संवाद

अन्या बुद्धे's picture
अन्या बुद्धे in जनातलं, मनातलं
4 Jun 2019 - 10:14 am

खूप जुना किस्सा आहे.. 1996-97चा..

आमच्याकडे एक माळी होता बागकाम करायला. आई त्याला पगार देत नसे. त्याच्या नावे तिने अकाउंट ओपन करून दिलेलं. त्यात ती भर टाकत असे. एके दिवशी आईने मला सांगितलं, तो बँक जवळ येईल त्याला पैसे काढून दे.

मी ठरल्यावेळी तिकडे थांबलो. त्याला यायला उशीर लागला. कंटाळून सिगारेटच्या टपरीकडे गेलो. सिगरेट अर्धी झाली असतानाच तो आला.. आमच्यात झालेला संवाद असा..

थोडं थांब. सिगरेट संपली की जाऊ बँकेत. तुला घेऊ सिगरेट?

नको. मी नाय वडत. सिगरेट तमाखू कायच नाय. दिवसभर काम केलं की 200 भेटतात. त्यात दारू सिगरेट साठी कुठे खर्चु?

चांगलंय.. हे तुला आता समजतंय हे बरोबर. पण गावाकडे लोक 12-13 वयापासून विडी तंबाखू सुरु करतात. तुला तेंव्हा का वाटलं की आपण विड्या फुकू नये?

सवयच नाय ना मला..

अरे पण का?

कधी गेलोच नाय त्या वाटेला..

बराच वेळ वेगवेगळ्या प्रकारे विचारून पण तो 'कारण' सांगेच ना. सवयच नाय, वडलीच नाय असं सांगत राहिला. बापाने बडवला, आईने शपथ घातली वगैरे सांगितलं असतं या पैकी काही ऐकायची अपेक्षा होती. अगदी स्वप्नात शंकराने येऊन सांगितलं महाशिवरात्रीला.. व्यसनापासून दूर रहा म्हणून नाही असं ऐकलं असतं तरी चाललं असतं कारण ते मला न पटणारं का असेना पण 'कारण' असतं.

नन्तर तर मला प्रश्न पडायला लागला.. मी मराठीच बोलतोय ना? साधं हे बोलणं का नीट होत नाहीये?

नन्तर किडा वाढला डोक्यातला.. गावगाड्यात सगळ्यात तळाशी असलेल्या माणसापासून ते घराबाहेर कधी न पडलेल्या बाई पर्यन्त सगळ्यापर्यंत स्वातंत्र्य, समता वगैरे विषय गांधीजी, सावरकर, टिळक वगैरे लोकांनी कसे पोचवले असतील? कशा प्रकारचं कम्युनिकेशन असेल ते!

- अनुप

मुक्तकसमाज