मराठी दिवस २०२०

ऐसी दिवानगी..

Primary tabs

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
6 Nov 2019 - 11:49 am

परवा शाहरुखचा बड्डे होता. रात्री एका चॅनेलवर त्याचाच "दिवाना" लागला होता. मग काय.. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बघणं सुरु केलं. (खरं कारण असंय की, आजकाल रिमोट हातात आल्यावर चॅनेल बदलण्यासाठी लेकीची वेगळी परवानगी घ्यावी लागते. ती सुद्धा महत्प्रयासाने मिळवली होती.म्हटलं दिवाना तर दिवाना पण रिमोट हातचा गेला नाही पाहिजे!)

तर सिनेमा तसा त्याच्या अखेरच्या टप्प्यात आला होता. म्हणजे शाहरुख आणि दिव्या भारतीचे लग्न झालेले आहे.आणि जो मेलाय असं गृहीत धरून दिव्या भारती शाहरुखच्या गळ्यात हार घालते तो ऋषी कपूर वापस आलेला आहे. ऋषी कपूरवर गुंडे हमला करतात आणि शाहरुख त्यांच्याशी फायटिंग करून त्याला दवाख्यान्यात ऍडमिट करतो. मुळात दाढी करायला पैसे नसलेल्या आणि फाटके कपडे घालून फिरणाऱ्या ऋषी कपूरवर गुंडे काय क्वालिफिकेशन बघून हमला करतात ते कळत नाही. फाटका असला तरी कपूर घराण्याचा दिसतोय असं लॉजिक असावं. तर इथून पुढे शाहरुख अन ऋषी कपूर मित्र बनतात. आणि शाहरुख ऋषी कपूरला आपल्या बायकोच्या वाढदिवसाच्या पार्टीला येण्याचे आमंत्रण देतो. आणि ऋषीसुद्धा चला आजची जेवायची सोय झाली असा विचार करून छान दाढीवगैरे करून पार्टीला जातो.

आता इथे गंमत आहे बरं का...!
ऋषी कपूरची खरी आई ही आता शाहरुखची मानलेली आई आहे. ऋषी कपूर हा दिव्या भारतीचा माजी नवरा असून सध्या ती तिच्या आजी नवऱ्यासोबत म्हणजे शाहरुखसोबत राहते आहे. तर ह्या सगळ्या आजीमाजींचा मिलन सोहळा म्हणजे दिव्या भारतीची बर्थ डे पार्टी !

थोडक्यात एक अत्यंत ऑकवर्ड सिच्युएशन समोर येणार आहे हे चाणाक्ष प्रेक्षकांच्या लक्षात येते. आता अश्या परिस्थितीत एक साधारण आयक्यू लेव्हल असलेला माणूस त्या सिच्युएशनचा "ऑकवर्डनेसपणा" कमी करायचा प्रयत्न करेल की नाही?? पण इथं तसं होत नाही, सिनेमाचे दोन्ही हिरोलोक सुपारी घेतल्यागत परिस्थितीला ऑकवर्डनेस इनटू एमबॅरेसमेन्ट रेझ्ड टू दी पॉवर इन्फिनिटी लेव्हलला आणून ठेवतात.

होतंय काय की, ऋषी कपूर आणि त्याच्या आईचं भूतकाळ आणि सद्यःपरिस्थितीविषयी झालेलं बोलणं शाहरुख लपून ऐकतो. आणि त्याला काय घोळ झालाय ते लक्षात येते. आता घरात पार्टी चालूये, चार लोकं आलीये तर ही वेळ निभावून न्यावी की नाही ! नंतर काय करायचं ते ठरवू बा.. पण नाही ना भाऊ..शाहरुख ऋषी कपूरला भेटून एक गाणं म्हणण्याची जबरदस्ती करतो. मुळात ती वेळ शाहरुखनेच "कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे" हे गाण्याची असते. तरी तो ऋषीला लाजवण्यासाठी त्याला गायला सांगतो. अन ऋषीपण काय कमी नाही हा ! पार मुगले आझमपासून ते राम तेरी गंगा मैलीपर्यंतचे असले कितीतरी लाजिरवाणे प्रसंग कोळून प्यायलेल्या खानदानाची औलाद हाय ती..तो ह्या कालच्या शारक्यासमोर गप्प बसतोय व्हयं !
तो लगेच चालू होतो..
"तेरे दर्द से दिल आबाद राहा..कुछ भूल गये, कुछ याद राहा.."

आक्ख्या गाण्यात त्याची नजर दिव्या भारतीवरून ढळत नाही. नॉर्मल सिच्युएशनमध्ये दिव्याने ऋषीवर किमान विनयभंगाचा तरी दावा ठोकलाच असता. पण "ती ठेहरी औरत जात" (हा तिचाच पुढच्या प्रसंगातील डायलॉग आहे). ती काहीच म्हणत नाही. अन ऋषी ह्या गाण्यात बेफाम सुटलाय. ऐकतच नाही..

"तू मला ऑकवर्ड केलंस ना शारक्या...!! आता बघ, नाही तुझ्या बायकोला रडवंलं तर बाप म्हणून राज कपूरचं नाव लावणार नाही..."
ह्या ऍटीट्युड ने गायलाय ऋषी कपूर..

सगळ्यांचं रडणं होऊन हा प्रसंग संपतो. पुढे आणखीनच गम्मत आहे. आता मेन व्हिलन अंबरीश पुरींची रीएंट्री होते. त्याची ऋषी कपूरच्या खानदानी दौलतवर डोळा आहे. आता सिएनामाचा क्लायमॅक्स सुरु होतो बरं का.. अंबरीश पुरीचे आदमी शाहरुख आणि दिव्या भरतीला किडनॅप करतात. आणि त्याबदल्यात तो ऋषी आणि शाहरुखच्या संयुक्त आईला तिची सगळी दौलत मागतो. तिला घाबरवण्यासाठी तो शाहरुखला बांधून विजेचे झटके वगैरे देतो.

आता मुळात शाहरुख बिचारा ह्या सिनेमात उपरा आहे. त्याला का मारायचं म्हणतो मी?? सिनेमाचा शूटिंगवगैरे संपल्यावर शाहरुखने अंबरीश पुरीला हा प्रश्न नक्कीच विचारला असेल..
"मामा... मले काऊन मारलं हो? मी म्हातारीले माह्या घरी आणून खाऊपिऊ घालून जित्तं ठेवलं. म्हणूनच तुम्हाले म्हातारीची जायदाद मिळणार व्हती. मले कमिशन द्यायचं राहिलं दूर..तुमी मलाच मारता? असं असते का राजे हो?"

असो..
शेवटी ऋषी कपूर मरतो. अन जाताना शाहरुखला म्हणतो, "भाऊ..झालं गेलं विसरून जा..अन सुखाने संसार कर बरं का?"

शाहरुख परत म्हणतो," ते सगळं ठीक आहे दादा.. पन मले काऊन मारलं?"

समाप्त

चित्रपटविरंगुळा

प्रतिक्रिया

चाणक्य's picture

6 Nov 2019 - 3:23 pm | चाणक्य

.

हे बायका आणि पोरींना शारु़ख एव्हढा का आवडतो हे मला अजुन कळलेलं नाही. आपल्याला तर त्यातले कोनतेच सिनेमे झेपत नाहीत.
आपण अक्षयकुमार कॅटेगरीमधले प्रेक्षक आहोत.

उपरोल्लिखित सिनेमा मी पाहिलेला नाहीये हे एव्हाना कळलं असेलच.
असो.

सेम पिंच!!! :)

जॉनविक्क's picture

6 Nov 2019 - 11:06 pm | जॉनविक्क

पॅशन ज्याला म्हणतात(उत्कटता) त्याचे तरुण शाहरुख खान ने अप्रतिम सादरीकरण वेळोवेळी केले आहे तीच त्याची दौलत अन तेच तो पॉप्युलर असण्याचे कारण. वाढत्यावयासोबत तो तितक्या दमदार भूमिका निवडू शकला नाही (स्वदेस, चकदे वगैरे कितीही चांगले असले तर शाहरुखने स्वतःची छाप त्यातून सोडली म्हणणे धाडसाचे ठरेल) पण तो पर्यंत बॅक टू बॅक सुपरहिट चित्रपट देणे (उत्कृष्ट कलावन्त असणे हा तुलनेने गौण मुद्दा) या नॉर्मच्या जवळपास तो पोहचून तो अमिताभच्या ग्लॅमरच्या आसपास फिरकू शकेल इतका मोठा सुपरस्टार आणी आधुनिक मीडिया व त्याची व्यावसायिक कौशल्ये यांचा वापर करून पुरेसा प्रसिद्ध व श्रीमंत होऊन गेला.

तरीही त्याचे मुख, सारा अली खानचे हास्य व गाढवाचे गु*द्वार यात कमालीची साम्यता आहे असे कोणी कलाकार निरीक्षण नोंदवत असेल तर चुकीचे म्हणता येणार नाही.

श्वेता२४'s picture

8 Nov 2019 - 2:58 pm | श्वेता२४

मामा... मले काऊन मारलं हो? मी म्हातारीले माह्या घरी आणून खाऊपिऊ घालून जित्तं ठेवलं. म्हणूनच तुम्हाले म्हातारीची जायदाद मिळणार व्हती. मले कमिशन द्यायचं राहिलं दूर..तुमी मलाच मारता? असं असते का राजे हो?"
या इनोदी रचनेला माझ्याकडून टाळ्या...................

किल्लेदार's picture

8 Nov 2019 - 3:07 pm | किल्लेदार

मजेशीर आहे....

फारएन्ड's picture

9 Nov 2019 - 12:33 am | फारएन्ड

धमाल आहे हे! :)

उन्मेष दिक्षीत's picture

10 Nov 2019 - 1:31 am | उन्मेष दिक्षीत

ऑकवर्डनेस इनटू एमबॅरेसमेन्ट रेझ्ड टू दी पॉवर इन्फिनिटी !
भारी लिहिलय

मालविका's picture

3 Dec 2019 - 8:15 am | मालविका

धमाल ! वाचून मजा आली .