[कविता' २०२०] - आता बदनाम झालो

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
6 May 2020 - 8:54 pm

आता बदनाम झालो

आता बदनाम झालो आहे,काय ते पाहून गेले
कुणी कुत्सित हसून गेले, कुणी जहरी चावून गेले.

याच वाटेवरती कधी,फुले मी वेचली होती
तिथेच शब्दांचे काटे, आज ठेच लावून गेले

माती सोबत इमानाचे,या हातावर घट्टे आहे
कणसातल्या पिकाला का,हे मोकाट खाऊन गेले

कधी त्यांना गर्व होता, माझ्या शब्दात जोर होता
हुंदक्याचा बहर आला,का सारेच दार लावून गेले

तुझ्या कोवळ्या उन्हाचे मी इंद्रधनू पाहिले होते
सुखाने ही बरसलो मी जीवन सारेच न्हाऊन गेले

तू नदी अवखळ वाहते सागराला जरूर भेटशील
या किनारी घर होतें एका पावसात वाहून गेले

दिल्या घेतल्या जखमांचा हिशोब सारा चोख आहे
जगणे सोबत जगणे होतें तेच मात्र राहून गेले

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);

background-size: 4500px;
}

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

6 May 2020 - 10:04 pm | तुषार काळभोर

स्वतंत्र कडवी चांगली आहेत, पण एकत्रित परिणाम मीसिंग वाटतोय.
जर कुणी गूढ / खोल / गहिरा अर्थ समजावल्यास मतदान करता येईल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 May 2020 - 11:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

मन्या ऽ's picture

7 May 2020 - 1:29 am | मन्या ऽ

सुंदर रचना!
भावना पोहोचल्या..

गणेशा's picture

7 May 2020 - 1:50 am | गणेशा

गझल /कविता आवडली
पहिल्या 3 कडव्या मध्ये कविता जी पकड घेत होती ती नंतर निसटली आहे असे वाटते.. पहिले 3 कडवी छान.. नंतरचा संधर्भ वेगळाच आहे असे वाटले

@ पैलवान यांच्या साठी रिप्लाय :
कडव्या प्रमाणे सांगण्याचा प्रयत्न करतो

1.
कवितेचा नायक हा आता बदनाम झाला आहे
आणि पूर्वी आपले म्हणणारे लोक आता हसतायेत त्याला नव्हे जहर दिसते आहे त्यांच्या वागण्यात.

2.
जेथे मनाप्रमाणे नायक राहिला होता, जणू तो फुलांचा रस्ता होता
तेथेच त्याच्या वाट्याला काटे आणि त्यांच्या दिलेल्या जखमा तो झेलत आहे

3.
इमानदारीने राहणारा नायक कायम इमानी होता
पण बरोबर जेंव्हा वेळ आली तेंव्हा त्याच्या कामाला दुसरे चोरून गेले आणि याला बदनाम तसेच ठेवले.. त्यासाठी शेत इमानी होते पण त्याचे कणीस (कामाचे फळ ) कोणी दुसरे खाऊन गेले
(येथे पिकातल्या कणसाला, किंवा कणसातल्या दाण्याला असे कवीला म्हणायचे आहे शब्द थोडा चुकलाय वाटत )

4.
सगळे दार लावून गेलेत हे सांगताना इतर शब्द रचना चुकली वाटत आहे मला येथे
पण तो एकटा आहे आता कारण तो बदनाम झालाय सो सर्वांनी दार बंद केले त्याच्या साठी.

5.
हे कडवे फिट बसत नाहीये. कोणी तरी समजावून सांगावे.

6.
नदी सागराला भेटते, ते तिचे ध्येय आहे
पण त्या किनारी घर माझे वाहून गेले आहे असे तो म्हणतो आहे.

7.हिशोब सर्व जखमांचा चोख ठेवला आहे.
पण असे जगताना, नायकाचे जगण्याचे मात्र राहून गेले आहे असे तो सांगतोय

मन्या ऽ's picture

7 May 2020 - 2:09 am | मन्या ऽ

नात्यांतल्या सुरवातीच्या काही सुंदर आठवणींमधे कवी त्या कडव्यात रमलेला वाटला मला..

तुषार काळभोर's picture

7 May 2020 - 5:52 am | तुषार काळभोर

स्वतंत्रपणे बहतेक कडवी चांगलीच आहेत. पण ती एकत्रित पणे एका कवितेत सांधलेली नाहीत, असं माझं वैयक्तिक मत. एका कवितेत एकच सलग विचार कडव्यातून असावा ना?
समजा पुल, वपु, विस यांच्या प्रत्येकी दोन वेगवेगळ्या पुस्तकातील उत्कृष्ट अशी एकेक वाक्ये निवडली, तर ती सहा वाक्ये स्वतंत्रपणे भारीच असतील. पण ती एकत्र येऊन एक अर्थबद्ध परिच्छेद नाही ना बनवू शकत.

चांदणे संदीप's picture

9 May 2020 - 8:58 am | चांदणे संदीप

मराठीतल्या गझलकारांचे हेच बहाणे असतात नेहमी. की प्रत्येक शेर हा स्वतंत्र कविता असते. अरे, मग किती कविता वाचायच्या आम्ही?

हिंदी आणि उर्दूतही असा प्रकार असतो पण तिथे वाचताना रसभंग नाही होत. तिथे गोडच वाटतात अशा गजला वाचायला. अर्थात सकस!

सं - दी - प

जव्हेरगंज's picture

9 May 2020 - 12:27 pm | जव्हेरगंज

सहमत आहे. कविता स्पर्धेत हे गझलांचे पीक कसे काय आले कळेना!! ;)

प्रचेतस's picture

7 May 2020 - 6:31 am | प्रचेतस

+१
खूपच छान

सत्यजित...'s picture

2 Jun 2020 - 4:53 pm | सत्यजित...

गझलतंत्रावर सरावातून पकड येत राहील.बरेच खयाल उत्तम आहेत आपल्याकडे हे जाणवते,तस्मात गझलेचा मंत्र मिळणेही फार दुरापास्त नसावे.
शुभेच्छा!