भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग २ - आत्मविचार आणि शरणागती: प्रकरण ५ - आत्मविचार (साधना संहिता)

मूकवाचक's picture
मूकवाचक in जनातलं, मनातलं
11 Jun 2020 - 11:47 am

या प्रकरणात आपण आत्मविचाराची साधना संहिता पाहणार आहोत.

डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:

भगवान रमण महर्षी आत्मविचार साधनापद्धतीच्या पहिल्या इयत्तेतल्या विद्यार्थ्यांना आपले सारे अवधान अंतर्यामी असलेल्या 'मी' या जाणीवेवर केंद्रित करण्याचा आणि शक्य तितका वेळ त्या जाणीवेला पकडून ठेवण्याचा सल्ला देत असत. ते पुढे असे सांगत असत की आत्मविचार करत असताना अन्य विचारांमुळे चित्त विचलीत होणे साहजिक असले, तरी आपले चित्त विचलीत झाले आहे हे लक्षात आल्यावर अवधान पुन्हा एकदा 'मी' या जाणीवेवर केंद्रित करणे आवश्यक आहे. या साधनापद्धतीला सहाय्यभूत ठरतील अशा काही गोष्टी ते सुचवत असत - आपण स्वतःलाच 'मी कोण आहे' हा प्रश्न विचारणे किंवा आपण कळत नकळत सगळ्या कार्यकलापांच्या केंद्रस्थानी मानलेला 'मी' नेमका कुठून जन्माला आलेला आहे याचा शोध घेणे इत्यादि. या सगळ्या प्रयत्नांमागचा अंतिम हेतू मात्र एकच आहे - शरीर आणि मनाद्वारे केल्या जात असलेल्या कार्यकलापांची जबाबदारी आपल्यावर आहे असे समजून चाललेल्या तथाकथित 'मी' विषयी निरंतर सजग असणे.

या साधनेच्या प्राथमिक टप्प्यामधे अहंस्फुरणेविषयीचे अवधान ठेवणे ही एक मानसिक क्रिया असली, तरी तीच हळूहळू स्थिर विचार किंवा अनुभूतीचे रूप घेत जाते. साधना परिपक्व होत जाईल तसा 'मी' विषयीचा बौद्धिक विचार हळूहळू व्यक्तिनिष्ठ स्वरूपात प्रत्यक्षात अनुभवता येणार्‍या सच्चिदानंद स्वरूपासाठी मार्ग प्रशस्त करत जातो आणि पुढे नानाविध विचारांचे आवर्त तसेच बाह्य वस्तुंच्या संपर्कात येणे किंवा त्यांच्याशी तादात्म्य पावणे थांबायला लागले की व्यक्तित्वदर्शक 'मी' पूर्णपणे अंतर्धान पावतो. मागे उरते ती फक्त शुद्ध अस्तित्वाची प्रचिती, जी अनुभवताना स्वतंत्र व्यक्तिमत्वाचे चलनवलन तात्पुरत्या स्वरूपात का होईना पूर्णपणे थांबते. सच्चिदानंद स्वरूपाची प्रचिती सुरूवातीच्या काळात अधूनमधून झलक दाखवल्यासारखी येत असली, तरी सातत्याने साधना करत राहिल्यास तिचा अनुभव घेणे आणि त्या प्रचितीत स्थिर होणे चढत्या भाजणीने सहजसाध्य होत जाते.

आत्मविचार पुढे अशा एका उन्नत अवस्थेत परिणत होतो जिथे विनासायास सच्चिदानंद स्वरूपाची प्रगाढ अनुभूती येते. अनूभूती प्रगाढ होत असताना प्रयत्नाने काही साध्य करू पाहणार्‍या 'मी' चा तात्पुरता लय झाल्याने त्या कालावधीत व्यक्तिगत प्रयत्न करणे अशक्यप्राय होऊन जाते. असे असूनही व्यक्तिगत 'मी' ची जाणीव वारंवार प्रबळ होऊन डोके वर काढत असल्याने प्रयत्नपूर्वक केलेल्या साधनेची ही सर्वोच्च अवस्था असली तरी ती आत्मसाक्षात्कारी स्थिती नसते. स्वरूप स्थितीची प्रचिती वारंवार आणि अधिकाधिक सातत्याने आली की ज्या वासनांच्या माध्यमातून व्यक्तिगत 'मी' ची जाणीव जन्माला येते, त्या वासनांना ती हळूहळू क्षीण आणि नष्ट करत जाते. वासनांचा चित्तावर असलेला पगडा अत्यंत क्षीण झाला की स्वरूपात असलेली आंतरिक शक्ती (गुरूकृपा) उरल्यासुरल्या वासनांचा असा काही समूळ नि:पात करते की व्यक्तिगत अहंतेचा फणा पुन्हा कधीच डोके वर काढत नाही. हीच अंतिम आणि अपरिवर्तनीय अशी आत्मसाक्षात्कारी स्थिती आहे.

एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आत्मविचार हा मनाला एकाग्र करण्याचा व्यायाम नाही, तसेच विचारांचे दमन करण्याच्या हेतूने आत्मविचार साध्य करता येत नाही.आत्मविचारात फक्त मन जेथून उसळी घेते त्या उगमस्थानाविषयी सजग होण्याची आंतरिक तळमळ असते. आत्मविचार ही एक अत्यंत ह़ळुवार आणि सौम्य साधना आहे. मनावर ताबा मिळवण्यासाठीच्या दमनकारी पठडीतल्या ती पद्धतींना पूर्णपणे बाजूला ठेवते. या पद्धतीत साधकाने केलेल्या प्रयत्नांची परिणती अशा प्रकारे स्वरूपाचा बोध होत नाही, उलट स्वरूपबोधात साधकच कळत नकळत विलीन होऊन जातो.

रमण महर्षींनी स्वतः एका उच्च कोटीच्या साधकाला असा अभिप्राय दिलेला आहे -
ध्यान करू नका - फक्त आपले अस्तित्व अनुभवा. '
मी अमुक आहे' असा विचार करू नका - फक्त आपले अस्तित्व अनुभवा.
हे अस्तित्व कसे अनुभवायचे हा विचार देखील करू नका - तुम्ही तेच आहात! (तत्वमसि)

आत्मविचाराकडे ठराविक वेळी ठराविक ठिकाणी एखादे आसन सिद्ध करून साधण्याची ध्यानपद्धती अशा प्रकारे बघणे बरोबर ठरणार नाही. साधक कुठलेही काम करत असला तरी तो जागृत असताना क्षणोक्षणी एकीकडे सतत आत्मविचार सुरू राहणे अत्यंत मोलाचे आहे. रमण महर्षींना सतत कार्यरत राहण्यात आत्मविचाराने व्यत्यय येतो हा आक्षेप मुळीच मान्य नव्हता आणि ते ठामपणे असे प्रतिपादन करत असत की थोडाफार सराव केला तर कुठल्याही परिस्थितीत आत्मविचार सुरू ठेवता येतो. कधीकधी ते असे म्हणत असत की नित्यनेमाने ठराविक पद्धतीने केलेली साधना (परिपक्वतेच्या दृष्टीने) अगदीच बाल्यावस्थेत असलेल्या साधकांसाठी सुरूवातीच्या काळात उपयुक्त ठरू शकते, मात्र ठराविक आसनात बसून बळजबरीने दीर्घ काळ साधना करण्यासाठी ते कधीच परवानगी देत नसत. त्यांच्या शिष्यांपैकी एखाद्याने सांसारिक जीवनाचा त्याग करून ध्यानधारणेसाठी वाहून घेण्याची ईच्छा व्यक्त केली, तर एखादाच विरळा अपवाद वगळता महर्षी तशी परवानगी द्यायला ठामपणे नकार देत असत.

प्रश्नः काही योगीजन असे म्हणतात की एखाद्याला सत्याचा शोध घ्यायचा असेल तर त्याला/ तिला प्रापंचिक जीवनाचा त्याग करून जंगलासारख्या निर्जन ठिकाणी घोर तपश्चर्या करावी लागते.
रमण महर्षी: (अध्यात्मिक साधकाने) कर्तव्यपरायण जीवनाचा त्याग करण्याची मुळीच गरज नसते. नित्यनेमाने एखाद दुसरा तास आत्मविचाराची साधना केली तर नंतर तुम्ही आपली सारी नित्य, नैमित्तिक कर्मे करू शकता तसेच आपल्या सगळ्या व्यावहारिक जबाबदार्या पार पाडू शकता. तुम्हाला योग्य पद्धतीने ध्यान करणे साध्य झाले तर तुमच्या चित्तात उगम पावलेला विशुद्ध चैतन्याचा प्रवाह तुम्ही कार्यरत असतानाही सतत वाहताच राहील. एकच संकल्पना दोन वेगवेगळ्या पद्धतीने अभिव्यक्त व्हावी असे काहीसे तुमच्या बाबतीत घडेल; तुम्ही ध्यानधारणा करताना जे सूत्र पकडले आहे तेच तुमच्या हातून घडलेल्या प्रत्येक कृतीतून अभिव्यक्त होईल.

प्रश्नः असे केल्याने त्याचा (व्यावहारिक जीवनात) नेमका काय परिणाम होईल?
रमण महर्षी: तुम्ही ही साधना करत जाल, तसे तुमच्या ध्यानात येईल की तेच लोक, त्याच घटना आणि त्याच वस्तु सभोवती असल्या, तरी त्यांच्याकडे बघण्याच्या तुमच्या दृष्टीकोणात हळुहळू बदल होतो आहे. तुमच्या हातून घडलेल्या प्रत्येक कृतीतून तुमच्या ध्यानमग्नतेची साक्ष आपोआप दिसून येईल.

प्रश्नः याचा अर्थ असा होतो का की आपण मी आधी विचारलेल्या प्रश्नात उल्लेख केलेल्या योगीजनांशी असहमत आहात?
रमण महर्षी: व्यक्तिगत स्वार्थ, जो माणसाला प्रापंचिक बंधनात गुंतवतो त्याचा साधकाने त्याग करायला हवा. भ्रामक अहंता, खोटी अस्मिता आणि तथाकथित स्वतंत्र व्यक्तित्वापासून मुक्त होणे याच खरा त्याग आहे.

प्रश्नः प्रापंचिक जीवन जगत असताना असे निस्वार्थ होणे कसे शक्य आहे?
रमण महर्षी: विहित कर्मे करणे आणि अध्यात्मिक ज्ञानप्राप्ती कधीच परस्परविरोधी नसतात.

प्रश्नः याचा अर्थ असा घ्यावा का, की आपल्या आजवर चालत आलेल्या आपल्या व्यावसायिक तसेच व्यक्तिगत जीवनातल्या सगळ्या उपक्रमांना तसेच पुढे सुरू ठेवले तरी त्याच वेळी एखाद्याला आत्मसाक्षात्कारही घडू शकतो?
रमण महर्षी: का नाही? पण या बाबतीत साधकाला असा अनुभव येणार नाही की त्याच्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी त्याच त्या जुन्या व्यक्तिमत्वाकडून घडत आहेत. साधकाच्या जाणीवेत जोवर ती कोत्या मनोवृत्तीच्या खुज्या व्यक्तिमत्वाच्या पलीकडे जाऊन शाश्वत निजस्वरूपात स्थिरावत नाही तोवर क्रमशः परिवर्तन होतच राहील.

प्रश्नः आजच्या धकाधकीच्या जीवनात एखाद्याच्या जीवनात कार्यबाहुल्य असेल, तर त्याच्याकडे ध्यानधारणा करण्यासाठी अत्यल्प वेळच शिल्लक राहील.
रमण महर्षी: आत्मविचाराच्या साधनेत ध्यानधारणेसाठी वेगळा वेळ राखून ठेवण्याची गरज फक्त नवजात शिशुसारख्या अत्यंत बाल्यावस्थेत असलेल्या साधकांनाच पडते. या मार्गावर प्रगती करायला लागलेल्या साधकाला अंतर्यामी कृतार्थतेची भावना तसेच विलक्षण आनंदाची अनुभूती मिळायला लागते. असा साधक कार्यरत असण्याने किंवा विश्रांत अवस्थेत असण्याने त्याला आलेल्या अनुभूतीत फरक पडत नाही. असा साधक आपल्या कर्मेंद्रियांचा आणि ज्ञानेंद्रियांचा यथायोग्य वापर करत समाजात वावरताना दिसला, तरी तो अंतर्यामी मात्र एकांतात आणि स्थिरचित्त राहण्यासाठी सक्षम होत जातो.

प्रश्नः याचा अर्थ असा होतो ना, की आपण योगमार्गाची शिकवण देत नाही?
रमण महर्षी: एखाद्या गुराख्याने दंडुक्याच्या सहाय्याने बैलाला पिटाळावे, तसे योगी आपल्या मनाला ध्येयाप्रत बळजबरीने नेण्याचा प्रयत्न करतात. या मार्गावर मात्र साधक आपल्या हाताने लुसलुशीत चारा भरवत लाडीगोडी लावत बैलाला त्याच्या गोठ्यापर्यंत घेऊन जातो.

प्रश्नः हे कसे साध्य व्हावे?
रमण महर्षी: तुम्हाला स्वतःलाच प्रश्न विचारावा लागेल - 'मी कोण आहे?' हा आत्मविचारच शेवटी तुमच्या अंतर्यामी अशा एका विलक्षण गोष्टीचा शोध लागण्यात परिणत होईल, जी मनाच्या आवरणामागे दडलेली आहे. या एका महाप्रश्नाची उकल करा, मी खात्रीने सांगतो की तुमच्या अन्य सगळ्या समस्यांचे आपोआप निराकरण होईल.

पुरवणी- महर्षींच्या शिकवणीशी विलक्षण साधर्म्य असलेले काव्यः

मनाचे की, पार्था | असे एक भले | तया आवडले| जे जे काही ||
तेथे चि ते पाहे | सोकावोनि राहे | अनायासे लाहे | तद्रूपता ||
म्हणोनि तयाते | कौतुके साचार | दावी वारंवार | आत्मसुख ||

स्त्रोत - स्वामी स्वरूपानंद (पावस) कृत अभंग ज्ञानेश्वरी नित्यपाठ

धर्मआस्वाद