हजारो ख्वाहिशें ऐसी - २०० किमी BRM भाग २

मालविका's picture
मालविका in भटकंती
9 Dec 2020 - 9:38 pm

२८ तारीख उजाडली. सकाळी सगळ्यांनी आपल्या आपल्या सायकली आणून आमच्याकडे लावून ठेवल्या. १० वाजता गाडी घेऊन बाबा आले. सायकल चढवून बांधून गाडी पुढे गेली. मागून आम्ही ५ जण एका गाडीत बसून निघालो. वाटेत शैलेश पेठे भेटला. खेड तालुक्यातून तो आणि पाटणे अशा दोघांनी नाव नोंदवलं होत. मग त्यालादेखील बरोबर घेऊन प्रवास सुरु झाला. चहा, वडापाव ब्रेक घेत सावंतवाडी गाठली . सायकल उतरवून चेक करून घेतल्या. थोडंफार ग्रीसिंग वगैरे करून सायकल तयार झाल्या. स्पर्धेचा आयोजक पुष्कर कशाळीकर हा देखील तिथे आला होता. त्याच्याशी ओळख झाली. थोडीफार आणखी माहिती झाली. रात्री जेवून सगळे झोपलो. सकाळी ५. ३० ला स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचायचे होते. त्यामुळे ३ वाजताच उठले मी. बरोबर ब्रेड घेतले होते. सर्वांसाठी कॉफी केली मस्त आणि सँडविच बनवले. काही बरोबर घेतले काही तेव्हाच खाऊन घेतले. थोड्याच वेळात सँडविचची संख्या एवढी झाली कि बरोबर घेऊन सुद्धा उरली. यावरून चिडवणे सुरु झाले. सगळं आटपून ५ ला आम्ही सगळे तयार झालो. राहण्याच्या ठिकाणापासून साधारण २ किमी वर सावंतवाडी उद्यानापासून स्पर्धा सुरु होणार होती. त्यामुळे तिथपर्यंत सायकलनेच जायचं ठरवलं. त्यामुळे वॉर्म अप सायकलिंगवरच झालं.

आम्ही वेळेत पोहोचलो. अजून बरेच जण यायचे होते. तोवर त्या मोती तलावाच्या शेजारी उभे राहून फोटो काढून झाले. तोवर सगळे जमलेच. बाईक चेक होऊन सगळ्यांना कार्ड्स दिली गेली. ६ वाजून १० मिनिटांनी सुरवात झाली. सावंतवाडीहुन निघून इन्सुलीच्या रस्त्याने बाहेर पडून हाय वे ला लागायचं होत. तिथून खारेपाटणला वळून परत मळगावच्या बाजून सावंतवाडी परत गाठायचं असा मार्ग होता. सुरवातीला सगळे उत्साहात होते. आमची tandem बाईक असल्याने सगळे उत्सुकतेने बघत होते. थोडासच अंतर गेल्यावर इंसुलीचा मोठ्ठा उतार लागला. मागे पुढे करत सगळे वेगात उतार उतरत होते. आम्हाला रस्ता नवीन त्यात वर काळोख, सायकलच्या लाईटच्या प्रकाशात तरीही बऱ्यापैकी वेगात जात होतो. थोड्याच वेळात हाय वे ला लागलो. इथपर्यंत साधारण एकत्र असणारे आम्ही मग जोड्यांनि वेगळे झालो. स्वप्निल त्याचा मित्र अमित पिंगट याच्याबरोबर पुढे गेला. तेजानंद आणि ओंकार एकत्र होते तर मी नि श्रीनिवास एकत्र. हायवेला लागल्याबरोबर सगळे एका ठराविक स्पीडला आले.

एक गोष्ट सांगण्यासारखी म्हणजे इथे मुंबई गोवा हाय वेच काम पूर्ण झालेलं असल्याने रस्ता एकदम चकाचक होता. ४ लेनचा रस्ता, मध्ये दुभाजक,कुठे खड्डा नाही किंवा काही नाही, रस्त्यावर गर्दी नाही. त्यामुळे सायकल चालवणं सहज शक्य होतं. क्वचित कुठे तळेरे, कणकवली सारख्या ठिकाणी उड्डाणपुलाचं काम झालेलं नाही तिथे खडबडीत रस्ताआहे. पण २०० किमी मध्ये २/३ किमी खराब रस्ता काहीच वाटत नाही. रस्ता चांगला असला तरी तो कोकणातलाच. त्यामुळे अखंड चढ उतार, घाट हवेच. प्रत्येक वेळी चढ उताराप्रमाणे गिअर बदलणे, मध्येच थांबून पाणी पिणे असे चालू होते. पहिला चेक पॉईंट ५०किमी ला ओरोस चा पेट्रोल पंप इथे होता. साधारण ३ तासात ५० किमी गाठायचे असं मी आणि श्रीनिवास ने ठरवलं होत. जास्त ताण नाही येत कामा तसाच वेळही पुरला पाहिजे. सकाळी थंडी आणि धुकं नसल्याने सायकल चालवणं सोपं जात होत. स्वप्निल आणि त्याचा मित्र अमित आम्हाला पाठी टाकून पुढे गेले होते. तेजानंद आणि ओंकार एकत्र होते. कधी ते पुढे तर कधी आम्ही पुढे करत पॅडल मारणं चालू होत. मध्येच दोनदा सायकलची चेन पडली.तेव्हढ्या वेळात ज्यांना आम्ही मागे टाकले होते ते आमच्या पुढे गेले. पण तरीही जाताना काही मदत हवीय का विचारून गेले. सुदैवाने अगदी काही सेकंदात चेन लावून झाली आणि आम्ही परत सुरवात करून ओरोस च्या चेक पॉईंट ला पोहोचलो. ६.१० ला सुरवात करून आम्ही ५०किमी अंतर कापून ८.१७ ला ओरोस ला होतो. आम्ही स्वतःवरच खुश झालो. आम्ही ठरवलेल्या टार्गेट पेक्षा लवकर आलो होतो. आम्ही पोहोचलो तर स्वप्निलनि अमित आम्हाला बाय करून पुढे निघाले. आमच्या नंतर थोड्याच वेळात तेजानंद आणि ओंकार येऊन पोहोचले. तिथे आयोजकांनी केळी,चिक्की,पाणी आणि एनरझाल ड्रिंक असं ठेवलं होत. एक ड्रिंक प्यायलं आणि पाणी बॉटल्स मध्ये भरून घेतलं. ब्रेव्हेट कार्ड वर सही शिक्का झाला आणि आम्ही परत निघालो.

इथून पुढे मात्र मोठे मोठे चढ उतार होते. परत २ दा चेन पडली. परत लावून झाली. इथे मात्र आम्ही थोडे मागे पडलो. ऊन तापायला सुरवात झाली होती. मध्येच एकदा थांबून बरोबर घेतलेलं सँडविच खाल्लं. तेजानंद आणि ओंकार आता पुढे गेले. अधून मधून इतर सायकलस्वार दिसत होते. उन्हाने दमायला व्हायला सुरवात झाली . अजून ११ देखील वाजले नव्हते. तळेरेच्या इथे पाण्याची बाटली विकत घेतली. परत सुरवात केली. मध्येच जिथे मोठे खड्डे किंवा अगदीच खडबडीत रस्ता असेल तिथे आम्ही सायकलवरून उतरून हातात घेऊन तेव्हढ चालून पुढे परत पॅडल मारायला सुरवात करायची असं चालू होत. अर्थात अशी वेळ केवळ २ किंवा ३ वेळा आली. बाकी रस्ता चांगला असल्याने हा त्रास काहीच झाला नाही. एका बऱ्यापैकी मोठ्या उतारावर आल्यावर श्री एकदम उत्फुर्तपणे म्हणाला ,"वा ! मस्त उतार आला !" त्याच वाक्य पूर्ण व्हायला आणि आम्ही एक वळण घ्यायला एकच वेळ आली. आणि समोर मोठ्ठा चढ दिसला. आणि मला हसायला आलं. श्री चा उत्साह क्षणभरच टिकला. पुढचा चेक पॉईंट खारेपाटण चेक पोस्टला होता. पण रस्त्यात कुठेही खारेपाटण किती किमी याचा ना बोर्ड दिसत होता ना मैलाचा दगड. बाकी इतर सगळी शहर,गाव लिहिलेली होती पण खारेपाटण दिसत नव्हतं. strava चालू असल्याने किती अंतर कापले गेले ते कळत होत आणि किती उरल हिशेब करून बरं वाटायचं. श्री पाठून बडबड करायचा ६० किमी झाले फक्त १४० किमी बाकी. २०० किमी मोठे वाटायचे त्यामानाने १४०किमी ऐकायला छान वाटायचं :) .मध्ये नडगिवे गावात छोटा घाट होता. पण खारेपाटणला जाताना तो उतरायचा होता त्यामुळे पूर्ण वेगात घाट उतरून टोकाला आलो तोच खारेपाटणला पोहोचून परत येणारे स्वप्निलआणि अमित दिसले. एकमेकांना हात करून पुढे निघालो आणि शेवटी एकदाचे ११. २६ ला आम्ही खारेपाटण चेक पॉईंटला पोहोचलो. इथे देखील आम्ही आमच्या ठरलेल्या वेळेपेक्षा थोडे आधी पोहोचलो होतो. त्यामुळे बरं वाटत होतं. अजून एवढाच अंतर आणि त्यामानाने बराच वेळ हाताशी असल्याने मनातून छान वाटत होत. इथे आयोजकांनी खिचडी, उकडलेली अंडी, पाणी, केळी असं सगळं ठेवलं होत.आम्ही पोहोचल्यावर आधी पोहोचलेल्या सगळ्यांनी टाळ्यांनी आमचं स्वागत केलं. काय मस्त वाटलं माहितेय. अख्ख्या ३० स्पर्धकांमध्ये मी एकटीच मुलगी आणिआम्ही त्यात आमच्या वेगळ्या सायकलवर त्यामुळे सगळ्यांना त्याचं कौतुक होतं.पोहोचल्या पोहोचल्या हातात गार पाण्याचा छोटा नॅपकिन दिला. तोंड पुसून काढून तो तसाच डोक्यावर ठेवला. इतकं बरं वाटलं. एकदम शांत वाटलं. तेजानंद आणि ओंकार आधीच पोहोचले होते. एकमेकांना चीअर अप करत ते दोघे पुढे निघाले. थोडी खिचडी खाऊन घेतली. पोटभर पाणी पिऊन घेतलं. तोवर पाठून शैलेश पेठे आलाच. त्याला बाय केलं, ब्रेव्हेट कार्ड स्टॅम्प करून झालं आणि परत निघालो सावंतवाडीकडे.

मगाशी वेगात उतरलेला नडगिवेचा चढ आता मस्त उन्हात तळपत होता. नवीन रस्ता जसा आकर्षक दिसत होता, गाडीतून येताना मस्त वाटत होता तेव्हढाच सायकल वरून जाताना नकोस वाटत होता. नवीन रस्त्यामुळे आजूबाजूला सावली देणारी झाडं अजिबात नव्हती. नवीन झाडांची लागवड झालेली दिसत होती. त्यात वरून ऊन आणि दमवणारा चढ. जमेल तेव्हढी सायकल चालवत होतो.अगदी शेवटचा चढ आला मग मात्र दोघांना दम लागला तेव्हा उतरलो. हातात सायकल धरून चालायला सुरवात केली आणि अगदीच ३/४ मिनिटात चढ संपला. म्हणजे आम्ही बराचसा चढ चढवला होता. जाणवून हुरूप आला. परत एकदा पाणी पिऊन सुरवात केली.आता मात्र भर दुपारचं ऊन चांगलंच जाणवत होत.पाणी पित राहणं गरजेचं होत. मध्ये मध्ये इलेकट्रोलच पाणी देखील पीत होतो. परत एकदा चढ चालू होता.सकाळचीच ओरोसच्या चेक पॉईंटच्या विरुद्ध बाजूला पुढचा चेक पॉईंट होता. मजल दरमजल केल्यासारखे ओरोसला येऊन पोहोचलो. खरं तर इथेही आम्ही चांगल्या स्पीडने आलो होतो. पण ऊन्हाने दमायला झाल्यामुळे किती वेळ झाला चेक पॉईंट येत नाही असं झालं होत. पण आम्ही ठरवलेल्या वेळेत थोड्या उशिरा म्हणजेच ३ ऐवजी ३. १० ला इथे पोहचलो. आम्ही पोहोचलो आणि ओंकार नि तेजानंद तिथून निघाले. पाणी, केळ, संत्र खाऊन कार्ड स्टॅम्प करून निघालो.आता ऊन थोडं कमी झालं होत. पुढचा चेक पॉईंट कुडाळ येथील हॉटेल कोकण स्पाईसला होता. ओरोसलाच पुष्करला विचारलं," कुडाळ किती किमी अजून ?" फक्त १८ किमी ऐकल्यावर काय बरं वाटलंय. उत्साह संचारला थोडा. परत पॅडल मारायला सुरवात. आता हॅण्डल धरून हात दुखायला लागले होते. तरी अधून मधून हातांच्या पोझिशन बदलत होते. पण tandem वर हात सोडणं पटकन शक्य होत नाही. बॅलन्स बिघडतो. एवढा वेळ सीटवर बसून पार्श्वभाग देखील थोडा दुखत होता. ओरोसच्या इथे एकदा गुडघ्याला स्प्रे मारून घेतला होता. ४.०४ वाजता कुडाळला पोहोचलो. इथे सेल्फी पॉईंट होता. म्हणजे मोबाईलवर सेल्फी फोटो काढून ग्रुप वर टाकायचा. फोटो वर आपसूक वेळ येते नि तुम्ही किती वाजता पोहोचलात ते कळत.

इथून पुढे शेवटचा टप्पा. हाच खरा कंटाळवाणा आणि परीक्षा बघणारा असतो. शेवटचे २५ किमी उरले होते. हाताशी वेळ होता. परत सायकल चालवायला सुरवात केली. पण आता हात पाय बोलायला लागले होते. खर तर हे मानसिक आहे हेही जाणवत होतं. छोटे छोटे चढ सुद्धा कितीतरी किलोमीटरचे असल्यासारखे वाटत होते. पण इथेच खरा कस लागतो. मध्येच उतरून पाणी विकत घेतलं. गार पाणी पिऊन बरं वाटलं. चढ उतार करत एकदाच झाराप आलं. इथून पुढे मळगावला वळून चढ चढून सावंतवाडीला पोहोचायचं होत.झाराप ते मळगाव साधारण ५/७/ किमी असेल नि पुढे चढ धरून अजून ४/५ किमी असं एकूण कमीत कमी १२/१५ किमी शिल्लक होते. रस्ता सगळं नवीन चकाचक होता. पण वाईट गोष्ट अशी कि लांबवर रस्ता दिसे आणि मग चढ उतार स्पष्ट दिसत.. एकपेक्षा एक चढ समोर दिसल्यावर मानसिक रित्या थकायला होत. शेवटचे १५ किमी असले तरी इथेही स्पष्ट समोरचे उड्डाणपूल दिसत होते. आता एका बाजूने उड्डाणपूल चढला तर दुसरीकडे उतार असतोच कि. पण थकलेल्या मनाला फक्त चढ दिसतात त्याला काय करणार? २ उड्डाणपूल पार केल्यावर वाटलं आता समोर हिरवा बोर्ड दिसतोय. कदाचित मळगावला जाणारा फाटा असेल. पण नाहीच. अजून २उड्डाणपूल पार केल्यावर मात्र एकदाचा मळगावला वळणारा फाटा आला. तिथून आत वळून सावंतवाडी रस्त्याला लागल . इथून पुढे अंदाजे २किमीचा चढ होता. जमेल तेवढी सायकल चढवली आणि मग मात्र उतरलो.५मिनिट सायकल हातात घेऊन चाललो आणि परत सायकलवर स्वार झालो.आता अगदीच थोडं अंतर उरलं होतं. त्यामुळे पाय भरभर चालत होते. कधी एकदा शेवटचा टप्पा गाठतोय असं झालं होतं. समोर सावंतवाडीचे बोर्ड दिसत होते. पण तरीही एका गल्लीत जरा चुकलोच. मग परत विचारत सावंतवाडी उद्यानाजवळ पोहोचलो. आमच्या आधी पोहोचलेले स्वप्निल, अमित, तेजानंद ,ओंकारआणि इतर सायकलस्वार यांनी टाळ्या वाजवून आमचं स्वागत केलं. घडयाळ बघितलं तर स्पर्धा संपायला अजून २ तास अवकाश होता. आम्हाला प्रचंड आनंद झाला. त्याच वर्णन शब्दात करण खरंच कठीण आहे. इतके दिवस घेतलेला ध्यास पूर्ण झाला. थोड्याच वेळात पाठून शैलेश देखील आलाच. खरा तो आमच्या आधीच यायचा. पण मळगावच्या चढात त्याला एक छोटासा धबधबा दिसला. स्पर्धा संपायला वेळ आहे म्हटल्यावर तो तेव्ह्ढ्यातल्या तेव्हढ्यात त्यात डुंबून आला.

स्पर्धा १३तास ३० मिनिटात २०० किमी अंतर पार करणे अशी होती. आम्ही ती ११ तास ३० मिनिटात पूर्ण केली. त्यातही सायकल चालवणायची वेळ फक्त १० तास होती. बाकी वेळ हा मध्ये थांबून खाणं, पिणं याचा होता. strava रेकॉर्ड प्रमाणे आम्ही २०किमी तासाला या हिशेबाने अंतर पार केले. आम्ही साधारण असाच हिशेब ठेवला होता. सुदैवाने आम्हा सगळ्यापैकी कुणाचीही सायकल पंक्चर झाली नाही किंवा आणखी कोणतीही अडचण आली नाही. हे खूप महत्वाचं असत कारण जर सायकल पंक्चर झाली तर कमीत कमी २० मिनिट पंक्चर काढायला जातात आणि मग यात मानसिक खच्चीकरण नक्की होत. हाताशी वेळ ठेवावा लागतो तो अशा कारणासाठी.

सर्वानी आमचं कौतुक केलं. माझं जरा जास्तच कारण ३० स्पर्धकांमध्ये मी एकटीच मुलगी होते. पण आम्ही ५हि जण स्पेशल होतो. श्रीनिवास जेव्हा २ वर्षपूर्वी या स्पर्धेसाठी प्रयत्न करीत होता तेव्हा पायाला दुखापत होऊन छोट ऑपरेशन करावं लागलं होत. तरीही त्याने जिद्दीने सराव करून हि स्पर्धा पूर्ण केली. तेजानंद देखील आजारपणातून उठून फिनिक्स पक्षाप्रमाणे परत तंदुरुस्त झाला आणि स्पर्धा पूर्ण केली. स्वप्निलचे काका २ दिवस आधी स्वर्गवासी झाले होते. तशाही दुःखात स्वतःला सावरून त्याने स्पर्धेत भाग घेतला. इतकंच नाही तर कमी वेळात सर्वात पहिला पोचला. आणि ओंकार तर केवळ २ महिन्यांपूर्वी सायकलिंग करायला लागलेला. त्याच्यापेक्षा किंचित मोठ्या उंचीची सायकल असून देखील या आमच्यात लहान असणाऱ्या बडबड्या मुलाने फारच छान प्रकारे स्पर्धा पूर्ण केली.

या स्पर्धेसाठी महत्वाचं म्हणजे जास्तीत जास्त १३ तास ३० मिनिट सायकल चालवायची असते. नुसती सायकल चालवणं नाही तर तेव्हढा वेळ सायकलच्या सीटवर बसणे हे देखील एक आव्हान असतं. इथे नुसतं प्रवास करायचा गाडीने तरी कंटाळवाणा होतो. इथे तर हात, पाय, डोळे ,मान कशालाच विश्रांती नाही. समोर मोठाले मोठाले चढ दिसत असताना निराश न होता हे पार करायचे आहेत हे कायम ध्यानात ठेवून सायकल चालवत राहणं गरजेचं असत. अधे मध्ये ब्रेक्स घेतले तरी त्यातही फार वेळ दवडायचा नसतो. खूप जास्त आणि मसालेदार खाणं शक्यतो टाळायचं. कायम पाणी पीत राहायचं अशा अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात आणि त्याप्रमाणे वागावं लागतं. या आणि अशा अनेक गोष्टी सराव करताना लक्षात ठेवून आम्ही केल्या. एकदा ठरवल्यावर रोज कमीत कमी ३०/४० किमी सायकलिंग झालेच पाहिजे यावर आमचा कटाक्ष होता. स्वप्निल न याआधीच १५०/ २०० किमीच्या राइड्स केल्या होत्या. मी देखील १०० किमी ची एक राईड केली. बाकी रोज ५०/ ६० किमी च्या राइड्स करतच होते. शिवाय ज्या दिवशी सायकलिंग होणार नाही त्या दिवशी थोडेफार पायांचे व्यायाम, बैठका असे देखील चालू होते. आहारात मुख्यत्वे प्रोटीन चा समावेश होईल असे बघितले. शक्यतो शेवटचा आठवडा बाहेर काही खाल्ले नाही जेणेकरून पोट बिघडू नये. अशी थोडीफार पथ्ये पाळली होती. स्पर्धेच्या दरम्यान नुसत्या पाण्याबरोबर इलेकट्रोलचे पाणी देखील पित होतो जेणेकरून एनर्जी टिकून राहील. बरोबर खायला सँडविच, एनर्जी बार, चिक्की असं काही ना काही घेतलं होत. जे पटकन खाता येईल, जडही होणार नाही, पचेलही लवकर. शक्य तेव्हढे कमी सामान बरोबर घेतले. अशा तर्हेने आमची हि २०० किमी ची स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली.

या सगळ्यात मला मोठ्ठी साथ लाभली ती पार्टनर श्रीनिवासची . मी काय करू शकते हे माझ्यापेक्षा तो जास्त जाणतो. त्यामुळे तो मला जरा जबरदस्तीच ढकलतो आणि चक्क मी ते करते. अशा काही स्पर्धा असतात हेच माहित नसणारी मी, अशी स्पर्धा पूर्ण करते हे माझ्यासाठी खूपच समाधानाची बाब आहे. श्रीनिवासचे बाबा कायम आम्हाला अशा गोष्टींना पाठिंबा देतात. सरावासाठी आम्ही ४/५ तास बाहेर असायचो अशा वेळी ईशानला (आमच्या मुलाला ) त्यांच्याकडे सोडून जायचो. क्वचित कधी फारच थोडक्यात स्वयंपाक उरकून मी सायकलिंग ला जायचे. पण त्यांनी कधीही तक्रार केली नाही. उलट प्रोत्साहन दिले. आम्ही जायचे म्हटल्यावर माझ्या आईबाबांनी ईशानला सांभाळायची तयारी दाखवली. जवळपास ३ दिवस आम्ही बाहेर होतो तेव्हा आणि इतरही अनेक वेळा मी ईशानला आईबाबा, दादा वहिनीच्या ताब्यात ठेवून जाते. या सगळ्यांचे कायम सहकार्य लाभलय म्हणुनच एवढा टप्पा मी गाठू शकलेय. हे आणि इत्तर अनेक जण आमच्या पाठी कायम आशीर्वाद आणि शुभेच्छा घेऊन उभे असतात. आणि म्हणूनच आम्ही आमचं एक स्वप्न पूर्ण करू शकलो.

"हजारो ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाईश पे दम निकलें ", यावेळी तशीच काहीशी अवस्था झाली. दम चांगलाच निघाला पण ख्वाईश पूर्ण झाल्याचं समाधान काही औरच होत.

-- धनश्रीनिवास

प्रतिक्रिया

भ ट क्या खे ड वा ला's picture

9 Dec 2020 - 9:52 pm | भ ट क्या खे ड वा ला

एकदम सही लिहिलय, त्याही पेक्षा टॅंडम ने २०० ची राईड केली आहात हे जास्त कौतुकास्पद. अशाच राईड्स सुरु राहूदेत.

चंबा मुतनाळ's picture

9 Dec 2020 - 10:07 pm | चंबा मुतनाळ

फारच छान लिखाण झालं आहे. तुमच्या यशाबद्दल अभिनंदन

गोरगावलेकर's picture

11 Dec 2020 - 9:43 am | गोरगावलेकर

२०० किमी ची राईड पूर्ण केली हे कौतुकास्पदच. तुमचे व तुम्हाला प्रोत्साहन देणाऱ्या सगळ्यांचे अभिनंदन. टँडम सायकलवरचा एखादा फोटो पहायला मिळाला असता तर आणखी छान वाटले असते.

MipaPremiYogesh's picture

11 Dec 2020 - 2:42 pm | MipaPremiYogesh

वाह अभिनंदन . खूप छान परिश्रम आणि त्याचे योग्य ते फळ.