आज काय घडले...
मार्गशीर्ष व. १
रामचंद्र गणेशांचा प्राणत्याग!
शके १७०२ च्या मार्गशीर्ष व. १ रोजी मराठेशाहीतील सुप्रसिद्ध वीर रामचंद्र गणेश कानडे यांनी वज्रेश्वरीजवळ इंग्रजांशी लढता लढतां प्राणत्याग केला.
या वेळी इंग्रजांनी वसई या महत्त्वाच्या ठाण्यावर हल्ला करून ते हस्तगत करण्याचा विचार केला होता. दोनतीन दिवसांपूर्वीच किल्ल्यावर तोफा डागल्या गेल्या होत्या. गॉडर्डनें वसई घेण्याचा निश्चय केला होता, अशा आणीबाणीच्या प्रसंगी नानांनी जुना कसलेला सेनापति रामचंद्र गणेश यास वसईस मदतीसाठी म्हणून पाठविले. रामचंद्र गणेश घाटांतून जात असतां इंग्रज सेनानी हार्टले व मुसा नारन यांनी त्याला अडविले. वज्रेश्वरी उर्फ वज्रयोगिनीचा पर्वत सुप्रसिद्ध असून त्याचा आश्रय लढाऊ फौजांस चांगलाच होता. काहीहि होवो, पण वसईस मदत पोचवून इंग्रजांचा पराभव करावयाचा हा निश्चय रामचंद्र गणेशाचा होता. हार्टले व मुसा नारन यांच्याशी निकराचा सामना झाला. मार्गशीर्ष व. १ या दिवशी धुके पडलेले होते. तेव्हां न दिसतां रामचंद्र गणेश हार्टले याला पकडण्यास अगदी तोफखान्याजवळ आला आणि आतां शत्रूस हस्तगत करणार तों अभ्रपटल दूर होऊन एकदम स्वच्छ सूर्यप्रकाश पडला. मराठे शूर गडी अगदीच जवळ आल्याचे हार्टलेच्या ध्यानी येतांच त्याने तोफांचे बार केले. मराठे मुळीच डगमगले नाहीत. अशा या भयंकर प्रसंगीहि ते तोफ पकडण्यास धांवले. इतक्यांत एक गोळा रामचंद्र गणेश यांस लागला व ते तात्काळ ठार झाले. परमेश्वरहि इंग्रजांची साह्यकर्ता झाला. अभ्रसुदर्शन वज्राबाईने जर दूर केले नसते तर लढाईचा रंगच बदलला असता; पण मराठ्यांच्या दुर्दैवाने विपरीतच घडले. आणि रामचंद्र गणेश धारातिर्थी पतन पावले. आदल्याच दिवशी वसई इंग्रजांच्या हाती आलेली होती. या दोन गोष्टींमुळे मराठे जास्तच खवळून गेले आणि पुढे त्यांनी प्रचंड आवेशाने युद्ध करून गॉडर्डला तह करण्यास भाग पाडले. अशा प्रकारें रामचंद्र गणेशाच्या मृत्यूमुळे अधिक महत्त्वाची कामगिरी झाली. रामचंद्र गणेश यांनी लढाईचे शिक्षण सदाशिवरावभाऊंच्या हाताखाली घेतले होते.
- १२ डिसेंबर १७८०
प्रतिक्रिया
6 Jan 2021 - 12:44 am | शशिकांत ओक
रामचंद्र गणेश काही शिपायांसह जिथून तोफाबारी होत होती तिथे जाऊन गोलंदाज व अन्य शिपायांना मारून टाकायचा प्रयत्न केला असावा. एका तोफेतून गोळा उडवला की ती तोफ थंड होई पर्यंत थांबून राहावे लागते. त्यासाठी दुसर्या तोफा अशा तर्हेच्या पोझिशन वर ठेवून थंड होणाऱ्या तोफांचे रक्षण पण होईल. व शत्रूची नुसत्या प्रचंड आवाजाने गाळण उडून सैनिक सैरावैरा पळत पळत सुटले की जो मुख्य सेनापती च्या सभोवतालच्या घेऱ्याला फोडायला सोपे होते. म्हणून राम गणेश यांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली थंड होणाऱ्या तोफेच्या आसपास जाताना नेमके धुके विरळ झाल्याने त्यांचे धक्कातंत्र बिघडले व दुसऱ्या तोफेच्या टप्प्यात सापडून दगावले असावेत.
अभ्यासकांचे विचार समजून घ्यायला आवडेल.