पुण्याजवळ, एकदम कमी पैशात होणारे रेंज ट्रेक

आंद्रे वडापाव's picture
आंद्रे वडापाव in भटकंती
23 Aug 2022 - 11:01 am

** उत्तराधिकारास नकार लागू

** सदर माहिती ही, आंतर्जालावरून गोळा करून इथे दिलेली आहे

**या धाग्याचे प्रयोजन, हे ट्रेकच्या बाबतीत , मिपा वाचकांच्या मनात ब्रेनस्टॉर्मिंग सुरु करून देणे हा असुन ...
**सादर माहितीच्या अचुकतेची कुठलीही शाश्वती नाही (जरी मी यातील ट्रेक स्वतः केलेले असले तरीही), वाचकाने स्वतःच्या रिस्कवर, ट्रेक करावा
**हे ट्रेक करताना अगोदर पूर्ण माहिती घ्या, पाणी, जेवण बरोबर घ्या, माहितीचा माणूस बरोबर असेल तर उत्तमच.
पण कोणताही ट्रेक करताना पूर्ण माहिती घेतल्याशिवाय ट्रेक करू नका ही विनंती.

१) कात्रज-कानिफनाथ
भारती विद्यापीठाच्या थोडे पुढे आणि राजीव गांधी प्राणी संग्रहालय च्या थोडे मागे पीएमटी बस डेपो आहे, तिथून सुटणाऱ्या बहुतांश बस या कात्रज घाटातून जातात,
कात्रज जुना बोगदा संपल्यावर लगेच बस ड्रायव्हरला बस थांबवण्याची विनंती करून तिथे उतरायचे, आणि बोगद्याच्या डाव्या बाजूने चढाई करायची, वाघजाई मंदिरापर्यंत गेल्यावर तिथून उजवीकडे वळायचे वाघजाई मंदिराकडे नाही गेलात तरी थोडे वर गेल्यावर अंबिल डोंगरावर फडकणारा झेंडा दिसतो, तो लक्षात ठेवून चालायचे, झेंड्याजवळ गेल्यावर उजव्या बाजूला जो मळलेला रस्ता दिसतो, तिथून चालत राहायचे,
झेंड्या पासून दिसणाऱ्या समोरच्या डोंगरावर जायचे असते पण ते जरा फिरून जावे लागते, रिबीन बांधल्या आहेत, त्याकडे लक्ष ठेवायचे, पुढचा डोंगर चढून गेल्यावर आपल्याला बापदेव घाटातील मंदिर दिसते, घाटातून कानिफनाथ मंदिर दिसते, ते समोर ठेऊन चालल्यावर रस्ता चुकण्याचा प्रश्न येत नाही.
कात्रज ते कानिफनाथ मंदिर अंतर १३ किमी, लागणारा वेळ ४ ते ५ तास,
कानिफनाथ ते वडकीनाला अंतर ४ किमी, तिथून हडपसर किंवा स्वारगेट बस मिळू शकते. तुम्ही होळकरवाडी कडे ही कानिफनाथ वरून उतरू शकता.

२) कानिफनाथ ते मल्हारगड ट्रेक
हडपसर वरून सासवड, जेजुरीला जाणाऱ्या पीएमटी ने वडकीनाला इथे उतरून कानिफनाथ ला जायचे, कानिफनाथांच्या मंदिराच्या अलीकडेच एक कंपौंड लागते, तिथून त्या कंपौंडच्या बाजूने डावीकडे डोंगररांगेवर चालत राहायचे,
डोंगररांगेवरून सरळ चालत राहिल्यावर आपण दिवेघाटात पोहचतो,
दिवेघाटातील विठ्ठल मूर्तीच्या पलीकडच्या बाजूच्या डोंगरावरून गेल्यावर पुढे एक सीताराम मंदिर लागते, तिथुन पुढे वर जायचे, एकदा माथा गाठला की उजवीकडे वळून सरळ चालत राहायचे, आपण मल्हारगडावर पोहचतो.
कानिफनाथ पायथा ते मल्हारगड हे अंतर आहे १५ किमी,
पण वडकीनाला ते कानिफनाथ पायथा आणि मल्हारगड पासून काळेवाडी पर्यंत चालत यायला लागेल, तर हे अंतर साधारण ७ किमी वाढते. म्हणजे हा ट्रेक जवळपास २२ किमीचा होतो. पण ट्रेकला जास्त चढ उतार नाहीत, आणि सोपा आहे.

३) कात्रज ते सिंहगड ट्रेक
हा ट्रेक खूपच दमछाक करणारा आहे, जवळपास छोट्या मोठ्या १७ टेकड्या पार कराव्या लागतात, आणि हा ट्रेक बरेच ट्रेकर्स रात्रीच करतात, पौर्णिमेचा जवळचा दिवस बघून, या ट्रेक ला ज्यांना अनुभव आहे त्यांनीच जावे आणि बरोबर माहितीचा माणूस घ्यावा.
भारती विद्यापीठाच्या थोडे पुढे आणि राजीव गांधी प्राणी संग्रहालय च्या थोडे मागे पीएमटी बस डेपो आहे, तिथून सुटणाऱ्या बहुतांश बस या कात्रज घाटातून जातात,
कात्रज जुना बोगदा संपल्यावर लगेच बस ड्रायव्हरला बस थांबवण्याची विनंती करून तिथे उतरायचे, आणि बोगद्याच्या डाव्या बाजूने चढाई करायची, वाघजाई मंदिरापर्यंत गेल्यावर तिथून डावीकडे वळावे, माहितीचा माणूस बरोबर हवाच या ट्रेक ला, आणि हा ट्रेक एकदा चालू केला तर पूर्ण करावाच लागतो, कारण मध्ये आपल्याला पाणी, अन्न, रस्ता असले काहीही पर्याय नाहीत, त्यामुळे चालण्याची आणि टेकड्या चढण्या उतरण्याची शारीरिक आणि मानसिक तयारी असेल तरच हा ट्रेक करावा.
आपण सिंहगडावर कोंढानपूर फाट्यावर पोहचतो,हे अंतर जरी १३ किमी असले तरी खूपच दमछाक होते, तिथून वडाप वाले ७०-८० रुपयात खाली सोडतात,
नाहीतर किल्ल्यावर जाऊन पुणे दरवाजाच्या अलिकडून आपण पायी खाली आतकरवाडीत उतरू शकतो, तिथून आपल्याला स्वारगेट बस मिळते.

४) सिंहगड ते राजगड ट्रेक
स्वारगेट वरून पहिली बस ५ वा. सुटते, त्या बसने आतकरवाडी पर्यंत गेल्यावर सिंहगड चढून कल्याण दरवाजातून उतरून कल्याण गावाकडे न जाता विनझर ची वाट पकडावी,
विनझर मध्ये गेल्यावर तिथून किंवा मार्गासनी पासून वडाप बघून गुंजवणे गावात जावे, तिथून राजगडावर जायला साधारण २ ते २.५ तास लागतात, परत गुंजवणे गावात येऊन वडाप पकडून मार्गासनी इथे येऊन बसने कात्रज ला यावे,
विनझर ते गुंजवणे हे डांबरी रस्त्याचे अंतर साधारण ९ किमी आहे, त्यामुळे ते वडाप ने गेलेले बरे, वेळ ही वाचतो आणि आपण लवकर माघारी ही येतो,
साधारण सिंहगड ते राजगड हे अंतर २५ किमीचे आहे, आणि राजगड वरून परत माघारी यायचे वेगळे,
त्यामुळे शेवटची बस कितीला आहे, आणि आपल्याला लागणार वेळ हे गणित बघूनच हा ट्रेक करावा.

५) ढवळगड (ढवळेश्वर) ते मल्हारगड
इथं पीएमटी जात नाही, त्यामुळे पुण्याच्या जवळ असले तरी आपल्याला आपली जायची यायची सोय करायला लागते.
साधारण अंतर १२ किमी.

६) ढवळगड (ढवळेश्वर) ते भुलेश्वर
इथेही पीएमटी जात नाही, इथेही आपल्याला जायची यायची सोय करायला लागते,
या ट्रेकचे ही अंतर साधारण १०-१२ किमी.

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Aug 2022 - 12:56 pm | ज्ञानोबाचे पैजार


पण कोणताही ट्रेक करताना पूर्ण माहिती घेतल्याशिवाय ट्रेक करू नका ही विनंती.

याच्याशी सहमत, कात्रज सिंहगड ट्रेकच्या वेळी माहितगार माणूस बरोबर होता, समोर टॉवरचा लाईट दिसत होता, तरी दुसर्‍या ट्रेकच्या वेळी सिंहगड ऐवजी चु़कल्या मुळे कोंढाणपुरात उतरावे लागले होते. नंतर एकदा परत चुकलो या वेळी सिंहगडावर पोचलो पण तो पर्यंत साधारण २० किमी पायपीट झाली होती.

याच यादीत अजून एक भर म्हणजे मळवली ते लोहगड, ह्याला ट्रेक नाही म्हणता येणार पण पावसाळ्यात ह्या वाटेवरुन चालायला मजा येते.

असाच एक छोटासा ट्रेक म्हणजे राजगड तोरणा, भुतोंडे खिंडीतून तोरण्याकडे जायचे बुधला माची पर्यंत जाउनही परत मागे येता येते. पावसाळी वातावरण नसेल तर वाटेवर लावलेल्या दोर आणि शिडीचा वापर करुन माचीवर पण जाता येईल. तोरण्यावरुन वेल्ह्याला गेले तरी तिकडून स्वारगेट ला जाणार्‍या बस मिळतात.

पैजारबुवा,

१) तैलबैलावरून खाली उतरून पाली गाठणे. रोहा -पाली -पुणे बसने वर येणे.
२) कामशेत - जांभिवली बसने कोंडेश्वर. तिथून ढाक खिंडीतून साडशी गावात उतरणे. कर्जतमार्गे पुणे.
३)महाबळेश्वरचा पश्चिम उतार. हातलोट घाट.
किंवा
कर्नाटक गाठा. कुद्रेमुखा,बाबा बुदनगिरी, केमन्नागुंडी, कुमारपर्वता,ब्रहमगिरी,तडियांडमूळ ट्रेक्स (हजार/दोनहजार मिटर्स)

यांचे यूट्यूबवर विडिओ सापडतील.

चौथा कोनाडा's picture

26 Aug 2022 - 5:35 pm | चौथा कोनाडा
चौथा कोनाडा's picture

26 Aug 2022 - 5:37 pm | चौथा कोनाडा

माहितीपुर्ण धागा.

👌

प्रचि असते तर आणखी कल्पना आली असती

#monsoon trek arvind pune# शोधावे.

पुण्याकडून एक पथ्य पाळल्यास अधिक आनंद मिळू शकतो. ते म्हणजे कारने त्या जागी पोहोचून कार परत पाठवायची. म्हणजे एका बाजूने सुरुवात करायची. दुसऱ्या बाजूला खाली किंवा वर जायचे.
उदाहरणार्थ नाणे घाट ट्रेक.

कंजूस's picture

27 Aug 2022 - 5:31 am | कंजूस

around
arvind