दिवाळी सेलिब्रेशन !!!

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
3 Nov 2019 - 9:18 pm

दिवाळी सेलिब्रेशन !!!
साधारण दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील मी भाऊबीजेला दादाकडे गेले होते. दादा, माझ्या चुलत बहिणीला आणि तिच्या दोन मुलांना पण घेऊन आला. बरेच दिवसांनी घरात खूप जण जमलो होतो. नेहमीप्रमाणे गप्पा गोष्टी चालल्या होत्या. एक एक भाऊ येत होता ओवाळणी होत होती, गोडाधोडाचं जेवण जेवून भेटीगाठी होऊन तृप्त होत होतो. दुसऱ्या दिवशी काय डोक्यात आलं माहित नाही, आज जेवण बाहेरून मागावूया म्हणून ठरलं. आता दादाच घर हे मुंबई गोवा हायवेला जरी असल तरी आहे ते खेडेगावचं. शहरात झोमॅटो नि स्वीगी वरून ऑर्डर करतात तसं काही शक्य नाही. गावात जरा बरं असं हॉटेलदेखील नाही. पण तिथेच एका ढाब्यासारख्या ठिकाणी मिसळ भाकरी मिळते. आम्ही गेलो कि एकदा तरी आमचा हा मेनू होतोच होतो. मग तिथूनच मिसळ भाकरी ऑर्डर आणायचं ठरलं. सारखं सारखं आज काय करायचं जेवायला हा विचार नको करायला नि एकत्र जमलोय तर गप्पा टप्पा गम्मत जम्मत करूया. एक दिवस विश्रांती असं ठरवलं. गावातच शेजारी राहणाऱ्या भाऊ,वहिनी, त्यांची मुलं यांनाही बोलवलं. माणसं मोजून संध्याकाळसाठी ऑर्डर देऊन ठेवली. साधारण १८ ते २० जण होतो आम्ही. असं सगळं प्लांनिंग झाल्यावर मग काय दुपारी झोपून उठल्यावर काहीच काम उरलं नाही. ४ वाजता मोठी सगळी आपले आपले फोन घेऊन आरामात बसलेली. छोटी सगळी जमेल तसा दंगा करून आता काय करू म्हणून पिडत होती.

उन्हं उतरलेली नसल्याने त्यांना घेऊन काय करायचं म्हणून मुलांना घेऊन पत्ते खेळायला बसले. बरेच दिवसांनी पत्ते खेळताना मजा येत होती. लहान मुलांबरोबर मोठ्यांनाही खेळता येईल असा खेळ म्हणजे मूंगूस अथवा पेनल्टी. वय वर्ष ६ पासून वय वर्ष २१ ची सगळी मुलं त्यात सामील झाली. मी पान वाटायला लागल्यावर ताई आणि माझी वहिनी देखील उत्साहाने त्यात सामील झाल्या. एकमेकांना पेनल्टी देत २ डाव मस्त पार पडले. मोठे देखील आपल्या खेळात सामील झाल्याने मुलांना मज्जा वाटत होती.

मग ५ वाजले तशी बॅडमिंटन खेळायची टूम निघाली. पण एकच सेट असलयाने आपला नंबर येईपर्यंत वाट बघा, त्यात मुलांची भांडण होणार, ती सोडवा हे सगळं टाळायला बॅडमिंटनलाच बाद केलं. ताईने मध्येच आठवण काढली, आपण कसे, कोणते खेळ खेळायचो. मग काय ? हाताशी पोरं होतीच. चला म्हटलं आता खेळू. मोठी आणि छोटी सगळी यात सामील झाली. सगळ्यात बेसिक खेळ 'तळ्यात मळ्यात ' याने सुरवात केली. त्या एवढुश्या साध्या खेळात पण काय मज्जा आली. ऑर्डर देणारी ताईच चुकली आणि पोरांची हसताना पुरेवाट झाली. मोठे नेहमी मोठेपणा मिरवतात पण या अश्या छोट्या गोष्टी करताना त्यांना चुकायला होत हे पाहणं मुलांसाठी मजेशीर होत. घर गावात असल्याने घरात चूल होती नि चुलीत लाकडाच्या बरोबरीने नारळाच्या किश्या नि करवंट्या पण जाळल्या जातात. मग त्या लाकडातून नि इतर जळावू सामानातून करवंट्या उपसून काढल्या. आणि मग आम्ही 'लगोरी ' खेळायला लागलो. मुलगे विरुद्ध मुली अशा सरळ दोन टीम पडल्या. रबरी चेंडू हरवण्याची शक्यता लक्षात घेऊन नि कापडाचा चेंडू करायला कापड शोधत बसायला वेळ नाही म्हणून मग जेम्स च्या गोळ्या भरलेला एक प्लास्टिक चा चेंडू मिळतो, तोच घेतला मग खेळायला. लगोरी खेळताना नेम धरून लगोरी फोडणं नि आऊट न होता ती परत रचणे हे कौशल्याचं नि एकत्र करण्याचं काम होत . बरेच दिवसांनी खेळत असलयाने सगळ्यांचीच नियमांच्या बाबतीत बोंब होती .एकाला असं आठवत होत तर दुसऱ्याला आणखी काही . आम्ही मुलींनी मुलांवर ३ लगोर्या चढवल्या .मग एका गाफील क्षणी आऊट झाल्यावर मुलांची पाळी होती लगोरी फोडण्याची . त्यांनी लगोरी फोडली. मी आणि ताई एकमेकांकडे बॉल पास करत होतो . वहिनी मगाच्याच खेळात होती काय माहित ? तिने बॉल ने आऊट करायचं सोडून त्यांना लगोरी लावायला मदत करायला लागली . आणि मग आम्ही सगळे बाकी विसरून हसायला लागलो . आपली टीम कुठली ?काय करतेय हेच विसरली ती :) नंतर परत जेव्हा आम्ही मुलींनी लगोरी फोडली तेव्हा वहिनी नेमकी दादाच्या जवळ होती नि दादाकडे बॉल आला . आणि वहिनी एकदम फ्रीझ झाल्यासारखी तिथेच थांबली नि आऊट झाली . परत आमची हसून हसून पुरेवाट . बरेच दिवसांनी असे खेळ खेळल्याने मजा अनुभवता आली . मग 'विष-अमृत ' खेळायला सुरवात केली . ३ वेळा विष मिळालं कि आऊट असा नियम ठरवून खेळलो . खूप दिवसांनी खेळल्यारखा वाटलं . मुद्दाम ठरवून राज्य देणे, चीटिंग करणे सगळे लहानपणीचे धमाल मस्तीचे प्रकार करून घेतले . लहान मोठे सगळे एकत्र असल्याने एकमेकांना सांभाळून घेत खेळाची मजा घेत होतो . शेवटी सगळे मोठे थकले. जवळ जवळ सगळ्या मोठ्यांचे सवय नसल्याने पाय दुखायला लागले . सगळ्यांचे चेहरे दम लागून, घाम येऊन लालबुंद झाले होते . पण हसणं काही थांबत नव्हतं . कितीतरी दिवसांनी खूप मस्त वाटत होत . मुलं पुढे थोड्या वेळ खेळत राहिली .

आम्ही परत एकदा फोन मध्ये घुसलो . पण आत फोन पेक्षा एकमेकांशी बोलणं सुखावह वाटू लागलं. म्हणून मग गप्पाना सुरवात झाली . माझ्या भाच्याचा वाढदिवस पेंडिंग राहिला होता . बाकी जेवणाची कटकट नसल्याने वहिनीने केक बनवायला घेतला होता. आम्ही आपली लुटुपुटुची मदत करत होतो . खर तर अखन्ड गप्पा चालू होत्या . आई म्हणाली पण," मेल्यानो तोंड फुटून जातील " :) मग मध्येच जेवण आलं . खेळल्यामुळे सगळ्यांनाच चांगली भूक लागली होती पोटभर मिसळ भाकरी खाऊन झाली . मग केक कापून भाच्याचा वाढदिवस झाला . केक खाऊन सगळ्यांची पोट खार तर फुल भरलेली होती . भावाने आईस्क्रिम आणलं होत . मुलांच्या हट्टापायी एक पॅक उघडलं आणि मग हळू हळू करत सगळ्यांनी २ पॅक आईस्क्रिम फस्त सुद्धा केलं . मुलं खेळून दमली होती . अंथरूण घालून मुलांना झोपवलं नि आम्ही गप्पा मारत बसलो . १२ वाजेपर्यंत गप्पा छान रंगल्या . हळूहळू जांभया यायला लागल्या. मग कॉफी ची फर्माईश झाली . मी कॉफी करून आणली आणि तेवढ्यात एक भाचा झोपेत बडबडला . आम्ही सगळे हसलो आणि मग झोपेत बडबडण्यावरून विषय सुरु झाला . मग झोपत पडलेली स्वप्न, त्यांचे अर्थ असतात/नसतात , कुणाची काय मतं?, मग श्रद्धा,अंधश्रद्धा, पत्रिका, गुरु वगैरे विषय आले आणि आम्ही अक्षरशः सकाळी ५.३० पर्यंत जागत बसलो . मग आता झोप पूर्ण होणार नाही म्हणून मग तशाच थोड्या गप्पा वाढवून चहाला उठलो .
एकंदरीत दिवाळीचे ते दोन दिवस खूप छान, मस्त गेले . सगळ्यांशी परत एकदा गप्पा मारताना जोडले गेल्याची भावना निर्माण झाली . अनेक नवीन गोष्टी कळल्या . अनेक नवीन अनुभव मिळाले . काही शंकांचं निरसन झालं . काही गोष्टींवर विश्वास बसला , काहींवर नाही तरीही एक वेगळीच आणि अनोखी रात्र, स्मरणात राहील अशी रात्र जागवून आम्ही समाधानाने दुसऱ्या दिवशी मुक्काम हलवला . .

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

गुल्लू दादा's picture

3 Nov 2019 - 10:09 pm | गुल्लू दादा

वहिनीची मजा वाचून हसू आलं. आमची पण दिवाळी अशीच साजरी होते. गप्पा-गप्पात 6 कसे वाजतात कळत सुद्धा नाही...छान लिहिलंय आवडलं.

पद्मावति's picture

3 Nov 2019 - 10:35 pm | पद्मावति

मस्तंच! छान लिहिलंय.

तुर्रमखान's picture

3 Nov 2019 - 10:51 pm | तुर्रमखान

छान अनुभव.

"हॅप्पिनेस इज हॅवींग लार्ज, लविंग, केअरींग, क्लोज-निट फॅमिली इन अनॉदर सिटी" हे जॉर्ज बर्न्सचं कोट आठवलं.

पण दोन-चार दिवसही खेळीमेळीने रहाणेही काहींच्या नशिबी नसते.