शुभ सकाळ!

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
1 Mar 2020 - 7:56 am

एक सुंदर सकाळ पुन्हा उगवल्याच्या आनंदाने असंख्य पक्ष्यांचा मंजुळ प्रभातराग वातावरणाला संगीतसाज चढवतो आहे. निरभ्र, निळ्याशार आभाळाच्या क्षितिजाशेजारच्या टोकावर धुक्याच्या पांढुरक्या रेघेने सीमारेख आखली आहे. पूर्वेकडचं तांबुडकं हळुहळू रुपेरी झाक घेऊ लागलंय, आणि डोंगरांच्या निळ्या रांगा आपल्या मूळ रंगानिशी जाग्या होऊ लागल्या आहेत...
ही वेळ मोठी वेगळीच असते. खरं तर ही जीवनासाठी घेऊन येणारा नवा दिवस साजरा करण्याची वेळ! पण त्या साजरेपणासाठी वेळ काढण्याएवढा निवांतपणा सगळ्यांकडे नसतो. आपण ज्याला ‘जागं होणं’ म्हणतो, ज्या किलबिलाटाला संगीत वगैरे म्हणतो, ते सारं, खरं म्हणजे नव्या दिवसासाठी जगण्याच्या धडपडीचीच एक सुरुवात असते. ती जाणीव मनाला शिवू न देता बाजूला ठेवून आपण त्याकडे पाहातो म्हणून तीदेखील आपल्याला सुरम्य वगैरे वाटत असते.
... म्हणूनच, जगण्यासाठीचं ‘जीवन’ शोधण्यासाठी अज्ञाताच्या भरंवशावर पिल्लांना फांदीवरच्या घरट्यात सोडून आकाशात भरारी घेणारी बगळ्यांची रांग पाहून आपल्याला आनंद होतो, कविताही सुचतात... पण या रांगेतल्या प्रत्येकाच्याच मनात, लवकरात लवकर अन्न शोधून पिल्लांच्या चोचीत घास भरविण्यासाठी घरी परतण्याचीच आस असते. झाडांच्या पानापानाआड किलबिलाट करून, मंजुळ स्वरात गाण्याचे आलाप आळवणारी चिमणी पाखरं, काही सदान कदा केवळ प्रणयगीतेच गात बागडत नसतात... या सुरांनी जेव्हा आपल्या कानांना सुखाची आणि आनंदाची अनुभूती येते, तेव्हा त्यांच्या नजरा आणि चोची मात्र, जगण्याचं आणि पिल्लांना जगविण्याचं साधन असलेल्या अन्नाच्या शोधातच भिरभिरत असतात!
... आत्ता, क्षणापूर्वी, आभाळातून, अशीच एक बगळ्यांची माळ फुलली, बघता बघता क्षितिजावरच्या त्या पांढुरक्या रेषेत विरघळून गेली.
तिथे बहुधा, पाणवठा असावा...
आता ती माळ जमिनीवर मात्र अस्ताव्यस्त विसावेल. बकध्यान सुरू होईल...
... आणि पाण्यातले मासे, भयभरल्या नजरांनी पाण्यापलीकडे पाहात, स्वत:स वाचविण्याची पळापळ सुरू करतील!
उजाडलेल्या नव्या दिवसाची संध्याकाळ पहावयास मिळेल की नाही या भयाने!...
सकाळ ही अशीच असते!
नेहमीच!
कुणी जगण्याचा आनंद साजरा करू लागतो, तेव्हा दुसरा कुणी जेमतेम जगण्याची धडपड सुरू करत असतो!
तरीही आपण मात्र, एकमेकांना म्हणतो, ‘शुभ सकाळ’!
कारण आपण नेहमीच पहिल्या वर्गात स्वत:ला पाहात असतो!
जगण्याचा आनंद साजरा करणाऱ्या वर्गात!...

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

1 Mar 2020 - 3:53 pm | चौथा कोनाडा

वाह, सुंदर चित्र !

श्वेता२४'s picture

2 Mar 2020 - 10:17 am | श्वेता२४

जीवनाचं शाश्वत सत्य. खूप आवडलं लिखाण.