दिवाळी अंक २०२२ - संपादकीय

Primary tabs

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in दिवाळी अंक
5 Nov 2022 - 11:29 am

णपतीबाप्पांना निरोप दिला की वेध लागतात दसरा-दिवाळीचे. बाजारातली वाढणारी उलाढाल ही दिवाळी कशी जाणार याचा अंदाज देऊ लागते. या काळात काय करायचे याचे नियोजन प्रत्येक घरात होऊ लागते आणि वातावरणात एक निराळा उत्साह संचारतो.

कोविडच्या संकटातून जग बाहेर यायला सुरुवात झाली आहे असे वाटणारे हे वर्ष एक नवी आशा घेऊन आलेले आहे. श्रीलंकेत पसरलेली अशांतता, युक्रेन युद्धाचा ज्वर, दोन वर्षांच्या खंडानंतर निघालेली पंढरपूरची वारी, दोन वर्षांनी पुन्हा शाळेत जायला लागलेले विद्यार्थी, सावरणारी अर्थव्यवस्था अशा संमिश्र बातम्या आणि भावना घेऊन आलेली ही दिवाळी.

या कोविड महामारीने आपल्याला बरेच काही शिकवले. थाळीवादनापासून सुरू झालेला प्रवास 'आत्मनिर्भरते'पर्यंत जाऊन पोहोचला. या काळात सर्वांचे काही ना काही प्रमाणात नुकसान झाले असले, तरीसुद्धा या काळात आपल्याला अनेक चांगल्या सवयी लागल्या होत्या किंवा त्या सक्तीने लावून घ्याव्या लागल्या होत्या. आता या उत्तर कोविड काळात त्या चांगल्या सवयी सुटू नयेत, याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. उदाहरणार्थ, स्वच्छतेविषयी आपण सारे जण त्या काळात विशेष जागरूक झालो होतो. अशीच लागलेली दुसरी सवय म्हणजे घरकाम. कोविड गेला असे वाटत असले, तरी या सवयी चालू ठेवायला काहीच हरकत नाही. या सवयींमुळे झाला तर फायदाच होणार आहे.

दिवाळीला एखादी नवी खरेदी, नवे कपडे, फराळाचे पदार्थ याबरोबरच आपल्या सर्वांना वेध लागतात ते मिपा दिवाळी अंकाचे.

कथा, कविता, प्रवासवर्णन, रसग्रहण, ललित लेखन अशा विविध रसांनी युक्त असा अंक आम्ही तुमच्यासमोर सादर करतो आहोत.

नीलकांत, प्रशांत, सुधांशुनूलकर, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, गवि, सस्नेह, टर्मीनेटर, तुषार काळभोर, जव्हेरगंज, पियुशा, चिनार या सर्वांनी घेतलेल्या अपार मेहनतीच्या जोरावर हा अंक तुमच्या हाती देताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे.

या वेळी तांत्रिक अडचणींमुळे आपले मिपा बरेच दिवस विश्रांतिअवस्थेत होते. त्याचा परिणाम दिवाळी अंकावरही झाला. अंक ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा प्रसिद्ध होतो आहे, याशिवाय या अंकात काही त्रुटीदेखील राहिल्या आहेत, याची संपादक मंडळाला कल्पना आहे. त्याकरता टीम दिवाळी अंकातर्फे मी सर्व वाचकांची क्षमा मागतो. पण मिपा अशा अनेक प्रसंगांतून तावून सुलाखून बाहेर पडले आहे. याही वेळी आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने या अडचणींवर मात करून मिपा पुन्हा एकदा नव्या जोमाने आपल्या सेवेत रुजू होइल, याची ग्वाही देऊन हा अंक आपल्यासमोर सादर करतो.

ही दिवाळी आणि येणारे वर्ष आपणा सर्वांना सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे, आरोग्यसंपन्न व भरभराटीचे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

|| शुभ दीपावली ||

ज्ञानोबाचे पैजार

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

5 Nov 2022 - 4:55 pm | तुषार काळभोर

याजसाठीं केला होता अट्टाहास, आजचा दिवस गोड झाला!

'तुका' म्हणें वाचावया लेख सारी, आता दिवस चारी, खेळीमेळी!

कुमार१'s picture

5 Nov 2022 - 5:34 pm | कुमार१

आजचा दिवस गोड झाला!

पॉइंट ब्लँक's picture

5 Nov 2022 - 5:35 pm | पॉइंट ब्लँक

संपादक मंडळ आणि सर्व लेखकांचे अभिनंदन.
दर्जेदार साहित्याला एक हक्काच घर मिळालं आहे :)

सन्जोप राव's picture

5 Nov 2022 - 5:39 pm | सन्जोप राव

वा!
अंकाच्या प्रकाशनात सहभागी असलेल्या सर्वांचे अभिनंदन आणि आभार!

सरिता बांदेकर's picture

5 Nov 2022 - 6:20 pm | सरिता बांदेकर

अंक छान जमलाय नेहमीप्रमाणे.
माझी कथा अनुक्रमणिकेत आहे, पण ॲक्सेस डिनाय येतंय असं का बरं??

कर्नलतपस्वी's picture

5 Nov 2022 - 6:32 pm | कर्नलतपस्वी

सर्व तांत्रिक अडचणीवर विजय मिळवत, अथक परिश्रम करून दिवाळी अंक प्रकाशित करण्यासाठी साहित्य संपादक समुहाचे हार्दिक अभिनंदन.

दिवाळी अंकाची मांडणी, रंगसंगती खुप सुंदर आहे. अनुक्रमणीका सहज,सुलभ आसल्याने अंक वाचण्यास विषेश मदत होईल असे वाटते.

संपादकीय लिहीताना माऊलींनी विषेश श्रम घेत चतुरस्र फलंदाजी केली आहे. गतकाळातील गोष्टींचा आढावा घेत समाज प्रबोधनाचे भान ठेवले आहे.

माझा ललित लेख व कवीता सर्व त्रुटीसह स्वीकारून प्रोत्साहन देण्यासाठी विशेष आभार.

मिपा व मिपाकरांची सदैव भरभराट होत राहो हीच इश्वरचरणी प्रार्थना.

अनिंद्य's picture

5 Nov 2022 - 7:12 pm | अनिंद्य

यावर्षी मिपाचा दिवाळी अंक सर्वांसाठीच अडथळ्याची शर्यत ठरला. सणासुदीच्या दिवसात सर्व व्याप सांभाळून, न कंटाळता अडचणी सोडवण्यासाठी संपादक मंडळ आणि तांत्रिक चमूला मान मोडून काम करावे लागले असणार. सर्वांचे खूप कौतुक वाटते.

श्रमाचे चीज झाले, बहुप्रतीक्षित दिवाळी अंक आज आला.

यावर्षीच्या गणेश लेखमालेत जेमतेम १० लेख होते, दिवाळी अंक मात्र भरगच्च दिसतो आहे.
आता निवांत वाचणार !

सौंदाळा's picture

5 Nov 2022 - 10:15 pm | सौंदाळा

देर आये पर दुरुस्त आये.
संपादक मंडळ, दिवाळी अंक टीम, प्रशांत, नीलकांत यांच्यावर किती दडपण आले असेल समजू शकतो
तुलसी विवाहाच्या शुभ दिनी अंक प्रदर्शित झाल्याचा आनंद आहेच.
आता सावकाश वाचतो.

तांत्रिक अडचणी आल्यामुळे खूप मोलाचा वेळ वाया गेला पण त्यावर मात करून उत्तमोत्तम लेखांनी सजलेला आणि सुखद रंगसंगतीने नटलेला अंक फार आवडला. संपादकीय उत्कृष्ट.

दिवाळी अंकात लेख द्यायचा होता पण नेमके मिपा बंद असल्याने वेळेत लिहिता आले नाही याची खंत वाटते, पण आता एकेक लेखाचा निवांत आस्वाद घेत राहीन.

कंजूस's picture

6 Nov 2022 - 4:54 am | कंजूस

ज्ञानोबाचे पैजार,
आणि
नीलकांत, प्रशांत, सुधांशुनूलकर, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, गवि, सस्नेह, टर्मीनेटर, तुषार काळभोर, जव्हेरगंज, पियुशा, चिनार या सर्वांनी घेतलेल्या अपार मेहनतीच्या जोरावर काढलेला हा सुंदर मिसळपाव दिवाळी अंक २०२२ पाहताना अतिशय आनंद होतो आहे.
सर्व लेखकांचे आणि अंकाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या वाचकांचे आभार.

अतिशय कष्टाचं काम आज संपूर्ण दिवाळी अंक टीमने तडीस नेलं आहे. या ठिकाणी खालील परिच्छेद वाचण्यात आला.

नीलकांत, प्रशांत, सुधांशुनूलकर, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, गवि, सस्नेह, टर्मीनेटर, तुषार काळभोर, जव्हेरगंज, पियुशा, चिनार या सर्वांनी घेतलेल्या अपार मेहनतीच्या जोरावर हा अंक तुमच्या हाती देताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे.

यात ज्येष्ठत्वाचा हक्क म्हणा किंवा जो काही असेल तो हक्क वापरुन माझे नाव कमी करतो.

केवळ चार सल्ले, दोनचार अभिप्राय आणि मते व्यक्त करणे याखेरीज या प्रोजेक्टमधली कोणतीही कामे, विशेषत: तो अडचणीच्या काळात तडीस नेण्याच्या दृष्टीने न केल्याने या अग्रणी उल्लेखाबद्दल स्वत:ची अत्यंत अपात्रता जाणवते. आणि त्याहून जास्त म्हणजे इट्स अन्फेअर फॉर कोअर वर्किंग टीम मेंबर्स. अगदी शेवटपर्यंत त्यांचे कष्ट आणि अंकाला येत असलेला आकार पहात आलो असल्याने त्यांचे फार कौतुक वाटते.

फार तर शेवटी इतर सहाय्य (चादर, तांब्याभांडे, पुष्पगुच्छ वगैरेची सोय केल्याबद्दल इ इ म्हणून) मी, प्राडॉ ठीक. ;-)

पण ज्या टीमने अत्यंत अथक कष्ट घेतले आहेत त्यांचे मनापासून अभिनंदन. आता अंक पुन्हा वाचतो. :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Nov 2022 - 8:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकदाचा दिवाळी अंक आला. खुप आनंद झाला. मिपावर लेखन प्रतिसाद टाकल्यानंतर येणा-या येररने मिपावर यायचा लिहायचा उत्साह नव्हता. त्यात दिवाळी अंक. दिवाळी अंक टीमने खुप मेहनत घेतली. नीलकांत, प्रशांत, नुलकरसाहेब, सस्नेह, टर्मीनेटर, तुषार काळभोर, जव्हेरगंज, पियुशा, चिनार या सर्वांचे श्रेय. आम्ही आपले तान देणारे, यंव झालं पाहिजे त्यंव झालं पाहिजे. इकडे येऊन पडलेले सामान तिकडे टाका, हे सांगण्यापुरते. तेव्हा, सर्व टीमचं मनापासून अभिनंदन.

-दिलीप बिरुटे

सस्नेह's picture

6 Nov 2022 - 8:27 am | सस्नेह

प्रा. डॉ सर, माझाही सहभाग अगदीच नगण्य आहे, हे नम्रपणे नमूद करु इच्छिते. संपादकांना विनंती करुनही माझे नाव वगळले नाही हा त्यांचा मोठेपणा.
गविंचा आणि तुमचा सहभाग निश्चितच मार्गदर्शक ठरला आहे. प्रशांत, नीलकांत, नूलकरकाका,टर्मिनेटर, पैजारबुवा आणि तुषार यांचे कष्ट थोर.
धन्यवाद.
स्नेहा.

गवि's picture

6 Nov 2022 - 8:37 am | गवि

ह्य ह्य ह्य..

अरे आता सर्वांनीच आपले काहीच कष्ट नव्हते असे म्हणू नका. माझा सुरुवातीचा पंच जातोय त्यामुळे. ;-)
शेवटी एकेक जण गळून जात हा अंक व्हावा हे तो श्रींची इच्छा इतकेच उरेल किंवा कसे?

पण त्याचबरोबर राखीव खंबिरराव मिपाकडे आहेत हे आम्ही लक्षात ठेवतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Nov 2022 - 8:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दिवाळी अंकात लेखन येत होते आणि मिपा एरर मधे गायबही होत होते. कोणते लेखन नवे आणि कोणते जुने, काय राहिले काय आले नुसता गोंधळ उडालेला होता. नंतर, नंतर तर मी पाहणे सोडले. कोणी तरी बघेल आणि पुढे ते लेख नेतील कार्यवाही होईल. माझ्या सारखे विचार करणारे अजुन दोन तीन लोक तिथे होते वाटतं. उदा. गवि, प्रचेतस, गणपा, वल्ली हीच नावे होती की अन्य आठवत नाही. (चुभुदेघे) :/

-दिलीप बिरुटे

शशिकांत ओक's picture

6 Nov 2022 - 10:58 am | शशिकांत ओक

म्हणजे नक्की काय? याचा खुलासा डॉ बिरुटे सरांच्या लिखाणात थोडा कळाला.
लहानपणी वडील स्वैपाकाला लागले की आईला कावळा शिवलाय असे सांगितले जायचे. त्यातली तांत्रिक अडचण समजल्यावर समाधान वाटले.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

6 Nov 2022 - 9:03 am | ॲबसेंट माइंडेड ...

दिवाळी अंक आलेला बघुन आनंद झाला.
तुम्हा सर्वांचे आभार.

मार्गी's picture

6 Nov 2022 - 6:29 pm | मार्गी

सर्वांचं खूप खूप अभिनंदन!!! संपादकीय छान, नेटकं आणि अर्थपूर्ण आहे! सर्वांच्या मेहनतीला सॅल्युट. काही कारणामुळे ही खूप कठीण पिचवरची मॅच झालीय हे कळत होतं. त्यामुळे किती प्रयत्न करावे लागले व त्रास झाले असतील, ह्याचीही किंचित कल्पना करता आली.

श्रीगुरुजी's picture

6 Nov 2022 - 6:37 pm | श्रीगुरुजी

अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून प्रकाशित झालेला दिवाळी अंक अतिशय सुंदर आहे. सर्व संपादक मंडळाचे अभिनंदन व धन्यवाद!

स्वधर्म's picture

6 Nov 2022 - 7:57 pm | स्वधर्म

जरी उशीराने प्रसिध्द झाला असला, तरी अत्यंत देखणा अंक काढल्याबद्दल संपादक मंडळाचे आभार. आता सवडीने सर्व लेख वाचेन.
शहाणा शेतकरी, वेडा माणूस हा माझा लेख चामुंडराय यांच्या नावाने प्रसिध्द झाला आहे, त्याच्या लेखकाच्या नावात दुरूस्ती लवकरात लवकर करावी, ही संपादक मंडळास विनंती.

साहित्य संपादक's picture

6 Nov 2022 - 8:08 pm | साहित्य संपादक

तसा बदल त्वरित करण्यात आला आहे. इमेल वर लेख आल्याने थोडी गडबड झाली होती त्याबद्दल क्षमस्व.

स्वधर्म's picture

6 Nov 2022 - 9:04 pm | स्वधर्म

संपादक मंडळाच्या तत्परतेबद्दल खूप धन्यवाद. जमले तर फटोही टाकावा ही विनंती.

चांदणे संदीप's picture

7 Nov 2022 - 8:37 am | चांदणे संदीप

जीव एकदाचा खूप मोठ्या भांड्यात पडलाय.

मिपा दिवाळी अंकाचे स्वागत.

सं - दी - प

श्वेता व्यास's picture

7 Nov 2022 - 10:42 am | श्वेता व्यास

माननीय "नीलकांत, प्रशांत, सुधांशुनूलकर, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, गवि, सस्नेह, टर्मीनेटर, तुषार काळभोर, जव्हेरगंज, पियुशा, चिनार आणि ज्ञानोबाचे पैजार" या सर्वांचे मनःपूर्वक आभार. सर्व तांत्रिक अडचणींवर मात करून दिवाळी अंक आल्याचा अतिशय आनंद झाला आहे.

नि३सोलपुरकर's picture

7 Nov 2022 - 10:50 am | नि३सोलपुरकर

संपादक मंडळ आणि सर्व लेखकांचे अभिनंदन, तांत्रिक अडचणींवर मात करून दिवाळी अंक आल्याचा अतिशय आनंद झाला आहे.

Bhakti's picture

7 Nov 2022 - 1:12 pm | Bhakti

पाककृती सहभागी करून घेतल्याबद्दल आभार!
रचक्याने भक्ति
चालेल पहिली वेलांटीपण चालेल पण मला आयडी मिळेल का? :)

मिपा चा दिवाळी अंक बराच देखणा झाला आहे. विशेष म्हणजे या दिवाळी अंकात वैविध्य देखील खूप आहे. एकूणच सर्व थरातील वाचकांचे मनोरंजन आपला मिपा चा हा दिवाळी अंक करणार यात शंका नाही. पुनःश्च अभिनंदन

भाऊबिजेनंतर दिवाळी officially संपते. परंतु शास्त्रानुसार आकाशकंदील आपण तुळशीच्या लग्नापर्यंत ठेवतो. मिपाचा दिवाळी अंक उशीरा का होईना परंतु तुळशीच्या लग्नापूर्वी आला. आता खरी दिवाळी वाटती आहे. आता अंक वाचून होईपर्यंत आकाशकंदील उतरवणार नाही. सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छा

तुषार काळभोर's picture

7 Nov 2022 - 9:04 pm | तुषार काळभोर

हा हा!!

मुक्त विहारि's picture

7 Nov 2022 - 6:24 pm | मुक्त विहारि

उत्तम संघ भावना असेल तर, कितीही अडचणी आल्या तरी, ध्येय गाठता येतेच...

बिपीन सुरेश सांगळे's picture

8 Nov 2022 - 8:53 am | बिपीन सुरेश सांगळे

अंकाचं स्वागत न खूप कौतुक आहे .
सर्व संपादक मंडळाचं अन कार्यकर्त्यांचंही कौतुक न आभार .

अंकाला उशीर झाला , हरकत नाही .
दिवाळीत फराळ खावासा वाटत नाही ; पण तेच दिवाळी संपल्यावर त्याची चव भारीच न्यारी लागते .

देखणा अन महत्त्वाचा अंक आपला !

शुभेच्छा !

Jayant Naik's picture

8 Nov 2022 - 9:40 am | Jayant Naik

सर्व संपादक मंडळाचे अनेक आभार. अंक उत्तम जमलाय. संपादक मंडळाने केलेल्या अथक परिश्रमाचे कौतुक करावे तितके थोडेच.

अनन्त्_यात्री's picture

8 Nov 2022 - 11:12 am | अनन्त्_यात्री

प्रकाशनात सहभागी असलेल्या सर्वांचे अभिनंदन

नीलकंठ देशमुख's picture

8 Nov 2022 - 3:24 pm | नीलकंठ देशमुख

उशीरा का होईना अंक निघाला..छान. सर्व संबंधितांनी खूप कष्ट घेतले. त्याचे सार्थक झाले.सर्वांचे अभिनंदन आणि धन्यवाद

कुठलेही पाल्हाळ नं लावता, मोजक्या शब्दात लिहिलेले संपादकीय आवडले आणि अंकही आवडला!

"जल्दी का काम शैतानका होता है... इंसान को धैर्य रखना चाहिये."

असा समस्त मानवजातीच्या हिताचा संदेश प. पू. श्री. श्री. देवकुमार मलिक उर्फ डी.के. मलिक (अभिनेता: विजयराज) ह्यंनी 'धमाल' चित्रपटातून दिलेला आहे, त्याला अनुसरून "आधीच उशीर झालेला आहे तेव्हा घाई-गडबड करून दिवाळी अंक प्रकाशित करण्यापेक्षा अजून थोडा उशीर झाला तरी चालेल पण अंकाच्या दर्जाशी तडजोड करायची नाही" असा सुयोग्य निर्णय 'टीम दिवाळी अंक' ने घेतला त्यासाठी सर्वप्रथम मी सर्व टीम मेंबर्स आणि आपला संयम ढळू नं देता विनातक्रार अतिशय उत्तमप्रकारे टीमला सहकार्य करणाऱ्या सर्व लेखक मंडळींचे मनापासून आभार मानतो 🙏

न भूतो न भविष्यती अशा 'तांत्रिक अडचणी' येत होत्या, त्या सुधारल्या जात होत्या, पुन्हा येत होत्या, पुन्हा सुधारल्या जात होत्या. त्यामुळे अंकाच्या निर्मिती प्रक्रियेत वारंवार अडथळे येत होते, एकच काम पुन्हा पुन्हा करावे लागत होते अशा अनेक 'गमती-जमती' घडत होत्या, त्यातल्या काही बिरुटे सरांनी वर सांगितल्या आहेतच. खरंतर ह्या गमती जमतींवर चित्रपटांचे जसे 'मेकिंग ऑफ अमुक-तमुक' टाईप व्हिडिओ असतात त्या धर्तीवर 'मेकिंग ऑफ मिपा दिवाळी अंक २०२२' असा लेख कोणी लिहिला तर तो धागा सुपरहिट होईल ह्यात शंकाच नाही 😀

असो, ज्ञानोबाचे पैजार (पैजारबुवा) ह्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व अडथळ्यांवर मात करत थोडा उशिराने प्रकाशित झालेल्या आपल्या 'मिपा दिवाळी अंक २०२२' चे सर्व मिपाकरांनी केलेले उस्फुर्त स्वागत बघून एक विलक्षण समाधान लाभले आहे, त्याबद्दल सर्व वाचकांचेही खूप खूप आभार!

जाता जाता:
२०१९ चा दिवाळी अंक 'यशोधरा', २०२० चा 'गवि', २०२१ चा 'तुषार काळभोर' आणि २०२२ चा हा अंक 'ज्ञानोबाचे पैजार' अशा चार संपादकपदी विराजमान झालेल्या सहकारी मिपाकरांबरोबर खेळीमेळीच्या वातावरणात अंक सजावटीचे काम करायला मजा आली, खूप काही नवीन शिकायला मिळाले. पण आता दुसऱ्या कुणाला संधी मिळावी असा विचार करून इथेच थांबावे म्हणतो! अर्थात विशेषांकांच्या कामातून निवृत्ती जाहीर करत असलो तरी मिपावर सक्रीय राहून अधून-मधून काही-बाही धागे पाडत त्रास देणे मात्र चालूच ठेवणार आहे, त्या अत्याचारातून मिपाकरांची सुटका नाही 😂

पुन्हा एकदा सर्व लेखक, वाचक आणि दिवाळी अंकाच्या कामात सहभागी झालेल्या सर्व मिपा सहकाऱ्यांचे आभार 🙏

विनिता००२'s picture

8 Nov 2022 - 9:36 pm | विनिता००२

संपादक मंडळ आणि सर्व लेखकांचे अभिनंदन :)

रोज मिपा बघत होते. अंक कधी येईल? उत्सुकता होतीच.
अडचणींवर मात करून दिवाळी अंक आल्याचा अतिशय आनंद झाला आहे.
वाचून कमेंट देईनच

चौथा कोनाडा's picture

9 Nov 2022 - 7:46 pm | चौथा कोनाडा

अतिशय उत्तम संपादकीय प्रकटन.

आणीबाणीच्या प्रसंगात सुद्धा संपादक आणि सहकाऱ्यांनी जे कष्ट घेतले आहेत, त्या साठी त्यांना मानाचा मुजरा.

अंक वाचण्यास सुरुवात केलीच आहे. अंकांचा आनंद घेत आहे.

धन्यवाद मिपा आणि मंडळी !

मित्रहो's picture

13 Nov 2022 - 8:11 am | मित्रहो

थोडक्यात परंतु उत्तम संपादकीय.
आता हळूहळू अंकातील लेख वाचून त्यावर प्रतिसाद देतो. यावर्षी दिवाळीच्या आत संपवायची घाई नाही. आरामसे

प्रसंगोचित अन समर्पक संपादकीय आवडले.
दिवाळी अंक भरगच्च आणि सुरेख दिसतो आहे. संपादक मंडळाचे अभिनंदन !
अगदी आपलं वाटणारं, मराठमोळं मिसळपाव अविरत सुरु राहण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या प्रशासकांचे विशेष आभार !

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Nov 2022 - 1:12 pm | ज्ञानोबाचे पैजार

थोड्या साशंक मनाने यावर्षीचा "दिवाळी अंक" दिवाळी नंतर प्रकाशित केला, त्याला इतका चांगला प्रतिसाद मिळेल आशी अपेक्षाच नव्हती. त्या करता सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार.

अंक प्रकाशित व्हायला जसा उशिरा होत होता तशी वाचक आणि लेखकांमधली बेचैनी वाढत होती. पण सर्वांनी संयमाने घेतले आणि कार्यकर्त्यांना भक्कम पाठिंबा दर्शवला. खरेतर या पाठिंब्यामुळेच अंक प्रकाशित करायचाच निश्चय दृढ होत गेला.

अंक प्रकाशित अनेक अडचणी येत होत्या, झालेले काम सेव्ह होत नसल्याने एकच काम पुन्हा पुन्हा करावे लागत होते. पण जस जश्या अडचणी वाढत होत्या तसा चमूचा उत्साह सुध्दा वाढत होता. प्रत्येक वेळी नव्या जोमाने कामाला सुरुवात व्हायची.

अंक प्रकाशित करताना त्यात अनेक त्रुटी आहेत याची जाणिव होती, श्रीगुरुजी आणि विजुभाऊ यांचे लेख पहिल्या प्रकाशनात समाविष्ट करायचे राहून गेले, मग नुलकरकाकांनी युध्दपातळीवर मुशो करुन दिले आणि टर्मिनेटर यांनी सजावटीचे काम तितक्याच तातडीने केले.

या नंतरही वाचकांच्या आणि लेखकांच्या सूचना येतच होत्या आणि त्या प्रमाणे योग्य ते बदल अंकात होत होते. अजूनही सुरु आहेत. ऑनलाईन अंक असल्याचा हा एक फायदाच म्हणायचा.

संपादकपदाची माळ माझ्या गळ्यात पडली तेव्हा असे काही होईल याची साधी कल्पना सुध्दा केलेली नव्हती. पण एकंदरीत हा अनुभव माझ्याकरता तरी नक्कीच अविस्मरणिय होता.

दिवाळी अंक टिम तर्फे मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो.

आणि ही संधी मला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मिपाच्या संचालक मंडळाचेही मी व्यक्तिशः आभार मानतो.

दिवाळी अंक टिम मधल्या सहकार्‍यांचे आभार मानणे म्हणजे त्यांना परके करण्यासारखे आहे. सदैव त्यांचा प्रेमात आणि ऋणात राहाणे मला अधिक आवडेल.

इतकेच म्हणेन की मिपा कडे असे खंबीरराव आहेत म्हणुनच मिपा इतक्या दिमाखत चालते आहे.

पैजारबुवा,

गोरगावलेकर's picture

21 Nov 2022 - 1:16 pm | गोरगावलेकर

संपादक मंडळाचे अभिनंदन तसेच उत्तमोत्तम लेख देणाऱ्या सर्व लेखक/लेखिकांचे
आभार

मला दिवाळी अंकाचे स्रेय ज्याने त्याने दुसर्याला दिले हा मराठी लोकांना न शोभणरा मोठेपणा एक व दुसरे म्हणजे दिवाळी अंकासाठी प्रत्येकाना दुसर्याला स्रेय दिल्याने दिवाळी अंक आपला आपणच प्रसिद्ध झाला असे वाटते.