बॉईल्ड अंडा भुर्जी

Primary tabs

मुक्तचिंतक's picture
मुक्तचिंतक in पाककृती
3 Nov 2020 - 4:12 am

तुम्हाला कधीमधी मस्त तिखट, झणझणीत, spicy खाण्याची इच्छा होते. नवरात्र आत्ताच संपलेले असतं. गेले काही महिने घरचचं खाल्लेलं असत, बाहेरच चमचमीत खाण्याची इच्छा असूनही खाता येत नसतं, अश्या वेळेस काय करावं असा यक्षप्रश्न तुमच्यासमोर असतो !

अश्यातच घरात काही अंडी असतात. उकडलेली अंडी,भुर्जी, ऑम्लेट, हाफ फ्राय हे सगळं खाऊन कंटाळा आलेला असतो, काहीतरी वेगळं खायला पाहिजे, पण काय हा प्रश्न कायम असतो. मग तुम्ही you tube वर जातात, तिथे काही व्हिडिओ पाहतात. तिथेही तेच तेच असतं. मग तुम्हाला डेक्कन किंवा स्वारगेटला भुर्जीपाव च्या गाडीवर खाल्लेल्या तिखट boiled भुर्जी ची आठवण येते. तोंडाला पाणी सुटतं आणी मग तुम्ही लागतात तयारीला
बायको आज नवरा स्वतःच स्वतः करून खाणार म्हणल्यावर मनातून खुश झालेली असते, तेवढाच त्रास वाचला असा विचार करून मनातला आनंद चेहऱ्यावर न आणण्याचा प्रयत्न करत असते. पण तुम्ही तिच्या आनंदावर विरजण टाकतात, तिला 2 मोठे कांदे बारीक बारीक चारायला लावून. तुम्ही मग 2-3 छोटे टमाटे बारीक कापून घेतात, टोमायोच्या बिया मात्र सगळ्या काढून घ्यायच्या. लसणीच्या 4-5 पाकळ्या, बोटभर आलं आणी 4-5 तिखट मिरच्या एकत्र खडबडीत वाटून घेतात. हे वाटण बारीक करायचं नाहीये, किंवा मिक्सर मधून काढायचं नाहीये, मिरच्यांचे तुकडे भुर्जी खाताना दाताखाली आले पाहिजेत असा तुम्ही विचार करून कृती करतात. बरं, हे सगळं करत असताना तुम्ही गॅस वर 3-4 अंडी उकडवून घेतात. अंड्यांची साल काढून चांगले बारीक कापून घेतात, पिवळे तुकडे आणी पांढरे तुकडे वेगवेगळे ठेवतात.
आता तेल तापवत ठेवतात, चिमूटभर हिंग आणी नंतर जिरे टाकतात, जिरे तडकले की वाटण टाकून देतात. लसूण संतापाने लाल झालं की लगेच कांदा टाकून घेतात आणी तुम्ही मनात बायकोचे आभार मानतात. कांदा गुलाबी झाला की 2 चमचा तिखट, 1 चमचा जिरे पूड, 1 चमचा धणे पूड, 1 चमचा गरम मसाला असं त्यात टाकतात. मग टमाटे टाकतात. पाचच मिनिटात टोमॅटो तेल सोडू लागतात, मग तुम्ही त्यात उकडलेल्या अंड्याचे पिवळे तुकडे टाकतात, थोडंस पाणी टाकून चांगलं शिजवून घेतात. आपल्याला इथे रस्सा करायचा नाहीये, पाणी फक्त शिजवण्यापूरत टाकायचं आहे ह्याच भान तुम्ही ठेवतात. मॅशर ने मिश्रण चांगलं एकजीव करून घेतात व काही मिनिटात शिजलं की मग अंड्याचे पांढरे तुकडे टाकतात आणी त्याला परतवतात. परतावताना त्याला गदगदा हलवून सगळं मिश्रण अंड्यांच्या तुकड्यांना सर्वांगी लागेल ह्याची खातरजमा करतात. 3-4 मिनिटं शिजल्यांनातर बचकाभर चिरलेली कोंथिबीर टाकून लिंबाच्या रसाचे काही थेंब शिंपडतात. झालं की ! खल्लास !
इथे पाव लागतो पण तुमच्याकडे पाव नसतो मग तुम्ही ब्रेड चे दोन स्लाईस टोस्टर मध्ये टाकतात, खरपूस भाजून घेतला आणी मग उदारपणे त्यावर बटर लावतात !
आता भूक कडकडून लागलेली असते, पण तरीही जीवावर उदार होऊन तुम्ही 2 फोटो काढून घेतात
आणी TV वर कुठलातरी मस्त सिनेमा लावतात आणी बॉईल्ड भुर्जी वर ताव मारतात !

बॉईल्ड अंडा भुर्जी

बॉईल्ड अंडा भुर्जी2

बॉईल्ड अंडा भुर्जी3

प्रतिक्रिया

मायला. कसली भन्नाट शैली आहे रेशीपी देण्याची.
एकदम रनिंग कॉमेंट्रीच की. अगदी समोर बसून पहातोय अशी
लै भारी. डिश तर आहेच. पण यावेळे डब्बल मार्क रनिंग कॉमेंट्रीला.

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Nov 2020 - 2:27 pm | ज्ञानोबाचे पैजार

सुनिल गावस्कर किंवा हर्ष भोगले यांची लाईव्ह कॉमेंट्री ऐकत मॅच पहाताना जो आनंद मिळतो तोच आनंद फोटू पहात व रेसीपी वाचताना आला.
और आने दो
पैजारबुवा,

तुषार काळभोर's picture

3 Nov 2020 - 4:41 pm | तुषार काळभोर

अशी उकडलेल्या अंड्याची चटणी/भुर्जी खाल्ली आहे. पण वर्णन, फोटो अन टोस्ट ला बोनस गुण!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Nov 2020 - 5:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लंबर एक फोटो आवडले. तोपासू.

-दिलीप बिरुटे

Gk's picture

3 Nov 2020 - 10:01 pm | Gk

छान

नीलस्वप्निल's picture

3 Nov 2020 - 10:46 pm | नीलस्वप्निल

उकडलेल्या अंड्याची भुर्जी .... अहाहा... माझी सर्वात आवडती डीश....:)

राघव's picture

3 Nov 2020 - 11:32 pm | राघव

तोंपासु! :-)

उगा काहितरीच's picture

5 Nov 2020 - 4:44 pm | उगा काहितरीच

मस्त ! पाकृपण आणि सांगायची पद्धत पण !!! सोप्पी आणि टेस्टी आहे पाकृ. Tried & tested आहे, म्हणून चुकण्याची शक्यता खूपच कमी आहे.

महासंग्राम's picture

12 Nov 2020 - 2:10 pm | महासंग्राम

डेक्कन ब्रीजखाली आनंद भुर्जी सेंटर आहे, तिथे अंडा घोटाळा, झिंगाट भुर्जी, अंडा बँजो असे अंड्याचे भारी प्रकार मिळतात. खवैय्ये असाल आणि स्वछतेचा बाऊ करत नसाल तर ट्राय करण्यासारखं आहे

अजिंक्यराव पाटील's picture

2 Dec 2020 - 12:54 pm | अजिंक्यराव पाटील

रेसिपी सेम, पण कोथिंबीर टाकण्याआधी सगळंच स्मॅश करून घेतलं नीट तर बेस्ट लागतंय