Skip to main content

[कविता' २०२०] - ... आणि बुद्ध

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 07/05/2020 21:57 या दिवशी प्रकाशित केले.

... आणि बुद्ध




तसे तयारीतच असतो आम्ही तर्जनी आणि नजर रोखुन स्वत्त्वावर 'मी'पणाचा साज असतो आणि 'मी' करतो मिजास 'आम्ही'ची.. आमच्या शब्दांना तर्काचा वर्ख असतो नेहमी नियमांना घासल्याबिगर शाई उतरत नाही कागदावर आणि जवाबदारीचा दगडही पेललेलाच असतो सदा कुणाच्यातरी टाळक्यात घालण्यासाठी.. आपली आपणच पाठ थोपटतो आम्ही शाबासकीचा शब्द दुसऱ्याच्या नरड्यातून वदवून आमच्या महानतेची ओझी वाहतात सारी पाठीत वाकून अन् मानही लववून.. तसे तयारीतच असतो आम्ही सदोदित अधिकारांच्या वेष्टणात लपलेले दुनियादारी कोळून प्यायलेली असते मतलबी संबंधही यथायोग्य जपलेले.. आणि अचानक कधीतरी टाचणी लागते कुण्या वाचल्या-बोलल्या शब्दांची जोडल्या हातांसवे थरथरणाऱ्या ओठांची वेदनेतही हसऱ्या डोळ्यांची अन् खंगल्या पोटांची.. मोहाचे धागे मग उसवून पडतात 'मी'पणाचे कोसळतात इमले लख्ख उजळतात धुरकटलेली तत्वे गमते कि मृगजळापाठीच आयुष्य दमले.. तोच क्षण खरा तुला बुद्ध कळण्याचा !


वाचने 10905
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

+1 वा क्या बात आणि अचानक कधीतरी टाचणी लागते कुण्या वाचल्या-बोलल्या शब्दांची जोडल्या हातांसवे थरथरणाऱ्या ओठांची वेदनेतही हसऱ्या डोळ्यांची अन् खंगल्या पोटांची.. मोहाचे धागे मग उसवून पडतात 'मी'पणाचे कोसळतात इमले लख्ख उजळतात धुरकटलेली तत्वे गमते कि मृगजळापाठीच आयुष्य दमले.. तोच क्षण खरा तुला बुद्ध कळण्याचा !

तर्काचा वर्खही थिजला टाचणी लागली आशयगर्भ शब्दान्ची दाद आली मुखातुन आमचाही बुद्ध जागा झाला...

आवडली रचना. छान! अवांतरः स्कोर सेटलिंग सारखा भास झाला आधी.. पण तो भासच असावा अशी आशा! :-)

मोहाचे धागे मग उसवून पडतात 'मी'पणाचे कोसळतात इमले लख्ख उजळतात धुरकटलेली तत्वे गमते कि मृगजळापाठीच आयुष्य दमले.. तोच क्षण खरा तुला बुद्ध कळण्याचा !
+१ मृगजळाच्या ओळीसाठी खास वाहवा... जियो!!!!