दिवाळी अंक २०२१ : पॉलिनिशियात मानवाचे आगमन

केदार भिडे's picture
केदार भिडे in दिवाळी अंक
1 Nov 2021 - 9:00 pm

body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");}

.navbar-fixed-top {
background-color: #000011;
border-bottom: 1px solid #111;
}
.node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;}
.page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Eczar',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
/* Hidden Items*/
.input-group {display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
/* फोटो */
.field-items img {background-color: white;border: 1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);max-width:100%;height:auto!important;}
.author-type-posted, .field-items a:link {color:#660000;}
.left {float:left;display:inline-block;margin-right:10px;margin-top:16px;}
.right {float:right;display:inline-block;margin-left:10px;}
.center {margin: auto;}
.portrait { margin-bottom:10px;max-width:450px;}
.landscape { margin-bottom:10px;max-width:800px;}
.kavita p{text-align:center}
.title {text-align:center;margin-bottom:32px;margin-left:24px;margin-right:24px;}
.col-sm-9 {padding:16px;background-color:#fefefa;box-shadow:0 4px 10px 0 rgba(0,0,0,0.2),0 4px 20px 0 rgba(0,0,0,0.19)}

.anklogo {float:left; max-width:300px;margin-top:4px;margin-right:16px;}
.voilet {background-color: #9900cc;color:#ffffff;}

आपल्या सिद्धान्ताच्या पडताळणीकरता थॉर हेयरडाहल यानी पॅसिफिक महासागरात एका तराफ्यावरून आपल्या ५ सहकार्‍यांसह १०० दिवस प्रवास केला. या मोहिमेची कथा सांगण्याचा आणि त्या प्रश्नाची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न आहे.

मानवाची पावले आज पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहेत. पॅसिफिक महासागराचे एकूण क्षेत्रफळ पृथ्वीवरील उपलब्ध जमिनीच्या क्षेत्रफळापेक्षा जास्त आहे. अशा या विशाल समुद्रात विखुरलेली अनेक छोटी छोटी बेटे आहेत आणि त्या बेटांवर लोकवस्ती आहे. अशाच बेटांचा एक समूह पॉलिनिशिया म्हणून ओळखला जातो. पश्चिमेस न्यूझीलँड, पूर्वेला इस्टर बेटे (किंवा रापा नुइ) आणि उत्तरेला हवाई यांना जोडणारा एक मोठा त्रिकोण काढला की पॉलिनिशिया तयार होतो (आकृती १).

आकृती १ - Google maps screenshot

1

सोळाव्या शतकापासून युरोपातील समुद्रमार्गे निघालेल्या दर्यावर्दींना या प्रदेशातील विविध बेटांचे दर्शन झाले. त्यांना ते तिथे पोहोचण्याअगोदरच मानवाची वस्ती असल्याचे पाहून आश्चर्यच वाटले. या बेटांवर मानवाने पाउल ठेवणे तसे सोपे नाही. त्यामुळे अफ्रिकेतून सुरू झालेला आपला प्रवास या दूर दूर पसरलेल्या बेटांवर कसा येऊन पोहोचला, याबद्दल संशोधकांना कायमच कुतूहल वाटले आहे. आजपासून सुमारे बारा हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवर शेवटचे हिमयुग शेवटच्या टप्यात होते. त्याही आधी, म्हणजे सुमारे तीस हजार वर्षांपुर्वी समुद्रातील बरेचसे पाणी बर्फरूपात गोठून राहिल्याने समुद्रपातळी आजच्यापेक्षा खाली होती. आजचे ऑस्ट्रेलिया खंड आणि त्याच्या उत्तरेचा पापुआ न्यू गिनी हे देश एकमेकांना जोडलेले होते, आज बेटांवर विखुरलेला इंडोनेशिया मलेशियाशी जोडलेला होता. मात्र ऑस्ट्रेलिया-न्यू गिनी आणि मलेशिया-इंडोनेशिया हे एकेमेकांपसून पाण्याने वेगळे होतेच (आकृती २).

आकृती २ - https://commons.wikimedia.org/wiki/File:Map_of_Sunda_and_Sahul.png
2

अशाही परिस्थितीत ऑस्ट्रेलिया-न्यू गिनी आणि आणखी काही बेटांवर मानव जाऊन पोहोचलाच. तत्कालीन मानवाला होडी, तराफा यांची कला अवगत असली पाहिजे, त्याशिवाय हा प्रवास शक्य नाही. तिथून पुढचा प्रवास मात्र तितका सोप्पा नाही, कारण तिथून पुढे बेटे अधिक विरळ आणि दूर दूर आहेत. न्यूझीलँड हा ऑस्ट्रेलियापासून जवळ भासणारा प्रदेश, पण तिथेही मानवी वस्तीचे आगमन व्हायला इसवी सनाचे बारावे शतक यावे लागले. पॉलिनिशिया या काल्पनिक त्रिकोणाचे क्षेत्रफळ साधारण २.५ कोटी चौ.कि.मी. (भारताच्या साधारण ८ पट) असून त्यामध्ये जमीन केवळ ३ लाख चौ.कि.मी. आहे (साधारण १%) आणि बाकी सगळे पाणी. यावरून आपल्याला या बेटांच्या दुर्गमत्वाची कल्पना येते. तर या दुर्गम बेटांवर मानवाने वस्ती कशी निर्माण केली, या प्रश्नावर नॉर्वेच्या थॉर हेयरडाहल यांनीही आपली नजर वळवली. त्याकरता त्यांनी पॅसिफिक महासागरात एक धाडसी मोहीम आखली.

थॉर हेयरडाहल

१९१४मध्ये जन्मलेले थॉर ऑस्लो, नोर्वे येथे खरे तर प्राणिशास्त्राचे आणि भूगोलाचे विद्यार्थी होते. तिथे विद्यार्थी असतानाच त्यांचे पॅसिफिक महासागरतील बेटांवरील संस्कृतीविषयी कुतूहल जागृत झाले. १९३६मध्ये फातुहिवा या पॉलिनिशियामधल्या एका बेटावर त्यानी आपल्या पत्नीसोबत स्थानिक लोकांत तिथल्या पद्धतीचे जीवन जगत एक वर्ष वास्तव्य केले. या वास्तव्याच्या काळातच पॉलिनिशियातील बेटांवर मानव कसा आणि कोठून पोहोचला असेल हा प्रश्न त्यांच्याही मनात आला. फातुहिवा येथील अनुभवातून त्यांनी असा निष्कर्ष काढला की सध्याच्या दक्षिण अमेरिकेतील किनाऱ्यावरून तेथील लोक हे समुद्रामार्गे प्रथम इस्टर बेटावर आले असावेत आणि नंतर तिथून ते पॉलिनिशियातील अन्य बेटांवर पसरलेले असावेत. त्यांच्या या सिद्धान्ताला पुरक अशा मुद्द्यांची चर्चा त्यानी स्वत:च्या लेखनातून केली आहे. पॉलिनिशियात आहारात समाविष्ट असलेले रताळे हे मुळात दक्षिण अमेरिकेतील आहे. दोन्हीकडच्या भाषांत त्याला असलेले नावेही एकमेकांशी साधर्म्य साधणारी आहेत. पॉलिनिशियात पायऱ्या असलेली पिरॅमिड्स दक्षिण अमेरिकेतील पिरॅमिड्सशी जवळची आहेत. दक्षिण अमेरिका आणि पॉलिनिशिया येथील लोककथांचाही आधार थॉर यांनी घेतला आहे. पूर्वेकडून आलेल्या लोकांनी आमच्या बेटावर वस्ती वसवली अशा कथा अनेक बेटांवर प्रसिद्ध आहेत. पेरू या देशातील एका कथेत काही शुभ्र आणि दाढी असलेले पुरुष अवतारल्याचे सांगितले आहे. काही काळानंतर स्थानिक जनतेने त्यांना पेरूमधून हाकलून लावले आणि त्यामुळे त्यांना पश्चिमेकडे समुद्रमार्गे निघून जावे लागले. हे मुद्दे सांगितले तरीही त्यांना मुख्य अडथळा होता तो पेरू आणि पॉलिनिशिया यांच्या मध्ये असणाऱ्या विशाल समुद्राचा. तत्कालीन दक्षिण अमेरिकेत एवढा मोठा समुद्र पार करून जाऊ शकतील अशा नौका उपलब्ध नव्हत्या, तर केवळ शीड असलेले तराफे होते. दक्षिण अमेरिकेत नंतर आलेल्या युरोपातील दर्यावर्दीनी त्यांची वर्णने करून ठेवली आहेत. या साध्या तराफ्यांचा वापर करून एवढ्या लांबचा प्रवास करणे शक्य नाही असा मुख्य आक्षेप थॉर यांच्या सिद्धान्ताला होता. अशा परिस्थितीत तराफ्यावरून दक्षिण अमेरिका ते पॉलिनिशिया हा प्रवास शक्य आहे की नाही याची पडताळणी थॉर यांनी स्वतःच करण्याचे ठरवले. त्यातून जन्माला आली कॉन-टिकी (Kon-Tiki) मोहीम.

कॉन-टिकी

थॉर यांनी आपल्या पाच सहकाऱ्यांसह कलाओ या पेरू देशातील शहरात आपला तराफा बांधायला घेतला (आकृती ३).

आकृती ३ - https://www.kon-tiki.no/wp-content/uploads/2016/09/2000323751001.jpg
3

त्याकरता पेरूच्या नौसेनेने जागा आणि मनुष्यबळ पुरवले. तराफा बांधताना कोणत्याही प्रकारे धातूचे खिळे, तार यांचा वापर केला नाही. लाकडी ओंडके एकमेकाना जोडण्यासाठी झाडांपसून तयार केलेले दोर वापरण्यात आले. थॉर यानी पॉलिनिशियात ऐकलेल्या लोककथांमध्ये आलेल्या एका देवाचे नाव कॉन-टिकी होते, त्यावरूनच या तराफ्याला नाव देण्यात आले कॉन-टिकी. २८ एप्रिल १९४७ रोजी पेरूमधून निघालेली ही मोहीम साधारण साडेतीन महिन्यात ७००० कि.मी. अंतर पार करून पॉलिनिशियात जाउन एका बेटावर जाऊन संपली. हे सर्व अंतर केवळ वार्‍याच्या आणि समुद्रातील नैसर्गिक प्रवाहाच्या मदतीने पार केले.

साडेतीन महिन्यानी मोहिमेतील सर्व जण सुखरूप पलीकडे पोहोचले. वाटेत मासेमारीमुळे अन्नाची कमी जाणवली नाही. दोन महिन्यांनी त्यांच्याजवळचे पाणी खराब झाले, मात्र समुद्रावर अध्ये ममध्ये येणाऱ्या पावसाने त्यांना पुरेसा पाण्याचा पुरवठा केला. आपल्या सिद्धान्ताला असलेला मुख्य अडथळा दूर करण्यात थॉर यशस्वी झाले. थॉर यांनी त्यांच्या प्रवासातील अनुभवावर एक पुस्तकही लिहिले आहे आणि त्याच नावाचा चित्रपट २०१२मध्ये प्रदर्शीत झालेला आहे.

आधुनिक संशोधन

थॉर हेयरडाहल यानी यशस्वीपणे हा कठीण प्रवास पूर्ण केला असला, तरी त्या काळातही त्यांच्या सिद्धान्तावर टीका झाली. तसेच, वंशश्रेष्ठत्वाच्या दृष्टीकोनातून संशोधन केल्याचाही आरोप त्यांच्यावर झाला आहे. आधुनिक संशोधकही त्यांच्या सिद्धान्ताला मान्यता देत नाहीत. थॉर यानी त्यांची धाडसी मोहीम केल्यानंतर पॉलिनिशियातील मानवाच्या आगमनाबद्दल संशोधन चालूच राहिले आहे.

या संशोधनातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे लापिता संस्कृतीचा शोध (आकृती ४).

आकृती ४ - https://commons.wikimedia.org/wiki/File:Oceania_UN_Geoscheme_-_Map_of_Po...
4

वर उल्लेख केल्याप्रमाणे हिमयुगाच्या अंतापर्यंत मानवाचा प्रसार सोलोमन बेटांपर्यंत झालेला दिसतो. सोलोमन बेटांच्या पश्चिमेला असणाऱ्या काही बेटांवर ३५००-४००० वर्षांपूर्वी लापिता संस्कृतीचा उगम झालेला आढळतो. सिरॅमिकपासून तयार केलेली भांडी आणि चांगल्या होड्या अशा दोन वस्तूंच्या वापरासाठी हे लोक प्रसिद्ध आहेत. हेच लोक पुढे साधारण २८०० वर्षांपुर्वी टोंगा, सॅमोआ इथे जाउन पोहोचले, म्हणजे अगदी पॉलिनिशियाच्या दारातच जाऊन पोहोचले. इथून पुढचा प्रवास सुरू होण्यास मात्र फार वेळ लागला. साधारण १००० वर्षांचा कालावधी गेल्यानंतरच इथून पुढच्या बेटांवर मानवाचे आगमन झालेले दिसते. न्यूझीलँडमध्ये लोकवस्ती प्रस्थापित होण्यास इसवी सनाचे बारावे शतक यावे लागले, हे आपण वरती पाहिले आहे किंवा हवाई येथे लोकवस्ती इसवी सनाच्या नवव्या-दहाव्या शतकात प्रस्थापित झाली. त्या काळात वातवरणातील काही विशिष्ट बदलामुळे समोआ-टोंगा येथून पुढे पूर्वेस समुद्रावर प्रवास सुकर झाल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. भाषा आणि गुणसूत्रांच्या अभ्यासातून पॉलिनिशियातील लोकांचे त्यांच्या पश्चिमेला असलेले संबंध अधिकच दृढ असल्याचे दिसून येते. पॉलिनिशियात बोलल्या जाणाऱ्या भाषा या ऑस्ट्रोनेशियन नावाच्या भाषासमूहात आहेत. याच भाषासमूहातील भाषा आजच्या इंडोनेशिया, फिलिपाइन्स इथे बोलल्या जातात. त्यामुळे लापिता संस्कृतीचे लोक नेमके कोठून आले याबद्दल एकवाक्यता नसली, तरीही याच संस्कृतीच्या लोकानी पश्चिमेकडून पूर्वेकडे आपला प्रवास चालू ठेवत एकेक बेट पादाक्रांत केले असे म्हणता येईल.

अजूनही एक प्रश्न अनुत्तरित राहतो, तो म्हणजे रताळ्याचा. युरोपातील दर्यावर्दी जगभर हिंडत पॉलिनिशियात येण्यापूर्वी इथे आहारात रताळ्याचा समावेश होता. आणि इतका आधी की कोलंबस अमेरिकेत येण्याच्याही (इस १४९२) आधी रताळे पॉलिनिशियात जाऊन पोहोचले आहे. तसेच गुणसूत्रांच्या अभ्यासातूनही पॉलिनिशियातील आणि दक्षिण अमेरिकेतील लोकांचा एकमेकांशी संपर्क आला असल्याचे कळते. आता प्रश्न आहे की अमेरिकेतील लोक पॉलिनिशियात गेले की पॉलिनिशियातले अमेरिकेत गेले, किवा दोघेही इकडे तिकडे फिरत होते? इथे त्यांचा आधीचा प्रवास पाहता पॉलिनिशियातील लोक आधीपासूनच नौकानयनात प्रवीण असले पाहिजेत, या गोष्टीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. थॉर यांची एक मोहीम कमी होती म्हणून की काय, १९७५मध्ये हवाईतील लोकानी पारंपरिक होडी (Hōkūleʻa) आणि नॅव्हिगेशनसाठी केवळ पारंपरिक तंत्रे वापरून पॉलिनिशियात अनेक ठिकाणी भेट दिली. त्या मोहिमेतून पॉलिनिशियात फार पूर्वीच नौकानयन किती उन्नत अवस्थेत पोहोचले, याची कल्पना सर्वांनाच आली. थॉर यांनी दक्षिण अमेरिकेतूनही असा प्रवास शक्य असल्याचे दाखवून दिले असले, तरी त्यांच्या काळापर्यंत समुद्रातील वारे, प्रवाह यांचे ज्ञान उपलब्ध झालेले होते. पॅसिफिकच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांनी (अगदी पॉलिनीशियातील लोकांनी नव्हे) केवळ पूर्वेकडेच नव्हे, तर पश्चिमेकडेही मादागास्करपर्यंत आपल्या नौकांतून प्रवास करून दाखवलेला आहे. मादागास्करमधील भाषा आज ७००० कि.मी. दूरच्या ऑस्ट्रोनेशियन भाषासमूहाचा भाग आहे. त्यामुळे तराफ्यांवर तरंग़णार्‍या दक्षिण अमेरिकी लोकांपेक्षा नौकानयनात तरबेज असलेले पॉलिनिशियाई लोक दक्षिण अमेरिकेत गेले असण्याची शक्यता अधिक वाटते.

न्यूझीलँडसहित पॉलिनिशियातील बेटे ही जगात सगळ्यात शेवटी मानवी वस्ती प्रस्थापित झालेल्या ठिकाणांपैकी आहेत. तिथे जाण्यासाठी तत्कालीन लोकांनी केलेले प्रयत्न हे त्याही पूर्वीपासून सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक विलक्षण हिस्सा आहेत.

संदर्भ
[1] Patrick, V. Kirch. "Peopling of the Pacific: A holistic anthropological perspective." Annual Review of Anthropology 39 (2010): 131-148.
[2] Rull, Valentí. "Human discovery and settlement of the remote Easter Island (SE Pacific)." Quaternary 2.2 (2019): 15.
[3] Heyerdahl, Thor. "The voyage of the raft Kon-Tiki." The Geographical Journal 115.1/3 (1950): 20-41.
[4] https://www.kon-tiki.no/thor-heyerdahl/
[5] Thorsby, Erik. "Genetic evidence for a contribution of native Americans to the early settlement of Rapa Nui (Easter Island)." Frontiers in Ecology and Evolution 4 (2016): 118.
[6] Wilmshurst, Janet M., et al. "Dating the late prehistoric dispersal of Polynesians to New Zealand using the commensal Pacific rat." Proceedings of the National Academy of Sciences 105.22 (2008): 7676-7680.
[7] http://www.hokulea.com/voyages/our-story/
[8] Blench, Roger. "Evidence for the Austronesian voyages in the Indian Ocean." The global origins and development of seafaring 239 (2010): 48.

प्रतिक्रिया

पराग१२२६३'s picture

2 Nov 2021 - 11:42 pm | पराग१२२६३

लेख आवडला.

पाषाणभेद's picture

3 Nov 2021 - 1:44 am | पाषाणभेद

तुमच्यामुळे आम्हाला नवीन माहिती समजली.

सौंदाळा's picture

3 Nov 2021 - 11:15 am | सौंदाळा

पॉलिनिशियातील एका बेटावर येथील स्थानिक जमातीबरोबर तब्बल चार महिने राहिलेल्या एका खलाशाची 'पाचूंचे बेट' ही अनुवादीत कादंबरी हल्लीच वाचली. साधारण विसाव्या शतकाचा सुरुवातीचा काळ असावा. बेटावरील निसर्ग, लोक, त्यांच्या चालीरिती, खाणे-पिणे, रुढी-परंपरा यांची सुंदर माहिती त्यात आहे. टैपी आणि हप्पार या २ स्थानिक जमाती बेटांवर असून त्यांच्यातले वैमनस्य, मारामार्‍या वगैरेंची वर्णनेदेखील आहेत.
हा लेख वाचून अजुन छान माहिती मिळाली. धन्यवाद.

मुक्त विहारि's picture

3 Nov 2021 - 11:25 am | मुक्त विहारि

लेख आवडला

केदार भिडे's picture

3 Nov 2021 - 11:40 am | केदार भिडे

दिवाळी अंकाशी संबंधित सर्वांचे अनेक आभार.
सर्व मिपाकर त्यांच्या लेखनातून इतरांना अध्ययन-लेखन याकरता प्रेरणा आणि मार्गदर्शन करताच असतात. त्यांचेही आभार.

अमरेंद्र बाहुबली's picture

4 Nov 2021 - 10:01 pm | अमरेंद्र बाहुबली

लेख आवडला

नवीन माहिती मिळाली, लेख आवडला

तुषार काळभोर's picture

16 Nov 2021 - 7:17 pm | तुषार काळभोर

अस्ताव्यस्त पसरलेल्या दूरदूरच्या बेटांवर मुख्य प्रवाहातील जगापासून हजारो किलोमीटर दूर राहणं... दळणवळणाच्या सुविधा नसताना.. कशाची गरज असेल तर पूर्ण करण्याचे ठिकाण काही हजार किलोमीटर दूर..
पॉलिनेशिया मधील लोकांचे जीवन अजूनही फार सुकर असेल असे वाटत नाही. अर्थात निसर्गाच्या सान्निध्यात, जगरहाटी पासून दूर, असे जीवन अंगवळणी पडल्याने त्यांना त्यात सुखच वाटेल.

खुप वर्षांपुर्वी कॉनटिकी हे पुस्तक वचले होते आज त्यची पुन्हा उजळणी झली.