आठवणीतलं पत्र..!

अंकुश इंगळे's picture
अंकुश इंगळे in काथ्याकूट
15 Jun 2020 - 11:29 am
गाभा: 

प्रिय मंगेश,
तुझे पञ वाचले..काय उत्तर द्यावे ते कळतच नव्हतं..स्पेशली मला कुणीतरी लिहीलेलं हे पहिलच पञ..आणि मी दहावीच्या परिक्षेत लिहीलेल धरून हे माझं दूसरं पञ.. .बराच विचार केला काय बरं लिहावं...काय उत्तर द्यावं..काही सुचत नव्हते..त्यामुळेच उत्तर द्यायला उशीर झाला...त्याबद्दल क्षमस्व वगैरे काही म्हणत नाही...तुझं पञ वाचून जे काही मनात आलं..मला जे वाटलं..ते या पञात लिहीलं मी..प्लीज समजून घे..

तू पञात म्हटलेस त्याप्रमाणे मी तुझ्यावर रागावणार वगैरे नाही. एवढी रागीट स्वभावाची वाटते काय मी तूला...? मी तुला आवडते यात रागावण्यासारखे काय आहे.उलट एखाद्यास आपण आवडतो ही भावना मनाला किती सुखद असते. आपण चांगल राहतो..छान कपडे घालतो..मेक अप करतो...कशासाठी..? आपण इतरांना आवडावं म्हणुनच ना..पण खर सांगते तुला..मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी कुणाला तरी आवडत असेल..तुझं पञ वाचल्यावर मला विश्वासच बसला नाही. तू म्हणालास की माझी प्रत्येक गोष्ट तुला आवडते..मग मी विचार करत बसले की काय बरं आवडत असेल याला आपल्यात. आपल्या वर्गात एवढ्या सुंदर मुली असताना माझ्यात काय दिसलं असेल बरं याला..? खोट सांगत नाही..तुझं पञ वाचल्या नंतर मी बराच वेळ आरश्यात बघतं बसले...खरचं मी सुंदर वगैरे आहे की काय ते पहायला..? पण आजपर्यंत एकाही मैञीणीने असं काही सांगीतल्याच आठवत नाही मला..मलाही तसं काही वाटत नाही..खरचं कुणाला काय आवडेल आणि काय नाही याचा नेम नसतो बुवा..मला नेहमी जुनेच कपडे घालायला आवडतात..कपडे जेवढे जुने होतील तेवढा माझ्या त्यात जास्त जीव जातो..मला नव्याचा तिटकारा..घरचे सगळे म्हणतात तूला काही चांगल्याची नजरच नाही...तुझी आवड जगावेगळीच आहे. मला याबाबतीत तरी तू माझ्यासारखाच वाटतोस. आपल्या क्लासमधे, कॉलेजमधे एवढ्या सुंदर असताना तुला आवडली कोण तर मी..वा रे वा तुझी आवड..अरे ती रोहिणी नाही आवडत का तुला...किती सुंदर आहे ती..अख्ख कॉलेज मरतं तिच्यावर..आणि तू बसला माझ्याकडे बघत..पण मस्करीचा भाग सोडला तर खरंच सांगते तूझे पञ वाचून खूप छान वाटले. मी तुला आवडले आणि ते तू मला पञातून सांगीतलेस त्याबद्दल खरच मन:पूर्वक आभार मंगेश...

आता राहिला प्रश्न माझ्या उत्तराचा. मंगेश आम्हा मुलींना सिस्क्थ सेंन्स असतो बरं का. एखाद्या मुलाच्या मनात काय चालले आहे हे कळायला आम्हाला फारसा वेळ लागत नाही. नजर आणि हावभावातून ते लगेच कळत. परंतू काय समजलं ते सांगायच नसतं. आणि त्यातल्या त्यात तुझा चेहरा तर असा बोलका आहे की मनात काय चाललय त्याच प्रतिबींब तुझ्या चेह-यावर पडतं. त्या प्रतीबिंबाचा अनुभव मी बरेचदा घेतलाय. कितीदा तू बोलायचा प्रयत्न केलास पण तुझी काही हिंमत झाली नाही समोरा समोर बोलायची. मला हसायला यायच तुझी ती तगमग बघून..हे पञ सुद्धा क्लासमधे कुणी नाही अशी वेळ पाहून नुसते माझ्या डेस्कवर ठेऊन दिलेस.. माझ्या नजरेला नजर न भिडवता..कसला घाबरलेला होतात तू..चेहरा तर गोरामोरा पडून अगदी पाहण्यासारखा झाला होता..तूझ्या छातीच्या ठोक्यांची धडधड जणू स्पष्ट ऐकायला येत होती..तुझं पञ वाचून मी सरांकडे कंप्लेंट करेल..माझ्या घरच्यांना सांगून सगळ्या कॉलेसमोर तुझ्या ईज्जतीचा पंचनामा करेल असचं वाटलं ना तुला..? तू पञात लिहीलं देखील आहेस "तुझं माझ्यावर प्रेम नसलं तरी चालेल मला..पण प्लिज कोणाला सांगू नकोस..? नसेल तर नसेल आवडत मी तुला..माझी काहीच हरकत माही पण माझ्या प्रेमाची खिल्ली उडवू नकोस...माझ्या प्रेमाचा बाजार जगासमोर मांडु नकोस..." म्हणून तू त्या दिवशी दूपारीच कॉलेज बंक केलेस ना...पुढचे दोन दिवस कॉलेजला पण दिसला नाहीस..माझी नजर तुलाच शोधत होती..तू दिसला नाहीस..तुझी नेहमीची सोबती सायकल दोन तीनदा सायकल स्टँडला जाऊन बघीतली पन ती सूद्धा दिसली नाही...आणि हो तुझा तो जीग्री दोस्त संदिप तेवढा दिसला..त्यानेही मी दुरून येताना दिसताच रस्ता बदलला..त्याने कॉलेजचा रिपोर्ट तुला घरी सविस्तर दिलाच असेल याची मला खाञी आहे..

मंगेश एवढी उथळ वाटली का तुला.? एवढी नादान..? तुझ्या प्रेमाची खिल्ली कशी उडवू शकेल बरं मी..?
अरे तू ज्या पद्धतीने प्रेम व्यक्त केलेस..ते शब्द वाचून मीच काय जगातली कोणतीही मुलगी प्रेमात पडेल..मग तुझ्या प्रेमाचा बाजार कसा बरं मांडेल मी..? प्रेम काय ठरवून होतं..? आपल्याला काय कुणी ठरवून आवडतं..? जे मनाला भावलं ते आवडलं..? त्यात गैर ते काय..? प्रेम ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे..माणसच काय जनावरं देखील प्रेम करतात..? आई मुलावर प्रेम करते..भाऊ बहिणीवर करतो..आजी नातवावर करते..शिक्षक विद्यार्थ्यांवर करतो..हे सर्व चांगल आहे..मग एका मुलाने मुलीवर आणि मुलीने मुलावर केलेलेच प्रेम वाईट का असते..? बरं तसच काही असतं तर देवाने ही भावनाच का दिली असती..? बरं प्रेमात पडताना काय ते जात पात पाहून पडावे की काय..? मला तुझ्या भावना कळतात मंगेश..मी सुद्धा तुझ्याच वयाची आहे..तुझ्या मनोविश्वाशी मी रिलेट करू शकते...माझ्यावर विश्वास ठेव..तुझ्या भावनांना..प्रेमाला ठेच पोहचेल असं माझ्याकडून कधीही घडणार नाही..हवं तर तस वचन देते मी..काळजी करू नकोस..

बरं मी तूला कधीपासून आवडायला लागल ते तू सांगीतलच नाही...? सिनेमातल्या सारख 'तुझे देखा तो ये जाना सनम..' वगैरे टाईप तर नाही ना..मंगेश, तू म्हणतोस त्याप्रमाणे मी तुझ्याबद्दल काही गैरसमज वगैरे करून घेणार नाहीये..उलट तुझ्या प्रतीचा मनातला आदर आणखीच वाढला..प्रेमाच्या या सुंदर भावनेस तू ज्याप्रमाणे व्यक्त केलेस ते खरच खूप छान आहे..फक्त एक कविता पाहिजे होती पञात..हो की नाही..? इतर वेळेस एवढ्या छान छान कविता करतोस आणि प्रेमपञात कविता नाही..? हे बात कुछ हजम नही हुई बाबु मोशाय..हे काही पटलं नाही बुवा आपल्याला..तसही म्हणा प्रेम तूझ्या कवितेत कधी डोकावतच नाही...त्या नेहमीच बंडखोर असतात..बहुदा तर त्या शेती मातीच्याच असतात...तू वरून शांत दिसत असलास तरी तूझ्या मनात सुरू असलेलं वादळ कवितेत उतरतं..शेवटी शेतकरी पुञ तू..च्यात शेती माती तर येणारच...तुझी ती 'पेटलेलं स्वप्न' नावाची कविता मला फारच आवडली होती..कवितेतील बंडखोर नायक म्हणून तुझ माझ्या डोळ्यासमोर आला होतास..कारण वर्गात नेहमी शांत असणारा तू त्या दिवशी फि वाढवण्याच्या विषयावर किती चिडला होतास खुद्द प्राचार्य सरांवर..बापरे...मला तेव्हा तूझ नव रूप दिसलं..आणिनआवडल देखील..अन्यायाला विरोध केलाच पाहिजे...

मंगेश, पञ जास्तच लांबत चाललय..वाचताना तुला बोरींग पण होईल..तुझ्यासारखी मी कवी बिवी नाही ना..शेवटी तुला एकच सांगते..माझं तुझ्यावर प्रेम आहे की नाही हे मला खरच माहिती नाही..पण तू मला नक्कीच आवडतोस..ते मिञ म्हणून की प्रेम म्हणून ते माञ सांगू शकत नाही...ते काळच ठरवेल...तू म्हणतोस की तुझ्या मनात नेहमी माझेच विचार असतात..अभ्यासातही तुझ मन लागत नाही..म्हणून माझा एक कळकळीचा सल्ला आहे...प्लीज अस काही होऊ देऊ नकोस..प्रेम ही खूप सुंदर भावना आहे हे मला नक्कीच मान्य आहे. पण आता त्यापेक्षाही महत्वाचा अभ्यास आहे. करियर आहे. तू हुशार आहेस. मेहनती आहेस. तूझ्या घरची परिस्थीती सुद्धा मला माहित आहे.प्रेम नक्की करावं..पण अभ्यासाकडे दूर्लक्ष होता कामा नये..माझ्यामुळे तुझ्यासोबत अस काही होत असेल..माझ्यामुळे तुझं अभ्यासातलं मन विचलीत होत असेल तर त्याच मला फार वाईट वाटेल..कृपया असं काही होऊ देऊ नकोस..हवं तर ही मी मागीतलेली प्रेमदक्षिणा समज..पण प्लिज अभ्यासावर फोकस कर..प्रेम करण्यासाठी अख्ख आयुष्य पडलेलं आहे..पण हे दिवस अभ्यासाचे दिवस परत येणार नाहित...म्हणून आधी अभ्यास..प्रेम वगैरे नंतर..

मंगेश मी तुझ्या प्रेमाचा स्विकार केला नाही असं मुळीच नाही..परंतू रूढी परंपरांचे..समाजाचे आणि घरादाराचे बंध तोडण्याची हिंमत माझ्यात नाही..आयुष्याच्या सरळ सोप्या वाटेवर चालणारी मी.. हे प्रेमाच वादळ अंगावर घेण्याच सामर्थ्य माझ्यात नाही..मला तुझं होता आलं असतं तर नक्कीच आनंद झाला असता...पण आपल्या दोघांच्याही वाटा भिन्न आहेत..अख्खा समाज या वाटांमधे उभा आहे...त्यांना विरोध तर सोड साधं त्यांच्या नजरेला नजर भिडवण्याच अवसान माझ्यात नाही...माझा संघर्ष वेगळा आहे आणि तुला तर संघर्ष काही नवा नाही..आणि म्हणूनच मी तुला मिञ मानेल..तूझी हरकत नसेल तर..आणि हो समजा मी मानलं तर आपल्या त्या मैञीत प्रेम नसेल का..? नक्कीच असेल...मैञी एवढ सुंदर नात तर जगातही नाही..हो की नाही...

मंगेश, तुझं हे पञ मला आजवर मिळालेल्या गिफ्ट पैकी सर्वात सुंदर गिफ्ट आहे..माझ्या मनाच्या सर्वात सुंदर कप्प्यात तुझी आणि या पञाची आठवण सदैव असेल..विसरलास तर तुच मला विसरशील...कदाचित हसशीलही की कॉलेजमधे असताना आपण हिच्या प्रेमात कसे काय पडलो असणार..तेव्हा तू कुठेतरी मोठा इंजीनीयर नाहीतर एखादा ऑफीसर असशील..तूला सुंदरशी बायको असेल..संसार असेल..माझी बिचारीची कशाला आठवण येईल तुला मग..नाही का..?

बरं पञ खुप लांबतेय..पुरे करते आता..आता जोरदार अभ्यासाला लाग...तू कॉलेजमधून पहिला आलेला पाहायचय तुझ्या या मैञीणीला...नक्की हां..ये वादा रहा..

- तुझीच मेघना

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Jun 2020 - 12:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पहिला भाग कुठेय ? बाकी काहीही म्हणा तुमच्या मैत्रीणीने अतिशय सुंदर पत्र लिहिलंय. अतिशय सुंदर स्केवर कट मारला आहे. मैत्रीण राहीन, प्रेम आहेच. पण आयुष्यभराच्या सोबतीचं काही ग्रहित धरु नको. अहाहा...! उच्च.

आता सध्या या स्टोरीचं एंड काय आहे ? तिच्या वाट्सॅपच्या स्टेटसवर तिचा बंगला, मुलं, परदेशी टूरवरचे बोटीवर पती-पत्नीचे नृत्य असलेले फोटो. आणि अधुन-मधून तुझी आठवण येते रे...! बस राहीलेलं आयुष्य ढकलायला इतकं पुरेसं असतं.

सविस्तर कसं काय लिहा.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

18 Jun 2020 - 2:58 pm | प्रचेतस

हे काल्पनिक पत्र आहे का? की नावे बदलून लिहिलेले आहे?

शा वि कु's picture

18 Jun 2020 - 3:21 pm | शा वि कु

एकदाच घरी त्याच्या येऊनिया गेली
चांदण्यांचे ढीग सारे पसरून गेली
आवरण्यासाठी पुन्हा फिरकली नाही
मग त्याने तिला कधी माफ केले नाही!

तापलेले अंग त्याचे, पट्टी भाळावर
कंटाळ्याचा लाल ज्वर होता डोळ्यावर
कपाळाला लावूनिया गार गार हात
तिनेच ना केली होती सारी सुरुवात !
म्हणाली की "निज आता, कुठे जात नाही"
विश्वासून मग डोळे मिटले त्यानेही
जाग आली तेव्हा तिथे नव्हते कुणीही
मग त्याने तिला कधी माफ केले नाही!

चित्र घेऊनिया आली, त्यातही तेच
मोर नव्हताच त्यात... केवळ पिसेच!
म्हणाली की 'पावलांचे इमान असेच
जमिनीशी उरतात केवळ ठसेच !
तुझ्याघरी ठसा माझा एवढा असू दे
हातातून हात मग असू दे... नसू दे!'
बोलली कोड्यात, त्याला समजले नाही
मग त्याने तिला कधी माफ केले नाही

हलकेच जाता जाता जशी चांदरात
तिला पकडले त्याने त्याच्या उसाश्यात!
त्याने ठेवलेले तिचे स्वतःपास प्राण
तिला लगडून गेले त्याचे भलेपण!
वर्षवर्ष काही आता गाठभेठ नाही
तो हि नव्हे सुखी, तरी दुःखी सुद्धा नाही
कुणाचेच तसे काही अडलेले नाही,
पण त्याने तिला कधी माफ केले नाही!

पत्र सुरेखच. हि संदीप खरेंची कविता जणू मंगेशसाठीच लिहिलीये.