.

पाली महाका - माडियांची बेअरफूट डॉक्टर

Primary tabs

लोकेश तमगीरे's picture
लोकेश तमगीरे in लेखमाला
7 Sep 2019 - 6:05 am


पाली महाका - माडियांची बेअरफूट डॉक्टर"लोक बिरादरी प्रकल्पाच्या आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका पाली महाकाची कहाणी."

‘लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा’ हे नाव ऐकले की घनदाट जंगल, असीम जिद्दीचे बाबा, प्रकाशभाऊ–मंदाताई या राम-सीतेच्या जोडीचे जगावेगळे कार्य, अपार कष्ट करणारे कुष्ठरोगी, वडाच्या झाडाखालचा दवाखाना, माडिया-गोंड आदिवासी, आश्रमशाळा, कन्ना-पांडू–माडिया हे आदिवासींमधले पहिले डॉक्टर, वन्यप्राणी अनाथालय, नक्षली भाग, नद्या, नाले अशी नानाविध चित्रे डोळ्यासमोर येतात. एकेकाळी कुणालाही माहीत नसलेला लोक बिरादरी प्रकल्प आणि त्या अनुषंगाने भामरागड भागाची माहिती आज जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचली आहे ते फक्त डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आमटे आणि त्यांच्या निःस्वार्थी कार्यकर्त्यांमुळेच.

उघड्यावर सुरू केलेला दवाखाना आज अत्याधुनिक झाला आहे, २५-३० माड़िया मुलांना घेऊन झाडाखाली सुरू झालेल्या आश्रमशाळेमधे आज ६५० आदिवासी मुलं-मुली विनामूल्य शिक्षण घेत आहेत, शिकार होण्यापासून वाचविलेल्या माकडाच्या पिल्लापासून सुरुवात झालेल्या वन्यप्राणी अनाथालयात आज १००पेक्षा अधिक प्राणी जगत आहेत. १५-२० कार्यकर्त्यांपासून सुरू झालेल्या ‘बिरादरी‘त आज ३००हून अधिक लोक अभिमानाने काम करीत आहेत. एवढेच काय, तर केरोसिन जनरेटरवर रामायण पाहणारी बिरादरी आज थ्री-जी वाय-फायपर्यंत येऊन पोहोचली आहे. बिरादरीच्या कार्याचा आज बराच विस्तार होत आहे. आधुनिक आरोग्य सुविधा, तलाव बांधणी, इंग्लिश माध्यम शाळा, बचत गट याबरोबरच एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम लोक बिरादरी दवाखान्याअंतर्गत राबवण्यात येतो, तो म्हणजे 'सामुदायिक आरोग्य कार्यक्रम'. या कार्यक्रमाविषयी जाणून घेण्याआधी सर्वप्रथम आपण भामरागड तालुक्याबद्दल थोडे जाणून घेऊ या.

महाराष्ट्राच्या अतिदुर्गम आणि ७५% वनक्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील छतीसगड सीमेलगत भामरागड हा तालुका आहे. पर्लकोटा, पमुलगौतमी, इंद्रावती, बांडिया या चार मोठ्या नद्यांनी आणि अनेक नाल्यांनी वेढलेला भामरागड हा १२१ गावांचा तालुका…. ३८८९९ लोकसंख्या. माडिया आदिवासींबरोबरच गोंड, गोवारी, परधान, हलबी आदिवासी आणि काही अंशी तेली-तामिळ बांधवांचे वास्तव्य येथे आहे. उन्हाळ्यात ४५ अंश से. तापमान, पावसाळ्यात धो-धो पडणारा पाऊस - पुराची स्थिती आणि हिवाळ्यात कडाक्याची थंडी. आलापल्ली ते हेमलकसा हा ६० किलोमीटरचा कच्चा रस्ता आज जरी तुटका-फुटका डांबरी झाला असला, तरी आतल्या गावांमध्ये जाण्यासाठी आजही जंगलवाटाच आहेत. काही अंशी वीज जरी पोहोचली असली, तरी बरीच गावे आजही अंधकारमय आहेत. पावसाळ्यामधे नद्या-नाले तुडुंब भरले की १२१ गावांपैकी ८५पेक्षा जास्त गावांचा आजही संपर्क तुटतो. मोबाइल नेटवर्कचा पत्ताच नाही. आतल्या वाटांवर दु-चार चाकी नेणे अशक्यच. साधा ताप, उलटी, हगवण जरी असेल तरी वेळेवर रुग्णालयात न पोहोचू शकल्यामुळे मृत्यूचे प्रमाण आहेच. मुख्य चार विषारी सापांपैकी नाग, घोणस आणि मण्यार यांमुळे होणारे मृत्यू आजही पाहायला मिळतात. अस्वल, रानडुक्कर, मगरी चावल्याचे पेशंट अधूनमधून वर्षभर येतच असतात. स्त्री-प्रधान संस्कृती असली, तरी मासिक पाळीदरम्यान कुर्माघरात विषारी सर्पदंश झालेल्या बाईला हात लावायला पुरुष येत नाहीत. गरोदर मातेचा दाईबाईवर असलेला गाढ विश्वास व वेळेवर डिलीव्हरीकरिता वाहन उपलब्ध नसल्याने आजही ५०% घरी बाळंतपणासाठी कारणीभूत आहे. गरोदरपणात ‘काय खावे’ यापेक्षा ‘काय खाऊ नये’ याचीच यादी मोठी असल्यामुळे एकूण जन्मांपैकी ५०% कमी वजनाची बाळे जन्माला येतात, आईची प्रकृती खालावते आणि परिणामी बाळही नंतर कुपोषित होते. पुजाऱ्यावर असलेला विश्वास आणि सामाजिक दबाव यामुळे योग्य उपचार न घेतल्याने व्यर्थ गेलेल्या वेळात साध्य रोगाचे असाध्य रोगात रूपांतर व्हायला वेळ लागत नाही. मोहाची दारू, ताड़ी, गोरगा, तंबाखू, खर्रा या मादक पदार्थांचा सेवानातिरेक वाढतच चालला आहे. संसर्गजन्य व्याधींबरोबरच असंसर्गजन्य व्याधींचे प्रमाणसुद्धा आता वाढीस लागले आहे.

एक ग्रामीण रुग्णालय, तीन प्राथमिक आरोग्य केंद्रे, १८ उपकेंद्रे असूनसुद्धा भामरागडसारख्या गरजू भागात आत्मीयतेने काम करणाऱ्या डॉक्टरांची संख्या नगण्यच. उपकेंद्र चालवणाऱ्या ए.एन.एम. या सर्व बाहेरच्याच. मग अशा वेळी आरोग्य सुविधा देणार तरी कशी? या सर्व बाबींचा विचार करता लोक बिरादरी प्रकल्पात सामुदायिक आरोग्य कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली. या अंतर्गत सहा छोटी आरोग्य केंद्रे स्थापन करण्यात आली. आरोग्य कार्यकर्ता म्हणून लोकांद्वारेच एकमताने स्थानिक माड़िया मुला-मुलींची निवड करण्यात आली. अट होती फक्त लिहिता-वाचता येण्याची. ४ सप्टेंबर २०१५ रोजी पहिले आरोग्य केंद्र पेनगुंडा येथे सुरू करण्यात आले आणि पाली लालसू महाका हिला लोकमताने आरोग्य सेविका म्हणून निवडण्यात आले. लोक बिरादरी ते पेनगुंडा हे अंतर फक्त २० किलोमीटर, पण जायला लागणारा वेळ एका तासापेक्षा जास्तच व हाच वेळ पावसाळ्यात दुप्पट होतो. सुरुवातीचा फक्त चार किलोमीटरचा डांबरी रस्ता नंतर हळूहळू कच्च्या रस्त्यातआणि शेवटी जंगलवाटेत परावर्तित होतो आणि सरतेशेवटी दिसते माती-शेणाने सारवलेले स्वच्छ पेनगुंडा आरोग्य केंद्र. पाली ही आरोग्य सेविका म्हणून जरी २०१५पासून कार्यरत असली, तरी ती लोक बिरादरीशी २०१० सालापासूनच जोडली गेलेली आहे.
लहानपणापासूनच शिकण्याची आवड असलेली पाली, घरापासून ७ कि.मी. अंतरावर असलेल्या आश्रमशाळेत राहून शिक्षण घेत होती. आठवीपर्यंतचे शिक्षण झाल्यावरही शाळा काही कारणास्तव बंद पडली व पालीस पुढे लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेत दाखला घ्यावा लागला. एकाच ठिकाणी राहणे, खाणे आणि वर्ग असणाऱ्या या आश्रमशाळेमध्ये पोषक आहाराच्या कमतरतेमुळे आरोग्यासंबंधी बऱ्याच अडचणी यायच्या. नववीचे शिक्षण पूर्ण होऊन पाली जेव्हा दहावीच्या वर्गात गेली, तेव्हा ती वारंवार आजारी पडू लागली. शाळेमध्ये पालीचे वारंवार आजारी पडणे तिच्या वडिलांना पटले नाही आणि म्हणून पालीची इच्छा नसतानाही केवळ वडिलांच्या आग्रहास्तव शिक्षण व शाळा सोडून घरी यावे लागले. पुढे शासकीय रुग्णालय, नागपूर येथे पालीला तीव्र रक्ताल्पता असल्याचे निदान झाले व त्यावर उपचार केले गेले. या सर्वांमध्ये मात्र पालीचा बराचसा शैक्षणिक वेळ गेलेला होता व तिला परत आजारी करण्यासाठी शाळेत पाठवण्यास तिच्या वडिलांचा विरोध कायम होता. या विरोधासमोर आजारी पालीस नमते घ्यावे लागले आणि म्हणूनच तिला तिच्या ९व्या वर्गाच्या शिक्षणावरच समाधान मानावे लागले.

पालीमध्ये शिक्षणाकरिता जिद्द व तीव्र इच्छा तशीच कायम होती आणि म्हणूनच जेव्हा पुढे लोक बिरादरी प्रकल्पातर्फे गावांमध्ये आरोग्यासंबंधी काम करण्यासाठी मूलभूत शिक्षण घेतलेल्या मुली हव्या आहेत असा निरोप देण्यात आला, तेव्हा पालीने हे काम करण्यास उत्सुकता दाखवली. या वेळेपर्यंत पालीच्या वडिलांनाही पालीच्या शिक्षणाला विरोध केल्याची खंत जाणवू लागली होती. आज तिच्या वडिलांना शिक्षणाचे महत्त्व पटल्याने तिची दोन धाकटी भावंडे पुणे व नागपूर येथे आपले शिक्षण पूर्ण करीत आहेत. आणि म्हणूनच पालीच्या वडिलांनी तिला आरोग्य सेविकेचे काम करण्यास अजिबात विरोध केला नाही, उलट तिला पूर्ण सहकार्य करण्यास संमती दर्शवली.

घरच्यांच्या सहकार्याने व स्वजिद्दीमुळे सुरुवातीला पाली २०१०पासून पेनगुंडासहित एकूण ८ गावांमध्ये (पेनगुंडा, कुचेर, परायनार, महाकापाडी, गोंगवाडा, नेलगुंडा, घोटपाडी, बोडांगे) ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांचे व गरोदर मातेचे वजन करणे, बी.पी. घेणे व त्यांना रुग्णालयीन प्रसूतीकरिता प्रवृत्त करणे ही कामे नियमितपणे करत होती. पालीस लोक बिरादरी दवाखाना येथे याकरिता लागणारे प्रशिक्षण मिळाले होते. याच काळात पाली लोक बिरादरी दवाखान्यात दर वर्षी होणाऱ्या शस्त्रक्रिया शिबिरांत सहभागी होत असे.

फील्ड व्हिजिटला जाताना पाली


पुढे २०१५पासून आरोग्य केंद्र सुरू झाल्यावर लोक बिरादरीत पालीला अधिकतर प्रशिक्षण मिळाले. यात भामरागड तालुक्यात आधिक्य असणारे अगदी साधे (पण उपचार न केल्यास रौद्र रूप धारण करून व्यक्तीच्या जिवास धोका निर्माण करणारे) आजार - उदा., मलेरिया, उलटी, जुलाब याशिवाय खरूज, सरदी, खोकला, अंगदुखी, जखमा इत्यादी आजारांवर औषधी उपचार व बचावात्मक उपाय कसा करावा यावर भर देण्यात आला. शारीरिक परीक्षणासोबतच नाडी, बी.पी., श्वासगती, शरीर तापमान कसे घ्यावे हे शिकवण्यात आले. यासाठी लागणारी सर्व उपकरणेसुद्धा देण्यात आली. शिवाय जन्म, मृत्यू, डिलीव्हरी याची नोंदणी कशी करायची हेसुद्धा शिकवण्यात आले.

पाली आज आत्मीयतेने पेनगुंडा आरोग्य केंद्र चालवत आहे आणि केंद्रांतर्गत येणाऱ्या पाच गावांमध्ये आरोग्य सुविधा देत आहे. सर्व गावांतील लोक तिच्या आरोग्यासंबंधी कार्याने संतुष्ट आहेत.२०१५पासून आजवर पालीने ३५००पेक्षा जास्त रुग्णांवर प्राथमिक उपचार केले आहेत. 'Prevention is better than Cure' यानुसार पालीने आपल्या गावातील २५ वर्षे व त्यावरील लोकांचे बी.पी. स्क्रीनिंग (screening) केले. आज २१ बी.पी. पेशंट्स डॉक्टरच्या देखरेखीत तिच्याकडून नियमित गोळ्या घेत आहेत. पेनगुंडा केंद्रात नुकतेच गरोदर माता तपासणी क्लिनिक सुरू केले गेले आहे. यातआसपासच्या सर्व गावातील गरोदर माता तपासणीकरिता यायला लागल्याआहेत, याचे श्रेय पूर्णतः पालीलाच जाते.
याशिवाय ज्या रुग्णांना आपत्कालीन उपचारांची त्वरित गरज असते, अशांना दिवस-रात्रीचा कुठलाही विचार न करता पालीने स्वतः रुग्णालयात दाखल करून नीट उपचार सुरू होईस्तोवर सोबत केल्याची बरीच उदाहरणे आहेत.

पेनगुंडा आरोग्य केंद्रामध्ये पाली


पालीला तिच्या कामाबद्दल विचारल्यास ती आवर्जून सांगते की, “रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा म्हणून मला माझे काम खूप आवडते, मला लोक बिरादरीमध्ये प्रत्येक वेळेस खूप काही नवीन शिकावयास मिळते. लोक बिरादरी दवाखान्यामध्ये रुग्णावर उपचारही त्वरित केला जातो. लोक बिरादरीबरोबर काम केल्याने मला गावांमध्ये खूप मानदेखील मिळतो."

पाली नुकतीच टाटा स्टील या कंपनीने आयोजित केलेला सात दिवसीय Tribal Leadership Program (TLP) पूर्ण करून आली आहे. यात २१ राज्यांतून जवळपास १०० आदिवासी मुला-मुलींची निवड करण्यात आली होती. पाली ही त्यातील एक.

आदरणीय बाबा आमटे म्हणत की, “अडाणी समजल्या जाणाऱ्या आपल्या कोट्यवधीच्या समूहात किती अबोल प्रतिभा (Mute Militants) पडलेल्या असतील.” त्या अबोल प्रतिभेचे एक जिवंत उदाहरण म्हणजे पाली - लोक बिरादरीची बेअरफूट डॉक्टर..! पेनगुंडा केंद्रासारखेच आणखी ५ आरोग्य केंद्रे स्थापन केली गेली आहेत. पालीसारखेच आणखी पाच आरोग्य कार्यकर्ते सामुदायिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत उत्तम काम करीत आहेत.

Tribal Leadership Program (TLP), पाचगणीमध्ये सहभागी पाली महाका

डॉ. लोकेश तमगीरे
डॉ. सोनू मेहेर
sonu.mehar@yahoo.com
lokeshtamgire9lbp@gmail.com

श्रीगणेश लेखमाला २०१९

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

7 Sep 2019 - 7:54 am | कुमार१

अभिनंदन व शुभेच्छा !

ज्ञानोबाचे पैजार's picture

7 Sep 2019 - 8:29 am | ज्ञानोबाचे पैजार

पाली महाका यांना अनेक अनेक शुभेच्छा आणि आपल्याला मनःपूर्वक धन्यवाद
पैजारबुवा,

मित्रहो's picture

7 Sep 2019 - 9:08 am | मित्रहो

पाली महाका यांच्या कार्याला प्रणाम. त्यांच्या हातून अशीच सेवा घडत राहो ही सदिच्छा.
त्यांची ओळख करुन दिल्याबद्दल तुमचे आभार.

यशोधरा's picture

7 Sep 2019 - 9:09 am | यशोधरा

अतिशय प्रेरणादायक.
पालीची ओळख करून दिल्याबद्दल आभार.

प्राची अश्विनी's picture

10 Sep 2019 - 8:00 am | प्राची अश्विनी

हेच म्हणते.

सुधीर कांदळकर's picture

7 Sep 2019 - 11:11 am | सुधीर कांदळकर


“रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा म्हणून मला माझे काम खूप आवडते,

वा! किती सुंदर विचार! माझी एक आगाऊपणाची पण नम्र सूचना आहे. जिथे जिथे महाजालसेवा उपलब्ध असेल तिथे तिथे पालीला जरूर असेल तेव्हा पालीला पेशन्टसाठी लेखी वैद्यकीय सल्ला उपलब्ध करावा. म्हणजे तिने लक्षणे मेसेज करावीत, डॉक्टरांनी तिला समजेल अशा भाषेत उपचार मेसेज करावेत.

नुकतेच चित्रवाणीवर बिहार की झारखंडमधल्या एका अल्पशिक्षित आदिवासी बेअरफूट डॉक्टरला पाहिले होते. त्याची आठवण झाली.

सुरेख लेखाबद्दल अनेक, अनेक धन्यवाद.

जालिम लोशन's picture

7 Sep 2019 - 12:50 pm | जालिम लोशन

सुरेख

पैलवान's picture

7 Sep 2019 - 1:25 pm | पैलवान

1

नावातकायआहे's picture

14 Sep 2019 - 2:37 pm | नावातकायआहे

+१

सामान्यातील असामान्यत्व लखलखते, ते असे!

पद्मावति's picture

7 Sep 2019 - 2:57 pm | पद्मावति

अत्यंत प्रेरणादायक __/\__

जॉनविक्क's picture

7 Sep 2019 - 3:04 pm | जॉनविक्क

मस्त

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Sep 2019 - 3:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

गौरवशाली आणि प्रेरणादायक कार्यकर्ती !

श्वेता२४'s picture

7 Sep 2019 - 3:30 pm | श्वेता२४

आदरणीय बाबा आमटे म्हणत की, “अडाणी समजल्या जाणाऱ्या आपल्या कोट्यवधीच्या समूहात किती अबोल प्रतिभा (Mute Militants) पडलेल्या असतील.” त्या अबोल प्रतिभेचे एक जिवंत उदाहरण म्हणजे पाली - लोक बिरादरीची बेअरफूट डॉक्टर..!
_/\_

ज्योति अळवणी's picture

7 Sep 2019 - 10:00 pm | ज्योति अळवणी

अत्यंत प्रेरणादायी आयुष्य आहे पालीचे. त्यांची ओळख करून दिल्याबद्दल आपले आभार

राजेंद्र मेहेंदळे's picture

7 Sep 2019 - 11:01 pm | राजेंद्र मेहेंदळे

बेअरफुट डॉक्टरची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

पियुशा's picture

9 Sep 2019 - 11:57 am | पियुशा

प्रेरणादायी __/\__

अनिंद्य's picture

10 Sep 2019 - 11:13 am | अनिंद्य

@ लोकेश तमगीरे,

पाली महाकाची ओळख करून दिल्याबद्दल आभार.
अशी माणसे आपल्या समाजात आहेत, अभिमान वाटतो, दिलासाही.

कौतुकास्पद आहे हे काम. उत्तम लेख.

मार्गी's picture

12 Sep 2019 - 7:08 pm | मार्गी

खूप मोठं काम आहे हे! इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद!

एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची छान ओळख करून दिलीत 🙏

नाखु's picture

14 Sep 2019 - 12:32 pm | नाखु

आणि आपण मिपाकरांना ओळख करून दिली त्याबद्दल धन्यवाद.