, त्या खराब झाल्यावर टोरंट वरुन डाऊनलोड करुन त्यांची पारायणे केली. आजही सगळे बाँडपट हार्डड्राईव्हवर आहेत, जेव्हा कधी मुड होईल तेव्हा कुठलातरी बघत बसतो!

२५ भागांची वाट बघत आहे.

आधी कोकण-गोवा मालिका गुंडाळतो, नंतर त्याला हात घालतो 😂

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

6 Nov 2022 - 11:58 am | ॲबसेंट माइंडेड ...

जबरदस्त लेख आहे.
पिअर्स ब्रॅास्नन आणि टीमोथी डाल्टन माझे आवडते बॅान्ड.

यश राज's picture

6 Nov 2022 - 1:54 pm | यश राज

बाँड पटांवरील खूप सुंदर आणि माहितीपूर्ण लेख. आवडला.
पिअर्स ब्रॅास्नन , शॉन केनेरी आणि रॉजर मुर हे आवडते बाँड.
डॅनिएल क्रेग फक्त आणि फक्त कॅसिनो रॉयल या चित्रपटात आवडला.
कॅसिनो रॉयल साठी जेव्हा डॅनिएल ची निवड झाली तेव्हा जगभरातल्या बाँड च्या चाहत्यांना हा निर्णय पटला नव्हता. अनेकांनी निराशा व्यक्त केली की डॅनिएल हा बाँड वाटत नाही आणि त्याला जेम्स बाँड साकारणं जमणार नाही.
पण जेव्हा कॅसिनो रॉयल प्रदर्शित झाला व त्यातल्या बाँड च्या एन्ट्री सीन मध्येच डॅनिएल ने दाखवून दिले की तो उत्तम बाँड साकारू शकतो. लोकांना त्याचा जेम्स बाँड खूप आवडला.

टर्मीनेटर's picture

15 Nov 2022 - 5:50 pm | टर्मीनेटर

डॅनिएल क्रेग फक्त आणि फक्त कॅसिनो रॉयल या चित्रपटात आवडला.

१००१% सहमत 👍
पुढचा 'क्वांटम ऑफ सॉलेस' वगळता मला त्याचे बाकीचे चित्रपट आवडले पण त्यांना मी बाँडपट मानु शकत नाही, ते निव्वळ हॉलीवुड 'थ्रिलर' पठडीतले मसाला चित्रपट वाटले.

झकास, बॉन्डपटांबद्दल सगळंच कव्हर केलंत !

बॉण्ड्सबद्दल लिहितांना बॉण्ड गर्ल्सचा विसर नाही पडू दिला हे विशेष आवडले आपल्याला :-)

बॉण्ड्सबद्दल लिहितांना बॉण्ड गर्ल्सचा विसर नाही पडू दिला हे विशेष आवडले आपल्याला :-)

जसे शंकर म्हंटले कि पार्वतीचे, विठ्ठल म्हंटले कि रखुमाईचे, कृष्ण म्हंटले कि राधेचे नाव ओघाने येते तसेच बॉंडचा विषय आला कि बॉंडगर्ल्स पण ओघाने यायलाच पाहिजेत, नाहीतर अस्सल बॉंडप्रेमी तो 'फाऊल' धरतात 😀

कंजूस's picture

7 Nov 2022 - 9:12 am | कंजूस

यांच्या कथा संपल्यावर उरलेल्या गरम तेलात गोल्डनआइ वगैरे सिनेमे काढले आणि बॉन्डपट संपले हे लक्षात आले. दुसरे एक कारण म्हणजे बॉन्ड वापरत असलेले विशेष गॅजेट्स लोकांच्या हाती आले. रशिया,अमली पदार्थ तस्करी,हत्यारे बाजार हे विषय चावून चोथा झाले. अमेरिकेचे हात ज्या धंद्यात काळे झालेत तो तेल हा विषय सोयिस्करपणे गाण्यात आला. तेल उत्पादक देशांना डिवचणार कोण? रशिया त्यांच्यावरच्या हल्ल्यामागे हसून बघते आणि सोडून देते.
पळापळी हे मात्र बॉन्डपटाचे वैशिष्ट्य. शत्रुपक्षाची मुलगी बॉन्डला सामिल होते हा नेहमीचा दुखरा भाग.

शशिकांत ओक's picture

7 Nov 2022 - 10:52 pm | शशिकांत ओक

बॉन्ड वापरत असलेले विशेष गॅजेट्स लोकांच्या हाती आले.

रशिया शी वैर, अंमली पदार्थ या विषयावर काळ बदलला म्हणून ते आकर्षण राहिले नाही!

श्वेता व्यास's picture

7 Nov 2022 - 12:42 pm | श्वेता व्यास

टर्मीनेटर साहेब, देखणा लेख लिहिला आहे.
माहितीसह बॉंडपटांच्या मूळ पोस्टर्सची धावती झलक आणि बॉंड गर्ल्स स्लाईड शो देखील खूप आवडले.
बाकी इयान फ्लेमिंग स्वतःच बॉंड दिसतो आहे खरा!

बाकी इयान फ्लेमिंग स्वतःच बॉंड दिसतो आहे खरा!

अगदी...अगदी 👍
"अमक्या-तमक्याचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिले जाईल ..." असे जे म्हंटले जाते ते सत्यात उतरवण्यासाठी 'सुवर्णाच्छादीत' टाईपरायटर वर आपल्या मानस पुत्राचे भाग्य कादंबरी रुपाने लिहिणारा हा शौकीन लेखक ग्रेटच! आपले स्वतःचे व्यक्तिमत्व त्या पात्राला देण्यात ते यशस्वी झाले ह्याची ही पोचपावती मानता येईल 😀

Bhakti's picture

7 Nov 2022 - 1:36 pm | Bhakti

अप्रतिम रसग्रहण!

सुंदर लेख. जेम्स बाँड च्या चाहत्यांसाठी तर पंच पक्वान्नांची मेजवानीच.

त्यातल्या पाच जणींचा अपवाद वगळता कुठल्याही अभिनेत्रीला पुन्हा बॉंडगर्लची भूमिका करण्याची संधी मिळालेल नाही.

त्या ५ जणींची नावे कळतील का?
एकीला मी रोजर मूर मधील चित्रपटांत पाहिले आहे. खूपच सुंदर होती ती. बहुतेक मड अ‍ॅडम्स नाव तिचे.
बाकीच्यांबद्दल पण माहिती करुन घ्यायला आवडेल :)

कर्नलतपस्वी's picture

7 Nov 2022 - 2:47 pm | कर्नलतपस्वी

फाॅर युवर आईज ओन्ली हा बाॅण्ड पट मित्राच्या आग्रहावरून बघीतला होता. बाकी विदेशी चित्रपट विषेश बघत नाही.

जेम्स बॉंडची भूमिका साकारणाऱ्या सहा अभिनेत्यांपैकी माझ्या वैयक्तिक पसंतीक्रमात 'जेम्स बॉंड' चित्रपट मालिकेला पुन्हा उर्जीतावस्थेत आणणारे 'पिअर्स ब्रॉस्नन' हे अर्थातच पहिल्या क्रमांकावर आहेत.

ब्रॉसनन जेम्स बाँड बनायच्या आधी एका अमेरिकन सीरीज मध्ये यायचा. त्यात हिरॉईन जरा वरचढ ठरेल असे दाखवत. तेंव्हा पासून मला तो बॉन्ड व्हावा असे वाटे. तसा तो झालाही!

मुक्त विहारि's picture

7 Nov 2022 - 11:33 pm | मुक्त विहारि

वैयक्तिक सांगायचे तर, डॅनियल क्रेग जास्त आवडला....

कॅसिनो राॅयल ते नो टाईम टू डाय पर्यंत, बाॅन्ड विरूद्ध स्पेक्टर हा सामना उत्तरोत्तर रंगत जातो

पण, नो टाईम टू डाय एकदम फुसका वाटला..

बाय द वे,

सीन काॅनेरीने, 1983 मध्ये आलेल्या, Never Say Never Again मध्ये बाॅन्ड साकारला होता आणि हा Thunderball चा रिमेक होता...

कधी कंटाळा आला की, जेम्स बाॅन्डचे थीम म्युजिक ऐकतो

Every James Bond Gun Barrel Sequence

https://youtu.be/3TAMEgqT6T0

बिपीन सुरेश सांगळे's picture

8 Nov 2022 - 8:45 am | बिपीन सुरेश सांगळे

जेम्स बॉण्ड हा अनेकांच्या आवडीचा विषय . अर्थात माझ्याही . यावर लिहिल्याबद्दल छान वाटलं . आणखी वाचायला आवडेल .
आपल्या बाकी मेहनतीचंही कौतुक आहे

चांदणे संदीप's picture

8 Nov 2022 - 10:01 am | चांदणे संदीप

रूमाल असा असेल तर धोती पहायला/वाचायाला किती मजा येईल!

आपला आवडता बॉन्डक्रम :
१) शॉन कॉनरी
२) पिअर्स ब्रॉस्नन
३) डॅनियल क्रेग

धोतीच्या प्रतिकक्षेत....

सं - दी - प

तर्कवादी's picture

8 Nov 2022 - 2:09 pm | तर्कवादी

अभ्यासपुर्ण लेख आवडला,
टर्मिनेटरजी
दोन गोष्टी सांगायच्या राहून गेल्यात असे वाटते. "ऑक्टोपस्सी" ह्या चित्रपटातली काही कथा राजस्थानात घडते. भारतीय पार्श्वभूमी असलेला हा एकमेव बॉण्ड चित्रपट असावा.
आणि दुसरी गोष्ट- बॉण्ड चित्रपटांतली माझी सर्वात आवडती गोष्ट म्हणजे sarcasm, अर्थात उपरोधिक /टोमणेबाज संवाद. खास करुन एम आणि बॉण्डमधले संवाद. मी केवळ हिंदीत डब केलेले चित्रपट पाहिलेत तरी मला ते संवाद आवडलेत.
मी बरेच बॉण्ड चित्रपट पाहिलेत पण संवाद वगळता मी त्या चित्रपटांच्या फारसा प्रेमात पडलो नाही. सगळे चित्रपट मनोरंजक असले तरी काहीतरी सुंदर कलात्मक पाहिल्याचा आनंद ते देत नाहीत. अर्थात हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे.

कपिलमुनी's picture

8 Nov 2022 - 2:48 pm | कपिलमुनी

लेख आवडला.
बाँडपटातील व्हिलन कसे बदलत गेलं पण लेखात आले असते तर चेरी ऑन केक असते

नागनिका's picture

8 Nov 2022 - 5:57 pm | नागनिका

बॉण्डपटांचा सविस्तर अभ्यास आणि अचूक निरीक्षण नोंदी आवडल्या..
बॉण्डपट, बॉण्डगर्ल्स या संज्ञेप्रमाणे बॉण्डबद्दल लिहिणार्यांना बॉण्ड रायटर्स म्हणावे का?
(कृ ह. घे.)

अरे वाह! मिपावर इतक्या संख्येने बॉंड प्रेमी असतील असे मला खरंच वाटले नव्हते आणि लेखही थोडा लांबल्याने त्याला इतका उत्साहवर्धक प्रतिसाद मिळेल असेही वाटले नव्हते. सर्वांच्या प्रतिसादांना थोड्या सवडीने सविस्तर उत्तरे देईनच पण त्या आधी एका छोट्याश्या ब्रेकची मला नितांत आवश्यकता असल्याने थोडा वेळ तुमच्याकडून उसना मागतो!

तूर्तास सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार 🙏

मुक्त विहारि's picture

8 Nov 2022 - 10:14 pm | मुक्त विहारि

But, you can not ignore Bond ....

All Hollywood movies are at one side and Bond movies are at another side ... This is the basic fact ....

माझ्या आजोबांना पण बाॅन्डपट आवडायचे आणि आता मुलांना पण आवडतात. आजोबांना सीन काॅनेरी आवडायचा, वडीलांना राॅजर मूर आणि मला डॅनियल क्रेग, तर मुलांना पियर्स ब्राॅस्नन .... अभिनेते बदलले पण बाॅन्डपटाची गोडी तशीच राहिली ....

Carry on नंतरची जास्तीत जास्त चित्रपट प्रदर्शीत झाले ते फक्त जेम्स बाॅन्डचे .... येत्या काही वर्षांत, Carry onचा पण रेकार्ड मोडायची शक्यता नाकारता येत नाही ....

एक विनंती आहे, जमल्यास Carry on Series बद्दल पण लिहा . दुर्दैवाने, Carry on Series , हिंदी मध्ये नाही, नाहीतर चार ओळींची समिधा पण टाकली असती ....

प्रचेतस's picture

9 Nov 2022 - 9:36 am | प्रचेतस

खल्लास लेख.
बॉण्डपटांचा मीदेखील फॅन आहे. शॉन कॉनेरी सर्वाधिक आवडता बॉण्ड. फ्रॉम रशिया विथ लव्ह मधली ट्रेन फाइट तर अविस्मरणीय. गॅजेट्सचा वापर गोल्डफिंगरपासून सुरु झाला, आधीच्या दोन चित्रपटात ते फारसे नव्हते.
रॉजर मूरच्या काळातला लोखंडी दात असलेला खलनायक जॉज हा विशेष आवडीचा, त्याची आणि बॉण्डची जुगलबंदी लैच भारी. ऑक्टोपसी तर चक्क आपला कबीर बेदी होता. मूरच्या चित्रपटांनी विनोदाचा पण तडका दिला जो क्रेगच्या बॉंडपटात आता अजिबातच दिसत नाही.

तुम्ही केलेल्या एकेक बाँडपटाच्या रसग्रहणाची आतुरतेने वाट पाहात आहेच हे सांगणे न लगे.

मुक्त विहारि's picture

9 Nov 2022 - 10:27 pm | मुक्त विहारि

हा MI5 विरूद्ध SPECTRE ही सिरीज असल्याने, विनोदाला वावच न्हवता..... त्यामुळे, ह्या सिरीजमध्ये डॅनियल क्रेग उत्तम शोभला.....

Vesperच्या मृत्यु नंतर, मनावर झालेला आघात, जेम्स बाॅन्ड पचवू शकत नाही आणि प्रसंगी MI5 च्या विरोधात जाऊन तो स्पेक्टर विरोधात Quantum of Solace ह्या सिनेमात लढतो.

सूडाने पेटलेला मनुष्य, सहसा विनोद करत नाही. त्याची ती मानसिकता नसते...(उदाहरणार्थ, त्रिशूल मधला अमिताभ बच्चन आणि शोले मधला थोटा ठाकूर बलदेवसिंग...)

आवडत्या विषयावर सुरेख लेख. त्यात वर स्लाईड शो.. कसे काय जमावता बुवा हे सगळे? परत परत उजळणी करावी असा लेख आहे.

अथांग आकाश's picture

15 Nov 2022 - 12:33 pm | अथांग आकाश

अप्रतिम लेख! सुरेख सादरीकरण!!

माझा पसंतीक्रम
१ शॉन कॉनरी
२ पिअर्स ब्रॉस्नन
३ रॉजर मुर
बॉण्ड म्हणुन डॅनीयल क्रेग कधीच आवडला नाही :P
.

स्मिताके's picture

15 Nov 2022 - 10:05 pm | स्मिताके

माहिती आणि स्पेशल इफेक्ट्स से खचाखच भरा हुआ.. मस्त रंजक लिखाण. मी चित्रपट पाहिल्यानंतर थोड्याच काळाने विसरुन जाते, त्यामुळे अशा खोल अभ्यासू लिखाणाचं कौतुक वाटतं.

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Nov 2022 - 1:47 pm | ज्ञानोबाचे पैजार

सगळ्यांचा इतका जिव्हाळ्याचा विषय आणि तो मांडणारा टर्मिनेटर यांच्यासारखा सिध्दहस्त दर्दी लेखक या मुळे हा लेख दिवाळी अंक गाजवणार यात काहीच शंकाच नव्हती.

बॉन्ड ची ओळख लहानपणीच झाली आणि नकळत त्याच्या प्रेमात पडलो, आजही टिव्हीवर कुठेही जर बॉन्डपट सुरु असेल तर चॅनेल बदलण्यावरुन घरात भांडणे होतात.

सर्व वाचकांना एक अंदरकी बात सांगतो, धोती को फाडके रुमाल असे लिहिणे हा टर्मिनेटर यांचा विनय आहे. मूळ लेखाचा आराखडा मी स्वतः वाचला आहे, त्या आराखड्याच्या मानाने हा लेख म्हणजे १०० मिटरच्या ताग्यातले एक सूत आहे.

लवकरच संपूर्ण तागा वाचकांकरता उपलब्ध होवो ही इश्वरचरणी प्रार्थना.

पैजारबुवा,

आलो आलो's picture

17 Nov 2022 - 2:16 pm | आलो आलो

तुमरे के मुंह में डबाभर साखर.
@टर्मिनेटर साहेब घ्याच मनावर तुम्ही.
आ. न. __/\__

श्वेता२४'s picture

18 Nov 2022 - 3:55 pm | श्वेता२४

मी एकही बॉंडपट पाहिलेला नाही. पण या लेखाच्या निमत्ताने बऱअयाच गोष्टी कळाल्या. तुमचा संकल्प सिद्धीस जावो. कारण तुमचे रसग्रहण वाचायला मिळाले तर माझा चित्रपट पाहण्याचा वेळ वाचेल. धन्यवाद

मुक्त विहारि's picture

21 Nov 2022 - 4:57 pm | मुक्त विहारि

खानावळीसाठी, हे योग्य आहे

पण, जेम्स बाॅन्ड, मार्व्हलचे आणि डीसीचे सिनेमे, हे पाहिले तर उत्तम ....

विजुभाऊ's picture

25 Aug 2023 - 4:36 pm | विजुभाऊ

डॅनियल क्रेग आल्यापासून ती गम्मत राहिली नाही असे वाटते.
बाँड कसा मिश्कील असायला हवा. डॅनियल क्रेग सिरीयल किलर वाटतो.