कोरोना लस: प्रश्नांची मालिका

Primary tabs

kool.amol's picture
kool.amol in काथ्याकूट
17 Dec 2020 - 8:45 am
गाभा: 

ब्रिटनमध्ये Pfizer कंपनीच्या लशीला मान्यता मिळाली आणि तिथे लसीकरण सुरू देखील झालं आहे. कोरोना लसीकरण करणारा ब्रिटन हा जगातला पहिला देश ठरला आहे. यथावकाश इतर देशात देखील लसीकरण सुरू होईल. पण ह्या निमित्ताने काही बाबींची चर्चा सुरू आहे, लसीकरण ह्या विषयावर विविध प्रश्न विचारले जात आहेत, काही स्वाभाविक आणि योग्य अशा शंका देखील आहेत. काय काय प्रश्न विचारले जात आहेत? काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा हा प्रयत्न…

कोरोना लस ब्रिटनमध्ये आली, भारतात केव्हा उपलब्ध होणार?

ब्रिटनमध्ये मान्यता मिळालेली लस ही Pfizer या कंपनीची आहे तर भारतात ऑक्सफर्ड, Astra Zeneca आणि serum institute ह्यांच्या संयुक्त प्रयत्नांनी बनणारी, रशियाची स्पुटनिक तसेच भारत बायोटेक ह्या विविध लशी सध्या मानवी चाचण्यांच्या विविध टप्प्यावर आहेत. त्यातली ऑक्सफर्डची लस पुढच्या महिन्यात भारतात उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे. इतर लशी त्यानंतर उपलब्ध होतील.

Pfizer ची लस भारतात उपलब्ध होईल का?

जरूर होऊ शकते. Pfizer ही mRNA प्रकारची लस आहे. ह्या लशीच्या बाबतीत असणारी मर्यादा किंवा मुख्य अडचण तिच्या साठवणुकीची आहे. -७०℃ इतक्या तापमानाला ह्या लशीची साठवण आणि वहन करावे लागते. ही एक खर्चिक बाब आहे. त्यातही भारत हा आकाराने प्रचंड मोठा देश आहे इथे सर्वत्र ही सुविधा मिळणे कठीण आहे. त्यामुळे भारत सरकार तातडीने ह्या लशीला मान्यता देणार नाही असे म्हणता येईल. पण कंपनीने तसा अर्ज सरकारकडे केला आहे. ह्या विषयातले तज्ञ ह्यावर मार्ग काढतील आणि मगच येणाऱ्या काळात ही लस देखील भारतात उपलब्ध होऊ शकते.

कोरोना लस घेणं सक्तीचं आहे का?

मुळीच नाही. अशी सक्ती करणं सध्या शक्य देखील नाही. नजीकच्या भविष्यात भारतात तरी अशी सक्ती होणार नाही. इतर देश, विशेषकरून युरोपियन, सर्वांना देता येतील इतके डोस उपलब्ध करतील पण सक्तीची शक्यता तशी कमीच आहे. ह्याउलट लोकं स्वतःहूनच लस घेतील.

कमी कालावधीत उपलब्ध झालेली लस सुरक्षित आहे का?

उपलब्ध होणाऱ्या सर्वच लशी ह्या कमी कालावधीत तयार झाल्या आहेत हे खरं आहे. पण असं असलं तरी जवळपास प्रत्येक देशातल्या औषध नियमन करणाऱ्या सरकारी संस्था सुरक्षेच्या बाबतीत कुठेही तडजोड करत नाहीत. ह्याची कल्पना लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांना देखील असते. त्यामुळेच सर्व नियम पाळून आणि समाधानकारक आणि पुरेसा data असल्याशिवाय कोणालाच लस मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्याची आणि ती वितरीत करण्याची परवानगी मिळत नाही, अगदी आपात्कालीन परिस्थितीत देखील. ह्याच ताजं उदाहरण म्हणजे नुकतंच सिरम आणि भारत बायोटेक ह्या कंपन्यांनी भारत सरकारकडे आपत्कालीन परिस्थितीसाठी लस उपलब्ध करण्याची परवानगी मागितली होती. परंतु ह्या दोन्ही कंपन्यांना मानवी चाचण्यांचा अजून विस्तृत विदा (data) सरकारने मागितला आहे (ह्याचा अर्थ त्यांना परवानगी नाकारली आहे असा होत नाही). ब्रिटनमध्ये लशीच्या वितरणाची मान्यता मिळालेल्या Pfizer ह्या कंपनीने 43 हजार लोकांवर चाचण्या घेऊन त्याची माहिती आणि इतर वैज्ञानिक विदा दिल्यानंतरच त्यांना मान्यता देण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर लस बाजारात आल्यानंतर देखील आढळणाऱ्या कुठल्याही side effects किंवा ज्याला adverse events म्हणतात त्यावर सरकार आणि ह्या कंपन्या लक्ष ठेवून असतील. इंग्लंडमध्ये लस दिल्यानंतर काही लोकांमध्ये तीव्र स्वरूपाची काही लक्षणं आढळली त्यानंतर ज्यांना ऍलर्जी आहे अशा लोकांना सध्या लशीपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशा स्पष्ट सूचना तिथल्या FDA ने दिल्या आहेत.

कोरोना लस इतक्या कमी कालावधीत निर्माण कशी काय झाली?

असं होण्यासाठी बरेच घटक कारणीभूत आहेत. मुख्य घटक म्हणजे तातडीची गरज. जागतिक साथ, वाढत जाणारा संसर्ग आणि होणारे मृत्यू ह्यामुळे शब्दशः युद्ध पातळीवर ह्यासाठी संशोधन झालं. ह्याच्या जोडीला उपलब्ध झालेलं प्रगत असं तंत्रज्ञान. Pfizer ची लस ही mRNA प्रकारची आहे. म्हणजे संपूर्ण विषाणू लस म्हणून न वापरता फक्त रोगप्रतिकारक प्रतिसाद निर्माण करणारा जनुकीय घटक ह्यात वापरला आहे. हा घटक निर्माण करणे आणि तोदेखील इतक्या प्रचंड प्रमाणात हे तंत्रज्ञानामुळेच शक्य होऊ शकले.

जेव्हा हजारो मानवांवर चाचण्या होतात तेव्हा निर्माण होणारा data हा महाकाय असतो. ह्या अवाढव्य data चं पृथकरण करणं हे प्रचंड वेळखाऊ आणि तितकंच किचकट असं काम असत. हे काम देखील अद्ययावत तंत्रज्ञानामुळे शक्य होऊ शकलं. ह्याच्या जोडीला औषध नियामक संस्थांनी देखील संपूर्ण प्रक्रिया वेगाने पूर्ण व्हावी ह्यासाठी सहकार्य केले आणि अजूनही करत आहेत. ह्या सर्वांच्या प्रयत्नांमुळे इतक्या कमी वेळेत लस उपलब्ध होऊ शकली आणि उर्वरित देखील होतील.

लस उपलब्ध नसताना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण जर जास्त असेल तर लशीची गरज आहे का?

हा एक अत्यंत महत्वाचा आणि वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे. गरज समजून घेण्यासाठी काही बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे. गेल्या वर्षभरात ह्या विषाणूविषयी आपलं ज्ञान टप्प्याटप्प्याने वाढलं आहे. सुरवातीच्या काळात गोंधळाची परिस्थिती होती. त्यामुळे खुद्द जागतिक आरोग्य संघटनेकडून बरेचदा परस्परविरोधी सूचना देण्यात आल्या. नंतर विषाणू बाबतीत काही बाबी स्पष्ट झाल्या. अनेक रुग्णांना तपासल्यानंतर, त्यांच्या लक्षणांचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता उत्तम आहे त्यांना ह्या विषाणूपासून जीवघेणा धोका नाही त्यामुळे कित्येक रुग्ण हे कुठलंही लक्षण दाखवत नाहीत. कित्येकांमध्ये अगदीच माफक अशी लक्षणं दिसतात. पण वृद्ध लोकं, ज्यांना दीर्घकाळ कुठलेतरी आजार आहेत, ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कुठल्या ना कुठल्या कारणाने कमी झाली आहे अशा लोकांमध्ये ह्या विषाणूचा धोका खूपच जास्त आहे. त्यामुळे सध्या कोरोना विषाणूचा मृत्युदर हा ढोबळमानाने 3% मानला जातो. इतर लोकांमध्ये देखील मृत्यू ओढवला नसला तरी गंभीर परिस्थिती नक्कीच निर्माण होते. असे रुग्ण बरे झाले तरी त्यांच्या फुप्फुसांची प्रचंड हानी होते जी भरून यायला किती वेळ लागेल हे सांगणे कठीण आहे. येणाऱ्या काळात डॉक्टर त्यांच्या निरीक्षणांवरून काही निष्कर्ष नक्की काढू शकतील. त्यामुळे साधारणपणे 10% लोकसंख्येला लशीची नितांत गरज आहे. लशीमुळे मृत्युदर कमी होण्यास नक्कीच मदत होईल ह्यात शंका नाही. ह्या विषाणू विरोधात आपली रोगप्रतिकारक संस्था जो प्रतिसाद देते तो अवाजवी म्हणावा असा आढळला आहे. ह्याच कारण काय असावं ह्यावर अजून पूर्णपणे प्रकाश पडलेला नाही पण कदाचित विविध मार्गांनी ह्या विषाणूला निष्प्रभ करण्याच्या प्रयत्नात असा प्रतिसाद निर्माण होत असावा. लशीमुळे हा प्रतिसाद नेमका होण्यास मदत होईल म्हणजे ज्या प्रकारच्या पेशींची गरज आहे त्याच पेशींचा प्रतिसाद निर्माण होईल. अनावश्यक पेशींची गर्दी आणि त्यातून निर्माण होणारी गोंधळाची परिस्थिती टाळता येईल. हे अगदी निरोगी लोकांमध्ये देखील उपयोगाचे असेल.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे संसर्ग करण्याची आणि वेगाने पसरण्याची ह्या विषाणूची क्षमता अफाट आहे. हे लक्षात घेता कोरोनाची साथ जगात कुठे ना कुठे येणाऱ्या काही वर्षात अस्तित्वात असेल आणि ती जर परत जागतिक झाली तर काय होईल ह्याची कल्पना एव्हाना आपल्याला आली आहे. त्यामुळे कमी मृत्युदर, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ह्या बाबी जरी असल्या तरी सध्या काहीसं दिलासादायक असणारं चित्र कधीही बिघडू शकतं. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण होणं हे आवश्यक आहे.

लशींची परिणामकारकता 70% किंवा 90% असताना अशी लस घेणे योग्य आहे का?

इथे ह्या विधानाचा योग्य अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. एखाद्या लशीची परिणामकारकता समजा 80% आहे. ह्याचा अर्थ त्या लशीची चाचणी जितक्या लोकांवर केली त्यापैकी 80% लोकांमध्ये सकारात्मक निकाल दिसले. पण ह्याचा अर्थ चुकीने असा घेतला जातो की एखाद्या व्यक्तीवर केलेल्या चाचणीमध्ये फक्त 80% च सकारात्मक निकाल आले. त्यामुळे लशीच्या परिणामकारकतेवर शंका घेण्यात येते. अमेरिकन FDA ने कोरोना लशीची ही मर्यादा 50% इतकी निश्चित केली आहे म्हणजे Placebo च्या तुलनेत 50% किंवा जास्त इतका सकारात्मक परिणाम दाखवणे हे लशीच्या निर्मात्यांना गरजेचे असणार आहे. खरं तर ह्या टक्केवारीच्या बाबतीत तज्ञामध्ये एकवाक्यता नाही. परंतु सध्या चाचण्या सुरू असलेल्या लशी 70% पेक्षा जास्त परिणामकारक आहेत. त्यामुळे ह्या मुद्द्यावर लस उत्तीर्ण होते असे म्हणता येईल.

एकदा लस घेतल्यानंतर कोरोनाच्या संसर्गाची भीती कायमची निघून जाईल का?

मुळीच नाही. कोरोना संसर्ग आपल्याला अजून पूर्णपणे समजलेला नाही. हीच बाब लशीच्या बाबतीत देखील लागू आहे. लशीमुळे निर्माण होणारी प्रतिपिंडे म्हणजेच Antibodies किती काळ शरीरात राहतील ह्याची संपूर्ण कल्पना आपल्याला अजून यायची आहे. एकाच व्यक्तीला दोन वेळेस कोरोना झाल्याची काही उदाहरणं आहेत, अगदी कमी असली तरीही. ह्याचा अर्थ नैसर्गिकरित्या निर्माण झालेली प्रतिपिंडे एकदा का नाहीशी झाली की व्यक्तीला परत एकदा संसर्ग होऊ शकतो, असे रुग्ण कमी असले तरी ह्याकडे कानाडोळा करता येणार नाही. लशीमुळे निर्माण होणारा प्रतिसाद हा एका डोसमध्ये अल्प असल्यामुळे 2 डोस घेऊन जास्त काळापर्यंत प्रतिपिंडे शरीरात राहतील असा कयास आहे. त्यामुळे लस घेतली म्हणजे परत कधीच संसर्ग होणार नाही असं सध्यातरी ठामपणे म्हणता येणार नाही. लस काही काळापर्यंत तरी संरक्षण देईल इतकं मात्र नक्की सांगता येईल.

लस हा आपत्कालीन उपाय आहे. येणाऱ्या काळात लशीचे परिणाम दिसतील आणि त्यानुसार उपचारांची दिशा निश्चित होईल. त्यामुळे ज्या लोकांना संसर्गाचा धोका जास्त आहे त्यांना तसेच जे रुग्णांच्या संपर्कात जास्त आहेत अशा लोकांना ही लस देऊन मृत्युदर आटोक्यात आणणे ही तातडीची गरज आहे. लसीमुळेच हे साध्य होईल इतका विश्वास मात्र बाळगणं गरजेचे आहे.

प्रतिक्रिया

मराठी_माणूस's picture

17 Dec 2020 - 10:00 am | मराठी_माणूस

लस घेतल्यानंतर कोरोनाच्या संसर्गाची भीती कायमची जाणार नसेल तर लस घेतल्या नंतर कीती काळा नंतर परत घ्यावी लागेल ?
हा रोग पुर्ण नष्ट होई पर्यंत ही लस सतत घ्यावी लागेल का ?
लस घेतल्यावर सुध्दा त्रिसुत्री पाळावी लागेल का ? (मास्क वगैरे...)

80% लोकांमध्ये सकारात्मक निकाल दिसले.

परीणामकारीकतेचे हे मोजमाप कसे ठरवले जाते ?

सध्या तरी 2 डोस घ्यावे लागतील असं सांगण्यात येत आहे. त्यानंतर पुरेसा प्रतिसाद निर्माण होईल, तो किती काळापर्यंत टिकेल हे आत्ताच सांगणे कठीण आहे. कारण विषाणूची ओळख एक वर्षपेक्षा जास्त नाही आणि लशीची परिणामकारकता तर अगदीच ताजी आहे. जर वर्षभर टिकली तर साधारणपणे साथ बघून दर वर्षी घ्यावी लागेल. रोग नष्ट होईल की नाही हे सांगता येणार नाही कारण हा विषाणू सतत बदलत असतो, त्यातले बदल जर जास्त धोकादायक नसतील तर विषाणू राहील पण काळजी करण्यासारखे काही नसेल.

लस घेतल्यानंतर त्रिसूत्री पाळणे आवश्यक आहे. लशीमुळे घेणाऱ्या व्यक्तीला काही काळासाठी संरक्षण मिळते, संसर्ग झाला तरी देखील. त्यामुळे अगदी नगण्य अशा प्रमाणात ती व्यक्ती संसर्ग पसरवू शकते त्यामुळे इतरांसाठी पालन करणे केव्हाही चांगले.

जितक्या लोकांवर चाचणी घेतली त्यापैकी किती लोकांमध्ये प्रतिपिंडे निर्माण झाली हे पाहिले जाते. म्हणजे 1000 लोकांना लस दिली आणि 750 लोकांमध्ये प्रतिसाद मिळाला तर लशीची परिणामकारकता 75% मानण्यात येते.

koolamol.wordpress.com ह्या माझ्या ब्लॉगवर तुम्हाला इतरही काही लेख वाचता येतील ह्या विषयावरचे.

चौकटराजा's picture

17 Dec 2020 - 12:55 pm | चौकटराजा

प्रतिपिंडे ही एक जनरल पर्पज फौज असते की कोणतेही बाहेरचे काही आत आले की ती तयार होते. समजा मी कोविड १९ ची लस घेतली व त्याच दरम्यान मला परजीवी पासून होणारा मलेरिया होऊन गेला तर सापडलेली प्रतिपिंडे कुणाला प्रतिक्रिया म्हणून व्हायरसला की पॅरासाइटला हे कसे उमगणार ?

ह्यात दोन्ही प्रकार असतात. म्हणजे निर्जीव घटक शरीरात गेले तर अशा specific प्रतिपिंडांची गरज नसते. पण जैविक घटक हे वेगवेगळे असतात. जिवाणू, विषाणू किंवा परजीवी ह्यांच्या पेशीमध्ये खूप फरक असतात. त्यांची आपल्या शरीरात रोग निर्माण करण्याची पद्धत देखील वेगवेगळी असते. त्यामुळे त्यांच्याशी लढण्यासाठी जशी तलवार तशी ढाल ह्या पद्धतीने प्रतिपिंडे आपल्या शरीरात निर्माण होतात. विषाणूंची प्रतिपिंडे जिवाणू किंवा परजीवी ह्यांना चालत नाहीत, त्यांच्यासाठी वेगळी प्रतिपिंडे लागतात. इतकंच काय एका विषाणूंची प्रतिपिंडे दुसऱ्याला चालत नाहीत, कांजण्याचा विषाणू आणि सर्दीचा विषाणू ह्यांच्यासाठी वेगळे उत्तर असते. पेशीसाधर्म्य असणाऱ्या विषाणूंमध्ये हे काही अंशी शक्य असते. म्हणून देवीच्या विषाणूची लस ही त्याच्याशी साधर्म्य असणाऱ्या विषाणूंच्या मार्फत दिली जाते. कोरोनाची सिरमची लस सुदधा माकडांना संसर्ग करणाऱ्या कोरोनासदृश विषाणूंच्या आवरणात दिली जाणार आहे.

Bhakti's picture

17 Dec 2020 - 3:47 pm | Bhakti

कोरोनाची सिरमची लस सुदधा माकडांना संसर्ग करणाऱ्या कोरोनासदृश विषाणूंच्या आवरणात दिली जाणार आहे.

चौकटराजा's picture

17 Dec 2020 - 7:44 pm | चौकटराजा

आपल्या उत्तरबद्द्ल शतशः धन्यवाद ! आपण जीवन नसलेला ( जेनेटिक मटेरिअल नसलेला )अगांतुक कण जरा बाजूला ठेवू ! माझा शेवटचा प्रश्न पुन्हा असा रहातो की परजीवी व विषाणू यांचे प्रतिपिन्ड वेगळे असतात हे मान्य परन्तू त्यातील फरक केमिकल की मायक्रोस्कोपिक पद्धतीने शोधतात ! काही अतिविशिष्ट रिएजन्ट वापरून विविध प्रतिपिन्डाचे अस्तित्व खातरजमा करतात किंवा कसे ?

हा फरक जैवरासायनिक पद्धतीने शोधला जातो. विषाणूंच्या पेशींवर असणाऱ्या विशिष्ट प्रथिनांच्या विरोधात निर्माण होणारी ही प्रतिपिंडे सुद्धा प्रथिनचं असतात. Lock and key ह्या तंत्रावर आधारित ही अभिक्रिया असते. म्हणजे प्रत्येक कुलुपाची विशिष्ट अशी किल्ली असल्याप्रमाणेच. ही प्रतिपिंडे शोधता येतात. त्यासाठी ELISA ही पद्धत वापरली जाते. त्याच बरोबर southern blot आणि western blot आणि आता तर PCR तसेच RT PCR ह्या विविध पद्धती वापरून ह्यांचा शोध बिनचूक घेता येतो.

अनुप ढेरे's picture

17 Dec 2020 - 12:16 pm | अनुप ढेरे

चांगला लेख.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Dec 2020 - 3:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रासंगिक आणि उत्तम लेखन मार्गदर्शन आभार. लेखन वाचल्यावर 'करोना आणि लशीचं' युद्ध पाहता, दर वर्षाला एकदा आपल्याला कंपलसलरी नसले तरी डोसांचे रिचार्ज मारावेच असे दिसतेय. अमोल कूल, लशीबद्दल नवी माहिती आल्यास ड्कवत राहावे ही नम्र विनंती. उत्तम लेखनाबद्दल आभार.

-दिलीप बिरुटे

kool.amol's picture

17 Dec 2020 - 4:12 pm | kool.amol

प्रतिसादाबद्दल मंडळ आभारी आहे. तसा मी नजर ठेवूनच आहे त्यावर पण रोज रोज नवी माहिती येते आहे ती समजून मगच अभ्यासोनी प्रकटावे असा विचार असतो.

> इथे ह्या विधानाचा योग्य अर्थ समजून घेणे आवश्यक आहे......

FDA वर डोळे झाकून विश्वास ठेवणे धोक्याचे आहे. ह्यांचा इतिहास विशेष चांगला नाही. त्याशिवाय काही महत्वाचा डेटा FDA आणि फायझर ने प्रकाशित केला नाही म्हणून थोडी शंका आहे. फायझर ह्या कंपनीने भूतकाळांत बऱ्याच भानगडी केल्या आहेत.

फायझरचा वॅक्सीन चा डेटा पाहू :

A - 18,325 लोकांना वॅक्सीन दिले.
B - 18,325 लोकांना प्लासिबो दिला.

A मधील ८ लोक काही दिवसांनी covid पॉसिटीव्ह ठरले. (फक्त सिम्प्टम असेल तरच PCR टेस्ट दिली होती)
B मधील सुमारे १६२ लोक कोविड पॉसिटीव्ह ठरले. (फक्त सिम्प्टम असेल तरच PCR टेस्ट दिली होती)

म्हणजे वॅक्सीन मुळे साधारण ९५% लोक covid पॉसिटीव्ह ठरले नाहीत असा ह्यांचा दावा आहे.

खरे तर हे दिशाभूल करणारी आकडेवारी आहे. covid हा काही पोलिओ नाही. covid झालेले सुमारे ९९% तरुण लोक इस्पितळांत सुद्धा न जाता ठीक होतात. वॅक्सीन चा मूळ उद्धेश हा hospitalization आणि मृत आकडेवारी कमी करणे हा असायला पाहिजे. (त्याशिवाय vaccine वाले लोक covid स्प्रेड करतील कि नाही हे अजून पूर्णपणे ठाऊक नाही त्यामुळे vaccine घेतल्याने तो पसरणार नाही असे नाही).

आता समजा A मधील ८ लोकांना ज्यांना कोविड झाला त्यातील ४ लोक हॉस्पिटल मध्ये गेले आणि त्यातील समजा २ लोक दगावले.
आणि B मधील ६ लोक इस्पितळांत गेले आणि आणि समाजा २ लोक दगावले.

तर मृत आकडेवारी कमी करण्यासाठी लस शून्य टक्के प्रभावशाली आहे असा होतो. तर इस्पितळांतील गर्दी कमी करण्यासाठी ३०% प्रभावशाली आहे असा होतो. आणि लस घेतलेले लोक covid पसरवू शकतात असे सिद्ध झाले तर मृतांचा आकडा काहीही बदलणार नाही असे वाटते. उलट लस घेतली आहे म्हणून लोक जास्त फिरतील आणि मृतांचा एकूण आकदा वर जाईल.

फायझर आणि FDA ह्या दोघांनीही मृत आणि hospitalization आकडेवारी बहुतांशी लपवून ठेवली आहे. ह्यावर लिहीणार्या लोकांना बिग tech इत्यादींनी पूर्ण पणे सेन्सर केले आहे. जर हि आकडेवारी चांगली असती तर फायझर ने त्याचा प्रचंड उदो उदो केला असता. काही सूत्रांच्या प्रमाणे hospitalization vaccine वाल्या लोकांमध्ये थोडे कमी असले तरी सांख्यिकी भाषेंत सांगायचे तर statisticaly significant नाही आहे. दोन्ही ग्रुप मध्ये काही लोक मेले असले तरी ते नक्की कशाने मेले हे समजले नाही. (काही वेळा covid लोकांना स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका इत्यादी येऊ शकतो).

तात्पर्य :
- तुम्हाला covid नको असेल तर लस जरूर घ्यावी. पण नाही घेतली तरी विशेष नुकसान आहे असे नाही. त्यामुळे उगाच घाई करून फायदा नाही.
- आपल्या आजी आजोबाना लस घेतली तरी मास्क इत्यादी घालावेच लागेल. इतर रोग असेल तर लस घेतली तरी सुरक्षा बाळगावीच लागेल.
- vaccine चा स्प्रेड वर काय परिणाम आहे हे खूप महत्वाचे आहे.
- गोऱ्या लोकांना आधी vaccine घेऊ द्या नंतर काही महिन्यांनी आपण घ्या !

तुषार काळभोर's picture

18 Dec 2020 - 4:52 pm | तुषार काळभोर

अत्यंत महत्वाचा मुद्दा.
पण थोड्या वेगळ्या दृष्टीकोनातून.
गोरे, काळे, दक्षिण अशियाई, पूर्व आशियाई लोकांत जर विषाणूचा परिणाम वेगवेगळा असेल, तर लशीचा परिणाम देखील वेगळा असू शकतो का?
म्हणजे समजा फायझर लस इंग्लंडमध्ये अत्यंत यशस्वी ठरली तरी भारतात ती तितकीच यशस्वी ठरेल, असं वाटत नाही. सेम फॉर सिरम्/भारत बायोटेक. त्या भारतात चाचण्या यशस्वी झाल्या तरी आफ्रिकेत कमी/जास्त यशस्वी होऊ शकतात का?

kool.amol's picture

19 Dec 2020 - 12:12 pm | kool.amol

mRNA लशी बाबतीत अपयश येण्याची शक्यता कमी आहे कारण तिथे काही ना काही प्रतिसाद मिळेलच. ह्याउलट सिरम लशीचे होऊ शकते. कारण तिथे प्रत्यक्ष विषाणू आहे. त्याला आत घेणारे receptors हे विविध वंशाच्या मानवात वेगवेगळ्या प्रमाणात निर्माण होतात. भारतीयांमध्ये हे A2 receptors कमी आहेत म्हणून मृत्यूदर देखील कमी आहे असा काही तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे सिरमच्या लशीचे वेगळे परिणाम असू शकतात. ती शक्यता नाकारता येणार नाही.

चौकटराजा's picture

19 Dec 2020 - 12:32 pm | चौकटराजा

समजा अ माणसाच्या शरीरात एच आय व्ही चा विषाणू शिरला .त्याला नेहमी साधारणपणे स्वीकारणारी एक विशिष्ट पेशी शरिरात आहे पण त्याला अशी बायोलॉजिकल गिफ्ट मिळाली आहे की त्याच्या त्या पेशीवरचा रिसेप्टर एच आय व्ही ला आत येऊ देत नाही असा आहे ! समजा काही दिवसानंतर एच आय व्ही ने आपला स्पाईक बदलला असा की त्या शरीरात पुन्हा प्रवेश करता त्याला आता अनुकूल असा रिसेप्टर तिथे आहे तर झाली ना रिप्लिकेशनला सुरुवात ?

वारंवार होणार्‍या सर्दीचे व्हायरस दरवेळी रोग निर्माण करतीलच असे नाही तर ज्यावेळी इकडे षटकोनी पाना आहे व पेशीवर त्याचा मापाचा षटकोनीच नट अशी योगायोगाने वेळ आली तरच रोग निर्माण होईल ना ... ?

थोडक्यात तो आपल्या शरीरात रेप्लिकेशनच्या उद्देशाने येतच नाही कारण तो जीव नसल्याने त्याला म्युटेशन पलिकडे अक्कल नाही पण आपले शरीर असे बनविले आहे की येथील कुलुपान्च्या किल्या हव्या तशा बनविण्याचे सामर्थ्य त्या सूक्ष्म स्रुष्टीत नक्की आहे ! स्पाईकची किल्ली बोथट करणे हे आपल्या विज्ञानाचे काम आहे !

थोडक्यात तो आपल्या शरीरात रेप्लिकेशनच्या उद्देशाने येतच नाही....
असे मुळीच नाही, पूर्णपणे असहमत! तो उद्देश्य नसेल तर शरीरात कशासाठी येईल? म्युटेशन तर शरीराबाहेर देखील होऊ शकते. रेप्लिकेशन साठी लागणारी यंत्रणा नसल्यामुळेच तर इतर पेशींची मदत घेऊन हे कार्य विषाणू करत असतात. लशीचा उद्देश इतकाच असतो की विषाणूची ओळख रोगप्रतिकारक यंत्रणेला येनकेनप्रकारे करून देणे.

चौकटराजा's picture

19 Dec 2020 - 8:23 pm | चौकटराजा

मला राहून राहून असे वाटते की जीवाप्रमाणे हेतूपुरस्सर हालचाल व्हायरस करीत नसावेत .निसर्गात एका जागेवरून मातीचा कण दुसर्‍या जागेवर वारा , पाण्याचा प्रवाह अशा कारणामुळे जात असतो तसाच विषाणूही ! आपल्याला हवी तशी पेशी माणसाच्या शरीरात आहे हे त्याला केमिकली तो ज्यावेळी रिसेप्टरच्या सनिध्यात येतो त्याच वेळी समजते !( खरे समजण्याएवढी बुद्धी त्याला नसतेच ) त्याला हवा तसा रिसेप्टर मिळणे हे केवळ योगायोगाचे काम असते. सबब एकाच प्रकारचा व्हायरस शरीरातील सर्वच प्रकारच्या पेशी फोडू शकत नाही ! काही फुफुसाच्या, काही यकृताच्या तर काही मजा पेशी फोडू शकतात व त्या त्या प्रमाणे अवयवांच्या कार्यात अडथळे निर्माण होतात ! विषाणूला एकदा पेशीत प्रवेश मिळाला की आपल्या पेशीतील जेनेटिक मटीरिअल त्याच्या जेनेटिक मटेरिअल ला संलग्न होते ! त्यात वंशव्रुद्धीचा हेतू व्हायरसचा असतो असे काही मला वाटत नाही. खरे तर अगदी प्रगत अशा माणसा मध्ये वंशवृद्धी निसर्गाच्या पातळीवर असा हेतू नसतोच म्हणून एकेकाचा जन्म हा एक नैसर्गिक अपघात आहे असे म्हटले जाते !

kool.amol's picture

19 Dec 2020 - 12:07 pm | kool.amol

Pfizer ची लस दिल्यानंतर संकल्पनेनूसार Covid होणे अपेक्षित नाही तर प्रतिपिंडे निर्माण होणे आवश्यक आहे. कारण ही लस म्हणजे फक्त mRNA आहे, जिवंत किंवा मृत विषाणू नव्हे. ह्याच कारणांमुळे Pfizer ची लस ज्यांनी घेतली आहे ते रोग पसरवू शकणार नाहीत कारण त्यांच्या शरीरात विषाणू नसेल फक्त प्रतिपिंडे असतील.

ह्याचबरोबर औषध किंवा लस ह्यांच्या चाचण्या घेताना All cause mortality म्हणजेच औषधाव्यतिरिक्त इतर सर्व कारणांनी मृत्यू येऊ शकतो ही शक्यता गृहीत धरलेली असते.

कारण ह्या शरीरातील healthy पेशींवर च हल्ला करतात असे वाचण्यात आले.
आणि covid च्या संक्रमण झाल्यावर ह्यांचा ट्रिगर काही लोकांत on होतो.