सुप्रभात!

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
11 Sep 2020 - 1:23 pm

सुप्रभात

सध्या २ आठवडे झाले सकाळी सकाळी उठून सायकल चालवायला जातेय. थंडीची चाहूल लागतेय पण पाऊस अजून पूर्ण गेला नाहीये असं काहीस वातावरण आहे. संध्याकाळहून आकाश भरून येत आणि धो धो पाऊस पडून जातो. पण सकाळी अगदी मस्त मोकळं आकाश असतं.

पहाटे खरं तर उठायचा कंटाळा येतो पण आताशा बाहेर गेल्यावरच वातावरण बघायची, अनुभवायची सवय झालेय त्यामुळे हल्ली कमी कंटाळा येतो . ६.३० च्या दरम्यान मी बाहेर पडते तेव्हा सूर्य उगवलेला नसतो पण स्पष्ट दिसायला लागलेलं असतं. हलके हलके धुकं पडायला सुरवात झालेली असते. वातावरण एकदम प्रसन्न असतं. थोडं स्ट्रेचिंग करून सायकल चालवायला सुरवात केली कि मस्त गार वाऱ्याची झुळूक जाते. बरं वाटत एकदम. कोरोनाने अजूनही सगळे व्यवहार पूर्ण सुरु झालेले नाहीत त्यामुळे रस्त्याला फारच कमी रहदारी असते. नाहीतर सकाळच्या वेळेला शाळा कॉलेजची मुलं, त्यांच्या गाड्या, एस टी च्या गाड्या यांची वर्दळ असते. सध्या ते प्रमाण कमीच आहे.

हळूहळू पुढे गेलं कि सायकल वेग धरायला लागते. छोटे मोठे चढ उतार पार करत एकाद्या चौकात जावं तर आपलं भूस्वागत होतं. आपली सुमंगल प्रभात अमंगल करण्यासाठी १२/१५ कुत्री सज्ज असतात. सकाळी सकाळी यांचे काय वादविवाद होतात माहित नाही पण एकमेकांवर जीव खाऊन ओरडत असतात. टी व्ही वरच्या चर्चांमध्ये कसे तिथली लोकं एकमेकांवर भुंकत असतात अगदी तसाच प्रकार असतो इथे. खरं तर हि पाळीव कुत्री नसतात कि घरात टी व्ही वरचे वादविवाद त्यांच्या कानावर पडतील. हे नसेल तर पुढे एखादी गाडी गेली असेल तर तिच्या पाठी लागलेली असतात. बाकी रस्त्याला कोणी नसेल तर आपली वेळ भरली असं समजून जायला हरकत नसते. सायकल आपोपाप प्रचन्ड वेगाने धावू लागते. ते जीव खाऊन पाठी लागतात तर आपण जीव वाचवून त्यांच्यापासून दूर पळत जातो. हा कार्यक्रम एखाद्या चौकात चुकला तर पुढच्या चौकात दुप्पट सदस्य हाताशी घेऊन कार्यक्रमचा दुसरा भाग सादर केला जातो. आजूबाजूला लोक असतील तर ती दगड मारून त्याना दूर करण्याचा प्रयत्न करतात. पण अशा वेळी ते आघाडीसारखे एकत्र येऊन त्या माणसावर हल्ला चढवतात. मी रोज सकाळी जाताना विचार करतच जाते कि माझ्यावर अशी वेळ आली तर मी काय करेन?अशा वेळी मला बिरबलाची गोष्ट आठवते. जीव वाचवण्यासाठी कोणतं हत्यार जास्त उपयोगी या बादशहाच्या प्रश्नावर बिरबल म्हणतो हातात येईल ते आणि थोड्याच वेळात एक हत्ती अंगावर धावून आलयावर बिरबल शेजारचं कुत्रं हत्तीवर टाकतो ज्यामुळे हत्ती दिशा बदलून निघून जातो. हि गोष्ट मला प्रकर्षाने आठवते आणि माझ्याजवळ काय आहे जेणेकरून मी माझा जीव या कुत्र्यांपासून वाचवू शकेन याच प्लानिंग करत राहते.मी पण हाताला येईल ते मारत राहीन त्यांना, असा विचार करते. वर्स्ट केस सायकल सुद्धा फेकून मारिन अशा टोकाच्या मतावर आलेय मी. सुदैवाने अशी झुंड माझ्या पाठी लागली नाही. एकदा एकटा कुत्रा पाठी लागला आहे पण ते तेव्हढ्यावर निभावलाय. तर सकाळच्या वेळेची हि एक गम्मत झाली.

नंतर येतात ती मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेली लोकं. रस्त्यावर रहदारी खूप कमी असते मान्य. पण म्हणून हि लोकं बिनधास्त रस्त्यावर भटकत असतात. रस्त्याच्या मधूनच काय चालतील, मागे पुढे न बघता रस्ता क्रॉस काय करतील ,एवढ्या मोठ्याने गप्पा मारतील कि पाठून बेल वाजवल्याचा आवाज पण कानावर जात नाही यांच्या. यात प्रामुख्याने उठून दिसतात त्या राष्ट्रीय पोशाखात बाहेर पडलेल्या बायका. गाऊन घालून बाहेर पडणाऱ्या बायका खरंच धन्य. एक ड्रेस घालायला असा किती वेळ लागतो कळत नाही? पण गाऊन घालून वरून ओढणी घायची आणि सध्या तीच मास्क सारखी कोणी दिसलच तर तोंडाभोवती गुंडाळायची हि जी काय फॅशन आहे ती कमाल म्हणावी लागेल. आणि या पोशाखात आरामात हालत डुलत गप्पा मारत चालणं हे कोणत्या व्यायाम प्रकारात मोडतं काय माहित?

आणखी एक दिसणारे लोक म्हणजे सकाळी सकाळी पाव घेऊन जाणारे लोक . आम्ही आपले हौस म्हणून ,व्यायाम म्हणून सायकल हाणत असतो . ती सुद्धा गियर वाली , कमी वजनाची आणि आणखी काही फीचर्स असलेली . पण हे बिचारे पाव विकणारे लोक एवढं पावाच ओझं घेऊन सगळे चढ उतार पार करत पोट भरण्यासाठी काम करत असतात . बघूनच खरं तर दया येते . प्रत्यके ठिकाणी थांबून पाव द्यायचे , पाऊस असेल तर पाव न भिजण्याची काळजी घ्यायची , पावसात भिजल्यास स्वतः आजारी ना पडण्याची खबरदारी घ्यायची , आणि सध्याच्या कोरोनोच्या काळात तर आणखीच काळजी घ्यायची . यांच्या सध्या काळ्या सायकल किती वजनाच्या असतात . त्यात आणखी पावांचं वजन घेऊन हे लोक जात असतात . मानलं या लोकांना .

रस्त्यावर फिरणारी गाई गुरे हा देखील एक स्वतंत्र विषय आहे . भटक्या गाई गुरे तर अर्धा रस्ता अडवून शांतपणे बसलेली असतात . तिथेच आजूबाजूला कुठेतरी त्यांचं शेण पडलेलं असतं . पाऊस पडला तर ते रस्ताभर पसरतं . आहे गुळगुळीत रस्त्यावरून सायकल स्लिप होण्याची शक्यता वाढते . शिवाय या प्राण्यांचं मन कधी भरकटले काही सांगता येत नाही. सरळ जाणारी एखादी गाय काय कुणास ठाऊक पण अचानक दिशा बदलून चालायला लागते. बरोबर वासरू वगैरे असेल तर ते मध्येच उधळत. मागून गुराखीअसेल तर त्यांच्या पाठून तो पळत सुटतो. तो त्यांना आवरायला म्हणून पळतो नि तो स्वतः रस्ताभर धावतो. अशी हि वरात चुकवत सायकल चालवणे कठीण होऊन जाते. सकाळी सकाळी असे सगळे प्रकार झाले कि ओव्या सुचायच्या सोडून शिव्या येतात मनात.

आणि प्राणी कमी म्हणून येणारी जाणारी लोक भरीला असतात. एखादी बाई सायकल चालवतेय तेही बरोबर कोणी नसताना म्हणजे वेगळच काहीतरी. हटकून हॉर्न वाजवणारे असतात. काही जण विचित्र प्राणी पाहिल्याचा लुक देतात. काहीजण काय नवीन फॅशन आलेय असा चेहरा करतात. तर काहीजण का एवढी चढ उतार करून दमवतात माणसं स्वतःला असाही चेहरा करतात. बायका तर एवढ्या भयानक रीतीने बघत नाक मुरडत असतात कि जस काय सायकल चालवून मी पाप करतेय. त्यांचा राष्ट्रीय पोशाख त्यांना खटकत नाही माझी मात्र ट्रॅक पॅन्ट, टी शर्ट खटकतो. एखादा मंद गतीने गाडी चालवत असताना मी त्याला ओव्हरटेक केलं तर काय अपमान होतो त्याचा. मागून हॉर्न वाजवत येऊन मला ओव्हरटेक करण्याचा पराक्रम करून दाखवतो लगेच.

तर असो हे सगळे प्रकार चालू असले तरीही नेमाने सायकल चालवायचा प्रयत्न करतेय. रोज निसर्ग बदलतोय. नवे नवे खेळ करतोय. सकाळच्या धुक्यात सूर्य लपाछपी खेळत असतो. अंगातून घाम निघत असला तरी मंद वारा वाहत असल्याने आल्हाददायक वाटत. धुकं असल्याने कंटाळवाणं अजिबात वाटत नाही. आजूबाजूच्या छोट्या छोट्या डोंगरांवर कापसासारखे ढंगांचे पुंजके असतात ते बघताना मस्त वाटत. म्हातारीच्या कापसाची आठवण येते. एखाद्या चढावर तर ढगातून आरपार जायला मिळत. अलोरे शिरगाव क्रॉस करून परत हायवेला लागलं कि चिपळूण बाजूला येताना उतार लागतो. मोठा नाही पण थोडा थोडा उतार करीत संपूर्ण रस्ता मस्त स्पीड ने सायकल चालवता येते. आधीच्या चढात घेतलेले श्रम भरून निघतात. मजा येतेय. चालू आहे माझं सायकलिंग लवकरच येईन आणखी काही अनुभव घेऊन. तोवर बायबाय!
---धनश्रीनिवास

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

उन्मेष दिक्षीत's picture

11 Sep 2020 - 4:00 pm | उन्मेष दिक्षीत

.

Gk's picture

12 Sep 2020 - 7:05 am | Gk

सकाळचा सूर्योदय किंवा संध्याकाळचा सूर्यास्त , किमान एक तरी बघता आले पाहिजे
पण 8 तास जॉब आणि 4 तास प्रवास ह्यात लोकांना हे जमत नाही

Bhakti's picture

12 Sep 2020 - 1:04 pm | Bhakti

बरोबर

वामन देशमुख's picture

12 Sep 2020 - 7:27 am | वामन देशमुख

सुप्रभात!

खूप छान लिहिलंय, वाचून अगदी फ्रेश वाटलं. दिवस मस्त जाणार आजचा असं दिसतंय!

दुर्गविहारी's picture

12 Sep 2020 - 9:43 am | दुर्गविहारी

खूपच छान लिहिलं आहे. भुंकणाऱ्या कुत्र्यांचा सोडून बाकीचे फोटो अससते तर मजा आली असती.

गणेशा's picture

12 Sep 2020 - 10:09 am | गणेशा

चांगली आहे सवय...
मला running चा नविन group मिळाला आहे, त्यामुळे त्यांच्याकडे 5:30 ला सायकल वर 10 km जाणे, मग running पुन्हा cycling असे आता तरी चालू आहे.
मुळात सकाळी लवकर रोज उठणे त्यांच्यामुळे शक्य झाले नाहीतर मी शनिवारी रविवारीच लवकर उठायचो..

बाकी कुत्री सकाळी मागे लागली तर, सरळ थांबायचे, कुत्री निघून जातात, मी तरी टुव्हीलर असो वा सायकल असेच करतो..

सायकल वगैरे मारायची गरज नाहीच.. काहीही नाही..
बघा एकदा

गाऊन घालून बाहेर पडणाऱ्या बायका खरंच धन्य. एक ड्रेस घालायला असा किती वेळ लागतो कळत नाही? पण गाऊन घालून वरून ओढणी घायची आणि सध्या तीच मास्क सारखी कोणी दिसलच तर तोंडाभोवती गुंडाळायची हि जी काय फॅशन आहे ?
हा हा
हा प्रश्न मलापण पडतो...
मी सध्या morning walk ला जातेय.मी पळायला लागले की पाहत राहतात..जाम राग येतो....पण नवीन track मिळालाय .. मस्त आहे..

त्यांचा राष्ट्रीय पोशाख त्यांना खटकत नाही माझी मात्र ट्रॅक पॅन्ट, टी शर्ट खटकतो...आमचापण ग्रामीण भाग आहे..सो असंच होतं..पण हे चूक आहे..

मस्त फिरा.. Enjoy!!