धो धो धो की भं भं भं ( भाग १)

राजे १०७'s picture
राजे १०७ in जनातलं, मनातलं
28 Sep 2019 - 9:25 pm

राजपुत्र आणि प्रधानपुत्र खूप जिवलग मित्र असतात. दोघेही शूरवीर असतात. दोघांनाच दूर दूर जंगलात शिकारीला जाण्याचा छंद असतो. एकदा असेच ते दोघे अरण्यात शिकारीसाठी जातात, बरेच प्रयत्न करुनही शिकार मिळत नाही. ते असेच घनदाट जंगलात पुढे जात राहतात. शिकार केल्याशिवाय परत यायचं नाही म्हणून चार पाच दिवस झाले तरी तिकडेच मुक्काम करतात. झाडांची फळे खाऊन, झऱ्याचं पाणी पिऊन तहान भूक भागवतात.
पाचव्या दिवशी ते एका तळ्याकाठी येतात. तळ्याकाठी त्यांना एक अतिशय सुंदर, लावण्यवती तरुणी दिसते. तिच्या हातात एक लाल असतो. त्या लालमधून लालसर प्रकाश बाहेर पडत होता. राजपुत्र आणि प्रधानपुत्र यांना पाहताच ती तळ्यात उडी मारते व दिसेनाशी होते. इकडे राजपुत्र तिच्या स्वर्गीय सौंदर्यानं वेडा होतो. तो प्रधानपुत्राला म्हणतो काहीही करून ती मला हवी आहे. ते बराच काळ तिथे थांबतात पण ती बाहेर येत नाही. राजपुत्र कुठेही जायला नकार देतो व मी तिला घेतल्याशिवाय जाणार नाही, निदान मला तिला भेटून माझं मन तिच्यावर जडलंय आणि मी तिच्या बरोबर लग्न करून तिला राणी बनविन हे सांगीन म्हणतो. प्रधानपुत्राचा नाईलाज होतो.
ते दोघे रात्री तिथेच मुक्काम करतात. घोडे झाडाखाली ठेवून ते झाडावर सुरक्षित चढून बसतात. राजपुत्र झोपी जातो, प्रधानपुत्र जागा राहून राजपुत्राचं संरक्षण करत असतो. इतक्यात खाली मोठा नाग येतो. त्याच्या डोक्यावर एक लाल असतो. लाल मधून पडणाऱ्या लालसर उजेडात जे सजीव दिसेल ते खातो. दोन्ही घोडे खातो तोच प्रधानपुत्र खाली उतरून घोड्याच्या लीदेचा गोळा त्या नागाच्या डोक्यावरील लालवर टाकतो. तलवारीने नागाचे तुकडे करून मारुन टाकतो व लाल काढून घेतो. सकाळी राजपुत्राला सगळी हकीकत सांगतो. लाल घेऊन तळ्याजवळ गेल्यावर त्यांना आत उतरणाऱ्या पायऱ्या दिसतात. त्या उतरून खाली गेल्यावर मोठा सोनेरी रंगाचा महाल दिसतो.
क्रमशः

बालकथाविरंगुळा