देवकुंडच्या वाटेवर.....

Primary tabs

चक्कर_बंडा's picture
चक्कर_बंडा in भटकंती
13 Aug 2022 - 2:21 pm

सकाळी-सकाळी सुर्यनारायण क्षितिजावर अवघा वीतभरही वर येण्याआधीच पिरंगुट ओलांडून पाऊस पिऊन हिरव्याकंच झालेल्या मुळशीच्या पांढरीतून, सह्याद्रीच्या पावलांना तुम्ही स्पर्श करावा. मालेच्या खिंडीतून जमिनीला भेटायला येणारे ढगांचे लोटच्या लोट वळणावर थांबून पाहावेत, मग मालेची खिंड ओलांडून, मुळशी धरणाचा जलाशय उजव्या हाताला ठेवत ताम्हिणीच्या अंतरंगात शिरावे. अग्नीच्या धगधगत्या वीर्यातुन जन्माला आलेला अतिप्रचंड, राकट, कणखर, काळा-कभिन्न सह्याद्री स्वतःचं आडदांड सामर्थ्य उधळत समोर यावा. डाव्या हाताला आभाळात घुसलेले सरळसोट अजस्त्र कडे तर उजव्या हाताला मुळशीचा प्रचंड जलाशय, वळणा-वळणाच्या सुंदर रस्त्याने, छोटी-छोटी गावे, वाड्या-वस्त्या झपाट्याने मागे टाकत, पुण्याची हद्द ओलांडून रायगडच्या हद्दीत पोहोचताच एका वळणावर अचानक दाट धुक्याच्या पोटात शिरावे व दुसऱ्याचं वळणाला बाहेर ही पडावे. मग प्रत्येक वळणाला हा पाठशिवणीचा खेळ तसाच खेळत, घाट उतरून पाटणुस-भिराची वाट पकडावी. मोठमोठ्या दगडी शिळांमधून वाट काढत धावणारं फेसाळ पाणी डाव्या हाताला ठेवत एका छोट्या पुलावरून पार होत, भिरा गावच्या वस्तीत गाडी उभी करत पाठपिशव्या अडकवीत, नाव-नोंदणीचा सोपस्कार आटोपून देवकुंडच्या वाटेला लागावे.

dev1

dev2

एक जवळपास कोरडा म्हणावा असा ओढा ओलांडून, गावातील सिमेंटचा रस्ता मागे टाकत आणि समोर येणारी दाट जंगलात घुसणारी पायवाट पकडावी. भिरा धरणाचा जलाशय डाव्या हाताला ठेवत त्याच्या कडे-कडेने जाणारी जंगलवाट, जलाशयाच्या पलीकडे तसेच उजव्या हातालाही हजारो वर्षांपासून स्थितप्रज्ञपणे ठाण मांडून बसलेले अजस्त्र सह्यकडे......त्यांचं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब न्याहाळत संथ चालीनं पुढे चालत रहावं. एखाद्या भुरळ पाडणाऱ्या सुंदर जागी, जलाशय आणि पाठीमागील गर्द झाडी निव्वळ अनुभवत शांत बसून राहावं. झाडी-झुडपे, वृक्ष त्यात गुरफटलेल्या वेली, अविरतपणे कानावर पडणारा नानाविध पक्षांचा एकमेकांत मिसळून गेलेला गुंजारव...सगळंच स्वर्गीय.....

dev3

dev4

मग मार्गातील दोन ओढे ओलांडून पुढे यावं. एव्हाना भिरा जलाशय मागे पडून, त्याची जागा डाव्या हाताने अवखळपणे वाहणाऱ्या ओढ्याने घेतलेली असते, मोठमोठ्या शिळांमधून वेगाने वाहणाऱ्या फेसाळ पाण्याचा आवाज कानात साठवत लाकडी पुलावरून अजून एक ओढा पार करून अंधारबन वाटावं अशा जंगलात घुसणाऱ्या चढणीच्या वाटेला भिडावं. पुढची पंधरा-वीस मिनिटे, घामाघूम करणारा, अंगावर येणार चढ, सूर्याची किरणे न पोहोचणाऱ्या पायवाटेवरून चालत पार करावा, दरम्यान, सुर्यकिरणाच्या अनुपस्थितीमुळे, मोठमोठ्या शिळा आणि झाडांची खोडं यावर जागोजागी समोर येणारी शेवाळाची कलाकारी, वेलींनी जखडलेल्या झाडा-झुडपांनी धारण केलेले गूढ अवतार न्याहाळत पुढे सरकत राहावं. सरतेशेवटी शेवटचा चढ पार करताच समोर येणारा दोन डोंगराच्या बेचक्यातून, खाली, खोल निवळशंक पाण्याच्या हिरवट-निळ्या डोहात, अदमासे ऐंशी ते शंभर फूट उंचीवरून सरळसोट खाली कोसळणारा स्वर्गीय शुभ्र जलप्रपात भान हरपून पहात राहावं......

dev5

dev6

चटका देणाऱ्या उन्हातून, पावलां-पावलांगणिक शरीरातील पाणी अव्याहत शोषून दमछाक करणाऱ्या दमट हवेतून, दगड-धोंड्यांची, ओढ्या-वघळीची सात किलोमीटरची पायवाट पार केल्यावर समोर येणाऱ्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या नजाऱ्याने सगळा शीण क्षणार्धात नाहीसा झालेला असतो, घामाने शिणलेलं खारट झालेलं अंग घेऊन तुम्ही देवकुंडाच्या डोहाकडे धाव घ्यावी, थंडगार पाणी पावलांना लागताचं हुडहुडी भरावी पण पहिल्याचं डुबकीबरोबर सगळे श्रम देवकुंडाच्या पाण्यात झरझर विरघळावे, मागे उरावे ते ईप्सित साध्य झाल्याचं प्रचंड आनंद देणारं समाधान....

dev7

dev8

सभोवतालची गर्दी विसरून, देवकुंडाचा स्वर्गीय प्रपात डोळ्यांत साठवून घेताना वेगळीच तंद्री लागावी, हजारो वर्षे महाराष्ट्राला आधार देणारा सह्याद्री, याच्या काळ्या-कभिन्न कड्यांना येथील माणसांनी लेण्यांचे, किल्ल्यां-बुरुजांचे साज चढवले, खिंडीना घाट-वाटांचे रूप दिले. वारा ठरत नसलेल्या ह्याच्या शिखरांवर मंदिरांचे दगड रोवून ते राबते ठेवले. स्वतःच्या कडे-कपारीच्या, शुभ्र जलप्रपातांच्या जोडीने, हे वैभवही या सह्याद्रीने मोठ्या प्रेमाने जपून ठेवले, सांभाळले. आजही देवकुंड सारखी स्वर्गीय जागा याच सह्याद्रीच्या कुशीतून डोंगरभटक्यांना स्वर्गीय अनुभूती चे चार क्षण देऊ करते आहे. याबद्दल सह्याद्रीचे मनापासून आभार मानावे.

dev9

dev10

देवकुंडात मनसोक्त डुंबून झाल्यावर परतीच्या मार्गावर पायांना पुन्हा मार्गस्थ करावे. आता अंतर वेगाने मागे पडतच असते तो झाडांच्या शेंड्यांपलीकडून दूरवर काळ्या-कभिन्न ढगांची दाटी तुमच्याच रोखाने तुमच्या दुप्पट वेगाने येताना दिसावी, काही क्षणात अंधारून येऊन टपोरे थेंब झाडांच्या दाटीतून जमिनीवर कोसळू लागावे, सवयीनं आडोसा घेण्याच्या निष्फळ प्रयत्नात पाचचं मिनिटात तुम्ही ओलेचिंब व्हावं अन मग अनायसे झालेली चूक उमजून पावसाला स्वाधीन होत रमत गमत चालू लागावं. गावात पोहोचता-पोहोचता पावसानेही शहाण्या मुलासारखी उघडीप देऊ करावी. झटपट कपडे बदलून तुम्ही गाडी काढावी तर त्याने पुन्हा: तुफान कोसळू लागावे. पुढच्या पंधरा-वीस मिनिटात तुम्ही ताम्हिणीच्या घाट-चढणीवर असावे तर त्याने मागून दाट धुक्याचे लोट घेऊन वेड्यासारखं बरसू लागावे, वळणा-वळणाच्या रस्त्यावरून, धुक्याच्या दाट चादरीखालून, सह्याद्रीच्या साथीने तुम्ही काळजीपुर्वक पुढे मार्गक्रमण करीत राहावं पण पावसाने मात्र अजिबात उसंत न घेता तुमच्या पाठलागावर असल्यासारखं मुसळधार कोसळत राहावं. धुक्यात लपलेल्या वाड्या-वस्त्या, गावे तुम्ही कोसळत्या पावसातच मागे टाकावी, सरतेशेवटी मालेची खिंड वळसा घालून पार करावी आणि अचानकचं पावसाने साथ सोडून मागे पडावे, घाटातच दाटून राहावे...... इथ त्याला निरोप द्यायला थोडा वेळ थांबून तुम्ही, पौड-पिरंगुट-भुकुम-भुगाव ओलांडत चांदणी चौकातून वैताग आणणाऱ्या ट्रॅफिक मध्ये शिरत, मजल-दरमजल करीत घर गाठावे.

dev11

dev12

रात्री, अंथरुणाच्या सुरक्षित ऊबेमध्ये, देवकुंडची वाट, देवकुंडचा स्वर्गीय जलप्रपात, ताम्हिणीतील धुक्याची चादर, तुफान कोसळणारा पाऊस आठवत निद्रेच्या अधीन व्हावे.

आयुष्यातील एका नितांत सुंदर स्वर्गीय दिवसाची, शांत - निवांत सांगता......

dev13

dev14

प्रतिक्रिया

मार्गी's picture

13 Aug 2022 - 2:44 pm | मार्गी

अद्भुत आणि अप्रतिम!!! लिहीलंयसुद्धा खूपच छान!

कॅलक्यूलेटर's picture

13 Aug 2022 - 3:23 pm | कॅलक्यूलेटर

मस्त! देवकुंडच्या अलीकडेच सीक्रेट वॉटरफॉल आहे तिथे नाही गेलात का?

कर्नलतपस्वी's picture

13 Aug 2022 - 4:03 pm | कर्नलतपस्वी

तुम्ही भटकतीच लिहीताय की काव्य? खुपच सुंदर निसर्ग आणी त्याचे वर्णन.
धन्यवाद

कर्नलतपस्वी's picture

13 Aug 2022 - 4:03 pm | कर्नलतपस्वी

तुम्ही भटकतीच लिहीताय की काव्य? खुपच सुंदर निसर्ग आणी त्याचे वर्णन.
धन्यवाद

विनोदपुनेकर's picture

14 Aug 2022 - 12:35 pm | विनोदपुनेकर

गेल्या पावसाळ्यामधे मित्र मन्ड्ळि जाउन आलो देवकुन्ड .... मस्त १० १२ किलोमिटरचि पायि रपेट होते , फक्त कोकनामधल ते दमट वातावरन ने वात आनला होते कारण पाउस गायब होता एकदमच... धबधबा अप्रतिम, भरपुर तरुन तरुणी सोशल मिडिया वरिल फोटो पाहुन आलेले सो किति दुर चालावे लागेल याचा अजिबात अन्दाज नवता त्याना एकन्दर हौस फिटली असे चेहरे सर्वांचे सर्व रस्त्याने, स्थानीक गावातील तरुण प्रत्येकी 50 रुपये गोळा करत होते, आम्ही तुम्हाला मदत करू या नावाखाली .. एकंदर छान अनुभव

मित्रहो's picture

14 Aug 2022 - 8:16 pm | मित्रहो

खूप छान फोटो आणि लेख
मला वाटतं इथे ऑरगानाइज्ड ट्रेकमधे जाणे योग्य असते. कुंडलिका नदी तीन वेळा पार करावी लागते.

सतिश गावडे's picture

14 Aug 2022 - 8:21 pm | सतिश गावडे

हे ठिकाण माझ्या तालुक्यात आहे आणि माझ्या पुण्याहून गावी येण्याजाण्याच्या वाटेवरच थोडेसे बाजूला आहे. एकदा हिवाळ्यात गेलो होतो तर विळे गावात स्थानिकांनी सांगितले की आता नका जाऊ, पाणी नसते त्यामुळे पाहण्यासारखे नसेल.

बघू कधी योग येतो ते. :)

मिसळपाव's picture

14 Aug 2022 - 8:56 pm | मिसळपाव

चक्कर-बंडा,
सुरेख लिहीलं आहेस! मोजकीच छायाचित्र दिल्येस पण नुसतं वाचन न होता वाचकाला जणू स्वतः अनुभव घेत त्या सगळ्या निसर्गात हरवून जाता यावं असं उत्कट लिहिलं आहेस. अनेकानेक धन्यवाद. वाचनखूण साठवून ठेवली आहे.

... एखाद्या भुरळ पाडणाऱ्या सुंदर जागी, जलाशय आणि पाठीमागील गर्द झाडी निव्वळ अनुभवत शांत बसून राहावं. झाडी-झुडपे, वृक्ष त्यात गुरफटलेल्या वेली, अविरतपणे कानावर पडणारा नानाविध पक्षांचा एकमेकांत मिसळून गेलेला गुंजारव...सगळंच स्वर्गीय.....

मित्रा, ईथे मी पण दोन मिनीटं थांबून, डोळे मिटून तिथे बसलो......

टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

खुपचं सुंदर! हिरव्या,निळ्या रंगांनी निसर्ग चित्र रेखाटत प्रवास वर्णन रेखाटले आहे.

चक्कर_बंडा's picture

14 Aug 2022 - 11:04 pm | चक्कर_बंडा

सर्वांचे मनापासून आभार !!!

आता गावात पार्किंगचे १०० रुपये आणि देवकुंडाकडे जाण्यासाठी वाटाड्याचे, गटात जेवढे लोक असतील त्याप्रमाणे प्रत्येकी १०० रुपये द्यावे लागतात. कुणी एक वाटाड्या मिळत नाही तर ते साखळी पद्धतीने वाटेवर विशिष्ट अंतरावर थांबून गरज पडल्यास मार्गदर्शन करतात. मार्गातील ओढे ओलांडण्यासाठी दोर व एक लाकडी पूल त्यांनी उभारला आहे. शिवाय आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्याची हमी ते देऊ करतात.

शेवटचा टप्पा वगळता, संपुर्ण मार्गावर गावकऱ्यांकडून पाणी, सरबत, चहा, नाश्ता याची सोय होते. पाण्याच्या बाटलीचे भाव जसेजसे पुढे जाता तसे वाढत जातात.

देवकुंडातील पाण्यात, डोहात खोल आत जाण्यास ही गावकऱ्यांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव मनाई केलेली आहे, दोर बांधून संरक्षित केलेल्या जागेत आपल्याला पाण्यात जाता येते.

पिरंगुटपासून संपुर्ण रस्ता उत्तम आहे. जलप्रपाताचे सौंदर्य पावसाळ्यात सर्वोत्तम, पावसाच्या कमी-अधिक प्रमाणानुसार दसरा-दिवाळीपपर्यंत धबधबा बऱ्यापैकी वाहता असतो तरी ही पावसाळ्यात जाणे उत्तम, शनिवार-रविवार टाळून गेलात तर अजूनच उत्तम.....

मुक्त विहारि's picture

15 Aug 2022 - 7:58 pm | मुक्त विहारि

लेख आणि फोटो आवडले