मराठी दिन 2021

मराठी दिन 2021

 

स्वराज्याचा लढा आणि पुरंदरचा तिढा ! ( भाग १)

Primary tabs

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in जनातलं, मनातलं
7 Jan 2021 - 6:39 pm

अश्विन महिन्यातील एक प्रसन्न सकाळ उजाडली. नुकताच वर्षाकाळ संपला होता आणि बंगलोर प्रांतीचा सर्वात मोठा सण दसराही थाटामाटात साजरा झाला. बेंगलोरच्या भुईकोटाला आणि शहाजी राजांना बर्‍याच काळांनी स्थैर्य मिळाले होते. वेशीच्या दरवाज्यातून एक ताफा बाहेर पड्ला आणि उत्तरेच्या दिशेने निघाला. या ताफ्यात हत्ती, घोडे,अमात्य, अध्यापक सारेजण होते. दोन मेणेही होते. एका हत्तीवर बारा वर्षाचा एक तरणाबांड तेजस्वी युवक बसला होता. एका मेण्यात त्याच्या मातोश्री तर दुसर्‍या मेण्यात पत्नी होती. हा ताफा होता बेंगलोर प्रांतीचे राजे शहाजी महाराजांची धर्मपत्नी जिजाउ साहेबांचा. बरोबर असलेला तेजस्वी युवक अर्थातच शिवाजी राजे व सोबत होत्या सईबाईसाहेब. यावेळचा शिवाजी राजांचा दसरा विशेष होता, याच वर्षी खर्‍या अर्थाने सीमोलंघन करायचे होते, बेंगलोर सोडून पित्याची पुण्याची जहागीर सांभाळायची होती.

बंगलोर किल्ल्याचे सन १७९१ चे कल्पनाचित्र.शहाजी राजांचा काळातील किल्ला आता अस्तित्वात नाही.

शहाजीराजांची जहागिरी आणि इतर राजकीय स्थिती

संपुर्ण बंगलोर शहर आपल्या या लाडक्या राणीसाहेबांना आणि राजपुत्राला निरोप द्यायला लोटले होते. कारणच तसे होते. जिजाउसाहेब आणि शिवाजी राजे कायमचे बेंगलोर सोडून महाराष्ट्रात, पुण्याला निघाले होते. गेले दोन वर्ष विजापुरावरून आल्यानंतर सगळ्या बेंगलोर शहराला शिवबाने आपलेसे केले होते. अवघ्या बारा वर्षाच्या या युवकाने आपल्या धारदार बुध्दीमत्तेने शिकवायला ठेवलेल्या अध्यापकांना थक्क केले होते. त्याला एक अक्षर शिकवावे तो पुढची दोन अक्षरे शिवबाने लिहीलेली असायची. स्वतः शहाजीराजे आणि थोरले बंधु संभाजी राजे संस्कृतचे जाणकार होतेच.

जिजाउंनी शिवबाला महाभारत्,रामायण, भागवत यातील कथा तर एकवल्याच होत्या, पण त्याच बरोबर पुर्वजांची कथा आणि सुलतानी अत्याचाराच्या कहाण्याही एकवल्या होत्या. शिवाजीराजे सुमारे पाच वर्षे आपल्या आई वडिलांसोबतच कर्नाटकातील कांपिली येथे निवास करत होते. याच काळात शाहाजीराजांनी उमाजी पंडित या विद्वान ब्राम्हण अध्यापकाला शिवाजीराजे व त्यांचे वडिलबंधू संभाजी यांना शिक्षण देण्यासाठी ठेवले होते. त्यांच्या हाताखाली शिवाजीराजांनी धर्म, नीतीज्ञान मिळवले तसेच वाचन व लेखन यांचेही शिक्षण प्राप्त केले. शिवाय आजुबाजुच्या पर्वतराजीत भटकायला जाताना आणि शिकारीला जाताना शिवबाची बहादुरी सर्वानी पाहीली होती.

याच कांपिलीच्या वास्तव्यात शिवाजीराजेंना त्यांचे वडिल शाहाजीराजे व गोमाजी नाईक पानसंबळ या दोघांकडून युद्ध कलेचे शिक्षणही मिळाले. यानंतर शाहाजी राजांनी त्यांचे पहिले लग्न सईबाई या फलटणच्या निंबाळकर घराण्यातील मुलीशी लावून दिले. सर्वानाच निरोप घेणे कठीण झाले होते, पण नाईलाज होता. जिजाउसाहेबांचे थोरले पुत्र संभाजी राजे तर वडीलांजवळ बेंगलोरला रहाणार होते. शिवबा सोबत असला तरी आउसाहेबांना हा दुरावा सोसायचा होता. शहाजी राजे, धाकट्या राणीसाहेब तुकाई यांचा निरोप घेउन हे सर्वजण आता कायमचे पुण्याला, मराठी मुलुखात निघाले होते. खरतर असे कोणते कारण झाले कि शहाजी राजांना हा निर्णय घ्यावा लागला ? एकतर थोरल्या संभाजी राजांचे कर्तृत्व शहाजी राजांच्या डोळ्यासमोर होते, शिवाजी राजांना स्वतंत्र कारभार दिला तर त्यांच्या कार्यकतॄत्वाला संधी मिळेल हा एक हेतु होता, शिवाय आदिलशाही दरबाराची मर्जी म्हणजे वार्‍यावरची वरात. यापुर्वी खवासखान, मुरार जगदेव, रणदुल्लाखान ,मुस्तफाखान या दरबारातील मुस्तद्द्यांवर खफा मर्जीचे आणि कैदेचे आलेले प्रसंग शहाजी राजांनी पाहिलेले होते. न जाणो दुर्दैवाने आपल्यावर असा काही प्रसंग आला तर दोन ठिकाणी गाद्या असाव्यात असा याचा मागचा विचार होता. शिवाय जिजाबाई यावेळी पोक्त होत्या, याआधी शहाजी राजे आणि जिजाउसाहेबांनी महाराष्ट्रात जो स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला होता, तोच डाव पुन्हा सुरु करण्याची चर्चा निश्चित झाली असली पाहीजे. कारण पुढे शिवाजी राजांच्या या प्रयत्नात शहाजी राजांना कैद भोगावी लागली तरी त्यांनी शिवबाना कायम प्रोत्साहनच दिले. राजकारणाचे डाव आणि आयुष्याचे चढउतार पाहून पुरेशा परिपक्व झालेल्या जिजाउ यावेळचा डाव यशस्वी करतील अशी शहाजी राजांना खात्री वाटत असणार.
या संदर्भात एतिहासिक साधनात आणखी थोडी वेगळी माहिती मिळते. सभासदाच्या बखरीत लिहीले आहे, श्री शंभुमहादेव जागृती येउन स्वप्न जाले, "बारा वर्षेपर्यंत तुम्ही आपले जवळ ठेवावे.पुढे न ठेवणे". हा दृष्टांत शहाजी राजांना शिवाजी जन्मताच झाल्याचे सभासदाने लिहीले आहे तर परमानंदकृत शिवभारतात हा दृष्टांत बेंगलोरला झाल्याचे संगितले आहे. त्यात शंकराने शहाजींना स्वप्नात सांगितले कि ,'तुझा शिव नावाचा मुलगा विष्णुचा अवतार आहे. त्याच्या हातून यवनाच्या संहाराचे काम होणार आहे.त्यासाठी तु काही काळ वाट पहा".
अर्थात कारण कोणतेही असो, ज्या क्षणाला शहाजी राजांनी शिवबाला पुण्याला पाठविण्याचा निर्णय घेतला, तो क्षण अखिल जगताच्या दृष्टीने, भारतभुसाठी आणि संपुर्ण महाराष्ट्र देशाच्या परमभाग्याचा सुवर्णक्षण ठरला यात शंका नाही. शिवाजी राजे बेंगलोरलाच राहिले असते तर पुढे जे अलौकीक कार्य त्यांच्या हातून झाले, ते झाले असते का, याची निश्चीत खात्री देता येत नाही. कारण काहीही असले तरी शिवाजी राजे जिथे भावीकाळात दैदीप्यमान इतिहास घडवणार होते त्या कर्मभुमीकडे निघाले होते हे नक्की. १६३९ साली बाल शिवाजी व माता जिजाऊ कर्नाटकात बँगलोरला शहाजीराजांच्या भेटीसाठी गेल्या होते ते आज मातृभुमी महाराष्ट्रात परत निघाले होते.

शिवाजी महाराजांचे बालपण व स्वराज्याची सुरुवात.

शहाजी राजांनी शिवबाबरोबर कारभारच्या सोयीसाठी अनेक कर्तृतवान माणसे दिली होती. शामराज निळकंठ हे पेशवा होते, माणकोजी दहातोंडे सरनौबत, बाळकृष्णपंत दिक्षीत हे मुजुमदार होते. बाळाजी हरी मजालसी हे कारकुन. शिवाय सोनोपंत डबीर आणि रघुनाथ बल्लाळ सबनीस हे अनुभवी कारभारी सोबत होतेच. अर्थात सर्वच बाबींवर देखरेख ठेवण्यासाठी आणि वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी दादोजी कोंडदेव होतेच. शाहाजीराजांनी आपल्या सोबत असणार्‍या अनेक विश्वासू व कर्तबगार लोकांना शिवाजीराजांबरोबर महाराष्ट्रातील पुण्याची जहागिरी पाहण्यासाठी पाठवून जणू भावी स्वराज्याची मुहूर्तमेढच शाहाजीराजांनी रोवली असे म्हणणे अतिशयोक्तीपुर्ण ठरणार नाही. या स्वराज्यनिर्मितीतील विशिष्ट भूमिकेबरोबरच शाहाजीराजांनी शिवाजीराजांना स्वराज्यनिर्मितीचा मुलमंत्र व भावी वाटचालीची योजनाही समजावली होती असे म्हणणेच योग्य होईल. यामुळेच शाहाजीराजांना स्वराज्य संकल्पक म्हंटले जाते.

आता या सर्वांना मोठा लांबचा पल्ला पार करायचा होता. हे अंतर होते ५६२ मैलाचे म्हणजे आजच्या भाषेत सांगायचे तर ८४३ कि.मी.चे. त्याकाळी रोजच्या प्रवासात १२ कोसांची मजल मारण्यात येई. त्या हिशेबाने या सर्वांना पुण्यात पोहचायला एक महिना लागला असेल. आजचा पुणे-बंगलोर महामार्ग साधारण तोच रस्ता त्याकाळी असला पाहीजे. या प्रवासात शिवाजी राजांनी अनेक अरण्ये, गावे, बार्‍या पाहिल्या असतील. गेली अनेक वर्षे यवनाच्या स्पर्शाने अपवित्र झालेल्या नद्यांना हा शिवस्पर्श दिलासा देणारा असेल. तुंगभद्रा,मलप्रभा,कावेरी,नीरा,कृष्णा,कोयना या नद्यांच्या पुण्योदकाचे स्नान शिवबाने घेतले असेल.
बेळगाव अर्थात वेणूग्राम जवळ आले तसे हवेत बदल जाणवायला लागला. अस्सल कन्नड उच्चार जाउन मराठी कानावर पडायला लागली. आणि डाव्या हाताला पश्चिमेला निळसर डोंगररांगा दिसायला लागल्या. हा होता अग्निपुत्र सह्याद्री! पोटात लाव्हारस रिचवलेल्या या पर्वतराजाने आतापर्यंत किती जणांना आपल्या कवेत बोलावून स्वातंत्र्यसंग्रामाची हाक दिली असेल, किती जणांना आपल्या कातळाच्या भरदार छातीचा विश्वास देउन लढायला प्रवृत्त केले असेल. पण हि हाक एकायला सवड होती कोणाला ? सुलतानाकडून कागदी भेंडोळ्यावर मिळालेल्या "राजा" पदवीचे मोल जास्त नव्हते का ? प्रजा हाल सोसते आहे, सोसु देत ! नाही तरी आज ना उद्या मरायचेच आहे, तर मनाने मेलेल्या लोकांना शारीरीक छळाचे काय ? स्वाभिमान गुंडाळलेल्या या भुमीतील कोणी वीर ह्या सह्यकड्यांची हाक एकायला तयार नव्हता. पण तो दिवस आला ! बेंगलोरहून आलेल्या या ताफ्यात सह्यद्रीला आशेचा किरण दिसला. कदाचित शिवबाने ही या पर्वतराजाची हाक एकली असेल,त्याला दिलासाही दिला असेल. सह्याद्रीच्या रांगा दिसल्या तसे विदर्भकन्या असणार्‍या जिजाउंना देखील शहाजीराजांबरोबर स्वराज्यस्थापनेचे दिवस आठवले असतील. आधी निजामशाही-आदिलशाहीत तो सातवाहनांच्या खुणा सांगणारा जुन्नरचा प्रदेश, मग स्वांतत्र्याचा वारा अनुभवणारी संगमनेरजवळच्या पेमगिरीवरची दोन वर्ष आणि शेवटी याच सह्याद्रीतील एका बलदंड किल्ल्याच्या, माहुलीच्या पायथ्याची अपमानास्पद तह आणि नाईलाजाने जवळ केलेले विजापुर. ईथे सह्याद्रीचा दुरावा झाला तो जुना सखा आज पुन्हा दिसला होता.
पुढे करवीर आले, महालक्ष्मीच्या प्राचीन मंदिरात दर्शन, लांबवर दिसणारा तो प्राचीन पर्णालक पर्वत उर्फ पन्हाळा, दख्खनचा राजा असणारा वाडी रत्नागिरीचा डोंगर, मग आला कर्‍हाडजवळचा आगाशिवाचा पर्वत, तळबीड, सातारा आला तसा सप्तर्षीचा डोंगर आडवा आला, त्याला डावी घालून ताफा पुढे सरकला तो प्राचीन विराटनगरी वाई, पुढे आले प्राचीन बौध्दकालीन सिरीवलय उर्फ शिरवळ, नीरा नदी ओलांडली आणि मावळाचा प्रदेश सुरु झाला. उजवीकडे आकाशाला भेदायला जाणारा पुरंदरगड दिसला आणि लगेच कापुरहोळचा मुक्काम आलाच. आता फक्त डावीकडे दिसणारा कोंढाणा पाहून कात्रजच्या रांग ओलांडायची कि आलेच पुणे ! पुणे जवळ आले तसे वातावरण पुर्ण बदलेले. सगळीकडे मराठी भाषा कानावर पडू लागली आणि मुख्य म्हणजे आणखी एक भाषा एकायला मिळाली. अत्याचाराच्या कहाण्यांची. आता या गांजलेल्या प्रजेला दिलासा देणे हे शिवाजी राजे, आउसाहेब आणि दादोजीपंतासमोरचे मोठे आव्हान होते.
ह्या सर्व ताफ्याचे लक्ष होते कसबा पुणे ! पुनवडी !! शहाजी राजांची कर्यात मावळातील हि जहागीरी. शहाजी राजांच्या जहागिरीत वास्तविक पुणे,सुपे,ईंदापुर्,चाकण एवढे चार परगणे होते ( आजचा ईंदापुर्,दौंड्,बारामती,पुरंदर, हवेली हे तालुके) मात्र दादोजी पंताच्या सुभेदारीमध्ये याच्या पश्चिमेचा भाग होता. हा प्रदेश म्हणजे आजचे मुळशी,वेल्हा,भोर हे पुणे जिल्ह्यातील तालुके तर सातारा जिल्ह्यातील वाई हा प्रदेश. हा भाग विलक्षण डोंगराळ. दोन डोंगररांगामधून नद्या वहातात, या नद्यांची खोरी शेतीसाठी सोयीची. हि अशी खोरी जुन्नरपासून दक्षीणेकडील महाबळेश्वरपर्यंत पसरली आहेत. ह्या बर्याच खोर्‍यांची नावे त्यात वहाणार्‍या नद्यांपासून पडली आहेत. वेळवंडी नदी असणारे वेळवंड मावळ, कानंदी नदी वाहणारे कानद खोरे. हि खोरी पश्चिमेकडे असल्यामुळे आणि पश्चिमेला 'मावळती' अशी संज्ञा असल्यामुळे या भुप्रदेशाला मावळ म्हणू लागले. या मावळात रहाणारे ते अर्थातच मावळे. प्रत्येक खोर्‍यात बळकट उंच डोंगर आहेत.यातील एखाद्या डोंगराला बेलाग कडे असले कि त्यावर किल्ला उभारल्याने या प्रदेशाचे संरक्षण झाले होते. आता या मुलखात शिवाजी राजांना आपले कर्तृत्व दाखवायचे होते.
( क्रमश : )

आपण माझे सर्व लिखाण येथे एकत्रित वाचु शकता
भटकंती सह्याद्रीची

इतिहासमाहिती

प्रतिक्रिया

MipaPremiYogesh's picture

7 Jan 2021 - 9:04 pm | MipaPremiYogesh

वाह काय सुंदर..एकदम चित्र डोळ्यासमोर उभे राहिले.

नीलस्वप्निल's picture

7 Jan 2021 - 9:15 pm | नीलस्वप्निल

वाह... नविन मेजवानी :)

कानडाऊ योगेशु's picture

7 Jan 2021 - 10:45 pm | कानडाऊ योगेशु

एक उत्सुकता आहे.
शिवाजी राजांना कन्नड बोलता येत असावी का?

शिवाजी राजांच्या बालपणीची वय वर्षे दहा ते बारा अशी दोन साल बंगळूरुमध्ये गेल्यामुळे त्यांना त्यावेळी तरी थोडेफार कन्नड येत असावे.नंतर महाराष्ट्रात आल्यानंतर सराव संपला असण्याची शक्यता आहे.मात्र बालपणी शिकलेली भाषा अशी सहजासहजी विसरता येत नाही.शिवाय कर्नाटकाशी असलेला शिवाजी महाराजांचा नंतरचा संबध विचारात घेता किमान त्यांना भाषा बोलता येत होती असा निष्कर्श नक्की काढता येईल.मात्र त्यांचे कन्नड काही लिखाण उपलब्ध नाही.

+१००
शिवरायांना स्वराज्याचे बीज त्यांच्या वडिलांकडुनच मिळाले. मंत्रीमंडळ आणि राजमुद्रेसकट शिवराय लहानाचे मोठे झाले.

टर्मीनेटर's picture

8 Jan 2021 - 12:52 pm | टर्मीनेटर

उत्तम सुरुवात 👍 पुढील सुरस भागांच्या प्रतीक्षेत.

Rajesh188's picture

8 Jan 2021 - 2:03 pm | Rajesh188

प्रत्यक्ष प्रसंग डोळ्या समोर उभे राहिले

लई भारी's picture

8 Jan 2021 - 10:13 pm | लई भारी

ऐतिहासिक माहितीसोबत सुंदर प्रसंग वर्णन!
लवकर येऊ द्या पुढचे भाग!

प्रचेतस's picture

9 Jan 2021 - 9:27 am | प्रचेतस

सुरेख सुरुवात.
वाचत आहे, लिहित राहा.

मुक्त विहारि's picture

13 Jan 2021 - 12:18 pm | मुक्त विहारि

पुढील भाग कधी?

MipaPremiYogesh, नीलस्वप्निल,कानडाऊ योगेशु, अर्धवटराव,टर्मीनेटर,Rajesh188,लई भारी,प्रचेतस,मुक्त विहारि अणि असंख्य वाचक यांना मनापासून धन्यवाद.कामाच्या व्यवस्तेमुळे पुढचा भाग लवकर पोस्ट करता आला नाही.आज तो पोस्ट करतो.