श्री अमृतानुभव अध्याय तिसरा - वाचाऋणपरिहार

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
30 Jan 2020 - 3:20 am

|| श्रीराम समर्थ ||

बाहेर एकदम जोरदार पाऊस कोसळतोय . नदीच्या दुथडी भरुन वाहणार्‍या पाण्याचा खळखळाट अगदी इथवर ऐकु येतोय , नदी धुसरशीच दिसत आहे पण तिचं अस्तित्व अगदी सुस्पष्ट जाणवत आहे. अधुन मधुन जोरदार विजा कडाडत आहेत अन त्याच्या प्रकाशात निमिषार्धच नदी चा प्रवाह उजळुन निघतोय. आणि आपण हे सारं अनुभवतोय ह्या जुनाट शिवालयाच्या आसर्‍याला बसुन ! जुनेच पण प्रशस्त आणि आत्ता ह्या वेळेला तर अगदीच निर्जन. अगदीच नाही म्हणायला मंदिराच्या दुसर्‍या कोपर्‍यात बसलेले ते २ ४ सन्यासी आहेत , पण त्यांचीही काही बडबड नाही , ते त्यांच्या गांजासेवनात सुखाने तल्लीन झाले आहेत. त्यांनी भरुन दिलेली चिलिम अशीच शेजारी पडली आहे वाट बघत पण तिचीही आसक्ती नाही . मंदिराच्या मध्यवर्ती असलेल्या धुनी मध्ये एक लाकडा चा ओंडका शांत पणे जळत आहे, त्यात तो लाकुड तडतण्याच्या आवाज इतर आवाजांच्या सोबत एक अफलातुन मिश्रण करत आहे. त्या धुनीच्या धुराचे अन गांजाच्या गोडसर वासाचाही एक सुंदर मिलाप नाकाला सुख देउन जात आहे. अंगावर घेतलेल्या जुनाट गोधडीची उब अन समोरच्या धुनीची धग . मगाशीच बनवुन खाल्लेली साधीशीच मुगाची खिचडी आता पोटात गप्प जाऊन बसली आहे. आता जेवणाचीही चिंता नाहीये , गडबड नाहीये.
" तसेही म्हणा आता कसली गडबड आहे ? आता इथेच आहोत की आपण ! आता काही टारगेट्स नाहीयेत की कसली टाईम लाईन नाहीये " असा विचार मनात येतो अन गालावर हसु उमटतं ! आपण आपल्या झोळीतुन एक छोटंसं पुस्तकं काढतो अन धुनीच्या मंद प्रकाशात पहायला लागतो ...
श्रीराम समर्थ - अमृतानुभव २६ मे २०१५ !
कित्ती वर्षं झाली , कित्ती पारायणं झाली , कित्ती फिरलंय हे पुस्तक ! समासाच्या जागेत लिहिलेल्या टिप्पण्ण्या , अगदी नानांच्यासारख्या ! बाकी हे मार्कस ऑरेलियस चं मेडीटेशन्स वाचलं हे एक फार बरं झालं , ही लेखन शैली भारी आहे ... हे सारं स्वतःसाठी आहे , स्वतःच्या आकलनासाठी आहे, आपल्याला कोणाला काहीही सांगायचं नाहीये की पटवुन द्यायचं नाहीये ,

हे सारं स्वान्तःसुखाय आहे !

____________________________________________________________________________________________

ययांचेनि बोभाटे । आत्मयाची झोंप लोटे ।
पूर्ण तही ऋण न फिटे । जें चेणोंचि नीद कीं ॥ ३-१ ॥
मागच्या अध्यायात श्री गुरुंचे स्तवन केल्यावर माऊली म्हणतात - की ह्या चारीवाणींच्या बोभट्यामुळे आत्म्याची झोप मोडते खरी पण तरीही त्यांचे ऋण मात्र काही फिटत नाही कारण मी आधी झोपलेलो होतो ते मी जागा झालो असे म्हणत असताना हे असे जागे झालो म्हणणे ही एक प्रकारची झोपच अर्थात अज्ञानच नाही का !

येहवीं परादिका चौघी । जीवमोक्षाच्या उपेगीं ।
अविद्येसवें आंगीं । वेंचती कीर ॥ ३-२ ॥
देहासवे हातपाये । जाती , मनासवें इंद्रियें ।
कां सूर्यासवें जाये । किरणजाळ ॥ ३-३ ॥
ना तरी निद्रेचिये अवधी । स्वप्नें मरती आधीं ।
तेवीं अविद्येचे संबंधी । आटती इया ॥ ३-४ ॥
मृतें लोहें होती । ते रसरूपें जिती ।
जळोनि इंधनें येती । वन्हीदशे ॥ ३-५ ॥
लवण अंगें विरे । परी स्वादें जळीं उरे ।
नीद मरोनि जागरें । जिइजे निदें ॥ ३-६ ॥
तेवीं अविद्येसवें । चौघीं वेंचती जीवें ।
तत्त्वज्ञानाचेनि नांवे । उठतीचि या ॥ ३-७ ॥

बाकी ह्या मागच्या अध्यायात वर्णन केलेल्या चारीवाणी जीवमोक्षाच्या उपयोगी येतात हे खरे पण जिथं अविद्या जाते , अज्ञान मालवते त्याच्या सोबत त्याही मालवतातच की ! जसे की देहाचा अंत झाला की मन सकट सर्व ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिये ही अंत पावतात किंव्वा सुर्य मावळला की जसे त्या सोबत त्याचा दाहही मावळतो. झोप ऊडाली की तिच्यासोबत स्वप्नेही विरुन जातात तसेच अविद्येच्या नाशासोबत ह्या चारी वाणीही लोप पावतात.
पण तरीही
जसे मीठ पाण्यात विरघळले तरी खारटपणाच्या निमित्तने त्याचे अस्तित्व रहाते तसेच ह्या चारीवाणी नष्ट झाल्या तरीही त्या योगे झालेल्या तत्वबोधाच्या निमित्ताने त्यांचे अतिषय सुक्ष्मस्वरुपात अस्तित्व रहातेच की !

हा तत्त्वज्ञान दिवा । मरोनि इहीं लावावा ।
तरी हाही शिणलेवा । बोधरूपेंची ॥ ३-८ ॥
येऊनि स्वप्न मेळवी । गेलिया आपणपां दावी ।
दोन्ही दिठी नांदवी । नीद जैशी ॥ ३-९ ॥
जिती अविद्या ऐसी । अन्यथा बोधातें गिंवसी ।
तेचि यथा बोधेंसी । निमाली उठी ॥ ३-१० ॥
परि जीती ना मेली । अविद्या हे जाकळी ।
बन्धमोक्षीं घाली । बांधोनियां ॥ ३-११ ॥

आता हा तत्वबोधाचा दिवा ह्या चही वाणींनी मरुन लावला पण तरीही त्याचा तरी काय उपयोग ? कारण " बोध झाला आहे " हा बोध ही देखील एक निरर्थक कटकटच की ! जसे की झोप येते अन आपल्याला स्वप्ने दिसतात , अन झोप उडाली की ' अरेरे, हे तर निद्रेच्या अवस्थेत पडलेले स्वप्न होते' ही जाणीव होते , आता दोन्ही जाणीवा एका झोपेमुळेच तर होतात ! तशीच अविद्या ( अज्ञान / माया ) " मी आहे" भौतिक जगतातील भास निर्माण करते तीच स्वतः नष्ट होऊन " आता मला आत्मज्ञानाचा बोध झाला" असा भास निर्माण करते. अर्थात की अविद्या जिती असो के मेलेली , एकदा जितीपणी "बंध आहे" असा भास करुन गुंतवते अन एकदा मेल्यावर "मोक्ष झाला" असा भास करुन गुंतवते !

मोक्षुचि बंधु होये । तरी मोक्ष शब्द कां साहे ? ।
अज्ञान घरी त्राये । वाउगीची ॥ ३-१२ ॥
बागुलाचेनि मरणें । तोषावें कीं बाळपणें ।
येरा तो नाहीं मा कोणें । मृत्यु मानावा ? ॥ ३-१३ ॥
घटाचें नाहींपण । फुटलियाची नागवण ।
मानीत असे ते जाण । म्हणो ये की ॥ ३-१४ ॥
म्हणोनि बंधुचि तंव वावो । मा मोक्षा कें प्रसवो ? ।
मरोनि केला ठावो । अविद्या तया ॥ ३-१५ ॥

म्हणुन मोक्ष हेच बंधन असेल तर त्याला मोक्ष तरी कसे म्हणावे ? मोक्ष मोक्ष ह्या गप्पा अज्ञानाच्या घरी ! जसे की लहान बाळाला आपण बागुलबुवा येईल म्हणुन घाबरवतो अन तेच रडायला लागले की बागुल बुवा मेला असे म्हणतो अन लहान बाळाला आनंद होतो , पण मुळात बागुलबुवाच नाही तर त्याच्या मरणाने कोण्या सुज्ञाला आनंद होइल ? समजा तुमच्या कडे मातीचा माठ नव्हता , तो फुटला तर तुम्हाला त्याचे दुख होईल काय ? (बरं ज्याला होतं असेल त्याला होवो बापडे!)
जिथं मुळात बंधच नाही तिथं मोक्ष कुठुन होणार ? , हे मोक्ष मोक्ष म्हणजे अविद्येने ( म्हणजे "मला मोक्षप्राप्ती झाली" ह्या विचाराने) स्वत मेल्यावर उरलेली अवस्था आहे. दुसरे काही नाही !

गोंदवलेकर महाराजांना एका प्रवचानात कोणीतरी प्रश्न विचारलेला की महाराज नामस्मरण किति करायचे कोठवर करायचे ? त्यावर महाराज म्हणाले की जोवर मी नामस्मरण करतो ह्या विचाराचे विस्मरण होत नाही बस्स तोवरच नामस्मरण करायचे आहे ! तसे काहीसे एकदा मला मोक्ष झाला ह्या विचाराचेही विसर्जन होईल तेव्हा उरेल तो मोक्ष !

रामगीतेत प्रभु रामचंद्र लक्ष्मणाला काय म्हणाले - यावन्न पश्येदखिलं मदात्मकं तावन्मदाराधनतत्परो भवेत् । श्रद्धालुरत्युर्जितभक्तिलक्षणो यस्तस्य दृश्योऽहमहर्निशं ह्रदि ॥ ५८ ॥ जोवर तुला चराचरात फक्त मी आणि मीच दिसत नाही तोवर माझी आराधना करत रहा . एकदा का तो पाहणारा मी द्रष्टाही दृस्याचाच भाग असल्याने रामच आहे हे लक्षात आले कि सुटलास !

आणि ज्ञान बंधु ऐसें । शिवसूत्राचेनि मिसें ।
म्हणितलें असे । सदाशिवें ॥ ३-१६ ॥
आणि वैकुंठींचेहि सुजाणें । ज्ञानपाशीं सत्त्वगुणें ।
बांधिजे हें बोलणें । बहू केलें ॥ ३-१७ ॥
परि शिवें कां श्रीवल्लभें । बोलिलें येणेंचि लोभें ।
मानु तेहि लाभे । न बोलतांही ॥ ३-१८ ॥
जें आत्मज्ञान निखळ । तेंहि घे ज्ञानाचें बळ ।
तैं सूर्य चिंती सबळ । तैसे नोव्हे ? ॥ ३-१९ ॥
ज्ञानें श्लाघ्यतु आले । तैं ज्ञानपण धाडिलें वांये ।
दीपवांचून दिवा न लाहे । तैं आंग भुललाचि कीं ॥ ३-२० ॥

हे जे ज्ञान - की मला मोक्ष झाला - हे ही एक बंधन च आहे असे साक्षात शंकरांनी शिवसुत्रात म्हणुन ठेवले आहे !
ज्ञानं बन्धः । ३-२।

आणि वैकुंठीच्या विष्णुंनीही ह्या सत्वगुण रुपी ज्ञानाच्या बंधनाने जीव बांधला जातो असे म्हणुन ठेवले आहे !

आता भगवान विष्णुंनी म्हणले म्हणुन किंव्वा महादेव शंकरांनी म्हणले म्हणुन आम्ही हे मान्य करतोय असे नाही , त्यांनी नसते म्हणले तरीही आम्ही हे मानलेच असते कारण हे आमच्या स्वत:च्या आत्मप्रचितीस येत आहे !

हे जे निखळ आत्मज्ञान आहे ते ह्या शब्दरुपात्मक " मला मोक्षप्राप्ती झाली" ह्या ज्ञानाच्या बळाने प्रकट व्हावे हे म्हणजे सुर्याने मी उगचलो आहे हे दाखवण्या करिता दुसर्‍या सुर्याची वाट पहाण्यासारखे आहे !
किंव्वा ह्या शब्दरुपात्मक ज्ञानाच्या मुळे निखळ आत्मज्ञान प्राप्त झाले असे म्हणले तर ते निखळ आत्मज्ञान व्यर्थच होईल की जसे की एक दिवा लावला तो लावला आहे हे पाहण्यासाठी दुसरा दिवा लावला तर तो पहिला दिवा लावलाच नव्हता म्हणावे लागेल !

आपणचि आपणापाशीं । नेणतां देशोदेशीं ।
आपणपें गिंवशी । हें कीरु होय ? ॥ ३-२१ ॥
परि बहुतां कां दिया । आपणपें आठवलिया ।
म्हणे मी यया । कैसा रिझों ? ॥ ३-२२ ॥
तैसा ज्ञानरूप आत्मा । ज्ञानेंचि आपली प्रमा ।
करितसे सोहं मा । ऐसा बंधु ॥ ३-२३ ॥
जें ज्ञान स्वयें बुडे । म्हणोनि भारी नावडे ।
ज्ञानें मोक्षु घडे । तें निमालेनि ॥ ३-२४ ॥

समजा आपणच आपल्याला शोधायला गेलो , देशोदेशी भटकलो तरी आपल्याला आपण सापडु का? , पण समजा सापडलोच ( अर्थात आपण दुसर्‍याला कोणाला नव्हे तर आपल्याला स्वतलच शोधत होतो हे लक्षात आले कि ) मला मी सापडलो ह्याचा आनंद कसा उपभोगणार ? तसेच मुळ आत्मा ज्ञानस्वरुपच असताना " सोहं ब्रह्म" ह्या सत्वगुण ज्ञानाने मला मोक्ष झाला हे म्हणणे हाच बंध आहे !आता हे सत्वगुण रुपी " सोहं ब्रह्म" ही जाणीव हे ज्ञान स्वत्च बुडणारे असल्याने ते आवडण्याचा संबंधच नाही , उलट ह्या ज्ञानाने तेव्हाच मोक्ष प्राप्ती होइल जेव्हा ते ज्ञान संपुर्ण लयाला जाईल !

समर्थांनी म्हणले तसे - माहावाक्य उपदेश सार । परी घेतला पाहिजे विचार । त्याच्या जपें अंधकार । न फिटे भ्रांतीचा ।।

म्हणोनि परादिका वाचा । तो शृंगारु चौ अंगांचा ।
एवं अविद्या जीवाचा । जीवत्व त्यागी ॥ ३-२५ ॥
आंगाचेनि इंधनें उदासु । उठोनि ज्ञानाग्नि प्रवेशु ।
करी तेथें भस्मलेशु । बोधाचा उरे ॥ ३-२६ ॥
जळीं जळा वेगळु । कापूर न दिसे अवडळु ।
परि होऊनि परिमळु । उरे जेवीं ॥ ३-२७ ॥
अंगीं लाविलिया विभूती । तैं परमाणुही झडती ।
परि पांडुरत्वें कांती । राहे जैसी ॥ ३-२८ ॥
ना वोहळला आंगीं जैसे । पाणीपणें नसे ।
तहीं वोल्हासाचेनि मिसें । आथीच तें ॥ ३-२९ ॥
ना तरी माध्यान्हकाळीं । छाया न दिसे वेगळी ।
असे पायातळीं । रिगोनियां ॥ ३-३० ॥
तैसें ग्रासूनि दुसरें । स्वरूपीं स्वरूपाकारें ।
आपुलेपणें उरे । बोधु जो कां ॥ ३-३१ ॥
तें ऋणशेष वाचा इया । न फेडवेचि मरोनियां ।
तें पायां पडोनि मियां । सोडविलें ॥ ३-३२ ॥

म्हणुनच ह्या परा पश्यंती मध्यमा आणि भारती ह्या चारीवाणी केवळ शृंगार आहे ज्या जीवाने जीवत्वाचा त्याग केल्याबरोबर नाश पावतात. अन त्यांच्या निमित्ताने अविद्या जिवंत रहाते !
जसे की स्वतःच्या इंधन रुपाचा कंटाळा आला म्हणुन लाकडाने ज्ञानाग्नीत प्रवेश केला अन ते भस्मसात झाले तरीही भस्माच्या रुपाने त्याचे अस्तित्व रहातेच ! अंगाला विभुती लावली , तिचे कण झडुन गेले तरीही कांतीच्या पांढरेपणाने तिचे अस्तित्व रहातेच .
किव्वा जसे ओहळातले पाणी आटुन गेले तरी ओलाव्याच्या निमित्ताने ते तिथे असतेच !
किंव्वा जसे भर दुपारी उन्गात उभे राहिल्यावर आपल्याला आपली सावली दिसत नाही पण ती आपल्या पायाखालीच का होईना पण असतेच .
तसेच " मला ज्ञान झाले मला मोक्ष झाला" ह्या जाणीवेचेही संपुर्ण निरसन केले अन शुध्द निखळ आत्मज्ञानाच्या बोधाची प्राप्ती करुन घेतली तरी हे सारे आपण त्या ह्या वाणींच्या सहाय्यने केले ही वस्तुस्थिती शिल्लक रहातेच ! स्वरुपी स्वरुपाकार होऊन शुध्द बोध झाला तरी बोध झाला तो त्या वाणींमुळेच हे शिल्लक रहातेच !
अर्थात काहीही केले तरीही हे अतिसुक्ष्म वाचेचे ऋण मरोन देखील फिटनारे नाही , ते मी केवळ सद्गुरुंना अनन्य शरण जाऊन नमन करुन फेडले !

म्हणोनि परा पश्यंती । मध्यमा हन भारती ।
या निस्तरलिया लागती । ज्ञानीं अज्ञानींचि ॥ ३-३३ ॥

परा पश्यंती मध्यमा अन भारती ह्या वाणींचे एकदा का निशेष निराकरण झाले की ज्ञानी आणि अज्ञानी समानच भासतात ! कारण अज्ञानी म्हणजे तो कि ज्याला शुध्द स्वरुपाचे ज्ञान नाहीये . आणि वर म्हणल्याप्रमाणे ज्ञानी तो कि ज्याला "मला ज्ञान झाले , मला मोक्ष प्राप्ती झाली" ह्या सत्वगुणरुपी ज्ञानाचेही विस्मरण झाले आहे !

समुद्र किनार्‍यावर उभा होतो जवळपास कंबरभर पाण्यात . लाटा तशा संथच होत्या. मावळत्या सुर्याला अर्घ्य देण्यासाठी ओंजळीत पाणी उचलले अन " ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते। पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥ " श्लोक म्हणलो. माझ्या हातात जे पाणी आहे तो अंशस्वरुप समुद्रच आहे, तो समुद्र नाही असे जे आजवर वाटत होते हे एक अज्ञान होते , पण आता तो समुद्र आहे हे कळाल्यावर "तो समुद्र आहे" असे ज्ञान झाल्यावर तो समुद्र आहे असे म्हणत रहाण्यात काय अर्थ आहे, मुळात तो समुद्रच होता आपल्याला आपल्या ओंजळीच्या योगाने तो समुद्र नाही असे वाटत होते , पण ह्याच ओंजळीच्या निमित्ताने आपल्याला त्याचे मुळ स्वरुप कळाले हे विसरता येणार नाहीये , आणि एकदा का हे अर्घ्य सुर्याला अर्पण केले, एकदा का ही ओंजळ बाजुला केली की परत तो समुद्रच होऊन जाणार आहे, त्याच्यात अन समुद्रात काहीच फरक रहाणार नाही !! शांतपणे अर्घ्य अर्पण करुन डोळे मिटुन घेतो !

|| इति श्रीकृष्णार्पणमस्तु ||
॥ इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्अमृतानुभवे वाचाऋणपरिहार नाम तृतीय प्रकरणं संपूर्णम् ॥
_________________________________________________________________________

आता बरीच रात्र झालीय . बाहेर पावसाची रिपरीप थांबलीये , नदीचा खळखळाट मात्र अजुनही जाणवतोय. त्यात आता रातकिड्यांनी त्यांच्या सुर मिसळायला सुरुवात केलीय. कोपर्‍यातल्या संन्यासांचीही ब्रह्मानंदी टाळी लागली आहे तेही त्यांचा सुर मिसळत आहेत ह्या सार्‍यात. धुनीतील लाकडांचे आता निखारे झालेत आणि त्यांच्यी ती लालभडक उब डोळ्यांच्या पापण्यांनाही जाणवत आहे . आपण ते जरा निटसं करतो , त्यात एखाददुसरा ओंडका सरकवतो. अन शांत डोळे मिटुन घेतो.

किति वाजुन गेले असतील कोण जाणे.

पण आपल्याला काय फरक पडतो ? आता कसली गडबड आहे ? मंदिरातच्या दारान येणार्‍या थंडगार झुळक काळाच्या प्रवाहाची जाणीव करुन देत रहाते बस्स . तुकोबांची आठवण मनात डोकाऊन जाते -

कथा कमंडलु देह उपचारा | जाणवितो वारा अवसरू ।।
.
.
.
मीची मज व्यालो | पोटा आपुलिया आलो||
आता पुरला नवस | निरसोनी गेली आस ||
जालो बरा बळी | गेलो मरोनी ते काळी ||
दोहीकडे पाहे | तुका आहे तैसा आहे ||

|| पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग ||

______________________________________/\____________________________________________

संदर्भ :
१) अमृतानुभव - सत्संगधारा http://satsangdhara.net/dn/amrut.htm
२) अमृतानुभव - हभप.दत्तराज देशपांडे संपादित - https://archive.org/details/amritanubhava_changdev_pasashti
३) अमृतानुभ - श्री. राजेंद्र वैशंपायन ह्यांच्या सुमधुर आवाजात ध्वनीफित - https://www.youtube.com/watch?v=0Pg8p6N0_u8
४) ग्रंथराज दासवोधातील सद्गुरुस्तवन हा समास : दशक पहिला समास चौथा http://satsangdhara.net/db/D01.htm
५) समान विषयावर असलेला समर्थांचा अप्रतिम ग्रंथ - आत्माराम - http://satsangdhara.net/db/atmaram.htm
६) शिवसुत्र : https://sanskritdocuments.org/doc_shiva/shivasuutra.html?lang=sa
७) अमृतानुभव - अजुन एक सुंदर अनुवाद - https://nilkanthbapat.wordpress.com/2015/11/28/21/

___________________/\_____________________
(क्रमशः .... बहुतेक)

संस्कृतीअनुभव

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Jan 2020 - 3:59 pm | ज्ञानोबाचे पैजार

बर्‍याच दिवसांनी पुढचा भाग आला,
आवडला,
मनापासून लिहिले आहे आणि ते मनापर्यंत पोचले.
लिहित रहा...
धन्यवाद
पैजारबुवा,

प्रचेतस's picture

31 Jan 2020 - 8:11 am | प्रचेतस

उत्तम लिहिलं आहेस.

गामा पैलवान's picture

3 Feb 2020 - 8:52 pm | गामा पैलवान

आनंद झाला.

सुरम्य देखावा असूनही पाहायला कोणीच नाही. असं काहीसं वाटलं हे वाचून.

तरीपण आनंद झाला.

-गा.पै.

"अर्थात काहीही केले तरीही हे अतिसुक्ष्म वाचेचे ऋण मरोन देखील फिटणारे नाही , ते मी केवळ सद्गुरुंना अनन्य शरण जाऊन नमन करुन फेडले !"

खरंय. आणि हेच सर्व बाबतीत आहे.
हाही भाग आवडला. लिहित रहा.