भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ३ - सद्गुरू: प्रकरण ९ - मौन आणि सत्संग महात्म्य

मूकवाचक's picture
मूकवाचक in जनातलं, मनातलं
13 Jun 2020 - 11:52 am

या प्रकरणात आंतरिक मौन तसेच सत्संगाचे महात्म्य या विषयीचा भगवान रमण महर्षींचा उपदेश आपण जाणून घेणार आहोत.

डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा गोषवारा असा आहे:

रमण महर्षी साधकांच्या प्रश्नांची उत्तरे देताना आनंदाने आणि सहजस्फूर्तपणे शाब्दिक उपदेश देत असत. शाब्दिक उपदेश देत असले तरी महर्षी न चुकता एका गोष्टीकडे लक्ष वेधून घेत असत की त्यांची मौनाद्वारे दिली जाणारी दीक्षाच शाब्दिक उपदेशांच्या तुलनेत कित्येक पटीने सामर्थ्यवान आणि थेटपणे परिणाम घडवून आणणारी अशी उपदेश करण्याचीच एक अनोखी पद्धत होती. महर्षींचा 'मौन उपदेश' त्यांच्या देहातून सतत उत्सर्जित होत असलेल्या एका अत्यंत प्रभावशाली अध्यात्मिक शक्तीच्या स्वरूपात दिला जात असे. या मौन दीक्षेचे सामर्थ्य इतके अलोट होते, की महर्षी तिला आपल्या उपदेशाचा सर्वोच्च प्रभावशाली आणि सगळ्यात थेट असा मार्ग मानत असत. मनःसंयम कसा साध्य करावा या विषयी शाब्दिक उपदेशाचा भडिमार न करता ते अगदी सहजगत्या अत्यंत निबीड मौनस्वरूपात असलेल्या एका शक्तीचे उत्सर्जन करत असत. या शक्तीच्या प्रभावामुळे त्यांच्या सान्निध्यात आलेल्या कित्येक साधकांना, अगदी मुक्या प्राण्यांना देखील मनःशांतीची थेट अनुभूती मिळत असे. या शक्तीशी एकतानता साधायला शिकलेल्या कित्येक साधकांनी असे नमूद करून ठेवलेले आहे की त्यांना विनासायास लाभलेली असीम शांती तसेच आपण पूर्णपणे 'स्वस्थ' असल्याची अनुभूती या स्वरूपात महर्षींच्या मौन दीक्षेची प्रचिती येत असे. काही उन्नत अवस्थेतल्या आणि परिपक्व साधकांमधे ही प्रचिती प्रगाढ आणि स्थिर होत गेल्याने त्यांना थेट 'पहावे आपणासी आपण' अशी अनुभूती येत आत्मलाभही घडत असे.

भारतात मौन दीक्षेची एक प्राचीन अशी परंपरा आहे. साक्षात शिवस्वरूप असलेल्या विख्यात गुरू दक्षिणामूर्तिंकडून अशी दीक्षा दिली जात असे. दक्षिणामूर्तिंनी अत्यंत व्युत्पन्न आणि विरक्त असूनही वैचारिक गोंधळात अडकलेल्या चार सनत्कुमारांना मौन दीक्षेद्वारे आत्मलाभ घडवून दिल्याची कथा सर्वज्ञात आहेच. महर्षी नेहेमी दक्षिणामूर्तिंचा अत्यंत आदरपूर्वक उल्लेख करत असत. दीक्षा या विषय निघाला की त्यांच्या संभाषणात दक्षिणामूर्तिंविषयी उल्लेख हमखास येत असत.

आपले ध्यान आत्मस्वरूपावर किंवा रमण सद्गुरूंच्या बाह्य रूपावर केंद्रित केलेल्या कुठल्याही साधकाला या मौन दीक्षारूपी शक्तीचा प्रत्यय घेता येतो. यात स्थळ, काळ आणि परिस्थितीचा अडसर कधीच येत नाही. गुरूकृपेकडे अवधान देण्याच्या क्रियेलाच महर्षी 'सत्संग' असे म्हणत असत. सत्संग या शब्दाचा शाब्दिक अर्थही (मनाने) सद्गुरूंच्या संगतीत राहणे असाच होतो. रमण महर्षी अगदी मनःपूर्वक सत्संग साधनेला अनुमोदन देत असत. ते नि:संदिग्धपणे असे प्रतिपादन करत असत की आत्मानुभूतीचा थेट अनुभव घेण्यासाठीचा सत्संग हा एक अत्यंत सहज आणि सोपा असा जणू राजमार्गच आहे. पारंपारिक दृष्ट्या आत्मसाक्षात्कार झालेल्या व्यक्तीच्या सहवासात राहणे असा सत्संगाचा अर्थ घेतला गेलेला असला तरी रमण महर्षी मात्र सत्संगाची व्याख्या खूपच विस्तृत अर्थाने घेत असत असे स्पष्टपणे दिसून येते. महर्षी सांगत असत की मन सद्गुरूंच्या किंवा ईश्वराच्या ठायी जडून राहणे हा सत्संगाचा सगळ्यात महत्वाचा घटक आहे, त्यामुळे महर्षी अशी खात्री देत असत की देहधारी सद्गुरूंच्या किंवा एखाद्या बाह्य प्रतिकाच्या सान्निध्यात असल्यानेच सत्संग घडतो असे नव्हे; तर स्थळ, काळ आणि वेळ यांची तमा न बाळगता मनोभावे कुठेही आणि कधीही सद्गुरूंचे स्मरण केलेत, तर तुम्ही सत्संगच साधत असता अशी खात्री बाळगा.

प्रश्नः (वयाच्या सतराव्या वर्षी सर्वसंगपरित्याग करून अरूणाचल पर्वतावर वास्तव्य केलेल्या रमण महर्षींनी शेवटचा श्वास तिथेच घेतला. अत्यंत साधे आणि संयत जीवन जगत ते तिथेच राहिले.) भगवान देशोदेशींचा प्रवास करून प्रवचने देत व्यापक अर्थाने मानव समाजाला सत्याचा उपदेश का करत नाहीत?

रमण महर्षी: मी तसे करत नाही असे आपल्याला का बरे वाटते आहे? व्यासपीठावर उभे ठाकणे आणि उपस्थितांवर प्रवचनबाजीचा भडिमार करणे अशा पद्धतीने ही शिकवण देता येईला का? खरा उपदेश मौन राहूनच देता येतो, कारण त्यात ज्ञानाचे साधे सोपे असे मनोगत थेटपणे अंत:करणापर्यंत पोचवले जाते. एखाद्या व्यक्तीने चांगली तासभर प्रवचनबाजी ऐकली, आणि तिच्या जीवनाच्या प्रवाहाची दिशा बदलेल असा कुठलाही प्रभाव न पडताच ती तेथून निघून गेली, तर या प्रकाराला आपण काय म्हणाल? उलटपक्षी एखाद्या व्यक्तीने चार मोजकेच क्षण एखाद्या पवित्र सत्पुरूषाच्या उपस्थितीत सत्संगात घालवले, आणि तिच्या दृष्टीकोनात आमूलाग्र बदल होऊन ती तिथून मार्गस्थ झाली ... या दोन्हीत तुलना केली असता अधिक श्रेयस्कर काय आहे? ज्याचा कुठलाच प्रभाव पडत नाही असा पांडित्यपूर्ण उपदेश जोरजोरात करावा की मौन बाळगत आंतरिक शक्तीच्या सामर्थ्याला योग्य दिशेने मार्गस्थ करत रहावे?

तुम्ही हे अवश्य लक्षात घ्या, की वाणीचा उगम कसा होतो? सुरूवात नेहेमी अमूर्त अशा ज्ञानापासून होते. त्यातून अहंभाव निर्माण होतो, अहंभाव स्थूल स्वरूपातल्या विचारांना जन्म देतो आणि हे विचारच शब्दरूपात वाचेद्वारे प्रकट होतात. त्यामुळे उच्चारला गेलेला शब्द हा नेहेमीच उगमस्थानी असलेल्या अमूर्त ज्ञानाचा पणतू असतो. शब्दांचा देखील काही प्रमाणात का असेना प्रभाव पडताना दिसतो. तेव्हा आता तुम्ही स्वतःच या गोष्टीचा विचार करा की मौनातून दिला गेलेला उपदेश हा शाब्दिक उपदेशाच्या तुलनेत किती पटींनी प्रभावशाली असेल!

प्रश्नः मौन इतके सामर्थ्यवान कसे असू शकेल?
रमण महर्षी: आत्मज्ञान झालेल्या व्यक्तीकडून अध्यात्मिक प्रभाव असलेल्या लहरी प्रक्षेपित केल्या जातात, त्यामुळे सत्प्रवृत्त असलेले लोक अशा व्यक्तीकडे आपोआप आकृष्ट होतात. तरीही बाह्यतः मात्र अशी व्यक्ती एखाद्या गुफेत पूर्णपणे मौन अवस्थेत बसलेली दिसू शकते. 'अध्यात्मिक सत्य' या विषयीची प्रवचने आपण हवी तितकी ऐकू शकतो, पण ती ऐकूनही मूळ विषयाला गवसणी घालण्याचा दृष्टीने त्यांचा फारसा उपयोग होत नाही. उलट आपल्या वैचारिक गोंधळात मात्र भर पडते आहे असे लक्षात आल्यावर आपण हात हलवत परत जातो. या उलट आत्मज्ञान झालेल्या व्यक्तीच्या सान्निध्यात आल्याने अशा व्यक्तीने एखादा शब्द देखील उच्चारला नाही तरी मूळ विषयाचे आकलन कित्येक पटीने चांगले होते. आत्मज्ञानी व्यक्तीला कधीच बाहेर पडून लोकानुनय करावा लागत नाही. गरज असेल तेव्हा इतर सत्पात्र व्यक्तींच्या माध्यमातून तिला आवश्यक ते कार्य करवून घेता येते.

गुरू शिष्याला जी शांतता प्रदान करतात, तिच्या योगे आत्मज्ञानाच्या प्रकाशात सारे काही लख्ख उजळून निघते. माया समूळ बेचिराख होऊन शेवटी विशुद्ध ज्ञानच शिल्लक उरते. आत्मसाक्षात्कारी सद्गुरूंची आणि सत्पात्र शिष्याची निव्वळ नजरानजर जरी झाली, तर मग तिथून पुढे बापुडवाण्या शब्दांचे काही कामच उरत नाही.

प्रश्न: भगवान दीक्षा प्रदान करतात का?
रमण महर्षी: मौन ही सर्वोत्तम आणि सगळ्यात सामर्थ्यवान दीक्षा आहे. तीच श्री दक्षिणामूर्ति देत असत. स्पर्श, दृष्टी इत्यादि प्रकारांनी दिलेली दीक्षा तुलनेने खालच्या पातळीवरची असते. मौन दीक्षेने साधकांच्या अंतःकरणात आमूलाग्र बदल घडून येतो.

शिष्यगण जेव्हा दीक्षेसाठी प्रार्थना करत, तेव्हा श्री दक्षिणामूर्ति मौन बाळगत असत. दीक्षा देण्याचा हा सर्वात श्रेष्ठ मार्ग आहे. त्यात इतर सगळ्या प्रकारांचा समावेश होतो. इतर दीक्षा पद्धतींमधे दाता आणि याचक असे नाते असणे अनिवार्य असते. आधी दात्याने काही द्यावे लागते आणि मग त्याचा याचकाकडून स्वीकार केला जावा लागतो. देणारा आणि घेणारा असे दोघे अस्तित्वात असले तरच एकाने दुसर्‍याकडे कृपादृष्टी वळवणे, किंवा एकाने दुसर्‍याला स्पर्श करणे संभवते, नाही का? मौन दीक्षाच सर्वार्थाने परिपूर्ण असते; कृपादृष्टी, स्पर्श, उपदेश अशा सगळ्या गोष्टींचा तिच्यात समावेश होतोच. मौन दीक्षा साधकाला सर्वार्थाने निर्मळ करते आणि तो आपल्या (सच्चिदानंद) स्वरूपात स्थिर होतो.

प्रश्नः स्वामी विवेकानंद म्हणतात की अध्यात्मिक गुरू खूप मोठ्या प्रमाणावर अध्यात्मिकतेचे शिष्याकडे हस्तांतरण करू शकतात.
रमण महर्षी: अध्यात्म ही अशी एखादी वस्तू आहे का जी हस्तांतरित करता यावी? हस्तांतरणाचा खरा अन्वयार्थ असा असू शकतो की शिष्यातल्या अज्ञानाचा निरास करणे. त्याच्या मूळ स्वरूपावर असलेले आवरण दूर करणे. हे कार्य सद्गुरू करतात. मात्र या हस्तांतरणाचा अर्थ असा मात्र खचितच होत नाही की शिष्य ही एक वेगळीच व्यक्ती होती, आणि मग तिचे रूपांतरण होत ती कुणी वेगळीच अलौकिक व्यक्ती झाली.

प्रश्नः (आपण जिचा उल्लेख करता ती) नि:शब्द शक्ती आपले कार्य कसे करते?
रमण महर्षी: भाषा ही निव्वळ एका व्यक्तीचे विचार इतर व्यक्तींपर्यंत पोचवण्याचे संवादाचे माध्यम आहे. मनात विचार उद्भवतात तेव्हाच ती कामी येते. 'मी आहे' हा विचार सर्वात आधी प्रकटतो आणि मग त्याच्या अनुषंगाने बाकीची विचारशृंखला जन्माला येते. त्यामुळे 'मी आहे' हा विचारच सगळ्या संवादांमागचे मूळ कारण असतो. बौद्धिक विचार न करता एखादी व्यक्ती जेव्हा सच्चिदानंद स्वरूपात स्थिर राहते तेव्हा तिचे इतरेजनांविषयीचे आकलन विश्वव्यापी शांततेच्या माध्यमातून व्हायला सुरूवात होते.

मौनाला सतत काही सांगायचे असते, काही अभिव्यक्त करायचे असते. निरंतर प्रवाही असलेल्या मौनाच्या संततधारेत बोलण्याने व्यत्यय येतो. मी या क्षणी उच्चारत असलेले शब्द देखील मौन संवादातला अडसर बनत आहेत. एक उदाहरण देतो - एखाद्या तारेतून विद्युतप्रवाह खेळत असतो. या प्रवाहात अडथळा निर्माण केला, तर तो पंख्याचा स्वरूपात फिरायला लागतो किंवा दिव्याच्या स्वरूपात प्रकाशमान होतो. तारेत मात्र तो निरंतर विद्युत उर्जेच्या शुद्ध स्वरूपातच गतिमान असतो. तद्वतच मौन हा भाषेचा सतत वाहता असलेला प्रवाह असतो, तो शब्दांनी अवरूद्ध होतो.

कित्येक वर्षे सतत संवाद साधून आणि वितंडवाद घालूनही जे आकळत नाही, सतत हुलकावण्या देत राहते, तेच (अध्यात्मिक सत्य किंवा स्वरूप) मौन अवस्थेत किंवा अंतर्बाह्य मौन असलेल्या सत्पुरूषाच्या पुढ्यात उभे राहिल्यावर क्षणार्धात उमगून जाते. दक्षिणामूर्ति आणि चार सनत्कुमार हे याचे उत्तम उदाहरण आहेत. मौन ही सर्वश्रेष्ठ आणि सर्वोच्च सामर्थ्य असलेली भाषा आहे.

पुरवणी:
संजीवनी गाथेत प. पू. स्वामी स्वरूपानंदांनी आंतरिक मौनाचे वर्णन असे केले आहे:

कैचा भक्त कैचा देव |
हरिरूप झाले सर्व ||

देव-भक्ता पडे मिठी |
अंतर्बाह्य जगजेठी ||

सर्वा ठायी सर्वा घटी|
हरि नांदे पाठी पोटी||

एक झाले मी-तू पण |
स्वामी म्हणे भले मौन ||

रमण महर्षींनी मुक्तकंठाने गौरवलेला सत्संग साधायचा असेल, तर साधकाची भावदशा कशी असावी याचे वर्णन स्वामीजी असे करतातः

चित्त असो द्यावे निवांत प्रसन्न, कल्पांती हि खिन्न होऊ नये
अंतरी असावा अखंड उल्हास, आपत्तीचा त्रास मानू नये
संसारी रहावे अलिप्त उदास, मोहे माया-पाश जोडू नये
स्वामी म्हणे व्हावा ईश्वरी विश्वास, संतांचा सहवास सोडू नये
-- प. पू. स्वामी स्वरूपानंद (संजीवनी गाथा)

धर्मआस्वाद

प्रतिक्रिया

शब्देविण संवादु करत साधकाला, भक्ताला, शिष्याला थेट अनुभूती देत मार्गस्थ करणारे किती ग्रेट आहेत हे महर्षी.
_/\_