हंपी, हंपी आणि पुन्हा हंपी! भाग ३

एक_वात्रट's picture
एक_वात्रट in भटकंती
23 Oct 2021 - 8:00 pm

०९ ऑगस्ट
आज सकाळी लवकर मातंग टेकडीवर पोहोचून तिथून सुर्योदय पहायचे आमचे नियोजन होते. पण असे होणार नव्हते (हे प्रवासवर्णन नसून नाटक असते तर ‘नियतीला हे मंजूर नव्हते’ असे लिहिले असते, असो.) स्वत: रमतगमत आवरत आणि दुस-याला ‘अरे आवर पटकन...’ असे म्हणत म्हणत शेवटी सकाळी साडेसातला आम्ही मातंग टेकडीवर पोचलो.
मातंग टेकडी उंचीला आपल्या पर्वतीच्या साधारण दीडपट असावी. पायथ्यापासून साधारण वीस ते तीस मिनिटांत आपण वरती पोचतो.
मातंग टेकडीवरून संपूर्ण हंपी गावाचे विहंगम दृष्य दिसते.


अंजनेय पर्वत - वेळ कमी पडला आणि इथे जायचे राहिलेच.

चारही बाजुंना अस्ताव्यस्त पसरलेले मोठमोठे दगड, दूरवर वाहणारी तुंगभद्रा नदी, त्याशेजारी दिसणारे विरुपाक्ष मंदिराचे भलेमोठे गोपूर, आडवेतिडवे पडलेले रस्ते, त्यांच्या आजूबाजूला दिसणारी (काही ओळखीची आणि बरीचशी अनोळखी) मंदिरं. सारंच सुंदर असं. मला तर मातंग टेकडी जाम आवडली, हंपीतल्या लोकांचा हेवाही वाटला. आपण हंपीत राहत असतो तर १००% रोज आलो असतो इथं.

विरूपाक्ष मंदिर


अच्युतराया मंदिर

अच्युतराया मंदिर जवळून

उन चढायला लागल्यावर आम्ही निघालो.
मातंग टेकडीवरून खाली उतरताना


मातंग टेकडी उतरेपर्यंत पावणेनऊ झाले होते. आम्ही हॉटेलात जाऊन नाश्ता केला आणि लगेच पुन्हा बाहेर पडलो. आता आम्ही हंपीतली काही फारशी प्रसिद्ध नसलेली मंदिरं पाहणार होतो.
आमचा पहिला थांबा होता चंद्रशेखर मंदिर.

नंतर आम्ही गेलो सरस्वती मंदिरात.

नंतर आम्ही गेलो अष्टकोनी स्नानगृह पहायला.


राण्यांचे स्नानगृह बंदिस्त आहे तर हे खुले - अर्थात् ते राजांसाठी असावे आणि हे सामान्य माणसांसाठी!
ही मंदिरं पाहून झाल्यावर आम्ही गेलो प्रसन्न विरूपाक्ष अर्थात् भूमिगत शिवमंदिर पहायला.


प्रसन्न विरूपाक्ष मंदिरात पाणी भरलेले आहे. ह्या पाण्यामुळे हे मंदिर थोडेसे गूढ, एखादे रहस्य आपल्या गर्भात लपवून ठेवल्यासारखे वाटते. आम्ही मंदिराच्या गर्भगृहात जाण्याचा प्रयत्न केला. पाणी दोनेक फूट खोल होते आणि पुढे आणखी खोल वाटत होते, त्यात गर्भगृहातून दोन तीन वटवाघुळे पंख फडफडवत बाहेर आली - आम्ही तत्काळ परत फिरलो!

इथे काल आम्हाला राजवाडा परिसर दाखवायला आलेला आमचा गाईड पुन्हा भेटला. खरंतर हा माणूस भापुसचा कर्मचारी होता, काल सुट्टी म्हणून गाईडचं काम करत होता. ह्या बोलघेवड्या माणसाशी जवळपास एक तास गप्पा मारल्यावर आणि मंदिराच्या आवारात असलेल्या हिरवळीवर यथेच्छ लोळल्यावर आम्ही निघालो जेवण करायला. वाटेत आम्हाला लागले शंकरनारायण द्वार. आपल्याला कोणीच पहायला येत नाही म्हणून ते बिचारे थोडेसे खट्टू झालेले दिसले.

जेवण झाल्यावर खोलीवर गेलो असतो तर बाहेर पडणे अवघड होते, तेव्हा तिथेच थोडा वेळ घालवून आम्ही निघालो माल्यवंत रघुनाथ मंदिर पहायला.
हंपीतल्या ज्या थोडक्या मंदिरांमध्ये आजही पूजाअर्चा चालू आहे त्या मंदिरांत माल्यवंत रघुनाथ मंदिराचा समावेश होतो. हे मंदिर एका छोट्या टेकडीवर आहे. मंदिराची रचना गमतीदार आहे - मंदिर बांधताना जागेवर सापडलेल्या एका दगडाला न हालवता चक्क मंदिराचा एक भाग बनवले गेले आहे. त्यामुळे आज मंदिराचा कळस ह्या मोठ्या दगडावर उभा केलेला दिसतो.

सूर्यास्त होत होता. मंदिराच्या अलीकडच्या बाजूला एक मंदिर आहे - इथे आम्ही काही वेळ रेंगाळलो.


एका मोठ्या दगडावर बनवलेले मंदिर

दूरवर दिसणारी मातंग टेकडी

माल्यवंत रघुनाथ मंदिराचा कळस

नंतर मंदिराच्या पलीकडल्या बाजूस असलेल्या दगडांवर गेलो.

मुख्य मंदिराच्या पलीकडे एक नैसर्गिक घळ आहे. याच्या दोन्ही बाजूला अनेक नंदी आणि शिवलिंगे कोरलेली आहेत.

अंधार बराच झाल्यावर (आणि सुरक्षारक्षकाने हाकलल्यावर) आम्ही तिथून निघालो.
ज्याचा शेवट गोड ते सारे गोड असे म्हणतात, पण आज आमच्या दिवसाची सुरूवात नि शेवट दोन्ही गोड झाले होते.

प्रतिक्रिया

हा भागही जबरदस्त. फोटो तर कहर आहेत.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

23 Oct 2021 - 9:14 pm | ॲबसेंट माइंडेड ...

खुप छान.

धोंडे अजब आहेत.

बोलघेवडा's picture

23 Oct 2021 - 10:17 pm | बोलघेवडा

वा!! खूपच सुंदर. मालयावंत मंदिर आणि मातंग टेकडी खूप आवडले.

वाह!हंपी दर्शन मस्त!दगडावर बांधलेले कळस ३ डीच वाटत आहेत.फोटो +१११

टर्मीनेटर's picture

24 Oct 2021 - 9:50 am | टर्मीनेटर

सर्वच फोटो मस्त आहेत
फोटो क्रमांक ३ मध्ये दगडावर कोरलेला/बसवलेला मेघडंबरी सारखा आकार सॉलिड आहे आणि माल्यवंत रघुनाथ मंदिरातला तो दगडात कोरलेला कळस तर क्लासच 👍

चौथा कोनाडा's picture

24 Oct 2021 - 5:12 pm | चौथा कोनाडा

अप्रतिम !
💖
सातवे प्रचि (विरूपाक्ष मंदिर) .... खुप आवडले क्या बात ! पाषाणांवर पडलेले सुंदर सोनेरी उन, नदी आणि वृक्षराजी, पकडलेला अ‍ॅन्गल .... सगळंच सुंदर !

अथांग आकाश's picture

25 Oct 2021 - 8:24 am | अथांग आकाश

सुरेख फोटोग्राफी! लेख आवड्ला!!
0

विंजिनेर's picture

26 Oct 2021 - 12:49 am | विंजिनेर

पोटभर फोटो टाकल्याबद्दल धन्यवाद. मस्त