श्रीगणेश लेखमाला २०२० - आठवणी मिपाकर्सच्या

प्रशांत's picture
प्रशांत in लेखमाला
1 Sep 2020 - 7:11 am

1
नमस्कार मिपाकर. सर्वप्रथम मिपाच्या १४व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा.

या वेळी श्रीगणेश लेखमालेचा विषय 'आठवणी' असा असल्यामुळे काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करू या, असा विचार करतच होतो, तेवढ्यात सुचले की मिसळपावच्याच खूप साऱ्या आठवणी आहेत, त्याबद्दल काहीतरी लिहून काढू...

फोरम मिसळपाव.कॉमची ओळख -

चौदा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी शुक्रवार पेठ चिंचेची तालीम येथे राहत होतो, नीलकांत (मिपामालक) आमचे रूम पार्टनर होते. एके दिवशी रात्रीचे साडेनऊ-दहा वाजले असतील, मंग्या आणि मी त्याच्या पीसीवर गाणे ऐकत बसलो होतो. तेवढ्यात "ओ भाऊ, चला बाजूला व्हा, मला कॉम्प्युटरवर काम करायचे आहे" असा आदेश देतच नीलकांत रूममध्ये आला. काय काम आहे? विचारल्यावर तो म्हणाला की "वेबसाइटचे काम करायचे आहे." काय, कसली वेबसाइट, काय.. अशी आमची चौकशी सुरू झाली. "एक मराठी संकेतस्थळ बनवायचे आहे, जे पूर्णपणे मराठीमध्ये असेल, लेखक / कवी त्यावर आपले लेखन प्रकाशित करणार व इतर सदस्य त्यावर प्रतिक्रिया देतील असे संकेतस्थळाचे स्वरूप असेल."

यावर मी म्हणालो, "म्हणजे फोरम ना???"

"नाही रे.." म्हणत त्याने की-बोर्डचा ताबा घेतला व पेन ड्राइव्ह जोडून एक फाइल उघडली, एक marathi.po फाइल ओपन केली.
आज संकेतस्थळ उघडल्यावर जे मराठी शब्द (सदस्यनाव, संकेताक्षर, मिसळपावचे सदस्य व्हा, नवीन संकेताक्षर बोलवा, शीर्षक, लेखक, आवागमन, खरडफळा...) आपल्याला दिसतात, ते इंग्लिशला पर्यायी मराठी शब्द दिसण्यासाठी त्या फाइलचा वापर होतो.

चौदा वर्षांपूर्वी श्रीगणेश चतुर्थीला संध्याकाळी नीलकांत रूमवर आला. त्याने सांगितले की "आज आपली साइट मिसळपाव.कॉम ऑनलाइन झाली." म्हणजे काय म्हटले, तर म्हणाला की "ते तुम्ही फोरम म्हणता ते सुरू झालं आजपासून." यानंतर नीलकांत रूमवर वेबसाइटची कामे करत असताना कधीकधी थोडीफार मदत करत होतो. चर्चा मात्र नियमित होत होती, परंतु बराच काळ सदस्यत्व घेतले नव्हते. एक दिवस आपण केलेले बदल सामान्य सदस्याला कसे दिसणार / दिसणार की नाही, हे बघण्यासाठी मिसळपाव खाते उघडले. मिपाशी मी असा कळत-नकळत जोडला गेलो.

२०१३ साली मी ऑफिसच्या कामासाठी पॅरिसला गेलो होतो. सुटीचा दिवस असल्याने तिथे शिकत असलेल्या नातेवाइकाला (समीरला) भेटायचे होते. समीरने लक्झेंबर्ग स्टेशनजवळ भेटायचे सुचवले. दुपारची वेळ होती. मी स्टेशनवर थोडा आधीच पोहोचलो. त्यामुळे समीरला फोन लावला आणि सांगितले, "मी स्टेशनवर पोहोचलो, तुला यायला किती वेळ लागेल?" त्याने सांगितले की "मला यायला कमीत कमी १५-२० मिनिटे तरी लागतील. तोवर तुम्ही स्टेशनवर न थांबता जवळच्या गार्डनमध्ये थांबा, मी तिथे पोहोचलो की फोन करतो." स्टेशनच्या बाहेर जाण्याचा मार्ग बघत होतो, तेवढ्यात समोरच एक काका दिसले. ते फोनवर बोलत होते.. "अगं.. माझी ट्रेन गेली.. मला यायला थोडा उशीर होईल." मराठी शब्द कानावर पडल्याने बरे वाटले. थोडा समोर जाऊन नमस्कार करून बोलायला सुरुवात केली. थोड्याफार गप्पा व प्राथमिक चौकशी झाली.

गप्पा चांगल्या रंगल्या होत्या, तेवढ्यात काकांनी विचारले,
काका : तुम्हाला लिहिण्या-वाचण्याची आवड असेलच ना?
मी : नाही हो. फार काही आवड नाही. कधीतरी थोडेफार वाचतो. लिहिणे जमत नाही.
काका : इतक्या वेळा पॅरिसमध्ये आलास, इथली बरीच ठिकाणे बघून झाली. त्यावर तुला मराठीतून छान काही लिहिता येईल.
मी : नाही हो, मला काही लिहायला जमत नाही.
काका : मला एका मराठी वेबसाइटबद्दल माहीत आहे. तिथे तु तुझे फिरण्याचे अनुभव लिहू शकतोस, फोटोसुद्धा टाकता येतील.
मी : अरे वा..! मीही एका मराठी वेबसाइटसाठी काम करतो. पण कधी लिहीत नाही.
काका : कोणती साइट?
मी : मिसळपाव.कॉम
काका : कोण तू? (कंबरेवर हात ठेवून, आश्चर्याने माझ्याकडे बघत) नाव काय तुझं?
मी : प्रशांत.
काका: नाही. मिपावरचं नाव काय आहे?
मी : प्रशांतच आहे.
काका : टेक्निकल कामात मदत करता, ते प्रशांत का तुम्ही?
मी़ : हो.
काका : अरे,! मी शरद... माझं नाव चित्रगुप्त..
मी : अहो... मी तुमचे लेख वाचतो.

1
इतक्यात समीर तिथे आला. चित्रगुप्तकाकांशी त्याची ओळख करून दिली. तेवढ्यात काकांचा फोन वाजला. त्यांनी घरी सांगितले की "एक ओळखीचे भेटले, त्यामुळे यायला उशीर होतोय." फोन झाल्यावर काकांनी सांगितले की "पहिल्यांदा मी फोनवर बोलण्याची सोंग करत होतो. तू फोनवर मराठीत बोलत होतास, तेव्हा तुला कळावे की मी मराठी बोलणारा आहे."

परत गप्पा सुरू झाल्या. त्यादरम्यान काकांनी सांगितले की त्यांच्याकडे louvre चा पास आहे आणि सोबत दोन व्यक्तीसुद्धा नेऊ शकतात (तिकिटे काढायची गरज नाही). मग लगेच पुढच्या आठवड्यात आम्ही louvreला जाण्याचे ठरवले. याआधी मी तीन वेळा तिथे गेलो होतो, पण दोन तासांत बाहेर पडलो होतो. मात्र या वेळी तीन तास एकाच हॉलमध्ये थांबलो होतो. चित्रगुप्तकाका प्रत्येक पेंटिंगची कथा सांगत होते, रंगसंगती समजावून सांगत होते.

मिपा कट्ट्यात भरपूर लोकांची ओळख झाली, काही खूप चांगले मित्रसुद्धा झालेत. कट्ट्याला किंवा इतर काही कारणाने मिपाकर भेटतात/बोलतात, मिपावर कसे आले ते सांगतात, त्यांचे मिपाबद्दलचे अनुभव सांगतात.

कोणी मिपाकर भेटून सांगतो, "मी कामानिमित्त मित्र/परिवारापासून दूर जातो, तेव्हा मला मिपाचा फार आधार मिळाला, मित्र मिळाले, त्यामु़ळे मिपाचे आभार.." असे अनुभव आठवले की मिपाचे काम करण्यास उत्साह येतो.

तर मंडळी, तुमच्या मिपाच्या/मिपाकरांच्या काही चांगल्या आठवणी असतील त्या सांगा.

2

श्रीगणेश लेखमाला २०२०

प्रतिक्रिया

केडी's picture

1 Sep 2020 - 8:11 am | केडी

सुंदर आठवणी

वाहवा... तो सगळा प्रसंग डोळ्यासमोर हुबेहुब उभा राहिला. नंतर आपण फॉन्तेन्ब्लोला पण गेलो होतो.

प्रशांत's picture

1 Sep 2020 - 10:00 am | प्रशांत

हो आणि petit palace ला पण ...

fontainebleau
1

1

चित्रगुप्तांंचे लेख ( आणि चित्रे) आवडीने वाचतो.
--–-----------
मी मिपाकर आतिवास'ना पाहिलेलं नाही पण
Kite Runner - खालिद होसैनी याचे अफगाणिस्तान देशातल्या परिस्थितीवर आधारित पुस्तक वाचल्यावर
त्यांचे लेखन भीतीच्या भिंती आठवले.

कट्टे फेम मुक्तविहारि ऊर्फ मुवि डोंबिवलीतच राहात असल्याने त्यांच्या आग्रहाने कट्ट्यांना जाऊ लागलो व तिथे बऱ्याच मिपाकरांची ओळख झाली. खरं म्हणजे हॉटेलिंगची मला आवड नाही पण हजेरीने ओळखी होतात हे पटलं.
मागच्याच कट्ट्याला प्रशांत, नीलकांत, कुमार, यशोधरांना भेटलो.

रातराणी's picture

1 Sep 2020 - 10:40 am | रातराणी

मस्त झाली की तुमची आणि चित्रगुप्तकाकांची भेट!! लेख त्रोटक झाला आहे मात्र.. अजून किस्से हवे होते मिपाकरांचे.

किसन शिंदे's picture

1 Sep 2020 - 10:47 am | किसन शिंदे

लेख त्रोटक आहे याच्याशी सहमत

प्राची अश्विनी's picture

30 Sep 2020 - 6:25 pm | प्राची अश्विनी

अजून आठवणी हव्या होत्या.

किसन शिंदे's picture

1 Sep 2020 - 10:50 am | किसन शिंदे

२०१० ला पहिला मिपाकर भेटला, मिका! त्यापुढच्या दहा वर्षात मिपाने अनेक घनिष्ठ मित्र दिले. कैक आठवणी आहेत भटकंतीच्या.

कुमार१'s picture

1 Sep 2020 - 11:58 am | कुमार१

छान आठवणी आणि मिपाजन्माची कथा.

माझे आतापर्यंत पुण्यातील दोन कट्टे झाले -पहिला शनिवार वाडा आणि दुसरा पाताळेश्वर .
यानिमित्ताने मालक मंडळींना विनंती, की सर्व मिपाकट्ट्याचा वृत्तांत मुखपृष्ठावरून एका शीर्षकाखाली बघता येईल, अशी काही सोय करावी.

कंजूस's picture

1 Sep 2020 - 1:07 pm | कंजूस

मिपाकट्टे सूची.
मी २०१६ चे भटकंती लेख सूची काढलेली. त्यामध्ये त्यावर्षीचे आहेत.
लिंक http://misalpav.com/node/37993

चौथा कोनाडा's picture

1 Sep 2020 - 1:26 pm | चौथा कोनाडा

व्वा भन्नाट आठवण ! तर असं वातावरण होतं मिपा जन्माच्या वेळी !
प्रशांत, भारी लेखन !

चिगु साहेब चतुर आहेत, "आपल्या" माणसाला भेटण्यासाठी मस्त सोंग घेतले,
मलाही चिगु या थोर चित्रविभुतीला भेटायचे आहे.

मिपा जन्मा आधी ४-६ महिने मी माबो वर वाचन सुरु केले तेव्हा सुंदर अश्या मराठी संस्थळजगताची ओळख झाली !
वेळ मिळेल तेव्हा या जगात रमणे सुरु झाले. कुठून तरी मिपा सुरु झाल्याचे कळले आणि इथे कायमचा रमलो.

५-६ वर्षांपूर्वी मिपाकर झालो, लिहायला लागलो. मिपाकरांचा प्रतिसाद पाहून हरखायला झालं !
लवकरच प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५ या मिपा कट्ट्याला सपत्नीक उपस्थित राहायचा योग आला. कट्ट्याला खुप मजा आली.
मुवि साहेब, वल्ली, चौरा, कॅप्टन जॅक स्पॅरो, नाखु, एक्कासाहेब (डॉ सुहास म्हात्रे) मितान तै, त्रि-----------------वे--------------णी तै, आत्मागुरुजी, नितीन, झकासराव इ दिग्गजांशी ओळख झाली ! खुप मजा आलेली या कट्ट्याला !

मिपा बिना जिंदगीसे कोई, शिकवा तो नहीं, शिकवा नहीं
मिपा बिना जिंदगी भी लेकिन, जिंदगी, तो नहीं, ज़िंदगी नहीं

चौकटराजा's picture

1 Sep 2020 - 7:25 pm | चौकटराजा

माझ्या प्रोग्राम मधे एम्बेडेड इफ्स फार आहेत ...तरीही
लस आली तर...
ती परिणाम कारक व सुरक्शित असेल तर ...
मी "असेन" तर ...
दुर्गा टेकडी येथे एक कट्ट्टा पोस्ट कोविड होऊ शकतो .त्यासाठी कन्जूष काका व चित्रगुप्त याना चिंचवड मुक्कामी बोलावणे व डॉ म्हात्रे व कुमार १ याना मनविणे ई माझे कडे लागले ...
पाहू या .. कालाच्या पोटात काय दडले आहे.
बाकी .. प्रशान्त ने फार आवश्यक अशी आठवण मिपाकरासाठी लिहिली आहे त्याबद्द्ल ऋणात रहाणे योग्य !

चौथा कोनाडा's picture

1 Sep 2020 - 9:02 pm | चौथा कोनाडा

दुर्गा टेकडी येथे एक कट्ट्टा पोस्ट कोविड होऊ शकतो
+१

लस आली तर...
ती परिणाम कारक व सुरक्शित असेल तर ...
मी "असेन" तर ...

हे गंभीर असलं तरी हसु आवरले नाही !
आम्ही देखिळ असाच विचार करत असतो, म्हणत असतो :-)

दुर्गा टेकडी येथे एक कट्ट्टा

कुठे? सप्तश्रृंगीवर/ एनडीए? आहे का?
मेट्रो सुरु झाल्यावर त्यातही कट्टा करू. एक रिटर्न तिकीट काढायचे आणि त्याच डब्यात बसून राहायचे. एक तासाने बाहेर पडायचे.

चौकटराजा's picture

1 Sep 2020 - 9:20 pm | चौकटराजा

एकदा तुमच्या( व माझ्या ही ) स्टाईली ने तुम्ही या ( डोंबिवली ते आकुरडी प्याशेंजर ) तिकडून आग्रा ते पुणे चित्रगुप्त दुरोन्तो ने येतील ना ! दुर्गाटेकडी हे एम एच १४ मधील रम्य ठिकाणं आहे . चिंचवडकरांचे मॉर्निग वाक सेंट्रल पार्क !

चित्रगुप्त यंदा आमच्या अमेरिकेत आहेत :)

नावातकायआहे's picture

5 Sep 2020 - 9:26 am | नावातकायआहे

मस्त कल्पना!!

तुषार काळभोर's picture

1 Sep 2020 - 1:45 pm | तुषार काळभोर

रोचक भेटीची रोचक आठवण.
अजुन मिपाकरांना भेटण्याचा योग नाही आला.

एकदा अभ्या.. पुण्यातून सोलापूरला जाताना हडपसरला आवर्जून थांबला होता. पण मी नेमका सोनोरी गावात नातेवाईकांकडे होतो. अभ्या.. अर्धा तास वाट बघून गेला. अन् ते भेटणं राहून गेलं ते गेलंच. :( आधी तो एमेच १३ मध्ये तरी होता. आता अजून पलीकडं एमेच १४ मध्ये गेलाय.
दॅट वॉज द क्लोजेस्त एन्काऊंटर आय हॅड विथ a मिपाकर.

चौकटराजा's picture

1 Sep 2020 - 9:14 pm | चौकटराजा

अभ्या एम एच १४ त आलाय हे खरंय पण या क्रोणामुळे त्याची पेंटींग पाहायचा योग काही येत नाही !

टर्मीनेटर's picture

1 Sep 2020 - 1:47 pm | टर्मीनेटर

तर मंडळी, तुमच्या मिपाच्या/मिपाकरांच्या काही चांगल्या आठवणी असतील त्या सांगा.

आधी मला पण लेख थोडा त्रोटक वाटला होता पण शेवटचे हे वाक्य वाचले आणि लक्षात आले कि हा फक्त लेख नसून एक रिले रेस आहे, ज्यात स्वतःच मिपाकरांनी बॅटन घेऊन आपल्या मिपाकरांबाद्दलच्या आठवणी प्रतिसादात मांडायच्या आहेत.

मी प्रत्यक्षात फारच थोड्या म्हणजे मुक्त विहारी (मुवि काका), कुमार१ (डॉक्टर साहेब), कोमल आणि ज्योती अळवणी अशा चारच मिपाकरांना भेटलो असलो/भेटत असलो तरी व्यनी, व्हॉट्सॲप, ईमेल आणि फोनच्या माध्यमातून अनेक मिपा सदस्य आणि मिपा वाचकांच्या संपर्कात आहे.

दोन वर्षांपूर्वी मिपावर लिहिलेल्या इजिप्त सोलोट्रीप ह्या मालिकेमुळेहि अनेक नवीन मिपाकर/मिपा वाचक संपर्कात आले आणि आनंदाची गोष्ट म्हणजे त्यातील पाच जण प्रत्यक्षात इजिप्तला जाऊनही आले! मालिकेतील शेवटच्या भागावर कंजूस काकांनी प्रतिसादात लिहिले होते कि "प्रेरणा घेऊन मिपाकर तिथे जाणार हे निश्चित." त्यांचे शब्द खरे ठरले!

गेल्या वर्षीच्या श्रीगणेश लेखमाला आणि दिवाळी अंकाच्या कामात पहिल्यांदाच सक्रीय सहभाग घेतल्याने मिपाचे एकंदरीत काम कसे चालते ह्याचाही एक छान अनुभव मिळाला.

एका मिपाकराची अकाली एक्झिट मात्र जीवाला हुरहूर लाऊन गेली तो म्हणजे वरूण मोहिते. व्हॉट्सॲप आणि फोनवर आम्ही संपर्कात होतो पण अनेकदा ठरवूनही आमची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही.

असो... अनेकांना आपल्या आठवणी मांडायला प्रेरित करणारा हा लेख आवडला आणि चित्रगुप्त काकांचे अनेक लेख वाचले असल्याने तेही अनोळखी नाही वाटले!

लेख भारीच.. आणखीन तुझ्याकडे खुप साऱ्या आठवणी असतीलच...
मी मिपावर आलो ते 2007 सालीच... पहिल्या 1000 id मध्ये माझा id आहे..
पण मिपावर खऱ्या अर्थाने मी 2010 ला आलो..

नंतर कितीतरी मिपाकर, कविता लिहिणारे, लेखक यांच्या कथा वाचून भारी वाटत होते..

मग मिपा outing करणारे पहिले 3-4 कट्यात मी होतो, मग खादाडी पुण्याच्या कट्यात पण मज्जा यायच्या..

मुंबई ला कामाला असल्याने, मुंबईचे काही मिपाकर पण माझे मित्र झाले..
पण विकएंड पुण्याला असल्याने पुण्यात असंख्य मिपाकराना भेटलो..
खुप जणांना भेटलो.. खुप जणांशी बोललो..

येथे नावे मुद्दाम लिहीत नाही, कारण फक्त नावे लिहिण्यात मज्जा नाही..

काही मिपाकरांना मी भेटलो नाहि, पण त्यांच्या लिखांणानी, आपुलकीच्या शब्दांनी नेहमी मित्रासारखेच वाटते..

आपला सर्वात जवळचा मित्र झाला तो वल्ली..
आज फायनली भेटतो एकदाचे त्याला चहा प्यायला..
--
मध्यतंरी मी मिपावर नसल्याने खुप कट्टे मिस झाले, खुप लोकांशी बोलणे राहिले.. पण हरकत नाही..

जिंदगी अभी बाकी है..

महासंग्राम's picture

1 Sep 2020 - 2:24 pm | महासंग्राम

अरे जबरदस्त आठवणी असणारा धागा आहे हा

सोत्रि's picture

1 Sep 2020 - 4:37 pm | सोत्रि

झक्कास!

- (मिपाकर) सोकाजी

टीपीके's picture

1 Sep 2020 - 5:10 pm | टीपीके

छान

२००८ ऑगस्ट मधे मी इंग्लंडला गेलो, दोनच महिन्यांनी दिवाळी होती आणि ऑफिस मधे काम चालू होते. त्यादिवशी जरा लवकर निघायचं असा विचार होता. निघण्यापूर्वी म टा चाळत होतो त्यात मराठी संकेतस्थळे अणि त्यावरील दिवाळी अंक यावर लेख होता. तो पर्यंत मला अशी संकेत स्थळ आहेत हेच मिहिती नव्हतं.

त्या वेळी उपक्रम, मायबोली, मी पा यांची ओळख झाली तेव्हापासून इथेच आहे. मधे राजे यांनी मीमराठी असे स्थळ पण चालू केले होते, ते पण छान होते पण काही तांत्रिक कारणाने ते बंद पडले.

पूर्वीचे अनेक दिग्गज सोडून गेले, काहींनी लिहिणे बंद किंवा कमी केले पण आमचे वाचणे कमी नाही झाले.

अजूनतरी एकालाही भेटलो नाही बघू केव्हा योग येतो. :)

राजे, म्हणजे मिपावरचा दशानन...
बरेच वर्ष काही कॉन्टॅक्ट पण नाही.. विसरलो होतो मी पुर्ण..

टीपीके's picture

1 Sep 2020 - 8:00 pm | टीपीके

बरोबर, एकदम गायब झाले ते.

बेकार तरुण's picture

1 Sep 2020 - 6:22 pm | बेकार तरुण

मिपावर खाते २०१२ मधे उघडले... कॉलेजमधील एका मित्राने कळवले होते की त्याने तिथे लेख लिहिला आहे तो वाचुन अभिप्राय कळव... तोवर मला अशी काही संस्थळे असतात हेच माहित नव्हते.... पण खाते उघडले आणी ईथलाच झालो...फारसे लिहित नसलो तरी वाचत नक्कीच असतो....
काही आयडींना आधीपासुन ओळखत होतो त्यांची भेट अधुन मधुन घडते.... पण मिपावर ओळख झालेल्या कोणालाच अजुन भेटलेलो नाहीये...

पूर्वीचे अनेक दिग्गज सोडून गेले, काहींनी लिहिणे बंद किंवा कमी केले पण आमचे वाचणे कमी नाही झाले. >>> ह्याला +१००...

हा माझा पहिला कट्टा, अनिवासी हे परदेशी असणारे भारतीय यांच्या बरोबर भेटीचा योग आला. त्या बरोबर मोदक, कंजूस काका, प्रचेतस, नीलकांत यांच्या भेटीचा योग आला. पाहू पुन्हा कधी योग येतो.

अनिवासी कट्ट्याला त्यांच्याशी डॉ आणि इतर गप्पा मारत होते. मग मी, वल्ली आणि सगा गप्पा मारू लागलो आणि मोदक म्हणाला हे पाहा या तिघांनी आणखी एक मिनी कट्टा सुरू केला.
या पाताळेश्वराची भेटण्याची जागा, तो मोठा वडाचा पार मला फारच आवडला. तिथून शिवाजीनगर स्टेशन जवळच. सकाळी ९ लाच पोहोचू शकतो. परतीची ट्रेन तीनला. सातच्या आत घरात.

कपिलमुनी's picture

2 Sep 2020 - 2:20 pm | कपिलमुनी

बॉर

MipaPremiYogesh's picture

1 Sep 2020 - 11:48 pm | MipaPremiYogesh

मस्त आठवण..मी खूप वर्षांपासून मिपा सदस्य आहे पण अजूनही कोणाला भेंटण्याचा योग आला नाहीये. कुमार डॉक ह्यांच्याशी संपर्कात आहे आणि समीर सूर जो माझ्याच ऑफिस मध्ये आहे..मात्र मिपा रोज उघडतो कितीही busy असलो तरीही..पोस्ट covid कट्ट्याला अनुमोदन..

गणेशा's picture

1 Sep 2020 - 11:59 pm | गणेशा

समिर सूर.. विसरलेलो पार.
भेटलो नाही, पण बोलणे झालेले नंतर 2010-11 ला. hi सांगा माझा..

MipaPremiYogesh's picture

3 Sep 2020 - 6:36 pm | MipaPremiYogesh

सांगतो नक्की

प्रचेतस's picture

2 Sep 2020 - 3:46 pm | प्रचेतस

चित्रगुप्त काका आणि प्रशांतच्या अवचित भेटीचा किस्सा प्रशांतकडूनच ऐकला होता.

बाकी कितीतरी आठवणी आहेत मिपाकरांच्या भेटीच्या.

प्रत्यक्ष भेट झालेला पहिला मिपाकर म्हणजे ५० फक्त. तेव्हा ९/१०वर्षापूर्वी. जंगली महाराज रोडवर मी, ५०, मनराव आणि धमाल मुलगा असे चौघेजण भेटलो होतो. आणि नंतर भेटी वाढतच गेल्या असंख्य मिपाकर भेटत गेले. अगदी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. आधी कट्ट्यांचे स्वरुप म्हणजेच कुठेतरी २.३ तास भेटणे, गप्पा मारणे आणि खादाडी असे स्वरुप असायचे मात्र नंतर म्मुक्कामी भटकंती कट्टे होऊ लागले.

धन्या, किसना, बिरुटे सर, प्रशांत, बुवा, सहपरिवार एक्काकाका, सूड, प्रगो यांजबरोबर वेरूळच्या सहली झाली, धन्या, किसना सोबत अजिंठा पाहणे झाले, गणेशाची पाण्यात डुंबण्याची आवड कोरीगड आणि सांदण दरीतल्या कट्ट्यांमुळेच समजली, जवळपास २५/३० मिपाकरांसोबत घारापुरी दर्शनाचा दौरा पार पडला. १२/१५ मिपाकरांसोबत रायगडावर मुक्काम झाला. कितीतरी लेण्यांच्या अनवट मंदिरांच्या सहली मिपाकरांसोबतच झाल्या. पिंपरी दुमाला, लोणी भापकर, पेडगाव, कोथळे, माळशिरस, भुलेश्वर, पाटेश्वर अशी अनवट ठिकाणे मिपाकरांसोबतच झाली. नंतर नंतर् जाहीर कट्टे होण्याचे प्रमाण कमी कमी होत गेले मात्र आम्हा मिपाकरांचे कट्टे चालूच असतात.

MipaPremiYogesh's picture

3 Sep 2020 - 6:38 pm | MipaPremiYogesh

वल्लीजी कळवा कधी कट्टा करणार असल्यास. तुम्हाला भेटायचे आहे :)

प्रचेतस's picture

3 Sep 2020 - 7:03 pm | प्रचेतस

नक्कीच.

काहि मिपाप्रेमी मित्रांमुळे मिपाची ओळख झाली . पहिले बरेच दिवस वाचनमात्र आणी प्रतिसादमात्र होतो . जो पहिला लेख लिहिला ( https://www.misalpav.com/node/32435) त्यावर बरीच टिका झाली . अर्थात हि टिका सकारात्मकपणे घेतल्यामुळे काहि त्रास झाला नाही . पुढे आवडलेल्या लेखनाला मिपाकरांनी आवर्जुन दाद दिली . त्यामुळे मजा आली .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Sep 2020 - 7:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रशांतसेठ, चांगल्या लेख आठवणी. अनेक मिपाकरांना भेटलो आहे, मैत्रीही टीकली. आहे. कादंबरीचा विषय मी आणि मिपा.
मिपा पहिलं प्रेम,
शुभेच्छा...!

-दिलीप बिरुटे
(मिपाकर)

प्रचेतस's picture

4 Sep 2020 - 10:13 pm | प्रचेतस

-दिलीप बिरुटे
(मिपाकर)

कट्टर असा शब्द नसल्याने फाऊल.

डबल ब्यारल राहिलं का?

प्रचेतस's picture

5 Sep 2020 - 9:36 am | प्रचेतस

नै, ते दुसर्‍यांनी दिलेलं विशेषण होतं म्हणे.

प्रशांत's picture

5 Sep 2020 - 9:31 pm | प्रशांत

या मागची स्टोरी काय आहे.

# अभ्यास कमी पडतो :(

प्रचेतस's picture

5 Sep 2020 - 10:43 pm | प्रचेतस

लो कल्लो बात..!

हे तुम्ही म्हणणं म्हणजे .......

बऱ्याच लेखक मिपाकरांची ( एक सोडून) भेट झाली आहे.

प्रत्यक्षात मिपाकराना भेटलो नाहीये पण "मिपाकरांच्या चांगल्या आठवणी" जमवायला त्याची काही गरज भासली नाहीये कारण प्रत्यक्ष भेटीच्या नाहीत तरी त्यांच्या चांगल्या लिखाणाच्या खूप आठवणी आहेत. भेटलो नाही तरी काहितरी संपर्क झालेल्या, हल्ली न दिसणार्‍या मंडळींबद्दल सांगायचं तर - पाककृतींचं उत्कृष्ठ सादरीकरण करणारा गणपा, सुरेख कविता लिहीणारा पुष्कराज, बेदरकारपणे टोप्या उडवणारा टारझण, जगन्मित्र धमाल मुलगा, सगळेच आंतरजालीय लिखाणाच्या बाल्यावस्थेत असताना "यावर तुमच्याशी चर्चा करायच्येय" या धर्तीचे प्रतिसाद कसे लिहावेत वगैरे झकास लिहिणारा छोट डॉन, "आओ कानसेन"ने सगळ्याना गुंगवणारा बहुगुणी, "श्रीवर्धन की मनरंजन" सारखे शब्दांचे खेळ करणारा नंदन, उत्तमोत्तम लिखाण करणारे रामदास/सन्जोप राव, अफलातून चित्रपट परिक्षण लिहिणारा फारएण्ड, रत्नागिरी/गोव्याबद्दल लिहिणारी पैसा, रेवती/चतुरंग, मक/निदे ......ही चटकन आठवलेली नावं, बरेच आहेत असे अजून..... कुठे उलथलेत कोणास ठाऊक. जहां भी हो, बस खुष रहो :-)

एक झकास आठवण - गविने कुठल्याशा अंकात सुरेख कथा लिहिली होती, त्याच्या नावाने. ती वाचून मी गविलाच "जरूर वाच, तुझ्याच फिल्डमधली आहे त्यामुळे जास्त अपील होईल" सांगितलं होतं. मग 'असा मी असामी'तला प्रसंग प्रत्यक्षात घडला - "वाचल्येय? हॅ हॅ हॅ हॅ.... *मीच* लिहिल्येय" !!!!

एक दुखरी आठवण. 'भोचक'ला http://bhochak.blogspot.com/2009/09/blog-post_4807.html काय सुरेख आहे सांगायचं राहून गेलं. :-( बाय द वे, त्याचा ब्लॉग जरी अजून असला तरी एक अतिशय संतापजनक प्रकार झालाय त्यावर - कोणा हॅकरने तो रिडायरेक्ट केलाय. क्रोम मधे Settings > advanced > Privacy and security > Site settings > content > javascript वर जाऊन bhochak.blogspot.com ब्लॉक लिस्ट मधे टाका म्हणजे वाचता येईल.

टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

प्रतिसादात उल्लेख केलेल्या मिपाकर्स पैकी: गणपा, टारझण, धमाल मुलगा (धम्या), छोटा डॉन, रामदास, पैसा आणि गवि यांना भेटण्याचा योग आला.

धम्या, ईनोबा, डॉन, आंद्या आणि कांता यांना आठवड्यातुन २/३ वेळा तरी डेक्कन जवळ असलेल्या कॅफे पॅराडाईजला भेटायचो, गप्पा फक्त मिपाच्याच तर कधीतरी पुस्तकविश्वच्या. विकांताला धम्याच्या घरीसुद्धा बरेचदा भेटायचो.. धम्याला तेव्हा

खरडसम्राट

म्हणायचे.
प्रतिसादात धम्याच नाव वाचुन एक किस्सा आठवला....

२००८/०९ ची गोस्ट असेल. रात्रीचे अकरा वाजले असतील. फोनची रिंग वाजली, स्क्रीनवर नाव होते कैवल्य.... फोन उचलला.
समोरुन: पशा झोपला होता का ?
मी: हो.
समोरुनः अरे विद्यापिठाजवळ आहे आणि माझी गाडी बंद पडली..
मी: हो का?
समोरुनः इथुन रिक्षा मिळेल का?
मी:हो.

आणि कॉल कट कट केला. मला हा कैवल्य कोणं आहे आठवतच नव्हतं.... नंबर तर सेव्ह केलाय पण याला मी ओळखत का नाही.. तोवर परत फोन वाजला आणि माझी ट्युब पेटली.. अरे हा तर धम्या....

धम्या.. (शिव्या देवुन सुरुवात) मग खात्री झाली... गप गाडी काढ, विद्यापिठ गेट जवळ ये आणि मला घरी सोड...

मी जवळच अशोकनगरला राहत असल्याने १०/१५ मिनिटात तिथं पोहचलो आणि धम्याला घरी सोडलं.

झालं असं होतं कि साहेबांना पहिल्यांदा भेटलो, ओळाख झाली तेव्हा कैवल्य नाव सांगितलं होतं. त्यानंबर १०० वेळा तरी भेटलो असेल पण नेहमी धम्या.. च म्हणायचो.

गणपाच्या भेटी बद्दल नंबर लिहतो...

मिपाला २०१४ नंतर फारच गळती लागली. तरीही शंभरच्या आत युजर आइडी असणारे मिपाकर अजूनही बुरुजावर उभे आहेत. ( प्रॉडॉबिरुटे आणि प्रकाश घाटपांडे )

मिपाकरांना प्रत्यक्ष भेटलो तो कात्रज कट्ट्याला. २००८ मधे.
बारामतीवरून तेथे गेलो होतो. तोवर या मंडळींना फक्त वाचत होतो.
पण भेट झाल्यावर वय वगैरे सगळ्या गोष्टी विसरून गेलो.
त्या दिवशी खूप पाऊस पडला होता. मित्राकडे जाणार होतो तो पावसामुळे येवू शकत नव्हता.
डॉ दाढेंनी ना पहिल्यांदाच भेटत होतो तरीही दिलखुलासपणे घरी नेले. एका अनोळखी माणसाला एकदम ओळखीचा बनवायची ही कला मिपाचीच.
त्या नंतर धम्या डान्या अंद्या हे सगळे भेटत राहीलो. धम्याच्या लग्नाला तर वरातीत गेल्यासारखे गेलो होतो.
मिपा कर हे घरचेच झाले आहेत.