इजिप्तमधील "डिस्कव्हरी"

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
8 Nov 2021 - 11:19 am

माहितीच्या खजिन्यासाठी मी नेहमी डिस्कव्हरी चॅनेल बघत असतो. अशातच इजिप्तच्या अनेक प्राचीन गूढ गोष्टींबद्दल काहीतरी बघावे असे वाटले म्हणून काही महिन्यापूर्वी एका रविवारी ओटीटी प्लॅटफॉर्मवर डिस्कव्हरी प्लस मध्ये इजिप्तवर कार्यक्रम शोधले तेव्हा "एक्सपेडिशन अननोन: इजिप्त स्पेशल" हा कार्यक्रम बघण्यात आला. (अज्ञात मोहीम: इजिप्त विशेष)

याची रूपरेषा थोडक्यात अशी आहे की, कार्यक्रमाचा अँकर जोश गेट्स हा इजिप्तमधील एका साईटवर क्रिसला भेटतो. तिथे डॉ. झाही हवास हे पुरातत्व संशोधक असतात. त्यांच्या देखरेखीखाली उत्खनन सुरू असते. ही साईट म्हणजे गिझा पिरॅमिडच्या दक्षिणेकडे मिन्या जवळ अल गोरिफा येथे असते, ज्याला "मध्य इजिप्त" म्हटलं जातं.

या कार्यक्रमात त्या साईटवरचे पुरातत्व संशोधक जी एकेक माहिती जोशला (आणि पर्यायाने आपल्याला) देत जातात ती छान आहे. अनेक जुन्या ईजिप्शियन संस्कृती, चालीरीती, मान्यता तसेच 2500 वर्षांपूर्वीचे ईजिप्शियन सुवर्णयुग, याची माहिती मिळते. पक्ष्यांची चोच असलेले देवता थॉत (ज्ञान देवता), सारकोफगुस, आयसिस (प्रेमदेवता), हेरेडोटस हा इतिहासकार याबद्दल रंजक माहिती मिळत जाते. तिथून 6 किलोमीटर दूर "एल असमोनियन" मध्येही जोश फेरफटका मारतो. तिथेही उत्खनन सुरू असते.

थोडक्यात, या कार्यक्रमाचा गाभा "लाईव्ह एस्केवेशन" म्हणजे "उत्खननाचे थेट प्रसारण" दाखवणे असा काहीसा आहे.

डिस्कव्हरी प्लस मध्ये इजिप्तवर आणखी एक कार्यक्रम आहे, "ईजिप्त: व्हॉट लाईज बिनिथ? इजिप्तस लॉस्ट सिटीज!" म्हणजे "इजिप्तच्या पोटात दडलंय काय? इजिप्तची हरवलेली शहरं!"

त्यात सारा पारकाक ही संशोधक असते. ती सॅटेलाईटद्वारे काढलेल्या इजिप्तच्या हाय रिजोलुशन इमेजेसच्या आधारे संशोधन करते. त्या फोटोंवर इन्फ्रारेड वापरून ती शोधते की जमिनीखाली काय काय असू शकेल? याला "स्पेस आर्किओलॉजी" असे म्हणतात. हाय रिजोलुशन इमेज म्हणजे असा फोटो की ज्यात कितीही झूम केले तरी छोटे आणि दूरवरचे ऑब्जेक्ट्स क्लियर दिसतील.

सारा इजिप्तची राजधानी कैरोमध्ये येते. तिथे ती रोमी रोमानी या पुरुष गाईडसोबत फिरते. ती गिझा आणि इतर पिरॅमिड्स जवळ जाते आणि मार्क नावाच्या आर्किओलॉजिस्टला त्या ठिकाणचे तिने संशोधन केलेल्या सॅटेलाईट इमेजेस दाखवते. त्या इमेजेस मध्ये एक मार्गिका दिसून येते ज्याद्वारे कदाचित पिरॅमिड्स बांधण्यासाठी दगड वाहून नेले असावेत.

सॅटेलाईट इमेजेस नुसार जिथे जिथे आणखी पिरॅमिड्स असू शकतील (जी आज अज्ञात आहेत) अशी ठिकाणे तिने शोधली आहेत. पण त्याला सिद्ध करण्यासाठी तिला उत्खनन करण्यासाठी सरकार कडून परवानगी हवी असते. त्यासाठी ती प्रयत्न सुरू करते. सध्याचे पिरॅमिड्स हे दोन मिलियन रॉक्स (खडक) ने बनलेले आहेत. त्यात एकावर एक चौकोनी चेंबर्स असून सगळ्यात वर त्रिकोणी चेंबर असते. हे पिरॅमिड्स म्हणे नाईल नदीशी पण जोडलेले आहेत. साराच्या मदतीसाठी रोमी इजिप्तच्या म्युझियममध्ये विविध प्रकारच्या पिरॅमिड्सवर रिसर्च करायला जातो आणि तिला मदत करतो.

ज्यांना विविध देशांतील पुरातन इतिहास आणि लुप्त झालेल्या संस्कृती अशा विषयांची आवड आहे, त्यांनी हे प्रोग्राम बघायला हरकत नाही. आपल्या ज्ञानात भर पडते.

- निमिष सोनार, पुणे

इतिहासमाध्यमवेध

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

8 Nov 2021 - 4:59 pm | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Nov 2021 - 10:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मलाही असे ऐतिहासिक पट आवडतात. वेगवेगळी माहिती मिळत असते.
लिहिते राहावे.

-दिलीप बिरुटे