[कविता' २०२०] - कविता म्हणजे . . .

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
10 May 2020 - 7:22 am

कविता म्हणजे . . .कविता म्हणजे असते ओंकार सृजनाचा
हुंकार प्रसवेच्या वेदनांचा.. अर्भकाच्या रुदनाचा
कविता म्हणजे असते कपालभाती प्रतिभेची
ऐकवत असते गुंजन भावनांच्या भ्रामरीची
छंदबद्ध कविता म्हणजे मयुरासनाचा डौल
गेयतेचा अन लालित्याचा सांभाळते तोल
कविता म्हणजे असते एक चित्रवीणा
झंकारत मनोमनी प्रकटविते करुणा
कविता म्हणजे असते चैत्राचा पाडवा
तर कधी पेटविते वैशाखवणवा
कविता असते काहूर घनगर्द आषाढमेघांचे
कविता असते माहेर सुवासिनींच्या श्रावणसणांचे
कविता असते तुतारी क्रांतीच्या उदघोषाची
कविता असते पोवाडा रणमर्द छातीची
कविता असते ओवी दळणाऱ्या आईची
कविता असते करुणा हंबरणाऱ्या गाईची
कविता असते ऋचा ऋग्वेदाच्या संथेची
कविता असते बंदिश मदभरल्या सुरांची
कविता असते गझल . . . विभ्रम वारूणिचा
कविता असते लावणी . . . झंकार नुपूरांचा
कविता असते भूपाळी उदयगान उषेचे
कविता असते अभंग भक्तिगान तुकयाचे
कविता असते ओवी ज्ञानोबांच्या पैजेची
कविता असते भारूड एकनाथांच्या गारुडाची
कविता असते नांदी देवलांच्या शारदेची
कविता असते गणगौळण ढोलकीच्या तालाची
कविता असते भाषांतर कवीच्या मौनाचे
कविता असते स्वगत सर्वात्मक सर्वेश्वराचें
कविता असते विराणी . . . मैफिलीची भैरवी
कविता सामवेद जनांचा, कविता कुणीही गावी


प्रतिक्रिया

मन्या ऽ's picture

10 May 2020 - 7:27 am | मन्या ऽ

+१

गणेशा's picture

10 May 2020 - 7:42 am | गणेशा

अतिशय सुंदर कविता..
ओळ अन ओळ पुन्हा पुन्हा वाचावी अशी...
आता पर्यंत बऱ्याच कविता वाचल्या त्यात हि मनात कायम घर करून राहणारी कविता..

मनापासुन आवडली..पुन्हा पुन्हा वाचणार या कवितेला..

गणेशा's picture

10 May 2020 - 1:34 pm | गणेशा

पुन्हा वाचली.. ही कविता विजेती ठरली तर मला खुप आनंद होईल ..
नाही झाली तरी माझ्यासाठी हीच विजेती कविता

पैलवान's picture

10 May 2020 - 10:01 am | पैलवान

सुरेख कविता.

पलाश's picture

10 May 2020 - 10:27 am | पलाश

+१
शब्द, आशय, नादमयता....सुंदर कविता.

जव्हेरगंज's picture

10 May 2020 - 12:09 pm | जव्हेरगंज

+1


प्रचेतस's picture

10 May 2020 - 9:47 pm | प्रचेतस

सॉरी, कविता नाही वाटली ही.

ऊमा बधे's picture

11 May 2020 - 10:25 pm | ऊमा बधे

+१

सुरेख कविता

चांदणे संदीप's picture

17 May 2020 - 12:40 pm | चांदणे संदीप

आवडले म्हणवेना आणि हातही सोडवेना अशी अवस्था झाली ही रचना वाचून.

सुरूवात उत्तम आणि शेवटही सुंदर, पण वनडे मधल्या २० ते ४० ओव्हर बघायचे सोडून आपली कामे आवरून पुन्हा बसावं तसं काहीसं झालं.

सं - दी - प