आंबेनळी घाटाने उतराई आणि मढे घाटाने चढाई ट्रेक २९.०५.२०२२

Primary tabs

Vivek Phatak's picture
Vivek Phatak in भटकंती
8 Aug 2022 - 1:55 pm

आंबेनळी घाटाने उतराई आणि मढे घाटाने चढाई ट्रेक २९.०५.२०२२

तीन वर्षापूर्वी ऐन पावसाळ्यात जुलै महिन्यात शिवथर भागातील गोप्याघाट केला होता. ह्याच भागातील घाटमाथ्या वरून कोकणात उतरणाऱ्या इतरही घाटवाटा जसे उपांड्या, मढे, आंबेनळी, शेवत्या खुणावत होत्या. त्यापैकी ह्या दोन घाटवाटा करायची संधी आमच्या ट्रेक ग्रूपमुळे मिळाली. २८ तारखेला रात्री ११.३० ला पुण्यातून निघून वेल्हा तालुक्यातील केळद गावी पोचलो तेव्हा रात्रीचे २/२.३० झाले होते. केळद हे ५००/५५० लोकवस्तीचे छोटेसे पण अतिशय टुमदार गाव. जवळच असलेल्या मढेघाट ह्या पर्यटन केंद्रामुळे, विशेषतः पावसाळ्यात वाहणाऱ्या येथील अजस्र धबधब्यानमुळे आणि तेथे चालणाऱ्या waterfall rapelling मुळे हे गाव अतिशय लोकप्रिय आहे.

गावातील विठ्ठल रखुमाई देवळाच्या प्रशस्त आवारात अर्ध्या तासात फ्रेश होऊन, पाठ पिशवी व्यवस्थित भरून ट्रेक साठी सज्ज झालो. तो पर्यंत आमचा वाटाड्या रामभाऊ पण आला. गावातल्या समस्त श्र्वानांच्या यथेच्छ भुंकण्याच्या पार्श्वभूमीवर ट्रेकसाठीच्या सगळ्या पूर्वसूचना देऊन झाल्यावर, रात्री ३ च्या सुमारास ट्रेकची सुरुवात झाली.

सुरवातीच्या कच्च्या रस्त्यावरून सुरुवात होऊन हळू हळू आम्ही जंगलातल्या पायवाटेला लागलो. जंगलात बऱ्याच ठिकाणी काजवा महोत्सव अनुभवायची संधी मिळाली. हातातल्या आणि डोक्यावरील विजेर्या विजवून, गच्च अंधारात हा सुंदर अनुभव घेतला. झाडावर बसलेल्या काजव्यांमुळे, संपूर्ण झाडच चमचमत होते. पण इथे जास्त वेळ न दवडता आम्ही पायवाटेने पुढे निघालो.

पण, हाय रे दैवा!! आम्ही वाट चुकलो. अंधारात आमचा वाटाड्या गंडला. थोडासा खळग्या खळग्यांचा भाग वाटत होता, बहुतेक ओढा असावा. तिथेच ग्रुपने जागा मिळेल तिथे बसकण मारली आणि अर्धा पाऊण तास डुलकी घेतली. आमच्यातल्या दोघा तिघांनी अर्धा पाऊण तास Google baba च्या साथीने जंगलात फिरून योग्य मार्ग शोधला. तीच होती ही अतिशय निमुळती तीव्र उताराची, मातीपासून सुटलेल्या दगडांची आंबेनळी घाटवाट.

दोन्ही बाजूने किर्र जंगल. उतरताना छोटे छोटे दगड निसटून खाली घरंगळत होते. प्रत्येक जण आपल्या कुवतीप्रमाणे घसरत घसरत ही फारशी वापरात नसलेली वाट उतरत होते. पहाटे ४.३०/५ वाजता उतरायला सुरुवात केलेली ही वाट, साधारण ७५% उतरल्यावर आम्ही उजवीकडे traverse घेतला कर्णवडी गावाकडे जाण्यासाठी, तेव्हा सकाळचे ६ वाजले होते. पुढे वाट खाली तळ कोकणात उतरते.

.

.

.

.

एव्हाना उजाडायला सुरुवात झाली होती. जंगलात विविध पक्षांचे मंजुळ गुंजारव चालू होते. वाट उतरताना वारा नसल्यामुळे घामाने अक्षरशः निथळत होतो. आता थंड वाऱ्यामुळे अक्षरशः स्वर्गीय आनंद झाला. पुढे ७-८ जण गेले होते. मागचे अजुन खूपच मागे होते. आम्ही तिघे जण पुढच्या मंडळींनी मारलेल्या दिशादर्शक खडू खुणा फॉलो करत चालत होतो. वाटेत आंब्यांनी लगडलेली पुष्कळ झाडे होती. चालून चालून भूक लागलेलीच होती. मग काय, आंब्यांवर यथेच्च ताव मारला. झाडावरून आंबे तोडून खाण्यात मजा काही औरच होती. कोणाच्या मालकीची ही झाडे नव्हती. जंगलातीलच झाडे ती, अडवणार कोण. मनसोक्त आंबे खाल्ले. झाडावर चढून झाड हलवले की टपाटप आंबे/कैऱ्या पडत होत्या. आमच्या वाटाड्याने तर पोते भरून कैऱ्या घेतल्या. इथे जांभळाची पण झाडे होती. जांभळं ही खूप खाल्ली. करवंदाची जाळी तर पायवाटेच्या दोन्ही बाजूने थोड्या थोड्या अंतराने होतीच. त्याचाही फराळ चालता चालता चालूच होता. करवंदाच्या चिकाने चिकट झालेला तळहात, तिथल्याच कोणत्यातरी झाडाची पानं तोडून पुसून घ्यायचा, हा कार्यक्रम चालूच होता. घरून आणलेला डबा उघडावा लागलाच नाही. इथे जवळपास १.३०/२ तास घालवले. मागून येणारी लोकं थोड्या थोड्या वेळाने येत होती आणि आम्हाला जॉईन होत होती.

.

.

.

.

.

पुढे १५/२० मिनिटांच्या चालीवर, रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर दुर्गम अशा डोंगर कपारीत, मढे घाटाच्या दरीत वसलेले कर्णवडी हे छोटेसे गाव लागले. तिथे पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. एव्हाना ८.३० झाले होते.

.

.

.

इथून पुढे माथ्यावरील केळद गाव गाठायला मढे घाट किंवा उपांड्या घाटाने जावे लागते. पैकी उपांड्याने वेळ थोडा कमी लागतो त्यामुळे आमच्यातील काही लोकं त्या वाटेने गेले. आम्ही मात्र ( majority लोकं) ठरल्याप्रमाणे मढे घाटाने निघालो. सिंहगडावर बलिदान दिलेल्या सरदार ' तानाजी मालुसरे ' यांचे शव मढे घाटातून ' बिरवाडी ' मार्गे त्यांच्या उमरठ ह्या गावी नेले म्हणून ह्या घाटाचे नाव मढे घाट पडले अशी वंदता आहे.

ह्याही घाटात आंब्यांची खूप झाडे होती. आमचा वाटाड्या त्याचे पोते भरतच होता. ते भरलेलं पोत घेऊन घाट चढणे त्याला नक्कीच कठीण होत होतं. त्यामुळे तो आमच्या मागे पडत होता. करवंदाच्या जाळ्या पण जागो जागी होत्या. त्याचाही आस्वाद अधून मधून घेत आमची चढाई चालू होती. ह्या घाटात दोन्ही बाजूने भरपूर झाडोरा होता त्यामुळे उन्हाचा त्रास अजिबात जाणवत नव्हता. पण हवा नसल्यामुळे घामाच्या धारा लागल्या होत्या. घाम पुसायला रुमाल अपुरा पडत होता. थोड्या थोड्या वेळाने थांबत, पाणी पीत नव्या हुरूपाने नागमोडी चढाई चालू होती. काही काही ठिकाणी दगडांचा वापर करून पायऱ्या बांधलेल्या दिसत होत्या. त्यावरून घाटाची प्राचीनता लक्षात येत होती. पावसाळ्यात आपल्या घनघोर आवाजाने आसमंत दणाणून सोडणारा " लक्ष्मी धबधबा " आता कोरडाठाक पडला होता. घाटाच्या शेवटी डोंगर थोडासा ढासळलेला होता. त्यातून मार्ग काढत मढे घाटाच्या पठारावर पोचलो तेव्हा १० वाजले होते.

.

.

.

.

ऐन उन्हात सुध्धा पठारावर जोरदार गार वारा होता. त्यामुळे चढाईमुळे घामेजलेल्या शरीराला ताजेतवाने वाटले. घाटमाथ्या वरून दिसणारा नजारा तर लाजवाब होता. उजवीकडे गाढवकडा, समोर खाली कर्णवडीचे पठार, त्यापलीकडे सह्याद्रीची डोंगररांग. थोडावेळ एका झाडाखाली बसून सगळा आसमंत न्याहाळून घेतला, फोटो काढले आणि तेथून दोन तीन किमी असलेल्या केळद गावाकडे मार्गस्थ झालो. गावच्या ग्रामपंचायतीच्या नळावर मस्त फ्रेश झालो. आमच्या ट्रेक संस्थेने आयोजलेल्या आमरसाचे जेवण करून २.३०/३ च्या सुमारास पुण्याकडे मार्गस्थ झालो. बस मधे थोडीथोडी डुलकी घेत पुण्यात पोचलो तेव्हा ६ वाजले होते.

.

.

.

.

.

प्रतिक्रिया

कॅलक्यूलेटर's picture

8 Aug 2022 - 3:16 pm | कॅलक्यूलेटर

मस्त!

एकनाथ जाधव's picture

8 Aug 2022 - 3:43 pm | एकनाथ जाधव

धुसर का दिसत आहेत?

फोटोची साइज निवडण्यात चूक झाली त्यामुळे फोटो धूसर दिसत आहेत.

मुक्त विहारि's picture

8 Aug 2022 - 5:03 pm | मुक्त विहारि

धन्यवाद

श्रीगणेशा's picture

9 Aug 2022 - 8:23 am | श्रीगणेशा

छान वर्णन!
आंबेनळी घाट असं वाचताच रायगड आणि साताऱ्याला जोडणारा घाट असा गैरसमज झाला. आणि लेख वाचताना लक्षात आलं की हा आंबेनळी घाट वेगळा, मढे घाटाच्या जवळचा!

२० वर्षांपूर्वी जिथे कोणीही फिरकत नव्हतं असा मढे घाट परिसर आता बऱ्यापैकी गर्दीचा झाला आहे, विशेषतः पावसाळ्यात, लक्ष्मी धबधबा पाहण्यासाठी!

(फोटो टाकताना फक्त height द्यावी, width देऊ नये. दोन्हीही दिलं तर मग बऱ्याचदा ते मूळ फोटोच्या प्रमाणात नसल्यामुळे फोटो धूसर, distort होतो)

कुठल्याही ऋतूत हा घाट सुंदरच असतो मात्र पावसाळ्यात ह्याचे सौंदर्य अधिक खुलते. उत्तम वृत्तांत.