चक्रव्युह

Primary tabs

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in काथ्याकूट
3 Sep 2022 - 3:35 pm
गाभा: 

अनुभव नंबर एक...

एक ऐंशी वर्षाचे सहनिवासी,या जगात एकटेच,यांना तो धोकेबाज विज बिलाचा मेसेज भ्रमणध्वनीवर आला.विज कापल्यानंतर होणाऱ्या संभाव्य पायपीट पासुन वाचण्या साठी त्यांनी प्रतीसाद दिला.काही क्षणातच त्यांच्या बँकेतील चारलाख रूपये धोकेबाजांनी (फ्राॅडस्टर) गायब केले.

अनुभव नंबर दोन...

आमचं पाणी शुद्धीकरण यंत्र खराब झालं,कंपनीला तक्रार केली. याच कामा करता काही अनोळखी नंबर वरून फोन आले पण धोकेबाज असतील म्हणून प्रतीसाद दिला नाही. कपंनीचा प्रतीसाद लवकर न आल्याने दुसर्‍या सर्व्हिस केंद्रावर तक्रार नोंदवली. त्वरीत प्रतीसाद व तंत्रज्ञ दारात उभा. बनावट सामान लावून गेला. मी जरा साशंकच होतो, सारखे प्रश्न विचारत होतो. घरचे म्हणाले तुम्हाला कुणावर विश्वासच नाही.तीन हजाराला शेंडी लावून गेला. बहुधा माहीती विक्रीचा खेळ असावा. (DATA selling) कंपनीचा नेहमीचा तंत्रज्ञ उशीरा आला तेव्हां हा प्रकार उघडकीस आला. "मरता क्या न करता" चिल्ल्या पिल्ल्यांच्या स्वास्थ्याचा प्रश्न म्हणून पुन्हा एकदा कंपनीचा ओरीजिनल फिल्टर बसवून घेतला. तक्रार दाखल केली,आरडाओरड केली, काहीही फायदा नाही झाला. धोकेबाजाने ज्या फोनवरून संपर्क साधला होता ते सिमकार्ड कर्नाटकातील होते.

वरील अनुभवावरून 'चक्रव्यूह',ही कवीता सुचली.म्हातारी मेल्याचं दुखः नाही पण काळ सोकावला नाही पाहीजे.

"एल्गार व रंग माझा वेगळा", हे सुरेश भटांचे प्रसिद्ध कवितासंग्रह वाचत आहे.'गझलेची बाराखडी',या लेखात 'गझल',कविता प्रकाराचे त्यांनी सुदंर विश्लेषण केले आहे व त्याचे कायदे समजावून सांगीतले आहेत.त्यापासून बोध घेऊन काही लिहीण्याचे एक धाडस केले.

गझलेची बाराखडी समजून घेत आहे त्यामुळे कवीता किंवा गझल, प्रयत्न जमला,चुकला,कुठले वृत्त इ.भागा कडे कृपया लक्ष देऊ नये. हळुहळू सुधारणा होईल. माहीतगारांनी शुद्धी सुचवल्यास पुढील वाटचालीसाठी मदतच होईल.

गझल म्हणजे काय?

"एकाच वृत्तातील, एकच यमक (काफिया) व अन्त्ययमक (रदीफ़ ) असलेल्या प्रत्येक २-२ ओळींच्या किमान पाच किंवा त्याहून अधिक कवितांची बांधणी म्हणजे गझल.

गझलेमधील प्रत्येक दोन ओळींच्या कवितेला आपण "शेर" म्हणतो.

गझलेमधील प्रत्येक शेर हा आपल्या जागी एक संपूर्ण अभिव्यक्ती असलेली स्वतंत्र व सार्वभौम कविताच असते.

नेहमीची कविता सलग असते,तिची एक "थीम" असते आणि म्हणूनच ती सहज उलगडत जाते.

एकाच गझलेत विविध विषय हाताळले जाऊ शकतात. प्रत्येक शेराचा आशय स्वतंत्र असू शकतो किंवा एकच संवेदना, एकच भाव किंवा एकच मूड असलेले सर्व शेर असू शकतात. कविते प्रमाणेच प्रतीकात्मक अलंकाराचा वापर करून रसिकांपर्यंत भाव पोचवता येतो.... इती गझल सम्राट सुरेश भट".

रचना लिहीण्याच्या मागची प्रेरणा समाजात संगणक, भ्रमणध्वनी द्वारे घडणाऱ्या धोखाधडी बद्दल आहे.

आजकाल जीकडे पहावे तीकडे सायबर क्राईम च्या गोष्टी ऐकावयास मिळतात.घरकर्ज, खुल्या बाजारात, मंदिरात, क्रेडिट कार्डच्या द्वारे, सरकारी कार्यालयात माणसाची माणसा कडून होणारी फसवणूक पाहीली म्हणजे ही वसुंधरा एक प्रकारे पांडवांची मयसभाच वाटते. छद्मवेषी म्हणजे फ्राॅडस्टर पावलो पावली भेटतात."दिसतं तस नसतं म्हणून जग फसतं".

"ही कुठली वसुंधरा ही तर मयसभा
जागो जागी इथे छ्द्मवेषी उभा"

बनावटी सामान,अधिकृत सामान म्हणून गळ्यात मारणारे बहुरूपीये जागोजागी उभे आहेत.इतकी बेमालूम बतावणी करतात की भले भले त्यांच्या जाळ्यात अडकतात. माणसे माणसाची शिकार करण्या साठी अनेक प्रकारच्या क्लुप्त्या, बतावण्या करतात,प्रलोभन दाखवतात. माणूसच माणसाला फसवण्याचा चालता फिरता पिंजरा आहे असे वाटते.धोकेबाजांचा लाघवी स्वभाव, संवाद कौशल्य आणी आत्मविश्वास हा भल्या भल्यांना जाळ्यात ओढतो.

"सापळे इथे माणसाचे माणसाला धरावया
वैखरीतून पेरती दाणे सावजाला घेरावया "

महाभारतात धर्म व अधर्माचे युद्ध चालू असताना कौरव सेनापतींनी चक्रव्युह रचला तो कसा भेदायचा याचे ज्ञान फक्त धनुर्धर अर्जुनलाच होते.अर्जुनाला कौरववीर दुर घेऊन गेले,पांडव विचारात पडले की चक्रव्युह कोण भेदणार? तेव्हां अर्जुन पुत्र अभिमन्यू पुढे आला त्याला चक्रव्युह भेदण्याची माहीती होती परंतू त्यामधून बाहेर कसे पडावे याचे ज्ञान नव्हते. पुढे सर्व कौरव रथी महारथींनी अधर्माचा अभिमन्युचा वध केला. हे आपल्या सर्वानाच माहीत आहे.चक्रव्युह आणी अभिमन्यू वध ही गोष्ट रूपकात्मक इथे वापरली आहे.

आज अशीच काहिशी परिस्थिती सामान्य माणसाची आहे. धोकेबाजांनी असेच कोंडाळे सामान्य माणसाच्या भोवती केले आहे.तंत्रज्ञान तर विकसित झाले पण बहुसंख्य लोक याचा सुरक्षित वापर कसा करावा या बद्दल अनभिज्ञ आहेत.याचाच फायदा धोकेबाज घेतात. अर्थात अन्य कारणे सुद्धा आहेत.

पुर्वी पत्र वाचून / लिहून देतोस का विचारणारे पुष्कळ होते तसेच आता बँकेत फाॅर्म भरून देता का, ए टी एम च्या बाहेर पैसे काढून देता का म्हणून विचारणारे सुद्धा भेटतात.

माणसाच्या अंगभूत लोभ,मोह या गुणांचा फायदा प्रलोभना द्वारे कसा घेता येईल, त्यांचे उत्पिडन कसे करता येईल याचे विवीध हातकंडे हे अगणित धोकेबाज शोधत असतात. धोकेबाजांची संख्या मोठी.यापूर्वी धोखाधडी होत नव्हती असे नाही परंतू आजच्या सारखी नव्हती.

"अठरा औक्षहिणी सेना यांची, चक्रव्युह मांडला
घेरूनी महारथीनी वीर अभिमन्यू कोडंला"

अनेक प्रकारच्या फसवणुकीच्या प्रकारापैकी वन टाईम पासवर्ड (OTP) च्या चोरीद्वारे होणाऱ्या धोखाधडीचा प्रातिनिधिक स्वरूपात रचनेत वापर केला आहे.

"तुमच्या डेबिट कार्डाची मुदत संपत आली आहे, के वाय सी अपडेट करा", असे विविध प्रकारचे फसवणुकीचे संदेश पाठवून वन टाईम पासवर्ड चोरण्याचे प्रयत्न करतात. बँक,टेलिव्हिजन व इतर माध्यमातून जनजागृतीपर संदेश सदासर्वदा प्रसारीत होत असल्या मुळे फरक पडत आहे पण कुणीना कुणी यांच्या जाळ्यात फसतात.

"जाहला रक्तबंबाळ परी ओटिपी अस्त्र न सोडले
कपटींनी कपट करून भ्रमणध्वनी- तुन चोरले"

एकदा का पासवर्ड चोरी झाला की क्षणात बँकेतील जमापुंजी खाली होते मग काय होते ते वाचकांना माहीतच असेल.

भेदिले शुन्यमंडळा रिता केला भाता
अभिमन्युचे...
राहीला न वाली कोणी राहीला न त्राता......

पोलिस खात्याने जनजागृतीपर प्रकाशीत केलेले गाणे.
https://youtu.be/4sHuFytsjpc
_________________________________
संपूर्ण रचना....

ही कुठली वसुंधरा ही तर मयसभा
जागो जागी इथे छ्द्मवेषी उभा

सापळे इथे माणसाचे माणसाला धरावया
वैखरीतून पेरती दाणे सावजाला घेरावया

अठरा औक्षहिणी सेना यांची, चक्रव्युह मांडला
घेरूनी महारथीनी वीर अभिमन्यू कोडंला

जाहला रक्तबंबाळ परी ओटिपी अस्त्र न सोडले
कपटींनी कपट करून भ्रमणध्वनी- तुन चोरले

भेदिले शुन्यमंडळा रिता केला भाता
अभिमन्युचे...
राहीला न वाली कोणी राहीला न त्राता.....
२-९-२०२२

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

3 Sep 2022 - 5:40 pm | कर्नलतपस्वी

धोकेबाज म्हणजे कलियुगातील वातापी.लोकांच्या पोटात शिरून त्यांचाच कोथळा फोडणारे.

चौथा कोनाडा's picture

3 Sep 2022 - 5:54 pm | चौथा कोनाडा

रचना आवडली कर्नल साहेब !

आता यांचा पावलोपावली धोका आहे, वर्तमान पत्रात अश्या फसवणुकीच्या बातम्या वाचतो, आणि आयुष्यभर घाम गाळून साठवलेल्या पुंजीवर डल्ला मारला ही वाचून
वाईट वाटते. इतक्या बातम्या येतात तरी लोक भोळसट पणे विश्वास कसा ठेवतात हाच प्रश्न आहे !

"अठरा औक्षहिणी सेना यांची, चक्रव्युह मांडला
घेरूनी महारथीनी वीर अभिमन्यू कोडंला"

जमतारा ही ओटीटी वेबसेरीज आठवली

याला उपाय एकच : प्रचंड प्रमाणात जागृती होणे

पोलिस खात्याने जनजागृतीपर प्रकाशीत केलेले गाणेही भारी आहे. जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे.

आणि समस्या सांगणे. इथे जाणकार मिपाकर सावध करतील.
दुसरा एक उपाय म्हणजे कोणतेही पेमेंट असो ते माझा 'अमुक' हे पाहतो ते तो करेल हे सांगणे.

नवीन तंत्रज्ञानाबरोबरच फसवणूकीचे प्रकारही वाढले आहेेत. पोलीस यंत्रणा व ग्राहकवर्ग, दोघेही धोके ओळखण्यात, प्रशिक्षणात कमी पडताहेत. यामुळे भामट्यांचे चांगलेच फावले आहे.
तंत्रनिर्मीती करणार्या संस्था हात झटकून बाजूला होताहेत आणि कर्नलसाहेब, तुम्ही लिहील्याप्रमाणे, सामान्य माणसावर चक्रव्युहात सापडलेल्या अभिमन्युप्रमाणे परिस्थीती आलेली आहे. यातून सोडवायला देव, परमात्मा, भगवान येणार नाहीय, तर आपल्यालाच मार्ग काढायचा आहे.

कर्नलतपस्वी's picture

4 Sep 2022 - 7:35 am | कर्नलतपस्वी

चौको,कंजूस आणी शेखर काळे आपल्या सविस्तर प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

कपिलमुनी's picture

4 Sep 2022 - 12:04 pm | कपिलमुनी

भारतात खटला चालवून शिक्षा होण्याचे प्रमाण नगण्य आहे त्यामुळे गुन्हेगारांना भय नाही.

मुक्त विहारि's picture

4 Sep 2022 - 12:25 pm | मुक्त विहारि

गझल आवडली

कर्नलतपस्वी's picture

5 Sep 2022 - 9:50 am | कर्नलतपस्वी

किलोनी,मुवी मनापासून आभार.

कर्नलतपस्वी's picture

5 Sep 2022 - 9:51 am | कर्नलतपस्वी

कपिल मुनी मनापासून आभार.

शशिकांत ओक's picture

5 Sep 2022 - 12:06 pm | शशिकांत ओक

कौरव रथी महारथींनी अधर्माचा अभिमन्युचा वध केला. हे आपल्या सर्वानाच माहीत आहे.चक्रव्युह आणी अभिमन्यू वध ही गोष्ट रूपकात्मक इथे वापरली आहे.
आज अशीच काहिशी परिस्थिती सामान्य माणसाची आहे. धोकेबाजांनी असेच कोंडाळे सामान्य माणसाच्या भोवती केले आहे.तंत्रज्ञान तर विकसित झाले पण बहुसंख्य लोक याचा सुरक्षित वापर कसा करावा या बद्दल अनभिज्ञ आहेत.

खिसेकापूंपासून सावधान...
अशा पाट्या लिहून ठेवलेल्या असल्या तरी आपला बकरा कसा होतो ते अनुभवाने शहाणे व्हावे लागते....

प्रकाश घाटपांडे's picture

6 Sep 2022 - 2:04 pm | प्रकाश घाटपांडे

डी एन डी रजिस्टर करुन सुद्धा मार्केटिंगच्या कॉलचा मारा होतो. त्यामुळे मी हल्ल्ली अनोळखी नंबरचे फोने घेतच नाही. घेतला तरी सुरवातीला त्यांच्या एक दोन शब्दांवरुन कळत की हा फोन मार्केटिंगचा आहे लगेच कट व ब्लॉक करतो.

कर्नलतपस्वी's picture

6 Sep 2022 - 2:49 pm | कर्नलतपस्वी

सर्व वाचकांचे व प्रतीसादकांचे मनापासून आभार.